पूर्वप्राप्ती दैवयोगें पंगु जालों मी अज्ञान – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १०३३
पूर्वप्राप्ती दैवयोगें पंगु जालों मी अज्ञान ।
विषय बुंथी घेऊनियां त्याचें केलें पोषण ।
चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान ।
अवचटें गुरूमार्गे प्रगट ब्रह्मज्ञान ॥१॥
दाते हो वेग करा कृपाळुवा श्रीहरि ।
समता सर्व भावी शांती क्षमा निर्धारीं ।
सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥
शरण रिघे सद्गुरू पायां पांग फिटेल पांचाचा ।
पांगुळलें आपेंआप हा निर्धारू पैं साचा ।
मनामाजीं रूप घाली मी माजी तेथें कैंचा ।
हरपली देहबुद्धि एकाकार शिवाचा ॥३॥
निजबोधे धवळा शुद्ध यावरी आरूढ़ पैं गा ।
क्षीराब्धी बोध वाहे तेथें जाय पां वेगा ।
वासना माझी ऐसी करी परिपूर्ण गंगा ।
नित्य हे ज्ञान घेईं अद्वैत रूपलिंगा ॥४॥
पावन होशी आधी पांग फिटेल जन्माचा ।
अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा ।
पांडुरंग होसी आधीं फळ पीक जन्माचा ।
दुष्ट बुद्धि वेगी टाकी टाहो करी नामाचा ॥५॥
ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना ।
मुराले ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना ।
दृश्य हे लोपलें बापा परती नारायणा ।
निवृत्ति गुरू माझा लागो त्याच्या चरणा ॥६॥
अर्थ:-
पुर्वजन्मी संपादन केलेली कर्मे हेच जे दैव त्या योगाने मला अज्ञान हाच कोणी पंगुपणा आला. पुढे विषयांचा बुरखा घेऊन त्या ज्ञानाचे मी पोषण केले. जरी स्वधर्माचरणाप्रमाणे मी वागत होतो. तरी त्यामध्ये आत्मज्ञानाचा विसरच पडला. पण माझ्या पूर्व पुण्याईमुळे मला सद्गुरूंची भेट झाली.त्यामुळे त्यांच्या उपदेशाने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. तुम्ही लवकर या दयाळू, श्रीहरिला प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करा. प्रयत्न करीत असतां सर्व ठिकाणी एक परमात्माच भरला आहे, अशी मनामध्ये समता ठेवा. तसेच निर्धाराने शांती क्षमा मनामध्ये धारण करा, त्यामुळे चित्त व विषय यांची बसलेली गाठ सुटून जाईल. म्हणजे चित्तातील विषय दूर होतील. पक्षी जसा आकाशांमध्ये जलद भ्रमण करतो. त्याप्रमाणे तुम्ही ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करा. तो प्रयल स्वबुद्धिने न करता सद्गुरूंना अनन्यभावाने शरण जाऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा म्हणजे तुम्ही पंच विषयाच्या तावडीतून सुटाल असे झाले म्हणजे आपोआपच देहांतील वासना बंद पडतील.याकरिता मनामध्ये श्रीहरिचे रूप धारण करा. म्हणजे तुमच्या ठिकाणची हा मी आहे व हे माझे आहेत. अशा त-हेची जी देहमूलक अहंमम बुद्धि ती नाहीशी होऊन तुम्ही शिवरूपच व्हाल. म्हणून परमात्माबोध हाच एक शुद्ध पांढरा नंदी त्यावर बसून क्षीराब्धीमध्ये वास करणाऱ्या परमात्मरूपी लिंगाच्या भेटीला त्वरित जा म्हणजे जी परमात्मप्राप्तीची वासना ती गंगेप्रमाणे परिपूर्ण होऊन जाईल. एवढ्याकरिता सतत आत्मज्ञानाचे चिंतन करून अद्वैतरूप लिंगाची प्राप्ती करून घे. त्यामुळे अनंत जन्माच्या संकटातून तूं मुक्त होशील. तसेच तुझे अंधत्व म्हणजे ज्ञानशून्यता पंगुत्व म्हणजे पांगळेपणा हे धर्म जाऊन विषयांची ग्रंथी सुटून जाईल.आणि त्यामुळे पवित्र होऊन जाशील इतकेच काय तूं पांडुरंगस्वरूप होशील व तुझ्या जन्माचे साफल्य होईल. याकरिता दुष्ट बुद्धि टाकून देऊन हरिनामाचा मोठ्याने टाहो फोड.वरीलप्रमाणे श्रीगुरूला शरण जाऊन आम्ही आत्मज्ञान प्राप्त करून घेतले. त्यामुळे आमची वासना पांगळी झाली. त्याचबरोबर अनादि जे परब्रह्म त्याचे ठिकाणी मन व ज्ञाता ज्ञेय हे सर्व धर्म नाहीसे होऊन गेले. दृश्य जगताचा मिथ्यात्वनिश्चय झाल्यामुळे त्याचा लय नारायण स्वरूपामध्ये झाला हे ज्या श्रीगुरू निवृत्तीरायांच्या कृपेने घडले. त्यांच्या चरणाला मी अनन्यभावाने वंदन करतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
पूर्वप्राप्ती दैवयोगें पंगु जालों मी अज्ञान – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग १०३३
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.