आरती

श्रीकृष्णाची आरती

श्रीकृष्णाची आरती ऑडियो आणि वीडियो सहित



ओवाळूं आरती मदनगोपाळा ।

श्यामसुंदर गळां वैजयंतीमाळा ।। धृ० ।।

चरणकमल ज्याचें अति सुकुमार ।

ध्वजवज्रांकुश  ब्रीदाचा तोडर ।। १ ।।

नाभिकमळ ज्याचें ब्रह्मयाचें स्थान ।

हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।। २ ।।

मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी ।

वेधले मानस हारपली दृष्टी ।। ३ ।।

जडितमुगुट ज्याचा दैदीप्यमान ।

तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ।। ४ ।।

एका जनार्दनीं देखियेलें रूप ।

पाहतां अवघें झाले तद्रूप ।। ५ ।।

संत एकनाथ

श्रीकृष्णाच्या आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ

आरत्यांचा अर्थ काही वेळा समजण्यास कठीण असतो. अर्थ समजून घेऊन आरती म्हटल्यास भाववृद्धी लवकर होण्यास मदत होते. यासाठी प्रथम समजून घेऊया, श्रीकृष्णाच्या आरतीमधील कठीण शब्दांचा भावार्थ.

१. ‘ध्वजवज्रांकुश ब्रीदाचा तोडर ।’ म्हणजे चरणांवर सामुद्रिकशास्त्रानुसार ध्वज, वज्र आणि अंकुश दर्शविणार्‍या रेखा शुभचिन्ह असून, पायातले तोडे भक्तवात्सल्याचे जणू ब्रीद सांगत आहेत.

२. ‘ह्रदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ।’ यातील ‘श्रीवत्सलांछन’ या शब्दाचा भावार्थ आहे, भक्तवत्सलता. श्रीविष्णूच्या ह्रदयातील त्याच्या भक्तांबद्दलचे वात्सल्य पदकाप्रमाणे शोभून दिसते.

अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद आपणास मिळो, अशी श्रीकृष्णाचरणी प्रार्थना आहे.


श्रीकृष्णाची आरती २

हरि चला मंदिरा ऐशा म्हणती गोपिका म्हणती राधिका । भावें ओवाळिती यदुकुलतिलका ।। धृ ।।

एकीकडे राई एकीकडे रखुमाई ।भावे ओवाळिता हरिसी तूं होसी दो ठाई ।। हरि ।। १ ।।

अष्टाधिक सोळा सहस्र ज्याच्या सुंदरा ज्याच्या सुंदरा । जिणे जिणें प्रार्थिलें जासी तियेच्या घरा ॥ हरि ।। २ ।।

एका जनार्दनी हरी तूं लाघवी होसी । इतक्याही भोगुनी ब्रह्मचारी म्हणवीसी ।। हरि ॥ ३ ॥


श्रीकृष्णाची आरती ३

अवतार गोकुळी हो । जन तारावयासी । लावण्यरुपडे हो । तेजःपुंजाळ राशी ।

उगवले कोटिबिंब। रवि लोपला शशी ।

उत्साह सुरवरां । महाथोर मानसी ।। १ ।।

जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाई कांता ।

आरती ओवाळीन । तुम्हा देवकीसुता ।। धृ ॥

कौतुक पहावया । भाव ब्रह्मयाने केली ।

वसेंही चोरूनिया गोपाल गाईवसें। दोन्ही ठाई। सत्यलोकासी नेलींरक्षिली ।।

सुखाचा प्रेमसिंधू । अनाथांची माऊली ॥ २॥

चोरितां गोधनें हो। इन्द्र कोपला भारी । मेघ कडाडिला । शिला वर्षल्या धारी ।

रक्षिले गोकुळ हो। नखीं धरिला गिरी ।निर्भय लोकपाळ अवतरला हरी ॥३॥

वसुदेव देवकीचे । बंद फोडिली शाळ । होऊनिया विश्वजनिता । तया पोटिंचा बाल ।

दैत्य हे त्रासियेले । समुळ कंसासी काळ । राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ४।।

तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून । पांडवा साहाकारी । अडलिया निर्वाणी ।

गुण मी काय वर्णु । मति केवढी वानूं । विनवितो दास तुका । ठाव मागे चरणी ।। ५ ।।


श्रीकृष्णाची आरती ४

सहस्त्रदीपें दीप कैसी प्रकाशली प्रभा । उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ।। १ ।।

कांकड आरति माझ्या कृष्ण सभागिया । चराचर मोहरलें तुझी मूर्ती पहाया ।। धृ ।।

कोंदलेंसे तेज प्रभा झालीसे एक । नित्य नवा आनंद ओंवाळितां श्रीमुख || २ ||

आरति करितां तेज प्रकाशलें नयनीं । तेणें तेजें मीनला एका एकीं जनार्दनीं ।। ३ ।।


श्री कृष्णाची आरती ५

ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें । सगुणरूप माये माझ्या जीवीं बैसलें ।

तें मज आवडतें अनुमान न बोले । पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें ।। १ ।।

यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी । आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं ॥ धृ ।।

पाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें । सनकादिक पाहा महा आसक्त झाले ।

मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें । तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें || २ ||

निर्गुण गोष्टि माये मज नावडे साचें । सगुण बोल कांहीं केव्हां आठवी वाचें ।

पाया लागेन तूझ्या हेंचि आर्त मनींचें । तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें ।। ३ ।।



तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

श्रीकृष्णाची आरती