चंचळ हें मन नावरे – संत भानुदास अभंग करूणा – ६०
चंचळ हें मन नावरे माझ्यानें ।
कामाच्या व्यसनें पीडीतसे ॥१॥
अविवेकांचे बळ झालें असे फार ।
धांवती षडविकार सैरावैरां ॥२॥
विवेकाची शक्ति होऊनिया क्षीण ।
सत्कार्मासी हीन बुद्धी झाली ॥३॥
चित्ताचा चालक अगा सुत्रधारी ।
भानुदासा हरी कृपा करी ॥४॥