shankar maharaj information in marathi
जन्म: अंदाजे १८००, मंगळवेढे (पंढरपूर), उपासनी कुटुंबात
कार्यकाळ: १८०० ते १९४७
स्पर्शदिक्षा: स्वामी समर्थ अक्कलकोट
समाधी: पुणे येथे, धनकवडी, २४/०४/१९४७
श्री शंकर महाराज अगदी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सत्पुरुष. त्यांची समाधी पुणे येथे सातारा रस्त्यावर धनकवडी भागात आहे. त्यांच्या समाधीचा दिनांक (वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ म्हणजे) २४ एप्रिल १९४७ सोमवारी आहे. समाधीची अधिकृत नोंद आहे. पण बालपण, माता-पिता, शिक्षण, गुरू, साधना, शिष्य-संप्रदाय इत्यादींचा तपशील हवा तसा मिळत नाही.
त्यांनीच पुढे एकदा म्हटले होते, ‘आम्ही कैलासाहून आलो!’ नावही ‘शंकर’! ते खरोखरच शिवाचे वैराग्य-संपन्न अंशावतार असावेत. नाशिक जिल्ह्यात अंतापूर नावाचे गाव आहे. तिथे कुणी चिमणाजी नावाचे गृहस्थ राहात होते. पोटी मूल-बाळ नव्हते. ते शिवाचे भक्त होते. एकदा त्यांना स्वप्नात दृष्टान्त झाला. ‘रानात जा. तुला बाळ मिळेल. घेऊन ये.’ ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले. तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला! शंकराचा प्रसाद म्हणून त्याचे नाव ‘शंकर’ ठेवले. ‘शंकर’ या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला, ‘तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल!’ आशीर्वाद देऊन शंकर बाहेर पडला.
नाम नाही, रूप नाही, एक स्थान नाही. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. ‘शंकर’ या नावाप्रमाणेच ‘सुपड्या’, ‘कुंवरस्वामी’, ‘गौरीशंकर’ अशा नावानीही ते ओळखले जात. ही नावे कळली एवढेच! आणखीही काही नावांनी ते वावरत असावेत. ‘नाव’ जसे एक नाही, तसेच त्यांचे ‘रूप’ही! काही ठिकाणी त्यांचा उल्लेख ‘अष्टावक्र’ असाही केलेला आढळतो. डोळे मोठे होते, ते अजानुबाहू होते, त्यांची गुडघे वर करुन बसण्याची पद्धती होती. ‘हे असे रूप!’ वेगळ्या अर्थाने ‘बहुरूपी!’
ते कधी एका स्थानीही नसत. त्रिवेणी संगम, सोलापूर, अक्कलकोट, त्र्यंबकेश्र्वर, नाशिक, नगर, पुणे, हैद्राबाद, तुळजापूर, औदुंबर, श्रीशैल- अशा स्थानी त्यांची भटकंती असायची! सांगितली एवढीच स्थाने असतील असेही नाही! म्हणजे शंकर महाराजांचे ‘नाम-रूप-स्थान’ सांगणे कठीण आहे. कारण खऱ्या अर्थाने ते वैराग्यसंपन्न होते! म्हणूनच ‘शंकर’ होते!
श्री शंकर महाराज योगीराज होते, याचा अनेकांनी अनेक प्रकारे प्रत्यय घेतला आहे. ते स्वत: मात्र नेहमी म्हणत, ‘सिद्धीच्या मागे लागू नका!’ पण त्यांनी आपले योगसामर्थ्य कळत-नकळत अनेकांच्या प्रत्ययाला आणून दिले. काहींना ‘सिद्धी’ हवी असते ती ‘प्रसिद्धी’साठी! त्याने नावलौकिक वाढतो, धन-दौलत मिळते, शिष्य-परिवार वाढतो! म्हणून श्री शंकर महाराज म्हणत ‘सिद्धीच्या मागे लागू नये’ त्यांना स्वत:ला सिद्धी प्राप्त होत्या पण त्यांनी धन-दौलत, नावलौकिक वा शिष्य-परिवारादि उपाधी मागे लावून घेतल्या नाहीत. ते स्वत: खऱ्या अर्थाने सिद्धींच्या मागे लागले नाहीत. पण शंकर महाराज अलौकिक पुरुष होत, हे चिकित्सक विद्वानांनाही मान्य होते. आचार्य अत्रे, न्यायरत्न विनोद यांच्यासारखे प्रकांड पंडित शंकर महाराजांना मानीत. हे विद्वान त्यांची योग्यता जाणून होते.
ते म्हणत, ‘मला जाती, धर्म काही नाही. ते स्वत: खरोखरीच सर्वांशी समभावाने वागत. त्यामुळे त्यांच्याकडे मुसलमानही येत. एका मुसलमानाने त्यांना आपली काही अडचण सांगितली. शंकर महाराजांनी त्यांना काय सांगावे? ‘अरे, तू नमाज पढत नाहीस. नमाज पढत जा. तुझी अडचण दूर होईल.’ ते काय शिकले होते कुणास ठाऊक! पण काही दीड शहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजीतून उत्तरे दिली. त्यांना इंग्रजीचे ज्ञान कसे नि कुठे झाले, कुणास ठाऊक
श्री शंकर महाराजांची मनोभूमिका
श्री शंकर महाराजांची पारमार्थिक वैराग्य-संपन्न मूर्ती केवढ्या उच्च भूमिकेवर होती, ते त्यांच्या एका सहज उद्गारातून दिसते. ते म्हणाले होते- ‘मला काही कमी नाही, कारण मला कमावण्यासारखे काही नाही. आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही.’
१) सुख-शांती हवी असेल, तर इच्छा, इर्षा, असुया, महत्त्वाकांक्षा, हावरेपणा सोडून दिल्याने अहंकाराने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल.
२) सामाजिक-धार्मिक-नैतिक अधिष्ठान गुरुंमुळे प्राप्त होते. पण ते अधिष्ठान विसरून लोक केवळ लौकिक सुखामागे लागल्याने सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरुस ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपले पाहिजे.
३) गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा हवी.
४) जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात. त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो.
५) देव सर्वव्यापी आहे असे लोक मानतात. पण जे बोलतात ते आचरणात आणत नाहीत. प्रथम आत्मबोध करावा तरच आत्मसाक्षात्कार घडून येईल.
६) साधनमार्गात अपेक्षा आणि पूर्ती महत्त्वाची असते. पण त्यासाठी विश्वास व श्रद्धा हवी. विद्वत्तेने देवाला जोखू नये. विद्वान मंडळींना शंकाच फार येतात. त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पाहावे. त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते.
७) स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे. त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला मदत, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की, लगेच राग येतो. तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो.
८) आशा, इच्छा, हव्यास, वित्त यांची हाव कधीच संपत नाही. मग त्यापोटी दु:ख-वेदना होणारच. बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच. मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसलाच पाहिजे. शरीर म्हटले की व्याधी आलीच.
९) जे आत्मदर्शन प्राप्ती करुन घेतात त्यांना जन्म-मृत्यू नसतो. ते जगद्उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात.
१०) सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ,
११) सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होते.
१२) आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो. मनुष्य जन्म असेतोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करुन घ्या. जीवनाचे सार्थक करा.’
मैं कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर।
दुनिया को समझाने आया, कर ले कुछ अपना घर।।
यहां दुनिया में कई रंग है। यह रंग निराला है।
पाया न भेद किसने, यह गहरा ही गहरा है।।
हे शब्द आहेत शंकर महाराजांचे. इ.स. १७८५ च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पती-पत्नीस बालक सापडले. श्री. व सौ. नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांनी या बालकाचे नाव शंकर ठेवले. पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले. भारत भ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतारकार्याचे स्वरूप दर्शवून दिले. सातपुड्याच्या परिसरातील दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तेथे सुपड्याबाबा म्हणून मानू लागले, तर खान्देशात कुँवरस्वामी, गौरीशंकर, गुजरातमध्ये देवियाबाबा, इस्लाममध्ये रहिमबाबा, आफ्रिकेत टोबो, तर अरबस्थानात नूर महंमदखान, मध्य भारतात लहरीबाबा, दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना
मानीत.
अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरू मानत. ते भक्तांना स्वामीसेवा जप करावयास लावत. सोलापूर येथील शुभराय मठ, त्र्यंबकेश्वर येथील रामभाऊ ऊर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर, अहमदनगर येथील डॉ. धनेश्वर, नारायणराव राजहंस (बालगंधर्व), प्रल्हाद केशव अत्रे, अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले. त्या भक्तपरिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. महाराजांच्या शब्दांत- माझी जात, धर्म, पंथ कोणता? हे शोधू नका. माझ्या बाह्यरूपाला पाहून तर्क-वितर्क करू नका. सर्वांशी प्रेमाने वागा. सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात, अशी शिकवण त्यांची भक्तांसाठी असे. महाराजांनी भक्तांचे गर्वहरण करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले. परंतु सगळ्यांनी त्याच्या नादी लागू नये, असेही स्पष्ट केले.
भक्तांना संकटातून सोडवून ज्ञानमार्ग दाखविणारे पूज्य शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी २६ एप्रिल १९४७ रोजी पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना त्या-त्या भागात दर्शन दिले तिथे आता मंदिरे आहेत व सर्व ठिकाणी वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. आजही भक्तांना दृष्टांत देणारे व हाकेस धावणारे श्री शंकर महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव आज रोजी साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर असून, हे स्थान लाखो भक्तांचे श्रध्दा स्थान आहे.
सदगुरू शंकर महाराजम्हणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही. श्री स्वामी समर्थ हा माझ्या गुरुचा जप आहे. त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते. जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है! हे त्यांचे वचन. स्वामी समर्थांना सदगुरु शंकर महाराज “मालक ” म्हणत असत.
सदगुरू श्री शंकर महाराज म्हणायचे,’ त्या उदबत्तीच्या किंवा सिगारेटच्या धुरातून मी त्र्यलोक्यही भटकून येतो, धुराच्या लहरी तरंगत विश्वभर संचार करीत असतात. श्री शंकर महाराज विश्वभर संचार करत असतात. आज देशात सर्वत्र आणि विदेशातही कित्येक भक्त साधक श्री शंकर महाराजांचं प्रत्यक्ष्य अनुभव दर्शन घेत असतात सिगरेटचा धूर किवा सुगंध अनुभवत असतात.’ मी तुमच्या बरोबर चोवीस तास आहे या त्यांच्या वचनाचा ते अनुभव देत असतात. आपली श्रद्धा आपला भाव महत्वाचा.
कर्नाटकातील हिप्परगी गावातील श्री भागवत यांनी शंकर महाराजांचे चरित्र लिहिले. सत्यनारायणाची पूजा घालून महाराजांना प्रकाशनाला बोलविले. शंकर महाराजांनी चरित्राची सर्व पाने सत्यनारायणाचा प्रसाद बांधून संपवली. श्री भागवत नाराज झाले तेव्हा महाराज म्हणाले “जेव्हा दासबोध ज्ञानेश्वरी कमी पडेल तेव्हा माझे चरित्र लिहून काढ ” माणसाने आपले धर्मग्रंथ वाचले तर तो सुखी होईल म्हणून महाराज गावोगाव उत्सव सण प्रवचने कीर्तने पारायणे करीत.
महाराज कमी बोलून कित्येक वेळा अधिक काम करीत. भक्त संकट मुक्त कसा होईल हा एकमेव ध्यास घेवून शंकर महाराजांनी आपली जीवनयात्रा पूर्ण केली. ढोंगी बुवांना सरळ केले. महिलेची छेड काढणाऱ्या गुंडाला चाबकाने फोडले. नाठाळांचे कर्दनकाळ झाले. भक्ती संगीताच्या तालावर नाचले. भजनात दंग झाले. महाराज भक्ती मार्गावरील एक महान तेजस्वी तारा होऊन गेले. त्यांच्या महान उपदेशाने व कार्याने आज अनेक भक्त प्रेरित झले आहेत. “आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी” या अभंगाच्या ओळी त्याच्या कार्याला समर्पक आहेत.
शंकर महाराज समाधीस्थान, एक अद्भुत व अनोखा प्रासादिक स्थान
पुण्यातील स्वारगेटकडून कात्रज कड़े जाताना रस्त्यावर, स्वारगेट पासून दोन अडीच किलोमीटर वर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरू श्री शंकर महाराजांचा मठ!
शंकर महाराजांनी बापू नावाच्या भक्ताला पर्वतीवर गुरुचरित्राचे उलटे पारायण अष्टमी पासून सुरु करायला सांगितले. सप्तमीला एक कप चहा घेतला. एका खोलीत छोटी गादी घातली .एक तक्या ठेवला आंघोळ करून त्या खोलीत जाताना सांगितले दार लावून घ्या. मी कोणाला भेटणार नाही. मला बोलायचे नाही. कोणी आले तरी दर उघडू नका. सकाळी ठीक १० वाजता महाराज खोलीत गेले. ढेकणे मामीनी दार लावून घेतले. दाराजवळ दोघे पहारा देत होते. रात्रभर ढेकणे मामा मामी घोंगडीवर बसून होते. पहाटे आतून आवाज आला. माझी आत्मज्योत आता अनंतात विलीन होत आहे. पुढील सोय करा.
महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील. आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात . ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या श ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीज तासात निर्माल्य आणले.
मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला , डॉक्टर घनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.
त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले त्यावेळी माळी महाराज म्हणाले भक्तीच्या वाटा जगाला दाखवण्यासाठीच आपण हे रूप घेतले काय ? सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधी गुफेत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. (वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे.)
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
View Comments
Jay Shankar Alk Nirjan
JAY SHANKAR MAHARAJ
Jai Shree Shankar Maharaj
जय शंकर ??
जय शंकर महाराज
NAD BHAYANKAR JAY SHREE SHANKAR