लेख

परशुराम

परशुराम

परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. त्यांचा जन्म जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी वैशाख शुक्ल तृतीयेला (अक्षय्य तृतीयेला) झाला. जन्माने ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण त्यांच्यात होते, म्हणूनच त्यांना “शरादपि शापादपि” असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले.

त्यानंतर त्यांचा उल्लेख, रामायणात सीता स्वयंवरात येतो. तेथे त्यांनी शिवधनुष्य तोडणाऱ्या रामाला आव्हान दिले. मात्र राग शांत झाल्यावर त्यांनी रामाला आपल्याकडील धनुष्य भेट दिले व विद्या दिली. त्यांनी महाभारत काळी, भीष्मांना त्या सगळ्या विद्या दिल्या. नंतर अंबेच्या याचनेवरून त्यांनी भीष्मांशी युद्ध केले. भीष्म हरले पण तरीही त्यांनी अंबेशी लग्न करण्यास नकार दिला.

शरादपि शापादपि

अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।

अर्थः चार वेद मुखोद्गत आहेत (संपूर्ण ज्ञान) आणि पाठीवर बाणासह धनुष्य आहे (शौर्य) – म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोन्ही असल्याने शाप अणि शस्त्र अशा दोन्ही गोष्टींचा उपयोग जो जाणतो [तो परशुराम].

कार्य

अधम अशा क्षत्रियांचा वध : `वाल्मीकीने त्याला `क्षत्रविमर्दन’ न म्हणता `राजविमर्दन’ म्हटले आहे. यावरून असे म्हणता येते की, परशुरामाने सरसकट क्षत्रियांचा संहार न करता, दुष्ट-दुर्जन अशा क्षत्रीय राजांचा संहार केला.’
कार्तवीर्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमातून कामधेनू व तिचे वासरू पळवून नेले. त्या वेळी परशुराम तिथे नव्हता. परत आल्यावर त्याला हे कळताच त्याने कार्तवीर्याच्या वधाची प्रतिज्ञा केली. नर्मदेच्या तीरी त्या दोघांत द्वंद्वयुद्ध झाले. त्यात परशुरामाने त्याला ठार मारले. यानंतर आपले पिता जमदग्नी यांच्या आज्ञेप्रमाणे तो तीर्थयात्रा व तपश्चर्या करण्यासाठी गेला.
परशुराम गेल्यावर कार्तवीर्याच्या वधाचा सूड घेण्यासाठी हैहयांनी जमदग्नीऋषींचे शिर धडावेगळे करून त्यांची हत्या केली. हा वृत्तान्त समजल्यावर परशुराम लगेच आश्रमात पोहोचला. जमदग्नींच्या शरिरावरील एकवीस जखमा पाहून त्याने तत्क्षणी प्रतिज्ञा केली की, `हैहय व इतर क्षत्रियाधमांनी केलेल्या या ब्रह्महत्येबद्दल शिक्षा म्हणून एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रीय करीन.’ या प्रतिज्ञेप्रमाणे त्याने उन्मत्त झालेल्या क्षत्रियांचा नाश करावा, युद्ध संपल्यावर महेंद्र पर्वतावर जावे, क्षत्रीय माजले की, पुन्हा त्यांचा नाश करावा, अशा एकवीस मोहिमा केल्या. समंतपंचकावर शेवटचे युद्ध करून त्याने आपला रक्‍ताने माखलेला परशू धुतला व शस्त्र खाली ठेवले.

क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित करणे : परशुरामाने २१ वेळा पृथ्वी-प्रदक्षिणा करतांना १०८ शक्‍तीपीठांची, तीर्थक्षेत्रांची, म्हणजेच क्षेत्रपालदेवतांची स्थाने प्रस्थापित केली.

 

https://www.hindujagruti.org/