श्री रामचंद्रांची आरती

श्री रामचंद्रांची आरती

श्री रामचंद्रांची आरती १

उत्कट साधुनि शिळा सेतु बांधोनी ।
लिंगदेह लंकापुर विध्वंसूनी ।।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥

जय देव जय देव निजबोधा रामा
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ॥

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।।
मारिला जंबूमाळी भुवनी त्राहाटीला ।
आनंदाची गुढी घेऊनियां आला ॥ जय ॥ २ ॥

निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणूनि येणें झालें अयोध्ये रघुनाथा ।।
आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊन आली कौसल्या माता ।। जय ।। ३ ।।

अनाहतध्वनी गर्जती अपार ।
अठरा परों वानर करिती भुभुःकार ।।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ॥॥ जय ।। ४ ।।

सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।
सोऽहंभावें तया पूजा उपचार ।।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासा स्वामी आठव ना विसर ।।
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। ५।।


श्रीरामचंद्रांची आरती २

त्रिभुवनमंडित माळ गळां ।
आरति ओवाळू पाहूं ब्रह्मपुतळा ।। १ ।।

श्रीराम जयराम जयजय राम ।
आरति ओंवाळूं पाहूं सुंदर मेघश्याम ।। धृ ।।

ठकाराचे ठाण वारीं धनुष्य बाण ।
मारुती सन्मुख उभा कर जोडून ॥ २ ॥

भरतशत्रुघ्न दोघे चामर ढाळिती ।
स्वर्गाहून देव पुष्पवृष्टी करीती ॥ ३॥

रत्नजडित हार वर्णू काय मुकुटी ।
आरती ओवाळू चौदा भुवनांच्या कोटी ॥ ४॥

विष्णुदास नामा म्हणे मागतो तूतें ।
आरती ओवाळूं पाहूं सीतापतीतें ॥ ५॥


श्री रामचंद्रांची आरती ३

स्वस्वरूपोन्मुबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमानें दशग्रीवें हरिली ।
सद्विवेकमारूतिनें तच्छुद्धि आणिली ।
तव चरणांबुजि येऊनि वार्ता श्रुत कली ।। १ ।।

जय देव जय देव जय निजबोधा रामा ।
परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ।। धृ ।।

उत्कट साधुनि शिळा सेतु बान्धोनि कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
लिंगदेहलंकापुरी विद्धवंसोनी ।
देह अहंभाव रावण निवटोनि ॥ जय || २||

प्रथम सीताशोधी हनुमन्त गेला ।
लंकादहन करूनी सखया मारीला ।
वधिला जंबूमाळी भुवनी त्राहटीला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ॥ जय ।। ३

निजबळें निजशक्ती सोडविली सीता ।
म्हणुनी येणें झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनि आली कौसल्या माता ।। जय ।। ४ ।।

अनुहत वाजिंत्रध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथ कुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर || जय ||५||

सहज सिंहासनी राजा रघुवीर ।
सोहंभावें तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदासस्वामी आठव ना विसर || जय ||६||


श्री रामचंद्रांची आरती ४

रत्नांची कुंडलें माला सुविराजे ।
झळझळ गंडस्थळ घननीळ तनू साजे ।
घंटा किंकिणि अंबर अभिनव गति साजे ।
अंदु वांकी तोडर नुपुर ब्रीद गाजे ।। १ ।।

जय देव जय देव जय रघुवर ईशा ।
आरती निर्जरवर ईशा जगदीशा ।। धृ ।।

राजिव लोचन मोचन सुरवर नरनारी ।
परातपर अभयंकर शंकर वरधारी ।
भूषणमंडित उभा त्रिदश कैवारी
दासा मंडण खंडण भवभय अपहारी ।। जय देव || २ ||


श्री रामचंद्रांची आरती ५

काय करूं गे माय आतां कवणा ओंवाळूं ।
जिकडे पाहे तिकडे राजाराम कृपाळू ।। धृ ।।

ओंवाळू गे माय निजमूर्ति रामा ।
रामरूपी दुजेपणा न दिसे आम्हा ।। १ ।।

सुरवर नर वानर अवघा राम सकल ।
दैत्य निशाचर तेही राम केवळ || २ ||

त्रैलोक्यस्वरूपें राम संचारला ए
सद्गुरुकृपें केशवराजी आनंद देख ।। ३ ।।

श्री रामचंद्रांची आरती समाप्त.

श्री रामचंद्रांची आरती

2 thoughts on “श्री रामचंद्रांची आरती”

  1. जय श्री स्वामी समर्थ रामदास- –
    संत साहित्य हा आपण प्रसिद्ध केला त्यामुळे कित्येकांना खूप फायदा होईल.आपल्या संपूर्ण व्यवस्थापनाला धन्यवाद!मी आपला आभारी आहे!
    आपला संतचरणदास बबन हरि पोखरक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *