अगा पंढरिनाथा ऐसें काय केलें ।
मज उपक्षिलें अनाथासी ॥१॥
त्रैलोक्याचे ठायी मज नसे कोणीं ।
ऐसें चक्रपाणी ठावें तुज ॥२॥
कोणाचे आधारे असावें म्यां येथें ।
जन्मविलें व्यर्थ कां गा मज ॥३॥
आम्हांसी क्लेशांत बहु पाडियेलें ।
काय हातां आलें तुझ्या देवा ॥४॥
आमुच्या मनीचे अर्थ करितां पूर्ण ।
भानुदास म्हणे जाण दुजा कोण ॥५॥