varkari sampradaya information in marathi
वारकरी संप्रदाय म्हणजे काय
वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा भक्तीसंप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सांस्कृतिक केंद्र आहे.
या संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्रीपुरुषांना खुले आहे. त्यात उच्चनीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. ब्राह्मणांपासून हरिजनापर्यंत सर्वांना सारखेच स्थान त्यात आहे. वारकरी संप्रदायाने शास्त्र प्रामाण्याला व जातिव्यवस्थेला धक्का न लावता स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले. बाह्य परिस्थीती ही पूर्व कर्मानुसार प्राप्त होते; त्यात आपण बदल करु शकत नाही. पण भक्ती पंथाच्या सहाय्याने अध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापांचिक दु:खावर मात करता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्यात निर्माण केला. लौकिक जीवनात आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये यथासांग पार पाडूनच वारकरी भक्तीमध्ये लीन होताना दिसतात.
वारकरी संप्रदायात विठ्ठल भक्तीचा महीमा विशेष असला तरी राम, कृष्ण, दत्त, विष्णू, शिव इत्यादी देवतांच्या भक्तांना त्यांनी आपल्यात सामावून घेतले. विष्णू व शिव यांच्या ऐक्यावर भर दिला.
स्वत: ज्ञानेश्वर महाराज गुरु परंपरेने नाथपंथीय होते; तेव्हा त्यांच्या विचारसरणीवर नाथपंथातील तत्त्वज्ञानाचा ठसा आहे. तसेच शांकरवेदान्त व काश्मिरी शैवमत यांचे ही संस्कार त्यांच्यावर होते. त्यामुळे शैवांची निष्ठा व तपश्चर्या त्यांनी स्वीकारली. वैष्णव संप्रदायातील सात्विकता, दयाशीलता, विश्वबंधुत्व इत्यादी गुण उचलले. उत्तर दक्षिण दिशांनी आलेल्या सार्या प्रवाहांना सामावून घेणारा असा हा वारकरी संप्रदाय आहे.
वारकरी संप्रदायात व्रत वैकल्याचे स्तोम नाही, कर्मठपणा नाही. तर त्याग, भोग, स्वधर्माचरण व नैष्कर्म्य यांचा मेळ घालण्याचा उपदेश आहे. अद्वैत, भक्ती, ज्ञान, उपासना, श्रद्धा व विवेक यांच्या एकात्मतेवर त्यांनी भर दिला.वारकरी संतांची वृत्ती नेहमीच लोकाभिमुख होती. रात्रंदिवस लोकांत राहून बहुजन समाजात नवचैतन्य ओतण्याचा सफल प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला. वारकरी पंथाने ज्ञानाचे महत्त्व मान्य करुन भक्तीला अग्रस्थान दिले व त्यासाठी नामसकीर्तना सारखे सोपे साधन लोकांपुढे ठेवले. परमार्थासाठी प्रपंच सोडून अरण्यात जाण्याची व व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची आवश्यकता नाही हे वारकरी संप्रदायाने दाखवून दिले.
व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व समाजिक नितीमत्तेला पोषक अशी कर्मे करावीत; असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला आहे.एकनाथ महाराज, चोखामेळा, गोरा कुंभार, सावता माळी हे सर्व वारकरी संत गृहस्थाश्रमी व कुटुंबवत्सल होते. आपापले व्यवसाय ते निर्वेधपणे करत व लोकांत मिसळत होते.वारकरी संप्रदायाने स्त्री व शूद्रांतील जडत्व नाहीसे करुन त्यांच्या जीवनात कार्य प्रवर्तक निष्ठा उत्पन्न केली. त्यांच्या नीरस अशा जीवनात अध्यात्मज्ञानाची जोड मिळवून दिली. त्यामुळे आपल्यातील सुप्त शक्तींची व भावनांची जाणीव त्यांना झाली.
प्राप्त परिस्थितीला कण़खरपणे सामोरे जाण्याच सामर्थ्य त्यांच्या मनात निर्माण झाले. मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर अवलंबून नसून वैयक्तिक चारित्र्यावर आहे ही गोष्ट वारकरी संप्रदायाने लोकांना पटवून दिली.वारकरी पंथाने विद्वत्तेचे अवडंबर माजवले नाही. निस्सीम भक्ती हाच या संप्रदायाचा आधार आहे. पण अंधभक्तीला मात्र त्यांनी थारा दिला नाही. किर्तन, अभंग, गौळणी, ओव्या, भारुडे इत्यादी सुलभ साधनांनी त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहचविले. आत्मशुद्धी व सदाचार यावर वारकरी पंथाने भर दिला. निष्ठा, त्याग, धैर्य, सहिष्णूता, उदारता इत्यादी गोष्टींनी त्यांनी लोकांची मने जिकून घेतली. स्त्री व शूद्रांनाही या संप्रदायाने धर्म मंदिरात स्थान दिले.
वारकरी संप्रदायाने(varkari sampradaya) मराठीचा अभिमान बाळगला. संस्कृतची कास धरली नाही. बोली भाषेला वाड्मयीन प्रतिष्ठा मिळवून दिली. महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी प्रथम मराठीत लेखन केले ते वारकरी संप्रदायातील संतानी. देशभाषेत लिहिलेली ९ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी वारकरी पंथाला पायाभूत आहे. ती वाचायला सोपी, विस्तृत व स्फूर्तिदायक आहे. श्री एकनाथी भागवत, तुकारामाची गाथा या सारखे ग्रंथलेखन वारकरी संतांनी केले. हे तीन ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची ‘प्रस्थानत्रयी’ होय. वारकरी संप्रदायातील या लेखकांनी लोकांची आवड निवड बरोबर ओळखली. आपल्या संप्रदायाच्या प्रचाराला नवे तंत्र वापरले. फुगड्या, पिंगा, भारुडे, गौळणी अभंग, ओव्या, किर्तने अशा एक ना अनेक प्रकारांनी आपले विचार त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवले.
नामदेव हे वारकरी संप्रदायाचे(varkari sampradaya) प्रचारक होते. नामसंकिर्तनाच्या तंद्रीत देहभान हरपून चंद्रभागेच्या वाळवंटात ते नाचू लागत. एकनाथ, तुकाराम, ज्ञानेश्वर हे सारेच वारकरी संत बहुजन समाजाशी समरस झाले व लोकांना रुचेल, समजेल अशा तर्हेचे लेखन त्यांनी केले. म्हणून त्यांच्या वाड्मयाला लोकप्रियता लाभली. निरुपणे, किर्तने यातून लोकात आत्मीयता व आत्मविश्वास निर्माण झाला. मग लोकांमधूनच अनेक धर्मप्रवक्ते, प्रचारक, कीर्तनकार निर्माण झाले. अध्यात्मविद्या केवळ ब्राह्मणांपुरताच मर्यादित राहिली नाही. जनाबाईसारखी मोलकरीणही अध्यात्माचे सिद्धांत अभंगात गाऊ लागली. आणि ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वहावा भार माथा | असे तुकारामांसारखा कुणबीही आत्मविश्वासाने म्हणू लागला.
(varkari sampradaya)वारकरी संप्रदायात प्रवेश करण्याची पद्धत एकदम सोपी आहे. ज्याला वारकरी व्हायचे आहे. त्याने संप्रदायातील जेष्ठाकडे तुळशीमाळघेऊन जायचे. तेथे गेल्यावर ती तुळशीमाळ ज्ञानदेवी, एकनाथी भागवत किंवा तुकाराम गाथा यापैकी कोणत्याही एका ग्रंथावर ठेवली जाते. आणि मग तीच माळ त्या वारकरी होण्याची इच्छा धरणार्याच्या गळ्यात घातली जाते. म्हणून त्यांना ‘माळकरी’ असेही म्हणतात. ही तुळशीमाला तुळस या वनस्पतीच्या वाळलेल्या लाकडापासून मणी बनवून केलेली असते. त्यात सामान्य: २७, ५४, १०८ या संख्येने मणी असतात. नामजपासाठी तिचा वापर केला जातो.
(varkari sampradaya)वारकरी उपासनेचे दुसरे साधन म्हणजे बुक्का. पूजेच्या वेळी हा बुक्का देवाला वाहिला जातो. प्रत्येक वारकर्याच्या कपाळावर बुक्का असतो. हा बुक्का दोन प्रकारचा असतो. कोळश्याची पूड, चंदनपूड, नागरमोथ्याची पावडर, बकुल फुल, दवणा, मरवा आदि वस्तूंपासून काळा बुक्का तयार करतात तर कापूर, चंदन, दवणा, नाचणी, देवदार, लवंग, वेलची इत्यादी वस्तुंपासून पांढरा बुक्का तयार करतात.
(varkari sampradaya)वारकरी उपासनेचे तिसरे साधन म्हणजे गोपीचंदन. ही एक प्रकारची मुलतानी माती असते. त्वचेचे उष्ण्तेपासून रक्षण करण्यासाठी ती वापरतात. ज्या ज्या ठिकाणी बुक्का लावला जातो त्या त्या ठिकाणी गोपीचंदनाचे ठसे उमटवण्याची प्रथा वारकरी संप्रदायात आहे.
(varkari sampradaya)वारकरी संप्रदायाचे चौथे साधन म्हणजे पताका. गेरुच्या रंगात बुडवून तयार केलेले, जाड्याभरड्या कापडाचे, विशिष्ट आकाराचे ते निशाण असते. वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत श्रीविठ्ठल. हे श्री कृष्णाचे रुप आहे. ‘रामकृष्ण हरी‘ हा वारकर्यांचा महामंत्र, तर “पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्रीगुरु ज्ञानदेव तुकाराम” हे वारकरी संप्रदायाचे घोषवाक्य आहे.
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
View Comments
I Am Namdev Shimpu.
excellent ?
khup chaan mahiti dili????