छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी राजांनी उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.
महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा संयुक्त उल्लेख ‘शिवशंभू’ असा होतो. सर्वसाधारणपणे शिवाजी महाराजांचा जन्म (१६३०) ते औरंगजेबाचा मृत्यू (१७०७) ह्या ७७ वर्षांच्या काळास इतिहासकार ‘शिवकाल’ असे म्हणतात..
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया (भारताचा शोध) या ग्रंथात म्हणतात : “छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणाऱ्या हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते. जुन्या इतिहासातून त्यांनी प्रेरणा मिळविली. महाराज अत्यंत धैर्यशील आणि उत्कृष्ट नेतृत्वगुण असणारे नेते होते. त्यांनी स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास अशी चेतना दिली की या गटाशी धडका घेत मुघल साम्राज्य अखेर मोडकळीस आले. छत्रपतींचा मृत्यू १६८० मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतावर प्रभुत्व प्रस्थापित होईपर्यंत मराठ्यांचा राज्यविस्तार होतच राहिला.”
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी इ.स. १६३० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.[२] इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ‘शिवाजी’ ठेवले गेले. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दख्खनमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या तीन मुसलमानी सल्तनतींमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांच्यादरम्यान बदलली; पण त्यांनी पुणे ही नेहमीच आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःची एक लहानशी फौज पदरी बाळगली.
शहाजीराजे भोसले (वडील)
हे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट शहाजहानच्या सैन्याने इ.स. १६३६ मध्ये अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी तुकाबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
जिजाबाई (आई)
जिजाबाई व बाल शिवाजी
जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ती दिली असे काही इतिहासकार मानतात.
मार्गदर्शक
युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यासंबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांचेकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले.
पत्नी
पहिली स्वारी – तोरणगडावर विजय
इ.स. १६४७ मध्ये सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
राजमुद्रा
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
संस्कृत :
“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते”
मराठी :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
शहाजीराजांना अटक
शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्या बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन फत्तेखान नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी पुरंदरावर फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला. शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना कोंढाणा किल्ला, आणि शहाजीराजांना बंगळूर शहर आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
जावळी प्रकरण
आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजीने रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
पश्चिम घाटावर नियंत्रण
इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.
अफझलखान प्रकरण – अफझलखान मृत्यू
आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वरजवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून चिलखत चढविले आणि सोबत बिचवा तसेच वाघनखे ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या नेताजीच्या सैन्यापासून वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली. अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला. नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.
सिद्दी जौहरचे आक्रमण
अफझलखानच्या मृत्यूमुळे चिडलेल्या आदिलशहाने त्याचा सेनापती सिद्दी जौहर यास सर्व शक्तीनिशी हल्ला करण्याचा आदेश दिला. इ.स. १६६० साली झालेले हे आक्रमण स्वराज्यावरील अनेक मोठ्या संकटांपैकी एक समजले जाते. त्यासुमारास शिवाजीराजे मिरजेच्या किल्ल्याला वेढा घालून होते. सिद्दीच्या आक्रमणाची बातमी येताच राजे पन्हाळगडावर गेले आणि सिद्दी जौहरला त्याचा सुगावा लागताच त्याने गडालाच वेढा घातला आणि गडाची रसद तोडली. काही दिवस गडावरील सर्वांनी तग धरली पण सिद्दीचा वेढा उठण्याचे काही लक्षण दिसेना तेव्हा सर्वांशी खलबत करून शिवाजीराजांनी जवळच्या विशालगडावर पोहोचावे असा निर्णय घेतला. पन्हाळगडावरून एके रात्री शिवाजीराजे आणि काही मंडळी गुप्त रस्त्याने शिताफीने निसटले. ह्याचा पत्ता लागताच सिद्दी जौहरने सिद्दी मसऊदच्या बरोबर काही सैन्य पाठलागावर रवाना केले.
पावनखिंडीतील लढाई
पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजी प्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमद्ध्येच झुंजवत ठेवतील.
शिवाजीराजांना ते पटेना पण ‘बाजी’ च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले. शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंड असे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.
शाहिस्तेखान प्रकरण
मोगल साम्राज्याचा नर्मदा नदीपलीकडे विस्तार, तसेच शिवाजी महाराजांच्या राज्यविस्ताराला वेसण घालणे या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्याचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले. प्रचंड मोठा लवाजमा, सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात, गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा जमेल तेथे विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला. शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.
एके रात्री लाल महालाजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या मिरवणुकीचा आधार घेऊन काही मोजक्या माणसांसह स्वतः शिवाजी महाराज लाल महालात शिरले. महालाचा कानाकोपरा माहीत असल्यामुळे लवकरच प्रत्यक्ष शाहिस्तेखानच्या खोलीत शिवाजी महाराजांनी प्रवेश केला. तोपर्यंत महालात कोठेतरी झटापट सुरू झाल्यामुळे शाहिस्तेखानला जाग आली आणि तेवढ्यातच शिवाजीराजांना समोर पाहून खानाने जीव वाचविण्यासाठी सरळ खिडकीतून खाली उडी घेतली. शिवाजी महाराजांनी चपळाईने केलेला वार हुकल्यामुळे खानाच्या प्राणावर बेतण्याऐवजी त्याची तीन बोटे कापली गेली.
अनेकदा या गोष्टीचा अप्रत्यक्ष फायदा शिवाजी महाराज किंवा त्यांच्या सैन्याला मिळाला. शत्रू सैन्यामध्ये शिवाजी महाराज घुसल्याच्या केवळ अफवा पसरवून संख्येने किरकोळ असलेल्या मावळ्यांनी संख्येने अनेक पटींनी मोठ्या सैन्याची उडविलेली दाणादाण ही याच गोष्टीची साक्ष देऊ शकते. इ.स. १६६३ सालचे शाहिस्तेखान प्रकरण शिवाजीराजांच्या जीवनात आणखी एका नाट्यमय प्रसंगाची भर घालून गेले.
सुरतेची पहिली लूट
इ.स. १६६४. सततची युद्धे आणि त्यामुळे रिता होत असलेला खजिना यामुळे शिवाजीराजे चिंतेत असत. मोगलांना किंवा इतर सुलतानांना ही चिंता फार सतावीत नसे. अन्याय्य कर लादून किंवा बळजबरीने खंडणी जनतेकडून वसूल करण्यात बादशाही कारभारास कमीपणा वाटत नव्हता. अनेक दिवसांच्या खलबतांनंतर शिवाजीराजांनी शेवटी एक उपाय शोधून काढला तो म्हणजे इतिहासाला माहीत असलेली सुरतेची पहिली लूट. आजच्या गुजरात राज्यातील सुरत शहर हे तत्कालीन मोगल राज्यात होते आणि व्यापारामुळे अतिशय श्रीमंत शहरांमध्ये गणले जात होते. सुरत शहराच्या लुटीमुळे दोन गोष्टी साध्य करता आल्या, एक म्हणजे मोगल सत्तेला आव्हान आणि राज्याच्या खजिन्यात भर. लुटीचा इतिहास भारतामध्ये अतिशय रक्तरंजित आणि विनाशक आहे. त्या पार्श्वभूमीवर सुरतेची लूट ही पूर्णपणे वेगळी जाणवते. शिवाजीराजांच्या आज्ञेनुसार स्त्रिया, मुले आणि वृद्ध यांच्या केसालाही धक्का न लावता ही लूट केली गेली. मशिदी, चर्च यासारख्या देवस्थानांनाही लुटीतून संरक्षण दिले गेले.
मिर्झाराजे जयसिंह प्रकरण – पुरंदरचा तह
इ.स. १६६५. औरंगजेबाने त्यांचे पराक्रमी सेनापती मिर्झाराजे जयसिंह याला प्रचंड सैन्यासह पाठविले. शिवाजीराजांचा प्रतिकार थिटा पडला आणि निर्णायक लढाईनंतर पुरंदरचा तह झाला आणि शिवाजीराजांना तहाच्या अटींनुसार २३ किल्ले द्यावे लागले. त्याबरोबरच स्वतः आग्रा (तत्कालीन मोगल राजधानी) येथे पुत्र संभाजी यासह औरंगजेबासमोर हजर होण्याचे कबूल करावे लागले.
आगऱ्याहून सुटका
इ.स. १६६६ साली औरंगजेबाने शिवाजीराजांना दिल्ली येथे भेटीसाठी आणि विजापूरवर त्यांनी केलेल्या आक्रमणावर चर्चा करण्यास बोलाविले. त्यानुसार शिवाजीराजे दिल्लीला पोहोचले. त्यांच्यासोबत नऊ वर्षांचा संभाजी देखील होता. परंतु दरबारात त्यांना कनिष्ठ सरदारांच्या समवेत उभे करून शिवाजीसारख्या राजांचा उपमर्द केला. या अपमानामुळे अतिशय नाराज होऊन शिवाजीराजे तडक दरबाराबाहेर पडले असता त्यांना तत्क्षणी अटक करून नजरकैदेत ठेवण्यात आले. लवकरच त्यांची रवानगी जयसिंहाचे पुत्र मिर्झाराजे रामसिंग यांच्याकडे आग्रा येथे करण्यात आली.
शिवाजीबद्दल आधीपासूनच धास्ती असल्यामुळे त्यांच्यावर कडक पहारा ठेवला होता. काही दिवस निघून गेले. सुटकेसाठी प्रयत्न फोल ठरले होते. शेवटी शिवाजीराजांनी एक योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी आजारी पडल्याचे निमित्त केले आणि त्यांच्या प्रकृतिस्वास्थ्यासाठी विविध मंदिरांना व दर्ग्यांना मिठाईचे पेटारे पाठविण्यात येऊ लागले. सुरुवातीला पहारेकरी प्रत्येक पेटारा बारकाईने तपासून पहात पण काही दिवसांनी यात ढिलाई होऊ लागली. नंतर त्यांनी तपासण्याचेदेखील सोडले. या गोष्टीचा फायदा घेऊन एक दिवस शिवाजीराजे आणि संभाजी एकेका पेटाऱ्यामध्ये बसून निसटण्यात यशस्वी झाले. कोणास संशय येऊ नये यास्तव शिवाजीराजांचा विश्वासू हिरोजी फर्जंद हा शिवरायांचे कपडे चढवून आणि त्यांची अंगठी दिसेल अशा पद्धतीने हात बाहेर काढून झोपल्याचे नाटक करीत होता. शिवराय दूरवर पोहोचल्याची खात्री आल्यावर तो देखील पहारेकऱ्यांना बगल देऊन निसटला. बराच वेळ आतमध्ये काही हालचाल नाही हे वाटून पहारेकरी आत गेले असता त्यांना तेथे कोणीही आढळले नाही तेव्हा त्यांना सत्य परिस्थिती समजली. तोपर्यंत शिवाजी निसटून २४ तास झाले होते.
आग्रा येथून शिवाजीराजांनी वेषांतर केले आणि लगोलग स्वराज्याकडे न जाता मथुरेकडे गेले, तेथे संभाजीला त्यांनी वेगळ्या मार्गाने काही दुसऱ्या विश्वासू माणसांबरोबर पाठविले. एका संन्याशाच्या वेषात महाराष्ट्रात प्रवेश केला. त्यातदेखील त्यांना अनेक खबरदाऱ्या घ्याव्या लागल्या. ते स्वतः अतिशय लांबच्या आणि तिरकस, वाकड्या मार्गाने मजल-दरमजल करीत आले. उद्देश हाच होता की काही झाले तरी पुन्हा औरंगजेबाच्या हातात पडायचे नाही.
यात आणखी एक गोष्ट उल्लेखनीय आहे. दिल्लीभेटीपूर्वी त्यांनी राज्यकारभारासाठी जे अष्टप्रधानमंडळ स्थापले होते, त्या मंडळाने राजांच्या अनुपस्थितीमध्ये देखील राज्याचा कारभार चोख चालविला होता. हे शिवाजीराजांचे आणि अष्टप्रधानमंडळाचे फार मोठे यश आहे.
राज्याभिषेक
शिवाजी भोसले हे अभिषिक्त राजे नसल्याचे अनेक व्यावहारिक तोटे शिवरायांना व त्यांच्या साथीदारांना जाणवत होते. शिवाजीराजांनी अनेक जमिनींवर स्वामित्व स्थापन केलेले असले आणि अपार धन मिळविले असले तरी; त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल असले आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असला तरी सैद्धांतिकदृष्ट्या त्यांची स्थिती ही राजासारखी किंवा सम्राटासारखी नव्हती. मुघल सम्राटाच्या लेखी ते एक जमीनदार होते; आदिलशहासाठी ते एका जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते कोणत्याही राजासोबत समान दर्जाचा दावा ते करू शकत नव्हते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते. राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते आपल्या राजकीय निर्मितीला (स्वराज्याला) कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.
ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते सामाजिकदृष्ट्या भोसले घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. असे लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते. त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. औपचारिक राज्याभिषेकामुळे अशा मत्सरी सरदारांना शिवाजी भोसले हे आता छत्रपती आहेत आणि विजापूर व गोवळकोंड्याच्या शहांप्रमाणेच समान दर्जाचे राजे आहेत असा संदेश गेला असता.
महाराष्ट्रातील काही प्रागतिक विचारांची मंडळी त्याकाळी शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारी महान व्यक्ती म्हणून पाहत होती आणि हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून तिने स्वतंत्र बाण्याने राज्य करीत रहावे अशी त्यांची इच्छा होती. हिंदू स्वराज्य उभे राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि साहजिकच त्यासाठी हिंदू छत्रपतीची गरज होती.
प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षत्रिय वर्णातील व्यक्तीसच राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते आणि अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. शिवाजी महाराज हे कुणबी होते. त्यांचे भोसले कूळ हे क्षत्रिय म्हणून गणले जात नव्हते, तसेच ते ब्राह्मणही नव्हते. अर्थातच या शास्त्रांनुसार भोसले कूळ शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता. शिवाजी भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना ‘क्षत्रिय’ जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.
शूद्रकुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल अशा पंडिताची म्हणूनच त्यावेळी स्वराज्यास गरज होती. विश्वेश्वर नामक पंडिताच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपणनाव ‘गागाभट्ट’ असे होते आणि तो तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होता. सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजी भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले. अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी भोसले यांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. अर्थात त्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्टाचे जंगी स्वागत केले.
६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून ‘करणकौस्तुभ’ नामक ग्रंथही लिहवून घेतला.
दुसरा राज्याभिषेक
गागाभट्टाने केलेल्या अभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक पुराणोक्त किंवा तांत्रिक पद्धतीने अश्विन शुद्ध पंचमी (२४ सप्टेंबर १६७४) रोजी करून घेतला अशी माहिती ‘शिवराज्याभिषेक कल्पतरू’ नावाच्या समकालीन संस्कृत ग्रंथांमध्ये मिळते. अनिरुद्ध सरस्वती या कवीने हा ग्रंथ लिहिलेला असून त्यामध्ये निश्चलपुरी गोसावी आणि गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे. त्यात असे म्हटले आहे की “गागाभट्टाने केलेल्या अभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम महाराजांना भोगावे लागत आहेत.” त्यामध्ये सेनापती प्रतापराव गुजर यांचा मृत्यू, प्रतापगडावर वीज पडणे, महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू, तसेच राज्याभिषेकानंतर केवळ बारा दिवसांनी राजमाता जिजाबाई यांचा मृत्यू इत्यादी घटनांचा उल्लेख आहे. यावरून असा निष्कर्ष काढता येतो की वैदिक पद्धतीच्या राज्याभिषेकाविषयी काही समज-गैरसमज तत्कालीन पुरोहितांमध्ये असावेत. विशेषतः तंत्रमार्गाचा पुरस्कार करणारे पुरोहित वैदिक विधींपेक्षा तांत्रिक विधींना श्रेष्ठ मानत असावेत आणि म्हणून तंत्रमार्गाचा पुरस्कार करणाऱ्या पुरोहितांनी पौराणिक किंवा तांत्रिक अभिषेक करून घेण्याविषयी शिवाजी महाराजांना आग्रह केला असावा. कारण काहीही असो २४ सप्टेंबर १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने झाला. राज्याभिषेकाचा हा समारंभ अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. तत्कालीन पाश्चात्त्य वखारवाल्यांनी किंवा फारशी तवारिखकारांनी या दुसऱ्या राज्याभिषेकाच्या उल्लेख केलेला आढळत नाही.
दक्षिण दिग्विजय
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर अल्पावधीतच दिनांक १७ जून १६७४ रोजी जिजाऊ मांसाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. त्यानंतर शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आदिलशाहीची फारशी भीती नव्हती, परंतु दिल्लीचा मोगल बादशहा औरंगजेब हा मात्र मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. तो स्वराज्याचा घास केव्हा येईल याचा नेम नव्हता. मोगलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत सैनिकी ठाणे असावे असा विचार शिवरायांच्या मनात आला; म्हणून त्यांनी दक्षिणेकडे मोहिमा करण्याचे ठरवले. राजाराम महाराजांच्या काळात जिंजी किती महत्त्वाची ठरली हे पाहता शिवरायांची दूरदृष्टी स्पष्ट होते. या मोहिमेसाठी शिवरायांनी गोवळकोंड्याच्या कुतुबशाहाची मदत मागितली. अशी मदत देण्याचे त्याने खुशीने कबूल केले. दक्षिण मोहिमेमागे शिवरायांचा आणखी एक हेतू होता. त्यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते. शहाजीराजांची कर्नाटकातील जहागिरीही त्यांच्याकडे होती. त्यांची भेट घेऊन स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची काही मदत मिळाली तर पहावे असा हेतू होता.
शिवरायांच्या दक्षिणेकडील मोहिमेदरम्यान गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहाने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. तेव्हा प्रथम कुतुबशहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी योजना त्यांनी आखली. गोवळकोंडा हीच कुतुबशाहाची राजधानी होती. गोवळकोंड्यात कुतुबशहाकडून व त्याच्या प्रजाजनांकडून शिवाजी महाराजांचे जंगी स्वागत झाले. दरबारातही कुतुबशहाने महाराजांना खास तयार केलेल्या सिंहासनावर आपल्या बरोबरीने बसवले. स्वागतसत्कार स्वीकारल्यानंतर शिवराय कर्नाटकाच्या मोहिमेवर निघाले.
चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे. रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत असलेला हा किल्ला वेढा घालून महाराजांनी जिंकला. त्यासोबतच दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर शिवरायांनी वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा दिला. कित्येक महिने वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना; तेव्हा वेल्लोरजवळच्या डोंगरावरून त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि किल्ला सर केला. त्यांनी कर्नाटकात एकूण वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले जिंकले.
यानंतर शिवाजी महाराजांनी आपले सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांना भेटीसाठी बोलावले. व्यंकोजीराजे या भेटीसाठी फारसे उत्सुक नव्हते. काही दिवस ते महाराजांसोबत राहिले, परंतु एका रात्री महाराजांना काही न कळवता तंजावरला निघून गेले आणि उलट महाराजांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा शिवरायांच्या फौजेने त्यांचा समाचार घेतला. व्यंकोजीराजांचा पराभव झाला. आपल्या भावाच्या अशा वर्तनामुळे महाराजांना दुःख झाले. त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची काही पत्रेही पाठवली. जिंजीच्या दक्षिणेकडील काही प्रदेश त्यांना दिला. त्यांची पत्नी दीपाबाई ही समजूतदार होती, तिने व्यंकोजींची समजूत घातली. महाराजांनी तिला चोळीबांगडीसाठी कर्नाटकातील थोडा प्रदेश दिला. महाराजांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले : “परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये. पराक्रमाचा तमाशा दाखवावा.” कर्नाटकातील विजय मिळवून महाराज रायगडावर परतले. या मोहिमेची दगदग जाणवत असतानाच वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना जंजिऱ्याच्या सिद्दीविरुद्ध आरमारी मोहीम काढावी लागली.
इतिहास
भारतात इंग्रज येण्यापूर्वी तिथीनुसार व्यवहार होत असत. इंग्रजी राज्य आल्यावर ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार व्यवहार होऊ लागले. ग्रेगरीय दिनदर्शिका भारतात लागू झाल्यावर ज्यांचा जन्म झाला त्यांची जयंती तारखेने करतात. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक या सर्व महापुरुषांचा जन्म भारतात ग्रेगरीय दिनदर्शिका लागू झाल्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती तारखेने केली जाते.
तुकाराम, बसवेश्वर, शिवाजी, गौतम बुद्ध या साऱ्यांचा जन्म भारतात ग्रेगोरीय दिनदर्शिका लागू करण्यापूर्वी झालेला आहे. त्यांच्या काळात सारे व्यवहार तिथीने करत असत. त्यांचे जन्मदिवस तिथीने साजरे होतात.
आज ज्या ग्रेगोरीय दिनदर्शिकेनुसार शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख १९ फेब्रुवारी अशी निश्चित केली आहे, ते कॅलेंडर शिवाजीच्या वेळेला युरोपातसुद्धा प्रचलित नव्हते. इंग्रजांनी ग्रेगोरियन कॅलेंडर १७५२ साली स्वीकारले, तोपर्यंत त्यांच्या साम्राज्यात ज्युलियन दिनदर्शिका अधिकृत होती. ज्युलियन दिनदर्शिकेतील कालगणना व ग्रेगोरीय दिनदर्शिकेतील कालगणना यांच्यात १७०० सालपर्यंत १० दिवसांचा तर १७०० सालापासून पुढे ११ दिवसांचा फरक येतो. (ज्युलियन दिनदर्शिका पुढे गेली होती.) त्यामुळे ज्युलियन दिनदर्शिकेनुसार निर्धारित १९ फेब्रुवारी ही तारीख १० – ११ दिवसांनी चुकते. (४ ऑक्टोबर १५८२ ज्युलियन या तारखेनंतरचा पुढचा दिवस ग्रेगोरियन १५ ऑक्टोबर १५८२ येतो.). अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जन्मावेळी जी कालगणना प्रचलित होती त्यानुसार शिवाजी जयंती तिथीनुसार साजरी केली जाते. सरकारी जयंती तारखेनुसार असते.
शिवाजीचा जन्म १६२७ साली झाला अशी जेव्हा मान्यता होती तेव्हा जयंतीची तिथी वैशाख शुद्ध तृतीया येत असे. जेव्हा जन्मसाल १६३० नक्की झाले तेव्हा तिथी फाल्गुन वद्य तृतीया येऊ लागली. शिवाजीच्या जन्मावेळी जर ग्रेगोरीय दिनदर्शिका प्रचलित असती तर १६३० सालची फाल्गुन वद्य तृतीया १९ फेब्रुवारीला आली असती. म्हणून, २००१ सालापासून १९ फेब्रुवारी ह्या तारखेला सरकारी शिवजयंती साजरी होते.
सण
शिवाजीच्या जयंतीला महाराष्ट्रात शिवजयंती म्हणतात. शिवाजीच्या जन्मदिनांकाबद्दल वाद असल्याने शिवजयंती महाराष्ट्रात वर्षभरात किमान दोनदा साजरी होते. त्या दिवशी दिवसभर ढोल-ताशे वाजवीत मिरवणुका निघतात आणि शिवाजीच्या पुतळ्यांना हार घालण्याचा कार्यक्रम होतो. मुंबईसारख्या शहरात शिवजयंतीच्या मिरवणुकीत १००च्या वर मालमोटारी व त्यांवर देखावे असतात.
भिवंडी आणि मालेगाव येथे या दिवशी अनेकदा दंगली झाल्या. इ.स. १९७० साली भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक मशिदीसमोर फार काळ रेंगाळल्यामुळे तुफान दंगल झाली. त्यामुळे भिवंडीत शिवजयंतीची मिरवणूक काढायला १४ वर्षांची बंदी घातली गेली. इ.स. १९८४ साली परवानगी मिळाली आणि त्यावर्षी झालेल्या भीषण दंगलीत अनेक वाहने जळून खाक झाली. त्यामुळे आता मिरवणुकीत सामील होण्यास वाहने मिळत नाहीत. प्रत्येक शिवजयंतीच्या एक आठवडा आधी भिवंडीतले झोपडपट्टीवासी आपले चंबूगबाळे आवरून झोपडी सोडून परगावी जातात.
गड / किल्ले
शिवाजी आणि चित्रपट
शिवाजीच्या जीवनावर अनेक चित्रपट निघाले; एक दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. भालजी पेंढारकरांनी शिवाजीच्या मावळ्यांबद्दल काही चित्रपट काढले; त्यांतल्या काही चित्रपटांची नावे पुढे दिली आहेत :