संत भानुदास अभंग करूणा गाथा – एकूण २५ अभंग
जैं आकाश वर पडों पाहे । ब्रह्मागोळ भंगा जाये ।
वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहें गा विठोबा ॥१॥
न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ०॥
सप्त सागर एकवट होती । जैं हे विरुनी जाय क्षिती ।
पंचमहाभुतें प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगातीं गा विठोबा ॥२॥
भलतैसें वरपडों भारी । नाम न संडों टळों निर्धारी ।
जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥३॥
अगा पंढरिनाथा ऐसें काय केलें ।
मज उपक्षिलें अनाथासी ॥१॥
त्रैलोक्याचे ठायी मज नसे कोणीं ।
ऐसें चक्रपाणी ठावें तुज ॥२॥
कोणाचे आधारे असावें म्यां येथें ।
जन्मविलें व्यर्थ कां गा मज ॥३॥
आम्हांसी क्लेशांत बहु पाडियेलें ।
काय हातां आलें तुझ्या देवा ॥४॥
आमुच्या मनीचे अर्थ करितां पूर्ण ।
भानुदास म्हणे जाण दुजा कोण ॥५॥
तुम्हीं कराल जें काय एक नोहे ।
ब्रह्मांड अवघे हें उभाराल ॥१॥
तुझिया सत्तेनें सकळांचा प्राण ।
चालतसे जाण ब्रह्मांड हैं ॥२॥
तुझिया सामर्थ्या नाहीं अंतपार ।
तेथें मी किंकर काय जाणे ॥३॥
सर्व अपराधी शरण मी पतित ।
उपेक्षा त्वा मातें न करावी ॥४॥
भानुदास म्हणे पुरवा मनोरथ ।
तुम्हीं अनाथनाथ पांडुरंगा ॥५॥
चंचळ हें मन नावरे माझ्यानें ।
कामाच्या व्यसनें पीडीतसे ॥१॥
अविवेकांचे बळ झालें असे फार ।
धांवती षडविकार सैरावैरां ॥२॥
विवेकाची शक्ति होऊनिया क्षीण ।
सत्कार्मासी हीन बुद्धी झाली ॥३॥
चित्ताचा चालक अगा सुत्रधारी ।
भानुदासा हरी कृपा करी ॥४॥
६१
अधोगती आम्हीं जावें पंढरीनाथा ।
ऐसें तुझ्या चित्ता आलें काय ॥१॥
पडिलों पदरीं अन्यायी अन्यायी मी दीन ।
नेई सांभळुन कैसें तरी ॥२॥
मज अनाथाची परिसावी विनंती ।
भानुदास स्तुति करीतसे ॥३॥
६२
ऐसियासी कृपा करावी त्वरित ।
पुरवा मनोरथ सर्व माझे ॥१॥
काकुळती कवणा येऊ तुजविण ।
दुःख निवारण कोण करी ॥२॥
त्रैलोक्य पालन करिसी सर्वकळ ।
त्याहुनि आगळें हेंचि काय ॥३॥
तुझिया पायांचा मजला आधार ।
केविं तुं निष्ठूर जाहलासी ॥४॥
आमुचे अन्याय न धरावे चित्तीं ।
सर्व कृपामूर्ति पोटीं घाली ॥५॥
कर्म धर्म माझें उत्तम आवरण ।
न न पाहें पावन करी मज ॥६॥
भानुदास म्हणे कृपेचें पोसणें ।
परि नारायणें सांभाळावें ॥७॥
देवा कोठवरीं अंत पाहतोसी ।
प्राण कंठापाशीं ठेवियेला ॥१॥
पळमात्र चित्ता नाहीं समाधान ।
चित्तेंनें व्यापुन घेतलेंसे ॥२॥
नानापरीचें दुःख येवोनी आदळत ।
शोकें व्याकुळ चित्त होत असे ॥३॥
यासी तो उपाय न कळेचि मज ।
शरण आलों तुज देवराया ॥४॥
इच्छा पुरवुनी सुखरुप ठेवी ।
भानुदास पायीं ठाव मागे ॥५॥
६४
मज निरविलें कोनाचिये हातीं ।
वैकुंठीं श्रीपति राहिलासी ॥१॥
कोणी नाहीं मज ठाऊक तुजला ।
संकटाचा घाला कैसा केला ॥२॥
दुरी टाकूनियां केलेसे निष्ठूर ।
दुःखाने बेजार केलें मज ॥३॥
काय राग आला तुझिया मनांत ।
तयामुळें शोंकांत पाडियलें ॥४॥
अन्यायाची राशी देहचि सगळा ।
हा राग गोपाळा न मानावा ॥५॥
क्षमा करीं माझे सर्व अपराध ।
धरावा भेद कांही देवा ॥६॥
भानुदास म्हणे अंगिकारा त्वरित ।
करुनि आनंदात ठेवा पायीं ॥७॥
६५
कोठवरी धांवा करुं तुझा देवा ।
श्रमा झाले जीवा फार माझ्या ॥१॥
अझुनियां कां गा न येसी त्वरित ।
दुःखानें बहुत जाकळिलों ॥२॥
कंठ रोधियेला श्वासावरी श्वास ।
घालुनी नेत्रास नीर वाहे ॥३॥
दाही दिशा मज वाटती उदास ।
झाला कासाविस प्राण माझा ॥४॥
हीन कर्म माझें फुटकें अदृष्ट ।
म्हणवोनि संकट ऐसें झालें ॥५॥
भानुदान म्हणे पहातां चरण ।
तळमळ जाण शांत झाली ॥६॥
दीनबंधु ब्रीद भले । जरी त्वां चरणीं बांधिलें ।
तरी कां आम्हा उपेक्षिले । संगे पंढरीराया ॥१॥
जळ बुडवीं पाषाण । जडकाष्ठा तारी पूर्ण ।
आपण वाढविलें म्हणोन । सांगे पंढरीराया ॥२॥
जीवानीं हा अभिमानी । तुं तंव जगाचें जीवन ।
ब्रीद आपुलें सांभळी पूर्ण । पंढ रीराया ॥३॥
माता ती क्रोध दृष्टी । परते बाळकासी लोटी ।
तरी तें चरणी घाली मिठी । पंढरीराया ॥४॥
सबळ काष्ठा कोरी भ्रमर ।
परि कमळ रक्षी निर्धार तैसा तुं प्रीतिकर ।
पंढारीराया ॥५॥
शारण निजभावेसी । भानुदास सेवेसी ।
तया तु नुपेक्षिसी सांगे पंढारीराया ॥६॥
६७
पतित म्हणोनि जाहलों शरणागत ।
अनाथाचा नाथ म्हणती तुम्हा ॥१॥
तें आपुलें ब्रीद साभाळी अनंता ।
नको पा परता दास तुझा ॥२॥
तुझा दास म्हाणोनि जगीं जाहली मात ।
अनथांचा नाथ तूते म्हणती ॥३॥
भानुदास म्हणे सांभळी वचन ।
पतीतपावन ब्रीद जगीं ॥४॥
६८
अनाथाचा नाथ भक्तांचा कैवारी ।
ऐसें चराचरी ब्रीद गाजे ॥१॥
तें आम्हां सांपडले सोपें वर्म हातां ।
म्होणोनि अच्युता बोलतसों ॥२॥
आम्हीं पतितांनीं घालावें सांकडें ।
उगवणें कोडें तुमचें हातीं ॥३॥
भानुदास विनवी चरणीं ठेवुनि माथा ।
सांभाळी अनाथनाथा आम्हांलागीं ॥४॥
दीन आम्हीं रंक पतीत पतीत ।
पावन तूं अनंत स्वामी माझा ॥१॥
धरला भरवसा नामावरी चित्त ।
नाहें दुजा हेत मनीं कांहीं ॥२॥
देणें घेणें नको पुरला मनोरथ ।
बोलणें ती मात वेगळी असे ॥३॥
भानुदास म्हणे अहो पंढरीराया ।
कृपा करी सखया धरी हातीं ॥४॥
७०
अहो श्रीराम पतीतपावना ।
तारी मज दीना रंकपणें ॥१॥
गाजे त्रिभुवनीं उदार ती ख्याती ।
वेदही वर्णिती महिमा तुझा ॥२॥
भानुदास म्हणे श्रीराम दयाळ ।
पाळा बरवा लळा उदारपणें ॥३॥
७१
भाकितों करुणा पंढरीच्या राया ।
अगा यादवराया श्रीकृष्णरामा ॥१॥
तूं माय माउली जीवीं जीवनकळा ।
भक्ताचा लळा पुरविसि ॥२॥
आवडे साबडे भक्ताचें कीर्तन ।
नाचसी येऊन निरभिमानें ॥३॥
भानुदास म्हणे पुरवीं माझे लळे ।
विठठले सांवळे माऊलीये ॥४॥
अहो पांडुरंग पतीतपावना ।
आमुची विज्ञापना एक असे ॥१॥
नामाचा उच्चार संताचा सांगात ।
पुरवावा हेत जन्मोजन्मीं ॥२॥
भलतीये याती भलतीये कुळीं ।
जन्म दे निर्धारी देवराया ॥३॥
भानुदास म्हणे दुजा नको धंदा ।
रात्रंदिवस गोविंदा वाचे नाम ॥४॥
७३
वेदांत सिद्धांत ऐकोनियां गोष्टी ।
मन जाहलें चावटी देवराया ॥१॥
परि त्याचा बोध नये काहीं चित्ता ।
फजिती तत्त्वतां मागें पुढें ॥२॥
संसाराचें जाळें पडतसे गुंती ।
करितां कुंथाकुंथी न ॥३॥
निघेची भानुदास म्हणे सांवळ्या श्रीरामा ।
तुझा देई प्रेमा दुजें नको ॥४॥
७४
माझा तो भरंवसा तुझे नामीं आहे ।
येणें कार्य होय आमुचें देवा ॥१॥
तूं जगाचें जीवन मनाचें मोहन ।
ब्रह्मा सनातन तूंचि देवा ॥२॥
जंगम जगीं प्रकाशला ।
हा अचोज अबोला दिसे देवा ॥३॥
भानुदास म्हणे विश्रांतीसी स्थान ।
पंढरीवांचून दुजें नाहीं ॥४॥
तुझिया रुपाची आवडी मज देवा ।
वाचेसी तो हेवा रामनाम ॥१॥
श्रवनीं ऐकेन तुमचे पोवाडे ।
दुजे वाडेंकोंडें न करीं कांहीं ॥२॥
चरणें प्रदक्षिणा घालीन लोंटागणा ।
वंदीन चरणा संताचिया ॥३॥
भानुदास म्हणे हीच मति स्थिर ।
रामराम निर्धार गाईन मुखीं ॥४॥
७६
श्रवणीं कीर्तीं ऐकेन मुखें नाम गाईन ।
डोळेभर पाहीन श्रीमुख देवा ॥१॥
चरणें करीन प्रदक्षिणा नमन चरणा ।
घालीन लोटांगणा संतद्वारीं ॥२॥
एकादशीं व्रत जागर निराहारी ।
द्वादशीं क्षीरापती निर्धारी सेवीन मी ॥३॥
भानुदास म्हणे हाचि माझा प्रेम ।
दुजा कांही श्रम न करी आन ॥४॥
इहीं श्रवणीं तुझें गुणगान ऐकेन । इहीं चरणीं तीर्थपथेम चालेन ।
नाशिवंत देह कवणीये काजा । ऐसी प्रेमभक्ति देई सहजा ॥१॥
अखंड तुझे नाम उच्चारी । तेणें संसारा होय उजरी ॥धृ० ॥
शालीग्राम तीर्थे करीन आंघोळी । हरिदासाचें चरणरज लावीन कपाळीं ।
कंठमंडित तुळशी माळी । तन मन प्राण तुमचे वोवाळी ॥२॥
उदयव्यथेलागीं मी न करी धंदा । उच्छिष्ट प्रसादें हरावीं हे क्षुधा ।
आपली स्तुति आणि पारावीया निंदा । हे दोन्हीं आतळों नेदी गोविंदा ॥३॥
सर्वाभूती रामा तूतेंचि देखे । तुझेनि प्रसादें सदा संतोषे ।
देवा भानुदास मागे इतुकें । चाड नाहीं आम्हां वैकुंठ लोकें ॥४॥
७८
एकाचिये घरीं द्वारपाळ होय ।
एकासि ते पाहे खांदा वाहे ॥१॥
एकाचिया घरीं उच्छिष्ठ ते काढी ।
एकाची आवडी उभा राहे ॥२॥
एका घरी कण्या आवडीनें खाय ।
एका घरीं न जाय बोलावितां ॥३॥
एकाचिये घरीं उच्छिष्ट भातुंके ।
खाय कौतुकें मिटक्या मारी ॥४॥
भानुदास म्हणे आवडीच्या सुखा
भुलोनियां देखा लोणी खाये ॥५॥
७९
शेबंडी वाकूडीं गौळियांची पोरं ।
तेथें नाचे निर्धारें आवडीनें ॥१॥
जाणते वेदांती न करिती तिकडे तोंड ।
म्हणे हे तों होती भांड शाब्दीक ते ॥२॥
चोरितानां लोणी बांधिती गौळणी ।
तेथें काकळुनि पाय धरी ॥३॥
यज्ञाचे ठायीं अवदान नेघे ।
विदुरासी मागे आणि कण्या ॥४॥
भानुदास म्हणे जाणते नेणते ।
दोनी ते सरते होता पायीं ॥५॥
जें सुख क्षीरसागरीं ऐकिजे ।
तें या वैष्णवा मंदिरीं देखिजे ॥१॥
धन्य धन्य ते वैष्णवमंदिर ।
जेथें नाम घोष होय निरंतर ॥२॥
दिंडीपताका द्वारी तुळशीवृदांवनें ।
मन निवताहे नाम संकीर्तने ॥३॥
ज्याच्या दरुशनें पापताप जाय ।
भानुदास तयासी गीतीं गायें ॥४॥
८१
तुम्हीं कृपानिधी संत ।
मी पतीत अन्यायी ॥१॥
सलगी बोलयेलों फार ।
न कळे निर्धार योग्यता ॥२॥
म्हणवीं दास तुमचा देवा ।
करितों हेवा पुढील्याचा ॥३॥
उच्छीष्ट प्रसादांची आस ।
म्हणे भानुदास तुमचा ॥४॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral