विठोबाची आरती
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।। धृ० ।।
तुळसीमाळा गळा कर ठेवुनी कटी ।
कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरुड हनुमंत पुढे उभे रहाती ।। २ ।।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
– संत नामदेव
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ।। १ ।।
विठ्ठल अठ्ठावीस युगांपासून पंढरपूरला विटेवर उभा आहे ।
(त्याच्या) वामांगी (डावीकडे) रखुमाई (रुक्मिणी) (उभी असून) दिसे दिव्य शोभा (त्याचे रूप अत्यंत शोभायमान आहे) ।
परब्रह्म (विठ्ठल) पुंडलिकासाठी (पुंडलिकाच्या मिषाने सार्या भक्तांसाठी) पंढरीला येऊन राहिले आहे ।
त्याच्या चरणाशी भीमा (चंद्रभागा) वहात असून तीही भक्तगणांचा उद्धार करत आहे ।। १ ।।
जय देव जय देव जय पांडुरंगा ।
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।
जय देव जय देव ।। धृ० ।।
हे देवा पांडुरंगा, तुझा जयजयकार असो !
हे रखुमाई आणि राई यांच्या वल्लभा (पती), (हे) जिवलगा (प्राणाहून प्रिय असलेल्या) (मला) पाव (प्रसन्न हो, ही तुझ्या चरणी प्रार्थना !)
(देवांच्या पत्नी म्हणजे त्यांच्या शक्ती होत. या तारक आणि मारक अशा दोन प्रकारच्या असतात.
विठ्ठल हा उत्पत्ती, स्थिती आणि लय यांपैकी स्थितीचा देव असल्याने त्याच्या दोन्ही शक्ती, म्हणजे पत्नी, उत्पत्ती आणि स्थिती यांच्याशी संबंधित आहेत.) ।। धृ० ।।
विठ्ठलाने तुळशीची माळ गळ्यात घातली आहे आणि दोन्ही कर (हात) कटी (कमरेवर) ठेवलेले आहेत ।
कासे (कमरेला) पीतांबर परिधान केले असून लल्लाटी (कपाळावर) कस्तुरीचा टिळा लावला आहे ।
(विठ्ठलाच्या रूपात असलेल्या परब्रह्माच्या) भेटीकरता देव सुरवर (श्रेष्ठ देवदेवता) नित्य येत असतात ।
गरुड आणि हनुमंत नेहमी हात जोडून त्याच्यासमोर उभे असतात ।। २ ।।
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळिती राजा विठोबा सावळा ।। ३ ।।
हे अनुक्षेत्रपाळा (पंढरपूर या क्षेत्राचे पालन करणार्या विठ्ठला), धन्य वेणूनाद (तुझ्या वेणुनादाने (बासरीच्या सुरांनी) सर्व भक्तगण धन्य धन्य होतात.) ।
विठ्ठलाच्या गळ्यात सुवर्णाची कमळे आणि वनमाळा (तुळस आणि फुले यांची माळ) आहेत ।
राई रखुमाबाई राणीया सकळा (राई आणि रखुमाई यांच्यासह इतर सर्व राण्या) ।
(अशा या भक्तांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणार्या) सावळ्या विठ्ठलराजाला आरती ओवाळतात ।। ३ ।।
ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती ।
चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ।। ४ ।।
ओवाळू आरत्या (पांडुरंगाला आरती ओवाळण्यासाठी) कुर्वंड्या येती (भक्तगण कुरवंड्या, म्हणजे दिवे लावलेले लहान द्रोण घेऊन येतात) ।
आरती ओवाळून चंद्रभागेमाजी (चंद्रभागेत) सोडून देतात ।
दिंड्या पताका वैष्णव नाचती (मिरवणुकीने, पताका (ध्वज) घेऊन आलेले वैष्णव (विठ्ठलभक्त) देहभान हारपून नाचतात.) ।
या पंढरीचा महिमा किती म्हणून वर्णावा ? (तो शब्दांतून वर्णन करणे अशक्यच आहे.) ।। ४ ।।
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ति ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती ।। ५ ।।
(हे पांडुरंगा,) दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी या एकादश्यांना जे भक्तजन तुझ्या दर्शनाला पंढरपूरला येतात, चंद्रभागेत भक्तीभावाने स्नान करतात, दर्शनहेळामात्रे (तुझ्या केवळ कृपाकटाक्षाने) त्यांना मुक्ती मिळते. (एवढे त्याचे सामर्थ्य आहे, महिमा आहे !) ।
हे केशवा, तुला नामदेव भावपूर्वक (आरती) ओवाळत आहेत. (तुझी कृपा असू दे, ही तुझ्या चरणी प्रार्थना आहे !) ।। ५ ।।
श्री विठ्ठल आरती २
येई हो विठ्ठले माझे माऊली ये । निढळावरी कर ठेवुनि वाट मी पाहे ।।धृ ।।
आलिया गेलिया हाती धाडी निरोप । पंढरपूरी आहे माझा मायबाप् ।। १ ।।
पिवळा पीतांबर् कैसा गगनी झळकला । गरुडांवरि बैसोनि माझा कैवारी आला ।। २ ।।
विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी । विष्णुदास नामा जीवेभावे ओंवाळी ।। ३ ।।
-संत नामदेव
श्री विठ्ठल आरती ३
ओवाळूं ग माये विठ्ठल सबाह्य साजिरा । राईरखुमाबाई सत्यभामेच्या वरा ।। धृ ।।
कनकाचे पर्येळी उजळोनी आरती ।
रत्नदीपशोभा कैशा प्रकाशल्या ज्योती ।। ओवाळूं ।। १ ।।
मंडित चतुर्भुज कानीं शोभत कुंडले ।
श्रीमुखाची शोभा पाहतां तेज फांकले ।। ओवाळू || २ ||
वैजयंती माळ गळा शोभे स्यमंत । शङ्खचक्रगदापद्म आयुर्धे शोभत ।। ओवाळूं ||३||
सांवळा सुंदर जैसा कर्दळीचा गाभा ।
चरणीईची नूपुर वांक्या गाजती नभा ।। ओवाळू ॥ ४ ॥
ओवाळीता मन माझें ठाकलें ठायी। समाधिस्थसमान तुकया लागला पायी ।। ओवाळूं ॥५॥
-संत नामदेव
श्री विठ्ठल आरती ४
आरती अनंतभुजा । विठो पंढरीराजा ।। न चलती उपचार। मनें सारिली पूजा ।। धृ ॥
परेस पार नाहीं । न पडे निगमा ठायीं ।। भुलला भक्तिभावें । लाहो घेतला देहीं ।। आरती ।। १ ।।
अनिर्वाच्या शुद्ध बुद्ध । उभा राहिला नीट ।। रामाजनार्दनीं । पाय जोडिली वीट ।। आरती ।। २ ।।
विठोबाची आरती