चोखियाचे घरी चोखियाची कांता ।
सोयरा तत्वतां नाम जीचें ॥१॥
बहु दिवस करी प्रपंच कारण ।
परी नव्हे संतान तिजलागीं ॥२॥
बैसोनियां एकांतीं आठवी पंढरीराणा ।
म्हणे कांवो नारायणा विसरलासी ॥३॥
आमुचीया कुळीं नाहीं वो संतान ।
तेणें वाटे शीण मना माझ्या ॥४॥
ऐकोनी पंढरीराव हासलासे मनीं ।
म्हणे ऐकें रुक्मिणी गोड एक ॥५॥
चोखियाची कांता चिंताक्रांत मनीं ।
संसारी असोनी उदास वृत्ती ॥६॥
पोटीं नाही मूल करी तळमळ ।
वंका म्हणे विठठल काय करी ॥७॥
राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.