संत भानुदास

संत भानुदास अभंग पंढरीनाथांचीभेट

संत भानुदास अभंग पंढरीनाथांचीभेट गाथा – १ अभंग

९४

आलें वारकरी करिती जयजयकार ।
गरुडटके भार असंख्यात ॥१॥
त्या सुखाचा पार जाणें तोचि एक ।
भक्त पुंडलिक भाग्यवंत ॥२॥
प्रेमे महाद्वारी घालुनी लोटांगण ।
देती आलिंगन एकमेंकां ॥३॥
निडारले नयन पीतांबरधारी ।
देखिले विटेवरी पांडुरंग ॥४॥
शिवणी सासुरवासी माउली देखे ।
तये चित्त पोखे जीवनकळा ॥५॥

तैसें तें श्रीमुख देखोनि निवालें ।
आलिंगना निघाले लवडसवडीं ॥६॥
विटेसहित मिठी घातलीसे पायीं ।
शरीरीं शुद्धी नाहीं मीपणाची ॥७॥
अनंता जन्मीचे विसरलों संताप ।
विठोबा मायबाप देखियेला ॥८॥
एक म्हणती स्वामी देवा दीनवत्सला ।
कृपेचा कोंवळा पाडुंरंग ॥९॥
म्हणती कूर्मदास आर्त करुनियां ।
तुम्हां भेटवाया बोलाविलें ॥१०॥

माझिये हातींचा चरणीं माथा ठेवा ।
निरोप सांगावा पंढरीनाथा ॥११॥
कृपेचा कोंवळा दीन दयानिधी ।
येऊनि मज आधीं सांभाळावें ॥१२॥
नाहीं कर चरण न घडे दर्शनें ।
मन आहे शरण तुमचे पायीं ॥१३॥
चातक जलधरा चिंतितां मानसीं ।
चकोर चंद्रासी भावें जैसा ॥१४॥
तैसी मनीं आवडी उचलली तुंतें ।
ध्यातसे तुमचें देवराया ॥१५॥

स्मरे वत्स जैसें माउली लागुनी ।
पिलीं ते पक्षिणी लागीं जैसीं ॥१६॥
तैसा मी तुमतें चिंती वेळोवेळां ।
देखावया डोळां चरण स्वामी ॥१७॥
गोत वित्त धन मज नाहीं आधारु ।
तुमचा निर्धारु आहे देवा ॥१८॥
करुणासिंधु ऐसें म्हणवितां जनीं ।
येऊन मजलागुनी सांभाळावें ॥१९॥
अनाथांचा नाथ सर्वज्ञाचा रावो ।
जाणसी निजभावो अंतरींचा ॥२०॥

ऐसें कूर्मदासेंविनविलें आहे ।
अहर्निश पाहें वात तुझी ॥२१॥

ऐकोनी पंढरीराव झाला उत्कंठित ।
केव्हा तो निजभक्त आलिंगीन ॥२२॥
अंतरीचें मनोरथ होती परिपुर्ण ।
उल्हासाती नयन देखलिया ॥२३॥
भक्त इष्टमित्र भक्त सुखसिंधु ।
भक्त आर्तबंधु थोर मज ॥२४॥
बोलाविला नामा आणि ज्ञानदेवो ।
सांगतला भावे तयाप्रती ॥२५॥

आर्तें करुनी वात पाहातसे कुर्मा ।
बोलाविलें आम्हां भेटीलागीं ॥२६॥
जाऊं समागमें तुम्ही आम्हीं तेथ ।
करणें सनाथ भक्तराया ॥२७॥
म्हणोनी दोघाजणां धरुनियां हातीं ।
चालिले श्रीपाति चरणें चालीं ॥२८॥
महिमा ज्ञानदेवो अहो जी पूर्णकामा ।
जाणा तुमचा महिमा तुम्ही देवा ॥२९॥
करता करविता सर्व तुझी सत्ता ।
सकळांची चाळीता चित्तवृत्ति ॥३०॥

नामदेवें चरणीं ठेवियेला माथा ।
बरवें दिनानाथा विचारिलें ॥३१॥
संतांचें दर्शन होईल संयोग ।
निवतीं अष्टांग चरण स्पर्शें ॥३२॥
विकासिले नयन स्फुरण आलें बाहीं ।
दाटलें हृदयीं करुणाभरतें ॥३३॥
जातां मार्गीं भक्त देवाचा आवाडता ।
होता तो सांवता जीवन्मुक्त ॥३४॥
त्यांचे सुख घ्यावें म्हणोनि माव केली देवें ।
कौतुक दाखवावें नामयासी ॥३५॥

तयांप्रती काय बोले केशवराज ।
लागलीसे मज थोर तृषा ॥३६॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी ।
मळीयाभीतरीं देव गेला ॥३७॥
तंव तो परमानंद बोधे नित्य तृप्त ।
केलेविण करीत न ये काया ॥३८॥
माथा ठेवोनि हात केला सावधान ।
दिधलें आलिंगन चहूभुजीं ॥३९॥
देखोनियां मिठी घातली चरणीं ।
वोसंडलें नयनी प्रमजळे ॥४०॥

करितसे विनवणी स्वामी चक्रपाणी ।
जनक जननी तुंचि माझी ॥४१॥
तुंचि माझे सर्व वैभव गौरव ।
हृदयींचा भाव जाणसी तुं ॥४२॥
चरणीं ठेउनी माथा विनवितसे सांवता ।
बैस पंढरीनाथा करीत पूजा ॥४३॥
म्हणती देवराज कैंचे पूजन तुझें ।
राख राख माझे प्राण आतां ॥४४॥
तस्काराची मांदी लागलीसे पाठीं ।
चुकवीं त्याची दृष्टी लपवीं मज ॥४५॥

कोठें तुज लपवुं अगा सगुणरुपा ।
माझ्या मायाबापा पाडुंरंगा ॥४६॥
ऐसा कोणरिता ठाव न दिसे मज ।
तेथें तुझें तेज झांकोळेल ॥४७॥
बाहेर भीतरीं तुझाचि प्रकाश ।
गगनासी अवकाश तुझे पोटीं ॥४८॥
मग कटीचें खुरपें सत्वर काढिलें ।
हृदय फाडिलें तत्क्षणी ॥४९॥
यावें पंढरीनाथा रिघावें भीतरीं ।
सुखरुप निर्धारी रहावें येथें ॥५०॥

बैसोनियां देव ह्रुदयसंपुटीं ।
करी सुखगोष्टी स्वभक्तासी ॥५१॥

एवढ्या उपकारा काय तुज द्यावें ।
कैसें तुज व्हावें उतराई ॥५२॥
अवघा मीचि घेई अवथा मीचि घेई ।
यापरतें कांहीं न दिसे मज ॥५३॥
तंव म्हणे सांवता जीवाहुनि परता ।
न करीं तुं चिंता विठ्ठलास्वामी ॥५४॥
नामदेव मनीं करीतसे चिंतनी ।
नयेचि अझूनि विठ्ठल माझा ॥५५॥

वाट पाहता बहू वाडवेळ झाला ।
कोठें गुंतयेला स्वामी माझा ॥५६॥
माझा पांडुरंग सर्व सुखधन ।
दाखविला कोण प्राणसखा ॥५७॥
अवस्थे भरे प्रेम बहुअ आसे स्फुंदतु ।
विठ्ठल विठ्ठल म्हणतु वेळोवेळां ॥५८॥
अदेह जातो चाचरी भेटीलागीं आर्त ।
पाउलें उमगीत विठोबाची ॥५९॥
तृषाक्रांत कैसें जीवनातें गिवसी ।
कीं बाळ मातेसी क्षुधातुर ॥६०॥

हरिणीचे पांडस चुकलें हरिणीसी ।
जैसेंअ दाही दिशा पाहे देखा ॥६१॥
पाझर सुटला दृष्टी वोसंडला पोटीं ।
हृदय तें पिटीं करकमळीं ॥६२॥
देह टाकी धरणीं नामाचे बोभाटी ।
म्हणे देई भेटी प्राण जातो ॥६३॥
सांडोनि जातोसी ऐसें जरी जाणतें ।
तरी कां विसंबतें तुजलागीं ॥६४॥
मिठीं पीतांबरी घालुनी मुरारी ।
येतो चरणावरी रुळत सरसा ॥६५॥

ऐसें विलपत अंतर अवस्था ।
देखिला सांवता सुखराशि ॥६६॥
चरणीं घालुणी मिठी पुसतसे मातु ।
माझा पंढरीनाथु केउता गेला ॥६७॥
तो विसरला देहभावा आर्तभुतमनें ।
होउनी संधानें हरिच्या रुपा ॥६८॥
प्रेम उंचबळतु आनंदे डुल्लतुअ ।
वाचेसी जपतु रामकृष्ण ॥६९॥
देखोनि त्यांची स्थिती विठ्ठल माझा आहे ।
त्याजपाशीं पाहे पुढतोपुढती ॥७०॥

त्यांचे पुर्ण सुख देखियलेंमनें ।
हर्षयुक्त चिन्हें याचे देहीं ॥७१॥
मज दुबळ्याचा ठेवा गिळियेला तुवां ।
सुखाचा विसांवा पंढरीराव ॥७२॥
क्षणभरी दाखवी धरीन मी जीवीं ।
जाताती वांचवीं प्राण माझे ॥७३॥
वेंगी मजसी भेटे करी सुख गोष्टी ।
म्हणे करीन भेटी विठोबाची ॥७४॥
तेचि शकुन गांठी बांधली पालवीं ।
माझ्या माथां ठेवीं अभयकर ॥७५॥

ऐकोनि पंढरीनाथ म्हणे सांवत्यांतें ।
मज माझ्या नाम्यातें भेटी करें ॥७६॥

शिणलें बाळक होत कासाविसी ।
दिसतें परदेशी मजवीण ॥७७॥
मग म्हणे सांवता परिसी हरिभक्ता ।
कृपा पंढरीनाथा आली तुझी ॥७८॥
म्हाणोनि उतावेळ झाले कमळापति ।
भेटोनि विश्रांति द्यावी मज ॥७९॥
जवळींच देखनी सावधान पाहे ।
देती पंधरीराय आलिंगना ॥८०॥

न कळेअ तुवांकाय केल्या पुण्यराशी ।
वाटे भजिन्नलासी सर्वांभूतीं ॥८१॥
जेणें सुख पावोनि माझा पंढरीनाथ ।
झाला वेळाईत तुजलागीं ॥८२॥
खांदी गरुड टका घेऊनी निरंतरीं ।
चालविली वारी पंढरीची ॥८३॥
संतचरणरज वंदियेले माथां ।
म्हणोनि पंढरीनाथा आर्त तुझें ॥८४॥
दशमी दिंडीपुढें नाचती बागडे ।
गाईल साबडें हरीचें नाम ॥८५॥

तेणें पंढरीनाथा वाटला आनंदु ।
मग तो कृपासिंधु बोलला तुज ॥८६॥
कायावाचामनें होऊन तल्लीन ।
केलें हरीकीर्तन एकादशीं ॥८७॥
तेथें तिष्ठत होता पंढरीचा रावो ।
प्रसन्न हा देव झाला तुज ॥८८॥
अनंत जन्मींदेह कर्वती घातले ।
कां उग्र तप सांधिलें महातीर्थीं ॥८९॥
परोपकारी प्राण वेंचियेला तुवां ।
पंढरी येतां केशव धाला तेणें ॥९०॥

आतां तुझें भाग्य महिमा तोअ अद्भुत ।
जाणें पैं समर्थ पंधरीराव ॥९१॥
म्हणोनियां चरणीं ठेऊंनियां माथा ।
गहिंवरें सांवता भक्तराज ॥९२॥
प्रेमें आलिंगन झालें उभयतां ।
मग झाला बोलता विष्णुदास ॥९३॥
सुखाचा सोयरा तुंचि या तत्त्वता ।
माझा प्राणदाता भक्तराज ॥९४॥
सांगितला शकुन साच करी वहिअला ।
मज माझ्या विठ्ठला भेटी करीं ॥९५॥

आतां मज धीरु न धरवे सर्वथा ।
स्फुंदता हे अवस्था चित्त माझें ॥९६॥

कडप्याचे खुरपे काढुनिया येरे ।
हृदय फाडिलें तये वेळीं ॥९७॥
तंव तो पाडुरंग निघाला बाहेरी ।
नामा पाय धरी धाऊनियां ॥९८॥
येरें संबोखुनी पितांबर आंचळें ।
पुसलें मुखकमळ नामयाचें ॥९९॥
देउनि आलिगन हांसे पांढरीनाथ ।
पुसतसे वृत्तांत काय झालें ॥१००॥

येरे तंव मिठी घातली चरणीं ।
म्हणे जनकजननी तुंचि देवा ॥१०१॥
कवण्या मोहे माझे पाळिसी तुं लळे ।
हें मज न कळे केशवराजा ॥२॥
भेटोनियां मातें म्हणे ज्ञानदेव ।
कूर्माही पहावो लवलाही ॥३॥
तरीच माझ्या मना वाटे समाधान ।
निवती लोचन देखिलिया ॥४॥
भेटीचें पैं आर्त आहे माझे मनी ।
चाल वेगें करुनि करुणारसे ॥५॥

आनंदाचा मर्ग संताचे संगतीं ।
आनंदें नाचती पांडुरंग ॥६॥
स्फुरती भुजा दंड आणि वक्षस्थळ ।
सुखाब्धी मिळेल मना आजी ॥७॥
नामा ज्ञानदेव नवल करिती कैसें ।
कूर्म्याचें पैं ऐसें प्रेम देवा ॥८॥
वोसरली धेनु वत्सालागीं जाय ।
तैसें पंढरीराय चालियेले ॥९॥
लवताती लोचन स्फुरताती बाहे ।
येती माझी माय भेटीलागीं ॥११०॥

आला पंढरीराव कूर्मा घाली लोटांगण ।
दिधलेम आलिंगन चहुभूर्जीं ॥११॥
पडियेली मिठी न सोडी सर्वथा ।
मीळाला पंढरीनाथा सद्भावेसी ॥१२॥
कूर्मा म्हणे माझे थोर भाग्य आतां ।
म्हणोनि पंढरीनाथा भेटी तुझी ॥१३॥
तरीं आतां तुवां न जावें येथुनी ।
जोडला चरणीं स्थिर राहे ॥१४॥
देव आणि भक्त एकरुप झाले ।
मग दोघे आले आश्रमासी ॥१५॥
देव म्हाणे भक्तां कष्टी तूं झालासी ।
तुझीये उपकारासी काय वानुं ॥१६॥
भानुदासा नयनीं पुर्ण जळें दाटलें ।
मग आलिंगिलें पांडुरंगें ॥११७॥

संत भानुदास अभंग पंढरीनाथांचीभेट समाप्त


हे पण वाचा: संत भानुदास यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral

संत भानुदास अभंग पंढरीनाथांचीभेट । संत भानुदास अभंग पंढरीनाथांचीभेट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *