Categories: लेख

गुरुपौर्णिमा उत्सव श्रीक्षेत्र गोंदवले

गुरुपौर्णिमा उत्सव श्रीक्षेत्र गोंदवले

द्गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्याचा पर्वकाळ.प्रापंचिक जीवनासाठी लागणारी विद्या जिच्या माध्यमातून उपजीविका साध्य होते ती विद्या देणारे गुरु आणि मानवी जीवनाचे मुख्य ध्येय साध्य करून भगवद भक्ती करत जीवाचा उद्धार करून घेण्यासाठी लागणारी पारमार्थिक विद्या देणारे ते सद्गुरु. गुरु आणि सद्गुरु दोन्हींचे स्थान मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीक्षेत्र गोंदवले येथे सात दिवसांचा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होतो .खूप सुंदर भव्य असा सोहळा यात सहभागी होण्याचा आनंद शब्दात व्यक्त होऊ शकत नाही असा. सात दिवसांमध्ये समाधी मंदिरातील नित्योपचार सुरू असतात.

त्याचबरोबर सद्गुरूंच्या चरित्र ग्रंथाचा पारायण सोहळा होतो. दोन अखंड जपमाळा सात दिवस सुरू असतात. एक जपमाळ पुरुष मंडळींकडून 24 तासासाठी सुरू असते आणि एक जपमाळ महिला मंडळाकडून बारा तासांसाठी सुरू असते.” श्रीराम जय राम जय जय राम ” या मंत्राचा जप या माळेच्या साह्याने केला जातो. दोन टाळ जोड्या नित्य चोवीस तास सुरू असतात. या दोन्ही ठिकाणी पुरुष मंडळींकडून टाळाची ही सेवा केली जाते .अत्यंत सुमधुर अशा मंद स्वरामध्ये हे टाळ वाजवून त्या टाळांच्या नादावरती “श्रीराम जय राम जय जय राम” हा मंत्र म्हटला जातो.

जपमाळेची आणि टाळांची सेवा करण्यासाठी आधीच नाव नोंदणी करून घेतली जाते. प्रत्येकाला नाव नोंदणी प्रमाणे एक एक तासाची ही सेवा दिली जाते .आपल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून ही सेवा या सेवेकऱ्यांकडून पूर्ण केली जाते. सेवेसाठी वृद्ध मंडळींप्रमाणेच तरुण वर्ग सुद्धा खूप उत्साहाने यामध्ये सहभागी होतो. समाधी मंदिरातील वातावरण अत्यंत शांत समाधान देणारं असं असतं. समाधीला रुद्राभिषेक सुरू असतो .

समाधी वरती अभिषेक पात्रातून दुधाची ती नाजूकशी धार श्रींच्या पावलांवरती समर्पित होत असते. पावलांवर सर्वत्र हे दूध जेव्हा अभिषिक्त होतं तेव्हा शंभू महादेवाच्या पिंडीप्रमाणे निळसर झाक त्या दुधावरती आलेली अनुभवास येते. रुद्राभिषेकानंतर समाधीची आरती होते. एका बाजूला अनुग्रह देण्याची सेवा सुरू असते. तर एका बाजूला सद्गुरूंच्या चरित्र ग्रंथाचे पारायण सुरू असते. बारा वाजेपर्यंत पारायण पूर्ण झाल्यानंतर श्रींना महानैवेद्य दाखवून आरती होते.

यानंतर सर्वांना महाप्रसाद दिला जातो .समाधी मंदिरातील नित्याची उपासना या काळात सुरू असते. काकड्यापासून तर रात्रीच्या पंचपदी भजनाची सर्व सेवा सेवेकरी करत असतात. उत्सवाच्या या काळात फक्त शेजारती मात्र सात दिवस होत नाही. सद्गुरु अखंड नामामध्ये जागृत असतात आणि सद्गुरूंच्या सोबतीने आपणही तिथे जेव्हा नाम घेतो तेव्हा ती अनुभूती काही औरच असते .ती शब्दात सांगता येत नाही. तो अनुभवच घ्यावा लागतो. याच काळात श्रींची पालखी पंढरपुराकडे मार्गस्थ झालेले असते .सद्गुरूंच्या पादुका पालखीत घेऊन शिष्यमंडळी आषाढी वारीला निघालेली असतात. वारीचा हा सोहळा मजल तर मजल करत सातव्या दिवशी पंढरपुरास पोहोचतो. पंढरपूरच्या या पायी प्रवासात सुद्धा गोंदवल्याच्या समाधी मंदिरात श्रीना होणारे जे नित्य उपचार आहेत ते नित्य उपचार श्रींच्या पादुकांना या पालखी सोहळ्यात होत असतात.

आषाढी वारीचा सोहळा संपन्न करून सद्गुरूंची पालखी पौर्णिमेच्या आधी गोंदवल्यास येते आणि मग गुरुपौर्णिमे दिवशी या साऱ्या उत्सवाचा आनंद अगदी शिजेला पोहोचलेला असतो .या साऱ्या सोहळ्याचा तो कळसा अध्याय म्हणावा असा तो गुरुपौर्णिमेचा दिवस. मंदिरास खूप सुंदर सजावट केलेली असते.अगदी मध्यरात्री पासूनच शिष्यमंडळी समाधी मंदिराच्या दर्शनासाठी शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत उभी असतात. सकाळपासून तर रात्रीपर्यंत अखंडपणे अन्नदानाची महाप्रसादाची सेवा सुरू असते. समाधी मंदिरातली सेवा असो की अन्नछत्रातील सेवा असो किंवा समाधी मंदिर परिसरातील इतर कोणत्या सेवा असो सर्व शिष्य मंडळी अगदी शांततेने आपापली सेवा पार पाडत असतात.

हजारोंचा समुदाय उपस्थित असतो परंतु कोठेही गडबड गोंधळ आवाज असा प्रकार नसतो. अत्यंत स्वच्छता अत्यंत शांतता ही बाप खूप लक्षणीय आहे. हा सर्व सोहळा अनुभवत असताना मनामध्ये विचार येतो बाल मवयात श्रीनी गोंदवल्यातून सद्गुरु भेटीसाठी प्रस्थान ठेवलं आणि कित्येक वर्ष श्रींचा हा सद्गुरु शोध सुरू होता. अक्कलकोटचे स्वामी महाराज हुमनाबादचे माणिक प्रभू आणि अनेक अशा थोर संत मंडळींच्या भेटी घेत त्यांच्याकडे गुरुउपदेशासाठी विनंती करत फिरणारे ते बाल रूपातील सद्गुरु आठवले की मन अगदी भरून येत.

सद्गुरु भेटीची त्यांची ही तळमळ तुकामाईंच्या भेटीनंतर पूर्ण झाली. तुकामाईंनी विविध प्रकारे श्रीनची परीक्षा घेतल्यानंतर श्रींना रामनाम दिले. श्रींनी मनापासून त्या रावनामाची सेवा केली. त्यांनी स्वतः ते राम नाम सिद्ध केलं आणि सिद्ध झालेलं हे राम राम त्यांनी आपल्या लाखो लाखो-शिषांच्या हृदयामध्ये स्थापित केलं. ज्यांनी श्रींनी दिलेलं हे राम नाम मनापासून घेतलं त्या प्रत्येक शिष्याला त्या रामरामाची गोडी चाखण्याचा अमृतानुभव मिळाला, श्रींनी घेतलेलं हे राम नाम आणि त्यांच्या शिष्यांनी घेतलेलं हे राम नाम आज संपूर्ण भारतभर विविध मंदिरांच्या रूपाने स्थापित झालेलं पाहायला मिळत.

रामाची मंदिरे विठ्ठलाची मंदिरे श्रींच्या भक्तांनी स्थापन केली आहेत. या मंदिरांमध्ये अखंडपणे रामनामाची सेवा होते आहे. सद्गुरु काय असतात आणि सद्गुरूंनी दिलेल्या या नामाची सत्ता अखंडितपणे कशी सुरू असते याचं एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे श्रीक्षेत्र गोंदवले.


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या