श्रीमद्‌भगवद्‌गीता अध्याय पहिला

श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)

श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानर्मसंन्यासयोग)


मूळ चौथ्या अध्यायाचा प्रारंभ

अथ चतुर्थोऽध्यायः
अर्थ

चौथा अध्याय सुरु होतो.


मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ ।
विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ ४-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, इमम्‌ = हा, अव्ययम्‌ = अविनाशी, योगम्‌ = योग, अहम्‌ = मी, विवस्वते = सूर्याला, प्रोक्तवान्‌ = सांगितला होता, विवस्वान्‌ = सूर्याने (तो योग), मनवे = (आपला पुत्र वैवस्वत) मनू याला, प्राह = सांगितला, (च) = आणि, मनुः = मनूने, इक्ष्वाकवे = (आपला पुत्र) इक्ष्वाकू राजाला, अब्रवीत = सांगितला ॥ ४-१ ॥

अर्थ

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितला. ॥ ४-१ ॥


मूळ श्लोक

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), एवम्‌ = अशाप्रकारे, परम्पराप्राप्तम्‌ = परंपरेने प्राप्त, इमम्‌ = हा योग, राजर्षयः = राजर्षींनी, विदुः = जाणला (परंतु त्यानंतर), सः = तो, योगः = योग, महता कालेन = काळाच्या मोठ्या ओघात, इह = या पृथ्वीलोकावर, नष्टः = जवळ जवळ नाहीसा झाला ॥ ४-२ ॥

अर्थ

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला. परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. ॥ ४-२ ॥


मूळ श्लोक

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ ४-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(त्वम्‌) = तू, मे = माझा, भक्तः = भक्त, च = आणि, सखा = प्रिय मित्र, असि = आहेस, इति = म्हणून, सः एव = तोच, अयम्‌ = हा, पुरातनः = पुरातन, योगः = योग, अद्य = आज, मया = मी, ते = तुला, प्रोक्तः = सांगितला आहे, हि = कारण, एतत्‌ = हे, उत्तमम्‌ = मोठेच उत्तम, रहस्यम्‌ = रहस्य आहे म्हणजे गुप्त ठेवण्यास योग्य असा विषय आहे ॥ ४-३ ॥

अर्थ

तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस. म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे. कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे. अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. ॥ ४-३ ॥


मूळ श्लोक

अर्जुन उवाच
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, भवतः = तुमचा, जन्म = जन्म (तर), अपरम्‌ = अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या काळातील आहे, (च) = आणि, विवस्वतः = सूर्याचा, जन्म = जन्म, परम्‌ = फार प्राचीन आहे म्हणजे कल्पाच्या आरंभी झालेला होता (तर मग), इति = ही गोष्ट, कथम्‌ = कशी, विजानीयाम्‌ = मी समजू की, त्वम्‌ = तुम्हीच, आदौ = कल्पाच्या आरंभी, (सूर्यम्‌) = सूर्याला, एतत्‌ = हा योग, प्रोक्तवान्‌ = सांगितलेला होता ॥ ४-४ ॥

अर्थ

अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा; आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता, असे कसे समजू? ॥ ४-४ ॥


मूळ श्लोक

श्रीभगवानुवाच
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, परन्तप अर्जुन = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, मे = माझे, च = आणि, तव = तुझे, बहूनि = पुष्कळ, जन्मानि = जन्म, व्यतीतानि = होऊन गेले आहेत, तानि = ते, सर्वाणि = सर्व, त्वम्‌ = तू, न वेत्थ = जाणत नाहीस, (किंतु) = परंतु, अहम्‌ = मी, वेद = जाणतो ॥ ४-५ ॥

अर्थ

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झालेले आहेत. ते सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहेत. ॥ ४-५ ॥


मूळ श्लोक

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(अहम्‌) = मी, अजः = जन्मरहित, (च) = आणि, अव्ययात्मा = अविनाशी स्वरूप असणारा, सन्‌ अपि = असून सुद्धा, (तथा) = तसेच, भूतानाम्‌ = सर्व प्राण्यांचा, ईश्वरः = ईश्वर, सन्‌ अपि = असूनही, स्वाम्‌ = स्वतःच्या, प्रकृतिम्‌ = प्रकृतीला, अधिष्ठाय = अधीन करून घेऊन, आत्ममायया = आपल्या योगमायेने, सम्भवामि = प्रकट होत असतो ॥ ४-६ ॥

अर्थ

मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रकट होत असतो. ॥ ४-६ ॥


मूळ श्लोक

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

भारत = हे भारता(भरतवंशी अर्जुना), यदा यदा = जेव्हा जेव्हा, धर्मस्य = धर्माची, ग्लानिः = हानि, (च) = आणि, अधर्मस्य = अधर्माची, अभ्युत्थानम्‌ = वृद्धी, भवति = होते, तदा हि = तेव्हा तेव्हा, अहम्‌ = मी, आत्मानम्‌ = आपले रूप, सृजामि = रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो ॥ ४-७ ॥

अर्थ

हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा धर्माचा ऱ्हास आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो. ॥ ४-७ ॥


मूळ श्लोक

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

साधूनाम्‌ = साधूंचा म्हणजे चांगल्या मनुष्यांचा, परित्राणाय = उद्धार करण्यासाठी, दुष्कृताम्‌ = पापकर्म करणाऱ्यांचा, विनाशाय = विनाश करण्यासाठी, च = आणि, धर्मसंस्थापनार्थाय = धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी, युगे युगे = युगायुगात, सम्भवामि = मी प्रकट होतो ॥ ४-८ ॥

अर्थ

सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. ॥ ४-८ ॥


मूळ श्लोक

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = हे अर्जुना, मे = माझा, जन्म = जन्म, च = आणि, कर्म = कर्म, दिव्यम्‌ = दिव्य अर्थात निर्मल व अलौकिक आहेत, एवम्‌ = अशाप्रकारे, यः = जो मनुष्य, तत्त्वतः = तत्त्वतः, वेत्ति = जाणून घेतो, सः = तो, देहम्‌ = शरीराचा, त्यक्त्वा = त्याग केल्यावर, पुनः जन्म = पुनर्जन्माला, न एति = येत नाही, (सः) = तो, माम्‌ = मलाच, एति = प्राप्त करून घेतो ॥ ४-९ ॥

अर्थ

हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. ॥ ४-९ ॥


मूळ श्लोक

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ

वीतरागभयक्रोधाः = (पूर्वीसुद्धा) ज्यांचे राग, भय आणि क्रोध हे सर्व प्रकारे नष्ट झाले होते, (च) = आणि, मन्मयाः = जे माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने स्थित राहिले होते (अशा), माम्‌ = माझ्या, उपाश्रिताः = आश्रयाने राहाणाऱ्या, बहवः = पुष्कळ भक्तांनी, ज्ञानतपसा = उपर्युक्त ज्ञानरूपी तपाने, पूताः = पवित्र होऊन, मद्भावम्‌ = माझे रूप, आगताः = प्राप्त करून घेतले होते ॥ ४-१० ॥

अर्थ

पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहात होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ॥ ४-१० ॥


मूळ श्लोक

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌ ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ये = जे भक्त, माम्‌ = मला, यथा = ज्या प्रकाराने, प्रपद्यन्ते = भजतात, तथा एव = त्याचप्रकाराने, अहम्‌ = मी सुद्धा, तान्‌ = त्यांना, भजामि = भजतो (कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुसरण करतात ॥ ४-११ ॥

अर्थ

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. ॥ ४-११ ॥


मूळ श्लोक

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

इह = या, मानुषे लोके = मनुष्यलोकात, कर्मणाम्‌ = कर्मांच्या, सिद्धिम्‌ = फळाची, काङ्क्षन्तः = इच्छा करणारे लोक, देवताः = देवतांचे, यजन्ते = पूजन करतात, हि = कारण (त्यांना), कर्मजा = कर्मांपासून उत्पन्न होणारी, सिद्धिः = सिद्धी, क्षिप्रम्‌ = शीघ्र, भवति = मिळून जाते ॥ ४-१२ ॥

अर्थ

या मनुष्यलोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात. कारण त्यांना कर्मांपासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. ॥ ४-१२ ॥


मूळ श्लोक

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

चातुर्वर्ण्यं = ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांचा समूह, गुणकर्मविभागशः = गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार, मया = माझ्याकडून, सृष्टम्‌ = रचला गेला आहे, तस्य = त्या सृष्टी-रचना इत्यादी कर्माचा, कर्तारम्‌ अपि = कर्ता असूनसुद्धा, अव्ययम्‌ = अविनाशी परमात्मा अशा, माम्‌ = मला, अकर्तारम्‌ = (खरे पाहता) अकर्ताच आहे, विद्धि = असे तू जाण ॥ ४-१३ ॥

अर्थ

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह, गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टिरचना इत्यादी कर्मांचा मी कर्ता असूनही मला-अविनाशी परमात्म्याला-तू वास्तविक अकर्ताच समज. ॥ ४-१३ ॥


मूळ श्लोक

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्मफले = कर्मांच्या फळांमध्ये, मे = माझी, स्पृहा = स्पृहा, न = नसते, (अतः) = म्हणून, माम्‌ = मला, कर्माणि = कर्मे, न लिम्पन्ति = लिप्त करीत नाहीत, इति = अशाप्रकारे, यः = जो, माम्‌ = मला, अभिजानाति = तत्त्वतः जाणून घेतो, सः = तोसुद्धा, कर्मभिः = कर्मांनी, न बध्यते = बांधला जात नाही ॥ ४-१४ ॥

अर्थ

कर्मांच्या फळांची मला स्पृहा नाही, त्यामुळे कर्मे मला लिप्त करीत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्त्वतः जाणतो, त्यालाही कर्मांचे बंधन होत नाही. ॥ ४-१४ ॥


मूळ श्लोक

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ ४-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = जाणूनच, पूर्वैः = पूर्वकालीन, मुमुक्षुभिः अपि = मुमुक्षूंच्याकडूनही, कर्म = कर्म, कृतम्‌ = केले गेले आहे, तस्मात्‌ = म्हणून, पूर्वैः = पूर्वजांनी, पूर्वतरम्‌ कृतम्‌ = नेहमी केलेली, कर्म एव = कर्मेच, त्वम्‌ (अपि) = तू सुद्धा, कुरु = कर ॥ ४-१५ ॥

अर्थ

पूर्वीच्या मुमुक्षूंनीसुद्धा अशा प्रकारे जाणूनच कर्मे केली आहेत. म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मेच कर. ॥ ४-१५ ॥


मूळ श्लोक

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्म किम्‌ = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम्‌ = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात्‌ = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत्‌ = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥

अर्थ

कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. ॥ ४-१६ ॥


मूळ श्लोक

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्मणः अपि = कर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम्‌ = जाणले पाहिजे, च = आणि, अकर्मणः = अकर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम्‌ = जाणून घ्यावयास हवे, च = तसेच, विकर्मणः = विकर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम्‌ = जाणले पाहिजे, हि = कारण, कर्मणः = कर्माची, गतिः = गती, गहना = गहन आहे ॥ ४-१७ ॥

अर्थ

कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. कारण कर्मांचे तात्त्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे. ॥ ४-१७ ॥


मूळ श्लोक

कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत्‌ ॥ ४-१८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यः = जो माणूस, कर्मणि = कर्मामध्ये, अकर्म = अकर्म, पश्येत्‌ = पाहतो, च = आणि, यः = जो, अकर्मणि = अकर्मात, कर्म = कर्म, पश्येत्‌ = पाहतो, सः = तो, मनुष्येषु = मनुष्यांमध्ये, बुद्धिमान्‌ = बुद्धिमान आहे, (च) = आणि, सः = तो, युक्तः = योगी, कृत्स्नकर्मकृत्‌ = सर्व कर्मे करणारा आहे ॥ ४-१८ ॥

अर्थ

जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहील, तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्मे करणारा आहे. ॥ ४-१८ ॥


मूळ श्लोक

यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यस्य = ज्याची, सर्वे = सर्व, समारम्भाः = शास्त्रसंमत कर्मे, कामसङ्कल्पवर्जिताः = कामना व संकल्प यांच्या विना असतात, (तथा) = तसेच, ज्ञानाग्निदग्धकर्माणम्‌ = ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारे भस्म झालेली असतात, तम्‌ = त्या महामनुष्याला, बुधाः = ज्ञानी, (अपि) = सुद्धा, पण्डितम्‌ = पंडित, आहुः = म्हणतात ॥ ४-१९ ॥

अर्थ

ज्याची सर्व शास्त्रसंमत कर्मे कामनारहित व संकल्परहित असतात, तसेच ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूप अग्नीने जळून गेली आहेत, त्या महामनुष्याला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात. ॥ ४-१९ ॥


मूळ श्लोक

त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥

संदर्भित अन्वयार्थ

कर्मफलासङ्गम्‌ = सर्व कर्मे आणि त्यांची फळे यातील आसक्ती, त्यक्त्वा = (संपूर्णपणे) सोडून देऊन, (यः) = जो मनुष्य, निराश्रयः = भौतिक आश्रयाने रहित झालेला आहे, (च) = आणि, नित्यतृप्तः = परमात्म्यामध्ये नित्यतृप्त आहे, सः = तो, कर्मणि = कर्मांमध्ये, अभिप्रवृत्तः अपि = व्यवस्थितपणे वावरत असतानाही (वस्तुतः), न एव किञ्चित्‌ करोति = काहीही करत नाही ॥ ४-२० ॥

अर्थ

जो मनुष्य सर्व कर्मांमध्ये आणि त्यांच्या फळांमध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून तसेच सांसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्यतृप्त असतो, तो कर्मांमध्ये उत्तमप्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करत नाही. ॥ ४-२० ॥


मूळ श्लोक

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्‌ ॥ ४-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यतचित्तात्मा = ज्याने आपले अंतःकरण आणि इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे, (च) = आणि, त्यक्तसर्वपरिग्रहः = सर्व भोगांच्या सामग्रीचा ज्याने परित्याग केला आहे असा, निराशीः = आशारहित असा सांख्ययोगी, केवलम्‌ = केवळ, शारीरम्‌ = शरीर-संबंधी, कर्म = कर्म, कुर्वन्‌ = करीत असताना, (अपि) = सुद्धा, किल्बिषम्‌ = त्याला पाप, न आप्नोति = लागत नाही ॥ ४-२१ ॥

अर्थ

ज्याने अंतःकरण व इंद्रियांसह शरीर जिंकले आहे आणि सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, असा आशा नसलेला मनुष्य केवळ शरीरसंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. ॥ ४-२१ ॥


मूळ श्लोक

यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(यः) = जो मनुष्य, यदृच्छालाभसन्तुष्टः = इच्छा नसताना आपोआप प्राप्त झालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट राहातो, विमत्सरः = ज्याच्या ठिकाणी ईर्ष्येचा संपूर्ण अभाव झालेला आहे, द्वन्द्वातीतः = जो हर्ष-शोक इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे संपूर्णपणे गेला आहे, सिद्धौ = सिद्धी, च = आणि, असिद्धौ = असिद्धी यांच्याबाबतीत, समः = समतोल राहाणारा कर्मयोगी, कृत्वा = कर्म करीत असताना, अपि = सुद्धा (त्या कर्मांनी), न निबध्यते = बद्ध होत नाही ॥ ४-२२ ॥

अर्थ

जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थांत नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांच्या पूर्णपणे पार गेलेला आहे, असा सिद्धीत व असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने बांधला जात नाही. ॥ ४-२२ ॥


मूळ श्लोक

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

गतसङ्गस्य = ज्याची आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाली आहे, मुक्तस्य = जो देहाभिमान आणि ममता यांनी रहित झाला आहे, ज्ञानावस्थितचेतसः = ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थित राहात आहे, यज्ञाय = (केवळ) यज्ञ संपादन करण्यासाठी, आचरतः = जो कर्म करीत आहे अशा माणसाचे, समग्रम्‌ = संपूर्ण, कर्म = कर्म, प्रविलीयते = पूर्णपणे विलीन होऊन जाते ॥ ४-२३ ॥

अर्थ

ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली आहे, जो देहाभिमान आणि ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्मे पूर्णपणे नाहीशी होतात. ॥ ४-२३ ॥


मूळ श्लोक

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्‌ ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

(यस्मिन्‌ यज्ञे) = ज्या यज्ञात, अर्पणम्‌ (अपि) = अर्पण म्हणजे स्रुवा इत्यादी सुद्धा, ब्रह्म = ब्रह्म आहेत, (च) = आणि, हविः (अपि) = हवन करण्यास योग्य असे द्रव्य (सुद्धा), ब्रह्म = ब्रह्म आहे, (तथा) = तसेच, ब्रह्मणा = ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे, ब्रह्माग्नौ = ब्रह्मरूप अग्नीमध्ये, हुतम्‌ = आहुति देणे (ही क्रिया सुद्धा ब्रह्म आहे), तेन = त्या, ब्रह्मकर्मसमाधिना = ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणाऱ्या योग्याला, गन्तव्यम्‌ = प्राप्त करून घेण्यास योग्य (असे फळ सुद्धा), ब्रह्म एव = ब्रह्मच आहे ॥ ४-२४ ॥

अर्थ

ज्या यज्ञात अर्पण अर्थात स्रुवा आदी ही ब्रह्म आहे आणि हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे, त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे. ॥ ४-२४ ॥


मूळ श्लोक


दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ ४-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अपरे = दुसरे, योगिनः = योगी लोक, दैवम्‌ = देवतांचे पूजनरूपी, यज्ञम्‌ एव = यज्ञाचेच, पर्युपासते = चांगल्याप्रकारे अनुष्ठान करीत राहतात, अपरे = दुसरे (योगी लोक), ब्रह्माग्नौ = परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये, यज्ञेन एव = (अभेद दर्शनरूपी) यज्ञाच्या द्वारेच, यज्ञम्‌ = आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वति = हवन करतात ॥ ४-२५ ॥

अर्थ

दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात. तर इतर योगी परब्रह्म परमात्मारूपी अग्नीत अभेददर्शनरूप यज्ञाच्या द्वारेच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. ॥ ४-२५ ॥


मूळ श्लोक

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अन्ये = अन्य योगी जन, श्रोत्रादीनि = श्रोत्र इत्यादी, इन्द्रियाणि = सर्व इंद्रियांचे, संयमाग्निषु = संयमरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात, (च) = आणि, अन्ये = दुसरे योगी लोक, शब्दादीन्‌ = शब्द इत्यादी, विषयान्‌ = विषयांचे, इन्द्रियाग्निषु = इंद्रियरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात ॥ ४-२६ ॥

अर्थ

दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयमरूप अग्नीत हवन करतात तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रियरूप अग्नीत हवन करतात. ॥ ४-२६ ॥


मूळ श्लोक

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ४-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अपरे = दुसरे (योगीलोक), सर्वाणि इन्द्रियकर्माणि = इंद्रियांच्या संपूर्ण क्रिया, च = आणि, प्राणकर्माणि = प्राणांच्या संपूर्ण क्रिया, ज्ञानदीपिते = ज्ञानाने प्रकाशित झालेल्या, आत्मसंयमयोगाग्नौ = आत्मसंयमयोगरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात ॥ ४-२७ ॥

अर्थ

अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया आणि प्राणांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयमयोगरूपी अग्नी त्यात हवन करतात. ॥ ४-२७ ॥


मूळ श्लोक

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ ४-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अपरे = काही मनुष्य, द्रव्ययज्ञाः = द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत, तपोयज्ञाः = तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत, तथा = तसेच (दुसरे काही लोक), योगयज्ञाः = योगरूपी यज्ञ करणारे आहेत, च = आणि, संशितव्रताः = अहिंसा इत्यादी कडक व्रतांनी युक्त (असे), यतयः = प्रयत्‍नशील मनुष्य, स्वाध्यायज्ञानयज्ञाः = स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत ॥ ४-२८ ॥

अर्थ

काही मनुष्य द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काहीजण तपश्चर्यारूप यज्ञ करणारे असतात. तसेच दुसरे काहीजण योगरूप यज्ञ करणारे असतात. अहिंसा इत्यादी कडकव्रते पाळणारे कितीतरी यत्‍नशील मनुष्य स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे असतात. ॥ ४-२८ ॥


मूळ श्लोक

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ

अपरे = दुसरे कितीतरी योगीजन, अपाने = अपान वायूमध्ये, प्राणम्‌ = प्राण वायूचे, जुह्वति = हवन करतात, तथा = त्याचप्रमाणे (इतर योगीलोक), प्राणे = प्राण वायूमध्ये, अपानम्‌ = अपान वायूचे, (जुह्वति) = हवन करतात, अपरे = अन्य कित्येक, नियताहाराः = नियमित आहार करणारे, प्राणायामपरायणाः = प्राणायाम-परायण मनुष्य, प्राणापानगती = प्राण व अपान यांच्या गतीचा, रुद्ध्वा = रोध करून, प्राणान्‌ = प्राणांचे, प्राणेषु = प्राणांमध्येच, जुह्वति = हवन करतात, एते = हे, सर्वे अपि = सर्व साधकही, यज्ञक्षपितकल्मषाः = यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे, (च) = आणि, यज्ञविदः = यज्ञ जाणणारे असतात ॥ ४-२९, ४-३० ॥

अर्थ

अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात. तसेच दुसरे योगी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर मनुष्य प्राण व अपान यांची गती थांबवून, प्राणांचे प्राणांतच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे व यज्ञ जाणणारे आहेत. ॥ ४-२९, ४-३० ॥


मूळ श्लोक

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम्‌ ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ४-३१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

कुरुसत्तम = हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञशिष्टामृतभुजः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी लोक, सनातनम्‌ = सनातन, ब्रह्म = परब्रह्म परमात्म्याप्रत, यान्ति = जातात, (च) = आणि, अयज्ञस्य = यज्ञ न करणाऱ्या मनुष्यासाठी तर, अयम्‌ = हा, लोकः = मनुष्यलोक सुद्धा (सुखदायक), न अस्ति = राहात नाही (तर मग), अन्यः = परलोक, कुतः = कसा बरे (सुखदायक होऊ शकेल) ॥ ४-३१ ॥

अर्थ

हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या मनुष्याला हा मनुष्यलोक सुद्धा सुखदायक होत नाही; तर परलोक कसा सुखदायक होईल? ॥ ४-३१ ॥


मूळ श्लोक

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

एवम्‌ = अशाप्रकारे, बहुविधाः = आणखीसुद्धा नानाप्रकारचे, यज्ञाः = यज्ञ, ब्रह्मणः = वेदाच्या, मुखे = वाणीमध्ये, वितताः = विस्ताराने सांगितले गेले आहेत, तान्‌ = ते, सर्वान्‌ = सर्व, कर्मजान्‌ = मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारे संपन्न होणारे आहेत, विद्धि = (असे) तू जाण, एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून), विमोक्ष्यसे = तू मुक्त होशील ॥ ४-३२ ॥

अर्थ

अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेलेले आहेत. ते सर्व तू मन, इंद्रिये आणि शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहेत, असे समज. अशाप्रकारे तत्त्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. ॥ ४-३२ ॥


मूळ श्लोक

श्रेयान्द्रव्यमयाद्यज्ञाज्ज्ञानयज्ञः परन्तप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ४-३३ ॥

संदर्भित अन्वयार्थ

परन्तप पार्थ = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), द्रव्यमयात्‌ = द्रव्यमय, यज्ञात्‌ = यज्ञापेक्षा, ज्ञानयज्ञः = ज्ञानयज्ञ, श्रेयान्‌ = अत्यंत श्रेष्ठ आहे, (तथा) = तसेच, अखिलम्‌ = जितकी म्हणून, सर्वम्‌ = सर्व, कर्म = कर्मे (आहेत ती), ज्ञाने = ज्ञानामध्ये, परिसमाप्यते = समाप्त होऊन जातात ॥ ४-३३ ॥

अर्थ

हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ आहे. तसेच यच्चयावत्‌ सर्व कर्मे ज्ञानात समाप्त होतात. ॥ ४-३३ ॥


मूळ श्लोक

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः ॥ ४-३४ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तत्‌ = ते ज्ञान (तत्त्वदर्शी ज्ञानी माणसांच्या जवळ जाऊन), विद्धि = तू जाणून घे, प्रणिपातेन = (त्यांना) यथायोग्यपणे दंडवत प्रणाम करण्याने, सेवया = त्यांची सेवा करण्याने (आणि त्यांना), परिप्रश्नेन = कपट सोडून सरळपणे प्रश्न करण्याने, तत्त्वदर्शिनः = परमात्म-तत्त्व व्यवस्थितपणे जाणणारे, ते = ते, ज्ञानिनः = ज्ञानी महात्मे (तुला त्या), ज्ञानम्‌ = तत्त्वज्ञानाचा, उपदेक्ष्यन्ति = उपदेश करतील ॥ ४-३४ ॥

अर्थ

ते ज्ञान तू तत्त्वसाक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने, परमात्मतत्त्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्त्वज्ञानाचा उपदेश करतील. ॥ ४-३४ ॥


मूळ श्लोक

यज्ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पाण्डव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ४-३५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, पुनः = पुन्हा, एवम्‌ = अशाप्रकारे, मोहम्‌ = मोहाप्रत, न यास्यसि = तू जाणार नाहीस, पाण्डव = हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), येन = ज्या ज्ञानाच्या द्वारे, भूतानि = सर्व सजीवांना, अशेषेण = संपूर्णपणे, आत्मनि = आपल्यामध्ये, अथो = नंतर, मयि = सच्चिदानंदघन मज परमात्म्यामध्ये, द्रक्ष्यसि = तू पाहशील ॥ ४-३५ ॥

अर्थ

जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस, तसेच हे पांडवा (अर्थात पांडुपुत्र अर्जुना), ज्या ज्ञानामुळे तू सर्व सजीवांना पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंदघन परमात्म्यात पाहशील. ॥ ४-३५ ॥


मूळ श्लोक

अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि ॥ ४-३६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

चेत्‌ = जरी, सर्वेभ्यः = सर्व, पापेभ्यः = पापी माणसापेक्षा, अपि = सुद्धा, पापकृत्तमः = अधिक पाप करणारा असा, असि = तू असलास (तरी सुद्धा), ज्ञानप्लवेन = ज्ञानरूपी नौकेने, एव = निःसंशयपणे, सर्वम्‌ = संपूर्ण, वृजिनम्‌ = पापसमुद्र, सन्तरिष्यसि = तू चांगल्याप्रकारे तरून जाशील ॥ ४-३६ ॥

अर्थ

जरी तू इतर सर्व पाप्यांहूनही अधिक पाप करणारा असलास, तरीही तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पापसमुद्रातून चांगल्याप्रकारे तरून जाशील. ॥ ४-३६ ॥


मूळ श्लोक

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात्कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात्कुरुते तथा ॥ ४-३७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अर्जुन = हे अर्जुना, यथा = ज्याप्रमाणे, समिद्धः = प्रज्वलित, अग्निः = अग्नी, एधांसि = सर्पणाला, भस्मसात्‌ = भस्ममय, कुरुते = करतो, तथा = त्याप्रमाणे, ज्ञानाग्निः = ज्ञानरूपी अग्नी, सर्वकर्माणि = संपूर्ण कर्मांना, भस्मसात्‌ = भस्ममय, कुरुते = करून टाकतो ॥ ४-३७ ॥

अर्थ

कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो. ॥ ४-३७ ॥


मूळ श्लोक

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ४-३८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

इह = या संसारात, ज्ञानेन = ज्ञानाशी, सदृशम्‌ = समान, पवित्रम्‌ = पवित्र करणारे, हि = निःसंदेहपणे, न विद्यते = काहीही नाही, तत्‌ = ते ज्ञान, कालेन = दीर्घ काळाने, योगसंसिद्धः = कर्मयोगाच्या द्वारे अंतःकरण शुद्ध झालेला मनुष्य, स्वयम्‌ = आपण स्वतःच, आत्मनि = आत्म्यामध्ये, विन्दति = प्राप्त करून घेतो ॥ ४-३८ ॥

अर्थ

या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काहीही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. ॥ ४-३८ ॥


मूळ श्लोक

श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ४-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ

संयतेन्द्रियः = जितेंद्रिय, तत्परः = साधन-तत्पर, (च) = आणि, श्रद्धावान्‌ = श्रद्धावान असा मनुष्य, ज्ञानम्‌ = ज्ञान, लभते = प्राप्त करून घेतो, ज्ञानम्‌ = ज्ञानाची, लब्ध्वा = प्राप्ती झाल्यावर, (सः) = तो मनुष्य, अचिरेण = विनाविलंब तत्काळ, पराम्‌ शान्तिम्‌ = भगवत्‌-प्राप्तिरूप परम शांती, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ ४-३९ ॥

अर्थ

जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो. आणि ज्ञान प्राप्त झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तिरूप परम शांतीला प्राप्त होतो. ॥ ४-३९ ॥


मूळ श्लोक

अज्ञश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ

अज्ञः = जो विवेकहीन, च = आणि, अश्रद्दधानः = श्रद्धारहित असतो, संशयात्मा = असा संशययुक्त मनुष्य, विनश्यति = परमार्थापासून निश्चितपणे भ्रष्ट होऊन जातो, संशयात्मनः = अशा संशययुक्त माणसाला, अयम्‌ लोकः = हा लोक, न अस्ति = नसतो, न परः = परलोक नसतो, च = आणि, न सुखम्‌ = सुखही नसते ॥ ४-४० ॥

अर्थ

अविवेकी आणि श्रद्धा नसलेला संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला ना हा लोक, ना परलोक आणि ना सुख. ॥ ४-४० ॥


मूळ श्लोक

योगसंन्यस्तकर्माणं ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ ।
आत्मवन्तं न कर्माणि निबध्नन्ति धनञ्जय ॥ ४-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ

धनञ्जय = हे धनंजया(अर्जुना), योगसंन्यस्तकर्माणम्‌ = कर्मयोगाच्या द्वारे ज्याने विधिपूर्वक सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत, ज्ञानसञ्छिन्नसंशयम्‌ = विवेकाच्या द्वारे ज्याने सर्व संशयांचा नाश केला आहे, आत्मवन्तम्‌ = ज्याने अंतःकरण वश करून घेतले आहे अशा मनुष्याला, कर्माणि = कर्मे, न निबध्नन्ति = बद्ध करीत नाहीत ॥ ४-४१ ॥

अर्थ

हे धनंजया(अर्जुना), ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहेत आणि ज्याने विवेकाने सर्व संशयांचा नाश केला आहे, अशा अंतःकरण स्वाधीन असलेल्या मनुष्याला कर्मे बंधनकारक होत नाहीत. ॥ ४-४१ ॥


मूळ श्लोक

तस्मादज्ञानसम्भूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४-४२ ॥

संदर्भित अन्वयार्थ

तस्मात्‌ = म्हणून, भारत = हे भरतवंशी अर्जुना, हृत्स्थम्‌ = हृदयामध्ये असणाऱ्या, एनम्‌ = या, अज्ञानसम्भूतम्‌ = अज्ञानाने निर्माण झालेल्या, आत्मनः संशयम्‌ = आपल्या संशयाला, ज्ञानासिना = विवेकज्ञानरूपी तलवारीने, छित्त्वा = कापून टाकून, योगम्‌ = समत्वरूप कर्मयोगात, आतिष्ठ = स्थित होऊन जा (आणि युद्धासाठी), उत्तिष्ठ = उठून उभा राहा ॥ ४-४२ ॥

अर्थ

म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेकज्ञानरूपी तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. ॥ ४-४२ ॥


मूळ चौथ्या अध्यायाची समाप्ती

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
ज्ञानकर्मसंन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः ॥ ४ ॥
अर्थ

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील ज्ञानकर्मसंन्यासयोग नावाचा हा चौथा अध्याय समाप्त झाला. ॥ ४ ॥


श्रीमद्‌भगवद्‌गीता : चौथा अध्याय (ज्ञानकर्मसंन्यासयोग)


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *