दशावतार आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म भक्तसंकटीं नाना स्वरूपीं स्थापिसी स्वधर्म ।। धृ ।।
अंबऋषीकारण गर्भवास सोशीसीवेद नेले चोरूनी ब्रह्मा आणुनियां देसी ।।
मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी । हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ १ ॥
रसातळाशीं जातां पृथ्वी पाठीवर घेसी परोपकारासाठी देवा कांसव झालासी ।।
दादें धरूनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी । प्रल्हादाकारणें स्तंभ नरहरि गुरगुरसी ।। २ ।।
पांचवे अवतारी बळिच्या द्वाराला जासी । भिक्षे स्थळ मागुनी बळिला पाताळी नेसी ।।
सर्व समर्पण केलें म्हणउनि त्या होसी ।। वामनरूप धरूनी बळिच्याद्वारी तिष्ठसी ।। ३ ।।
सहस्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला । कष्टीं ते रेणुका म्हणुनी सहस्रार्जुन वधिला ।।
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला सहावा अवतार परशुराम प्रगटला ।। ४ ।।
मातला रावण सर्वां उपद्रव केला ।तेहतीस कोटी देव बंदर्दी हरलें सीतेला ।।
पितृवचनालागीं राम वनवास केला । मिळोनी वानर सहित राजाराम प्रगटला ॥ ५||
देवकीवसुदेव बंदीमोचन त्वां केलें । नंदाघरी जाउन निजसुख गोकुळा दिधलें ।।
गोरसचोरी करीतां नवलक्ष गोपाळ मिळविले । गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ।। ६ ।।
बौद्ध कलंकी कलियुगि । झाला अधर्म हा अवघा । सांडुनि नित्यधर्म सोडुनि नंदाची सेवा ।।
म्लेंच्छमर्दन करिसी म्हणुनि कलंकी केशवा । बहिरवि जान्हवि द्यावि निजसुखानंदसेवा ||७||