पैल तो गे काऊ कोकताहे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १८८

पैल तो गे काऊ कोकताहे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १८८


पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकूनगे माये सांगतसे ॥१॥
उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें
मढीन पाऊ ।
पाहुणे पंढरीराऊ घरा कैं येती ॥२॥
दहिंभाताचीं उंडी लाविन तुझ्या तोंडी ॥
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥
दुधें भरुनी वाटी लावीन तुझे वोंठी ।
सत्य सांगे गोठी विठो
येईल कायी ॥४॥
आंबयां डाहाळीं फ़ळें चुंबी रसाळीं ।
आजिचेरे काळीं शकून सांगे ॥५॥
ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणें ।
भेटती पंढरीराणे शकून सांगे ॥६॥

अर्थ:-

एक विरहिणी, विरहाने दुःखित होऊन बसली असता आपल्या घरांवर पलीकडच्या बाजूला कांवळा कोकू लागला. तो शुभ शकुन सांगतो आहे.असे समजून शुभशकुन सांगणाऱ्या कावळ्याला म्हणते उड रे उड काऊ, तुझे पाय सोन्याने मढविन पण एवढे सांग की माझ्या घरी पंढरीराव पाहुणे कधी येतील. दहीभाताची उंडी करून तुला खाऊ घालीन पण जीवाला प्रिय असणाऱ्या पंढरीरायांची गोडी केंव्हा प्राप्त होईल. ते लवकर सांग.दुधाने वाटी भरून तुझ्या ओठाला लावीन पण तो विठोबाराय माझ्या घरी येईल काय हे खरे सांग.आंब्याच्या डहाळीला आलेली रसाळ फळे ही चाख, पण आजच्या वेळी मला शुभशकुन सांग. अशा त-हेची तळमळ लागली असता पंढरीराजे भेटतील, असा शकुन सांग.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


पैल तो गे काऊ कोकताहे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १८८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

View Comments

  • अप्रतिम शब्द, माऊलीची कृपा आहे आम्हा महाराष्ट्र वासिया वर की ते या देशात जन्मले 🙏