आधी चरे पाठी प्रसवे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २०१
आधी चरे पाठी प्रसवे ।
कैसी प्रतिदिनी गाभास जायेरे ।
विउनियां वांझ जालीरे ।
ती उन्हाळा मासां वोळलीरे कान्हो ॥१॥
दुहतां पान्हा न संवरेरे ।
पैल पर्वता सुटले झरेरे कान्हो ॥२॥
मोहें वाटायाच्या चा़डेरे ।
दोहीं तयावरि पडेरे ।
वत्स देखोनि उफ़राटी उडेरे ।
तया केलीया तिन्ही बाडेरे कान्हो ॥३॥
तिहीं त्रिपुटी हे चरतां दिसेरे ।
तिहीं वाडियां वेगळी बैसेरे ।
ज्ञानदेव म्हणे गुरुतें पुसारे ।
ते वोळतां लयलक्ष कैसेरे कान्हो ॥४॥
अर्थ:-
या अभंगामध्ये मनरूपी गाय असून ती अगोदर चरते, म्हणजे मनोरथ करते नंतर ती प्रसवते. म्हणजे त्या संकल्पाप्रमाणे जीवाला क्रिया करण्यास प्रवृत्त करते. अशा रितीने ती दररोज गाभाला जाते. परंतु जीवाचे ते संकल्प तृप्त न झाल्यामुळे शेवटी ती मनरूपी गाय वांझ असल्याप्रमाणे होते. परंतु पूर्व पुण्याईने सद्गुरूची भेट होऊन त्यांनी मनाला उपदेश केला म्हणजे निर्विषय जे ब्रह्म त्याठिकाणी ती लठ्ठ होते. म्हणजे तद्रुप होते. ब्रह्म सर्वात मोठे आहे. ती तद्रुप झाल्यामुळे लठ्ठ झाली. अज्ञानदशेत तिचा पान्हा दोहन करू लागले असता म्हणजे संकल्पाचा विचार करू लागले असता ते आकलन न होता जणू काय पर्वताला धारा सुटल्याप्रमाणे ते प्रतितीला येतात. मोहाने तिला चाटावयास गेले तर ती दोही म्हणजे दोहन करणाऱ्यावर पडते म्हणजे अधिकच संकल्प रचते. मात्र गुरूकृपेने मनांचे ठिकाणी बोध झाला तर त्याला पाहून नाहीसी होते. म्हणजे मनरूपाने राहात नाही. अज्ञानदशेत तिला राहण्याकरिता भोग्य, ती उलट भोग, भोक्ता ही त्रिपुटीरूपी वाडे केली आहे. ती या त्रिपुटीरूप तीन वाड्यामध्ये चरताना दिसते. परंतु बोध झाल्यामुळे या त्रिपुटीहून लांब जे ब्रह्म तेथे बसते. ती गाय कोणती हे श्रीगुरूंना जाऊन विचारा.व ती प्रसन्न झाली म्हणजे सर्वदोषविवर्जित झाली असता जीवाचे लक्ष्य जे आत्मस्वरूप त्याचे ठिकाणीच तिचा लय होतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
आधी चरे पाठी प्रसवे – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २०१
संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड करा.