दासबोध दशक पहिला विडिओ आणि ऑडिओ सहित
समास १ ते ५
अर्थ समास १ ते ५
समास ६ ते १०
अर्थ समास ६ ते १०
॥ स्तवननाम दशक प्रथम ॥ १ ॥
दासबोध दशक पहिला – समास पहिला : ग्रंथारंभ
॥ श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १॥
ग्रंथाच्या सुरुवातीलाच श्रोते श्री सद्गुरू समर्थ रामदास स्वामींना विचारत आहेत की, आपण जो ग्रंथ सांगणार आहात त्याचे नाव काय आहे, यात काय सांगितले आहे आणि हा ग्रंथ श्रवण केल्याने काय लाभ होणार आहे? (१)
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद ।
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २॥
या प्रश्नावर समर्थ सांगतात की, या ग्रंथाचे नाव दासबोध असून यात गुरूशिष्यांच्या संवादातून भक्तिमार्गाचे स्पष्ट वर्णन करण्यात आले आहे. (२)
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्म निरोपण । निरोपिलें ॥ ३॥
नवविधा भक्तीचे स्वरूप, ज्ञानाची आणि वैराग्याची लक्षणे सांगून, विशेषतः अध्यात्मविद्येचे निरूपण यात केले आहे. (३)
भक्तिचेन योगें देव । निश्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथीं ॥ ४॥
भक्तीच्या योगानेच मनुष्यास निश्चितपणे ईश्वराची प्राप्ती होते, हाच या ग्रंथाचा मुख्य सिद्धांत आहे. (४)
मुख्य भक्तीचा निश्चयो । शुद्धज्ञानाचा निश्चयो ।
आत्मस्थितीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ५॥
मुख्यतः भक्तीचे स्वरूप काय, शुद्ध ज्ञान कशास म्हणावे, आत्मस्थितीची लक्षणे कोणती, याविषयीचे निःसंदेह प्रतिपादन या ग्रंथात केले आहे. (५)
शुद्ध उपदेशाचा निश्चयो । सायोज्यमुक्तीचा निश्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्चयो । बोलिला असे ॥ ६॥
या ग्रंथात उत्कृष्ट उपदेश कसा असतो, सायुज्यमुक्ती म्हणजे काय, मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी, यांविषयी ठाम मते मांडली गेली आहेत. (६)
शुद्धस्वरूपाचा निश्चयो । विदेहस्थितीचा निश्चयो ।
अलिप्तपणाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ७॥
शुद्ध स्वरूपस्थिती कशी असते, विदेहावस्था म्हणजे काय, अलिप्तपणा म्हणजेच निःसंगता कशा प्रकारे मिळवावी हे सांगितले आहे. (७)
मुख्य देवाचा निश्चयो । मुख्य भक्ताचा निश्चयो ।
जीवशिवाचा निश्चयो । बोलिला असे ॥ ८॥
मुख्य देव कोणता, त्यास कसे जाणावे, जाणता भक्त कसा असतो, जीवशिव यांचे स्वरूप कसे आहे, त्यांच्यात काय भेद आहे, याचे निःसंशय प्रतिपादन करण्यात आले आहे. (८)
मुख्य ब्रह्माचा निश्चयो । नाना मतांचा निश्चयो ।
आपण कोण हा निश्चयो । बोलिला असे ॥ ९॥
मुख्य देव म्हणजे परब्रह्म कशास म्हणावे, आपले खरे स्वरूप काय याविषयीची मते ठामपणे सांगून नाना मतांच्या गुंतागुंतीमुळे मनुष्य कसा चक्रावून जातो, हे त्या मतांचे स्वरूप सांगून स्पष्ट केले आहे. (९)
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १०॥
या ग्रंथात मुख्यतः उपासना कशी करावी, कवित्वाची नाना लक्षणे कोणती आहेत, तसेच चातुर्याची विविध लक्षणे कोणती याचे वर्णन आले आहे. (१०)
मायोद्भतवाचें लक्षण । पंचभूतांचे लक्षण ।
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११॥
मायेची उत्पत्ती कशी झाली, तिचे लक्षण कोणते, पंचमहाभूतांची लक्षणे कोणती आणि या सर्वांचा कर्ता कोण याविषयीचे विवेचन येथे केले आहे. (११)
नाना किंत निवारिले ॥ नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्न ॥ १२॥
नाना कुशंका, नाना संशय, विविध आशंका आणि विविध प्रश्न यांचे समाधानकारक निरसन या ग्रंथात करण्यात आले आहे. (१२)
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें ।
तें अवघेंचि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३॥
या प्रकारे यात अनेक विषयांचे निरूपण केलेगेले आहे. पण ग्रंथारंभीच त्या सर्वांसंबंधी कसे काय सांगता येईल. (१३)
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४॥
तथापि एवढे म्हणता येईल की, हा ग्रंथ वीस दशकांत विभागला गेला आहे व प्रत्येक दशकात दहा समास आहेत. ज्या दशकात जो विषय सांगितला गेला आहे, त्याचे विवरण त्या त्या दशकात केले आहे. (१४)
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५॥
हा ग्रंथ उपनिषदे, वेदांत, श्रुती तसेच इतरही अनेक ग्रंथांच्या आधारे व मुख्यतः शास्त्रप्रचीती व आत्मप्रचीतीच्या आधारे लिहिला गेला आहे. (१५)
नाना समतीअन्वये । म्हणौनी मिथ्या म्हणतां न ये ।
तथापि हें अनुभवासि ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६॥
खरे तर अनेक ग्रंथांच्या आधारे हा लिहिला आहे म्हणून यास मिथ्या म्हणता येत नाही. हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवाला येणारच आहे. (१६)
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वा क्यें ॥ १७॥
जे लोक मत्सराने यास मिथ्या ठरवितात, त्यांच्या हे लक्षातच येत नाही की, असे केल्याने ज्या नाना ग्रंथांच्या व भगवद्वचनाच्या आधारे हा ग्रंथ लिहिला गेला आहे, त्यांनाही ते मिथ्या ठरवीत असतात. (१७)
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणी वेदांत ॥ १८॥
भगवद्गीतता ब्रह्मगीता । हंसगीता पाण्डवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९॥
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाकक्ये येथार्थ । निश्चयेंसीं ॥ २०॥
शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता तसेच वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेश्णीता, यमगीता, उपनिषदे, भागवत, तसेच यांसारखेच अनेक ग्रंथ व मुख्यतः भगवद्वचनाच्या आधारेच यातील विषय मांडले गेले आहेत. (१८-२०)
भगवद्वाचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे ।
भगवद्वाकक्याविरहित नसे । बोलणे येथीचें ॥ २१॥
भगवद्वचनास अनुसरूनच येथे विषयप्रतिपादन केले आहे आणि भगवद्वाक्याविषयी अविश्वास ज्यास वाटेल, असा क्षुद्र व हीन कोण बरे असणार आहे ? (२१)
पूर्णग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२॥
संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास न करता जो कोणी या ग्रंथात दोष आहेत, असे मानून त्यास नावे ठेवतो, तो केवळ दुरभिमान व हीन मनोवृत्तीमुळे मत्सराधीन होऊनच असे करीत असतो. (२२)
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३॥
वृथा अभिमानामुळे मत्सर वाटू लागतो व मत्सरामुळे तिरस्कार उत्पन्न होऊन अत्यंत प्रबळ असा क्रोधाचा विकार त्याचे ठिकाणी प्रभाव गाजवू लागतो. (२३)
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावे पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४॥
अशा रीतीने कामक्रोध बळावले, म्हणजे त्यांचे अंतरंग दूषित बनते व अहंकाराने त्याचा स्वभाव बदलल्याचे प्रत्यक्ष दिसून येते. (२४)
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५॥
जो कामक्रोधाच्या अधीन झालेला असतो, त्यास भला कसे बरे म्हणावे ? अमृत पिण्याने वास्तविक अमरत्व प्राप्त व्हावयास हवे; पण कामक्रोधास वश झाल्यानेच अमृत पिऊनही राहूचे मरण ओढवलेच नाही का ? (२५)
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६॥
बरे आता हा विषय राहू दे. या ग्रंथातून ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार जे सार ते ग्रहण करावे. मुख्य म्हणजे अभिमानाचा त्याग करून याचा रसास्वाद घ्यावा हीच गोष्ट उत्तमोत्तम आहे. (२६)
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गे ॥ २७॥
ग्रंथारंभी श्रोत्यांनी ‘या ग्रंथात काय आहे ?’ असा जो प्रश्न केला होता, त्यासंबंधीचे सर्व विवेचन येथे थोडक्यात केले आहे. (२७)
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८॥
आता ‘हा ग्रंथ श्रवण केल्याने काय फळ मिळते ?’ या प्रश्नाचे उत्तर असे की, हा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या मनातील सर्व संशय समूळ नष्ट होऊन त्यांच्या आचरणात तत्काळ फरक पडतो. (२८)
मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम ।
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९॥
कुठलेही अवघड साधन करावे न लागता आत्मोन्नतीचा सोपा मार्ग कोणता हे कळून सायुज्यमुक्तीचे रहस्य बसल्या ठिकाणीच अनायासे हाती येते. (२९)
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३०॥
अज्ञान, दुःख, विपरीत ज्ञान नष्ट होऊन तत्काळ ज्ञानप्राप्ती होते. हीच याची फलश्रुती होय. (३०)
योगियांचे परम भाग्य । आंगीं बाणे तें वैराग्य ।
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१॥
योगी ज्याला परमभाग्य मानतात, ते वैराग्य अंगी बाणते व अंतर्यामी विवेक उत्पन्न होऊन यथायोग्य चातुर्याची प्राप्ती होते. (३१)
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेंचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२॥
जे श्रवणापूर्वी अस्थिर अंतःकरणाचे अवगुणी व अवलक्षणी असतात, ते सुलक्षणी, चतुर तार्किक व कुशाग्र बुद्धीचे तसेच वेळप्रसंग पाहून योग्य आचरण करणारे होतात. (३२)
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३॥
जे श्रवणापूर्वी आळशी होते ते उद्योगी बनतात, जे कुणी पापी होते, त्यांना कृतकर्माचा पश्चात्ताप होऊन त्यांची चित्तशुद्धी होऊ लागते. जे कुणी श्रवणापूर्वी भक्तिमार्गाची निंदा करीत असतात, ते आता श्रवणामुळे भक्तीचे महत्त्व कळल्याने तिची प्रशंसा करू लागतात. (३३)
बद्धची होती मुमुक्ष । मूर्ख होती अतिदक्ष ।
अभक्तची पावती मोक्ष । भक्तिमार्गें ॥ ३४॥
बद्ध असतात, ते ग्रंथश्रवणाने मुमुक्षू बनतात. मूर्ख असणारे अतिदक्ष बनतात व भक्तिमार्गाचे अवलंबन केल्याने पूर्वी अभक्त असणारेही मोक्षप्राप्ती करून घेतात. (३४)
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५॥
केवळ श्रवणाच्या योगे नाना दोष नष्ट होऊन पतितही पावन होतात व त्या त्या व्यक्तींना उत्तम गती प्राप्त होते (३५)
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६॥
श्रवणाने दृढ देहबुद्धीमुळे होणारे नुकसान (दुख शोकदि) तसेच कुतर्क व संशय आणि नाना प्रकारचे सांसारिक उद्वेग (अर्थात त्रिताप, पंचक्लेशादी) नष्ट होतात. (३६)
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती ।
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७॥
या ग्रंथाची फलप्राप्ती अशी आहे की, केवळ श्रवणाने अधोगती तर चुकतेच; शिवाय मनास सहज संतोषरूपी समाधान लाभून परम विश्रांतीही प्राप्त होते. (३७)
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८॥
ज्याचा जसा भावार्थ असेल त्याप्रमाणे त्यास तसा लाभ होतो. एखाद्याच्या मनात मत्सरादी, वाईट भाव असेल तर त्याच्या भावास अनुसरूनच त्यास फलप्राप्ती होते. (३८)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला ॥ १॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे
‘ग्रंथारंभलक्षणनाम ‘ समास पहिला समाप्त.
दासबोध दशक पहिला – समास दुसरा : गणेशस्तवन
॥ श्रीराम ॥
ॐ नमोजि गणनायेका । सर्व सिद्धिफळदायेका ।
अज्ञानभ्रांतिछेदका । बोधरूपा ॥ १॥
सर्वसिद्धींचा फळदाता, अज्ञान व विपरीत ज्ञान नष्ट करणाऱ्या बोधरूप अशा गणनायकास मी वंदन करतो. (१)
माझिये अंतरीं भरावें । सर्वकाळ वास्तव्य करावें ।
मज वाग्सुंन्यास वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २॥
आपण माझे अंतःकरणास व्यापून सर्वकाळ तेथे वास्तव्य करावे आणि आपल्या कृपाकटाक्षाने माझे अज्ञान दूर करून माझ्या मुखाने ग्रंथ वदवून घ्यावा. (२)
तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें ।
आणी विश्वभक्षक काळें । दास्यत्व कीजे ॥ ३॥
तुझ्या कृपेच्या योगे भ्रांतीची पटले वितळून जातात. एवढेच नव्हे तर विश्वभक्षक काळही तुझ्या कृपेने दास बनतो. (३)
येतां कृपेची निज उडी । विघ्नें कापती बापुडीं ।
होऊन जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४॥
गणेशाची कृपा झाली की विघ्ने चळचळा कापू लागतात. त्याच्या केवळ नामस्मरणानेही ती देशोधडीला लागतात. (४)
म्हणौन नामें विघ्नहर । आम्हां अनाथांचे माहेर ।
आदिकरूनी हरीहर । अमर वंदिती ॥ ५॥
म्हणूनच गजाननाला ‘विघ्नहर’ नावाने संबोधले जाते. आमच्यासारख्या अनाथांना त्याचा मोठाच आधार वाटतो. हरिहरादी देवही त्याच्या चरणी वंदन करीत असतात. (५)
वंदूनियां मंगळनिधी । कार्य करितां सर्वसिद्धी ।
आघात अडथाळे उपाधी । बाधूं सकेना ॥ ६॥
सर्व मंगलाचे निधान अशा गणेशाला वंदन करून कार्यारंभ केला असता त्या कार्यांत सर्वप्रकारे यश प्राप्त होते. ते करीत असताना संकटे ,अडथळे इत्यादी उपाधींची बाधा होऊ शकत नाही. (६)
जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान ।
नेत्रीं रिघोनियां मन । पांगुळे सर्वांगी ॥ ७॥
मनात त्याच्या रूपाचे चिंतन करू लागले, तरीही मनाला परम समाधान वाटते. चंचल मन स्थिर होऊन नेत्रांच्या ठिकाणी एकाग्र होते. (७)
सगुण रूपाची टेव । माहा लावण्य लाघव ।
नृत्य करितां सकळ देव । तटस्त होती ॥ ८॥
गणेशाच्या सगुण रूपाचे लावण्य व कौशल्य अत्यंत चित्ताकर्षक असून तो जेव्हा नृत्य करू लागतो, तेव्हा सर्व देव देहभान विसरून तटस्थ होऊन त्याच्याकडे पाहातच राहातात. (८)
सर्वकाळ मदोन्मत्त । सदा आनंदे डुल्लत ।
हरूषें निर्भर उद्दित । सुप्रसन्नवदनु ॥ ९॥
त्याच्या गंडस्थळातून सतत मद गळत असतो, तो सदा आनंदाने डुलत असतो व अत्यंत आनंदाने उल्लसित झालेले त्याचे सुप्रसन्न वदन आपले चित्त आकर्षित करून घेते. (९)
भव्यरूप वितंड । भीममूर्ति माहा प्रचंड ।
विस्तीर्ण मस्तकीं उदंड । सिंधूर चर्चिला ॥ १०॥
त्याचे रूप भव्य, दिव्य असून, देह अत्यंत विशाल व महाप्रचंड आहे. त्याचा भालप्रदेश विस्तीर्ण असून, त्यावर सिंदूर लावलेला आहे. (१०)
नाना सुगंध परिमळें । थबथबा गळती गंडस्थळें ।
तेथें आलीं षट्पदकुळें । झुंकारशब्दें ॥ ११॥
त्याच्या गंडस्थळातून थबथबा मदस्राव होत असतो व त्या मदस्रावातून दरवळणाऱ्या सुगंधांच्या परिमळामुळे आकर्षिले जाऊन भुंग्यांचे थवे मधुर गुंजारव करीत त्या गंडस्थळाभोवती रुंजी घालू लागतात. (११)
मुर्डीव शुंडादंड सरळे । शोभे अभिनव आवाळें ।
लंबित अधर तिक्षण गळे । क्षणक्ष्णा मंदसत्वी ॥ १२॥
गणेशाची सोंड सोटासारखी सरळ पण टोकास मुरडलेली आहे. कपाळावर दोन सुंदर आवाळे शोभत असतात. खालचा ओठ जरा लोंबत असतो आणि उग्र गंध असलेला मद क्षणक्षणाला गळत असतो. (१२)
चौदा विद्यांचा गोसांवी । हरस्व लोचन ते हिलावी ।
लवलवित फडकावी । फडै फडै कर्णथापा ॥ १३॥
गणेश हा चौदा विद्यांचा स्वामी असून, त्याचे डोळे फार लहान आहेत. त्या सूक्ष्म दृष्टीने तो सर्वत्र न्याहाळून पाहात असतो. त्याचे कान खूप मोठे व लवलवित असून, त्यांना तो सुपासारखे सतत फडफडा हलवीत असतो, तेव्हा त्यांचा फडफड आवाज येतो. (१३)
रत्नखचित मुगुटीं झळाळ । नाना सुरंग फांकती कीळ ।
कुंडलें तळपती नीळ । वरी जडिले झमकती ॥ १४॥
त्याच्या मस्तकावर नाना रत्ने ज्यांत जडविलेली आहेत, असा रत्नजडित मुकुट आहे व त्यातून नाना रंगांच्या प्रकाशाचे किरण सर्वत्र फाकले जाऊन अपूर्व झळाळीने आपले डोळे जणू दिपतात. कानात नीलमण्यांनी जडलेली कुंडले झगमगत असतात. (१४)
दंत शुभ्र सद्दट । रत्नखचित हेमकट्ट ।
तया तळवटीं पत्रें नीट । तळपती लघु लघु ॥ १५॥
त्याचे दात पांढरे शुभ्र व ठसठशीत आहेत आणि त्यांच्या टोकाला सुवर्णाची रत्नजडित कडी बसवलेली असून, त्यांच्या खालच्या बाजूला छोटी छोटी सोन्याची पाने तळपत असतात. (१५)
लवथवित मलपे दोंद । वेष्टित कट्ट नागबंद ।
क्षुद्र घंटिका मंद मंद । वाजती झणत्कारें ॥ १६॥
त्याचे पोट लवलवीत असून सारखे हालत असते व त्याला सर्पाचा कडदोरा वेढलेला असतो. कमरेच्या साखळीच्या छोट्या छोट्या घुंगुरांचा मंद मंद मधुर ध्वनी ऐकू येतो. (१६)
चतुर्भुज लंबोदर । कासे कासिला पितांबर ।
फडके दोंदिचा फणीवर । धुधूकार टाकी ॥ १७॥
त्याला चार हात असून लंबोदरावर सोनसळी पीतांबर नेसलेला आहे, तर पोटावरील मोठा नाग सारखे फूत्कार यकतो. (१७)
डोलवी मस्तक जिव्हा लाळी । घालून बैसला वेटाळी ।
उभारोनि नाभिकमळीं । टकमकां पाहे ॥ १८॥
तो नाग कमरेला वेढा घालून बसलेला असून गणेशाच्या नाभिकमळाजवळ फणा उभारून मस्तक डोलवत जिभल्या चाटत सर्वत्र टकमका पाहतो. (१८)
नाना याति कुशुममाळा । व्याळपरियंत रुळती गळां ।
रत्नजडित हृदयकमळा- । वरी पदक शोभे ॥ १९॥
त्याच्या गळ्यात विविध जातीच्या फुलांच्या माळा कमरेतील सापापर्यंत पोहोचतील अशा लांबलचक रुळत असतात व हृदयावर रत्नजडित हारांतील पदक अत्यंत शोभून दिसते. (१९)
शोभे फरश आणी कमळ । अंकुश तिक्षण तेजाळ ।
येके करीं मोदकगोळ । तयावरी अति प्रीति ॥ २०॥
चारी हातांपैकी एका हातात परशू , एका हातात कमळ, एका हातात अत्यंत तीक्ष्ण व तेजस्वी अंकुश तर एका हातात त्याला अत्यंत प्रिय असणाऱ्या मोदकाचा गोळा शोभून दिसतो. (२०)
नट नाट्य कळा कुंसरी । नाना छंदें नृत्य करी ।
टाळ मृदांग भरोवरी । उपांग हुंकारे ॥ २१॥
गणेश हा नृत्य, नाट्य इत्यादी कलांमध्ये अत्यंत कुशल असून टाळ, मृदंगाच्या तालावर नृत्याचे उपांग जे हुंकार ते करीत नानाप्रकारे नृत्य करतो. (२१)
स्थिरता नाहीं येक क्षण । चपळविशईं अग्रगण ।
साअजिरी मूर्ति सुलक्षण । लावण्यखाणी ॥ २२॥
इतका विशाल व थुलथुलीत देह असूनही चपलतेमध्ये गणेश अग्रगण्य असून क्षणभरही स्वस्थ राहात नाही. त्याची साजिरी मूर्ती सुलक्षण व लवण्याची जणू खाणच आहे. (२२)
रुणझुणा वाजती नेपुरें । वांकी बोभाटती गजरें ।
घागरियासहित मनोहरें । पाउलें दोनी ॥ २३॥
पायांत नूपुरे रुणझुणत असतात, दंडांतील वाक्यांचा मधुर ध्वनी होत असतो, तर मधुर झंकारणार्या घागऱ्यांमुळे दोन्ही पाउले भक्तांचे मन हरण करीत असतात. (२३)
ईश्वरसभेसी आली शोभा । दिव्यांबरांची फांकली प्रभा ।
साहित्यविशईं सुल्लभा । अष्टनायका होती ॥ २४॥
गणपतीमुळे देवांच्या सभेला शोभा येते. त्याच्या दिव्य वस्त्रांची प्रभा सर्वत्र पसरलेली असते. त्याच्या कृपेमुळेच साहित्य निर्मितीच्यावेळी अष्टनायिका साह्य करू लागतात. (२४)
ऐसा सर्वांगे सुंदरु । सकळ विद्यांचा आगरु ।
त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावें ॥ २५॥
श्री समर्थ म्हणतात, असा जो सर्वांगाने सुंदर असणारा, सकळ विद्यांचे वसतिस्थान असा श्रीगणेश त्यास मी साष्टांग भावाने नमस्कार करतो. (२५)
ध्यान गणेशाचें वर्णितां । मतिप्रकाश होये भ्रांता ।
गुणानुवाद श्रवण करितां । वोळे सरस्वती ॥ २६॥
त्या गणेशाच्या रूपाचे वर्णन केले असता भ्रमित- चित्त माणसाच्या बुद्धीतही ज्ञानाचा प्रकाश पडतो. त्याच्या गुणांचे श्रवण केल्याने प्रत्यक्ष सरस्वती प्रसन्न होते. (२६)
जयासि ब्रह्मादिक वंदिती । तेथें मानव बापुडे किती ।
असो प्राणी मंदमती । तेहीं गणेश चिंतावा ॥ २७॥
ज्यास ब्रह्मादी देवही वंदन करतात, त्यापुढे बिचारे मानव ते काय म्हणावेत ? म्हणून मंदमती असणारांनीही श्रीगणेशाचे चिंतन करावे. (२७)
जे मूर्ख अवलक्षण । जे कां हीणाहूनि हीण ।
तेचि होती दक्ष प्रविण । सर्वविशईं ॥ २८॥
कारण जे कुणी मूर्ख अवलक्षणी, अथवा हीनांहूनही हीन असतील, तेही श्रीगणेशाच्या कृपेने अत्यंत चतुर व सर्व विषयांत पारंगत होऊ शकतात. (२८)
ऐसा जो परम समर्थ । पूर्ण करी मनोरथ ।
सप्रचीत भजनस्वार्थ । कल्लौ चंडीविनायेकौ ॥ २९॥
असे गणेशाचे अपार सामर्थ्य आहे. त्याची कृपा झाली असता भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होऊन त्यांना अनुभवयुक्त परमार्थाची प्राप्ती होते. कलियुगात देवी (चंडी) व गणेशाची उपासना करावी, असे शास्त्र सांगते. (२९)
ऐसा गणेश मंगळमूर्ती । तो म्यां स्तविला येथामति ।
वांछ्या धरूनि चित्तीं । परमार्थाची ॥ ३०॥
म्हणून अशा मंगलमूर्ती गणेशाची स्तुती मी मनात परमार्थाची इच्छा धरून यथामती केली आहे. (३०)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
गणेशस्तवननाम समास दुसरा ॥ २ ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवाादे
‘गणेशस्तवननाम’ समास दुसरा समाप्त
दासबोध दशक पहिला – समास तिसरा : शारदास्तवन
॥ श्रीराम ॥
आतां वंदीन वेदमाता । श्रीशारदा ब्रह्मसुता ।
शब्दमूल वाग्देवता । माहं माया ॥ १॥
मी आता वेदांची जननी, ब्रह्मदेवांची कन्या, शब्दब्रह्माची उत्पत्ती जिच्यापासून झाली त्या वाग्देवतारूपी महामायेला, श्रीशारदेला वंदन करतो. (१)
जे उठवी शब्दांकुर । वदे वैखरी अपार ।
जे शब्दाचें अभ्यांतर । उकलून दावी ॥ २॥
तिच्यापासूनच शब्द स्फुरतात व वैखरी वाणीच्या रूपाने तिचाच अपार विस्तार होतो. तीच शब्दांचे विविध अर्थ उकलून दाखवते. (२)
जे योगियांची समाधी । जे धारिष्टांची कृतबुद्धी ।
जे विद्या अविद्या उपाधी । तोडून टाकी ॥ ३॥
योग्यांच्या ठिकाणी समाधिरूपाने तर धैर्यवान पुरुषांच्या ठिकाणी निश्चयी बुद्धीच्या रूपाने राहून तीच विद्या व अविद्या या दोन्ही उपाधी तोडून टाकून स्वरूपी लीन करते. (३)
जे माहापुरुषाची भार्या । अति सलग्न अवस्था तुर्या ।
जयेकरितां महत्कार्या । प्रवर्तले साधु ॥ ४॥
ती ईश्वराची भार्या असून प्रत्यगात्मा ब्रह्माच्या अत्यंत निकट असणारी तुर्यावस्थाही तीच आहे. तिच्या आधारानेच साधुपुरुष महान कार्ये करण्यास प्रवृत्त होतात. (४)
जे महंतांची शांती । जे ईश्वराची निज शक्ती ।
जे ज्ञानियांची विरक्ती । नैराशशोभा ॥ ५॥
ती महंताची शांती असून ईश्वराची निजशक्ती आहे, तर ज्ञानी लोकांच्या ठिकाणी ती विरक्तिरूपाने प्रगटून नैराश्य रूपाने शोभत असते. (५)
जे अनंत ब्रह्मांडें घडी । लीळाविनोदेंचि मोडी ।
आपण आदिपुरुषीं दडी । मारून राहे ॥ ६॥
ती सहज लीलाविनोदरूपाने अनंत ब्रह्मांडांची उत्पत्ती व लयही करीत असते; पण आपण स्वतः मात्र आदिपुरुषाच्या ठिकाणी लपून राहते. (६)
जे प्रत्यक्ष पाहातां आडळे । विचार घेतां तरी नाडळे ।
जयेचा पार न कळे । ब्रह्मादिकांसी ॥ ७॥
हे प्रत्यक्ष दिसणारे विश्व हे तिचेच रूप आहे असे भासते, पण तिचा शोध घेऊ गेले असता ती कोठेच सापडत नाही. अशी ती विलक्षण असल्याने ब्रह्मादी देवांनाही तिचा अंत लागत नाही. (७)
जे सर्व नाटक अंतर्कळा । जाणीव स्फूर्ती निर्मळा ।
जयेचेनी स्वानंदसोहळा । ज्ञानशक्ती ॥ ८॥
या सर्व विश्वरूपी नाटकाची तीच मुख्य सूत्रधार असून ईश्वराच्या ठिकाणी प्रथम स्फुरलेली निर्मल ‘एकोऽहं’ ही जाणीव हे तिचेच स्वरूप आहे. तीच साधकांच्या ठिकाणी ज्ञानशक्तिरूपाने प्रगट होऊन त्यांना स्वानंदाची अनुभूती करून देते. (८)
जे लावण्यस्वरूपाची शोभा । जे परब्रह्मसूर्याची प्रभा ।
जे शब्दीं वदोनि उभा । संसार नासी ॥ ९॥
जगातील सर्व लवण्याचे, सौंदर्याचे, शोभेचे ती उत्पत्तिस्थान असून, परब्रह्मरूपी सूर्याची प्रभा म्हणजे अभिन्न तेजही तीच आहे. आपल्या अचिंत्य अशा शब्दशक्तीच्या साहाय्याने ही विश्वाभासरूपी संसार नाहीसा करून टाकते. (९)
जे मोक्षश्रिया माहांमंगळा । जे सत्रावी जीवनकळा ।
हे सत्त्वलीळा सुसीतळा । लावण्यखाणी ॥ १०॥
तीच साक्षात मोक्षरूपी लक्ष्मी असून अत्यंत मंगलमय अशी सत्रावी जीवनकळा आहे. लावण्याची खाण अशी ही शारदा परम सुशीतल व सत्त्वशील असून जीवास सुख देणारी आहे. (१०)
जे अवेक्त पुरुषाची वेक्ती । विस्तारें वाढली इच्छाशक्ती ।
जे कळीकाळाची नियंती । सद्गु रुकृपा ॥ ११॥
अव्यक्त अशा परब्रह्माची व्यक्त झालेली शक्ती त्याच्या इच्छाशक्तीच्या साहाय्याने अत्यंत विस्तार पावली आहे. कळिकाळावरही सत्ता गाजविणाऱ्या सद्गुरुकृपेच्या रूपाने ती कार्यान्वित होते. (११)
जे परमार्थमार्गींचा विचार- । निवडून, दावी सारासार ।
भवसिंधूचा पैलपार । पाववी शब्दबळें ॥ १२॥
तीच सारासार विवेकरूपाने परमार्थमार्गात मार्गदर्शन करून शब्दांच्या आधारे भवसिंधूतून पैलतीरास पोहोचविते. (१२)
ऐसी बहुवेषें नटली । माया शारदा येकली ।
सिद्धचि अंतरी संचली । चतुर्विधा प्रकारें ॥ १३॥
अशाप्रकारे विविध वेषांनी ती नटलेली दिसली, तरी ती शारदा मायारूपाने एकच असून सिद्धपुरुषांच्या ठिकाणी ती परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या चार वाणींच्या रूपाने वास्तव्य करून असते. (१३)
तींहीं वाचा अंतरीं आलें । तें वैखरिया प्रगट केलें ।
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें । तें शारदागुणें ॥ १४॥
परा, पश्यंती, मध्यमा यांच्यात जे स्फुरते, तेच वैखरी वाणीने प्रगट केले जाते. म्हणून हे सर्व कर्तृत्व शारदेच्या योगेच प्रगट होत असते, हे जाणून घ्यावे. (१४)
जे ब्रह्मादिकांची जननी । हरीहर जयेपासुनी ।
सृष्टिरचना लोक तिनी । विस्तार जयेचा ॥ १५॥
अशी ही मूळमाया ब्रह्मादिकांची जननी असून तिच्यापासूनच विष्णू शंकरादी देव व तिन्ही लोकांची सृष्टिरचना होत असते. हा सर्व तिचाच विस्तार आहे. (१५)
जे परमार्थाचें मूळ । नांतरी सद्विद्याची केवळ ।
निवांत निर्मळ निश्चळ । स्वरूपस्थिती ॥ १६॥
जिला सद्विद्या असे म्हणतात, जी निर्मळ, निश्चळ निवांत (शांतिरूप) परमार्थाचे मूळच अशी स्वरूपस्थिती, ती म्हणजे शारदाच होय. (१६)
जे योगियांचे ध्यानीं । जे साधकांचे चिंतनीं ।
जे सिद्धांचे अंतःकर्णीं । समाधिरूपें ॥ १७॥
योग्यांच्या ठिकाणी ध्यानमग्नतेच्या रूपाने, साधकांच्या ठिकाणी आत्मस्वरूपचिंतनाच्या रूपाने तर सिद्धांच्या अंतःकरणात समाधिरूपाने तीच राहते. (१७)
जे निर्गुणाची वोळखण । जे अनुभवाची खूण ।
जे व्यापकपणें संपूर्ण । सर्वांघटीं ॥ १८॥
ती चराचरांत संपूर्णपणे व्यापक असून साधकांना स्वरूपाच्या अनुभवाच्या योगे तीच निर्गुणाचा परिचय करून देते. (१८)
शास्त्रें पुराणें वेद श्रुति । अखंड जयेचें स्तवन करिती ।
नाना रूपीं जयेसी स्तविती । प्राणीमात्र ॥ १९॥
शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती अखंड तिचीच स्तुती करत असतात व सर्व प्राणिमात्रही नाना रूपाने तिचेच गुणगान करतात. (१९)
जे वेदशास्त्रांची महिमा । जे निरोपमाची उपमा ।
जयेकरितां परमात्मा । ऐसें बोलिजे ॥ २०॥
वेदशास्त्रांना मोठेपणा शारदेमुळेच प्राप्त झाला असून ज्या परमात्म्याचे शब्दांत वर्णन होऊच शकत नाही, त्याचे उपमा-दृष्टांताच्या सहाय्याने वर्णन करून त्यास ‘परमात्मा’ हे नाव देणारी ही शारदाच आहे. (२०)
नाना विद्या कळा सिद्धी । नाना निश्चयाची बुद्धी ।
जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी । ज्ञेप्तीमात्र ॥ २१॥
परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी केवळ जाणीवरूपाने स्फुरणारी सूक्ष्म शुद्ध जाणीव हेच शारदेचे मूळरूप असून तीच नंतर नाना विद्या, नाना कला, नाना सिद्धी व नाना मतांसंबंधीच्या निश्चयात्मक बुद्धीच्या रूपाने प्रगट होत असते. (२१)
जे हरिभक्तांची निजभक्ती । अंतरनिष्ठांची अंतरस्तिथी ।
जे जीवन्मुक्तांची मुक्ती । सायोज्यता ते ॥ २२॥
तीच हरिभक्तांच्या ठिकाणी निजभक्तीच्या रूपाने, अंतर्निष्ठांच्या ठिकाणी अंतर्यामी ज्ञाननिष्ठेच्या रूपाने तर जीवन्मुक्तांच्या ठिकाणी मुक्तिरूपाने वास करते व सायुज्यमुक्ती हेही तिचेच रूप आहे. (२२)
जे अनंत माया वैष्णवी । न कळे नाटक लाघवी ।
जे थोराथोरासी गोवी । जाणपणें ॥ २३॥
शारदा म्हणजे भगवंताची अनंत अशी मायाशक्ती असून ती अत्यंत लाघवी व नाट्यकलेत निपुण आहे. मोठमोठ्यांना ‘मी ज्ञाता’ या अभिमानाच्या जाणिवेत, मोहात ती गुंतविते. (२३)
जें जें दृष्टीनें देखिलें । जें जें शब्दें वोळखिलें ।
जें जें मनास भासलें । तितुकें रूप जयेचें ॥ २४॥
जे जे काही दृष्टीस दिसते, नादरूपाने ऐकू येते वा जे जे मनाने कल्पिले जाते अर्थात जेथपर्यंत इंद्रियांची, मनाची धाव पोहोचते, ते सर्व मायेचे रूप समजावे. (२४)
स्तवन भजन भक्ति भाव । मायेंवाचून नाहीं ठाव ।
या वचनाचा अभिप्राव । अनुभवी जाणती ॥ २५॥
अर्थात आपण जे जे काही स्तवन, भजन, साधन, भक्तिभाव इत्यादी करतो, तेही मायेचेच स्वरूप असून मायेखेरीज तेथे इतर काही नाही. या बोलण्यातील गूढार्थ जे स्वस्वरूपाचे अनुभवी लोक असतील तेच जाणू शकतील. (२५)
म्हणौनी थोराहुनि थोर । जे ईश्वराचा ईश्वर ।
तयेसी माझा नमस्कार । तदांशेंचि आतां ॥ २६॥
म्हणून शेवटी थोराहूनही थोर व ईश्वराचाही ईश्वर असणाऱ्या त्या शारदेला तिच्या अंशरूपानेच मी आता नमस्कार करतो. (२६)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
शारदास्तवननाम समास तिसरा ॥ ३॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे
‘शारदास्तवननाम’ समास तिसरा समाप्त
दासबोध दशक पहिला – समास चवथा : सद्गुरुस्तवन
॥ श्रीराम ॥
आतां सद्गुरु वर्णवेना । जेथें माया स्पर्शों सकेना ।
तें स्वरूप मज अज्ञाना । काये कळे ॥ १॥
मला सद्गुरूंचे स्तवन करावे अशी इच्छा तर आहे, पण ज्यांच्यापर्यंत माया पोहोचू शकत नाही, अशा त्या स्वरूपाचे आकलन माझ्यासारख्या अज्ञानी जीवास कसे होणार ? म्हणून सद्गुरूचे वर्णन करताच येत नाही, असे म्हणावे लागत आहे. (१)
न कळे न कळे नेति नेति । ऐसें बोलतसे श्रुती ।
तेथें मज मूर्खाची मती । पवाडेल कोठें ॥ २॥
श्रुती ही आत्मविद्येची जननी असून ती सुद्धा ‘नेति नेति’ मला कळत नाही, कळत नाही असे ज्याच्याविषयी म्हणते, त्या स्वरूपाचे वर्णन करण्यास माझ्यासारख्या मूर्खाची बुद्धी कशी समर्थ असेल ? (२)
मज न कळे हा विचारु । दुर्ह्हूनि माझा नमस्कारु ।
गुरुदेवा पैलपारु । पाववीं मज ॥ ३॥
तुमचे वर्णन कसे करावे हेच मला कळत नसल्याने मी तुम्हांला दुरूनच नमस्कार करून प्रार्थना करतो की, हे गुरुदेवा, मला पैलतीरास न्या. (३)
होती स्तवनाची दुराशा । तुटला मायेचा भर्वसा ।
असाल तैसे असा । सद्गुलरु स्वामी ॥ ४॥
मायेच्या आधारे तुमचे स्तवन करता येईल अशी अयोग्य आशा मी मनाशी बाळगली होती, पण माया आपणास स्पर्शच करू शकत नसल्याने आता मायेचा आधारही नाहीसा झाला आहे. म्हणून ‘हे सद्गुरू स्वामी, तुम्ही असाल तसे असा’ एवढेच मी म्हणतो. (४)
मायेच्या बळें करीन स्तवन । ऐसें वांछित होतें मन ।
माया जाली लज्यायमान । काय करूं ॥ ५॥
मायेच्या साहाय्याने आपले स्तवन करावे अशी इच्छा माझ्या मनात होती. पण मायाच लाजून बाजूस सरल्यावर मी तरी काय करू ? (५)
नातुडे मुख्य परमात्मा । म्हणौनी करावी लागे प्रतिमा ।
तैसा मायायोगें महिमा । वर्णीन सद्गुुरूचा ॥ ६॥
मुख्य परमात्मा इंद्रियगोचर नसल्याने तो हाती गवसत नाही, म्हणून त्याची प्रतिमा करून तिचा आधार घ्यावा लागतो. म्हणून आता त्या मायेचा आधार घेऊनच मी सद्गुरूचा महिमा वर्णन करीन. (६)
आपल्या भावासारिखा मनीं । देव आठवावा ध्यानीं ।
तैसा सद्गुारु हा स्तवनीं । स्तऊं ॥ ७॥
आपल्या मनात जसा भाव असेल त्यास अनुसरूनच ध्यानात मनाने आपल्या इष्ट देवाचे स्मरण करावे लागते. तशी माझ्या मनात जशी सद्गुरूची मूर्ती स्थिरावली आहे, तशीच ती आठवून त्या श्रीसद्गुरूचे मी स्तवन करतो. (७)
जय जया जि सद्गुखरुराजा । विश्वंभरा बिश्वबीजा ।
परमपुरुषा मोक्षध्वजा । दीनबंधु ॥ ८॥
हे सद्गुरुराजा, तुझा जयजयकार असो ! तूच सर्व विश्वास व्यापले आहेस, तूच विश्वाचे मूळ कारण आहेस व तूच परमपुरुष आहेस; तसेच मोक्ष देणारा व दीनांचा बंधू तूच आहेस. (८)
तुझीयेन अभयंकरें । अनावर माया हे वोसरे ।
जैसें सूर्यप्रकाशें अंधारें । पळोन जाये ॥ ९॥
जसा सूर्यप्रकाशाने अंधार पळून जातो, तशी तुझी कृपा झाली की अनावर अशी मायाही ओसरू लागते. (९)
आदित्यें अंधकार निवारे । परंतु मागुतें ब्रह्मांड भरे ।
नीसी जालियां नंतरें । पुन्हां काळोखें ॥ १०॥
सूर्याच्या योगे अंधकार नाहीसा झाला, तरी रात्र झाली की परत काळोखाने ब्रह्मांड भरून जाते. (१०)
तैसा नव्हे स्वामीराव । करी जन्ममृत्य वाव ।
समूळ अज्ञानाचा ठाव । पुसून टाकी ॥ ११॥
पण सद्गुरू स्वामीराज तसे नाहीत. ते अज्ञानाचा समूळ नाश करतात व त्यामुळे परत जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडावे लागत नाही. (११)
सुवर्णाचें लोहो कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
तैसा गुरुदास संदेहीं । पडोंचि नेणे सर्वथा ॥ १२॥
परीसस्पर्शाने लोखंडाचे एकदा सोने झाले की, ते परत लोखंड कधीच होत नाही. त्याप्रमाणे गुरूंनी आपल्या दासाचे अज्ञान एकदा समूळ नष्ट केले की, तो परत कधीही संशयात पडत नाही. (१२)
कां सरिता गंगेसी मिळाली । मिळणी होतां गंगा जली ।
मग जरी वेगळी केली । तरी होणार नाहीं सर्वथा ॥ १३॥
किंवा नदी एकदा गंगेस मिळाली की त्यासरशी ती गंगाच बनते. मग कितीही प्रयत्न केले तरी ती कधीही वेगळी केली जाऊ शकतच नाही. (१३)
परी ते सरिता मिळणीमागें । वाहाळ मानिजेत जगें ।
तैसा नव्हे शिष्य वेगें । स्वामीच होये ॥ १४॥
एखाद्या ओहोळाला नदीला मिळण्यापूर्वी जग लहान ओढाच म्हणते. पण नदीला मिळाल्यावर तो नदी होतो. तसा सामान्य साधक सद्गुरुकृपा होण्यापूर्वी कसाही असला तरी सद्गुरुकृपा झाली की तो तत्काळ गुरूच होतो. (१४)
परीस आपणा ऐसें करीना । सुवर्णें लोहो पालटेना ।
उपदेश करी बहुत जना । अंकित सद्गु<रूचा ॥ १५॥
परीस लोखंडाचे सोने करतो पण त्या सुवर्णास तो आपले परिसत्व देत नाही म्हणजे त्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होऊ शकत नाही. पण जो साधक सद्गुरूचा कृपांकित होतो, तोही अनेक लोकांचा उद्धार करू शकतो. (१५)
शिष्यास गुरुत्व प्राप्त होये । सुवर्णें सुवर्ण करितां न ये ।
म्हणौनी उपमा न साहे । सद्गु्रूसी परिसाची ॥ १६॥
परिसामुळे सुवर्ण झालेल्या सुवर्णाच्या स्पर्शाने दुसऱ्या लोखंडाचे सोने होऊ शकत नाही, पण सद्गुरुकृपेने शिष्यास मात्र गुरुत्वच प्राप्त होते; म्हणून सद्गुरूंना परिसाची उपमा देणेही योग्य नाही. (१६)
उपमे द्यावा सागर । तरी तो अत्यंतची क्षार ।
अथवा म्हणों क्षीरसागर । तरी तो नासेल कल्पांतीं ॥ १७॥
बरे त्यांना सागराची उपमा द्यावी तर तो तर अत्यंत खारट असतो म्हणून तीही उपमा योग्य नव्हे. अथवा क्षीरसागराची उपमा द्यावी तर कल्पांती क्षीरसागरही नष्ट होतो. म्हणून तीही उपमा देता येत नाही. (१७)
उपमे द्यावा जरी मेरु । तरी तो जड पाषाण कठोरु ।
तैसा नव्हे कीं सद्गु रु । कोमळ दिनाचा ॥ १८॥
सद्गुरूंना मेरू पर्वताची उपमा द्यावी तर मेरुपर्वत जड पाषाणाचा व कठोर आणि सद्गुरू तर दीन शरणागताविषयी अत्यंत कोमल अंतःकरणाचे असतात, म्हणून तीही उपमा देता येत नाही. (१८)
उपमे म्हणों गगन । तरी गगनापरीस तें निर्गुण ।
या कारणें दृष्टांत हीण । सदद्गुरूस गगनाचा ॥ १९॥
बरे ! सद्गुरूंना गगनाची उपमा द्यावी, तर त्यांचे रूप गगनाच्याही पलीकडचे निर्गुण आहे. म्हणून गगनाची उपमासुद्धा हीन ठरते. (१९)
धीरपणे । म् उपमूं जगती । तरी हेहि खचेल कल्पांतीं ।
म्हणौन धीरत्वास दृष्टांतीं । हीण वसुंधरा ॥ २०॥
धैर्यशील म्हणून पृथ्वीची उपमा द्यावी तर कल्पांती पृथ्वीही खचून जाईल. म्हणून तिची उपमाही अयोग्य ठरते. (२०)
उपमावा गभस्ती । तरी गभस्तीचा प्रकाश किती ।
शास्त्रें मर्यादा बोलती । सद्गुचरु अमर्याद ॥ २१॥
सद्गुरू परम प्रकाशरूप म्हणून सूर्याची उपमा द्यावी तर त्यालाही मर्यादा आहे. पण सद्गुरूचे सामर्थ्य अमर्याद आहे. ते नित्य परम प्रकाशरूपच आहेत. (२१)
म्हणौनी उपमे उणा दिनकर । सद्गुfरुज्ञानप्रकाश थोर ।
उपमावा फणीवर । तरी तोहि भारवाही ॥ २२॥
सदगुरूंचा प्रकाश चिरंतन टिकणारा असल्याने त्याला सूर्याची उपमा देताच येत नाही. बरे शेषाची उपमा द्यावी तर त्याने स्वतःच पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर वाहिला आहे. परंतु श्रीगुरू शिष्याचा संसारभार दूर करतात. म्हणून तीही उपमा देता येत नाही. (२२)
उपमे द्यावें जळ । तरी तें काळांतरीं आटेल सकळ ।
सद्गुसरुरूप तें निश्चळ । जाणार नाहीं ॥ २३॥
आता जीवनदायी व कोमल म्हणून जलाची उपमा द्यावी, तर कालांतराने पाणीही आटून जाते. शिवाय ते चंचल असते, पण सद्गुरु-स्वरूप निश्चल असून त्याचा नाश कधीच होत नाही. (२३)
सद्गु रूसी उपमावे । म् अमृत । तरी अमर धरिती मृत्यपंथ ।
सद्गुररुकृपा यथार्थ । अमर करी ॥ २४॥
त्यांना अमृताची उपमा द्यावी तर सदैव अमृतपान करणारे देवही मृत्यूच्या कचाट्यातून सुटत नाहीत. पण एकदा सद्गुरूची कृपा झाली की, शिष्य मात्र अमर होतो. म्हणून ही उपमाही देता येत नाही. (२४)
सद्गुररूसी म्हणावें कल्पतरु । तरी हा कल्पनेतीत विचारु ।
कल्पवृक्षाचा अंगिकारु । कोण करी ॥ २५॥
सद्गुरूला कल्पतरूची उपमाही देता येत नाही. कारण तो जे मागावे तेवढेच व तेही कल्पनेतील पदार्थच देतो. पण सद्गुरू कल्पनेच्या पलीकडील मोक्ष देतात. मग कल्पतरूचा अंगीकार कोण करील बरे ! (२५)
चिंता मात्र नाहीं मनीं । कोण पुसे चिंतामणी ।
कामधेनूचीं दुभणीं । निःकामासी न लगती ॥ २६॥
सदगुरूंना चिंतामणीची उपमाही देता येत नाही. कारण ते शिष्याच्या मनात कुठलीही चिंताच उरू देत नाहीत. त्यांच्या कृपेने शिष्य निष्काम झालेला असतो. मग निष्काम झालेल्या पुरुषास कामधेनूची प्रसन्नता वा पान्हा यांची आवश्यकताच उरत नाही. म्हणून चिंतामणी वा कामधेनू यांच्याही उपमा सद्गुरूना देता येत नाहीत. (२६)
सद्गुीरु म्हणों लक्ष्मीवंत । तरी ते लक्ष्मी नाशिवंत ।
ज्याचे द्वारीं असे तिष्टत । मोक्षलक्ष्मी ॥ २७॥
सद्गुरूंना लक्ष्मीवंत म्हणावे, तर तेही योग्य नव्हे कारण लक्ष्मी चंचल असते, नाशिवंत असते, पण सद्गुरूंच्या दारी तर साक्षात मोक्षलक्ष्मी त्यांच्या कृपाकटाक्षाची आशा धरून तिष्ठत असते. म्हणून ही उपमाही देता येत नाही. (२७)
स्वर्गलोक इंद्र संपती । हे काळांतरीं विटंबती ।
सद्गुतरुकृपेची प्राप्ती । काळांतरीं चळेना ॥ २८॥
स्वर्गलोक, इंद्रपद या सर्व गोष्टी नश्वर असून कालांतराने नाश पावतात. पण सद्गुरूची कृपा एकदा झाली की ती कधीही नाश पावत नाही. (२८)
हरीहर ब्रह्मादिक । नाश पावती सकळिक ।
सर्वदा अविनाश येक । सद्गुवरुपद ॥ २९॥
ब्रह्मा, विष्णू शिवादी सर्व देव हे कालांतराने नाश पावतात. एक सद्गुरुपदच असे आहे की ते अविनाशी आहे. (२९)
तयासी उपमा काय द्यावी । नाशिवंत सृष्टी आघवी ।
पंचभूतिक उठाठेवी । न चले तेथें ॥ ३०॥
फार काय सांगावे, ही सर्व सृष्टीच पंचमहाभूतांची असून नाशिवंत आहे. फक्त सद्गुरूचे स्वरूपच शाश्वत अविनाशी आहे. तेव्हां त्याची उठाठेव करण्यातही काही अर्थ नाही. (३०)
म्हणौनी सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ।
अंतरस्थितीचिया खुणा । अंतर्निष्ठ जाणती ॥ ३१॥
तेव्हा सद्गुरूंच्या रूपाचे वर्णन करता येण्यासारखे नाही, हेच माझे वर्णन आहे. जे अंतरीच्या खुणा जाणणारे असतात, त्यांनाच त्यांचे खरे स्वरूप कळते. (३१)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सद्गुरुस्तवननाम समास चवथा ॥ ४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘सद्गुरुस्तवननाम ‘ समास चौथा समाप्त.
दासबोध दशक पहिला – समास पांचवा : संतस्तवन
॥ श्रीराम ॥
आतां वंदीन सज्जन । जे परमार्थाचें अधिष्ठान ।
जयांचेनि गुह्यज्ञान । प्रगटे जनीं ॥ १॥
आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान, की ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या सज्जनांना मी वंदन करतो. (१)
जे वस्तु परम दुल्लभ । जयेचा अलभ्य लाभ ।
तेंचि होये सुल्लभ । संतसंगेकरूनी ॥ २॥
परब्रह्मप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे. पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे. हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वांत सोपा उपाय म्हणजे संतसंगती. (२)
वस्तु प्रगटचि असे । पाहातां कोणासीच न दिसे ।
नाना साधनीं सायासें । न पडे ठाईं ॥ ३॥
परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे. पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही. कारण त्याचा शोध घेऊ गेले असता ते कुठे आढळूनच येत नाही. (३)
जेथें परिक्षवंत ठकले । नांतरी डोळसचि अंध जाले ।
पाहात असताअंचि चुकले । निजवस्तूसी ॥ ४॥
अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात. डोळसांनाही आत्मवस्तु दिसत नाही. तेही चुकतात, म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात. (४)
हें दीपाचेनि दिसेना । नाना प्रकाशें गवसेना ।
नेत्रांजनेंहि वसेना । दृष्टीपुढें ॥ ५॥
दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तु दिसत नाही. एवढेच नव्हे तर डोळ्यांत नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ती दृष्टीपुढे येत नाही. (५)
सोळां कळी पूर्ण शशी । दाखवू शकेना वस्तूसी ।
तीव्र आदित्य कळारासी । तोहि दाखवीना ॥ ६॥
सोळा कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रसुद्धा ती दाखविण्यास समर्थ नाही. एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूस दाखवू शकत नाही. (६)
जया सुर्याचेनि प्रकाशें । ऊर्णतंतु तोहि दिसे ।
नाना सूक्ष्म पदार्थ भासे । अणुरेणादिक ॥ ७॥
कोळ्याच्या अंगांतून बाहेर पडणारा अति सूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो, तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगे आपण पाहू शकतो. (७)
चिरलें वाळाग्र तेंहि प्रकासी । परी तो दाखवीना वस्तूसी ।
तें जयाचेनि साधकांसी । प्राप्त होये ॥ ८॥
एवढेच कशाला, केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते, पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही, पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते. (८)
जेथें आक्षेप आटले । जेथें प्रेत्न प्रस्तावले ।
जेथें तर्क मंदावले । तर्कितां निजवस्तूसी ।
आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की, तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात. प्रयत्न उपयोगी पडत नाहीत, तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात. (९)
वळे विवेकाची वेगडी । पडे शब्दाची बोबडी ।
जेथें मनाची तांतडी । कामा नये ॥ १०॥
विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो, शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते व मनाने जाणू जावे, तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही. (१०)
जो बोलकेपणें विशेष । सहस्र मुखांचा जो शेष ।
तोहि सिणला निःशेष । वस्तु न संगवे ॥ ११॥
शेषास सहस्त्र मुखे असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे, पण तोही वर्णन करून थकला, तरी त्याला निजवस्तूचे वर्णन करता आले नाही. (११)
वेदे प्रकाशिलें सर्वही । वेदविरहित कांहीं नाहीं ।
तो वेद कोणासही । दाखवूं सकेना ॥ १२॥
वेदांत सर्व वस्तूंचे वर्णन आढळते. त्यांत ज्या वस्तूचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते; पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तु दाखवू शकत नाही. (१२)
तेचि वस्तु संतसंगें । स्वानुभवें कळों लागे ।
त्याचा महिमा वचनीं सांगे । ऐसा कवणु ॥ १३॥
अशी सर्वप्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तु ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते, त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दांत कसा बरे वर्णन करता येईल ? (१३)
विचित्र कळा ये मायेची । परी वोळखी न संगवे वस्तूची ।
मायातीता अनंताची । संत सोये सांगती ॥ १४॥
मायेचे अंगी अनेक विचित्र कळा असल्या, तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे. अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल, त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात. (१४)
वस्तूसी वर्णिलें नवचे । तेंचि स्वरूप संतांचें ।
या कारणे वचनाचें । कार्य नाही ॥ १५॥
ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही, त्याप्रमाणेच संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही. कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही. (१५)
संत आनंदाचें स्थळ । संत सुखचि केवळ ।
नाना संतोषाचें मूळ । ते हे संत ॥ १६॥
संत हे परमानंदरूप असतात, सुखरूप असतात. एवढेच नव्हे, तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते. (१६)
संत विश्रांतीची विश्रांती । संत तृप्तीची निजतृप्ती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । ते हे संत ॥ १७॥
संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात. (१७)
संत धर्माचें धर्मक्षेत्र । संत स्वरूपाचें सत्पात्र ।
नांतरी पुण्याची पवित्र । पुण्यभूमी ॥ १८॥
संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात; अथवा जेथे पुण्यच उदयास येते, अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. (१८)
संत समाधीचें मंदिर । संत विवेकाचें भांडार ।
नांतरी बोलिजे माहेर । सायोज्यमुक्तीचें ॥ १९॥
संत म्हणजे समाधीचे मंदिरच, विवेकाचे भांडारच आणि सायुज्य मुक्तीचे माहेरघरच असतात. (१९)
संत सत्याचा निश्चयो । संत सार्थकाचा जयो ।
संतप्राप्तीचा समयो । सिद्धरूप ॥ २०॥
संत सत्याचा कधीही त्याग करीत नाहीत. संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो ज्यावेळी आत्मवस्तुप्राप्तीची वेळ येते, त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते. (२०)
मोक्षश्रिया आळंकृत । ऐसे हे संत श्रीमंत ।
जीव दरिद्री असंख्यात । नृपती केले ॥ २१॥
संतांजवळ मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभवसंपन्न असतात. एवढेच नव्हे, तर असंख्य दरिद्री जीवांना मोक्षलक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभवसंपन्न करून सोडतात. (२१)
जे समर्थपणें उदार । जे कां अत्यंत दानशूर ।
तयांचेनि हा ज्ञानविचार । दिधला न वचे ॥ २२॥
संत अत्यंत सामर्थ्यसंपन्न व उदारवृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील ? (२२)
माहांराजे चक्रवर्ती । जाले आहेत पुढें होती ।
परंतु कोणी सायोज्यमुक्ती । देणार नाहीं ॥ २३॥
जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत. सध्या आहेत व पुढेही होतील, पण त्यातील कोणीही सायुज्यमुक्ती देऊ शकत नाहीत. (२३)
जें त्रैलोकीं नाहीं दान । तें करिती संतसज्जन ।
तयां संतांचें महिमान । काय म्हणौनी वर्णावें ॥ २४॥
हे सायुज्यमुक्तीचे दान त्रैलोक्यात संतसज्जनांशिवाय कुणी देऊच शकत नाही. ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी ? (२४)
जें त्रैलोक्याहून वेगळें । जें वेदश्रुतीसी नाकळे ।
तेंचि जयांचेनि वोळे । परब्रह्म अंतरीं ॥ २५॥
जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे, जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतःकरणात प्रगट होते. (२५)
ऐसी संतांची महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा ।
जयांचेनि मुख्य परमात्मा । प्रगट होये ॥ २६॥
असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या, तरी त्या अपुर्याच पडतात. संतांच्या मुळेच मुख्य परमात्मा प्रगट होतो. (२६)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
संतस्तवननाम समास पांचवा ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘संतस्तवननाम’ समास पाचवा समाप्त.
दासबोध दशक पहिला – समास सहावा : श्रोतेजनस्तवन
॥ श्रीराम ॥
आतां वंदूं श्रोते जन । भक्त ज्ञानी संत सज्जन ।
विरक्त योगी गुणसंपन्न । सत्यवादी ॥ १॥
येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो. भक्त, ज्ञानी, संतसज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. (१)
येक सत्वाचे सागर । येक बुद्धीचे आगर ।
येक श्रोते वैरागर । नाना शब्दरत्नांचे ॥ २॥
यांतील काही सत्त्वगुणांचा समुद्रच आहेत, तर कुणी बुद्धिमान आहेत. काही श्रोते नाना शब्दरत्नांची जणू खाणच आहेत. (२)
जे नाना अर्थांबृताचे भोक्ते । जे प्रसंगीं वक्तयाचे वक्ते ।
नाना संशयातें छेदिते । निश्चै पुरुष ॥ ३॥
कुणी असे रसिक आहेत, की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात. तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. (३)
ज्यांची धारणा अपार । जे ईश्वराचे अवतार ।
नांतरी प्रत्यक्ष सुरवर । बैसले जैसे ॥ ४॥
काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की,हे ईश्वराचेच अवतार आहेत. ते जेव्हां सभेत बसतात तेव्हा जणूं प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने सभेत उपस्थित आहेत, असे वाटते. (४)
किं हे ऋषेश्वरांची मंडळी । शांतस्वरूप सत्वागळी ।
जयांचेनि सभामंडळीं । परम शोभा ॥ ५॥
असे अत्यंत सात्त्विक व मूर्तिमंत शांतिस्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की, जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे. (५)
हृदईं वेदगर्भ विलसे । मुखीं सरस्वती विळासे ।
साहित्य बोलतां जैसे । भासती देवगुरु ॥ ६॥
वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात, त्यांच्या जिव्हेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य, नाट्यादी साहित्यप्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरू बृहस्पतीच बोलत आहेत. (६)
जे पवित्रपणें वैश्वानर । जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर ।
ज्ञातेपणें दृष्टीसमोरे । ब्रह्मांड न ये ॥ ७॥
काही श्रोते अग्नीप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फुर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. (७)
जे अखंड सावधान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
सर्वकाळ निराभिमान । आत्मज्ञानी ॥ ८॥
काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळज्ञानी आहेत, तर काही आत्मज्ञानी असून सर्वकाळ निरभिमानी आहेत. (८)
ज्यांचे दृष्टीखालून गेलें । ऐंसें कांहींच नाहीं उरलें ।
पदार्थमात्रांसी लक्षिलें । मनें जयांच्या ॥ ९॥
ज्यांच्या दृष्टीखालून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही, असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थमात्रांस जाणून घेतलेले असते. (९)
जें जें कांहीं आठवावें । तें तें तयांस पूर्वीच ठावें ।
तेथें काये अनुवादावें । ज्ञातेपणेंकरूनी ॥ १०॥
बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे, ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते. तेव्हां शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय, हेच कळत नाही. (१०)
परंतु हे गुणग्राहिक । म्हणौन बोलतों निःशंक ।
भाग्यपुरुष काये येक । सेवीत नाहीं ॥ ११॥
परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात. ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. (११)
सदा सेविती दिव्यान्नें । पालटाकारणें आवेट अन्नें ।
तैसींच माझीं वचनें । पराकृतें ॥ १२॥
जे सर्वदा दिव्यान्ने सेवन करतात, तेही रुचिपालटाकरिता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात, तशीच ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील. (१२)
आपुले शक्तिनुसार । भावें पुजावा परमेश्वर ।
परंतु पुजूं नये हा विचार । कोठेंचि नाहीं ॥ १३॥
प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वरपूजन करावे असे सांगितले जाते, पण परमेश्वरपूजनच करू नये, हा विचार कुठेही सांगितलेला नाही. (१३)
तैसा मी येक वाग्दुर्बळ । श्रोते परमेश्वरचि केवळ ।
यांची पूजा वाचाबरळ । करूं पाहे ॥ १४॥
त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वरस्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो, तरी मला जमेल तशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. (१४)
वित्पत्ती नाहीं कळा नाहीं । चातुर्य नाहीं प्रबंद नाहीं ।
भक्ति ज्ञान वैराग्य नाहीं । गौल्यता नाहीं वचनाची ॥ १५॥
माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती, ज्ञान, वैराग्यादी गुण नाहीत, तसेच शब्दमाधुर्यही नाही. (१५)
ऐसा माझा वाग्विाळास । म्हणौन बोलतों सावकाश ।
भावाचा भोक्ता जगदीश । म्हणौनियां ॥ १६॥
माझा वाग्विलास हा असा आहे, पण जगदीश हा भावाचा भोक्ता असतो. हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे. (१६)
तुम्ही श्रोते जगदीशमूर्ति । तेथें माझी वित्पत्ती किती ।
बुद्धिहीण अल्पमती । सलगी करितों ॥ १७॥
आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीच आहात. माझी व्युत्पत्ती ती किती ? मी मंदबुद्धीचा, मूळ असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करीत आहे. (१७)
समर्थाचा पुत्र मूर्ख जगीं । परी सामर्थ्य असे त्याचा आंगीं ।
तुम्हां संतांचा सलगी । म्हणौनि करितों ॥ १८॥
एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला, तरी तो बापाची सलगी करू शकतो. तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. (१८)
व्याघ्र सिंह भयानक । देखोनि भयाचकित लोक ।
परी त्यांचीं पिलीं निःशंक । तयांपुढे खेळती ॥ १९॥
व्याघ्र-सिंहादी हिंस्त्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात. पण त्यांची पिल्ले निःशंक मनाने त्यांच्यापुढे खेळत असतात. (१९)
तैसा मी संतांचा अंकित । तुम्हां संतांपासीं बोलत ।
तरी माझी चिंता तुमचे चित्त । वाहेलच कीं ॥ २०॥
त्याप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हांपाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी वाहाल अशी मला खात्री आहे. (२०)
आपलेंची बोले वाउगें । त्याची संपादणी करणें लागे ।
परंतु काहीं सांगणें नलगे । न्यून तें पूर्ण करावें ॥ २१॥
आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले, तर आईबापांना त्यास सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही. (२१)
हें तों प्रीतीचें लक्षण । स्वभावेंची करी मन ।
तैसे तुम्ही संतसज्जन । मायेबाप विश्वाचे ॥ २२॥
ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संतसज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. (२२)
माझा आशय जाणोनी जीवें । आतां उचित तें करावें ।
पुढें कथेसि अवधान द्यावें । म्हणे दासानुदास ॥ २३॥
म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे, अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. (२३)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रोतेस्तवननाम समास सहावा ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘श्रोतेजनस्तवननाम’ समास सहावा समाप्त.
दासबोध दशक पहिला – समास सातवा : कवेश्वरस्तवन
॥ श्रीराम ॥
आतां वंदूं कवेश्वर । शब्दसृष्टीचे ईश्वर ।
नांतरी हे परमेश्वर । वेदावतारी ॥ १॥
आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करतो. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दांच्या साहाय्याने नवी सृष्टीच उत्पन करतात किंवा कवी म्हणजे जणू वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. (१)
कीं हे सरस्वतीचें निजस्थान । कीं हे नाना कळांचें जीवन ।
नाना शब्दांचें भुवन । येथार्थ होये ॥ २॥
कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय. नाना कलांचा विकास कवींच्यामुळेच होतो. अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी, असे म्हटले तरी ते योग्य ठरेल. (२)
कीं हे पुरुषार्थाचें वैभव । कीं हे जगदीश्वराचें महत्व ।
नाना लाघवें सत्कीर्तीस्तव । निर्माण कवी ॥ ३॥
जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्त्व वाढविण्याचे कार्य नाना युक्त्या योजून, संतांची कीर्ती वर्णन करून कवी करतात. (३)
कीं हे शब्दरत्नाचे सागर । कीं हे मुक्तांचे मुक्त सरोवर ।
नाना बुद्धीचे वैरागर । निर्माण जाले ॥ ४॥
कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात. मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात. बुद्धीच्या विविध विलासांचे उत्पत्तिस्थान कवीच असतात. या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखविण्यासाठीच जणू ते जन्मास येतात. (४)
अध्यात्मग्रंथांची खाणी । कीं हे बोलिके चिंतामणी ।
नाना कामधेनूचीं दुभणीं । वोळलीं श्रोतयांसी ॥ ५॥
कवी हे अध्यात्मग्रंथांची खाण असतात, चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते; पण तो अचेतन असतो. कवीही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या साहाय्याने करून देतात. ते चेतन असतात, म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेतनूंनी स्रवलेल्या अमृतधारा असे समजावे. (५)
कीं हे कल्पनेचे कल्पतरु । कीं हे मोक्षाचे मुख्य पडीभरु ।
नाना सायोज्यतेचे विस्तारु । विस्तारले ॥ ६॥
किंवा कवी म्हणजे कल्पिलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावाडीच आहेत किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठा विस्तारच आहेत. (६)
कीं हा परलोकींचा निजस्वार्थु । कीं हा योगियांचा गुप्त पंथु ।
नाना ज्ञानियांचा परमार्थु । रूपासि आला ॥ ७॥
किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योगमार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रगट झाला आहे. (७)
कीं हे निरंजनाची खूण । कीं हे निर्गुणाची वोळखण ।
मायाविलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ॥ ८॥
निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते. कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दांत कशी वर्णन करणार ? पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्या मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात. (८)
कीं हा श्रुतीचा भावगर्भ । कीं हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ।
नातरी होये सुल्लभ । निजबोध कविरूपें ॥ ९॥
कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या साहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोधरूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. (९)
कवि मुमुक्षाचें अंजन । कवि साधकांचें साधन ।
कवि सिद्धांचें समाधान । निश्चयात्मक ॥ १०॥
कवी हे मुमुक्षूंना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय किंवा साधकांना साधनास प्रवृत्त करणारे ते साधनरूपच आहेत किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी. (१०)
कवि स्वधर्माचा आश्रयो । कवि मनाचा मनोजयो ।
कवि धार्मिकाचा विनयो । विनयकर्ते ॥ ११॥
कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटले आहे, तर मनोजय कसा करावा यांचेही मार्गदर्शन ते करतात म्हणून त्यांनाच येथे मनोजय म्हटले आहे; तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो, तोही एकप्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो म्हणून त्यांना येथे विनयकर्ते असे समर्थ म्हणत आहेत. (११)
कवि वैराग्याचें संरक्षण । कवि भक्तांचें भूषण ।
नाना स्वधर्मरक्षण । ते हे कवी ॥ १२॥
कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात म्हणजे याप्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवितात म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. कवींमुळे लोकांना आपापल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्माचरण करण्यास प्रवृत्त होतात. म्हणून त्यांना स्वधर्मसंरक्षण असे म्हटले आहे. (१२)
कवि प्रेमळांची प्रेमळ स्थिती । कवि ध्यानस्थांची ध्यानमूर्ति ।
कवि उपासकांची वाड कीर्ती । विस्तारली ॥ १३॥
प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात, तर ध्यान कसे करावे यांचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्ट देवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास साहाय्य करतात. भक्तांची, उपासकांची श्रेष्ठ कीर्तीही कवींच्यामुळेच सर्वदूर पसरते. (१३)
नाना साधनांचे मूळ । कवि नाना प्रेत्नांचें फळ ।
नाना कार्यसिद्धि केवळ । कविचेनि प्रसादें ॥ १४॥
कवींच्यामुळेच लोकांना नाना साधनांची माहिती मिळते, काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते, एवढेच नव्हे, तर कवींच्या रचनेमुळेच विविध कार्यांत सिद्धी प्राप्त होते. (१४)
आधीं कवीचा वाग्विळास । तरी मग श्रवणीं तुंबळे रस ।
कविचेनि मतिप्रकाश । कवित्वास होये ॥ १५॥
कवींचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसास्वाद घडतो, तर त्यांच्या श्रेष्ठप्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. (१५)
कवि वित्पन्नाची योग्यता । कवि सामर्थ्यवंतांची सत्ता ।
कवि विचक्षणाची कुशळता । नाना प्रकारें ॥ १६॥
कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषांचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुषार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. (१६)
कवि कवित्वाचा प्रबंध । कवि नाना धाटी मुद्रा छंद ।
कवि गद्यपद्यें भेदाभेद । पदत्रासकर्ते ॥ १७॥
कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार धाटी, मुद्रा, छंद, प्रास उपयोगात आणतात, गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात. कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात. (१७)
कवि सृष्टीचा आळंकार । कवि लक्ष्मीचा शृंघार ।
सकळ सिद्धींचा निर्धार । ते हे कवी ॥ १८॥
या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात, त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रगट होतात; कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात. (१८)
कवि सभेचें मंडण । कवि भाग्याचें भूषण ।
नान सुखाचें संरक्षण । ते हे कवी ॥ १९॥
कवींमुळे सभा शोभून दिसते. ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षणरूपच असतात. (१९)
कवि देवांचे रूपकर्ते । कवि ऋषीचें महत्ववर्णिते ।
नाना शास्त्रांचें सामर्थ्य ते । कवि वाखाणिती ॥ २०॥
कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन तेच त्यांचे महत्त्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवतात. (२०)
नस्ता कवीचा व्यापार । तरी कैंचा अस्ता जगोद्धार ।
म्हणौनि कवि हे आधार । सकळ सृष्टीसी ॥ २१॥
कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती, तर जगाचा उद्धार कसा बरे झाला असता ? म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. (२१)
नाना विद्या ज्ञातृत्व कांहीं । कवेश्वरेंविण तों नाहीं ।
कवीपासून सर्वही । सर्वज्ञता ॥ २२॥
कवी नसते तर चौदा विद्या, विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार कसा झाला असता ? म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसारास कवीच कारणीभूत आहेत. (२२)
मागां वाल्मीक व्यासादिक । जाले कवेश्वर अनेक ।
तयांपासून विवेक । सकळ जनासी ॥ २३॥
पूर्वी वाल्मीकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकवला. (२३)
पूर्वीं काव्यें होतीं केलीं । तरीच वित्पत्ती प्राप्त झाली ।
तेणे पंडिताआंगीं बाणली । परम योग्यता ॥ २४॥
त्यांच्यासारख्यांनी केलेली उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळेच पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परम योग्यता प्राप्त झाली. (२४)
ऐसे पूर्वीं थोर थोर । जाले कवेश्वर अपार ।
आतां आहेत पुढें होणार । नमन त्यांसी ॥ २५॥
असे पूर्वी जे थोर कवीश्वर होऊन गेले, सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो. (२५)
नाना चातुर्याच्या मूर्ती । किं हे साक्षात् बृहस्पती ।
वेद श्रुती बोलों म्हणती । ज्यांच्या मुखें ॥ २६॥
हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारचे मूर्तिमंत चातुर्यच होय. अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रगट होण्याची इच्छा करतात, असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. (२६)
परोपकाराकारणें । नाना निश्चय अनुवादणें ॥
सेखीं बोलीले पूर्णपणें । संशयातीत ॥ २७॥
केवळ परोपकारासाठीच संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धान्त विस्तारपूर्वक कवी आपल्या काव्यांतून सांगतात. (२७)
कीं हे अमृताचे मेघ वोळले । कीं हे नवरसाचे वोघ लोटले ।
नाना सुखाचे उचंबळले । सरोवर हे ॥ २८॥
हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघ आहेत. किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठमोठे प्रवाहच आहेत किंवा नाना प्रकारच्या सुखांनी उचंबळून येणारी ही सरोवरे आहेत. (२८)
कीं हे विवेकनिधीचीं भांडारें । प्रगट जालीं मनुष्याकारें ।
नाना वस्तूचेनि विचारें । कोंदाटले हे ॥ २९॥
कवींचे अंतरंग निरनिरळ्या वस्तूंच्या विचाराने भरले असते. म्हणून त्यांना मनुष्यरूपांनी प्रगटलेली विवेकरूपी रत्नांची भांडारे असल्याचे समर्थ म्हणतात. (२९)
कीं हे आदिशक्तीचें ठेवणें । नाना पदार्थास आणी उणें ।
लाधलें पूर्व संचिताच्या गुणें । विश्वजनासी ॥ ३०॥
किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून, जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरविणारी ही ठेव, लोकांना त्यांच्या पूर्वपुण्यसंचयानेच प्राप्त झालेली असते. (३०)
कीं हे सुखाचीं तारुवें लोटलीं । आक्षै आनंदे उतटलीं ।
विश्वजनास उपेगा आलीं । नाना प्रयोगाकारणे ॥ ३१॥
कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची ‘जहाजेच’ असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगांसाठी लोकांच्या उपयोगी पडत आहेत. (३१)
कीं हे निरंजनाची संपत्ती । कीं हे विराटाची योगस्थिती ।
नांतरी भक्तीची फळश्रुती । फळास आली ॥ ३२॥
कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्म्याची संपत्ती आहे किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे. (३२)
कीं हा ईश्वराचा पवाड । पाहातां गगनाहून वाड ।
ब्रह्मांडरचनेहून जाड । कविप्रबंदरचना ॥ ३३॥
किंवा आकाशाहूनही विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे. किंवा या विशाल ब्रह्मांडरचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंधरचना आहे. (३३)
आतां असो हा विचार । जगास आधार कवेश्वर ।
तयांसी माझा नमस्कार । साष्टांग भावें ॥ ३४॥
असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत, म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवितो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. (३४)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
कवेश्वरस्तवननाम समास सातवा ॥ ७॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘कवेश्वरस्तवननाम’ समास सातवा समाप्त
दासबोध दशक पहिला – समास आठवा : सभास्तवन
॥ श्रीराम ॥
आतां वंदूं सकळ सभा । जये सभेसी मुक्ति सुल्लभा ।
जेथें स्वयें जगदीश उभा । तिष्ठतु भरें ॥ १॥
श्री समर्थ म्हणतात की, आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो, जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते व जेथे स्वतः जगदीश प्रेमभराने तिष्ठत उभा असतो. (१)
श्लोक ॥ नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ ।
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद ॥
नाहीं वैकुंठीचा ठाईं । नाहीं योगियांचा हृदईं ।
माझे भक्त गाती ठाईं ठाईं । तेथें मी तिष्ठतु नारदा ॥ २॥
भगवान म्हणतात की, ‘नारदा, मी वैकुंठात, योग्यांच्या हृदयात (अथवा सूर्यबिंबामध्ये) राहात नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात, तेथे मी उभा असतो. (२)
याकारणें सभा श्रेष्ठ । भक्त गाती तें वैकुंठ ।
नामघोषें घडघडाट । जयजयकारें गर्जती ॥ ३॥
असे स्वतः भगवंतांनी सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जयजयकार करून त्याची कीर्ती गात असतात, ती सभा श्रेष्ठ असून ती म्हणजेच खरे वैकुंठ होय. (३)
प्रेमळ भक्तांचीं गायनें । भगवत्कथा हरिकीर्तनें ।
वेदव्याख्यान पुराणश्रवणें । जेथें निरंतर ॥ ४॥
अशा सभेमध्ये प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत्-कथा, हरिकीर्तन, वेदांवरील व्याख्यान, तसेच पुराण-श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात. (४)
परमेश्वराचे गुणानुवाद । नाना निरूपणाचे संवाद ।
अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथे ॥ ५॥
तेथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात. विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते. तसेच अध्यात्मविद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते. (५)
नाना समाधानें तृप्ती । नाना आशंकानिवृत्ती ।
चित्तीं बैसे ध्यानमूर्ति । वाग्विळासें ॥ ६॥
अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका-कुशंका तसेच तर्क-कुतर्कांचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते. अशाप्रकारे व्याख्यान- प्रवचनादिकांमुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदैवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते. (६)
भक्त प्रेमळ भाविक । सभ्य सखोल सात्त्विक ।
रम्य रसाळ गायक । निष्ठावंत ॥ ७॥
अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्त्विक लोक, तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात. (७)
कर्मसीळ आचारसीळ । दानसीळ धर्मसीळ ।
सुचिस्मंत पुण्यसीळ । अंतरशुद्ध कृपाळु ॥ ८॥
या सभेत कर्मनिष्ठ आचारनिष्ठ, दानशील धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहेत असे लोक संमिलित होतात. (८)
योगी वीतरागी उदास । नेमक निग्रह तापस ।
विरक्त निस्पृह बहुवस । आरण्यवासी ॥ ९॥
दंडधारी जटाधारी । नाथपंथी मुद्राधारी ।
येक बाळब्रह्मचारी । योगेश्वर ॥ १०॥
तेथे योगी, वैराग्ययुक्त, उदासीन, नियमनिष्ठ निग्रही, तापसी, विरक्त, निःस्पृह बराच काळ अरण्यात राहाणारे दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे वैष्णव, तर कुणी बालब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात. (९-१०)
पुरश्चरणी आणी तपस्वी । तीर्थवासी आणी मनस्वी ।
माहायोगी आणी जनस्वी । जनासारिखे ॥ ११॥
कुणी पुरश्चरण करणारे तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहाणारे, तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजविणारे, लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात. (११)
सिद्ध साधु आणी साधक । मंत्रयंत्रशोधक ।
येकनिष्ठ उपासक । गुणग्राही ॥ १२॥
सिद्ध, साधू, साधक, मंत्र-यंत्र करून देणारे कुणी एकनिष्ठ उपासक, तर कुणी गुणग्राही असतात. (१२)
संत सज्जन विद्वज्जन । वेदज्ञ शास्त्रज्ञ माहाजन ।
प्रबुद्ध सर्वज्ञ समाधान । विमळकर्ते ॥ १३॥
येथे संत, सजन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, ज्ञानी, सर्वज्ञ, तर कुणी शुद्ध समाधान करणारे असतात. (१३)
योगी वित्पन्न ऋषेश्वर । धूर्त तार्किक कवेश्वर ।
मनोजयाचे मुनेश्वर । आणी दिग्वल्की ॥ १४॥
योगी, विद्वान, ऋषीश्वर तर कुणी धूर्त, तार्किक, कवीश्वर मनोनिग्रही मुनिश्रेष्ठ, तर काही दिगंबरही असतात. (१४)
ब्रह्मज्ञानी आत्मज्ञानी । तत्त्वज्ञानी पिंडज्ञानी ।
योगाभ्यासी योगज्ञानी । उदासीन ॥ १५॥
ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्त्वज्ञानी, पिंडज्ञानी योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. (१५)
पंडित आणी पुराणिक । विद्वांस आणी वैदिक ।
भट आणी पाठक । येजुर्वेदी ॥ १६॥
कुणी पंडित तर कुणी पुराणिक तर कुणी विद्वान तर कुणी वैदिक, भट पाठक, यजुर्वेदी इत्यादी नाना लोक एकत्र येतात. (१६)
माहाभले माहाश्रोत्री । याज्ञिक आणी आग्नहोत्री ।
वैद्य आणी पंचाक्षरी । परोपकारकर्ते ॥ १७॥
अती चांगले, महाश्रोत्री, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही असतात. (१७)
भूत भविष्य वर्तमान । जयांस त्रिकाळाचें ज्ञान ।
बहुश्रुत निराभिमान । निरापेक्षी ॥ १८॥
काही भूत, भविष्य, वर्तमानकाळाचे ज्ञान असणारे त्रिकाल असतात, तर काही बहुश्रुत काही निरभिमानी व काही अगदी निरपेक्ष असतात. (१८)
शांति क्ष्मा दयासीळ । पवित्र आणी सत्वसीळ ।
अंतरशुद्ध ज्ञानसीळ । ईश्वरी पुरुष ॥ १९॥
शांती, क्षमा, दयाशील पवित्र, सत्त्वशील, शुद्ध अंतःकरणाचे, ज्ञाननिष्ठ जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात. (१९)
ऐसे जे कां सभानायेक । जेथें नित्यानित्यविवेक ।
त्यांचा महिमा अलोलिक । काय म्हणोनि वर्णावा ॥ २०॥
अशा प्रकारचे जे सभानायक असतात, जेथे नित्यानित्य विवेक असतो, त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल ? (२०)
जेथें श्रवणाचा उपाये । आणी परमार्थसमुदाये ।
तेथें जनासी तरणोपाये । सहजचि होये ॥ २१॥
जेथे असा परमार्थसमुदाय असतो त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला, तर सामान्य लोकांनाही भवसागर तरून जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. (२१)
उत्तम गुणाची मंडळी । सत्वधीर सत्वागळी ।
नित्य सुखाची नव्हाळी । जेथें वसे ॥ २२॥
अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी, सत्त्वशील, सत्त्वनिष्ठ एकत्र जमतात, त्यामुळे तेथे नित्य सुखप्राप्तीच होते. (२२)
विद्यापात्रें कळापात्रें । विशेष गुणांची सत्पात्रें ।
भगवंताचीं प्रीतिपात्रें । मिळालीं जेथें ॥ २३॥
तेथे विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेष गुणसंपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. (२३)
प्रवृत्ती आणी निवृत्ती । प्रपंची आणी परमार्थी ।
गृहस्ताश्रमी वानप्रहस्ती । संन्यासादिक ॥ २४॥
प्रवृत्त, निवृत्त, प्रपंची, परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी आणि संन्यासी तेथे असतात. (२४)
वृद्ध तरुण आणी बाळ । पुरुष स्त्रियादिक सकळ ।
अखंड ध्याती तमाळनीळ । अंतर्यामीं ॥ २५॥
तेथे वृद्ध, तरुण, बाल, स्त्रिया, पुरुष आदी सर्वच श्याम-वर्ण भगवान विष्णूचे हृदयात अखंड ध्यान करतात. (२५)
ऐसे परमेश्वराचे जन । त्यांसी माझें अभिवंदन ।
जयांचेनि समाधान । अकस्मात बाणें ॥ २६॥
असे जे परमेश्वराला प्रिय असणारे लोक आहेत, त्यांना मी अभिवंदन करतो. त्यांच्या सहवासाने तत्काळ समाधान मिळून ते स्थिर होते. (२६)
ऐंसिये सभेचा गजर । तेथें माझा नमस्कार ।
जेथें नित्य निरंतर । कीर्तन भगवंताचें ॥ २७॥
जेथे नित्य निरंतर भगवंताच्या कीर्तनाचा गजर होत असतो, अशा सभेस माझा नमस्कार असो. (२७)
जेथें भगवंताच्या मूर्ती । तेथें पाविजे उत्तम गती ।
ऐसा निश्चय बहुतां ग्रंथीं । महंत बोलिले ॥ २८॥
जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्तिस्वरूप सत्पुरुष असतात, तेथे गेले असता सहजच उत्तम गती प्राप्त होते, असे अनेक संत-महंतांनी अनेक ग्रंथांतून ठामपणे सांगितले आहे. (२८)
कल्लौ कीर्तन वरिष्ठ । जेथें होय ते सभा श्रेष्ठ ।
कथाश्रवणें नाना नष्ट । संदेह मावळती ॥ २९॥
कलियुगात हरिकीर्तन हेच सर्वोत्कृष्ट साधन असून जेथे हरिकीर्तन होते, तीच सभा श्रेष्ठ होय. तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. (२९)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सभास्तवननाम समास आठवा ॥ ८॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे
‘सभास्तवननाम’ समास आठवा समाप्त.
दासबोध दशक पहिला – समास नववा : परमार्थस्तवन
॥ श्रीराम ॥
आतां स्तऊं हा परमार्थ । जो साधकांचा निजस्वार्थ ।
नांतरी समर्थामध्ये समर्थ । योग हा ॥ १॥
आता परमार्थाचे गुणवर्णन करून सांगतो. कारण परमार्थ हेच साधकांचे मुख्य ध्येय असून मानवी जीवनात सर्वोत्तम समर्थ योग परमार्थच आहे. (१)
आहे तरी परम सुगम । परी जनासी जाला दुर्गम ।
कां जयाचें चुकलें वर्म । सत्समागमाकडे ॥ २॥
खरे पाहिले तर परमार्थ अत्यंत सोपा आहे. संत-समागम केला तर त्याची सहज प्राप्ती होते; पण लोकांना हे मर्म कळत नाही. त्यामुळे त्यांना तो अति दुर्गम वाटतो. (२)
नाना साधनांचे उधार । हा रोकडा ब्रह्मसाक्षात्कार ।
वेदशास्त्रीं जें सार । तें अनुभवास ये ॥ ३॥
परब्रह्मप्राप्तीची अनेक साधने आहेत, पण त्यांचे फल कालांतराने मिळते; पण संतसमागम हा रोकडा व्यवहार आहे. म्हणजे त्याने ब्रह्मसाक्षात्कार हे फळ तत्काळ मिळते. वेदशास्त्रांचे जे सार तो ब्रह्मसाक्षात्कार तत्काळ अनुभवास येतो. (३)
आहे तरी चहूंकडे । परी अणुमात्र दृष्टी न पडे ।
उदास परी येकीकडे । पाहातां दिसेना ॥ ४॥
तसे पाहिले तर परमार्थ म्हणजे परब्रह्म हे सर्वत्र व्यापून राहिले आहे, पण पाहावयास गेले तर अणुमात्रही दृष्टीस पडत नाही. सर्वसंगपरित्याग करून एकांतात राहून प्रयत्न केला तरी ते दिसत नाही. (४)
आकाशमार्गी गुप्त पंथ । जाणती योगिये समर्थ ।
इतरांस हा गुह्यार्थ । सहसा न कळे ॥ ५॥
जे योगी असतात, तेच सुषुम्ना नाडीद्वारे षट्चक्रे भेदून हृदयाकाशमार्गाने गुप्तपणे स्वस्वरूपदर्शन करू शकतात. त्यांच्या ठिकाणीच या मार्गाचे ज्ञान व तो आक्रमण्याची क्षमता असते. सामान्य लोकांना हे सहसा कळत नाही. (५)
साराचेंहि निजसार । अखंड अक्षै अपार ।
नेऊं न सकती तश्कर । कांही केल्या ॥ ६॥
परमार्थ हा सर्व साराचेही निजसार असून तो अखंड, अक्षय व अपार असा परब्रह्मस्वरूपच असतो. त्यास कुणी चोरू शकत नाही. (६)
तयास नाहीं राजभये । अथवा नाहीं अग्निभये ।
अथवास्वापदभये । बोलोंच नये ॥ ७॥
त्यास राजभय नाही, अग्निभय नाही अथवा श्वापदभय नाही. असल्या भयाची गोष्टच कुणी बोलू नये. (७)
परब्रह्म तें हालवेना । अथवा ठावही चुकेना ।
काळांतरी चळेना । जेथीचा तेथें ॥ ८॥
परब्रह्म आपल्या जागेवरून हलत नाही, तसेच दुसरे कुणीही त्याला हलवू शकत नाही, कितीही काळ गेला तरी ते आपले स्थान सोडत नाही. जिथल्या तिथे स्थिर असते. (८)
ऐसें तें निज ठेवणें । कदापि पालटों नेणे ।
अथवा नव्हे आदिक उणें । बहुतां काळें ॥ ९॥
अशी ती अगदी स्वतःची खास ठेव आहे. त्यात कधीही परिवर्तन होत नाही, अथवा कितीही काळ लोटला तरी त्यात अधिक-उणे होत नाही. (९)
अथवा तें घसवटेना । अथवा अदृश्य होयेना ।
नांतरी पाहातां दिसेना । गुरुअंजनेविण ॥ १०॥
त्याचप्रमाणे ते झिजतही नाही वा अदृश्यही होत नाही. पण असे असून गुरुकृपेच्या अंजनाशिवाय पाहू गेले तर ते दिसतही नाही. (१०)
मागां योगिये समर्थ । त्यांचाहि निजस्वार्थ ।
यासि बोलिजे परमार्थ । परमगुह्य म्हणौनि ॥ ११॥
पूर्वीही जे सामर्थ्यसंपन्न योगी होऊन गेले, त्यांचाही निजस्वार्थ परमार्थ हाच होता. परमार्थ परम गुप्त असतो, म्हणूनच त्यास परमार्थ म्हणतात. (११)
जेंही शोधून पाहिला । त्यासी अर्थ सांपडला ।
येरां असोनी अलभ्य जाला । जन्मोजन्मीं ॥ १२॥
ज्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्याची प्राप्ती झाली. जे असा प्रयत्नच करीत नाहीत त्यांना तो जवळ असूनही कित्येक जन्म गेले तरी त्याची प्राप्ती होत नाही. (१२)
अपूर्वता या परमार्थाची । वार्ता नाहीं जन्ममृत्याची ।
आणी पदवी सायोज्यतेची । सन्निधचि लाभें ॥ १३॥
हा परमार्थ फार अपूर्व आहे. त्याच्यापाशी जन्ममृत्यूची वार्ताही नसते. उलट बसल्या ठिकाणी अगदी सहज सायुज्यतेची योग्यता परमार्थामुळे प्राप्त होते. (१३)
माया विवेकें मावळे । सारासारविचार कळे ।
परब्रह्म तेंहि निवळे । अंतर्यामीं ॥ १४॥
सारासार विवेकामुळे मायेचे पटल नाहीसे होते व अंतर्यामी परब्रह्माचा साक्षात्कार होतो. (१४)
ब्रह्म भासले उदंड । ब्रह्मीं बुडालें ब्रह्मांड ।
पंचभूतांचें थोतांड । तुछ्य वाटे ॥ १५॥
सर्वत्र ते ब्रह्मच व्यापून आहे अशी अनुभूती येऊन त्या ब्रह्मात जणू ब्रह्मांड बुडून जाते. आणि पंचमहाभूतांचा हा अफाट पसारा तुच्छ वाटू लागतो. (१५)
प्रपंच वाटे लटिका । माया वाटे लापणिका ।
शुद्ध आत्मा विवेका- । अंतरीं आला ॥ १६॥
प्रपंच खोटा वाटतो, माया मिथ्या वाटते व विवेकामुळे शुद्ध आत्मस्वरूप अंतरी प्रगट होते. (१६)
ब्रह्मस्थित बाणतां अंतरीं । संदेह गेला ब्रह्मांडाबाहेरीं ।
दृश्याची जुनी जर्जरी । कुहिट जाली ॥ १७॥
अंतरंगात स्वस्वरूपानुभव आला म्हणजे संशय कुठल्याकुठे नाहीसा होतो. हे सर्व दृश्य विश्व जुनाट फाटलेले, विटलेले वाटू लागते. (१७)
ऐसा हा परमार्थ । जो करी त्याचा निजस्वार्थ ।
आतां या समर्थास समर्थ । किती म्हणौनि म्हणावें ॥ १८॥
परमार्थ हा असा आहे. जो करील त्याच्या जन्माचे सार्थक होते. हा इतका श्रेष्ठ, थोर व उत्तमोत्तम आहे की, याची प्रशंसा तरी किती करावी ? (१८)
या परमार्थाकरितां । ब्रह्मादिकांसि विश्रामता ।
योगी पावती तन्मयता । परब्रह्मीं ॥ १९॥
या परमार्थामुळेच ब्रह्मादी देवांना विश्रांती लाभते. त्याच्या योगानेच योगी परब्रह्माशी तादात्म्याचा अनुभव घेतात. (१९)
परमार्थ सकळांस विसांवा । सिद्ध साधु माहानुभावां ।
सेखीं सात्विक जड जीवां । सत्संगेंकरूनी ॥ २०॥
सिद्ध, साधू, महानुभाव इत्यादी सर्वांना परमार्थामुळेच विसावा प्राप्त होतो. एवढेच नव्हे तर सामान्य जड पण सात्त्विक जीवांनाही संतसंगतीने हा लाभ मिळू शकतो. (२०)
परमार्थ जन्माचें सार्थक । परमार्थ संसारीं तारक ।
परमार्थ दाखवी परलोक । धार्मिकासी ॥ २१॥
परमार्थामुळेच मनुष्यजन्माचे सार्थक होते. जीव परमार्थामुळेच संसारातून तरून जातो. धार्मिकांना परमार्थामुळेच परलोकात उत्तम गती प्राप्त होते. (२१)
परमार्थ तापसांसी थार । परमार्थ साधकांसी आधार ।
परमार्थ दाखवी पार । भवसागराचा ॥ २२॥
तपस्वी लोकांचा परमार्थच आश्रयदाता आहे. साधकांना परमार्थच आधार असून त्याच्या योगेच या भवसागरातून पैलतीरास जाता येते. (२२)
परमार्थी तो राज्यधारी । परमार्थ नाहीं तो भिकारी ।
या परमार्थाची सरी । कोणास द्यावी ॥ २३॥
जो परमार्थ करतो तोच खरा श्रीमंत होय व जो परमार्थ करीत नाही तोच खरा भिकारी ! अशा या परमार्थाची तुलना तरी कुणाबरोबर करावी ? (२३)
अनंत जन्मींचें पुण्य जोडे । तरीच परमार्थ घडे ।
मुख्य परमात्मा आतुडे । अनुभवासी ॥ २४॥
अनंत जन्मांची पुण्याई गाठी असेल तरच मनुष्याकडून परमार्थ घडतो. परमार्थामुळे आपल्या अंतरातच आपणास मुख्य परमात्मा अनुभवास येतो. (२४)
जेणें परमार्थ वोळखिला । तेणें जन्म सार्थक केला ।
येर तो पापी जन्मला । कुलक्षयाकारणें ॥ २५॥
ज्याने कुणी परमार्थाचे हे श्रेष्ठत्व जाणले असेल त्याचाच जन्म खरोखरी सार्थकी लागतो. इतर जे त्याचे महत्त्व जाणत नाहीत, ते लोक पापी असून केवळ कुलक्षयाकरिताच जन्मास येतात. (२५)
असो भगवत्प्राप्तीविण । करी संसाराचा सीण ।
त्य मूर्खाचें मुखावलोकन । करूंच नये ॥ २६॥
असो. भगवत्प्राप्तीसाठी प्रयत्न न करता जो केवळ संसारासाठी कष्ट उपसतो, अशा मूर्ख माणसाचे तोंडही पाहू नये. (२६)
भल्यानें परमार्थीं भरावें । शरीर सार्थक करावें ।
पूर्वजांस उद्धरावें । हरिभक्ती करूनी ॥ २७॥
चांगल्या माणसाने हा मनुष्यदेह परमार्थी लावावा व या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. त्याने भगवद्भक्ती करून स्वतःचा व पूर्वजांचाही उद्धार करून घ्यावा. (२७)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
परमार्थस्तवननाम समास नववा ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘परमार्थस्तवननाम’ समास नववा समाप्त.
दासबोध दशक पहिला – समास दहावा : नरदेहस्तवननिरूपण
॥ श्रीराम ॥
धन्य धन्य हा नरदेहो । येथील अपूर्वता पाहो ।
जो जो कीजे परमार्थलाहो । तो तो पावे सिद्धीतें ॥ १॥
खरोखरच हा नरदेह अत्यंत धन्य आहे. कारण याची अपूर्वता अशी आहे की, या देहात परमार्थाचा जो जो छंद लागेल तो तो सिद्धीस जातो. (१)
या नरदेहाचेनि लागवेगें । येक लागले भक्तिसंगें ।
येकीं परम वीतरागें । गिरिकंदरें सेविलीं ॥ २॥
या नरदेहाच्या योगे कुणी परमेश्वराची भक्ती करू लागतात, तर कुणी अत्यंत वैराग्यशील असतील ते डोंगरकपारीत एकांतात जाऊन राहातात. (२)
येक फिरती तिर्थाटणें । येक करिती पुरश्चरणें ।
येक अखंड नामस्मरणें । निष्ठावंत राहिले ॥ ३॥
कुणी तीर्थयात्रा करतात, तर कुणी पुरश्चरणे करतात. काही अत्यंत निष्ठेने अखंड नामस्मरण करण्यात दंग होतात. (३)
येक तपें करूं लागले । येक योगाभ्यासी माहाभले ।
येक अभ्यासयोगें जाले । वेदशास्त्री वित्पन्न ॥ ४॥
कुणी तपाचरण करतात, तर कुणी फार श्रेष्ठ योगाभ्यासी बनतात. कुणी अभ्यास करून वेदशास्त्रांत पारंगत होतात. (४)
येकीं हटनिग्रह केला । देह अत्यंत पीडिला ।
येकीं देह ठाईं पाडिला । भावार्थबळें ॥ ५॥
कुणी हठयोगाचा अभ्यास करून देह कष्टवितात, तर कुणी भावभक्तीच्या योगे बसल्या जागीच देवाचा साक्षात्कार करून घेतात. (५)
येक माहानुभाव विख्यात । येक भक्त जाले ख्यात ।
येक सिद्ध अकस्मात । गगन वोळगती ॥ ६॥
कुणी प्रसिद्ध महानुभाव असतात, तर कुणी भक्त म्हणून कीर्ती मिळवितात. कुणी योगाभ्यासाने सिद्धी प्राप्त करून आकाशात संचार करू लागतात. (६)
येक तेजीं तेजचि जाले । येक जळीं मिळोन गेले ।
येक ते दिसतचि अदृश्य जाले । वायोस्वरूपीं ॥ ७॥
कुणी तेजोरूप होऊन तेजात विलीन होतात, तर कुणी जळात विरघळून जातात. कुणी पवनजय करून वायुरूप होऊन एकाएकी अदृश्य होतात. (७)
येक येकचि बहुधा होती । येक देखतचि निघोनि जाती ।
येक बैसले असतांची भ्रमती । नाना स्थानीं समुद्रीं ॥ ८॥
कुणी एक असून अनेक रूपे धारण करतात, तर कुणी पाहता पाहता गुप्त होतात. कुणी एका जागी बसलेले असूनही नाना स्थळी, समुद्रादी ठिकाणीही फिरून येतात. (८)
येक भयानकावरी बैसती । एक अचेतनें चालविती ।
येक प्रेतें उठविती । तपोबळेंकरूनी ॥ ९॥
कुणी व्याघ्रादी हिंस्त्र पशूवर स्वार होतात, तर कुणी जड भिंती इत्यादीही चालवितात. कुणी आपल्या तपोबलाने मेलेल्या माणसासही जिवंत करतात. (९)
येक तेजें मंद करिती । येक जळें आटविती ।
येक वायो निरोधिती । विश्वजनाचा ॥ १०॥
कुणी तेजाला मंद करतात, तर कुणी जलाशय कोरडे करतात, तर कुणी जगातील सर्व प्राण्यांचा श्वास कोंडून धरतात. (१०)
ऐसे हटनिग्रही कृतबुद्धी । जयांस वोळल्या नाना सिद्धी ।
ऐसे सिद्ध लक्षावधी । होऊन गेले ॥ ११॥
कोणी अत्यंत दृढ निश्चयाने सातत्याने योगाभ्यास करून अनेक प्रकारच्या सिद्धी मिळवितात. असे लक्षावधी सिद्ध होऊन गेले आहेत. (११)
येक मनोसिद्ध येक वाचासिद्ध । येक अल्पसिद्ध येक सर्वसिद्ध ।
ऐसे नाना प्रकारीचे सिद्ध । विख्यात जाले ॥ १२॥
कुणी मनोसिद्ध असतात म्हणजे ते जो संकल्प करतील तो सिद्धीस जातो, तर कुणी वाचासिद्ध असतात म्हणजे ते जे बोलतात ते तत्काळ खरे होते. कुणी अल्पसिद्ध म्हणजे लहानसहान सिद्धी प्राप्त केलेले असतात, तर कुणी सर्वसिद्ध म्हणजे अष्टमहासिद्धी प्राप्त झालेले असतात. असे नाना प्रकारचे सिद्धपुरुष कीर्ती मिळवून गेले आहेत. (१२)
येक नवविधाभक्तिराजपंथें । गेले, तरले परलोकींच्या निजस्वार्थें ।
येक योगी गुप्तपंथें । ब्रह्मभुवना पावले ॥ १३॥
कुणी नवविधाभक्तीच्या राजमार्गाने जाऊन भवसागर तरून गेले व स्वस्वरूपाचा अनुभव घेऊन त्यांनी जन्म सार्थकी लावला. कुणी योगी सुषुम्नेच्या गुप्तमार्गाने ब्रह्मलोकास गेले. (१३)
येक वैकुंठास गेले । येक सत्यलोकीं राहिले ।
येक कैळासीं बैसले । शिवरूप होऊनी ॥ १४॥
कुणी वैकुंठास गेले, कुणी सत्यलोकात राहिले तर कुणी शिवरूप होऊन कैलासात जाऊन राहिले. (१४)
येक इंद्रलोकीं इंद्र जाले । येक पितृलोकीं मिळाले ।
येक ते उडगणी बैसले । येक ते क्षीरसागरी ॥ १५॥
कुणी इंद्रलोकी इंद्र झाले, तर कुणाला पितृलोक प्राप्त झाला. कुणी नक्षत्रमंडळात जाऊन बसले, तर कुणी क्षीरसागरात जाऊन राहिले. (१५)
सलोकता समीपता । स्वरूपता सायोज्यता ।
या चत्वार मुक्ती तत्वतां । इच्छा सेऊनि राहिले ॥ १६॥
सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता या चार मुक्तींपैकी ज्याला ज्या मुक्तीची इच्छा होती, त्याप्रमाणे ती ती मुक्ती त्यांनी मिळविली. (१६)
ऐसे सिद्ध साधू संत । स्वहिता प्रवर्तले अनंत ।
ऐसा हा नरदेह विख्यात । काय म्हणौन वर्णावा ॥ १७॥
याप्रमाणे या नरदेहाच्या साह्याने अनेकांनी स्वहितासाठी प्रयत्न केले. सिद्ध, साधू, संत यांची अशी अनंत उदाहरणे आहेत. म्हणून अशा या अपूर्व नरदेहाचे किती म्हणून वर्णन करावे ? (१७)
या नरदेहाचेनि आधारें । नाना साधनांचेनि द्वारें ।
मुख्य सारासारविचारें । बहुत सुटले ॥ १८॥
या नरदेहायोगे नाना प्रकारची साधने करून आणि मुख्यतः सारासारविचार करून अनेक जीव मुक्त झाले आहेत. (१८)
या नरदेहाचेनि संमंधें । बहुत पावले उत्तम पदें ।
अहंता सांडून स्वानंदे । सुखी जाले ॥ १९॥
या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम पदे मिळविली. देहाची अहंता सोडून स्वस्वरूपानुभव घेऊन ते स्वानंदाने सुखी झाले (१९)
नरदेहीं येऊन सकळ । उधरागती पावले केवळ ।
येथें संशयाचें मूळ । खंडोन गेलें ॥ २०॥
या नरदेहात आल्यावर विवेकाच्या साहाय्याने सर्व संशयांचे निरसन झाल्याने अनेकांना सद्गतीचा लाभ झाला आहे. (२०)
पशुदेहीं नाहीं गती । ऐसे सर्वत्र बोलती ।
म्हणौन नरदेहींच प्राप्ती । परलोकाची ॥ २१॥
पशुदेहात विवेक नसल्याने उत्तम गती प्राप्त करून घेता येत नाही असे सर्व सांगतात, म्हणून हा नरदेह प्राप्त झाला असतानाच उत्तम अशा परलोकाची प्राप्ती करून घ्यावी. (२१)
संत महंत ऋषी मुनी । सिद्ध साधू समाधानी ।
भक्त मुक्त ब्रह्मज्ञानी । विरक्त योगी तपस्वी ॥ २२॥
तत्त्वज्ञानी योगाभ्यासी । ब्रह्मच्यारी दिगंबर संन्यासी ।
शडदर्शनी तापसी । नरदेहींच जाले ॥ २३॥
संत, महंत, ऋषी, मुनी, सिद्ध, साधू समाधानी, भक्त, मुक्त, ब्रह्मज्ञानी, विरक्त, योगी, तपस्वी, तत्त्वज्ञानी, योगाभ्यासी, ब्रह्मचारी, दिगंबर संन्यासी, षड्दर्शनी, तापसी यांनी नरदेहातच अशी योग्यता प्राप्त केली. (२२-२३)
म्हणौनी नरदेह श्रेष्ठ । नाना देहांमध्यें वरिष्ठ ।
जयाचेनि चुके आरिष्ट । येमयातनेचें ॥ २४॥
म्हणूनच सर्व देहांमध्ये नरदेहच सर्वांत श्रेष्ठ आहे, कारण या देहातच यमयातनारूपी अरिष्ट चुकविण्याची संधी प्राप्त होते. (२४)
नरदेह हा स्वाधेन । सहसा नव्हे पराधेन ।
परंतु हा परोपकारीं झिजऊन । कीर्तिरूपें उरवावा ॥ २५॥
नरदेह सहसा पराधीन असत नाही, स्वाधीनच असतो. म्हणून याला परोपकारात झिजवून कीर्तिरूपे उरवावा. (२५)
अश्व वृषभ गाई म्हैसी । नाना पशु स्त्रिया दासी ।
कृपाळूपणें सोडितां त्यांसी । कोणी तरी धरील ॥ २६॥
घोडा, बैल, गाई, म्हशी, इतर नाना पशू व स्त्रिया, विशेषतः दासी यांना जर कृपाळूपणे मोकळे सोडले, तर त्यांना कुणीही धरून नेईल. (२६)
तैसा नव्हे नरदेहो । इछा जाव अथवा रहो ।
परी यास कोणी पाहो । बंधन करूं सकेना ॥ २७॥
पण पुरुषदेहाची स्थिती तशी नाही. त्याची इच्छा असेल, तर त्याने घरात राहावे वा बाहेर जावे, पण त्याला कुणी पारतंत्र्यात ठेवू शकत नाही. (२७)
नरदेह पांगुळ असता । तरी तो कार्यास न येता ।
अथवा थोंटा जरी असता । तरी परोपकारास न ये ॥ २८॥
नरदेह पांगळा असेल तर त्याने काम करता येत नाही. अथवा तो थोटा असेल तरी त्याने परोपकार करता येत नाही. (२८)
नरदेह अंध असिला । तरी तो निपटचि वायां गेला ।
अथवा बधिर जरी असिला । तरी निरूपण नाहीं ॥ २९॥
नरदेह आंधळा असेल तर तो पूर्णपणे वायाच जातो. अथवा बहिरा असेल तर श्रवण-निरूपणाच्या उपयोगी पडत नाही. (२९)
नरदेह असिला मुका । तरी घेतां न ये आशंका ।
अशक्त रोगी नासका । तरी तो निःकारण ॥ ३०॥
नरदेह मुका असेल तर मनातील शंका बोलून दाखवता येत नाहीत, त्यामुळे त्यांचे निरसन होत नाही किंवा तो अशक्त, रोगी, किंवा सडलेला असेल तरी तो कुचकामाचा ठरतो. (३०)
नरदेह असिला मूर्ख । अथवा फेंपया समंधाचें दुःख ।
तरी तो जाणावा निरार्थक । निश्चयेंसीं ॥ ३१॥
नरदेह लाभला असूनही तो प्राणी मूर्ख असेल अथवा त्याला फेफरे अथवा समंधाची बाधा वगैरे असेल तरी तो निश्चितपणे निरर्थकच जाणावा. (३१)
इतकें हें नस्तां वेंग । नरदेह आणी सकळ सांग ।
तेणें धरावा परमार्थमार्ग । लागवेगें ॥ ३२॥
इतकी ही व्यंगे नसून चांगला आरोग्यसंपन्न, धडधाकट नरदेह ज्याला लाभला असेल त्याने तत्काळ परमार्थमार्ग धरून या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. (३२)
सांग नरदेह जोडलें । आणी परमार्थबुद्धि विसर्ले ।
तें मूर्ख कैसें भ्रमलें । मायाजाळीं ॥ ३३॥
उत्तम निर्व्यंग नरदेह प्राप्त झाला असताही जे परमार्थबुद्धी विसरतात, ते मूर्ख लोक मायेच्या जाळ्यात सापडून भ्रमतात अर्थात फिरून जन्ममरणाच्या चक्रात सापडतात. (३३)
मृत्तिका खाणोन घर केलें । तें माझें ऐसें दृढ कल्पिलें ।
परी तें बहुतांचें हें कळलें । नाहींच तयासी ॥ ३४॥
जमीन खणून लोक घर बांधतात व हे आपले घर अशी दृढ समजूत करून घेतात, पण वास्तविक ते अनेकांचे असते, हे त्यांना कळत नाही. (३४)
मुष्यक म्हणती घर आमुचें । पाली म्हणती घर आमुचें ।
मक्षिका म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३५॥
उंदीर म्हणतात हे घर आमचे आहे, पाली म्हणतात हे घर आमचे आहे, माशा ठामपणे म्हणतात की हे घर आमचे आहे. (३५)
कांतण्या म्हणती घर आमुचें । मुंगळे म्हणती घर आमुचें ।
मुंग्या म्हणती घर आमुचें । निश्चयेंसीं ॥ ३६॥
याप्रमाणेच कांतण्या, मुगळे मुंग्या घर आमचे आहे असे म्हणतात. (३६)
विंचू म्हणती आमुचें घर । सर्प म्हणती आमुचें घर ।
झुरळें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३७॥
विंचू सर्प, झुरळे घर आमचेच म्हणतात. (३७)
भ्रमर म्हणती आमुचें घर । भिंगोर्या म्हणती आमुचें घर ।
आळीका म्हणती आमुचें घर । काष्ठामधें ॥ ३८॥
भुगे, भ्रमरीची अळी व किडे म्हणतात की, लाकडात आमचेच घर आहे. (३८)
मार्जरें म्हणती आमुचें घर । श्वानें म्हणती आमुचें घर ।
मुंगसें म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ३९॥
मांजरे, कुत्री, मुंगसे इत्यादी प्राणी घर आपले आहे, असे म्हणतात. (३९)
पुंगळ म्हणती आमुचें घर । वाळव्या म्हणती आमुचें घर ।
पिसुवा म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४०॥
पुंगळ वाळ्या, पिसवा घर आमचे आहे असे म्हणतात. (४०)
ढेकुण म्हणती आमुचें घर । चांचण्या म्हणती आमुचें घर ।
घुंगर्डी म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४१॥
ढेकूण, लाल मुंगळे, घुंगुर्डी देखील घर आमचे आहे असे म्हणतात. (४१)
पिसोळे म्हणती आमुचें घर । गांधेले म्हणती आमुचें घर ।
सोट म्हणती आमुचें घर । आणी गोंवी ॥ ४२॥
पिसोळे, गांधील माश्या, सोट आणि गोमा हे सुद्धा घर आमचेच आहे असे म्हणतात. (४२)
बहुत किड्यांचा जोजार । किती सांगावा विस्तार ।
समस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४३॥
अशा प्रकारचे खूपसे किडे, त्यांचे किती म्हणून वर्णन करावे ? सर्वच म्हणतात की, निश्चित हे घर आमचेच आहे. (४३)
पशु म्हणती आमुचें घर । दासी म्हणती आमुचें घर ।
घरीचीं म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४४॥
पशू दासी, घरातील माणसे सर्वच म्हणतात की घर आमचे आहे. (४४)
पाहुणे म्हणती आमुचें घर । मित्र म्हणती आमुचें घर ।
ग्रामस्त म्हणती आमुचें घर । निश्चयेंसीं ॥ ४५॥
एवढेच नव्हे तर पाहुणे, मित्र, ग्रामस्थ हे घर आमचेच आहे असे म्हणतात. (४५)
तश्कर म्हणती आमुचें घर । राजकी म्हणती आमुचें घर ।
आग्न म्हणती आमुचें घर । भस्म करूं ॥ ४६॥
चोर, राजकीय अधिकारी, एवढेच नव्हे तर अग्नीही म्हणतो की घर माझे आहे. याला मी जाळून खाक करतो. (४६)
समस्त म्हणती घर माझें । हें मूर्खहि म्हणे माझें माझें ।
सेवट जड जालें वोझें । टाकिला देश ॥ ४७॥
याप्रमाणे सर्वच म्हणतात की, घर माझे आहे. तसेच हा मूर्खही म्हणतो की घर माझे आहे. शेवटी त्या घरचे ओझे होते व ते सोडून, किंबहुना देशही सोडून त्याला जावे लागते. (४७)
अवघीं घरें भंगलीं । गांवांची पांढरी पडिली ।
मग तें गृहीं राहिलीं । आरण्यस्वापदें ॥ ४८॥
याप्रकारे कधी कधी गावातील सर्वच घरे कालांतराने पडतात व सर्व गावच ओस पडतो. अखेर त्या घरांतून अरण्यातील हिंस्र श्वापदे येऊन राहतात. (४८)
किडा मुंगी वाळवी मूषक । त्यांचेंच घर हें निश्चयात्मक ।
हें प्राणी बापुडें मूर्ख । निघोन गेलें ॥ ४९॥
वास्तविक ते घर किडा, मुंगी, वाळवी, उंदीर यांचेच असते. ‘माझे-माझे’ म्हणणाऱ्या मूर्खाला मात्र ते सोडून निघून जावे लागते. (४९)
ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचीती ।
जन्म दों दिसांची वस्ती । कोठें तरी करावी ॥ ५०॥
घराची स्थिती अखेर अशी होते व आपण यास ‘माझे-माझे’ म्हणतो ते खरे नसते, असा अनुभवही येतो; म्हणून जन्म म्हणजे या जगातील दोन दिवसांची वस्ती आहे, हे जाणून ती कुठे तरी करावी. (अर्थात कुठल्याही जागेची आसक्ती धरू नये). (५०)
देह म्हणावें आपुलें । तरी हें बहुतांकारणें निर्मिलें ।
प्राणीयांच्या माथां घर केलें । वा मस्तकीं भक्षिती ॥ ५१॥
आता देहासंबंधी विचार करू लागलो तर कळून येते की, हा देह आपण आपला म्हणतो पण तेही खरे नाही. हा देही अनेकांसाठी निर्माण झालेला असतो. उदाहरणार्थ, उवा माणसाच्या डोक्यात घर करतात आणि त्याचे डोके खातात. (५१)
रोमेमुळी किडे भक्षिती । खांडुक जाल्यां किडे पडती ।
पोटामध्ये जंत होती । प्रत्यक्ष प्राणियांच्या ॥ ५२॥
रोमरंध्राच्या मुळाशी राहून किडे मांस खातात, कुठे खांडक झाले तर त्यातही किडे पडतात. पोटात जंत होतात. हे तर आपण पाहतोच. (५२)
कीड लागे दांतासी । कीड लागे डोळ्यांसी ।
कीड लागे कर्णासी । आणी गोमाशा भरती ॥ ५३॥
दातांना कीड लागते, डोळ्यांना कीड लागते, कानांना कीड लागली की तेथे गोमाशा गर्दी करतात. (५३)
गोचिड अशुद्ध सेविती । चामवा मांसांत घुसती ।
पिसोळे चाऊन पळती । अकस्मात ॥ ५४॥
गोचिडी रक्त पितात, चामवा मांसात घुसतात, तर पिसवा अकस्मात दंश करून पळून जातात. (५४)
भोंगें गांधेंलें चाविती । गोंबी जळवा अशुद्ध घेती ।
विंचू सर्प दंश करिती । कानटें फुर्सीं ॥ ५५॥
भुंगे व गांधीलमाशा चावतात. तर गोमा आणि जळवा रक्त पितात. विंचू, साप, कानटे व फुरशी दंश करतात. (५५)
जन्मून देह पाळिलें । तें अकस्मात व्याघ्रें नेलें ।
कां तें लांडगींच भक्षिलें । बळात्कारें ॥ ५६॥
जन्माला आल्यापासून देहाचा सांभाळ करावा, तर अकस्मात वाघ त्यास उचलून नेतो किंवा बळजबरीने मारून लांडगाच त्यास खाऊन टाकतो. (५६)
मूषकें मार्जरें दंश करिती । स्वानें अश्वें लोले तोडिती ।
रीसें मर्कटें मारिती । कासावीस करूनी ॥ ५७॥
उंदीर मांजर त्याला दंश करतात. कुत्री, घोडे वगैरे त्याचे लचके तोडतात, तर अस्वले, माकडे कासावीस करून मारतात. (५७)
उष्टरें डसोन इचलिती । हस्थी चिर्डून टाकिती ।
वृषभ टोचून मारिती । अकस्मात ॥ ५८॥
उंट चावून उचलून फेकून देतात तर हत्ती पायाखाली चिरडून टाकतात. बैल शिंगाने टोचून अकस्मात मारून टाकतात. (५८)
तश्कर तडतडां तोडिती । भूतें झडपोन मारिती ।
असो या देहाची स्थिती । ऐसी असे ॥ ५९॥
चोर तडतड शरीराचे तुकडे करतात, तर भुते अंगात संचार करून मारतात. असो. या देहाची स्थिती अशी आहे. (५९)
ऐसें शरीर बहुतांचें । मूर्ख म्हणे आमुचें ।
परंतु खाजें जिवांचें । तापत्रैं बोलिलें ॥ ६०॥
या दृष्टीने विचार केला, तर हा देह पुष्कळांचा आहे; पण मूर्ख माणूस त्यास ‘माझा’ असे समजतो. वास्तविक ते अनेक जीवांचे भक्ष्य आहे. तापत्रय वर्णनात ही गोष्ट पुढे सांगितली आहे. (६०)
देह परमार्थीं लाविलें । तरीच याचें सार्थक जालें ।
नाहीं तरी हें वेर्थची गेलें । नाना आघातें मृत्यपंथें ॥ ६१॥
नरदेह परमार्थासाठी लावला तरच त्याचे सार्थक होते; नाहीतर नाना प्रकारच्या आघातांनी तो मृत्यू पावतो. (६१)
असो जे प्रपंचिक मूर्ख । ते काये जाणती परमार्थसुख ।
त्या मूर्खांचें लक्षण कांहीं येक । पुढे बोलिलें असे ॥ ६२॥
असो. जे प्रापंचिक सुखात गढलेले मूर्ख लोक असतात, ते परमार्थाचे सुख काय जाणार ? अशा मूर्खांची काही लक्षणे पुढे सांगितली आहेत. (६२)
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
नरदेहस्तवननिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
‘नरदेहस्तवननिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.
॥ दशक पहिला समाप्त ॥
सार्थ श्रीमंत दासबोध विकत घेण्यासाठी संपर्क करा: 7744957092
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: satsangdhara
View Comments
Khupch chhan माहिती jay sadguru
धन्यवाद महाराज