संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2022 महाराष्ट्रातून वारकरी आळंदीत दाखल
इंद्रायणीवर झालेली प्रचंड गर्दी…वैष्णवांचा भरलेला मेळा…हरिनामाचा गजर अशा भारलेल्या वातावरणात रविवारी (ता. २०) कार्तिकी एकादशीनिमित्त नगरप्रदक्षिणा करीत भक्तिरसात चिंब होत सुमारे तीन लाख वैष्णवांनी आपली वारी माऊलीच्या चरणी रुजू केली. देऊळवाड्यातून दुपारी माऊलींचा चांदीचा मुखवटा पालखीत ठेवून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता. २२) माउलींचा संजीवन समाधीदिन सोहळा होणार आहे. इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या जवळच्या दोन मजली दर्शनबारी उभारली आहे. कार्तिकी यात्रेच्या दरम्यान घातपाताची शक्यता होवू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा, तपासणी यंत्रणा बसवली आहे.
कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या भक्तीने अलंकापुरीतील कार्तिकीचा सोहळा सजला होता. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या वारकऱ्यांचा प्रवाह पूर्णतः इंद्रायणीच्या काठावर विसावला. आज कार्तिकी एकादशी असल्याने पायी दिंडीतून, एसटी, पीएमटी तसेच खासगी वाहनांनी लाखो भाविक आळंदीत दाखल झाले. पूर्ण निर्बंधमुक्त वारी यंदा भरल्याने वैष्णवांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त घाटावर पहाटेपासून वारकऱ्यांनी स्नानासाठी गर्दी केली होती. बोचऱ्या थंडीची तमा वारकऱ्यांनी बाळगली नाही. नगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी स्नानगृहे उभारली होती. त्याचा चांगला वापर झाला.
दुपार एकच्या सुमारास देउळवाड्यातून माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. हजेरी मारुती मंदिरात पालखीने विसावा घेतला. यावेळी संत नामदेव महाराजांची पालखीही तेथे प्रदक्षिणा करून अगोदरच पोचली होती. तेथे संत नामदेव आणि माऊलींच्या पालखीसमोर बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार यांनी दिंड्यांच्या हजेऱ्या घेतल्या. त्यानंतर माऊलींची पालखी प्रदक्षिणा रस्त्याने हरिहरेंद्र स्वामी मठामार्गे मंदिरात पोचली.
आळंदीत येण्यासाठी भाविकांचा ओघ रविवारी दुपारनंतर वाढला. खासगी वाहने, पीएमपी, एसटीची वाहतूक यामुळे पुणे आळंदी मार्गावर अलंकापुरमपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आळंदीत येणाऱ्या सर्व रस्त्यांवर पासशिवाय कोणतेही वाहन सोडले जात नव्हते. त्यामुळे पासची माहिती नसणाऱ्या वाहनचालकांना नाकाबंदी केलेल्या ठिकाणांजवळ वाहने उभी करून चालत आळंदीत जावे लागले. सायंकाळनंतर येणाऱ्या भाविकांचे प्रमाण वाढल्याने कोंडीत वाढ होत गेली.
आकर्षक फुलांची सजावट…रंगीबेरंगी विजेच्या माळांचा झगमगाट…आकर्षक रांगोळी… सनईचा मंजूळ स्वर…अशा मंगलमय वातावरणात संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून अकरा ब्रम्हवृंदांनी केलेल्या मंत्रघोषात कार्तिकी एकादशीनिमित्त माउलींना पंचामृताने विधीवत पवमान अभिषेक करण्यात आला. पुजारी वेदमूर्ती प्रसाद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अकरा ब्रम्हवंदाच्या वेदघोषात अभिषेक केला. सिद्धेश्वर मंदिरात मुरलीधर प्रसादे यांच्याकडून रुद्राभिषेक करण्यात आला. कार्तिकी एकदशीच्या महापूजेसाठी दर्शनबारी बंद केल्यानंतर पहिल्या जोडप्याला दिला जाणारा पूजेचा मान यंदा सीआरपीएफ जवान गोरक्षनाथ बाळासाहेब चौधरी (वय २९) आणि आयटी कर्मचारी सविता गोरक्षनाथ चौधरी या दांपत्यास मिळाला. याबाबत चौधरी म्हणाले, ‘‘आमच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहे. मी सीआरपीएफमध्ये छत्तीसगड येथे कार्यरत आहे. दोन दिवसांपूर्वीच आलो. आळंदीला दर्शनासाठी आलो होतो, सायंकाळी पाचला रांगेत थांबलो, पाच तासानंतर आम्हाला थेट महापूजेचा मान मिळाल्याचे कळाले. महापूजा करायला मिळेल, हे स्वप्नात पण वाटले नव्हते.’’
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
source: tv9marahi, sakal
View Comments
समाधी सोहळ्याची सविस्तर माहिती देणे