संपूर्ण भगवद्‌गीतेमधील अध्याय व त्याबद्दलची संपूर्ण माहिती वाचा.


भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील ए ग्रंथ. ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे. ५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. गीताई हे आचार्य विनोबा भावे यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे. भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृत भाषेत काव्यस्वरूपात लिहिलेला आहे. ‘महाभारत’ या महाकाव्याचा एक भाग असलेला हा ग्रंथ १८ अध्यायांचा (७०० श्लोक) आहे. महाभारतातल्या महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हिंदू (वैदिक) धर्माच्या मते भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे स्वरूप मानले जातात. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्यजनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.

अर्जुनाला श्रीकृष्ण गीता सांगत असल्याचे दर्शवणारे कुरुक्षेत्र येथील शिल्प कुरुक्षेत्रावर रणांगणामधे युद्धाच्या सुरुवातीला सांगितली गेलेली गीता हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असून त्यामधे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या शंकांचे निरसन केले आहे. विविध उदाहरणे आणि उपमांचा आधार घेत श्रीकृष्णाने अर्जुनाला योग आणि वेदान्त यांबद्दल मार्गदर्शन केले आहे. यामुळे हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.

भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक ऋषीलाही दाखविले आहे!)

भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला ‘योगोपनिषद’ किंवा ‘गीतोपनिषद’ ही म्हणले जाते आणि तिला उपनिषदांचा दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला ‘उपनिषदांचे उपनिषद’ असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे. इस्कॉन संघटना भगवद्गीता सर्व लोकांना पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.


गीता निर्मितीचा काळ

महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५व्यापासून ते ४२व्या अध्यायांत संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते. उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत तज्ज्ञांमधे एकवाक्यता नाही. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातल्या बहुतेक सगळ्या अर्वाचीन ग्रंथांप्रमाणेच गीतेच्या लेखकाची निश्चित माहिती आधुनिक युगातल्या जाणकारांना नाही परंतु तरीही महाभारतात समाविष्ट असल्याने गीता ‘महर्षी व्यास’ यांनी लिहिली असे मानले जाते.

छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला ठेवा स्वरूपात देण्याची प्रथा असल्याने आधुनिक अभ्यासकांच्या मतापेक्षा गीता कित्येक वर्षे जुनी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच गीतेमधील तत्त्वज्ञान हे कालातीत आहे असे मानले जाते. कुठल्याही युगात त्याचे महत्त्व आपण नाकारू शकत नाही. म्हणूनच विद्वानांच्या मते आध्यात्मिकदृष्ट्या गीता कधी लिहिली गेली अथवा कधी सांगितली गेली याला फारसे महत्त्व नाही.


गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा

भगवद्‌गीतेच्या प्रभावातून हजारो वर्षांपासून वेगवेगळ्या कालखंडांत इतर विविध गीता निर्माण झाल्या. यात अष्टावक्रगीता, ईश्वरगीता, कपिलगीता, गणेशगीता, पराशरगीता, भिक्षुगीता, व्यासगीता, रामगीता, शिवगीता, सूर्यगीता, हंसगीता, इतकेच काय, पण यमगीताही लिहिली गेली. कूर्मपुराणात उत्तर विभागात पहिल्या अकरा अध्यायांत ईश्वरगीता तर पुढील अध्यायांत व्यासगीता आहे. गणेशपुराणात शेवटच्या क्रीडा खंडात १३८ ते १४९ अध्यायांत गणेशगीता आहे.[१]

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज । अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ १८.६६ ॥

सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भयभीत होऊ नकोस.


गीतेची अठरा नावे

गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती|
ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी||
अर्धमात्रा, चिदानंदा, भवग्नी, भयनाशिनी|
वेदत्रयी, परा, अनंता, तत्त्वार्थज्ञानमंजिरी||

ही गेय स्वरूपातली गीतेची अठरा नावे नित्य घेतल्यास गीता पठणाचे पुण्य लाभते, अशी मान्यता आहे.


भगवद्‌गीतेतील सर्व अध्याय
इवलेसे|श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेले विश्वरुप

अध्याय शीर्षक श्लोक
पहिला अर्जुनविषादयोग ४७
दुसरा सांख्ययोग (गीतेचे सार) ७२
तिसरा कर्मयोग ४३
चौथा ज्ञानकर्मसंन्यासयोग (दिव्य ज्ञान) ४२
पाचवा कर्मसंन्यासयोग २९
सहावा आत्मसंयमयोग ४७
सातवा ज्ञानविज्ञानयोग ३०
आठवा अक्षरब्रह्मयोग २८
नववा राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) ३४
दहावा विभूतियोग (भगवंताचे ऐश्वर्य) ४२
अकरावा विश्वरूपदर्शनयोग ५५
बारावा भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) २०
तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग ३४
चौदावा गुणत्रयविभागयोग २७
पंधरावा पुरुषोत्तमयोग २०
सोळावा दैवासुरसंपद्विभागयोग २४
सतरावा श्रद्धात्रयविभागयोग २८
अठरावा मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) ७८
एकूण ७००

वाचा भगवद्‌गीतेतील सर्व अध्याय व त्याचा अर्थ.

View Comments