मतमांतांतरें रचूनियां ग्रंथु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५९
मतमांतांतरें रचूनियां ग्रंथु ज्ञानव्युत्पत्ति
जंव जाली नाहीं आत्मप्रतिती ।
ये सकळ विज्ञानें विषयासक्तीचेनि अनुमानें
तेणें केंवि तुटे संसृती ।
अंतरींचा स्फुलिंग जाज्वल्य जाणतां
कामक्रोधाचिया उपपत्ती ।
बाह्य दीक्षा उदंडी आणुनिया तेणें
केविं होय ब्रह्मप्राप्ती रया ॥१॥
सुटलेपणें करिसी विषय त्याग
तेणें अंतरीं होय अनुराग ।
परतोनि तरीच पावशी ब्रह्म भाग रया ॥२॥
आपुलेनि रुढपणें ग्रंथाचे विज्ञानें
संपदा मिरविती ज्ञातेपणें ।
अंतरी आशापाश विखार भरणें
जगीं संतता मिरवणें ।
येणें द्वारें म्हणसी मी वंद्य जगीं कीं
उपासनाद्वारें मुक्त होणें ।
पालट केलिया साठीं सिणो नको
बापा जेविं गधर्व नगरीं वस्ती करणें रया ॥३॥
यालागी दंभ दर्प सकळ प्रतिष्ठादि
भ्रांति धनदाराविषयासक्ती ।
ऐसा अहंममते ज्ञातेपणाचेनि अहंकारें
तेणें केविं होय आत्मप्राप्ती ।
जंव येणें देहें विनीतता शरण
गेला नाहीं संताप्रती ।
बापरखुमादेविवरु विठ्ठलु चिंतितां ।
सर्व सुखाची होय निजप्राप्ती रया ॥४॥
अर्थ:-
मतमतांतर मांडुन अनेक ग्रंथ केले पण आत्मप्रतिती आली नाही त्यामुळे ही सर्व ज्ञाने विषयासक्त ज्ञान आहे त्या अनुमानाने संसारज्ञान कसे सुटेल. अंतरात काम क्रोध असताना बाहेरुन उदंड दिक्षा घेतल्या तरी ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल. जर हे विषय अंतरातुन त्यागलेस तरच तुझ्या अंतरात अनुराग येईल. व तुला आत्मब्रह्म लाभेल.आपण रचलेल्या ग्रंथांच्या मुळे मी ज्ञानी हा डांगोरा जर पिटशील तर अंतरात आशापाशांचे निखारे भरशील. मी संत आहे अशी संतता मिरवणे मी ज्ञानी असुन मला वंदन करा हे सांगणे व उपासनेने मी मुक्त होईन हे सांगणे म्हणजे वायाच शिणणे आहे. त्यामुळे गंधर्वनगरीत वस्ती करावी लागेल. सर्व विषय, दंभ, दर्प, प्रतिष्ठा, भ्रांती, धनदारा, विषयासक्ती, ह्या अहंतेमुळे व ज्ञातेपणाच्या सोगांमुळे तुला आत्मप्राप्ती कशी होईल. त्यासाठी विनीत होऊन तुला संतांना शरण जावे लागेल. व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सर्व सुखाची निजप्राप्ती होते असे माऊली सांगतात.
मतमांतांतरें रचूनियां ग्रंथु – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ४५९
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.