हिंदू धर्मामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तीभावाने केले जाते. या दिवशी भगवान विष्णुंची पूजा केली जाते. प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील 11 व्या तिथीला एकादशी म्हटले जाते. ‘एकादशी’ ही विष्णूची तिथी असून या दिवशी विष्णु भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. एकादशीच्या दुसर्या दिवशी उपवास सोडला जातो. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्लपक्षातील एकादशीला ‘मोक्षदा एकादशी‘ तसेच ‘मोक्षदायिनी एकादशी’ साजरी केली जाते. या दिवशी पितरांना मोक्ष देणारी एकादशी, असे म्हटले जाते. जो व्यक्ती हे व्रत करील त्याच्या पितरांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडले जातील. यावर्षी 8 डिसेंबरला ‘मोक्षदा एकादशी’ साजरी केली जाणार आहे. यादिवशी उपवास केल्याने पुण्य प्राप्ती होते.
कथा आणि महत्त्व – मोक्षदा एकादशी
महाभारत युद्ध सुरू असताना अर्जुन मोहग्रस्त झाला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने गीतेचा उपदेश देऊन अर्जुनला त्या मोहातून बाहेर काढले होते. त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची शुक्ल पक्षाची एकादशी होती. तेव्हापासून या एकादशीला ‘मोक्षदा एकादशी’ म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्यामुळे मोक्षाची प्राप्ती होते. त्यामुळे वारकरी संप्रादयात ही एकादशी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या दिवशी असा करा पूजाविधी – मोक्षदा एकादशी
या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावी. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीचे किंवा फोटोचे पुजन करावे. श्रीकृष्णाच्या मुर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा. देवाला खडिसाखरेचा नैवैद्य दाखवा. या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा काही फळे खाऊनदेखील तुम्ही हे व्रत करू शकता. हे व्रत केल्याने दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाची पूजा करावी आणि ब्राह्मणांना अन्नदान करावे. हिंदू धर्मात एकादशीचे व्रताचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मासात 2 याप्रमाणे वर्षामध्ये 24 एकादशी येतात. यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा, मोहिनी, निर्जला, शयनी, पुत्रदा, परिवर्तिनी, पाशांकुशा, प्रबोधिनी, मोक्षदा, प्रजावर्धिनी, जयदा व आमलकी यांचा समावेश होतो. तसेच कृष्ण पक्षात पापमोचनी, वरुधिनी, अपरा, योगिनी, कामिका, अजा, इंदिरा, रमा, फलदा, सफला, षट्तिला व विजया या एकादशींचा समावेश होतो.
ref:- marathi.latestly.com