उंच पताका झळकती ।टाळ मृदंग वाजती ।
आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ॥१॥
आले हरीचे विनट । वीर विठ्ठलाचे सुभट ।
भेणें जाहले दिप्पट । पळति थाट दोषांचे ॥२॥
तुळसीमाळा कंठी । गोपीचंदनाच्या उटी ।
सहस्त्र विघ्नें लक्ष कोटी । बारा वाटा पळताती ॥३॥
सतत कृष्णमूर्ति सांवळी । खेळे ह्रदयकमळीं ।
शांति क्षमा तया जवळी । जीवेंभावें अनुसरल्या ॥४॥
सहस्त्र नामाचे हातियेर । शंख चक्राचे श्रृंगार ।
अतिबळ वैराग्याचे थोर ।केला मार षड्रवर्गां ॥५॥
ऐसें एकांग वीर । विठ्ठल रायाचें डिंगर ।
बाप रखुमादेवीवर । तींही निर्धारी जोडिला ॥६॥
अर्थ:-
या अभंगांत भगवत् भक्तांची लक्षणे सांगतात ज्यांच्या खांद्यावर उंच पताका झळकतात. टाळ मृदंग वाजतात असे ते पवित्र विठ्ठलाचे भक्त आनंदाने भगवन्नामाची गर्जना करतात. हरिच्या भक्तिने नटलेले विठ्ठलाचे वीर आलेले पाहून दोषांचे समुदाय दशदिशेला पळून गेले. ज्यांच्या गळ्यांत तुळशीच्या माळा शोभतात. ज्याच्या अंगाला गोपीचंदनाची उटी आहे. अशा वैष्णवाला पाहून कोट्यवधी विघ्ने बारा वाटा पळून जातात. त्या वैष्णवांच्या हृदयरुपी कमलांत भगवान श्रीकृष्णाची सांवळी मूर्ति खेळत असल्यामुळे शांति क्षमा आपल्या जीवभावाने त्याच्या जवळ येऊन राहिल्या. वैष्णव वीरांच्या हातातली शस्त्रे म्हणजे भगवन्नामाची सहस्रनामे असून त्यांचे शंख चक्र हे शृंगार तसेच वैराग्याचे बळ त्यांच्या अंगात असल्यामुळे काम क्रोधादि षड्वर्गाचा त्यांनी नाश केला आहे. वैष्णववीरांनी आपले शरीर फक्त परमात्म्याकरिताच अर्पण केले आहे. असे विठ्ठलरायाचे आवडते शूर भक्त त्यांनी माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना निर्धाराने आपलासे करुन घेतले. असे असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.