कल्पना वृक्षासी देखिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६२
कल्पना वृक्षासी देखिलें ।
चिंतामणीस चिंतिलें ।
कामधेनुसी आपेक्षिलें ।
जीण्या जिवविलें तेंचि हरिरुप पंढरिये ॥१॥
धन्य कुळ धन्य जन्म ।
जयासि पंढरीचा नेम ।
चित्तीं अखंड विठ्ठल प्रेम ।
ते धन्य भक्त भूमंडळी ॥ध्रु०॥
तोचि तीर्थरुप सदा ।
तया दोष न बाधिती कदां ।
जो रातला परमानंदा ।
तेथें सर्व सिध्दि वोळंगती ॥२॥
ऐशीं वेदशास्त्रीं पुराणीं ।
जो रातला नामस्मरणीं ।
धन्य तया तीर्थ पर्वणी ।
धन्य वाणी तयाची ॥३॥
पंढरीसी कीर्तन करी ।
पुंडलिकासी नमस्कारी ।
विठ्ठल चरण अंतरी धरी ।
धन्य जन्म तयाचा ॥४॥
सकळ कुळाचा तारकु ।
तोचि जाणावा पुण्यश्लोकु ।
पांडुरंगी रंगला निशंकु ।
धन्य जन्म तयाचा ॥५॥
त्यासी अंतीं वैकुंठप्राप्ती ।
ऐसें शुकें सांगितलें परीक्षिती ।
जे जे हरिचरणीं भजती ।
ते ते पावती वैकुंठ ॥६॥
मानें स्फ़ुंदत नाचत रंगणीं ।
प्रेम विठ्ठल चरणीं ।
सर्व सुख खाणी ।
बाप रखुमादेवीवर विठ्ठल ॥७॥
अर्थ:-
जसा एखाद्याला कल्पतरु लाभावा. किंवा चिंतिलेले देणारा चिंतामणी मिळावा, अथवा मनातील कामना पूर्ण करणारी, कामधेनु जसी लाभावी. त्याप्रमाणे जीवाला खरा अर्थ प्राप्त करुन देणारा तो श्रीहरि परमात्मा पंढरीक्षेत्रांत असून ज्याचे चित्तात विठ्ठला विषयी अखंड प्रेम असून ज्याचा पंढरीचे वारीचा नेम आहे. त्याचे कुळ धन्य त्याचा जन्म धन्य त्रैलोक्यात तोच एक धन्य समजावा. तोच तीर्थरुप समजावा, निर्दोष पुरुष तोच समजावा, सतत भगवन्नामा मध्ये रंगलेल्या पुरुषाल कसलीही पातके लागू शकत नाही. इतकेच काय सर्व रिद्धीसिद्धी. त्याला लोटांगण घालीत त्याच्याकडे येत असतात.नामस्मरणांत रंगलेल्या पुरुषाचे वर्णन वेदशास्त्रांनी व पुराणांनी केलेले आहे. असा तो भगवद् भक्त वारकरी धन्य होय त्याची वाणी पवित्र समजावी.ज्याच्या मुखाने ती अक्षरे ऐकावयास मिळतील ती तीर्थपर्वणी समजावी. पंढरीला जाऊन वाळवंटात जो कीर्तन करतो व पुंडलिकरायांचे जो दर्शन करतो त्याचा जन्म धन्य होय. तो सर्व कुळांचा तारक असून पुण्यवान आहे तो पांडुरंगाशी पुर्ण रंगलेला आहे म्हणुन त्याचा जन्म धन्य होय. जे त्याच्या चरणांची सेवा करतील त् वैकुंठाला प्राप्त होतील असे शुक्राचार्यानी परिक्षिती राजाला श्रीभागवतात सांगितले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते भगवत्भक्त कीर्तनात रंगन जाऊन आनंदाने नाचतात. व कंठ दाटून त्यांना आनंदाचे भरते येते असे माज़े पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगरायाचे चरणी प्रेम ठेवून समाधानांत राहातात. असे माऊली सांगतात.
कल्पना वृक्षासी देखिलें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ६२
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.