कोठवरी धांवा करुं तुझा देवा ।
श्रमा झाले जीवा फार माझ्या ॥१॥
अझुनियां कां गा न येसी त्वरित ।
दुःखानें बहुत जाकळिलों ॥२॥
कंठ रोधियेला श्वासावरी श्वास ।
घालुनी नेत्रास नीर वाहे ॥३॥
दाही दिशा मज वाटती उदास ।
झाला कासाविस प्राण माझा ॥४॥
हीन कर्म माझें फुटकें अदृष्ट ।
म्हणवोनि संकट ऐसें झालें ॥५॥
भानुदान म्हणे पहातां चरण ।
तळमळ जाण शांत झाली ॥६॥