एकाचिये घरीं द्वारपाळ – संत भानुदास अभंग करूणा – ७८
एकाचिये घरीं द्वारपाळ होय ।
एकासि ते पाहे खांदा वाहे ॥१॥
एकाचिया घरीं उच्छिष्ठ ते काढी ।
एकाची आवडी उभा राहे ॥२॥
एका घरी कण्या आवडीनें खाय ।
एका घरीं न जाय बोलावितां ॥३॥
एकाचिये घरीं उच्छिष्ट भातुंके ।
खाय कौतुकें मिटक्या मारी ॥४॥
भानुदास म्हणे आवडीच्या सुखा
भुलोनियां देखा लोणी खाये ॥५॥