तिही त्रिपुटीचे वाडेरे ।
सवालक्ष चरावया जायरे ।
ते दैत्यापाठी हुंबरत लागेरे ।
भक्ता घरीं दुभे सानुरागेरे कान्हो ॥१॥
तिचें नाम शांभवी आहेरे ।
तिची रुपरेखा कायरे कान्हो ॥२॥
येकी चौमुखी गाय पाहेरे ।
तिचा विस्तार बहु आहेरे ।
तिच्या नाभिकमळीं जन्म वासु सांगेरे ।
तिसी आदि पुरुषु बापमायेरे कान्हो ॥३॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलु पाहीरे ।
ते भक्ता ओळली आहेरे ।
ते दोहतां भरणा पाहेरे ।
चारी धारा वर्षत आहेरे कान्हो ॥४॥
अर्थ:-
भोक्ता, भोग्य, भोग इत्यादि त्रिपुटीचा व्यवहार चालणारे तिन्ही लोक हे तिचे वाडे आहेत. व जी आपण ‘सवालक्ष चरावया जाये रे’ म्हणजे तिच्याकडून दररोज सवालक्षाची घडामोड होते. व जी गाय दैत्यांच्या पाठीमागे त्याला मारण्याकरिता हुंबरत म्हणजे ओरडत असते. आणि आपल्या भक्ताच्या घरी मात्र मोठ्या प्रेमाने दूध देते. तिचे नाव शांभवी असे आहे. तिची रूपरेखा सांग पाहू काय आहे ती? एक चौमुखी म्हणजे ब्रह्मदेव गाय आहे. ती तूं पहा. जिचा विस्तार फार मोठा आहे. म्हणजे सर्व जगत जिचा विस्तार आहे. तिच्या नाभिकमळी जन्म असून,आदिपुरूष परमात्मा तिचे आईबाप आहेत. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना पाहा. त्यांना पाहिले असता ते भक्ताला प्रसन्न होऊन धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष अशा चार धारांनी वर्षाव करतात असे माऊली सांगतात.
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.