दत्ताची आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।
– संत एकनाथ
दत्ताची आरती मधील काही कठीण शब्दांचा भावार्थ
आता आपण श्री दत्ताची ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति …’ ही आरती ऐकली. या आरतीमधील काही कठीण शब्दांचा भावार्थ समजून घेऊया. अर्थ समजल्याने देवतेचे श्रेष्ठत्व समजण्यास आणि तिची भक्ती वाढण्यास साहाय्य होते.
१. ‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।’ याचा अर्थ दत्त हा (कार्यानुरूप) त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे तीन देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत, म्हणजे अनुक्रमे रज, सत्त्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात.
२. ‘नेति नेति शब्द न ये अनुमाना ।’ याचा भावार्थ वेदांनी श्री दत्ताचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने ‘नेति, नेति’ म्हणजे ‘असे नाही, असे (ही) नाही’, एवढेच ते सांगू शकले.
३. ‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।’ म्हणजे आत-बाहेर पूर्णपणे तू एक दत्त केवळ गुरुतत्त्वरूप, ईश्वरतत्त्व असलेला आहेस.
४. ‘अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।’ म्हणजे आम्हा अभागी, दुर्दैवी लोकांना तुझे माहात्म्य कसे कळणार ?
५. ‘पराही परतली तेथे कैंचा हेत ।’ म्हणजे श्री दत्ताचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली त्यात कोणता हेतू असावा बरे ? दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्याने परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली.
६. ‘जन्ममरणाचा पुरलासे अंत ।’ याचा भावार्थ आहे, श्री दत्ताचे स्वरूप नित्य आणि अनादी-अनंत असे आहे. तिथे जन्ममरण हे शब्दच संपतात.
७. ‘जन्ममरणाचा फेरा चुकविला ।’ याचा भावार्थ जन्ममरणाच्या फेर्यातून माझी सुटका केली.
मला मोक्ष दिला, असा आहे.
८. ‘मीतूपणाची झाली बोळवण ।’ याचा भावार्थ आहे, अद्वैतावस्था प्राप्त झाल्याने मी-तू हा आपपरभाव संपला आहे.
‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो आणि भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्री दत्ताच्या चरणी प्रार्थना आहे.
दत्ताची आरती
खूप सुंदर अर्थ सांगितला आहे.श्री दत्त गुरूंचे अतिशय सुंदर त्रिगुणात्मक एकत्रीकरण या देवतेत वास करते. त्यामुळे तीन गुणांचे एकत्रीकरण झाल्याने जे मिळवायचे आहे. ते परब्रम्ह उपासनेने अधिक मिळते. जन्म मरणाच्या फेरा चुकतो. वाईट शक्तींचा नाश होतो.