संत निवृत्तीनाथ अभंग

संत निवृत्तीनाथ अभंग

संत निवृत्तीनाथ अभंग गाथा (एकूण २१८)


संत निवृत्तीनाथ अभंग – १

अवीट अमोला घेता पैं निमोला ।
तो प्रत्यक्ष देखिला भीमातटीं ॥ १ ॥
अव्यक्त साकार अकारिला अंकूर ।
क्षरला चराचर भक्तिकाजें ॥ २ ॥
अनुमान विटे सर्वाघटींमाजिटें ।
तें परब्रह्म ईटें भक्तिसाह्य ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट पिकलिसे पेठ ।
पुंडलिकें प्रगट केलें असे ॥ ४ ॥

अर्थ :-

जो विटत नाही, संपत नाही, जो कधी पुर्णत्वाला जात नाही, असा तो पांडुरंग पुर्वीच प्राप्त असल्यामुळे त्याला मी भीमा तटी सगुण रुपात पाहिला तो निर्गुण अव्यक्त रुप सोडुन सगुण होऊन आकारले आहे. असा हा परमात्मा भक्तांच्या भक्तीभावाने जगतात पाझरला आहे. जरी तो विटेवर उभा असला तरी सर्वांच्या ठिकाणी तो आहे. व तो भक्ताच्या हृदयात राहुन साह्य करतो. निवृत्तिनाथ म्हणतात असे हे परब्रह्म पुंडलिकाने पंढरपूर पेठेत उभे आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – २

प्राणिया उद्धार सर्व हा श्रीधर ।
ब्रह्म हें साचार कृष्णमूर्तीं ॥१ ॥
तें रूप भीवरें पांडुरंग खरें ।
पुंडलिकनिर्धारें उभे असें ॥ २ ॥
युगे अठ्ठावीस उभा ह्रषीकेश ।
पुंडलिका सौरस पुरवित ॥ ३ ॥
निवृत्तीचें गुज पांडुरंगाबीज ।
विश्वजनकाज पुरे कोडें ॥ ४ ॥

अर्थ:-

जगाची उत्पत्ती करणारी माता ज्याच्या ह्रदय स्थानी आहे असा श्रीधर सर्व प्राणीमात्रांचा उध्दार करतो.व तो ब्रह्मस्वरुपाने कृष्ण रुपात साकारला आहे. तोच कृष्ण पांडुरंग स्वरुपात पुंडलिकाच्या निर्धारामुळे उभा आहे. तो गेली 28 युगे पुंडलिकाचा मायबापांच्या सेवेचा निर्धार पुर्ण करण्यासाठी तिकडे उभा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा विश्वजनांचे कोड पुर्ण करण्यासाठी पांडुरंग बीज स्वरुपात उभा आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – ३

रूपाचें रूपस विठ्ठलनामवेष ।
पंढरीनिवास आत्माराम ॥ १ ॥
पुंडलिकभाग्य वोळलें संपूर्ण ।
दिननिशीं कीर्तन विठ्ठल हरी ॥ २ ॥
त्रैलोक्य उद्धरे ऐसी पव्हे त्वरे ।
कीर्तन निर्धारे तरुणोपाव ॥ ३ ॥
पूण्य केलें चोख तारिले अशेख ।
जनीं वनीं एकरूप वसे ॥ ४ ॥
वेदादिकमति ज्या रूपा गुंतती ।
तो आणूनी श्रीपति उभा केला ॥ ५ ॥
निवृत्तीचा सखा विठ्ठलरूप देखा ।
निरालंब शिखा गगनोदरीं ॥ ६ ॥

अर्थ:-

जगातील सर्व रुप ज्याच्या रुपामध्ये आहे असा श्री विठ्ठल तो आत्मस्वरुप परमात्मा पंढरीत राहतो. पुंडलिकाच्या भाग्याने तो साकार झाला म्हणुन रात्रंदिवस कीर्तन करण्याचा लाभ मिळाला. हेच ते कीर्तन त्रयलोकांना तारुन नेते. कीर्तनामुळे सर्व तरुन जातात व त्यांना जनी वनी तोच परमात्मा दिसु लागतो. त्या वेदांची मती ही ह्यांच्या रुपात गुंतुन पडते.तो लक्ष्मीपती पुंडलिकाने आणुन उभा केला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो माझा सखा श्री विठ्ठल त्याचे निराकार ब्रह्म स्वरुप ज्योती स्वरुपाने गगनाच्या पोटात व्यापक स्वरुपात आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – ४

पाहतां साधन विठ्ठलकीर्तन ।
भक्तसंजीवन आत्माराम ॥ १ ॥
विठ्ठल सधर भिवरा तें नीर ।
नाम निरंतर केशवाचें ॥ २ ॥
शिवसुरवर चिंतिती सुस्वर ।
कीर्तनविचार पंढरीसी ॥ ३ ॥
निवृत्ति कीर्तन दिननिशीं ध्यान ।
मनाचें उन्मन इये रूपीं ॥ ४ ॥

अर्थ:-

ईश्वर प्राप्तीची अनेक साधने आहेत पण कीर्तन ह्या साधनामुळे भक्त आत्मारामाला प्राप्त करुन अमर होऊ शकतात. भक्त त्यासाठी चंद्रभागेत स्नान करुन बाह्य सुर्चिभूतता व तेच जल जठरात घेऊन आतील सुर्चिभूतता करुन सतत विठ्ठल नामाचे संकीर्तन करतात. आदिनाथ महादेव सर्व देवांना सोबत घेऊन सुस्वरे पंढरी क्षेत्रात कीर्तन करत असतात. निवृत्तीनाथ म्हणतात मी रात्रंदिवस संकीर्तन करुन माझे मन उन्मनी अवस्थेत विठ्ठल स्वरुपाला प्राप्त होते.


संत निवृत्तीनाथ अभंग – ५

मन कामना हरि मनें बोहरी ।
चिंतितां श्रीहरि सुखानंद ॥ १ ॥
तें पुंडलिक तपें वोळलें स्वरूप ।
जनाचीं पै पापें निर्दाळिली ॥ २ ॥
वेणुनाद तीर्थ चंद्रभागा समर्थ ।
विठ्ठल दैवत रहिवास ॥ ३ ॥
निवृत्ति साकर विठ्ठल आचार ।
भिवरा तें नीर अमृतमय ॥ ४ ॥

अर्थ:-

हरिच्या चिंतनाने सुखानंद प्राप्त होतो त्या मुळे मनाचे त्यातील इच्छांसकट हरण होऊन मन त्या स्वरुपाला प्राप्त होते इच्छा उरतच नाहीत. हे पुंडलिकाचे उपकार आहेत ज्यामुळे जनांच्या पापाचे निर्दाळण करण्यासाठी परब्रह्म स्वरुपाला प्राप्त झाले. जेथे वेणुनाद झाला असे चंद्रभागा तीर्थ त्याच्या रहिवासामुळे समर्थ झाले. निवृत्तीनाथ म्हणतात की भिवरेच्या अमृतमय तीर्थामुळे ते विठ्ठल रुप मला सगुण साकार रुपात मिळाले.


संत निवृत्तीनाथ अभंग – ६

निराकार वस्तु आकारासि आली ।
विश्रांति पैं जाली विश्वजना ॥ १ ॥
भिवरासंगमीं निरंतर सम ।
तल्लीन ब्रह्म उभें असे ॥ २ ॥
पुंडलिक ध्याये पुढत पुढती सोये ।
विठ्ठल हेंचि गाये संकीर्तनीं ॥ ३ ॥
निवृत्तिसंकीर्तन ब्रह्म हें सोज्वळ ।
नाम हें रसाळ अनिर्वाच्य ॥ ४ ॥

अर्थः-

निर्गुण निराकार वस्तुरुप ब्रह्म हे विठ्ठल रुपात सगुण साकार रुपात आले त्यामुळे विश्वजनाना मोक्षरुप विश्रांती घेता येईल. चंद्रभागेतीरी समचरण समदृष्टी स्वरुपातील विठ्ठल भक्त भेटीसाठी तल्लीन होऊन उभे टाकले आहे. नाम संकीर्तनातुन पुंडलिक ह्याचे गायन करुन ह्यांचे ध्यान करतात. निवृत्तिनाथ म्हणतात हे सोज्वळ ब्रह्म मी रसाळपणे अनिर्वाच्च रुपात कीर्तनात सांगत आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – ७

पुंडलीकपेठ वैष्णवाचा हाट ।
करिती बोभाट हरिनामाचा ॥ १ ॥
वाळलें अंबर अमृततुषार ।
झेलीत अमर चकोर झाले ॥ २ ॥
देव मुनी सर्व ब्रह्मादिक लाठे ।
पंढरीये पेठे प्रेमपिसे ॥ ३ ॥
निवृत्ति निर्वाळिला ज्ञानदेव सोपान ।
खेचर तल्लीन वीनटला ॥ ४ ॥

अर्थ:-

पुंडलिक सर्व संतांच्या मेळाव्यात पंढरीच्या पेठेत हरिनामाचा गजर करत आहेत चंद्राने केलेल्या अमृत वर्षावा मुळे जसे चकोर पक्षी अमर होतात तसे आकाशातुन ब्रह्म भक्तांवर अमृत वर्षाव करते. ब्रह्मादिक, ऋषी, मुनी पंढरी तील भक्तीचा गजर ऐकुन पीसे होतात. भक्तीपीसे त्यांना लागते. निवृत्तिनाथ म्हणतात त्यांच्या सकट ज्ञानेश्वर सोपान विसोबा खेचर भक्तीने विठ्ठल रुपात लीन झाले.


संत निवृत्तीनाथ अभंग – ८

विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं ।
तिष्ठती कामारी मुक्तिचारी ॥ १ ॥
मुनिजनां सुख निरंतर लक्ष ।
भक्तां निजसुख देत असे ॥ २ ॥
पुंडलिकपुण्य मेदिनीकारुण्य ।
उद्धरिले जन अनंत कोटी ॥ ३ ॥
निरानिरंतर भीमरथी तीर ।
ब्रह्म हें साकार इटे नीट ॥ ४ ॥
नित्यता भजन जनीं जनार्दन ।
ब्रह्मादिक खुण पावताती ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर हरीरूप सर्व ।
नाम घेतां तृप्त आत्माराम ॥ ६ ॥

अर्थ:-

ज्या पंढरीत श्री विठ्ठल उभे आहेत तिकडे चारी मुक्ति कामारी दासी होऊन तिष्टत आहेत. मुनिजन जेथे लक्ष केंद्रीत करुन जे सुख निरंतर भोगतात तेच सुख पंढरीत भक्तांना मिळते पुंडलिकाने पुण्य पृथ्वीवर करुणा दावुन हे ब्रह्मस्वरुप पंढरीत भक्तजनांच्या उध्दारासाठी पंढरीत आणले. त्या पंढरीत निराभिवरे तीरावर हे परब्रह्म विटेवर उभे आहे. ब्रह्मादिकांनी खुण सांगितली आहे की हे ब्रह्म भजनामुळे जगत रुपात पाहता येते. निवृत्तिनाथ म्हणतात तत्परतेने नाम घेचल्यास तो आत्माराम तृप्त होतो.


संत निवृत्तीनाथ अभंग – ९

भवजळ काया पंचतत्त्वमाया ।
भजन उभया पंढरीरावो ॥ १ ॥
तारक पंढरी प्रत्यक्ष भीमातीरीं ।
ब्रीदें चराचरीं बोले वेदु ॥ २ ॥
माया मोहजाळ ममता निखळ ।
सेवितां सकळ होय हरी ॥ ३ ॥
निवृत्तीचें फळ सकळ हा गोपाळ ।
तोडी मायाजाळ संकीर्तने ॥ ४ ॥

अर्थ:-

पंचतत्वाने बनलेला देह हा भवसागरातील पाणी आहे. व ह्या जळातुन तरण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे पंढरीरावाचे भजन आहे. भवसागरातुन तरण्यासाठी तारक पंढरीत आहे असे वेद सांगतात. ह्या परब्रह्माच्या सेवे मुळे माया, ममता, मोहजाळातुन सुटका होते. निवृत्तिनाथ म्हणतात ह्याच्या संकीर्तनामुळे माया मोहाचा पाश मला तोडता आला हे साधनेचे फळ आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – १०

नित्य हरिकथा नित्य नामावळी ।
वैष्णवांचे कुळीं धन्य जन्म ॥ १ ॥
म्हणोनि पंढरी उपजवावें संसारीं ।
प्रत्यक्ष श्रीहरी तीरीं उभा ॥ २ ॥
नित्यता दिवाळी नाहीं तेथें द्वैत ।
नित्यता अच्युत तिष्ठतसे ॥ ३ ॥
निवृत्ति सादर विष्णुमय सार ।
विठ्ठल आचार पंढरिये ॥ ४ ॥

अर्थ:-

ज्या घरात नित्य हरिकथा व नामसंकीर्तन होते आशा वैष्णवाच्या कुळात जन्म मिळणे भाग्याचे आहे. म्हणुनच जीवाला हे सर्व ज्या पंढरीत हे होते त्या क्षेत्री जन्म घ्यावसा वाटतो. ज्या ठिकाणी श्री विठ्ठल उभा आहे तिकडे आनंदाची दिवाळी असते व द्वैत नसते. निवृत्तिनाथ म्हणतात श्री विठ्ठलाच्या रहिवासामुळे सर्व जगत विष्णुमय झाले आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – ११

प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत ।
कुळीं उगवत भाग्ययोगें ॥ १ ॥
तें रूप पंढरी उभें असे सानें ।
त्रिभुवनध्यान वेधियेले ॥ २ ॥
उगवली ज्योति प्रभा पैं फाकती ।
नाहीं दीनराती पंढरीये ॥ ३ ॥
प्रभात हरपे सायंकाळ लोपे ।
दिननिशी लोपे विठ्ठलप्रभा ॥ ४ ॥
पृथ्वी हे ढिसाळ वायु व्योमफळ ।
सेविती अढळ जोडती रया ॥ ५ ॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ ।
पंढरी ये राम विश्रामले ॥ ६ ॥

अर्थ:-

अनेक जन्माच्या संचित व प्रारब्धामुळे भाग्य योगाने श्री विठ्ठल भक्ताच्या कुळात जन्म मिळतो.सगुण रुपाने पंढरीत साकार झालेल्या रुपाने त्रिभुवनाचे ध्यान वेधले आहे. ह्या आत्मज्योतीच्या तेजप्रभेमुळे दिनरात्रीचे भास पंढरीत होत नाहीत.ह्या विठ्ठलाच्या प्रभेमुळे सकाळ संध्याकाळ लोप पावतात. श्री विठ्ठलाच्या सेवे मुळे पृथ्वीचे जडपण वायु चे विचरण व आभाळाचा आभास स्थिरावतो. येथेच प्रभु श्रीरामाने येऊन समाधीरुपाने विश्रांती घेतली तो श्रीराम मला प्राप्त झाला असे निवृत्तिनाथ म्हणतात.


संत निवृत्तीनाथ अभंग – १२

सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण ।
पतीतपावन हरि एक ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिका वोळलें ।
आणूनि ठेविलें भीमातीरीं ॥ २ ॥
नलगती त्या सिद्धि करणें उपाधी ।
नित्य चित्तशुद्धि विठ्ठलनामें ॥ ३ ॥
कळिकालासि त्रास चित्तीं ह्रषिकेश ।
उगवला दिवस सोनियाचा ॥ ४ ॥
त्रिभुवनीं थोर क्षेत्र पैं सार ।
विठ्ठल उच्चार भीमातीरीं ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर ।
नित्यता आचार विष्णुमय ॥ ६ ॥

अर्थ:-

ह्या विठ्ठल स्वरुपात सर्व धन व सिध्दि असुन ह्यांचा मुळे पतित ही पावन होतो. ते परब्रह्म सगुण रुपात पुंडलिकांने भीमातीरी उभे केले. आता अनेक इतर साधन न करता त्या विठ्ठलनामामुळे चित्त शुध्द होते. चित्तत जर विठ्ठल धारण केला तर कळीकाळास धाक होतो असा सोन्याचा दिवस भक्तास प्राप्त होतो. विठ्ठल नामाच्या गजर भीमातीरी झाल्यामुळे ते तीर्थ सर्व त्रिभुवनात श्रेष्ट ठरते. निवृतिनाथ म्हणतात हे जगत विष्णुस्वरुप आहे ह्या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना शांती मिळाली आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – १३

उघडें स्वरूप प्रत्येक्षाचें दीप ।
नाम घेतां पाप हरे जना ॥ १ ॥
तें रूप विनट विठ्ठल सकळ ।
सेवा दिनकाळ पंढरीयेसी ॥ २ ॥
रजतमें दूरी नामाची माधुरी ।
निशाणी एकसरी रामकृष्ण ॥ ३॥
भवाब्धितारक नावाडा विवेक ।
पुंडलिक देख सेवितसे ॥ ४ ॥
विश्व हें तारिलें नामचि पिकलें ।
केशवी रंगलें मन हेतु ॥ ५ ॥
निवृत्ति विठ्ठल सेवितु सकळ ।
दिनकाळफळ आत्माराम ॥ ६ ॥

अर्थ:-

उघड्या परब्रह्नाचे नाम घेतले तर सगऴी पापे नष्ट होतात व दिपासारखा श्री विठ्ठल प्रगट होतो. ज्याची सेवा दिवसरात्र पंढरीत होते तो विठ्ठल सर्वत्र जगत रुपात वास करतो. रामकृष्ण नामाची निशाणी करुन रज व तमाचा लोप करता येतो व तेथे शुध्द सत्व उरते.पुंडलिकाने विवेकाला नावाडी करुन संसार सागरातुन स्वतःला तारुन नेले. केशव नामाच्या साधनेत मन रंगले की विश्व तरले जाते हा नामाचा महिमा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या रात्रंदिवस केलेल्या नामाच्या साधनेने मला जगत आत्माराम स्वरुपात दिसले.


संत निवृत्तीनाथ अभंग – १४

पंढरीये चोख रूपडें अशेख ।
भीमातीरीं देख पुण्यभूमी ॥ १ ॥
आदिपीठ देव ब्रह्म हें स्वयमेव ।
पुंडलिक भाव प्रगटला ॥ २ ॥
जन हें कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ ।
कीर्तनीं कळीकाळ दूरी ठाये ॥ ३ ॥
नाम हें विठ्ठल नलगे पैं मोल ।
नित्यता सकळ पांडुरंग ॥ ४ ॥
त्रिविधताप पाप तें जिंतील अमूप ।
मुरतील संकल्प एक्या नामें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी ।
सर्वत्र चराचरीं बोलियेलें ॥ ६ ॥

अर्थ:-

पुण्यभूमी पंढरी ज्या भीमातीरी वसली आहे तेथे सगुण रुपातील विठ्ठल रुप तुम्हाला पाहता येईल. पुंडलिकाच्या भक्तिभावामुळे पांडुरंग प्रगट झाला व त्यामुळे पंढरी हे आदि पीठ मानले जाते. इंद्रियाचा धनी असा तारक विठ्ठल जनातील कल्लोळ दुर सारतो व हे कीर्तनामुळे साध्य होते कीर्तनात कळीकाळालाही प्रवेश नसतो. जेथे श्री विठ्ठलाचा अखंड वास आहे तेथे कोणते ही मोल न देता नामसाधना होते. विठ्ठल नामामुळे त्रिविध ताप व अनेक पापे नष्ट होऊन संकल्प ही स्थिरावतात. निवृत्तिनाथ म्हणतात जो नामसंकीर्तन करतो तो धन्य आहे आशी सर्व चराचराची धारणा आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – १५

जनासी तारक विठ्ठलचि एक ।
केलासे विवेक सनकादिकीं ॥ १ ॥
तें रूप वोळले पंढरीस देखा ।
द्वैताची पै शाखा तोडीयेली ॥ २ ॥
उगवलें बिंब अद्वैत स्वयंभ ।
नाम हें सुलभ विठ्ठलराज ॥ ३ ॥
निवृत्तीचें गूज विठ्ठल सहज ।
गयनीराजें मज सांगितलें ॥ ४ ॥

अर्थ:-

सनकादिक संतांनी विचार मंथनातुन जो विचार सांगतिला त्या प्रमाणे एक विठ्ठलच जगतासी तारक आहे. संत ह्याला विवेक म्हणतात. तो श्री विठ्ठल आपले अद्वैत असे निर्गुण रुप सोडुन इकडे सगुण रुपात आकारला आहे. ज्या सुलभते नित्य सुर्यबिंब उगवते तेवढ्याच सुलभतेने त्याचे नाम प्रगट होते. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गयनीनाथ कृपे मुळे नाम सुलभ आहे हे गुज मला कळले.


संत निवृत्तीनाथ अभंग – १६

पिंड हा न धरी ब्रह्मार्पण करी ।
विष्णु चराचरीं ग्रंथीं पाहे ॥ १ ॥
तें रूप विठ्ठ्ल ब्रह्माकार दिसे ।
पंढरी सौरस भींमातीरीं ॥ २ ॥
जगाचे तारक पूण्य पूज्य लोका ।
तृप्त सनकादिक नामें होती ॥ ३ ॥
पतीतपावन नाम हे जीवन ।
योगीयाचें ध्यान हरि आम्हां ॥ ४ ॥
वेणुनादीं काला पिंडावती जाला ।
भाग्य भोगियला दृष्टी पूढें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे ते रूपडें अनंत ।
विठ्ठल संकेत तरुणोपेव ॥ ६ ॥

अर्थ:-

देह तादात्म्य सोडुन हा देह देवाच्या कारणी लावावा हा अनुभव जगतातील सर्व ग्रंथ सांगत आहेत. असे हे ब्रह्माकार रुप भक्तांकरिता भीमातीरी श्री विठ्ठल रुपाने साकारले आहे. जगाला तारणारे सनकादिक संत हे नाम घेतल्याने तृप्त झाले आहेत. योग्यांचे ध्येय असणारे हे नाम पतित पावन व जिवनदायी आहे. ह्याच्या वेदुनादाने माझे देह तादात्म्य संपवुन मला भाग्य भोगायला पात्र केले. निवृत्तिनाथ म्हणतात अनंत रुप विठ्ठलाचे संकेत प्राप्त करणे हा तरणोपाय आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – १७

हरिविण व्यर्थ आचार समर्थ ।
हरि हेंचि हेत अरे जना ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिकसंगे ।
एका नामें पांग पाश तोडी ॥ २ ॥
सर्व ब्रह्मार्पण क्रिया करी जाण ।
वेदमत्तें खुण ऐसी असे ॥ ३ ॥
निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद ।
नाहीं भिन्न भेद विश्वीं इये ॥ ४ ॥

अर्थ:-

हे लोक हो हरिविण कोणताही आचार श्रेष्ट नाही. हरिची प्राप्ती हाच समर्थ विचार आहे. त्या विठ्ठल नामाने सर्व पाश सुटतात तो श्री विठ्ठल पंढरीत उभा आहे. आपली सर्व कर्म त्याला अर्पण करावीत हे वेदांचे मत आहे. निवृतिनाथ म्हणतात हा माझा गोविंद भिन्न रुपात भासत असला तरी तो एकत्व रुपाने त्यात आहे.


संत निवृत्तीनाथ अभंग – १८

भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें ।
तें पुंडलिका संगें भीमातटीं ॥ १ ॥
ध्यान मनन एक करितां सम्यक ।
होय एकाएक एक तत्त्व ॥ २ ॥
उदोअस्तुमेळें ब्रह्म न मैळें ।
भोगिती सोहळे प्रेम भक्त ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत विठ्ठल सतत ।
नघे दुजी मात हरिविण ॥ ४ ॥

अर्थ:-

दैवयोगाने भाग्याचा उदय झाला म्हणुन पुंडलिकाच्या संगतीने भीमातीरी परब्रह्म अवतरले. हा परब्रह्म म्हणजे एकच तत्व आहे हे ध्यान व मननाने कळते. भक्त हे प्रेम सुख सतत भोगत राहतात जसा सुर्य व चंद्राला उदय अस्त असतो तसा ह्या प्रेमसुखाला नाही. निवृत्तिनाथ म्हणतात मी निवांत ह्या विठ्ठलाचे भजन करतो इतर मतांचे काही ऐकत नाही.


संत निवृत्तीनाथ अभंग – १९

ध्येय ध्यान मनीं उन्मनीं साधनीं ।
लाविता निशाणी ध्यानमार्गे ॥ १ ॥
तें रूप सघन गुणागुणसंपन्न ।
ब्रह्म सनातन नांदे इटे ॥ २ ॥
विठ्ठलनामसार ऐसाचि निर्धार ।
मुक्ति पारावार तीं अक्षरीं ॥ ३ ॥
निवृत्ति निवांत राहिला निश्चित ।
केलेंसे मथीत पुंडलिकें ॥ ४ ॥

अर्थ:-

ध्येय ध्यान ध्याता ही त्रिपुटी निरास पावली की उन्मनी अवस्था प्राप्त होते. त्याची निशाणी हे योगी ध्यान मानतात.योग्यांचे ते ध्यान जे सर्व गुणांनी युक्त आहे तेच विटेवर उभे आहे. त्यामुळे श्री विठ्ठल नाम हेच सार असा निर्धार करुन ती मुक्ती प्राप्त झाली आहे. तोच हा परमात्मा आहे हे पुंडलिकाने सांगितल्यामुळे निवृत्तिनाथ निवांत राहिले.


संत निवृत्तीनाथ अभंग – २०

काळवेष दुरी काळचक्र करीं ।
बाह्य अभ्यंअती हरि नांदे ॥ १ ॥
सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरीं जाला ।
कृष्णें काला केला गोपवेषें ॥ २ ॥
गोपाळ संवगडे खेळे लाडेकोडे ।
यशोदेमाये पुढें छंदलग ॥ ३ ॥
निवृत्तिम्हणे तो स्वामी सकळांचा ।
दिनकाळ वाचा कृष्ण जपों ॥ ४ ॥

अर्थ:-

नामसाधनेने हृदयात स्थापित झालेला हरि आत बाहेर राहुन भक्ताचे काळचक्रापासुन रक्षण करतो. चराचर भरुन राहिलेला भगवंत नंदाघरी गोपवेश घेऊन काला करित आहे. लडिवाळपणे यशोदामातेसमोर आपल्या गोपाळांबरोबर अनेक खेळ खेळतो. निवृत्तिनाथ म्हणतात तो सर्व जगाचा राजा असुन त्याचे दिवसरात्र नाम जपु.


संत निवृत्तीनाथ अभंग – २१

नाहीं यासि गोत नाही यासी कूळ ।
शेखीं आचारशीळ कोण म्हणे ॥ १ ॥
बाळरूपें हरि गोकुळीं लोणी चोरी ।
त्या यशोदा पाचारी थान द्यावया ॥ २ ॥
सोंवळा हरि वागवी शिदोरी ।
तो गोपालांच्या करी काला देतु ॥ ३ ॥
निवृत्ति संपूर्ण काला देतु जाण ।
ब्रह्मसनातन गोकुळींचें ॥ ४ ॥

अर्थ:-

एको हं ह्या वेदवाक्यानुसार हे परमतत्व एकटे आहे त्यामुळे त्यास कुळ व नाती नाहीत. तो अकर्तुम असल्याने तो कर्म करतो असे कसे म्हणता येईल. हा परमात्मा गोकुळात एकीकडे लोणी चोरत असताना दुसरीकडे पान्हा अनावर झाल्यामुळे यशोदा त्यास स्तनपानासाठी बोलवत असे. पण सत्वगुणी सोज्वळ शिदोरी ही हा परमात्मा बाळगतो व त्यातील काला गोपाळांच्या हाती खायला देतो. निवृत्तीनाथ म्हणतात गोकुळीच्या ह्या ब्रह्मसनातनाने आपला स्वस्वरुप काला गोपाळांना वाटला.


संत निवृत्तीनाथ अभंग – २२

गोपाळ संवगडे आले वाडेकोडें ।
असंख्य बागडे हरिरूपीं ॥ १ ॥
बिंबली पंढरी हरीरूपीं सार ।
अवघाचि श्रृंगार विठ्ठलराजु ॥ २ ॥
कालया कौशल्या नामदेव जाणे ।
तेथीलीहे खुणे निवृत्तिराजु ॥ ३ ॥
ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा ।
नहरहि वेगा झेलिताती ॥ ४ ॥
वैकुंठ सांवळे मजि भक्त मेळे ।
काला एक्या काळें करिताती ॥ ५ ॥
निवृत्ति संपूर्णता घेउनि उद्गारु ।
सेविता उदार हरिराणा ॥ ६ ॥

अर्थ:-

श्रीकृष्ण अवतारामुळे त्याचे भक्त त्याच्या प्रेमामुळे गोपवेष घेऊन त्याच्या भोवती अवतरले आहेत. सगळे अलंकार लेऊन हाच परमात्मा पंढरीत विठ्ठल स्वरुपात अवतिरण झाला आहे व पंढरी त्याच्या सार रुपात रंगली. ह्याच्या प्रेमभक्तीने रंगलेले नामदेव, निवृत्तिनाथ त्याची खुण ओळखतात. ह्याने उधळलेला एकात्म काला ज्ञानदेव, सोपान जममित्र नागा, नरहरी सोनारांदी संत वरच्यावर झेलतात. मध्याहच्या वेळेवर एकाच वेळी एका ठिकाणी हा एकात्म काला सावळा रंग घेतलेले परब्रह्म भक्तांच्या मेळ्यात वाटत असते. निवृतिनाथ म्हणतात आम्ही केलेल्या नामरुप प्रेमभक्ती मुळे तो परमात्मा संतुष्ट झाला व त्यांने कृपा करुन माझा संपुर्ण उध्दार केला.


संत निवृत्तीनाथ अभंग – २३

आनंद सर्वांचा काला अरुवार ।
नामया साचार फुंदतसे ॥ १ ॥
राहिरखुमाई सत्यभामा माता ।
आलिया त्वरिता काल्यामाजी ॥ २ ॥
उचलिला नामा प्रेमाचें फुंदन ।
नुघडी तो नयन कांही केल्या ॥ ३ ॥
बुझावित राही रखुमादेवी बाही ।
पीतांबर साई करू हरी ॥ ४ ॥
ज्ञानासी कवळु सोपानासी वरु ।
खेचरा अरुवारु कवळु देत ॥ ५ ॥
निवृत्ति पूर्णिमा भक्तीचा महिमा ।
नामयासि सीमा भीमातीरीं ॥ ६ ॥

अर्थ:-

काल्यातील सर्वांच्या आनंदाने गहिवरलेले नामदेवराय आनंदाने स्पुंदु लागला. ह्या काल्यासाठी राही रखुमाई व सत्यभामा ही त्वरित आल्या. सर्वांनी अनिवार आनंदात रमलेल्या नामदेवाना उचलुन घेतले तरी आनंदविभोर झालेले नामदेव डोळे उघडायला तयार नव्हते.नामदेवांचे भाग्य पहा दोन्ही मातांनी त्याचे हात धरुन त्याला भानावर आणायचा प्रयत्न केला व देवांने त्याच्यावर पितांबराची छाया धरली.ज्ञानदेवांना व सोपानाला देव काल्याचा ब्रह्मैक्याचा घास दिला व विसोबा खेचराना गहिवरुन घास दिला.निवृत्तिनाथ म्हणतात भक्तांनी पूर्ण चंद्रासारखा परिपूर्ण काला अनुभवला व नामदेवांचे वास्तव्य असलेले भीमातीरी आनंदाला सीमा नव्हती.


संत निवृत्तीनाथ अभंग – २४

तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला ।
मुक्ताई लाधला प्रेमकवळु ॥ १ ॥
चांगयाचे मुखीं घालीत कवळू ।
आपण गोपाळु दयासिंधु ॥ २ ॥
दिधलें तें तूं घेई पूर्ण तें होई ।
सप्रेमाचे डोही संतजन ॥ ३ ॥
नामया विठया नारया लाधलें ।
गोणाई फावलें अखंडित ॥ ४ ॥
राही रखुमाई कुरवंडी करिती ।
जिवें वोंवाळिती नामयासी ॥ ५ ॥
निवृत्ति खेंचर ज्ञानदेव हरि ।
सोपान झडकरी बोलाविला ॥ ६ ॥

अर्थ:-

काल्याच्या आनंदात देहभान हरपलेला परमात्मा भक्तांच्या स्वाधिन झाला व त्यांने मुक्ताईला प्रेमाने काल्याचा घास भरवला. तो दयासागर गोपाळ चांगयाच्या तोंडात काल्याचा घास घालत आहे. भगवंत प्रेमाने म्हणाला की पूर्णत्वाचा काला घेऊन तुम्ही संत पूर्णतेला पोहचाल. व हे ऐकुन संत आनंदाच्या डोहात डुंबु लागले. नामदेव त्यांचे चिंरजीव विठ्ठल, नारायण आई गोणाई ह्यांना ही काल्याच्या आनंदात भाग घेता आला. प्रेमाने राहि रखुमाईनी प्रेमाने नामदेवांना औक्षण केले. निवृत्तिनाथ म्हणतात की देवांने मला, ज्ञानदेव, सोपान, व विसोबा खेचरांना आवर्जुन प्रेमाने त्वरित बोलावुन घेऊन त्यांना काल्याचा लाभ दिला.


संत निवृत्तीनाथ अभंग – २५

नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी ।
आनंदाची सृष्टि तया जाली ॥ १ ॥
घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी ।
तुजमाजि निवासि हरि आहे ॥ २ ॥
नामा पसरी मुख आनंदला तृप्त ।
कवळु पूर्णभरित हरिराज ॥ ३ ॥
निवृत्तीने सेविला कवळु हा हरि ।
तूंचि चराचरीं दिससी आम्हां ॥ ४ ॥

अर्थ:-

सृष्टी त्यांना आनंदाची भासते. निवृत्तिनाथ नामदेवांना भानावर आणुन काल्याचा घास घेण्यास सांगतात. हा एकात्म काला घेऊन तुझ्यात निवास करत असलेल्या परमात्माचे दर्शन घेण्यास सुचवतात. त्या आनंदात नामदेव आपले मुख पसरतात व देव त्यांना काल्याचा घास भरवतो.निवृत्तिनाथ म्हणतात देवांने त्या काल्याचा घास मला दिल्यावर ब्रह्मैक्य चराचराचे दर्शन मला एकत्वाने झाले.


संत निवृत्तीनाथ अभंग – २६

नुघडितां दृष्टि न बोले तो वाचा ।
हरिरूपी वाचा तल्लीनता ॥ १ ॥
उठि उठिरे नाम्या चालरे सांगातें ।
माझे आवडते जीवलगे ॥ २ ॥
कुरवाळीला करें पुसतसे गूज ।
घेई ब्रह्मबीज सदोदित ॥ ३ ॥
ज्ञानासि लाधलें निवृत्ति फावलें ।
सोपाना घडलें दिनकाळ ॥ ४ ॥
तें हें रे सखया खेंचरासि पुसे ।
गुरुनामी विश्वासे ब्रह्मरूपें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे आतां अनाथा श्रीहरि ।
तूंचि चराचरी हेचि खुण ॥ ६ ॥

अर्थ:-

काल्याच्या आनंदात देहभान हरवलेले नामदेव राय डोळे ही उघडत नव्हते व बोलत ही नव्हते. त्या हरिरुपात ते पूर्ण तल्लीन झाले होते. तेंव्हा देव म्हणाले माझ्या आवडत्या जीवलगा नामया आता भानावर ये. देवाने नामयाला हाती धरुन करुवाळले व हे सर्वांचे बीज असलेले नाम ब्रह्म सदोदित भोगायला सांगितले. ह्याच नामब्रह्माचा लाभ ज्ञानदेव निवृत्तिनाथ तर घेतातच तसेच सोपानदेव ही दिवसरात्र अनुभवतात. ते हे नाम ब्रह्म कसे भोगायचे हे तु तुझे गुरु खेचर ह्यांना विचार व सदगुरुंच्या उपदेशाचा बोध विश्वासाने घेऊन तु त्याला प्राप्त तुच ब्रह्मरुप होशिल.निवृत्तिनाथ म्हणतात हे अनाथांच्या नाथा हे श्रीहरि तुच एकत्वाने पूर्ण चराचरात भरला आहेस.


संत निवृत्तीनाथ अभंग – २७

सत्यभामा माये अन्नपूर्णा होये ।
वेळोवेळां सूये कवळू मुखीं ॥ १ ॥
राहीरखुमाई आदिमाता मोहे ।
नामा तो उपायें बुझाविती ॥ २ ॥
घेरे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाला ।
आवडसि गोपाळां प्रीतीहूनी ॥ ३ ॥
कुर्वाळितो हरि नुघडी तो दृष्टी ।
सप्रेमाच्यां पोटी अधिक होसी ॥ ४ ॥
धरूनि हनुवटी पाहे कृपादृष्टी ।
आनंदाचे सृष्टि माजि नामा ॥ ५ ॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगा हरि ।
यांसी परोपरी कवळू देतु ॥ ६ ॥

अर्थ:-

प्रत्येक संतांच्या तोंडात काल्याचा प्रसाद भरवताना सत्यभामेने जणु अन्नपूर्णेचे रुप घेतले होते. नामदेवाच्या मोहाने राहिरखुमाबाई त्यांना भानावर आणण्यासाठी अनेक उपाय करु लागल्या.दोघी अत्यंत लडिवाळपणे नामदेवांना तो ब्रह्मरस काल्याचा घास घे म्हणुन सांगत आहेत. त्या भगवंताने तुला कुरवाळल्यामुळे तुझी भावसमाधी जास्त दृढ झाली असुन तु त्यामुळे डोळे उघडत नाहीस.पुन्हा देवाने नामयाच्या हनुवटीला धरुन त्याला कृपादृष्टीने पाहिले. त्या प्रेमामुळे नामदेवराय आनंदाच्या सृष्टीत निमग्न झाले. निवृत्तिनाथ म्हणतात मला, ज्ञानदेवांना, सोपानदेवांना, चांगदेवांना परिपूर्ण काला दिला.


संत निवृत्तीनाथ अभंग – २८

काला तंव निकटी श्रीरंग जाले ।
भक्तांचे सोहळे पुरविले ॥ १ ॥
वेणुनादीं काला एकत्र पैं जाला ।
दहींभात झेलाझेलीतु देव ॥ २ ॥
तोचि कवळु घेत नामयासी देतु ।
ज्ञानासी भरीतु पूर्णतोषें ॥ ३ ॥
निवृत्ति सोपान कालवले कालीं ।
खेचराची धाली ताहान भूक ॥ ४ ॥

अर्थ:-

भक्तांची निकटता अनुभवण्यासाठी भगंवताने काला केला.व सर्व भक्तांच्या देवाच्या सहवासाची इच्छा पूर्ण केली. काला म्हणजे एकत्रीकरण असा एकत्र केलेला काला देवांने वेणुनाद तीर्थावर म्हणजे भीमातीरी केला.जीव व ब्रह्माचे प्रतिक अ़सणारे दही व भात करुन त्याचे घास बनवले व ते भक्तांनी वरच्यावर मुखातच झेलले. कण ही वाया जाऊ दिला नाही.त्याच काल्याचा घास करुन ज्ञान व आनंदाला एकत्र करुन तो घास देवाने नामदेवरायांना दिला. निवृत्तिनाथ म्हणतात काल्याच्या आनंदात ते ही कालवले गेले म्हणजे एकरुप झाले. तसेच विसोबा खेचर ही आपली तहानभूक विसरला.


संत निवृत्तीनाथ अभंग – २९

वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला ।
विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ १ ॥
हरिनामा विनट हरि उच्चारीत ।
सप्रेम डुल्लत भक्तजन ॥ २ ॥
चालिला सोपान ज्ञानदेव निधी ।
मुक्ताई गोविंदीं तल्लीनता ॥ ३ ॥
निवृत्ति खेचर परसा भागवत ।
आनंदे डुल्लत सनकादीक ॥ ४ ॥

अर्थ:-

पंढरीत सर्व संतांनी एकत्र येऊन देव विठ्ठल व देवाचे नाम यांना एकत्र करुन काला केला.सप्रेमाने घेतलेल्या हरिनामाने डुल्लत असलेले भक्त त्या नामात तल्लीन झाले. हरिनामात तल्लिन झालेले सोपानदेव व ज्ञानदेव काल्याच्या दिंडीत मुक्ताई सह चालताना तल्लीन झाले आहेत.निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वतः, विसोबा खेचर, परसा भागवत, सनक, सनंदन, सनातन, व सनत्कुमार हे ह्या आनंदात डुल्लत आहेत.


संत निवृत्तीनाथ अभंग – ३०

पांडुरंग हरि माजी भक्तजन ।
कैसें वृंदावन शोभतुसे ॥ १ ॥
ब्रह्मादिक ठेले विमानें अंबरीं ।
काला तो गजरीं पंढरिये ॥ २ ॥
सनकादिक देव देहुढापाउलीं ।
गोपाळ वांकुली दाविताती ॥ ३ ॥
पुंडलिका नाचे देवमुनी सर्व ।
भीमातीरीं देव प्रगटले ॥ ४ ॥
ज्ञानदेव सोपान विसोबा खेंचर ।
नरहरि सोनार नाचताती ॥ ५ ॥
निवृत्ति मुक्ताई चांगदेव गाढा ।
हरिचा पवाडा झेलिताती ॥ ६ ॥

अर्थ:-

पांडुरंग व त्याचे नाम घेत येणारे भक्त यांच्या मुळे पंढरी वृंदावन क्षेत्रा सारखी शोभत आहे. तो हरिनामाच्या गजरात होणारा काला पाहायला पंढरीत ब्रह्मादिकांच्या विमानांची गर्दी झाली आहे. सनकादीक भक्त व एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेऊन देव त्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे. हरिनामाच्या गजरात नाचणाऱ्या पुंडलिकाला पाहुन ते सर्व देव पंढरीत प्रगट होऊन नाचु लागले.तसेच ज्ञानदेव, सोपान, विसोबा खेचर, नरहरी सोनार हे सर्व संत ही नाचु लागले. निवृत्तिनाथ म्हणतात ते स्वतः, मुक्ताई व चांगदेव हरिनामात रंगुन गेले.


संत निवृत्तीनाथ अभंग – ३१

आपुलेनि हातें कवळु समर्पी ।
ब्रह्मार्पण मुखीं ब्रह्मपणे ॥ १ ॥
सोपान सावंता निवृत्ति निधान ।
यासि जनार्दन कवळ देतु ॥ २ ॥
ब्रह्मपद हरि बाह्य अभ्यंतरीं ।
सर्वत्र श्रीहरि दिसे तया ॥ ३ ॥
देऊनि हस्तक पुशी पीतांबरें ।
पुसतसे आदरें काय आवडे ॥ ४ ॥
राहीरखुमाबाई कासवीतुसार ।
अमृत सार सर्वाघटी ॥ ५ ॥
निवृत्ति खेचर सोपान सांवता ।
हरि कवळु देतां तृप्त जाले ॥ ६ ॥

अर्थ:-

श्री विठ्ठल आपल्या हातानी भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास घालुन तो ब्रह्मार्पण करत आहे. सोपान सांवता निवृत्ती ह्यांसर्व भक्तांच्या मुखात ब्रह्मरुप काल्याचा घास स्वतः श्रीहरि भरवत आहे. श्रीहरीने दिलेल्या ह्या काल्याच्या प्रसादामुळे त्यांना अंतर बाह्य ब्रह्मस्वरुप दिसायला लागले. मग देव ह्या भक्तांच्या मस्तकावर हात ठेऊन त्यांचे मुख स्वतःच्या पीतांबराने त्यांचे मुख पुसुन त्यांना लडिवाळपणे विचारत आहे की तुम्हाला अजुन काय हवे आहे. जशी कासवी आपल्या दृष्टीने तिची पिल्ल पाळते तश्या प्रेम वात्सल्याने राही रखुमाई काला प्रसंगी आपल्या भक्तांना प्रेम पान्ह्याचे अमृत सार रुपात देत आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात देवांने आपल्या हाताने काल्याचा घास दिल्याने मी, विसोबा खेचर, सोपानदेव व सांवतामहाराज तो प्रसाद घेऊन तृप्त झालो.


संत निवृत्तीनाथ अभंग – ३२

उपजे तें मरे मरे तें तें झुरे ।
जन्म येरझारे एकरूपें ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम गोपीसंगें मेळे ।
नंदाघरी सोहळे बाळक्रीडा ॥ २ ॥
अमर अमरे अमर क्म्द खरे ।
होऊनि गोजिरें दूध मागे ॥ ३ ॥
निवृत्ति परिचार सर्व हा गोपाळ ।
पूजी दिनकाळ आत्माराम ॥ ४ ॥

अर्थ:-

जन्मले ते मरते मरते ते जन्मते ह्या जन्ममरणाच्या चक्रात एकत्वाने फक्त निर्गुण आत्मा आहे. तो निर्गुण आत्माराम गोकुळात नंदा घरी गोपिकांसह बाळक्रीडा करत आहे व ते जगासाठी सोहळाच आहे.असे हे अमर आत्मतत्व म्हणजे अमरत्वाचा कंदच झाला आहे. असे ते आत्मतत्व स्वतःच यशोदेकडे दुध मागत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात असा हा आत्माराम आपल्या सानिध्यातुन चराचरात तोच आहे याची जाणीव करुन देत आहे. अशा त्या परमात्म्याची मी नित्य पूजा करतो.


३३
धीराचे पैं धीर उदार ते पर ।
चोखाळ अमर अभेदपणें ॥ १ ॥
तें हें चतुर्भुज कृष्णरूपें खेळे ।
माजि त्या गोपाळें छंदलग ॥ २ ॥
किडाळ परतें चोखाळ अरुतें ।
मी माझें हे कर्ते तेथें नाहीं ॥ ३ ॥
निवृत्ति धर्मता विचारे चोखाळ ।
सर्वत्र गोपाळ सखा आम्हां ॥ ४ ॥

अर्थ:-

धीरगंभीर असलेले परमतत्व उदारांचा राणा आहे प्रेमसुखाची जगतावर बरसात करत आहे. असे हे परब्रह्म गुणातीत निर्दोषस्वरुपात एकत्वाचे दर्शन घडवत आहे. ते चतुर्भुज परमतत्व कृष्णरुप गोपाळांना आपल्या कृष्णरुपाचा छंद लावुन त्यांच्या सोबत खेळत आहे. कोणत्याही वाईटाचा डाग नसलेले चोख निर्मळ असलेले हे ब्रह्म या ठिकाणी मी माझे असा कोणताही भेद करत नाही. व कोणत्याही कर्तेपणाचा लेश लाऊन घेत नाही.निवृत्तिनाथ म्हणतात की धर्माचा शुध्द विचार चोखपणे करुन असलेला तो गोपाळ माझा सखा आहे.


३४
विश्रामधर्मता आश्रमपूर्णता ।
आपरूप कथा निमे जेथें ॥ १ ॥
तें हें कृष्णबाळ गोपिकांसि खेळे ।
नंदाघरीं सोहळें आनंदाचे ॥ २ ॥
कथा त्या कथितां पूर्ण त्या मथिता ।
अरूप अच्युता सर्व असे ॥ ३ ॥
निवृत्ति समाधान कृष्ण हें चोखडें ।
मनोनिग्रह खोड चरणीं गोवी ॥ ४ ॥

अर्थ:-

धर्माची विश्रांती व आश्रम व्यवस्थेतेची पूर्णता ह्याच्याच ठिकाणी होत असते. अशा त्या परमात्म्याने आत्मरुपाचे ज्ञान दिले तेंव्हा स्वस्वरुप त्यात मावळुन गेले. तेच हे परमात्मस्वरुप कृष्णस्वरुपात गोपिंकांबरोबर नंदाच्या घरात खेळले तेंव्हा नंदाचे घर आनंदात न्हाले. अशा त्या अरुप, अकर्तुम परमात्म्याची कथा केली तर करणाऱ्याला पूर्णत्व मिळते. निवृतिनाथ म्हणतात मनोनिग्रह करुन मी ह्याच्या चरणी एकरुप झाल्यावर मला त्यांचे शु्ध्द स्वरुप दिसले त्यामुळे मला समाधान प्राप्त झाले.


३५

अकर्ता पैं कर्ता नाही यासी सत्ता ।
आपण तत्वता स्वयें असे ॥ १ ॥
तें रूप चोखाळ कृष्णनामें बिंबे ।
यशोदा सुलभें गीतीं गाय ॥ २ ॥
व्योमाकार ठसा नभीं दशदिशा ।
त्यामाजि आकाशा अवकाश होय ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु माझा पूर्ण ब्रह्म ।
उपदेश सुगम कृष्णनाम ॥ ४ ॥

अर्थ:-

तो अकर्त असला तरी त्याच्या सत्ते शिवाय काही होत नाही. एकटे म्हणावे तर तो चराचरात अशांत्मक स्वरुपात जाणवतो. त्या अरुप परमात्म्याचे कृष्णस्वरुपात नाम दर्शन होते व त्याला माता यशोदा अंगाई गाते. त्या आकाशाच्या आत दशदिशेला फाकलेले चिदाकाश आहे. आकाशाने पोकळ होऊन त्या चिदाकाशाला पोटात धरले आहे.
निवृत्तिनाथ म्हणतात ब्रह्मस्वरुपाला प्राप्त असलेल्या श्री गुरु मुळे ते कृष्णनाम मला सोपे व सुलभ झाले.


३६

सारासार धीर निर्गुण परतें ।
सादृश्य पुरतें हरिनाम ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम यशोदेच्या घरीं ।
वनीं गायी चारी यमुने तटीं ॥ २ ॥
सुलभ आगमनिगम ।
तो हा आत्माराम गोपवेषें ॥ ३ ॥
निवृत्तीचे पार गयनीचें गुज ।
मज मंत्रबीज उपदेशिलें ॥ ४ ॥

अर्थ:-

सर्व चराचर अस्थिर आहे त्यात स्थित्यंतर होत असते त्यात परब्रह्म फक्त स्थिर आहे. त्या सादृश्य गुणातीत परमात्म्याचे नामच परिपूर्ण आहे. तेच परब्रह्म यशोदामातेच्या घरातील गायी यमुने तीरी चारत आहे. सर्वांना अगम्य असणारा हा परमात्मा मात्र गोपाळांशी सोपा झाला व गोपवेशे धरुन त्यांच्यात वावरु लागला निवृत्तिनाथ म्हणतात सर्वा पलिकडे असणारे ते ब्रह्म नाम मंत्राच्या आधारे प्राप्त करुन घेण्याचे गुज गौप्य श्री गुरु गहिनीनाथांमुळे मला प्राप्त झाले.


३७
स्थिर धीर निर सविचारसार ।
ब्रह्मांड आगर गोपवेषें ॥ १ ॥
तो हा कृष्ण सखा नंदाघरीं देखा ।
यशोदे सन्मुखा दूध मागे ॥ २ ॥
कळिकाळ कळिता काळ आकळिता ।
आपण स्वसत्ता विश्व हरी ॥ ३ ॥
निवृत्ति निकट ज्ञानदेव धीट ।
खेचरासि वाट गुरुनामें ॥ ४ ॥

अर्थ:-

तो गोपवेष घेऊन आलेला परमात्मा म्हणजे निर्गुण, शांत, स्थिर, सर्व विचारांचे सार व ह्या ब्रम्हांडाचे उत्पत्ती स्थान आहे. तो हा सखा कृष्ण नंदाघरी यशोदे कडे दुध मागताना पाहु शकता. तोच आपल्या सत्तेने कळिकाळाला धरुन ठेवतो व काळाची शक्ती त्याच्या आधिन असते.निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या आकलनामुळे ज्ञानदेव ब्रह्मैक्याला व खेचर गुरु कृपेने ब्रह्म वाटेला लागले.


३८
नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध ।
जन वन बोध ब्रह्मरसें ॥ १ ॥
तें मेघःशाममूर्ति स्वरूप गोजिरी ।
गोकुळींची चोरी करि कृष्ण व २ ॥
मुद्दल शामळ नित्यता अढळ ।
अखंड अचळ स्वरूप ज्याचें ॥ ३ ॥
निवृत्ति पुरता गुरु विवरण ।
गयनीची खूण आगमरूपें ॥ ४ ॥

अर्थ:-

सर्व जगता मध्ये तो परमात्मा एक रसाने व्यापला आहे तो परमात्मा आपला विस्तार प्रबंधात्मक रुपाने बोध करुन देत आहे. तोच परमात्मा ढगाच्या रंगाचे सावळे सगुण रूप घेऊन गोकुळात चोरी करतो. असे सतत नित्य, अखंड, अचळ, अढळ असे स्वरूप काळा जसा शूद रंग म्हणजे दुसरा रंग मिसळा तरी सावळेपण न सोडणारा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथा मुळे पुर्ण स्वरूप असलेले वेदाना आगम्य असलेले परमात्म स्वरुप मला समजले.


३९
पियूषी पुरतें कासवी ते विते ।
संपूर्ण दुभतें कामधेनु ॥१॥
तेंचि हें डोळस सांवळे सुंदर ।
यशोदे सकुमार बाळकृष्ण ॥२॥
मधुर क्षारता माधवीं अखंड ।
दिनकाळ प्रचंड आत्माराम ॥३॥
निवृत्तिचें ताट पियूष पुरतें ।
कांसवी दुभतें वाढियेसि ॥४॥

अर्थ:-

कासवीचे दुध फक्त तिच्या पिला पुरते असते तर कामधेनुचे दुध तिच्या वासरासकट सर्वांसाठी वापरता येते. गाय जशी सर्वांना दुध देऊन तृप्त करते तसे परब्रह्म सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. तोच परमात्मा आपल्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सुकुमार सावळा बाळकृष्ण यशोदेचा पुत्र बनुन गोकुळात आला आहे. जसे वृक्ष एका विशिष्ट काळात मधुर, आंबट तुरट फळे देतात तसे काळाचे बंधन ह्या परमात्म्याला नाही तो भक्ताला कालातीत होऊन तृप्त करतो. निवृत्तिनाथ म्हणतात कासवी जशी आपल्या पिलास दुध देऊन वाढवते तसे भंगवता तुम्ही मला हे ज्ञानामृत देत आहात.


४०

निर्दोषरहित सर्व गुणीं हेत ।
द्वैत विवर्जित अरूप सदां ॥१॥
तें रूप स्वरूप कृष्ण बाळलीला ।
माजि त्या गोपाळा सदा वसे ॥२॥
गुणागुणी धीट वासना अविट ।
तद्रूप प्रगट निरंजन ॥३॥
विकार विवर्जित विवरण सोपे ।
अकार पैं लोपे एका नामें ॥४॥
निःसंदेह छंद वासनेचा कंद ।
ब्रह्माकार भेद नाहीं सदा ॥५॥
निवृत्ति परिवार ब्रह्मरूप गोकुळीं ।
वृंदावन पाळी यमुनातटीं ॥६॥

अर्थ:-

गुणातित, निर्दोष द्वैत नसलेले अरुप निर्गुण असलेले हे परमात्म स्वरुप आहे. असे ते निर्गुण रूप गोकुळात सगुण कृष्ण रुप घेऊन गोकुळात गोपाळासह लिला करत आहे. ते परब्रम्ह तद्रुप, निरंजन स्वरुपात असुन सगुण साकार होते तेंव्हा त्याला गुण वासना शिवत ही नाहीत. तेच परब्रह्म निर्विकार असुन त्याचा आकार नामात लोप पावतो. व त्या नामामुळे त्याचे विवरण करणे सोपे होते. वासनेचा त्याग करुन त्या परमात्म्याचा छंद धरला तर ते ब्रह्म साधकास प्राप्त होते व त्या साधकापाशी भेद राहात नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा त्या वृंदावनात यमुनेतटी राहात होता त्यांच्या सोबत मी परिवारासह होतो.


४१
परेसि परता पश्‍यंति वरुता ।
मध्यमे तत्त्वता न कळे हरी ॥१॥
तें हें कृष्णरूप गौळियांचे तप ।
यशोदे समीप समीप नंदाघरी ॥२॥
चोखट चोखाळ मनाचे मवाळ ।
कांसवीचा ढाळ जया नेत्रीं ॥३॥
निवृत्ति सर्वज्ञ गुरूची धारणा ।
ब्रह्म सनातना माजि मन ॥४॥

अर्थ:-

तो परमात्मा परेहून परता व पश्यंतीच्या वर आहे. मध्यमेला म्हणजे जिव्हेच्या प्रकाराना ही तत्वता तो कळत नाही. तेच हे कृष्णरुप गौळियांच्या तपामुळे यशोदेच्या निकट नंदाचा घरी अवतीर्ण झाले. तो हा परमात्मा शुध्द, निर्मळ, व कोमल असुन कासवी जशी पिलांना नजरेतुन प्रेमपान्हा देते तसा भक्तांना देत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात माझ्या सर्वज्ञ श्री गुरुंमुळे तो परमात्मा ब्रह्मसनातन स्वरुपात माझ्या मनात राहतो.


४२
रूप नाम अरूप रूपाचें रूपस ।
कांसवी डोळस निगमागमें ॥१॥
तो हा ब्रह्मामाजि गोपाळ सांगाती ।
यशोदे हो प्रति दूध मागे ॥२॥
जो रेखा अव्यक्त रेखेसिहि पर ।
दृश्य द्रष्टाकार सर्वाभूतीं ॥३॥
निवृत्ति तटाक चक्रवाक एक ।
वासनासि लोक गुरुनामें ॥४॥

अर्थः-

जसे कासवीचे डोळे विशेष असतात त्याच्या माध्यमातुन ती पिलांचे पालनपोषण करते तश्या दृष्टीने पाहिले तर ज्याला रुप नाही असे निर्गुण परमतत्व नामाने रुपास आले. आहे. तोच परमात्मा गोपाळांना सांगाती घेऊन यशोदे कडे दूध मागत आहे. जे अव्यक्त रुप म्हणजे शुन्याचे प्रतिक आहे पण शुन्य दाखवताना ही गोलरेखा काढावी लागते म्हणजे तिला मर्यादा असते पण ह्याच्या शुन्यत्वाला मर्यादा नाहित. तो दृष्य, द्रष्टत्व व द्रष्टा ह्या त्रिपुटीलाही परे आहे. निवृत्तिनाथ म्हणतात जसे चक्रवाकाचे मैथुन दिसत नाही नर ह्या तर मादी त्या तटावर असते तसे गुरुकृपेने मी व वासना यांची भेट होत नाही.


४३
वर्ण व्यक्ति सरवे वर्णाश्रम मुखें ।
ब्रह्मनाम सौख्य योगीजन ॥१॥
तें हें कृष्ण नाम देवकीसबळ ।
वसुदेवकुळ गोपवेषे ॥२॥
धर्म धरि धार धारणा धीरट ।
निरालंब पीठ सौख्य शोभा ॥३॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग ।
गुरुनामें पांग हरे एक ॥४॥

अर्थ:-

योगीजन सुध्दा जीवन पोषणासाठी आपल्या वाटेला आलेला व्यवसाय करुन तसेच आपल्या वर्णातील लोकांच्या साहाय्याने विवाह करुन जीवन व्यतीत करत असतात. अशा योगीजनांचे परब्रह्म देवकीच्या पोटी जन्माला येऊन वसुदेवाच्या घरी गोपवेशात वावरत असुन त्यामुळे त्यांचे भाग्य उजळले आहे. ते परब्रम्ह निरलंब स्थानात सौख्याने राहात असताना धर्माला धारण करुन धर्मरक्षण करते. निवृत्तिनाथ म्हणतात मला त्याचे ब्रह्मस्वरुप. मी माझ्या गुरुंच्या केलेल्या नाम चिंतनामुळे कळले.


४४
मंगल मांगल्य ब्रह्म हें सखोल ।
ब्रह्मरूपें खोल ब्रह्म भोगीं ॥१॥
तें हें कृष्ण नाम वोळलें त्या नंदा ।
आनंदें यशोदा गीत गात ॥२॥
विश्वाद्य वेदाद्य श्रुतीसी अभेद्य ।
तें ब्रह्मपणे वंद्य ब्रह्म भोगी ॥३॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग ।
गुरुनामें पांग हरे एक ॥४॥

अर्थः-

ते हे ब्रह्म सर्व मंगलाचे मांगल्य असुन योगी सखोल चिंतन करुन ह्याचे ब्रह्मपण भोगतात तेच परब्रह्म कृष्ण नाम घेऊन नंदाच्या घरी आवतरले व त्यामुळे गीत गाऊन यशोदा आनंद व्यक्त करते. जे वेदांचे आद्य, जे विश्वाची सुरवात जे श्रुतीला अभेद्य असलेले ब्रह्म त्याच्याशी समरसुन योगी त्याचा भोग घेतात. ॐ कारचे ध्यान सहखदळ चक्राचे अंतर्गत मूर्ध्नि स्थानी करतात. ॐ कार स्वरुप होऊनच ॐकाराचे ध्यान करावे. व ते करण्यासाठी वेद किंवा इतर ग्रंथानी त्या ब्रह्मस्वरुपाचे वर्णन केले आहे त्याचे चिंतन करुन केले तर फलद्रूप होते. वेदांनी वर्णन केलेले हे अद्वैत ब्रह्म निराकार असुन ते एकटे आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या गुरुनी मला अमरत्व दिले त्यांनी व गोरक्षनाथांनी ज्या निगमस्थानी रहिवास केला तेथेच मी ही त्यांच्या सोबत राहिलो.


४५

ज्ञानेंसे विज्ञानी उन्मनि निमग्न ।
द्वैत रूपें भग्न उरो नेदी ॥१॥
तोचि हा गोपाळ गोपिसंगे खेळे ।
गो गोपाळ मेळे नंदाघरीं ॥२॥
दृश्य द्रष्टा सर्व तितिक्षा उपरती ।
श्रुतीसी संपत्ति येथें जाण ॥३॥
निवृत्ति सधर गोरक्ष गयनी ।
ब्रह्मरूपी पूर्णी समरसे ॥४॥

अर्थ:-

ज्ञान म्हणजे स्वरुपाची ओळख व विज्ञान म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी जाणारी निश्चयात्मक बुध्दी आणी उन्मनी म्हणजे अवस्था, ते ब्रह्म ह्या तिन्ही मध्ये मग्न असते ते द्वैताला जवळ ही येऊ देत नाही. तोच हा गोपाळ सगुण रुप धारण करून गोपाळांच्या मेळ्यात गोपिकांबरोबर खेळत आहे व नंदा घरी वास करते. तो ब्रह्म द्रष्टा दृष्य द्रष्टत्व ह्या त्रिपुटीचा आधिष्टाता असुन तो तितिक्षा म्हणजे शम दम विकारांना सहन करणारा व उपरती म्हणजे वैराग्य ह्या श्रुतीनी सांगितलेल्या संपत्तीने युक्त आहे. निवृत्तिनाथ म्हणतात गोरत्ष व गयनी ह्या नाथांच्या वैचारिक आधाराने मी ह्या ब्रह्मस्वरुपाशी समरस झालो.


४६
ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न ।
आपण चिद्धन वैकुंठी रया ॥१॥
तें रूप सखोल कृष्ण रूपें खेळें ।
नंदयशोदेमेळें गोपीसंगें ॥२॥
नित्यता प्रकाश सर्व पूर्ण सार ।
आपण श्रीधर सर्व सुखें ॥३॥
तेंची हें रूपडें कृष्णनामें पिकलें ।
यमुने स्थिरावलें वेणू वातां ॥४॥
ज्योतिरूपें कीर्ण अनंत विस्तार ।
ब्रह्मांड आकार अनंतकोटी ॥५॥
निवृत्ति सोज्वळ नित्य नुतन सोय ।
आपणची होय गोपरूपें ॥६॥

अर्थः-

दृष्य द्रष्टा द्रष्यत्व ह्या त्रिपुटीचा आधिष्टानाने युक्त असे ते परब्रम्ह असुन ते चिद्धन अशा वैकुंठात राहते. ते परब्रह्म सगुण साकार होऊ नंद यशोदे सह गोपिकांशी खेळ खेळते. ज्याच्या अंगाच्या प्रकाशाने हे जगत प्रकाशमान होते तो सर्व सुख ज्याच्याकडे आहे आसा हा श्रीधर परमात्मा आहे. आशा ह्या परमात्माचे पुर्ण पिकलेल्या फळा सारखे कृष्णरुप जेंव्हा बासरी वाजवते तेंव्हा यमुनाही पांगुळते. त्या परमान्याच्या अलौकिक प्रकाशातुन निघणारा एक किरणातुन अनंत ब्रम्हांडे प्रसवत असतात. निवृत्तिनाथ म्हणतात आशी ही नित्य सोज्वळ सोय कृष्णरुपामुळे झाली असुन तो गोपरुपाने भक्ताशी एकरुप होतो.


४७
गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं ।
जीव शिव पोखी कारण सिद्ध ॥१॥
तेची हें सांवळें स्वरूप गोजिरें ।
कृष्णनाम खरें नंदाघरीं ॥२॥
पृथ्वीचें तळवट अनंत विराट ।
आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥
निवृत्ति तप्तर लक्षते स्वानंद ।
नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥

अर्थ:-

गगनाहुन जास्त लांब जाणारी दृष्टी असलेले परब्रह्मा मुळे जीव व शिवाची वाढ होते. ते सिध्द तत्व आकाशाहुन मोठे व सर्वांच्या परे आहे. तेच तत्व सगुण सावळे कृष्णरुप घेऊन नंदाच्या घरी अवतरले आहे. मोठेपणाचे माप असलेली पृथ्वी हि त्याच्या पायाशी असुन ते पृथ्वीपेक्षा विराट आहे. ते तत्व श्रीकृष्ण बनुन गोपीसवे क्रीडा करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वानंदासाठी तत्पर असुन त्यावर लक्ष ठेऊन हा आनंद नित्य उपभोगत असतो.


४८
नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा ।
आणि ते महेंन्द्र नानस्थानी ॥१॥
तें रूप खेळत गौळियांच्या संगे ।
पुंडलिका मागे भीमातीरी ॥२॥
उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग ।
दुजियाचा संग नाहीं ज्यासी ॥३॥
निवृत्ति प्रगट गुरुमंत्र फळद ।
गोपाळ विद्नद ब्रह्म सेवी ॥४॥

अर्थ:-

ब्रह्मदेव. इंद्रादिक देव हे हि ह्या परब्रम्हाचे स्वरुप जाणत नाहीत. आपल्या स्थानीचे मुख्य असलेले सुर्य चंद्र शेषादी ही ह्या स्वरुपाला पासुन अनभीज्ञ आहेत. तेच स्वरुप कृष्ण रुप घेऊन गोपिकांबरोबर खेळते व तेच पुंडलिका साठी भीमातीरी आले आहे. त्या स्वरुपाला सुरवात व अंत ही नाही व असंग असल्यामुळे कोणाशी ही संग नाही. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीच्या नाममंत्राचा सतत जप केल्याने त्या स्वरुपाची सेवा करुन तो मंत्र मला फलदायी झाला.


४९
सिद्धीचे साधन नेणती ।
ते सिद्ध अधिक उद्धोध आनंदाचा ॥१॥
तें रूप सांवळें देवकीये लीळे ।
भोगिती सोहळे कृष्णरूपें ॥२॥
उन्मनी अवस्था लाविती ते मुनी ।
अखंडता ध्यानीं कृष्णसुख ॥३॥
निवृत्ति ठकार श्रुतीचा आकार ।
गोपाळ साकार अंकुरले ॥४॥


५०

नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं ।
दुजियाची गोष्टी नाहीं तेथें ॥१॥
तें रूप सुंदर देवकी उदरीं ।
वसुदेव घरीं कृष्ण माझा ॥२॥
ब्रह्मांडकडवा मनाचा वोणवा ।
साधितां राणिवा हारपती ॥३॥
निवृत्ति सुंदर कृष्णरूप सेवी ।
गयनीगोसावी उपदेशिलें ॥४॥

अर्थ:-

जो परमात्मा ब्रह्मांड व बैकुळात नाही तो परमात्मा सर्वत्र व्यापक स्वरुपात ओतप्रोत भरला आहे. तेच सुंदर रूप कृष्ण होऊन देवकीच्या पोटी व वसुदेवाच्या तुरुंगात म्हणजे तो आल्याने झालेल्या घरात अवतिर्ण झाले. तो परमात्मा ब्रह्मांड व मनाला परे असुन तो मनाच्या जाणिवा पासुन दुर आहे. निवृत्तिनाथ म्हणतात गोसावी गहिनीनाथांनी उपदेशामुळे मला ते कृष्ण रूप भोगता आले.


५१

खुंटले वेदांत हरपले सिद्धांत ।
बोलणें धादांत तेंही नाहीं ॥१॥
तें रूप पहातां नंदाघरीं पूर्ण ।
यशोदा जीवन कॄष्णबाळ ॥२॥
साधितां साधन न पविजे खूण ।
तो बाळरूपें कृष्ण नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति संपन्न सेवी गुरुकृपा ।
गयनीच्या द्विपा तारूं गेलें ॥४॥

अर्थ:-

वेदांतांत सिध्दांत असतात पण त्या पैकी एक ही ब्रह्मस्वरुपाचे यथार्थ वर्णन करु शकत नाही वेदांची धाव तेथे खुंटते. चारी वाणी ही त्याचे वर्णन करु शकत नाहीत. जे स्वरुप वेद पाहू शकले नाही ते नंदा घरी कृष्ण होऊन अवर्तिण झाले व तेच स्वरूप यशोदेचे जीवन झाले. त्या नंदा घरी आलेल्या कृष्ण स्वरुपाला समजण्यासाठी साधना केली तरी ते कळत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गयनीनाथांचा ज्ञानरुपी दिपस्तंभामुळे माझा परमार्थचा प्रवास संपन्न झाला.


५२
तेथें नाहीं मोल मायाचि गणना ।
आपण येसणा ब्रह्मघडु ॥१॥
तें रूप साजिरें निर्गुण साकार ।
देवकीबिढार सेवियेले ॥२॥
नसंपडे ध्याना मना अगोचर ।
तो गोपवेषधर गोकुळीं रया ॥३॥
निवृत्ति धर्मपाठ गयनी विनट ।
कृष्ण नामें पाठ नित्य वाचा ॥४॥

अर्थ:-

त्याच्या स्वरुपाचे मोल करण्यास माया ही थिटी आहे. आपण किती ही केले तरी त्याच्या स्वरुपाला पोहचु शकत नाही. त्यास ब्रह्मस्वरुपाचे सगुण साकार रुप देवकीनी भोगले, जे स्वरुप ध्यान करुन ही सापडत नाही ते विनासायास गोपवेश घालुन गोकुळात आले. निवृत्तिनाथ म्हणतात जे धर्मपीठ श्री गहिनीनाथांनी भुषवले. त्या पिठात सतत कृष्णनामाचा घोष होतो.


५३
नाहीं छाया माया प्रकृतीच्या आया ।
मनाच्या उपाया न चले कांही ॥१॥
तें रूप स्वरूप अपार अमूप ।
यशोदे समीप खेळतसे ॥२॥
विश्वाचा विश्वास विश्वरूपाधीश ।
सर्वत्र महेश एकरूपें ॥३॥
निवृत्ति सर्वज्ञ नाममंत्रयज्ञ ।
सर्व हाचि पूर्ण आत्माराम ॥४॥

अर्थ:- ते परब्रम्ह ज्याला चारी हि शरिरे नाहीत त्यामुळे त्याची छाया ही नाही व शरिरच नसल्याने मायेला ही परे आहे. म्हणुन तेथे मनाचा ही उपाय चालत नाही. ते स्वरुप येवे विशाल आहे की त्याचे मोजमाप नाही होत ते स्वरुप यशोदे जवळ खेळते. तो परमात्मा नुसता जगाचा विश्वास नाही तर विश्वाचे रुपचे आहे. व तोच सर्वांचा महा देव आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या सर्व जगात पसरलेल्या स्वरुपाला मी कृष्णनामात पाहातो व सतत त्याचा जप करतो.


५४
प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा नेम ।
सर्वज्ञता तम गिळीतसे ॥१॥
तें रूप सकुमार गोपवेषधर ।
सर्वज्ञ साचार नंदाघरीं ॥२॥
त्रिपुर उदार सर्वज्ञता सूत्र ।
नाम रूप पात्र भक्तिलागीं ॥३॥
निवृत्ति संपदा सर्वज्ञ गोविंदा ।
सूत्रमणी सदा तेथें निमो ॥४॥

अर्थ:-

तो परमात्मा अज्ञानरुपी अंधकाराचा ग्रास घेऊन भक्तांचे रक्षण करण्याच्या प्रतिज्ञेला अनुसरून त्यांचे संरक्षण करतो. तेच सर्वज्ञ साचार असलेले स्वरूप गोपाळाचे रुप घेऊन आले आहे. त्रिपुरासुराला उदार होऊन सोन्यारुप्यालोहाची शहरे देणारा तो सर्वज्ञ असुन तो सुत्ररूपाने जगाचे धारण करतो. त्याच नामरूपांवर विश्वास असलेले त्याची भक्ती करतात. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा ब्रह्मांड माळेचा सुत्रमणी असुन त्याच्याशी मी एकरुप झालो.


५५

ज्ञानेंसि विज्ञास रूपेंसि सज्ञान ।
ध्यानेंसि धारणा हारपली ॥१॥
तें रूप संपूर्ण वोळलें हें खुण ।
नंदासी चिद्धन वर्षलासे ॥२॥
अरूप सरूप लक्षिता पै माप ।
नंदा दिव्य दीप उजळला ॥३॥
निवृत्ति संपूर्ण नामनारायण ।
सच्चिदानन्दघन सर्व सुखी ॥४॥

अर्थ:-

त्या स्वरुपाच्या ठिकाणी ईश्वर स्वरुपाचा निर्णय करणारे विज्ञानासहित स्वरुप सांगणारे स्वरुप ज्ञान व प्रकृतीच्या तत्वे सांगणारे सुक्ष्म ज्ञान ध्यानासह लयाला जाते. त्या परमात्म्याने नंदा घरी येऊन सर्वांवर चैतन्याचा वर्षाव केला, ज्याच्या अरुप स्वरुपा ला माप नाही तो प्रत्यक्ष नंदाकडे वंशरूप दिप होऊन तेवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ह्या नारायण नामाचा जप केला तर सच्चिदानंद सहज प्राप्त होतो.


५६
आदिरूप समूळ प्रकृति नेम ।
वैकुंठ उत्तम सर्वत्र असे ॥१॥
तें रूप संपूर्ण वोळलें परींपूर्ण ।
सर्व नारायण गोपवेष ॥२॥
आधारीं धरिता निर्धारीं ।
सर्वत्र पुरता एकरूपें ॥३॥
निवृत्ति साधन सर्वरूपें जाण ।
एकरूपें श्रीकृष्ण सेवितसे ॥४॥

अर्थः-

एकट्या परब्रह्माला जेंव्हा एकटेपण जाणवतो तेंव्हा तो प्रकृती तयार करून जगतरुपी वैकुंठ तयार करतो. तोच परमात्मा गायी गोपाळांच्या जागी अंशात्मक रुपाने आला व संपुर्ण जगाताचे रुप परिपुर्ण केले, योग्यांनी निर्धारानी धारण केलेल्या ध्यानातुन सर्वत्र तोच अनेक रुपाने प्रकट होतो. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा जरी अनेक रुपानी प्रगट झाला तरी श्रीकृष्ण रुपात त्याला एकत्वाने पाहता येते.


५७
वैकुंठ कैलास त्यामाजी आकाश ।
आकश‍अवकाश धरी आम्हा ॥१॥
तें रूप सुघड प्रत्यक्ष उघड ।
गौळियासी कोड कृष्णरूप ॥२॥
न दिसे निवासा आपरूपें दिशा ।
सर्वत्र महेशा आपरूपें ॥३॥
तारक प्रसिद्ध तीर्थ पै आगाध ।
नामाचा उद्धोध नंदाघरीं ॥४॥
प्रकाशपूर्णता आदिमध्य सत्ता ।
नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥५॥
निवृत्तिसाधन कृष्णरूपें खुण ।
विश्वीं विश्वपूर्ण हरि माझा ॥६॥

अर्थः-

वैकुंठलोक व कैलासलोक ज्या अवकाशात आहे त्यांने आम्हाला धारण केले आहे. तो ज्या जगत स्वरुपात प्रगट झाला तेच कृष्णरुप आहे हे पाहून गौवळी त्याचे कोड पुरवत आहेत. त्याच्या निवास पाहु गेले तर तो सर्वत्र जगत स्वरुपात दिसतो व सुक्ष्म रुपात पाहिले तर स्वतःत दिसतो. जी तीर्थे उध्दाराचे काम करता करता लोप पावली त्यांना तो नंदाघरच्या कृष्ण नामाने जागृत करतो. प्रकाशाची पूर्णता त्याच्याकडे आहे. आदि मध्य अंतावर त्याचे राज्य आहे व तो द्वैता अद्वैतात सापडत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा चराचरात असुन सर्व विश्वात विश्व होऊन असतो.


५८
निरशून्य गगनीं अर्क उगवला ।
कृष्णरूपें भला कोंभ सरळु ॥१॥
तें रूप सुंदर गौळियांचे दृष्टी ।
आनंदाचि वृष्ट्सी नंदाघरीं ॥२॥
रजतमा गाळी दृश्याकार होळी ।
तदाकार कळी कृष्णबिंबें ॥३॥
निवृत्ति साकार शुन्य परात्पर ।
ब्रह्म हें आकार आकारलें ॥४॥

अर्थः-

शुन्यवत नसलेल्या अवकाशत एक प्रकाशमान सूर्य अवतरला व तोच श्रीकृष्ण रुपात कोंभ पावले. त्या गौळ्यांच्या दृष्टीने सावळ्या सुंदर असलेल्या कृष्णाने नंदाघरी आनंदाचा पाऊस पाडला. त्याच कृष्ण रुपावर एकत्व केल्यावर दृष्याकार रजो व तमो गुणांची होळी होते. सत्व कृष्ण रुपाने उरते. निवृत्तिनाथ म्हणतात ते रुप परात्पर शुन्या पलिकडील आहे व तेच कृष्ण रुपाने साकारले आहे.


५९
निरालंब सार निर्गुण विचार ।
सगुण आकार प्रगटला ॥१॥
तें रूप सुंदर शंखचक्रांकित ।
शोभे अनंत यमुनातटीं ॥२॥
अपार उपाय आपणचि होय ।
सिद्धीचा न साहे रोळु सदा ॥३॥
सर्व हें घडलें कृष्णाचें सानुलें ।
घटमठ बुडाले इये रूपीं ॥४॥
सर्वसुखमेळे नामाकृती वोळे ।
सिद्धिचे सोहळे कृष्णनामीं ॥५॥

अर्थ:-

जे परब्रम्ह कोणावर अवलंबुन नाही ते निर्गुण आहे ते सगुण होऊन साकारले. शंखचक्रगदा घेऊन ते सुंदर रुप घेऊन यमुना तटी आले. जो अपायांवर उपाय आहे. त्याकडे येण्यास अष्टमा सिध्दी ही स्वतःला रोखु शकल्या नाहीत. कृष्ण रुपात ज्या • लिला केल्या त्यामुळे भगवान लहान दिसत असले तरी अमर्याद शक्ती ठेऊन असतो. त्याच्या त्या सानुल्या रुपात घट मठादी सिध्दांत लोप पावले. हे कृष्ण नाम घेतलावर सर्व सुखाची प्राप्ती तसेच सर्व सिध्दी ही आपसुक मिळतात. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या नामप्रभावामुळे घट व मठातील पोकळी ही भरते म्हणजे सिध्दांत सिध्द होतात. हे सामर्थ त्या कृष्ण नामात आहे.


६०

ज्या नामें अनंत न कळे संकेत ।
वेदाचाही हेत हारपला ॥१॥
तें रूप सानुलें यशोदे तान्हुलें ।
भोगिती निमोले भक्तजन ॥२॥
अनंत अनिवार नकळे ज्याचा पार ।
जेथें चराचर होतें जातें ॥३॥
निवृत्तिसंकेत अनंताअनंत ।
कृष्णनामें पंथ मार्ग सोपा ॥४॥

अर्थ:-

अनंत नाम असणाऱ्या परमात्याचे यथार्थ वर्णन करायला वेदांचा ही विचार खुंटला, तो परमात्मा यशोदेच्या घरी तान्ह्या रुपात आल्यावर भक्तांना ही विनासायास त्याचा लाभ झाला अनंत व अनिवार रुपाच्या परमात्माचा पार लागत नाही. त्याच्यात अनेक चराचरे घडत व बिघडत असतात निवृत्तिनाथ म्हणतात अनंत असलेला परमात्मा जाणण्याचा उपाय म्हणजे कृष्णनामपंथ होय.


६१
विश्वाद्य अनाद्य विश्वरूपें वंद्य ।
आणि हा अभेद भेद नाहीं ॥१॥
तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें ।
यशोदे निर्धारे प्रेमसुख ॥२॥
हारपती दिशा सृष्टीचा कडवसा ।
आपरूपें कैसा वोळलासे ॥३॥
निवृत्तिसाधन वसुदेवखूण ।
गोपिकाचें धन हरी माझा ॥४॥

अर्थ:-

हा परमात्मा विश्वाचा आरंभ आहे. विश्वरुपाचे दर्शन घडवणारा वंद्य आहे. त्याला आदि मध्य अंत देश काल हे भेदाभेद नाहीत. ज्या रुपावर नंदाचे प्रेम जडले ते कृष्ण रुपावर यशोदा ही प्रेमासक्त आहे. जेथे दिशाज्ञान व जगत ज्ञान हारपते तोच जीवनदाता पाण्याच्या व प्रकाशाच्या कवडस्याच्या रुपाने प्रतित होतो. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा वसुदेवाची ठेव व गोपीचे धन बनुन नंदाकडे आहे.


६२
निराकृती धीर नैराश्य विचार ।
परिपूर्ण साचार वोळलासे ॥ १ ॥
तें रूप रूपस सुंदर सुरस ।
तो पूर्ण प्रकाश गोकुळीं रया ॥ २ ॥
नानारूप हरपे दृश्य द्रष्टा लोपे ।
तो प्रत्यक्ष स्वरूपें नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति सादर निराकार अंकुर ।
साकार श्रीधर गोपवेष ॥ ४ ॥

अर्थ:-

तो परमात्मा निराकार आशारहित तरी सर्व गुणानी परिपूर्ण होऊन अवतरला आहे. त्या सुंदर सुकुमार व सुरस रुपातुन प्रत्यक्ष प्रकाश होऊन गोकुळात आला आहे. जाच्या स्वरुपात अनेक रुप हरपतात दृष्यादृष्यत्व विलीन होते तो नंदा घरी कृष्णरुपात अवतरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात गोपाळ वेशात अंकुरलेला तो कोंभच कृष्णरुपातील साकार परमात्मा आहे.


६३
आदि मध्ये वावो अवसान अभावो ।
पाहाताती निर्वाहो हरपला ॥ १ ॥
तें रूप माजिटें गोपवेश खेळे ।
नंदाचे सोहळे पुरविले ॥ २ ॥
धन्य ते यशोदा खेळवी मुकुंदा ।
आळवीत सदा नित्य ज्यासी ॥ ३ ॥
निवृत्तिसधर ब्रह्मरूपसार ।
वृत्तीचा विचार हरपला ॥ ४ ॥

अर्थ:-

आदि मध्य अंत रहित असलेला हा परमात्मा पाहावयास गेले तर त्या स्वरुपात सापडत नाही. तेच रुप सगुण रुपात गोपवेशात नंदा घरी अनेक प्रकारचे खेळ खेळत आहे. ती यशोदा धन्य आहे जी त्या मुकुंदास विनवण्या करुन खेळवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो परमात्मा सर्व साराचे सार असुन तिथे वृतींची निवृत्ती होते. त्या तदाकार बनतात.


६४
जेथें रूप रेखा ना आपण आसका ।
सर्व रूपें देखा हरि माझा ॥ १ ॥
तें रूप गोजिरें नंदाघरीं असे ।
जनीवनीं दिसे गोपिकांसि ॥ २ ॥
नादभेद कळा जेथें भेद नुठी ।
ब्रह्मरूपें तुष्टि अवघी होय ॥ ३ ॥
निवृत्ति जन जन वन देख ।
आत्मरूपभाव ब्रह्म जाला ॥ ४ ॥

अर्थ:-

ज्या रंग नाही. रुप नाही. असा जो माझा हरि आहे. तोच सर्वत्र सर्व रुपानी नटला आहे. तोच परमात्मा नंदा घरी सगुण रुपात आल्यावर त्या गौवळणी येवढ्या मुग्ध झाल्या की जना वनात त्याला त्याच रुपात म्हणजे कृष्ण रुपात पाहु लागल्या. ज्याच्या मध्ये ध्वनीचे नाद किंवा भेद नाहीत तो अभेद असुन त्यांने ह्या कृष्णब्रह्मरुपात सृष्टीची तृषा तृप्त केली आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या त्या रुपाने माझा आत्मभाव त्याच्याशी एकरुप झाला म्हणुन मी जनी विजनी त्यालाच पाहात आहे.


६५

मध्यबिंदनाद उन्मनि स्वानंद ।
रूपरस गोविंद गुणनिधी ॥ १ ॥
तें रूप सुरवर सेविती अरुबार ।
नित्यता सविचार भोगिताती ॥ २ ॥
गौळिया गोजिरें दैवत साचारें ।
नंदासि एकसरे प्रेम देत ॥ ३ ॥
निवृत्ति निवाला प्रेमरसें धाला ।
सर्व सुख डोळा हरिकृष्ण ॥ ४ ॥

अर्थः-

मध्य बिंद म्हणजे ॐकाराचा वरचा बिंदु ज्याला शुन्य म्हणा पण ह्या शुन्यात निर्मिती आहे. किंबहुना येथुन सुरवात आहे. ते स्थान शरिरात दोन डोळ्यामध्ये आहे तेथे उन्मनी अवस्थेत जो ब्रह्मानंद होतो तो स्वानंद सकल गुणाचा स्वामी गोविंद आहे. त्याच रुपा नित्य स्मरण करुन सुरवर सुख अनुभवतात, ते गोजिरे दैवत गोकुळात गौळी व नंद यांना प्रेम देत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ते सर्व गोकुळातील सुख मी माझ्या डोळ्यानी पाहिल्यामुळे निवांत झालो आहे.


६६
विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी ।
नामाची पर्वणी भक्तांलागी ॥ १ ॥
तें रूप संपूर्ण वसुदेवाकुळीं ।
यादव गोपाळीं वोळलासे ॥ २ ॥
व्यापकपण धीर ब्रह्मांड साकार ।
तें रूप तदाकार भाग्ययोगें ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट आपण वैकुंठ ।
कृष्णनामें पेठ गोकुळीं रया ॥ ४ ॥

अर्थ:-

विश्वाची निर्मिती केल्यावर निरंजनी राहिलेल्या ह्या परमात्माच्या नामाची पर्वणी नामसाधना करुन भक्त साधतात. तोच परमात्मा वसुदेवाच्या कुळात जन्मुन यादवकुळी गोकुळात राहिला गेला. ह्या विश्वाचा आधार तो परमात्मा असुन तो तदाकार रुपाने प्रतित होतो. निवृत्तिनाथ म्हणतात त्या घनवट परमात्माने कृष्णनाम योगाने गोकुळात वैकुंठ पेठ निर्माण केली.


६७
विश्वंभरमूर्ति विश्वाचे पाळक ।
वैकुंठव्यापक जीवशिव ॥ १ ॥
तें रूप सुंदर नंदाघरीं वसे ।
जनीवनीं वसे कृष्णरूप ॥ २ ॥
निखळ निघोट नितंब परिपूर्ण ।
आनंदपुर्णघन गोपवेषें ॥ ३ ॥
निवृत्ति परिकर वैकुंठ अपार ।
भाग्य पारावार यशोदेचें ॥ ४ ॥

अर्थ:-

विश्वाचे भरणपोषण तो परमात्मा विश्वाचा पालक आहे तो वैकुंठा पासुन जीवशिवा पर्यंत सर्वत्र तोच आहे. जनीवनी असलेले ते सर्वव्यापक रूप कृष्णरुपाने गोकुळात नंदाघरी आले. तो नितळ, निघोट परमात्मा कंबरेला पितांबर बांधुन गोपवेशात साकार झाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या सुंदरतेला मर्यादा नाहीत असा तो परमात्मा यशोदेचे मुल होऊन गोकुळात राहतो हे तिचे भाग्य आहे.


६८
त्रिभंगी त्रिभंग जया अंगसंग ।
एकरूप सांग वोघवतसे ॥ १ ॥
तें रूप सावळें भाग्ययोगें वोळे ।
नंदाचे सोहळे पाळियेले ॥ २ ॥
श्रुतिप्रतिपाद्य शास्त्रांसि जें वंद्य ।
निर्गुणाचें आद्य भाग्यनिधि ॥ ३ ॥
निवृत्ति नितंब रूपस स्वयंभ ।
कृष्णनामें बिंब बिंबलेंसे ॥ ४ ॥

अर्थ:-

जरी कृष्ण रुपात तिन ठिकाणी वाकडा देहुडा असलेला परमात्मा मात्र एकात्मरुपाने जगात आहे. ते सावळे सुंदर कृष्ण रुप दैवयोगाने नंदाला प्राप्त झाले आहे. व ते नंदाचा आनंद द्विगुणित करत आहे. ज्याचे वर्णन करायचा प्रयत्न वेद व शास्त्र करतात जो वेदांना वंद्य आहे. ते निर्गुण गणातीत स्वरुप आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्या पितांबरधारी सुंदर रुपाने माझा अंतःकरणाला व्यापले आहे.


६९
ज्याचे स्मरणें कैवल्य सांडणें ।
एका नामें होणें चतुर्भुज ॥ १ ॥
तें रूप वैकुंठ भोगिती गोकुळीं ।
नंदाचिये कुळीं बाळकृष्ण ॥ २ ॥
न संपडे ध्यानीं लावितां उन्मनी ।
तो गोपाळाचे कानीं सांगे मातु ॥ ३ ॥
निवृत्ति अरुवार कृष्णरूपी सेवी ।
मन ठाणदिवी ह्रदयामाजी ॥ ४ ॥

अर्थ:-

ज्या चतुर्भुज रुपाच्या नामाचे स्मरण जरी केले तरी त्या पुढे वैकुंठतील कैवल्याला ही फिकेपण येते. नंदाच्या घरी अवतरलेल्या त्या रुपामध्ये गोकुळाचे जन बैकुंठाचे सुख भोगतात. जे उन्मनी अवस्थेत समाधी लावलेल्यांच्या ध्यानात सापडत नाही ते रुप गोपाळाच्या कानाशी हितगुज करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी त्या रुपाच्या लामणदिवा बनवुन माझ्या हृदयात स्थापन केला व त्या योगे ज्ञानप्रकाश सुख उपभोगत आहे.


७०

विकट विकास विनट रूपस ।
सर्व ह्र्षिकेश दिसे आम्हां ॥ १ ॥
तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें ।
उन्मनिनिर्धारे भोगूं आम्हीं ॥ २ ॥
विलास भक्तीचा उन्मेखनामाचा ।
लेशु त्या पापाचा नाहीं तेथें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तें सुखरूप कृष्ण ।
दिननिशीं प्रश्न हरि हरि ॥ ४ ॥

अर्थः-

ह्य जगतात काही रुप विक्राळ, प्रचंड, कुरुप आहेत. व काही रुप सुंदर साजिरी असली तरी ती सर्व एकत्वाने त्या हृषिकेश रुपात एकवटली आहेत. पण सुंदर शोभिवंत असे नंदाच्या घरी अवतरलेले कृष्ण रुप आम्ही उन्मनी अवस्थेत भोगत आहोत. असे रुप ज्याच्या मनात संचरते त्याच्या मनात पापाचा लवलेशही राहात नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तोच सुखरुप असलेला परमात्मा कृष्णरुपनामाने हृदयातील नामरुप प्रश्नांचे नामरुप उत्तर होतो.


७१
गगनाचिये खोपे कडवसा लोपे ।
क्षरोनियां दीपें दृश्यद्रष्टा ॥ १ ॥
तें वोळलें गोकुळीं वसुदेवकुळीं ।
पूर्णता गोपाळीं गोपीरंगी ॥ २ ॥
जिवशिवसीमा नाहीं जेथें उपमा ।
हारपे निरोपमा तया माजी ॥ ३ ॥
निवृत्ति तत्पर वेदांचा ॐकार ।
ॐतत्सदाकार कृष्णरूपें ॥ ४ ॥

अर्थ:-

गगनाच्या घरात कवडसा पडण्याच्या जसा योग नसतो तसा दृष्य, द्रष्टा व दृष्यत्व ह्या त्रिपुटीचा लय त्याच्या रुपात होतो. त्याच रुपात ते गोपाळ व गौवळणी रममाण झाले. ते गोकुळात वसुदेवकुळातुन आले. ज्याला जीवशिवाची सिमा नाही कोणतीही उपमा नाही किंबहुना सर्व उपमा त्या रुपाच्या ठिकाणी संपतात निवृत्तिनाथ म्हणतात वेदांची सुरवात असणारा ओंकार, तोच त्या कृष्णरुपाशी तदाकार आहे त्यात मी निमग्न आहे.


७२
गगनीं उन्मनी वेदासी पडे मौनी ।
श्रुतीची काहणी अरुती ठाके ॥ १ ॥
तें ब्रह्म साबडे नंदाचिये घरीं ।
वनी गाई चारी गोपवेषें ॥ २ ॥
न पाहातां होय ब्रह्मांड पीठिका ।
ते युग क्षणिका हारपे रया ॥ ३ ॥
निवृत्तिदैवत कृष्ण परिपूर्ण ।
सर्वत्र जीवन सर्वीं वसे ॥ ४ ॥


७३
गनीं वोळलें येतें तें देखिलें ।
दर्पणीं पाहिलें बिंबलेपण ॥ १ ॥
तें रूप सुरूप सुरूपाचा विलास ।
नामरूपी वेष कृष्ण ऐसे ॥ २ ॥
सांडुनी धिटिंव जालासे राजीव ।
सर्वत्र अवेव ब्रह्मपणें ॥ ३ ॥
निवृत्ति घडुला सर्वत्र बिंबला ।
दर्पण विराला आत्मबोधीं ॥ ४ ॥

अर्थ:-

जसे दर्पणात पाहिले तर स्वस्वरुप दिसते, तसे परमात्म्याचे विश्वात्मक स्वरुप गगनी प्रकाश रुपाने भासते. त्याच विश्वात्मक रुपाने कृष्णावतारात सुंदर देखणे असे सावळे रुप घेतले आहे. व ते रुप धारण करुन धिटाईने राज्यकारभार पाहिला तरी त्याचे सर्व अवयव ब्रह्म स्थितीच होते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या स्वरुपाचे सर्वात्मक घटांत प्रतिबिंब दिसते. त्याच परमात्म्याचे ज्ञान होते ह्या भावनेचा लय त्याच्या स्वरुपात होतो.


७४
क्षीराचा क्षीराब्धि क्षरोनियां लोटे ।
वैकुंठ सपाटे पाटु वाहे ॥ १ ॥
तें माथे हरिरूप कृष्णरूप माझें ।
नेणिजे तें दुजें इये सृष्टीं ॥ २ ॥
सांडुनी उपमा गोकुळीं प्रगट ।
चतुर्भुजपीठ यमुनेतटी ॥ ३ ॥
निवृत्ति निकरा वेणु वाहे धरा ।
यमुने स्थिरस्थिरा नामध्वनी ॥ ४ ॥

अर्थ:-

क्षीरसागराला भरती ओहटी असली तरी वैकुंठात वाहणाऱ्या प्रेम पाटाचे पाणी समान वाहते. त्यात कमी जास्त होत नाही. त्या मायेने निर्मित केलेल्या कृष्णरुपाला पाहिले की मला सृष्टीतील दुसरे रुप पाहता येत नाही किंवा पहायचे नाही. अनुपम्य वैकुंठ लोकातील चतुर्भुज रुप सोडुन ते ब्रह्म गोकुळात कृष्णरुपात आहे. निवृतिनाथ म्हणतात त्या कृष्णरुपात वाजवलेल्या मधुर मुरली मुळे यमुनेचे अवखळ जळ ही स्थिर झाले.


७५
निरशून्य गगनीं अंकुरलें एक ।
ब्रह्मांड कवतुक लीळातनु ॥ १ ॥
तें माये वो हरि गोपिका भोगिती ।
शुखचक्राकृति कृष्ण मूर्ति ॥ २ ॥
निराभास आस निःसंदेह पाश ।
तोचि ह्रशीकेश नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ति प्रकार ध्यानाचा विचार ।
सर्वत्र श्रीधर यशोदेचा ॥ ४ ॥

अर्थ:-

त्या निराशुन्य आकाशातुन प्रगटलेल्या एका बीजाने आपल्या लिळेतुन हे जगत विस्तारले किंवा जन्माला घातले. तोच परमात्मा शंख चक्र घेऊन कृष्णरुपात गोकुळात अवतरला व त्याचे सुख तेथील गौवळणी नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, मी सर्वत्र त्या यशोदेच्या श्रीघराला पाहतो व तोच माझा ध्यानाचा प्रकार बनला आहे..


७६
निरोपम गगनीं विस्तारलें एक ।
अनंत हे ठक गणना नाहीं ॥ १ ॥
तो माय सांवळा यमुनेचे तटीं ।
कृष्ण तो जगजेठी यशोदेचा ॥ २ ॥
निराकृति आकार अंकुर गोमटे ।
तो गोपिकांसी भेटे भाग्ययोगें ॥ ३ ॥
निवृत्ति संपन्न कृष्णरूप ध्यान ।
गयनी तल्लीन नाम घेतां ॥ ४ ॥


७७
निराळ निरसी जीवशीवरसीं ।
सर्व ब्रह्म समरसीं वर्तें एक ॥ १ ॥
तें रूप परिकर कृष्णमूर्ति ठसा ।
गोपिकाकुंवासा नंदाघरीं ॥ २ ॥
संसाराचें तारूं ठाणमाण दिसे ।
शाम प्रभावसे तये ब्रह्मीं ॥ ३ ॥
निवृत्ति घनदाट कृष्ण घनःश्याम ।
योगी जनाध्यान नित्यरूपें ॥ ४ ॥

अर्थ:-

तो परमात्मा सर्व ठिकाणी जीवशिव स्वरुपात ओतप्रोत भरला आहे. व तोच एकत्वाने आपले ब्रह्मरुप सांगत असतो. तेच ब्रह्म सुंदर श्रीकृष्णरुप घेऊन गोपाळ व गोपकांचे आश्रयस्थान होण्यासाठी नंदाघरी आले आहे. सांजवातेतुन निघणाऱ्या प्रभे प्रमाणे ह्याचे श्यामवर्ण कृष्ण होऊन आले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात योगी ज्या रुपाचे ध्यान करतात ते घनश्याम रुप सर्व ठिकाणी भरलेले आहे. व ह्याचा मला अनुभव आहे.


७८
निरासि निर्गुण नुमटे प्रपंच ।
विषयसुक साच नाहीं नाहीं ॥ १ ॥
तें रूप गोजिरें कृष्णमूर्ति ठसा ।
तो गोपाळ समरसा माजि खेळे ॥ २ ॥
चित्ताची राहाविते आपणचि द्रष्टें ।
नेतसे वैकुंठा नाम घेतां ॥ ३ ॥
निवृतिसी ध्यान सर्व जनार्दन ।
वैकुंठ आपण गोपीसंगें ॥ ४ ॥

अर्थ:-

ते गुणातीत परब्रह्म जे निर्गुण आहे. त्यामुळे त्याचा विषयसुखाशी संबंधच येत नाही. हे नाही शब्दाची द्विरोक्ती करून सांगतात. तेच निर्गुणरुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोपाळांबरोबर त्यांच्या सारखे होऊन खेळ खेळत आहे. ते रुप चित्तात राहते व आपण आपणास पाहते व त्याचे धारण चित्तात करुन नामसाधना करणाऱ्या साधकास वैकुंठात नेते, निवृत्तिनाथ म्हणतात, तो परमात्मा गोपीसंगे राहतो त्याचे ध्यान केले की तो सर्व जनात प्रतित होतो.


७९
निरालंब देव निराकार शून्य ।
मनाचेंही मौन हारपलें ॥ १ ॥
तें रूप साबडें शंखचक्रांकित ।
यशोदा तें गात कृष्णनाम ॥ २ ॥
मौनपणें लाठें द्वैत हें न साहे ।
तें नंदाघरीं आहें खेळेमेळें ॥ ३ ॥
निवृत्ति आकार ब्रह्म परिवार ।
गोकुळीं साकारमूर्ति ब्रह्म ॥ ४ ॥

अर्थ:-

जो परमात्मा कोणावर अवलंबून नाही जो निराकार आहे. त्याच्या ध्यानाने मनाचे मौन्य हरपते. शंख चक्र ही आयुधे घेऊन ते कृष्ण रूप सहज सगुणात्मक साकार झाले आहे. ते कृष्णरुप निरागस होऊन हातात शंखचक्रनिरागसअवतरले आहे. त्याला माता यशोदा त्याचे नामगायन करुन रिझवते. निर्गुणरुपातील मौन स्तब्धता सोडुन ते गोपी समावेत खेळ खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या गोकुळात अवतरेल्या कृष्ण रुपाचा मी आश्रय घेतला आहे.


८०

दुजेपणा मिठी आपणचि उठी ।
कल्पना हे सृष्टि गाळूं पाहे ॥ १ ॥
तें कृष्णरूप गाढे यशोदा घे पुढें ।
दूध लाडेंकोडें मागतसे ॥ २ ॥
सृष्टीचा उपवडु ब्रह्मांडाचा घडु ।
ब्रह्मींच उपवडू उघडा दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति उघड ब्रह्मांडामाजि लोळे ।
नंदाघरीं खेळे गोपवेष ॥ ४ ॥

अर्थ:-

एकट्या असलेल्या परमात्माने आपल्या कल्पनेने जगतरुपाचा पसारा मांडला व ते द्वैताची निर्मिती करुन स्वतःला पाहू लागले. तोच परमात्मा कृष्ण रुप धारण करून यशोदे कडे लाडाकोडाने दुध दही मागत आहे. ज्या रुपात अनंत ब्रह्मांडे आहेत.ते कृष्णरुप नंदाघरी खेळीमेळेने राहते. निवृत्तिनाथ म्हणतात ते निर्गुण परब्रम्ह गोपवेशात नानाप्रकारचे खेळ करत नंदा घरी नांदत आहे.


८१
अरूप बागडे निर्गुण सवंगडें ।
खेळे लाडेंकोडे नंदाघरीं ॥ १ ॥
तें रूप संपुर्ण यशोदा खेळवी ।
कृष्णातें आळवी वेळोवेळां ॥ २ ॥
सागरजीवन सत्रावीची खुण ।
मेघ ती वर्षण वोळलीसे ॥ ३ ॥
निवृत्तिचें धन गोकुळीं श्रीकृष्णां ।
गयनी सहिष्णु प्रेमें डुल्ले ॥ ४ ॥


८२
मेघ अमृताचा जेथूनि पवाड ।
दुजियाची चाड नाहीं तेथें ॥ १ ॥
तें रूप अरूप सुंदर सावळे ।
भोगिती गोवळे सुखसिंधु ॥ २ ॥
विराट नाटकु वैराज जुनाटु ।
गोपवेषें नटु नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ति सत्वर सेवि सुखसार ।
प्रकृति आकार लोपें ब्रह्मीं ॥ ४ ॥

अर्थ:-

तो परमात्मा प्रेमामृताचा मेघ होऊन गोकुळाच्या अवकाशात आला आहे. त्याला दुसऱ्या कोणाच्या सहाय्याची गरज नाही. तोच रुप रहित अमृतमय परमात्मा सुंदर सावळे कृष्णरुप घेऊन गोकुळात आल्याचे सुख सगळे भोगत आहेत. त्या विराट आशा परमात्माला कोणी जोड नसल्याने त्याचे राज्य सर्वत्र असते. तोच परमात्मा गोपवेशात नंदाघरी राहत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या सुखरुप पणाचे प्रकृती, आकार विरहित रुप संत भोगतात.


८३
वैभव विलास नेणोनिया सायास ।
कल्पनेची आस नाहीं जेथें ॥ १ ॥
तें रूप दुर्लभ कृष्णमूर्तिठसा ।
वोतल्या दशदिशा नंदाघरीं ॥ २ ॥
योगियांचे ध्यान मनाचें उन्मन ।
भक्तांचे जीवन गाई चारी ॥ ३ ॥
निवृत्ति साकार ब्रह्मींचा प्रकार ।
ॐतत्सदाकार कृष्णलीला ॥ ४ ॥

अर्थ: –

जो परमात्मा अरुप आहे त्याच्या ठिकाणी वैभव, वितासांचे या नाहीत. कल्पनाचे आस नाही. त्या परमात्म्याला आकारच नाही त्याला दिशा मध्ये कसे असा तो नदारी दुर्लभ श्रीकृष्ण रूप घेऊन आला आहे. तोच परमात्माचे जरी असले तरी ते नंदाच्या गाई राखत आहे म्हणतात तो परमात्मा आपल्या लिला ॐ तत्सदाकार आहेत त्याच मंत्रात मी लीन आहे..


८४
ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी ।
तें नंदयशोदेघरीं खेळतसे ॥ १ ॥
त्रैलोक्यदुर्लभ ब्रह्मांदिका सुलभ ।
रुक्मिणीवल्लभ कृष्ण सांवळा॥ २ ॥
हिरण्याक्ष वधूनि दाढेवरी मेदिनी ।
तो हा चक्रपाणी यशोदेचा ॥ ३ ॥
रामावतारु गाढा दशशिरा रगडा ।
रिठासुर दाढा तेणेंपाडें ॥ ४ ॥
चतुर्भुज श्रीपति सुकुमार साजती ।
शंख चक्रांकिती हरि माझा ॥ ५ ॥
निवृत्ति ध्यानशूर सर्वरूपें श्रीधर ।
जिंकिला भौमासुर रणयुद्धीं ॥ ६ ॥

अर्थ:-

ज्या ब्रह्मांडाची निर्मिती त्या हरिने त्वरित केली तो नंद यशोदोच्या घरात खेळणारा हरिच आहे. तो रुक्मिणीचा पती सावळा कृष्ण त्रैलोक्याला अवघड व ब्रह्मादिकांना सोपा झाला आहे. दाढेवरी पृथ्वीचे हरण करणारा हिरण्याक्ष मारणारा तोच यशोदेचा कुंवर आहे. रामअवतारात दशानन रावणाला मारणारा व बैल झालेल्या रिठासुराच्या दाढा उपटणारा तोच आहे. तोच शंखचक्र घेतलेला सावळा सुकुमार माझा हरि आहे निवृत्तिनाथ म्हणतात त्याच शुर हरिने भौमासुराचा म्हणजेच नरकासुराचा वध केला.


८५

आदीची अनादि मूळ पैं सर्वथा ।
परादि या कथा हारपती ॥ १ ॥
तें अव्यक्त रूप देवकीचें बाळ ।
वसुदेवकुळ कृष्णठसा ॥ २ ॥
मुरालीं ब्रह्मांडें अमितें पैं अंडें ।
ढिसाळ प्रचंडें जया माजी ॥ ३ ॥
निवृत्तीचें धन माजी तो श्रीकृष्ण ।
सांगितला प्रश्न गयनीराजें ॥ ४ ॥

अर्थ:-

तो परमात्मा सर्वंचे अनादि मूळ आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी सारखे ह्याचे वर्णन करताना हरपून जातात. तोच निर्गुण परमात्मा श्रीकृष्ण नामाची मुद्रा लाऊन देवकी वसुदेवाच्या कुळी जन्माला आला. त्या परमात्मरुपात अनेक ब्रह्मांडे लयाला जातात व अनेक नविन ब्रह्मांडांचे बीजारोपण होते. निवृत्तिनाथ म्हणतात, मी जेंव्हा गहिनीनाथांना विचारले की मुळ ठेवा कोणता तेंव्हा त्यांनी सांगितले माझा श्रीकृष्ण हाच मुळ ठेवा आहे.


८६
बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक ।
आपण तिन्हीलोक एक्यारूपें ॥१॥
तो कृष्णरूप ठसा गोपाळां लाधला ।
सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥२॥
निळिमा अंबरीं निजवर्ण तेज ।
गोपाळ सहज बिंबाकार ॥३॥
निवृत्ति परिपाठा नीळवर्ण खरा ।
नंदाचिया घरा कृष्ण आले ॥४॥

अर्थ:-

बिंबातील बिंब म्हणजे चिदाकाशातील परमात्मा हा तिन्ही लोकात एकत्वाने समप्रमाणात राहतो. तेच मुळचे चतुर्भुज असणारे स्वरुप श्रीकृष्ण होऊन गोपाळांत राहतो. निळवर्ण बिंबाचे रुपात आपण जे पाहतो ते ह्याच्या निळवर्णी छाये मुळेच आकाशाला निलवर्ण प्राप्त झाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात नंदाच्या घरी आलेल्या निलवर्ण परमात्मा मुळे मला सर्वत्र निलवर्णाचे आवरण पडल्या सारखे वाटते.


८७
वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये ।
तें पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥१॥
तें रूप रूपस कांसवी प्रकाश ।
योगीजनमानस निवताती ॥२॥
सुंदर सुनीळ राजस गोपाळ ।
भक्तीसी दयाळ एक्या नामे ॥३॥
निवृत्ति गयनी मन ते चरणीं ।
अखंडता ध्यानीं तल्लीनता ॥४॥

अर्थ:-

तो परमात्मा कृष्ण रुपात वैकुंठातील कामधेनु बनुन नंदा घरी आले आहे. व यशोदेसही त्याला पाहुन प्रेमपान्हा दाटुन येतो व ती सतत तो कृष्णाला देत आहे. ज्या प्रमाणे कांसवी आपल्या पिल्लांना दृष्टिक्षेपाने वाढवते तसा श्रीकृष्ण योगीजनांना म्हणजे भक्तांना कृपादृष्टी देत असतो. नुसत्या त्याच्या नामाच्या उच्चाराने तो सुंदर, सुनीळ, सुकुमार परमात्मा तो भक्तांवर दया करतो. निवृत्तिनाथ म्हणतात, मी गहिनीनाथांच्या चरण व मार्गावर लक्ष केंद्रित केल्याने मी सतत त्याच्या नामात तल्लीन असतो.


८८
गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळांमाजी ।
सौरसें अभक्ता न दिसे काय करूं ॥१॥
पूर्वपुण्य चोखडें ब्रह्मांड कोडें ।
तो यशोदेकडे शोभे कैसा ॥२॥
वसुदेव आपण देवकीये समीप ।
वैकुंठीचें दीप लाडेंकोडें ॥३॥
उग्रसेन संप्रधार केला राज्यधर ।
यादव परिवार रामकृष्ण ॥४॥
द्वारकानाथ हरि सोळासहस्त्र नारी ।
बळिराम परिवार हरि माझा ॥५॥
निवृत्ति जीवन ध्यान एक रामकृष्ण ।
उच्चारणी कोटि यज्ञ होती नामें ॥६॥

अर्थ:-

भक्तीहीन मनुष्याला गोकुळात तो गोपाळ बनुन राहतो हे कळत नाही. त्याची योग्यता ही दिसत नाही. चोख पूर्व पुण्यामुळे त्याने बनवलेल्या ब्रह्मांडाचे कोडे सुटते. व तोच परमात्मा यशोदेच्या कडेवर शोभुन दिसतो. तो वैकुंठदिप परमात्मा मोठ्या लाडाकोडाने देवकी वसुदेवाजवळ जन्माला आला.त्याच परमात्माने संपूर्ण यादवामधुन संयत व संयमी असलेल्या उग्रसेनाला राज्यावर बसवले. बळिरामाचा लहान भाऊ असुन ही द्वारकानाथ म्हणणाऱ्या परमात्म्याने कैदेतुन सोडवल्या सोळा सहस्त्र स्त्रीयांचा उध्दार केला.निवृत्तिनाथ म्हणतात, अश्या परमात्माच्या रामकृष्ण नामउच्चारणा मुळे कोटी यज्ञांचे फळ मिळते.


८९
सर्वस्वरूप नाम राम सर्व घनःश्याम ।
तो गोकुळीं आत्माराम दुध मागे ॥१॥
भाग्येंविण दुभतें दैव उभडतें ।
नंदाघरीं आवडते घरीं खेळे ॥२॥
मंजुळ वेणु वाजें लुब्धल्या धेनुवा ।
नंदाघरीं दुहावा पूर्ण वाहे ॥३॥
घरोघरीं दुभतें गौळियां परिपूर्ण ।
यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥४॥
गोपाळ हरिखु नंदा यशोदे देख ।
गौळियां कौतुक करिती हरि ॥५॥
निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व ।
गोरक्ष गुह्म भाव सांगति मज ॥६॥

अर्थ:-

सर्व नामरुपाने युक्त असणारा घनश्याम, गोकुळात दुध मागतो. त्या नंदाच्या भाग्यामुळे नवनिताचा दुभत्याचा सागर त्याला मिळाले ते भाग्य कृष्णरुपाने नानाविध खेळ खेऴते. त्या परमात्माच्या मुरलीचा धुनीवर सर्व गायी लुब्ध झाल्यामुळे नंदाघरी दुभत्याचा सुकाळ करत आहेत. व गौवळ्यांच्या घरी ह्या दुधाच्या सुकाळाने ते हरखुन गेले आहेत व यशोदे सह सर्व गौळणी दह्याची घुसळण करत असतात. नंद व यशोदा हे कृष्णरुपाने हरखुन गेले आहेत व ह्याचे आश्चर्य सर्व गोकुळाला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या उपदेशाने मला त्याचे गुह्यरुप दिसले व ते गुह्य मला गोरक्षानाथानी ते सोपे करुन सांगितले.


९०

हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा ।
नंदाघरीं गोपाळा हरि माझा ॥१॥
न साहे सगुण अवघाचि निर्गुण ।
तो कृष्ण आपण गोपाळवेषें ॥२॥
गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी ।
वेणु नाना परि वातु असे ॥३॥
निवृत्ति गयनी कृपा जपतो अमुप जाण ।
सांगीतली खूण गोरक्षानें ॥४॥

अर्थ:-

वैकुंठात सुख भोगणारा हा परमात्मा सर्व जागा व्यापुन ही त्या पासुन निराळा आहे तोच परमात्मा गोपाळ बनुन नंदा घरी आला आहे. तो गोपाळ वेशातील कृष्ण जरी सगुण दिसत असला तरी तो कायम सगुण राहात नाही. आपले विहीत कार्य झाले की तो निर्गुणातच जातो. तो परमात्मा कृष्ण बनुन गायी चारताना खांद्यावर घोंगडी घेऊन वेणुतुन अनुहत नाद निर्माण करत आहे. त्या मुळे चराचर मोहरून गेले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोरक्षनाथानी गहिनीनाथाना जे गुह्य ज्ञान दिले ते मला ही गहिनीनाथांच्या कृपाप्रसादामुळे प्राप्त झाले आहे.


९१
न साहे दुजेपण आपण आत्मखुण ।
श्रुतीही संपूर्ण हारपती ॥१॥
वेदरूप श्रीकृष्ण योगिया जीवन ।
तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥२॥
न दिसे वैकुंठीं योगियां ध्यानबीज ।
तो गोपाळांचें काज हरि करी ॥३॥
निवृत्ति गयनी हरि उच्चारित ।
माजि करि मनोरथ पुरी कामसिद्धि ॥४॥

अर्थः-

श्रुतींची ताकत ज्या स्वरुपाचे वर्णन करताना हरपते ते परमात्म स्वरुप द्वेताला नाकारत एकत्वाने अद्वैत स्वरुपातच राहते. तो परिपूर्ण असणारा परमात्मा वेदांचे स्वरुप व योगियांचे निजध्यान आहे. जो परमात्मा वैकुंठात दिसत नाही. जो योगियांच्या ध्यानात ही सापडत नाही. तो गोकुळात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सह हरिनाम उच्चारल्यामुळे मनाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात कार्य सिध्दी होते.


९२
नाहीं हा आकार नाहीं हा विकार ।
चतुर्भुज कर हरि माझा ॥१॥
हरिरूप पै जप हरिहररूप ।
गौळियांचें रूप सहज कृष्ण ॥२॥
हरिरूप घरीं सोळासहस्त्र नारी ।
तो बाळ ब्रह्माचारी गाई राखे ॥३॥
निवृत्ति रोकडे ब्रह्म माजिवडें ।
तो यशोदे पुढें लोणी मागे ॥४॥

अर्थ:-

तो चतुर्भुज परमात्मा जरी सगुण दिसत असला तरी त्याला रुप नाही व त्याच्यात दोषांचा लवलेश ही नाही. गोपाळांत असलेल्या कृष्णामध्ये हरि हराचे एकत्व आहे. जो कृष्ण गायी चारताना दिसतो त्याला सोळा सहख बायका आहेत तरी तो परमात्मा ब्रह्मचारी आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच सगुण सर्वव्यापक परब्रह्म यशोदेकडे लोणी मागत आहे.


९३
जेथुनि उद्गारु प्रसवे ॐकारु ।
तोचि हा श्रीधरु गोकुळीं वसे ॥१॥
जनकु हा जनाचा जीवलगु साचा ।
तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥
नमाये वैकुंठी योगियांचे भेटी ।
पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥
निवृत्ति म्हणे देवा म्हणविता हे रावो ।
तो सुखानुभवो यादवांसी ॥४॥

अर्थ:-

जो ओमकार प्रणव जे सृष्टीचे आद्यतत्व आहे तेच श्रीधर बनुन गोकुळात वास करत आहे. जो नंदा घरी नांदतो आहे तो श्रीकृष्ण ह्या जगाचा जनक म्हणजे आहे. हे परब्रम्ह योग्यांच्या धान्यात पकडले जात नाही वैकुंठात मावत नाही व ज्ञान्यांच्या हाताला लागत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात. यादव ज्याला राजा मानतात तो देव त्याच गोपाळांचा सुखानुभव आहे.


९४
योगियांचे धन तें ब्रह्म संपन्न ।
तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥
हरिरूप माये सर्वाघटीं आहे ।
दूध लोणी खाये गौळियांचे ॥२॥
चिंति अजामेळा नाम आलें मुखा ।
तो वैकुंठीच्या सुखा देत हरी ॥३॥
निवृत्तिचें धन जगाचें जीवन ।
नाम नारायण तरुणोपाव ॥४॥

अर्थ:-

त्या परब्रम्हाची प्राप्ती म्हणजे महाधन मानणारे योगी त्यांना हा सहज मिळत नाही पण हा जनार्दन नंदा घरी अवचित आला आहे. जे सर्वांघटी भरलेले आहे असे ते परब्रम्ह गौळ्यांचे दुध-लोणी खात आहे. त्या महापापी अजामेळा त्यांनी शेवटी घेतलेल्या नामामुळे वैकुंठाला पोहचला. तोच परमात्मा हा वैकुंठाचे सुख गोकुळात देतो आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ते नाम घेतले तर ते त्रैलोक्याला तारते ते नारायण नाम माझा ठेवा आहे.


९५
देवामुकुटमणि ऐकिजे पुराणीं ।
तो हा चक्रपाणी नंदाघरें ॥१॥
नंदानंदान हरि गौळण गोरस ।
गोकुळीं हृषीकेश खेळतसे ॥२॥
हरि हा सकुमार भौमासुर पैजा ।
वोळलासे द्विजा धर्मा घरीं ॥३॥
निवृत्ति रोकडे नाम फाडोवाडें ।
हरिरूप चहूंकडे दिसे आम्हां ॥४॥

अर्थ:-

सर्व देवांचा जो मुकुटमणी आहे असे पुराणे सांगतात तो परमात्मा चक्रपाणी नंदाघरी आहे. तोच हा नंदाचा मुलगा गौवळणींचे गोरस चोरुन खातो तोच गोपाळांबरोबर गोकुळात नाना खेळ खेळतो. तोच श्रीकृष्ण भौमासुराला पैज घेऊन मारुन आला व त्यानेच धर्माराजा घरी उष्टया पत्रावळी उचलत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्याचे नाम अट्टाहासाने नाम घेतल्याने त्याचेच रुप मला सर्वत्र दिसते.


९६
वेदबीज साचें संमत श्रुतीचें ।
गुह्य या शास्त्रांचें हरि माझा ॥१॥
तो हरि खेळतु प्रत्यक्ष मूर्तिमंतु ।
कृष्ण मुक्ति देतु जीवघातें ॥२॥
अर्जुना साहाकरी द्रौपदी कैवारी ।
तो विदुराचे घरीं अन्न मागे ॥३॥
निवृत्तीचें धन गोकुळीं श्रीकृष्ण ।
यादव सहिष्णु हरि माझा ॥४॥

अर्थ: –

`हा माझा हरि सर्व शस्त्रांचे मुळ असुन वेदांचे बीज आहे. त्या हरिला आपला जीव लावला की तो आपल्या जीवदशेतुन मुक्त करतो. तोच हरि श्रीकृष्ण बनुन गोकुळांत खेळतो आहे. तोच हरि अर्जुनाला साह्यभूत झाला, द्रौपदीचा तारणहार झाला तोच विदुरा घरी कण्या मागुन खातो. निवृतिनाथ म्हणतात, तोच हरि माझे महाधन आहे व तोच हरि गोकुळात गौळ्यांसारखा बनुन सर्वाटबरोबर सहिष्णु पध्दतीने राहात आहे.


९७
ब्रह्मादिक पूजा इच्छिती सहजा ।
जो गौळियांच्या काजा तिष्ठतुसे ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वाभावी ।
वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती ।
तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ ।
पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥

अर्थ:-

ज्या श्रीकृष्णाची पुजा करायची ही इच्छा ब्रह्मादिकांना आहे. तोच श्रीकृष्ण गौवळ्यांची काम करण्यासाठी तिष्टत बसला आहे. गौवळी ज्या सावळ्या परब्रह्माला पुजतात तो नंदाघरी खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्याला योगी हृदयात ज्याला जपतात ते दैवत सर्वांचे मनोरथ पूर्ण करतो.


९८
ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी ।
तो उच्छिष्टें काढी धर्माधरीं ॥१॥
देखिला वो माये चक्रभुज स्वभावी ।
वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥
याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती ।
तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥
निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ ।
पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥

अर्थ:-

जशी हंड्यांची उतरंड रचतात तसे हे ब्रह्मांड ज्याच्या इच्छेने रचले गेले तो धर्माच्या घरी उष्ट्या पत्रावळी गोळा करत आहे. हे माझे आई ज्याच्या भुजांवर चक्र आहेत असा तो कृष्ण अर्जुनाची घोडी सांभाळत आहे. ज्याच्या नावे याज्ञिक यज्ञात आहुत्या देतात तो द्रौपदीच्या ताटाला लागलेले भाजीचे पान मागुन खातो व संतुष्ट होतो. निवृतिनाथ म्हणतात, ज्याचे नाम घेत पांडव पुण्यवंत झाले त्याच दैवताचे नाम माझे मनोरथ पूर्ण करतील.


९९
निरालंब बीज प्रगटे सहज ।
तो गौळियांचें काज करी कृष्ण ॥१॥
हरि हा सांवळा वेधिलिया बाळा ।
माजि त्या गोपाला गायी चारी ॥२॥
वंदिती सुरगण ब्रह्मादिक चरण ।
तो यशोदेसि स्तन मागे हरि ॥३॥
निवृत्तीचें ध्यान मनाचें उन्मन ।
योगिया जीवन हरि माझा ॥४॥

अर्थ:-

जो परमात्मा कोणावर अवलंबुन नाही तो विश्वाचे बीज होऊन प्रगटला आहे. तरी ही तो गौळ्यांची कामे करत असतो. ज्याच्या रुपावर गवळणी लुब्ध झाल्या त्या कृष्णरुपात तो गायी चारतो. ज्याच्या चरणसेवेसाठी सुरगण व योगी तिष्टत असतात तो कृष्ण यशोदेकडे स्तनपानाचा हट्ट करतो. निवृती नाथ म्हणतात ज्या श्रीकृष्ण नामाचे ध्यानी ध्यान करतात तोच त्या योगीजनांचा प्राण आहे.


१००

वैकुंठदेवत देवामुगुटमणी ।
ऐकीजे पुराणीं कीर्ति ज्याची ॥१॥
तो हरी बाळक गोपिका कौतुक ।
गोपाळ सकळिक संवगडे ॥२॥
आदि शिवाजप जपतु अमुप ।
तें प्रत्यक्ष स्वरूप नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति समाधि उगवली सकळिकां ।
तारि तिन्ही लोकां एक्यानामें ॥४॥

अर्थ:-

सर्व देवांचा मुकुटमणी असलेला तो वैकुंठाचा देव त्याची कीर्ति सर्व पुराणे उच्चारवाने ऐकवतात.त्या देवाचे संवगडी गोपाळ असुन गोपीका त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. ज्याचे नाम महादेव शंकर सतत जपत असतात तो नंदा घरी कृष्ण होऊन आला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या नामाने तिन्ही लोक तारले जातात ते नाम मला व सर्वांना समाधीचा अर्थ समजवते.


१०१
गगन घोटींत उठि पृथ्वी सगळी दाटी ।
आपणचि पाठी कूर्म जाणा ॥१॥
कांसवितुसार अमृत सधर ।
भक्त पारावार तारियेले ॥२॥
उचलिती ढिसाळ सर्व हा गोपाळ ।
तो यशोदेचा बाळ नंदाघरीं ॥३॥
निवृत्ति सादर हरिरूप श्रीधर ।
आपण चराचर विस्तारला ॥४॥

अर्थ:-

समुद्र मंथनावेळी पर्वताचा व घुसळणीचा भार सहन न झाल्या मुळे पृथ्वी खाली गेली तेंव्हा कासव रुप धरुन पाठीवर पृथ्वी घेऊन तिला आधार दिला. जशी कासवी आपल्या अमृतच्या नजरेने पिल्लांचे पोषण करते तसेच पाठीचा अमृतमय आधार पाठीवर घेऊन पृथ्वीला समुद्रात बुडण्या पासुन वाचवले. तोच कच्छ रुप परमात्मा नंदाघरी कृष्णरुपात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, चराचरात विस्तारलेला तो श्रीधर हरिरुप घेऊन गोकुळात आहे.


१०२
गगनींचा गगनीं तेज पूर्ण धरणी ।
आपणची तरणी जगा यया ॥१॥
ब्रह्म माजीवडे गोपाळ संगती ।
वेद वाखणिती ज्याची महिमा ॥२॥
लोपती त्या तारा हारपे दिनमणि ।
तो खेळे चक्रपाणी गोपाळामाजी ॥३॥
निवृत्ति निधान श्रीरंग खेळतु ।
गोपिकासी मातु हळुहळु ॥४॥

अर्थ:-

चिदाकाशात आकाश व पृथ्वी यांच्या मध्ये तो कृष्ण सूर्यनारायण बनुन तळपत आहे व जगाला प्रकाशित करत आहे. वेद ज्याची महती गातात तो कृष्णरुप धरुन गोपाळांत वावरत आहे. तो त्या गोपाळांबरोबर खेळण्यात येवढा मग्न आहे की सुर्य व तारे कधी मावळतात याचे भान त्याला नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, तो खेळगडी बनलेला कृष्ण गोपाळांची खेळता खेळता गौवळींची मन जिंकत आहे.


१०३
निरपेक्षता मन अनाक्षर मौन्य ।
प्रकाश संपूर्ण तया ब्रह्मा ॥१॥
ऐसें रूप पाहा क्षरे दिशा दाहा ।
सर्वभावें मोहा एका कृष्णा ॥२॥
नित्यता अढळ नित्यपणें वेळे ।
विकाश आकळे नित्य तेजें ॥३॥
रूपस सुंदर पवित्राआगर ।
चोखाळ साकार पवित्रपणें ॥४॥
नेणें हें विषय आकार न माये ।
विकार न साहे तया रूपा ॥५॥
निवृत्ति तत्पर कृष्ण हा साकार ।
ॐतत्सदाकार हरि माझा ॥६॥

अर्थ:-

सर्व ब्रह्मांडात प्रकाश आहे. तो प्रकाश निरपेक्ष आहे काही न बोलता तो जगताला प्रकाशीत करत असतो. असे जे प्रकाशमय ब्रह्म कृष्ण रुप घेऊन आले असलेल्या मुळे तेच रुप दशदिशा व्यापुन टाकत आहे. ते प्रकाशरुप ब्रह्म आपल्या स्वरुपात कोणताही बदल न करता नित्य प्रकाश देण्याचे कर्म करत आहे.जे रुप प्रसंगानुसार शुध्द व निर्दोष रुप घेते ते सुरेख असुन सर्व शुध्दतेचा जनक आहे. कोणता ही विकार नसलेले ते अकार नसलेले रुप निर्गुण प्रकाशमय आहे. निवृत्तिनाथ म्हणतात,ज्या ब्रह्माचे स्वरुप ॐ तत् सत् असे आहे तोच कृष्णरुप घेऊन साकारला आहे.


१०४
अद्वैत अमरकंदु हा घडला ।
ब्रह्मांडी संचला ब्रह्मासाचें ॥१॥
तें रूप कारण कृष्ण तेजाकार ।
सर्व हा आकार त्याचा असे ॥२॥
विराट विनटु विराट दिसतु ।
आपणचि होतु ब्रह्मसुख ॥३॥
निवृत्ति कोवळें आपण सोंविळें ।
त्यामाजी वोविलें मन माझें ॥४॥

अर्थ:-

त्या ब्रह्मांडाला व्यापुन राहिलेली आपल्या अद्वैत व अमरत्वाने ब्रह्मत्व घेऊन आलेला हा जगताचा ठेवा आहे. जगताचे सर्व आकार आपल्या अंगे दाखवणारा हा जग निर्मिती करणारा कृष्णच आहे. अत्यंत विराटरुप जगतस्वरुपात निर्माण करणारा तेच विराट रुप आपल्या अंगात बाळगुन आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या पवित्र, कोवळ्या व सर्वापासुन वेगळ्या असणाऱ्या रुपाने माझे मन बांधले आहे.


१०५

जयामाजी दीक्षा हारपोनि जाये ।
द्वैत हेंही ठाये दुजेपणें ॥१॥
तें रूप रोकडें दिसे चहूंकडे ।
गोपाळ संवगडे खेळताती ॥२॥
उपराति योगियां तितिक्षा हारपे ।
मायकार लोपे कृष्णध्यानें ॥३॥
निवृत्ति तप्तर सर्व हा श्रीधर ।
मनाचा विचार हारपरला ॥४॥

अर्थ:-

त्या अद्वैत स्वरुपात द्वैताला द्वैत होण्यासाठी तसुभर जागा नाही.त्याच रुपात मंत्र देणारा गुरु व मंत्र घेणारा शिष्य ह्यांचा लय होऊन ते त्या ब्रह्मस्वरुपात लीन होतात. ते रुप सगुण साकार होऊन गोपाळांबरोबर खेळत आहे. त्याच स्वरुपात योग्यांना वैराग्य ज्ञान व तितिक्षा ह्यांचा लय करता येतो व माया ही त्याच ठिकाणी ब्रह्मरुप पावते.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या रुपाच्या सर्वत्र प्रगट होण्याने मन त्या श्रीधर रुपात मग्न होते


१०६
रसज्ञ रसाचार रसामाजी वसे ।
जीवन हें सोसे असोस होय ॥१॥
तें रूप स्वरूपाचें रूपींच वोळले ।
कंदर्पें घोळिले नंदाघरीं ॥२॥
नाहीं त्या आकार अवघाचि वैकुंठ ।
अद्वैत घनदाट ब्रह्ममय ॥३॥
निवृत्ति नितंब कृष्ण तो स्वयंभ ।
श्रीमूर्तीचे बिंब दिसे सर्व ॥४॥

अर्थ:-

जसे रसज्ञ आपल्याला आवडता रस अनेक पदार्थातुन ओळखुन नेमक्या पदार्थात घेतात त्या प्रमाणे पृथ्वीवर पाणी अपार आहे पण प्रत्येक जीव त्याला आवश्यक पाणीच घेतो. मदनाला वाटले आपला ही शिरकाव गोकुळात कृष्णा बरोबर होईल पण कृष्णाने त्याला पार घुमवुन बेजार केले. त्या रुप नसलेल्या ब्रह्माने गोकुळच नाही तर सर्व चराचर धनदाट पध्दतीने व्यापुन टाकले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात तो कृष्ण प्रकाशमान असुन त्याच्या शरिराचा वरचा भाग स्वर्गलोक मधील भाग मृत्युलोक व कंबरेखाली पाताळ लोक स्वरुपात जरी असला तरी मला तो एकत्वाने ब्रह्मरुपातच दिसतो.


१०७
अनंत रचना हारपती ब्रह्मांडे ।
हेळाचि वितंडे मोडीतसे ॥१॥
तें रूप राजस वसुदेव भोगी ।
देवक्रियेलागी वोळलेंसे ॥२॥
विचित्र रचना ब्रह्मांड कुसरी ।
निरालंब हरि गोकुळीं वसे ॥३॥
निवृत्ति संपदा गाताती गोविंदा ।
भोगिती मुकुंदा निजबोधे ॥४॥

अर्थ:-

अनंत जगाची रचना तो करतो व त्याच्याच ठिकाणी त्या जगताचा लय होतो. त्याच रुपाने देवकीच्या उदरातुन जन्म घेतला व वसुदेवाने पिता होण्याचे सुख.त्याच रुपाने आधी विविध रुपात जगताची निर्मीती केली व नंतर कृष्ण बनुन तो गोकुळात अवतरला. निवृत्तिनाथ म्हणतात, मी माझ्या बौध्दिक संपदेने त्या गोविंदाचे वर्णन गाऊन त्याच्या मुकुंद स्वरुपात आत्मबोधाचा आनंद घेत आहे.


१०८
व्याप्तरूपें थोर व्यापक अरूप ।
दुसरें स्वरूप नाहीं जेथें ॥१॥
तें अव्यक्त साबडें कृष्णाचें रूपडें ।
गोपाळ बागडें तन्मयता ॥२॥
उन्मनि माजिटें भोगिती ते मुनी ।
मुर्तिची पर्वणी ह्रदयीं वसे ॥३॥
निवृत्ति कारण कृष्ण हा परिपूर्ण ।
यशोदा पूर्णघन वोळलेंसे ॥४॥

अर्थ:-

ज्या निर्गुणरुपाने सर्व जगत व्यापले आहे त्यारुपाच्या जागी दुसरे कोणतीही रुप नाही. त्याच रुपाने भाबडे सगुण कृष्णरुप धारण केले असुन ते गोपाळांत बागडत आहे. उन्मनी ह्या स्वरुप ज्ञानाच्या प्रकाराने मुनी त्या रुपाचा आनंद उपभोगुन ती कृष्णमूर्ती हृदयात स्थापित करतात. निवृत्तिनाथ म्हणतात, आपल्या कर्मामुळे हे कृष्ण हे रुप परिपूर्ण झाले आहे व ते रुप यशोदेचा पुत्र होऊन आल्या मुळे तिला महाधन प्राप्त झाले आहे.


१०९
गगन घांस घोंटी सर्व ब्रह्मांडें पोटीं ।
निमुनियां शेवटीं निरालंबीं ॥ १ ॥
तें ब्रह्म सांवळें माजि लाडेंकोडें ।
यशोदेमायेपुढें खेळतसे ॥ २ ॥
ब्रह्मांडाच्या कोटी तरंगता उठी ।
आप आपासाठीं होत जात ॥ ३ ॥
निवृत्तिचें ध्यान यशोदेचें धन ।
वासुदेवखुण आम्हांमाजी ॥ ४ ॥

अर्थ:-

वेदाना ह्या ब्रह्मस्वरुपाची निर्मिती कळली नाही त्या रुपातुन ॐकार प्रगट झाला व तो ॐकार प्रणव त्या ब्रह्मरुपातच हारपला. त्याच ब्रह्मस्वरुपाने रामकृष्ण हे सगुण रुप घेतले व त्याच रामकृष्ण नामाचा घोष करुन गोपिका कृतार्थ झाल्या.त्याच ब्रह्मस्वरुपाने अनंत जगताची निर्मिती केली व त्याच्या पासुन झालेल्या ऋषीनी धीट होऊन मठांची निर्मिती केली. निवृत्तिनाथ म्हणतात, ह्या सर्वाचे सार असलेले कृष्णरुप म्हणजेच परिपूर्ण ब्रह्मस्वरुप आहे व त्याच्या तेजाने जगत प्रकाशमान झाले आहे.


११०

कारण परिसणा कामधाम नेम ।
सर्वाआत्माराम नेमियेला ॥१॥
तें रूप सुंदर सर्वागोचर ।
कृष्ण परिकर गोपवेषे ॥२॥
वेदादिक कंद ॐकार उद्बोध ।
साकार प्रसिद्ध सर्वाघटीं ॥३॥
निवृत्ति म्हणे धाम कृष्ण हा परम ।
सौख्यरूपें सम वर्ततसे ॥४॥

अर्थ:-

माझ्या सर्व इच्छा, सर्व कर्म, सर्व नित्यनेम हा तोच झाला असुन त्याच्याच मुळे मला आत्मभान स्वरुपात भगवंत जाणवला आहे. तेच कृष्णरुप सर्वांग सुंदर देखणे असुन गोकुळात अवतरुन सर्वाना प्राप्य आहे.सर्व वेदांचे सार जसे ॐकार प्रणवात एकवटले आहे. तसेच तो ॐकार त्या ब्रह्मस्वरुपातुन प्रतित होतो.निवृत्तिनाथ म्हणतात, तो भगवंत सर्व धामामध्ये संपुर्ण भरला असुन तो स्वानंद स्वरुपात सौख्य प्रदान करत असतो.


१११
जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा ।
चिदाकाश एका आपतत्त्व ॥१॥
तें रूप गोजिरें कृष्ण रूपें सांग ।
यशोदेचा पांग हरियेला ॥२॥
जेथें रजतम नाहीं तें निःसीम ।
अपशम दम पूर्णघन ॥३॥
निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन ।
सर्व जनार्दन गोपवेषें ॥४॥

अर्थ:-

त्या जीवनयुक्त पाण्याला जसे आकार, रुप, रेखा नसते तसे ते निर्गुण ब्रह्मस्वरुप चिदाकाशाला व्यापुन जगतात प्रतित होत आहे.त्याच ब्रह्मस्वरुपाने गोजिरे कृष्णरुप घेऊन यशोदेचे पुत्रत्व स्विकारल्या मुळे तिचे सर्व पांग फिटले आहेत. त्याच रुपाला सत्व रज तम ह्या गुणांचा वाराही लागलेला नसुन तितिक्षा ही नसलेले ते परिपुर्ण स्वरुप आहे. निवृत्तिनाथम्हणतात, सर्वांचे सार घेऊन ते ब्रह्म जनार्दन कृष्ण होऊन गोपवेशात आला आहे.


११२
गोत वित्त चित्त गोतासी अचुक ।
चाळक पंचक तत्त्वसार ॥१॥
तें जप सादृश्य कृष्णनाम सोपें ।
नंदायशोदाखोपें बाळलीला ॥२॥
निरसूनि गुण उगविली खूण ।
गोकुळी श्रीकृष्ण खेळे कैसा ॥३॥
निवृत्तिचें सार कृष्णनामें पार ।
सर्व हा आचार हरीहरी ॥४॥

अर्थ:-

जो आपल्या मनाचा, वित्ताचा चालक आहे.आपले गोत कोण असावेत हे ठरवतो तोच पंचकोष व पंचभुतांचा चालक आहे.त्याच परमात्मा श्रीकृष्णाचे नाम येवढे सोपे आहे जेवढ्या त्याच्या बाळलिला नंद यशोदेच्या घरात सहज वाटतात. तिन्ही गुणाचा निरास करुन हे परमात्म स्वरुप गोकुळात उगवले आहे ते गोकुळात अनेक खेळ करुन दाखवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ह्या कृष्णनामाने पार होणाचे सार असे आहे की आपला सर्व आचार हरिरुप करणे मग पार होणे सोपे आहे.


११३
विश्वाचा चाळक सूत्रधारी एक ।
विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥१॥
तें रूप साजिंरे कृष्ण घनः श्याम ।
योगियां परम रूप ज्याचे ॥२॥
शिव शिवोत्तम नाम आत्माराम ।
जनवनसम गोपवेषें ॥३॥
निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक ।
आपरूपें एक सर्वत्र असे ॥४॥

अर्थ:-

जगाच्या सर्व सत्तांचे सुत्र हातात असलेला तो विश्वंभर ह्या जगात पुर्ण रुपाने भरले त्याचे ज्ञान झाले की सर्व ज्ञान आपोआप होते. तेच परमात्म स्वरुप सुंदर मेघासारखा श्यामल कृष्णरुप होऊन साकारले आहे तेच रुप योगी ज्या परम स्वरुपाचे ध्यान करतात ते तेच रुप आहे. जे परमतत्व सर्वोत्तम शिवतत्व आहे जे सर्व जन वनात अंशात्मक स्वरुपात आहे तेच शिवतत्व पुर्ण स्वरुपात कृष्णात भरले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जे जीवन स्वरुपात सर्वत्र व्यापक स्वरुपात भरलेले आहे व जे जगाचे चालक आहे तसेच मला जाणवले आहे.


११४
जाणोंनि नेणते नेणत्या मागते ।
आपण पुरते नित्यपूर्ण ॥१॥
तें स्वरूप कृष्ण गौळियाच्या भाग्यें ।
नंदासि सौभाग्य भागा आलें ॥२॥
जाणते पूर्णता पूर्णतां समता ।
आपण चित्साता गोंपवेष ॥३॥
निवृत्ति परिमाण सर्वपूर्णघन ।
दिननिशी घन कृष्ण भाग्ययोगें ॥४॥

अर्थ:-

सर्व ज्ञानाचा जनिता असलेल्या त्या भगवान कृष्णांने नेणतेपणा स्विकारला व ते गुरु संदिपनांकडे शिकायला गेले. तेच कृष्ण स्वरुप गोळ्यांच्या पुर्वपुण्याईने व नंदाच्या सौभाग्यामुळे गोकुळात आले. सर्व ज्ञानाची पुर्णता व सर्व ज्ञानांची समता ज्याच्यात आहे तो कृष्ण गोपाल वेश धारण करुन गोकुळात आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जो सर्व परिणाम तोकडे करत जगतात भरला आहे त्या कृष्णरुप महाधनाचा लाभ मला दिननिशी होत आहे.


११५

मृगजळाभास लहरी अपार ।
हा प्रपंच पसारा उदरीं जया ॥१॥
तें रूप वैकुंठ कृष्णरूपें खेळे ।
गोपाळांचे लळे यमुनातटीं ॥२॥
जाळूनि इंधन उजळल्या दीप्ती ।
अनंतस्वरूपी एक दिसे ॥३॥
निवृत्ति सागर ज्ञानार्क आगर ।
कृष्णाचि साचार बिंबलासे ॥४॥

अर्थ: मृगजळाच्या अमर्याद लाटां प्रमाणे हे मायेच्या पटलात बध्द असलेले ह्या जगताचा पुर्ण पसारा त्याच्या उदरात आहे. तेच रुप कृष्ण रुप घेऊन गोपाळांच्या लळ्यामुळे यमुनाती वैकुठातुन येऊन कृष्णरुप धरुन खेळत आहे. अग्नीत इंधन टाकल्यावर जशा दशदिशा प्रदीप्त होतात पण तो अनंत स्वरुपातील प्रकाश मात्र एकत्वाने जाणवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, तोच परमात्मा ज्ञानार्काचा सागर बनुन त्या सागराला उदरात धरून तोच परमात्मा कृष्ण रुपाने साचार होऊन बिंबला आहे.


११६
गोत वित्त धन मनाचें उन्मन ।
निमोनि संपूर्ण तयामाजी ॥१॥
जीवन पावन रसाचें निधान ।
रसरूपें धन रसनेचें ॥२॥
भोग्य भोग भोक्ता आपण तत्त्वता ।
त्याहुनी परता तयामाजि ॥३॥
निवृत्ति आगर कॄष्ण हा सागर ।
सर्वरूपें श्रीधर दिसतसे ॥४॥

अर्थः संपत्ती ऐश्वर्य नात्यासारख्यातुन मन बाजुला करुन परमेश्वराच्या सगुणरूपाचा आनंदाने मन शांत झाले आहे. पाण्यातुनच आलेले अनेक चवा जशी जिभाला कळते हेच कळणे म्हणजे जिव्हेचे महाधन आहे जसा भोग्य, भोग, व भोक्ता ह्या त्रिपुटीत आपण तत्वतः बसतो जीव म्हणुन पण हा त्या पासुन वेगळा आहे. निवृत्तीनाथ म्हणतात, हे कृष्णरुप समुद्रा पेक्षा विशाल असुन आशा अनेक समुद्राचे चे ते आगर असुन मला त्या सर्व रुपात तो श्रीधर दिसतो.


११७
निराकृत्य कृत्य विश्वातें पोखितें ।
आपण उखितें सर्वाकार ॥१॥
तोचि हा सावळा डोळ डोळस सुंदर ।
रुक्मिणीभ्रमर कृष्ण माझा ॥२॥
निश्चळ अचळ । नाहीं चळ बळ ।
दीन काळ फळ हारपती ॥३॥
निवृत्ति सोपान खेचर हारपे ।
तदाकार लोपे इये ब्रह्मीं ॥४॥

अर्थ: निर्गुण निराकार परमात्मा विविध आकाराने नटलेल्या जगाचा निर्मिता आहे. स्वतःच अनेक आकार धारण करून ह्या जगाचे पोषण ही करतो. श्री रुक्मिणीच्या भोवती हा राहणारा कृष्णभ्रमर जरी सावळा असला तरी सर्वांग सुंदर आहे. अकर्ता निर्गुण परमात्मा हालचाल करत नाही तरी ही त्याच्यामुळे रोज दिवसरात्र होत असतात हे आश्रय आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, नावाने वेगळे असणारे सोपान, खेचर जरी भिन्न वाटत असेल तरी त्यांच्यातील ब्राह्मस्वरूप एकच असल्याने त्यांच्यातील एकत्व मी पाहात आहे.


११८
मथनीं मथन मधुरता आपण ।
विश्वीं विश्व पूर्ण सदोदित ॥१॥
तें हे चतुर्भुज मुगुटवर्धन ।
सुंदर श्रीकृष्ण खेळतसे ॥२॥
दुमदुम पाणि दुमिळित ध्यानीं ।
दृढता निशाणीं काष्ठीं लागे ॥३॥
ध्रुवाद्य अढळ ब्रह्म हें अचळ ।
शोखिमायाजाळ निःसंदेहे ॥४॥
क्लेशादि कल्पना क्लेशनिवारणा ।
आपरूपें भिन्न होऊं नेदी ॥५॥
निवृत्ति कठिण गयनिप्रसाद ।
सर्वत्र गोविंद नंदाघरीं ॥६॥

अर्थ: मंथन करुन दह्यातुन जसे लोणी व ताक काढले जाते नवनीत शुध्द व ताक असार मानले जाते तसे ह्या परमात्म्याच्यामुळे विश्वातुन चैतन्य सार व जड असार वेगळे निघते हे पूर्णस्वरुपात ह्या विश्वात आहे. तोच परमात्मा चतुर्भुज रुप टाकुन उंच मुकुट धारण करून श्रीकृष्ण बनुन खेळत आहे. पातळ पाणी स्तब्ध होऊन मुळाला मिळाल्यावर झाडाचे लाकुड कठीण स्वरुपाला प्राप्त होते. जसे सर्व वाद्यात शिरस्थान विणेचे अढळ आहे तसेच ब्रह्माचे स्थान अढळ आहे. व तेच ब्रह्म मायाजाळाचे शोषण करुन ब्रह्मस्वरूप दाखवते. त्या ब्रह्मस्वरुपाचे दर्शन झाल्यावर पुर्वजन्मीचे दुःख क्लेष हे त्या जीवाजवळ फिरकु ही शकत नाहीत म्हणजेच तो जीव व ते ब्रह्म यांचे एकरुपत्व होते. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या प्रसादाने तो सर्वासाठी कठिण असलेला नंदाघरचा परमात्मा मला सोपा झाला.


११९
मन निवटलें ज्ञान सांडवलें ।
ठाणदिवी केलें ध्यानालागीं ॥१॥
उमटल्या ध्वनि कृष्ण नामठसे ।
सर्व हृषीकेश भरला दिसे ॥२॥
दिशा दुम ध्यान हारपली सोय ।
अवघा कृष्ण होय ध्यानींमनीं ॥३॥
निवृत्तिमाजि घर मनाचा सुघडु ।
कृष्णचि उपवडु दिसतसे ॥४॥

अर्थः जसा लामण दिवा लावल्यावर प्रकाश पसरतो तसा परमात्मज्ञानाचा दीप मनात लाऊन विज्ञान म्हणजे संसार ज्ञान टाकुन मनात त्या स्वरुपाचे ध्यान लावले. त्यातुन जो अनुहत ध्वनी श्रीकृष्ण नामाचा प्राप्त झाला व हे जगत त्या हृषीकेषाने विनटले आहे हे


१२०

अव्यक्त आकार अकारलें रूप ।
प्रकाश स्वरूप बिंबलेंसें ॥१॥
तें रूप अव्यक्त कृष्णनाम निज ।
नामाअधोक्षज चतुर्भुज ॥२॥
वर्णासी अव्यक्त वर्णरूप व्यक्त ।
भोगिती वरिक्त नामपाठें ॥३॥
निवृत्तिचे काज नाम मंत्र बीज ।
गयनी सहज तुष्टलासे ॥४॥

अर्थ:-

ते निर्गुण निराकार रुप कृष्णरुपात सगुण साकारले असुन जसा प्रकाश सर्वत्र बिंबावा तसे भासत आहे.मुळचे अव्यक्त स्वरुपातील ते परमात्मस्वरुप कधी श्रीकृष्ण कधी अधोक्षज भासते. चारी वर्णाला हे रुप स्वतःला लाऊन घेत नाही त्याला रंगरुप नाही असे असले तरी कृष्णनामामुळे ते स्वरुप भोगता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, माझे नित्यकर्मच कृष्णनामाचा जप करणे झाल्यामुळे सदगुरु गहिनीनाथ संतुष्ट झाले आहेत.


१२१
निरशून्य बिंबी आकार पाहतां ।
आपण तत्त्वता हरि एकु ॥१॥
तें रूप साबडे कृष्णा माजींवडे ।
सोंवळें उघडें शौच सदा ॥२॥
तेथें वर्ण व्यक्ति कल्पना हरपती ।
मनाच्या खूंटती गती जेथें ॥३॥
निवृत्ति नितंब सोवळा स्वयंभ ।
प्रकाशलें बिंब चहूंकडे ॥४॥

अर्थ:-

निरशुन्य आकाशात दिवसा पाहिले तर एकटे बिंब दिसते.तत्वतः त्या बिंबाकडे पाहिल्यास तोच एकत्वाने हरीरुप दिसतो. तेच उघडे परब्रह्म पवित्र व सोवळे कृष्णरुप घेऊन अवतरले आहे. त्यारुपाकडे पाहिल्यावर तेथे वर्ण, व्यक्ती व कल्पना यांचा लय होतो व मनाची गती कुंठित होते. निवृत्तिनाथ म्हणतात, तोच नितळ पवित्र स्वयंभू कृष्ण अवतरला असुन त्याच्या निज प्रकाशाने असे वाटते की चहुकडे सुर्यबिंब प्रकाशित झाले आहे.


१२२
पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण ।
त्याचेही जीवन जनार्दन ॥१॥
तो सोंवळा संपूर्ण अमृताचा घन ।
त्यामाजि सज्जन हरि आम्हा ॥२॥
नित्यता सोंवळा स्वयंपाकी शौच ।
न दिसे आमुचें आम्हां तेथें ॥३॥
निवृत्ति सोंवळा स्वयंपाकी नित्य ।
नाम हें अच्युत जपतसे ॥४॥


१२३
हिरण्यगर्भ माया अंडाकार छाया ।
ब्रह्म असलया तेथें नेत ॥१॥
तें रूप वैकुंठ जीवशिवपीठ ।
मायेचा उद्धाट छायसंगें ॥२॥
माया ब्रह्म हरि माता पिता चारी ।
जीवशिव शरिरीं एक नांदे ॥३॥
निवृत्ति छाया जीवशिवमाया ।
वासना संदेहा लया गेली ॥४॥

अर्थ:-

माया ब्रह्माच्या एकत्वाने जगदोत्पन्नाचा संकल्प सिध्द होऊन ते जगत ब्रह्म म्हणुनच प्रसवते किंवा हिरण्यगर्भ होऊन प्रसवते. ते ब्रह्म स्वरुप जीवशिवाच्या एकत्र येण्याचे मुळपीठ आहे. व त्याठिकाणी मायेचा छायारुप प्रवेश होऊन जगाचा भासमान होतो. ते परब्रम्ह व माया हे आईबाप होतात तोच हरि असुन व जीवशिव स्वरुपातील शरिरात अंशात्मक स्वरुपात असते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या स्वरुपाच्या ज्ञानाचा लाभ झाला की जीव शिव व शरिरसह सर्व लय होऊन वासना रहित होऊन वासनेचा लय होतो.


१२४
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा ।
परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
तें रूप साजिरें चतुर्भुजवेष ।
वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥
सिद्धीचें साधन चिंतामणि धन ।
कल्पवृक्ष घन वसते जेथें ॥३॥
निवृत्तिचें मूळ गोपाळ सकळ ।
साधक दयाळ हरि होय ॥४॥

अर्थ:-

अनंत सृष्टी अनंत देह व त्यांची अनंत घरे जरी वेगळी दिसत असली तरी परिणाम पाहिला तर त्यातील परमात्म तत्व एकच आहे. ते वैकुंठातील साजरे चतुर्भुजरुप नंदाच्या भाग्याने त्याला प्राप्त झाले आहे. त्याच परमात्माच्या ठिकाणी सिध्दीचे साधन, चिंतामणी चे धन व कल्पवृक्ष वन वसती करते निवृत्तिनाथ म्हणतात, माझे मुळ मी त्या गोपाळतच पाहिले व सर्व साधकांसाठी दयाळु हरि तेच स्वरुप आहे.


१२५

नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा ।
सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥
तें रूप सगुण अवघेंचि निर्गूण ।
गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥
अनंत तरंगता अनंत अनंता ।
सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥
निवृत्ति परिमाण अनंत नारायण ।
सर्वाहि चैतन्य आपरूपें ॥४॥

अर्थ: नित्य निर्गुण निराकार असलेला तो गोविंद सगुण साकार होऊन ह्या सृष्टीच्या निर्मितीचा खेळ खेळतो. सगुण रुपात असताना ही त्या परमात्यात गुणातीत मुळ स्वरुप कायम असते. जरी तो गुणातीत असला तरी त्याच्यात ते सर्व गुण भासतात. अनंत स्वरुप समुद्रात अनंत सृष्टीच्या निर्मितीच्या लाटा येतात व त्या लाटारुपी सृष्टीचा लय ही तिकडेच होतो पण त्या आशा सर्व सृष्टीचा पोषण कर्ता तोच असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या व्यापक परमात्मा चे स्वरुप मोजायला ही अनंत परिमाणे लागतात व त्या नारायणात ते मुळ चैतन्य जीवनरुपात राहते.


१२६
नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी ।
द्वैताची परवडी हारपली ॥१॥
तें रूप सुंदर कॄष्णाचें सकुमार ।
सेविती निर्मळ भक्तराज ॥२॥
विराटे अनंत ज्या माजि विरतें ।
नव्हेचि पुरतें शेषादिकां ॥३॥
निवृत्ति लक्ष्मी गरूड चिंतिती ।
तयांचिये मति आकळ हरि ॥४॥

अर्थ: त्या परमात्माच्या नामाची व्यापकता येवढी आहे की त्या ठिकाणी सर्व भेद अभेद होतात. अशा त्या सुंदर, सगुण रुपातील श्रीकृष्ण पूजेच्या सेवेचा लाभ भक्त घेतात. त्या रुपात पासुन सुक्ष्मा सारखी सर्व जगतातील स्वरुपे लय पावतात. ते रुप ज्याच्यावर पहुडले आहे त्या शेषाला ही त्याचे स्वरुप सांगता येत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, विष्णुप्रिय निकट असणारे लक्ष्मी व गरुड त्याचे सतत स्मरण करतात. तरी त्यांना ही तो अकळ व राहिला आहे.


१२७
खुंटले साधन तुटलें बंधन ।
सर्वही चैतन्य एकरूप ॥१॥
नाहीं तेथें माया नाहीं तेथें छाया ।
निर्गुणाच्या आया ब्रह्मरूप ॥२॥
चैतन्य साजिरें चेतवी विचारें ।
आपरूपें धीरें विचरत ॥३॥
निवृत्ति म्हणे तें कृष्णरूप सर्व ।
रोहिणीची माव सकळ दृष्टि ॥४॥

अर्थ: त्या एक रुप असणाऱ्या चैतन्यामध्ये अविद्ये बंधन नाही व साधक साधन साध्य ही त्रिपुटी ही नाही. त्या रुपाच्या ठिकाणी कोणते ही गुण व आकार नसुन भ्रम करणारे कोणतेही चिन्ह नाही. ते चैतन्य विचारांच्या चेतना जणुकाही पाणी होऊन संपुर्ण पृथ्वीवर पसरत (फिरत) आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात, ते जगताची सर्व रुपात हे तत्व आविष्कारले असले तरी जगत मृगजळा प्रमाणे मिथ्या असुन त्याचा लय त्याच रुपात निश्चित आहे.


१२८
निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ ।
विव्हळ पाल्हाळ नेणों कांही ॥१॥
तें रूप श्रीधर मानवी अकार ।
सर्व निराकार सिद्धि वोळे ॥२॥
कुटूंब‍आचार कुळवाडी साचार ।
सर्व हा श्रीधर एका एक ॥३॥
निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा ।
नामें कोटि यज्ञा होतजात ॥४॥

अर्थ: माया व परब्रह्म हे निकट आल्या शिवाय जगत उत्पन्न होत नाही तरी मायेचे मायिक गुण अविद्या, जडत्व, दुःख हे त्या व्यापक ब्रह्माला बंधन करु शकत नाही. ह्या पाल्हाळा पासून ते मुक्त असते. त्या ब्रह्मरुपाने सर्व सिध्दी सह मानवी श्रीधररुपात अवतार घेतला आहे. ते ब्रह्म सर्वापासुन वेगळा एकटे दिसत असले तरी त्याने कुटुंब कबिल्या आचार साचार करुन दाखवला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी दिलेल्या प्रतिज्ञेमुळे मी त्या त्याच्या नामात रत असल्यामुळे मला कोटी यज्ञांचे फळ प्राप्त झाले आहे.


१२९
रूप हें सावंळे भोगिताती डोळे ।
उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥१॥
पदरज वंदी ध्यान हें गोविंदी ।
उद्धव मुकुंदीं तल्लीनता ॥२॥
विदुक्र सुखाचा नाम स्मरे वाचा ।
श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥३॥
निवृत्तीचें ध्यान ज्ञानदेव खूण ।
सोपान आपण नामपाठें ॥४॥

अर्थ: उध्दव व अक्रुराचे डोळे सगुण सावळ्या कृष्णरुपाचे सोहळे भोगत असतात.मथुरेत नेण्यासाठी आलेल्या अक़ुराने त्या गोकुळाच्या धुळीत उमटलेल्या कृष्णपदाचे पहिले दर्शन घेतले तसे करणारा तो पहिला मथुरावासी होता. त्याच मुकुंद नामात तो उध्दव ही निमग्न आहे. तो विदुरकाका सतत त्या कृष्णरुपाचा जप करत असल्याने श्रीकृष्ण भगवानानी त्याचा अंगीकार केला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्या श्रीकृष्ण ध्यानाने, ज्ञानदेव त्या आत्मरुपात त्याची खुण मिळवुन व सोपानदेवानी नामपाठ करुन त्याला आपलासा केला आहे.


१३०

भरतें ना रितें आपण वसतें ।
सकळ जग होते तयामाजी ॥ १ ॥
तें रूप पैं ब्रह्म चोखाळ सर्वदा ।
नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ २ ॥
आशापाश नाहीं घरीं पूर्णापूर्ण ।
सकळ जग होणे एक्यारूपें ॥ ३ ॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक ।
जेथें ब्रह्मादिक ध्याती सदा ॥ ४ ॥

अर्थ:-

ज्या रुपा पासुन ह्या जगता पसारा पसरतो व त्या रुपात लय ही पावतो. ते स्वरुप आपल्या स्थानी कधी रिते व कधी भरते असत नाही. तेच ब्रह्म रुप सदा निर्दोष व आनंदरुप असुन सगुण श्रीकृष्ण रुपात नंदाच्या घरी आले आहे. त्यारुपाला कोणते ही आशापाश, पुर्णापूर्ता वगैरे नाही. सर्व जगताचे ऐक्य त्याच्यात सामावले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच रुपाचे सर्व ऋषी मुनी ध्यान करतात मी ही त्या नामसरोवराचा एक तट आहे


१३१
न देखों सादृश्य हारपे पैं दृश्य ।
उपनिषदांचें पैं भाष्य हारपले ॥ १ ॥
तें रूप उघडें कृष्णरूप खेळें ।
गोपाळांचें लळे पुरविले ॥ २ ॥
न घडे प्रपंच नाही त्या आहाच ।
सर्वरूपें साच हरि आम्हा ॥ ३ ॥
निवृत्तिचें पर कृष्ण हा साचार ।
सर्व हा आचार कृष्ण आम्हां ॥ ४ ॥

अर्थ:-

जगतात दिसणाऱ्या सर्व वस्तुत त्या स्वरुपाचे अस्तित्व असुन त्या रुपातच त्या सर्व वस्तूंचा लय आहे. त्या स्वरुपाचे वर्णन उपनिषदानाही करता येत नाही. तेच रुप सगुण साकार कृष्णरुप घेऊन गोकुळात अवतरले असुन गोकुळवासीयांचे लाड त्यांच्या बरोबर खेळत आहे. त्या रुपाचे दर्शन जरी होत असले तरी त्याला प्रपंच नाही तोच सर्व जगतातील वस्तूंचे जीवाचे रुप घेऊन हरिरुप दाखवत असतो. निवृत्तिनाथ म्हणतात, सर्वांच्या आचाराचे मुळपीठ असलेला तो कृष्ण असुन त्याच रुपात माझ्या समोर साकार झाला आहे.


१३२
नाहीं त्या आचारु सोंविळा परिवारु ।
गोकुळीं साचारु अवतरला ॥ १ ॥
गाई चारी हरी गोपवेष धरी ।
नंदाचा खिलारीं ब्रह्म झालें ॥ २ ॥
ध्याताति धारणें चिंतिताती मौन्यें ।
योगियांची मनें हारपति ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें तें वसुदेवकुळीं ।
अवतार गोकुळीं घेतलासे ॥ ४ ॥

अर्थ:-

ते परब्रम्ह निर्गुण असल्यामुळे ते कर्मविरहित व विटाळ नसलेले सोवळे स्वरुप असुन तेच सगुण साकार होईन गोकुळात अवतरले आहे. तेच परब्रम्ह यमुनातटी गायी चारते व ब्रह्माने जेंव्हा नंदाची खिलारे चोरली तेंव्हा त्या खिलारांचे ही रुप त्यानेच घेतले.योगी जेंव्हा मौन धारण करुन त्याचे ध्यान करतात तेंव्हा त्यांचे मन ही त्या स्वरुपात हारपुन जाते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या रुपाने गोकुळात येऊन नंदाघरी आपला अवतार धारण केला आहे.


१३३
अजन्मा जन्मला अहंकार बुडाला ।
बोध पै ऊठिला गोकुळीं रया ॥ १ ॥
आपरूपे गोकुळीं आपरूपें आप ।
अवघेंचि स्वरूप हरिचें जाणा ॥ २ ॥
रूपाचें रूप सुंदर साकार ।
गोकुळीं निर्धार वृंदावनीं ॥ ३ ॥
निवृत्तीचें पुण्य वेणु वाहे ध्वनि ।
जनमनमोहनि एकरूप ॥ ४ ॥

अर्थ:-

आपण चोरलेले गोधन परत गोकुळात दिसल्यामुळे तेंव्हा त्याचा अहंकार गळाला व त्याला शुध्द ज्ञानाचा बोध त्या गोकुळात झाला. त्या स्वरुपात त्याला पाहुन ब्रह्मा समजुन गेला की तो श्रीकृष्ण असुन त्यानेच सर्व रुपाचे धारण केले आहे. हे संपुर्ण गोकुळ त्या रुपाचे आविष्कार दाखवत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या मुरलीच्या ध्वनीने जग मोहित होते तो मुरलीचा ध्वनी मी ही ऐकत आहे.


१३४
परेसि परता न कळे पैं शेषा ।
तो गौळिया अशेषा माजी हरी ॥ १ ॥
भाग्य पैं फळलें नंदाघरीं सये ।
यशोदा पैं माय परब्रह्माची ॥ २ ॥
गौळिये नांदती गोधनाचे कळप ।
त्यामाजि स्वरूप कृष्णमूर्ति ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्यान गोपाळ आमुचा ।
आतां जन्म कैचा भक्तजना ॥ ४ ॥

अर्थ:-

ज्याच्या स्वरुपाचे वर्णन परा वाणीला करता येत नाही ज्याच्यावर ते स्वरुप आरुढ आहे आशा शेषालाही करता येत नाही ते सगुण रुप धारण करुन गोकुळात आले आहे. हे बुध्दीरुपी मैत्रीणी तेच रुप नंदा घरी आले असुन यशोदेला त्याचे मातापण मिरवायचे भाग्य मिळाले आहे. गौळियांबरोबर नांदतात ते गोधनांचे कळप, ते गोप हे सर्व त्या कृष्णाचे स्वरुप झाले आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात, त्याचे ध्यान करता करता आम्हाला जन्मच राहिला नाही म्हणजे त्या नामाने आम्हाला जन्म मरणाच्या चक्रातुन बाहेर काढले आहे.


१३५

ज्या रूपा कारणें वोळंगति सिद्धि ।
हरपती बुद्धी शास्त्रांचिया ॥ १ ॥
तें रूप साजिरें गोकुळीं गोजिरें ।
यशोदे सोपारें कडिये शोभे ॥ २ ॥
न संटे त्रिभुवनीं नाकळे साधनीं ।
नंदाच्यां आंगणीं खेळे हरी ॥ ३ ॥
निवृत्ति निधडा रूप चहूं कडा ।
गोपाळ बागडा गोकुळीं वसे ॥ ४ ॥

अर्थ: ज्याच्या रुपाचे वर्णन करताना शास्त्रांची बुध्दी हारपते त्याच्या दारी सर्व सिध्दीही सेवेसाठी तिष्ठत असतात. तेच गोजिरे साजिरे रुप यशोदेच्या कडेवर बसुन गोकुळाला दर्शन देत आहे. जे रुप त्रिभुवनाला दिसत नाही कोणत्याही साधनात अडकत नाही ते नंदाच्या अंगणात खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, तेच स्वरुप ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत ते गोकुळात संवंगड्यांबरोबर खेळत आहे.


१३६
न साहात दुजेपण आपणचि आत्मखुण ।
श्रुति जेथें संपूर्ण हरपती ॥ १ ॥
देवरूप श्रीकृष्ण योगियां संजीवन ।
तें रूप परिपूर्ण आत्माराम ॥ २ ॥
न दिसे वैकुंठी तें योगियांचे ध्यानबीज ।
तो गोपाळाचें काज हरि करी ॥ ३ ॥
निवृत्ति गयनि हरि उच्चारितां माजीं घरीं ।
होती मनोरथ पुरी कामसिद्धी ॥ ४ ॥

अर्थ: ज्याचे वर्णन श्रुती करु शकत नाहीत ज्याच्या स्वरुपात कोणतेही द्वैत नाही तेच स्वरुप आत्मखुण आहे. तेच देवस्वरुप कृष्णरुप योग्यांना संजिवनी देते तेच रुप हे परिपूर्ण आत्मस्वरुप आहे. जे स्वरुप वैकुंठात दिसत नाही जे स्वरुप योग्यांच्या ध्यानाचे बीज आहे ते सगुण रुपात गोपाळांची काम करत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या कृपेने मी त्याच नामाचा जप केला त्या मुळे माझे सर्व मनोरथ व इच्छा पूर्ण झाल्या.


१३७
सूर्यातें निवटी चंद्रातें घोंटी ।
उन्मनि नेहटीं बिंबाकार ॥ १ ॥
तें रूप सावळें योगियाचें हित ।
देवांचें दैवत कृष्णमाये ॥ २ ॥
सत्रावी उलंडी अमृत पिऊनि ।
ब्रह्मांड निशाणी तन्मयता ॥ ३ ॥
निवृत्ति अंबु हें वोळलें अमृत ।
गोकुळीं दैवत नंदाघरीं ॥ ४ ॥

अर्थः योग्यांच्या ध्यानात चंद्ररुपाला बाजुस करुन ज्ञानसुर्याचा शोध घेतला जातो. व त्या ज्ञानसुर्याचा बिंबाकार ते योगी मनात ठसवतात. चंद्र म्हणजे अंधार व सूर्य प्रकाश हे अज्ञान व ज्ञानाचे रुपक आहे. तेच ज्ञानबिंब सावळे रुप धारण करुन सर्व देवांचे दैवत झाले असुन तेच योग्यांना हितकार आहे. योगी चंद्राच्या सतरावीतुन ते नामामृत घेऊन आपल्या मनात ब्रम्हांडाचे स्वरुप म्हणुन धारण करतात. निवृत्तिनाथ म्हणतात, नंदाच्या घरी तेच दैवत अवतरले असुन ते नामामृत त्याने मला ही पाजले आहे.


१३८
न साधे योगी न संपडे जगीं ।
तें नंदाच्या उत्संगी खेळें रूप ॥ १ ॥
कृष्ण माझा हरी खेळतो गोकुळीं ।
गोपिका सकळीं वेढियेला ॥ २ ॥
गाईचे कळप गोपाळ अमुप ।
खेळतसे दीप वैकुंठीचा ॥ ३ ॥
निवृत्ति दीपडें वैकुंठें साबडें ।
यशोदामाये कोडें चुंबन देत ॥ ४ ॥

अर्थ: जे ब्रह्मस्वरुप योग्यांच्यां ध्यानात सापडत नाही जे जगाला दिसत नाही ते नंदाच्या मांडीवर खेळत आहे. तोच माझा हरि गोकुळात कृष्ण बनुन खेळत आहे व त्यांने सर्व गोपिका नादावल्या आहेत. तो वैकुंठीचा दिप गाईंचे कळप घेऊन गवळ्यांसोबत खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, मला ज्ञानप्रकाश देणारा निरागस कृष्ण माता यशोदेचे प्रेमाने चुंबन घेतो.


१३९
भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता ।
तो गोकुळीं खेळता देखों हरी ॥ १ ॥
मुक्तीचे माजीवडे ब्रह्म चहूंकडे ।
गौळणी वाडेकोडें खेळविती ॥ २ ॥
नसंपडे ध्यानीं मनीं योगिया चिंतनी ।
तो गोकुळीचें लोणी हरी खाये ॥ ३ ॥
निवृत्तिजीवन गयनीनिरूपण ।
तो नारायण गोकुळीं वसे ॥ ४ ॥

अर्थः पुर्ण समर्पण भावाने त्याचे नामस्मरण केले तर तर हरि पुर्णत्वाने प्राप्त होतो. तोच बाळकृष्ण बनुन गोकुळात खेळत आहे. तो मुक्तीदाता सर्व बाजुने जगात कोंदला आहे मात्र सगुण रुपातील त्याला, गवळणी कडेवर खेळवतात. जो परमात्मा योग्यांच्या ध्यानात सापडत नाही तोच गोकुळात लोणी चोरुन खातो. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी त्याचे स्वरुप मला समजवल्यामुळे त्या गोकुळात राहणाऱ्या नारायण मी समजु शकलो.


१४०

जेथुनीया परापश्यंती वोवरा ।
मध्यमा निर्धारा वैखरी वाहे ॥ १ ॥
तें रूप सुंदर नाम तें श्रीधर ।
जेणें चराचर रचियेलें ॥ २ ॥
वेदाचें जन्मस्थान वेदरूपें आपण ।
तो हा नारायण नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति दैवत पूर्ण मनोरथ ।
गोपिकांचें हित करि माझा ॥ ४ ॥

अर्थ:-

परा, पश्यंती, मध्यम, वैखरी हे वाणीचे सर्व प्रकार परमात्माचे वर्णन करु शकत नाहीत व शेवटी आपल्या हद्दीतील ओवरीत निवांत पडुन राहतात. तो नितांत सुंदर अ़सलेला श्रीधर ह्या चराचराचा निर्माता आहे. वेदांचे जन्मस्थान असलेला तो वेदरुप परमात्मा नंदाघरी नारायण झाला आहे.निवृत्तिनाथ म्हणतात, तो गोपिकांचे हित करणारा माझा देव माझे मनोरथ पूर्ण करतो.


१४१
उफराटी माळ उफराटें ध्यान ।
मनाचें उन्मन मूर्ति माझी ॥ १ ॥
तें रूप आवडे भोगिता साबडें ।
यशोदेसि कोंडें बुझावितु ॥ २ ॥
नहोनि परिमाण हरपलें ध्यान ।
आपणचि रामकृष्ण जाला ॥ ३ ॥
निवृत्तिची जपमाळा हे गोमटी ।
मन तें वैकुंठी ठेवियेलें ॥ ४ ॥

अर्थ:-

मनाला उन्मनी अवस्थेत त्याची मूर्ती पाहिली की उफराटे ध्यान व उफराटी माळ न जपता ही त्याचा लाभ होतो. येथे महाराज कर्मकांडाचा निषेध करतात. त्याच उन्मनी अवस्थेत निरागस कृष्णरुप पाहताना ते रुप यशोदेचीही कोडी निरसन करताना दिसते. त्याचे ध्यान करताना ध्यानच हारपून जाते व आत्माच स्वयंभ रामकृष्ण बनतो.निवृत्तिनाथ म्हणतात, त्या वैकुंठातील कृष्णाच्या पायावर त्याचेच नाम अर्पण केले की जपमाळ व जप तोच होऊन जातो. त्या परती जपमाळ दुसरी नाही.


१४२
श्यामाचि श्यामशेज वरी ।
तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥ १ ॥
शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरीं ।
तो नंदयशोदेघरीं क्रीडतुसे ॥ २ ॥
अनंत नामीं क्षीर क्षरलासे साचार ।
गोपिकासमोर हरीराजा ॥ ३ ॥
नाहीं योगिया दृष्टि मनोमयीं करि सृष्टि ।
पाहातां ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥ ४ ॥
शांति नेणें क्शमे पारु विश्रांतिसी अरुवारु ।
तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥ ५ ॥
विचाराचें देटुगें आकार निराकार सांगे ।
तो गोसावी निगे गोकुळीं रया ॥ ६ ॥
निवृत्तीचें परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म ।
चिंतितां चिंताश्रम नासोनि जाय ॥ ७ ॥

अर्थ:-

त्या श्याम रंग परमात्म्याच्या रंगामुळे आकाशच श्याम रंगात रंगुन त्याची शय्या झाले व त्या श्याम रंगामुळे क्षिरसागर ही अलौकिक निल तेजाने चमकत आहे. जो परमात्मा क्षिरसागरात शेषशय्येवर आहे तोच नंद यशोदेच्या घरात खेळत आहे. ज्याने क्षिरसागराची निर्मीती केली तोच परमात्मा गोपीकांसाठी हरिराज आहे. जे योगी मनाच्या दृष्टीने स्थुल जगताला पाहतात तेंव्हा ते जगत मिथ्या मायिक आहे हे त्यांना समजत नाही. व ज्ञानदृष्टी देऊन तोच हरि ते मायिक विज्ञात्वाला दुर करतो.जो परमात्मा शांती व क्षमेचे विश्रांतीस्थान आहे. किंवा ह्या दोन्ही त्याच्याजवळ वस्ती करतात.तो गोपाळांची कामे करत आहे. ज्याला विचारवे की तुझे मुळ रुप कोणते तर तो ठसठसशीत (देटुगे) पणे निराकार निर्गुण सांगतो तो गोसावी कृष्ण होऊन गोकुळात राहतो. निवृतिनाथ म्हणतात,त्याचे नुसते नाम घेतली की विजय होतो त्याच्या चिंतनाने चिंता दुर होते अ़सा ते चिंतामणी नाम आहे.


१४३
विस्तार विश्वाचा विवेकें पैं साचा ।
बोलताचि वाचा हारपती ॥ १ ॥
तें रूप श्रीधर कृष्णाचा आकार ।
सर्व निराकार एकरूपें ॥ २ ॥
नसतेनि जीव असतेनि शिव ।
तदाकार माव मावळली ॥ ३ ॥
निवृत्ति स्वरूप कृष्णरूप आप ।
विश्वीं विश्वदीप आपेंआप ॥ ४ ॥

अर्थ:-

जगत पित्याचे वर्णन करताना चारही वाणी लोप पावतात.परमात्म्याने कुठलेही रूप धारण केले तरी त्याची सर्व रूपे एकच आहेत.स्वरूप कुठलेही असले तरी ब्रह्मरूपाचा बोध झाल्याने भ्रमाचा नाश होतो. निवृत्तिनाथ म्हणतात, जगताचे मुळ रुप हे कृष्णरुपच आहे. व तो विश्वाचा दिप होऊन सहज वावरतो.


१४४
तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध ।
नामाचा उद्बोध नंदाघरी ॥ १ ॥
प्रकाश पूर्णता आदिमध्यें सत्ता ।
नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥ २ ॥
निवृत्ति साधन कृष्णरूपें सुख ।
विश्वीं विश्वरूप हरि माझा ॥ ३ ॥

अर्थ:-

जगाचे तारक तीर्थ असलेल्या भगवान श्रीकृष्णाचे नांव घेऊन नंदाच्या गोकुळात लोक एकमेकाला उद्बोध करतात. जो प्रकाशमान करण्याऱ्या सर्व वस्तुंमध्ये प्रकाशच आहे तो द्वैत अद्वैतात आडकत नाही. निवृतिनाथ म्हणतात, विश्वाचे विश्वरुप असणाऱ्या हरिच्या नामाचे साधन बनवल्यामुळे त्या कृष्णाचे सुख मला लाभले आहे.


१४५

आगम निगमा बोलतां वैखरी ।
तो यशोदेच्या करीं धरूनी चाले ॥ १ ॥
न संपडे शिवा बैंसताची ध्यानीं ।
जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥ २ ॥
कमळासनीं ब्रह्मा ध्यानस्थ बैसला ।
पाहतां पाहतां मुळा न संपडे ॥ ३ ॥
निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा ।
तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥ ४ ॥

अर्थ: ज्याचे वर्णन करणे आगमा निगमाला जमले नाही वेद व श्रुती मौनावल्या तो परमात्मा यशोदेचे बोट धरुन चालतो. महादेव शिव ध्यान लाऊन बसतात तरी त्यांच्ये पुर्ण ते स्वरुप ते पाहु शकत नाहीत, उन्मनी अवस्थेत ही तो त्यांना दिसत नाही. ब्रह्मदेव कमळाच्या आसनावर ध्यानस्त बसुन ह्याला पाहायला गेला तरी ही मुळ स्वरुपात पाहु शकला नाही. निवृतिनाथ म्हणतात. तो परमात्मा देवकीचे तान्हे बाळ झाला ही श्री गुरु गहिनीनाथानी मला त्याची खुण ही सांगितली


१४६
अष्टांग सांधनें साधिती पवन ।
ज्यासि योगीजन शिणताती ॥ १ ॥
तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी ।
क्रीडा नानापरी करी आत्मा ॥ २ ॥
अठरा साहिजणें बोलती परवडी ।
तो माखणासि जोडी स्वयें कर ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्येय कृष्ण हाचि होय ।
गयनिनाथें सोय दाखविली ॥ ४ ॥

अर्थ: अपानाचा निरोध करुन योगी जन अष्टांग साधना करुन शिणतात तरी त्यांना अप्राप्य असलेला हा कृष्ण बनुन हा परमात्मा गोपाळांबरोबर अनेक खेळ सहज खेळत आहे. ज्याचे वर्णन सहा शास्त्रे व अठरा पुराणे परावाणीने करतात तो गोपिंकांना हात जोडुन लोणी मागतो. निवृतिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी मार्ग दाखवल्या प्रमाणे माझे ध्येय ते श्रीकृष्ण रुपच झाले आहे. व त्याच्याशी मी एकरुप होतो.


१४७
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति ।
मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥ १ ॥
तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी ।
हाचि चराचरीं प्रकाशला ॥ २ ॥
आदि मध्य अंत तिन्ही जाली शून्य ।
तो कृष्णनिधान गोपवेषे ॥ ३ ॥
निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ ।
आवडी वैकुंठ वसिन्नले ॥ ४ ॥

अर्थः गुरुकृपेने अंधाऱ्या रात्री म्हणजे अज्ञानाच्या रात्री ज्ञानसुर्य उगवतो व त्या सुर्याला मावळणे माहित नाही. तोच श्री कृष्ण गोकुळात अवतरल्या मुळे चराचराला ज्ञानप्रकाश प्राप्त झाला आहे. भुत भविष्य व वर्तमाना हे त्रिकाल ज्याच्यात शुन्य होतात तो परमात्मा गोपवेश धारण करुन कृष्ण बनला आहे. निवृतिनाथ म्हणतात आवडीने त्याचे नाम घेतल्यामुळे ते वैकुंठपीठ माझ्या जवळ वस्तीला आले आहे.


१४८
दुभिले द्विजकुळी आलें पैं गोकुळी ।
नंद यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ १ ॥
खेळे लाडेकोडें गौळणी चहूंकडे ।
नंदाचें केवढे भाग्य जाणा ॥ २ ॥
ज्या रूपें वेधलें ब्रह्मांड निर्मळे ।
तेंचि हें आकारले कृष्णरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति दिवटा कृष्णाचिया वाटा ।
नामेचि वैकुंठा पावन होती ॥ ४ ॥

अर्थः ज्याचे दोहन ब्रह्मनिष्ठांनी केल्या मुळे तो पान्हावला व तो नंद यशोदे चा बाळकृष्ण म्हणुन गोकुळात आला. तोच लाडाकोडाने गौवळणींबरोबर खेळणारा कृष्ण नंदाघरी आल्याने त्याच्या भाग्याला पार नाही. ज्याच्या रुपामुळे ह्या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. तोच कृष्णरुप घेऊन अवतरला आहे. निवृतिनाथ म्हणतात, ज्याच्या नामाने वैकुंठ पावन झाले त्यांच कृष्णनामाची दिवटी करुन मी साधना पथावर वाटचाल करत आहे.


१४९
विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ ।
आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥ १ ॥
तें रूप गोकुळीं नंदाचिये कुळीं ।
यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ २ ॥
सर्वघटी नांदे एकरूपसत्ता ।
आपणचि तत्त्वतां सर्वांरूपी ॥ ३ ॥
निवृत्तीचें पार कृष्णचि पै सार ।
गोकुळीं अवतार नंदाघरीं ॥ ४ ॥

अर्थ:-

लक्ष्मीचा पती असलेला परमात्माच ह्या विश्वाचा आधिपती असुन तोच सर्वरुपानी समर्थ आहे. तोच परमात्मा गोकुळात, नंदाच्या कुळात यशोदेचा बाळ कृष्ण आहे. आपणच जगताच्या सर्व रुपात अंशात्मक असल्याने त्याच्या रुपाने जगात एकत्मता आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, गोकुळात नंदाघरी अवतरलेल्या कृष्णाचे नाम हे माझे सार आहे व तेच मला पार करणार आहे.


१५०

जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा ।
द्वैताचा हा लेखा हरपला ॥ १ ॥
तें रूप वोळलें नंदायशोदे सार ।
वसुदेवबिढार भाग्ययोगें ॥ २ ॥
नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी ।
त्यालागीं गौळणी खेळविती ॥ ३ ॥
निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपें ।
नामें पुण्यपापें हरपती ॥ ४ ॥

अर्थ:-

जेथे चारी वेदांना व श्रुती, स्मृती सारखा त्यांच्या शाखाना त्याचे वर्णन जमले नाही. ते वर्णन करण्याची त्यांची शक्तीच हरपली.ते साररुप परब्रह्म वसुदेवाच्या कुटुंबात जन्मले व नंद यशोदेला पुत्र म्हणुन मिळाले. ज्याने ब्रह्मांडे निर्मिले त्याचे माप करण्यास सगळी मापे थोकडी आहेत त्याला त्या गौवळणी सहज अंगावर खेळवतात. निवृतिनाथ म्हणतात, हे त्या कृष्णनामाचे सहज सोपे सार असुन त्याच्या नामामुळे पाप पुण्य दोन्ही हरपतात.


१५१
हा पुरुष कीं नारी नव्हे तो रूपस ।
शेखी जगदीश जगद्रूप ॥ १ ॥
तें हें कृष्णरूप यशोदेकडीये ।
नंदाघरीं होये बाळरूप ॥ २ ॥
ज्यातें नेणें वेद नेणती त्या श्रुती ।
त्या गोपिका भोगिती कामरूपें ॥ ३ ॥
निवृत्तिचें ब्रह्म कृष्णनामें खेळे ।
असंख्य गोवळें ब्रह्मरूप ॥ ४ ॥

अर्थ:-

त्या अरुप परमात्माला पुरूष किंवा स्त्री कसे म्हणता येईल तोच ह्या जगाचा जगदिश बनुन आला आहे. त्याच कृष्णरुपात तो नंदाच्या घरी बाळ होऊन यशोदेच्या कडेवर बसला आहे. ज्याला ओळखायला वेद व श्रुती कमी पडतात त्याचा वावर त्या गोपिका नित्य भोगतात. निवृतिनाथ म्हणतात, माझे बपरब्रह्म कृष्णनाम घेऊन त्या गोपाळांबरोबर खेळता खेळता त्यांना ब्रह्मरुप प्रदान करते.


१५२
ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज ।
लक्षितां सहज नये हातां ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम सखे नंदघरी ।
गौळियां माझारी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
न दिसे पाहतां शेषादिका गति ।
यशोदे श्रीपति बाळ झाला ॥ ३ ॥
गुंतलें मायाजाळीं अनंत रचनें ।
तो चतुरानना खुणें न संपडे ॥ ४ ॥
नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी ।
शेखीं तो अनुभवीं भुलविला ॥ ५ ॥
निवृत्ति रचना कृष्णनामें सार ।
नंदाचें बिढार ब्रह्म झालें ॥ ६ ॥

अर्थ:-

ध्यानाची धारणा व योग्यांच्या उन्मनी अवस्थेचे बीज जरी त्यांचे लक्ष असले तरी ते त्यांना सहज सापडत नाही.तेच परब्रह्म कृष्णनाम धारण करुन गौळ्यांबरोबर खेळत आहे. ज्यांची गती व त्याचे स्वरुप त्याच्या जवळ असणारे शेषादिक जाणु शकले नाहीत तोच यशोदेचा बाळ श्रीपती झाला आहे. ज्याने मायाधीन होऊन ह्या विश्वाची निर्मीती केली त्या ब्रह्मदेवाला हे त्याचे स्वरुप सापडले नाही. कारागृहात व बाहेर अनेक चमत्कार दाखवुन ही त्याचे स्वरुप देवकी व वसुदेवाला समजले नाही ते त्याला पाहुनच भुलले. निवृतीनाथ म्हणतात त्याच्यामुळे त्या नंदाचा सर्व परिवारच ब्रह्मरुप झाला त्या कृष्णनामाला मी सार म्हणुन वाङमयात रचले आहे.


१५३
चतुरानन घन अनंत उपजती ।
देवो देवी किती तयामाजि ॥ १ ॥
तेंचि हें सांवळें अंकुरलें ब्रह्म ।
गोपसंगे सम वर्ते रया ॥ २ ॥
निगमा नाठवे वेदाचां द्योतुकु ।
तो चतुर्भुज देखु नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ती म्हणे शंखचक्रांकितमूर्ति ।
आपण श्रीपति क्रीडतसे ॥ ४ ॥

अर्थ:-

त्याच्या स्वरुपात कित्येक देव देवता नव्हे नव्हे ब्रह्मदेव ही उपजतो. तेच ब्रह्मस्वरुप सावळे सुंदर रुप घेऊन त्या गोपाळांबरोबर समानतेची वर्तणुक करताना दिसते. तेच परब्रह्म वेदांचे द्योतक असुन ही वेदांने ते समजत नाही. तोच चतुर्भुज परमात्मा नंदाचा कृष्ण झाला आहे. निवृतिनाथ म्हणतात, शंखचक्रांकित असलेला लक्ष्मीचा मालक गोकुळात नवनविन क्रिडा करतो आहे.


१५४
ज्या रूपाकारणें देव वोळंगणे ।
योगी गुरुखुणें सेविताती ॥ १ ॥
ते रूप गोकुळीं गोपाळांचे मेळीं ।
अखंड त्यामेळीं खेळतुसे ॥ २ ॥
ब्रह्मांड कडोविकडी ब्रह्मांड घडी ।
या योग परवडी हरपती ॥ ३ ॥
निवृत्तीचे धन ब्रह्म हें रोकडें ।
गौळणी त्यापुढें खेळविती ॥ ४ ॥

अर्थ:-

त्या ब्रह्मस्वरुपाचे चिंतन किंवा नामरुप सेवा देवादिक व योगी आपल्या गुरुकृपेने करतात.तेच परब्रह्म गोकुळात त्या गोपाळांबरोबर अखंड खेळत आहे.ते ब्रह्मस्वरुप अनेक ब्रह्मांड घडवत व मोडत असते ते नुसते ऐकुन योगी भान हरपुन जातात. निवृतिनाथ म्हणतात, ज्याला गौवळणी आपल्या पुढ्यात खेळवतात तेच माझे महाधन परब्रह्म आहे.


१५५

गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं ।
चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥ १ ॥
देखिलागे माये सुंदर जगजेठी ।
नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
आकाश सौरस तत्त्व समरस ।
तो हा ह्रषिकेश गोपीसंगें ॥ ३ ॥
निवृत्ति साधन निरालंबीं ध्यान ।
तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझें ॥ ४ ॥

अर्थ:-

ज्याच्या एका घासात गगन हरपते ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांडे आहेत तेच परब्रह्म ह्या जगताचे चैतन्य स्वरुप आहे. नंद यशोदेकडे त्याला खेळताना मी त्या सुंदर जगजेठीला पाहिला. जो एकत्वाने सर्व आकाश बनुन व्यापला आहे तोच हृषीकेश गोपी बरोबर आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्रीकृष्ण नाम सोडुन इतर कोणतेही साधनचा उपयोग मी माझ्या ध्यानासाठी करत नाही.


१५६
चिंतितां साधक मनासि ना कळे ।
तो गोपिकासी आकळे करितां ध्यान ॥ १ ॥
देखिलागे माये सगुणागुणनिधि ।
यशोदा गोविंदीं प्रेम पान्हा ॥ २ ॥
न माये सर्वाघटी आपणचि सृष्टी ।
तो यमुनेच्या तटीं गायी चारी ॥ ३ ॥
निवृत्ति साधन कृष्णाचे रूपडें ।
ब्रह्मांडा एवढें तदाकार ॥ ४ ॥

अर्थ:-

ज्याचे चिंतन सतत करणाऱ्या साधकाला तो सापडत नाही तो परमात्मा गोपिकांच्या प्रेमभक्तिमुळे सतत त्यांच्या ध्यानात असतो. ज्याला यशोदा आपला प्रेमपान्हा पाजते त्या सगुण गुणनिधीला मी पाहिला. यमुनेच्या तटावर गायी चारणारे ते परब्रह्म सृष्टीतील कोणत्याच स्वरुपात बंधिस्त होत नाही. निवृतिनाथ म्हणतात, त्याच कृष्णरुपाला माझे नामसाधन बनवल्यामुळे सर्व ब्रह्मांड मला तदाकार एकरुप दिसत आहे.


१५७
निज लक्षाचें लक्ष हरपलें भान ।
दिन मान शून्य जया माजी ॥ १ ॥
तें ब्रह्म गोजिरें गोपाळ संगती ।
संवगडे सांगाती भाग्यवंत ॥ २ ॥
वेणुवाद्यध्वनि यमुनाजळ स्थिर ।
ध्यानाचा प्रकार कृष्णरासी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तें स्वरूप सौख्य रूपडें ।
पाहाती चहूंकडे योगीजन ॥ ४ ॥

अर्थ:-

जे स्वरुप काळ, स्थल, हुन परे आहे त्या निर्गुण परब्रह्माठायी योगी ज्याला आपले लक्ष मानतात त्या लक्षला विसरतात. तेच गोजिरे कृष्णपरब्रह्म आपले भाग्यवान सोबती गोपाळांबरोबर राहते. ज्या वेणुच्या वादनामुळे यमुनेचे जळ ही पांगुळते नव्हे नव्हे यमुनेलाही त्याचे ध्यान लागते. निवृतिनाथ म्हणतात, तेच कृष्णरुप नित्य सर्वत्र व्यापक, सुखरुप, ब्रह्मस्वरुप आहे त्यालाच योगी सर्व ठिकाणी पाहतात.


१५८
अनंतरूप देव अनंत आपण ।
अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥ १ ॥
तो हा हरिमाये गोकुळीं अवतार ।
गोपीसंगें श्रीधर खेळतुसे ॥ २ ॥
शास्त्रांसि नाकळे श्रुति ही बरळे ।
तें गोपवेषें खेळे गोपाळांमाजी ॥ ३ ॥
निवृत्तिचें सार गयनीविचार ।
ब्रह्मचराचरमाजि वसे ॥ ४ ॥

अर्थ:-

जो अनंत रुपाने सृष्टीत व्यापला आहे. त्यालाच सर्व रुपात पाहुन योग्यांना त्याच्या अंतर्बाह्य रुपात दिसतो तोच हरिचा अवतार गोकुळात झाला असुन तोच गोपीसंगे खेळत आहे. जो परमात्ना शास्त्राना कळत नाही ज्याच्या बद्दल बोलताना श्रुती ही बरळ होते. तोच परमात्मा गोपवेशात गोपाळांबरोबर खेळत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात सर्व चराचरात व्यापुन असलेला परमात्मा आहे हे विचार सार गुरु गहिनीनाथांनी मला दिले.


१५९
जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे ।
सूर्य तारांगण हरपती ॥ १ ॥
तें रूप रूपस कृष्णब्रह्मनाम ।
गौळिया सप्रेम वोळलेंसे ॥ २ ॥
जेथें लय लक्ष हरपोन सोये ।
द्वैत तें न साहे सोहंबुद्धि ॥ ३ ॥
निवृत्ति मान्यता सेवितु साकार ।
आपण आपार गोपवेषें ॥ ४ ॥

अर्थ: त्या परब्रह्माचे लक्षित लक्षण पाहिले तर त्याचा ठाव घेता येत नाही. त्याच्या स्वरुपात अनेक सुर्य तारांगणे हरपतात. ते मोठ्या प्रेमाने गौळियांना भेटणारे ते सुंदर रुप म्हणजे कृष्णरुप आहे. त्याच्या रुपात लक्षचा लय होऊन हरपुन जाते व सोहं ब्रह्म ही उपाधी ही द्वैत वाटायला लागते व जीव शिवाचे ऐक्य होते. निवृतिनाथ म्हणतात, ज्या गोपाळ वेशाचा आधार घेऊन ते परब्रह्म आले आहे. त्यांची मी अपार सेवा करतो.


१६०

मी पणे सगळा वेदु हरपला ।
शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥ १ ॥
तें रूप सुंदर कृष्ण नाम सोपार ।
निरालंब गोचर गोकुळींचे ॥ २ ॥
सेविता योगियां सुलभ दुर्गम ।
गौळियां सुगम नाम घेतां ॥ ३ ॥
निवृत्ति निकट कृष्णनामसार ।
पापाचा संचार नाम छेदी ॥ ४ ॥

अर्थ: ज्याचे वर्णन करायला मी पणा न सोडलेले वेद गेले ते तिथेच हरपले तर शास्त्रांना त्याचे वर्णन करता आले नाही. तेच परब्रह्म सुंदर व देखणे सगुण रुप घेऊन कृष्णनाम धारण करुन गोकुळात अवतरले आहे. सर्वत्र व्यापक व सोपे असणारे ते परब्रह्म योग्यांना समजायला अवघड होते व सगुण कृष्णरुपाच्या नामा मुळे त्या गौळ्यांना सोपे झाले आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या कृष्णनामाच्या प्रभावाने पापाचा समुळ नाश होतो त्याच नामाचा मी निकट आश्रय केला आहे.


१६१
हरिदास संगे हरिदास खेळे ।
ब्रह्मादिक सोहळे भोगिताती ॥ १ ॥
संतमुनिदेवसनकादिक सर्व ।
तिहीं मनोभाव अर्पियेला ॥ २ ॥
पुंडलिकफळ वोळले सकळ ।
शंकर सोज्वळ प्रेमें डुले ॥ ३ ॥
निवृत्ति लोळत चरणरजीं लाटा ।
माजि त्या वैकुंठा आत्मलिंगीं ॥ ४ ॥

अर्थ: हरिच्या दासा सोबत घालवलले वेळ हरिदासासाठी जे ब्रह्मादिक सोहळे भोगतात तसाच असतो. हरिदास म्हणजे त्याचे नाम घेणारे संत मुनी देव सनकादिक ज्यांनी आपल्या सर्व इच्छा त्याच्या पायाशी अर्पित केल्या आहेत. त्याच मुळे संत पुंडलिकाच्या कृपेमुळे ते सगुण परब्रह्मचे प्रेम आपल्याला प्राप्त झाले आहे. तेच प्रेम मिळाल्यामुळे महादेव शंकर ही डोलत असतात. निवृतिनाथ म्हणतात, त्या आत्मलिंग असणाऱ्या श्री विठ्ठलाच्या चरणरजांच्या लाटात मी लोळत पडलो आहे.


१६२
सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव ।
मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ १ ॥
दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम ।
खेचरासी प्रेम विठ्ठलाचें ॥ २ ॥
नरहरि विठा नारा ते गोणाई ।
प्रेम भरित डोहीं वोसंडती ॥ ३ ॥
निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे ।
पुंडलिकसंगे हरि खेळे ॥ ४ ॥

अर्थ: सोपे नाम जपणारा सोपान, नित्य स्वानंद स्वरुप प्राप्त करणारे ज्ञानदेव व श्री विठ्ठलावर प्रचंड भाव असणारी मुक्ताई सोबत आहे. विसोबा खेचरासही त्या विठ्ठलाचे प्रेम लाभल्यामुळे हे सर्व टाळ दिंडी घेऊन त्या विठ्ठलाचे नाम घोळवत आहेत. नरहरी सोनार, विठा, नारा ही नामदेवांची मुले व गोणाई हे सुध्दा त्या विठ्ठला नाम डोहात प्रेमभरित झाले आहेत. निवृतिनाथ ज्ञानदेवाला स्पष्ट सांगतात हे ज्ञानराजा तो पुंडलिक श्री विठ्ठलाबरोबर खेळत आहे.


१६३
वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें ।
प्रेमाचें भरतें वैष्णवासी ॥ १ ॥
वोळतील चरणीं वैष्णव गोमटे ।
पुंडलिकपेठें हरि आला ॥ २ ॥
सोपान खेंचर ज्ञानदेव लाठा ।
देताती वैकुंठा क्षेम सदा ॥ ३ ॥
निवृत्तीनें ह्रदयीं पूजिलें तें रूप ।
प्रत्यक्ष स्वरूप विठ्ठलराज ॥ ४ ॥

अर्थः सर्व इच्छा प्राप्त करणारी श्री विठ्ठल नाम कामधेनु सर्व वैष्णवांना मिळाल्याने त्यांना प्रेमाचे भरते आले आहे. संत पुंडलिकामुळे पंढरीपेठेत तो श्री विठ्ठल आल्याने त्याच्या चरणकमलांचा लाभ वैष्णव घेत आहेत. सोपानदेव, विसोबा खेचर व सर्वात मोठा वैष्णव ज्ञानराज हे त्या वैकुंठपीठाला श्री विठ्ठलाला क्षेम देत आहेत. निवृतिनाथ म्हणतात, ज्या रुपाला मी हृदयात पूजले तेच रुप श्री विठ्ठल बनुन प्रत्यक्ष स्वरुपात अवतरले.


१६४
धन्य हा खेचर धन्य हा सोपान ।
भक्तीचें जीवन जनक हेतु ॥ १ ॥
धन्य याचें कूळ पवित्र कुशळ ।
नित्य या गोपाळ जवळी असे ॥ २ ॥
याचेनि स्मरणें नासती दारुणें ।
कैवल्य पावणें ब्रह्मामाजी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे परब्रह्म हें साकार ।
तेथील अंकूर उमटले ॥ ४ ॥

अर्थ: सतत केलेल्या भक्ती मुळे त्या भक्तीचे जनकत्वच प्राप्त करुन कृतकृत्य झालेले सोपानदेव व विसोबा खेचर आहेत. ज्यांच्या जवळ तो गोपाळ नामरुपाने सतत असतो त्याचे कुळ पवित्र व कुशळ असते. या संतांचे जे सतत चिंतन करतात त्यांचे दारुण पाप नष्ट होते व ते भगवंताच्या कैवल्यास प्राप्त होतात. निवृतिनाथ म्हणतात, हे संत म्हणजे त्या सगुण साकार परब्रह्माचे अंकुर आहेत.


१६५

कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें ।
वरी आकारलें फूल तया ॥ १ ॥
सुमनाचेनि वासें भ्रमरभुलले ।
मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥ २ ॥
तैसेहे संत विठ्ठलीं तृप्त ।
नित्य पैं निवांत हरि चरणीं ॥ ३ ॥
नाठवे हें दिन नाठवे निशी ।
अखंड आम्हांसि हरिराजा ॥ ४ ॥
तल्लिन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे ।
डिंगर हरिचे राजहंस ॥ ५ ॥
टाहो करूं थोर विठ्ठल कीर्तनें ।
नामाच्या सुमनें हरि पुजूं ॥ ६ ॥
निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला ।
प्रपंच आबोला हरिसंगें ॥ ७ ॥

अर्थ: कमळाच्या देठ सकट कमळाची कळी ही देठच वाटते व नंतर कमळ फुलले की ते देठवर नसल्यासारखे वाटते त्या फुलामुळे ते देठ दिसत नाही. कमलदलाच्या सुगंधामुळे ते भ्रमर येवढे मोहित होतात की त्यांच्या इंद्रियाद्वारे लाकुड पोखरण्याचा गुणधर्म विसरतात. तसेच हे संत त्या विठ्ठल नामात तृप्त होतात व त्या विठ्ठल चरणकमलांवर निवांत होतात. त्या हरिनामामुळे ते रात्र व दिवस ही विसरतात. ज्ञान व अज्ञान हा निरक्षीर विवेक असणारे हे विठ्ठलाचे जणु राजहंसच आहेत त्या मुळे ते त्या नामामृत प्रेमाने तल्लिन होतात. हे संत विठ्ठलनामाचा टाहो करुन कीर्तन करतात व त्याच विठ्ठलाच्या नामाने त्याचीच पूजा बांधतात. निवृत्तिनाथ म्हणतात, मी त्या नामचिंतनामुळे प्रपंचाचा निरास करुन त्या नामघोषात निवांतपणे तल्लिन झालो.


१६६
गयनी गव्हार कृपेचा उद्धार ।
वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा ।
चालिले वैकुंठा समारंबें ॥ २ ॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि ।
चालिलें गजरीं हरिसंगे ॥ ३ ॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर ।
करिताती गजर हरिनामें ॥ ४ ॥

अर्थः माझे श्री गुरु गहिनीनाथांनी माझ्यावर उदार अमृतमय कृपेचा वर्षाव केला आहे. तोच प्रेमवर्षाव मी नित्यमुक्त मुक्ताईवर केल्याने ती वैकुठांतील समारंभ येथेच भोगत आहे. टाळ, विणा व गरुडटके घेऊन ते हरिनामाचा उच्चार करत हरि बरोबर चालतात. निवृतिनाथ म्हणतात, हे वैष्णव असलेले सोपानदेव विसोबा खेचरादी सर्वजण विठ्ठलनामाचा गजर करतात.


१६७
शांति क्षमा दया सर्वभावें करुणा ।
तोचि नारायणा आवडे दासु ॥ १ ॥
तोचि एक साधु बोलिजे पैं जनीं ।
निरंतर ध्यानीं कृष्णमूर्ति ॥ २ ॥
जीवशिव एक सर्वत्र चैतन्य ।
ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥ ३ ॥
तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे ।
नित्य नारायणें तारिजे त्यासि ॥ ४ ॥
येउनि जनीं सदा पैं तो विदेही ।
तारकू सबाहीं सप्रेमळु ॥ ५ ॥
निवृत्ति सांगतु भक्तीचा महिमा ।
करी शांति क्षमा तो विरळा असे ॥ ६ ॥

अर्थ: ज्याच्याकडे दया, क्षमा, शांती व करुणा भाव आहे असा भक्त भगवंताचा आवडता दास असतो. ज्याच्या ध्यान्यात सतत ती कृष्णमूर्ती असते त्याला लोकांनी साधु म्हंटले पाहिजे. जाच्या कडे जीव व शीवाकडे सम्यक दृष्टीने पाहण्याची दृष्टी आहे व जो करुणेचा झरा आहे तोच धक्त धन्यत्वाला पोहचतो. जो भक्त सतत हरि नामाचा घोष करतो त्यालाच तो नारायण तारत असतो. जे महात्मे जनामध्ये विदेही अवस्थेत वावरुन त्यांना प्रेम देतात तेच जगाचे तारक होतात. निवृतिनाथ म्हणतात, जो सतत हरिनामाचा गजर करतो व शांती क्षमा आपल्या अंगी बाणवतो मी त्याच भक्तांचा महिमा सांगत आहे.


१६८
प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा ।
न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥ १ ॥
अहिंसेचें स्वरूप हेंचि हरिरूप ।
न म्हणे हरि आप सर्व आहे ॥ २ ॥
नाहीं त्यांसि जय नुद्धरे सर्वथा ।
हरिवीण व्यथा कोण वारी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये ।
तेणें मार्गें पाहे हरि सोपा ॥ ४ ॥

अर्थ: मी व माझे ह्या देह कल्पनेनुसार मार्गक्रमण करणारा कधीच वैकुंठाला प्राप्त होत नाही. तो अभक्त नुसते अहिंसेचे तत्व मानतो पण सर्व जग हे हरिने ओतप्रोत आहे हे मानत नाही त्याला कधी ही जय व यश प्राप्त होत नाही. कारण हरिच सर्वसामर्थ्यशाली मदत आहे व तोच तारणारा आहे. निवृतिनाथ म्हणतात, ज्यांने गुरुचरणाचा आश्रय त्याच्यासाठी हरिप्राप्तीचा मार्ग सोपा आहे.


१६९
कांसवीचीं पिलीं करुणा भाकी ।
परिसंपडलीं निकीं चरणसोय ॥ १ ॥
कामधेनु घरीं हरि माझा गोपाळ ।
मज काळवेळ नाठवें तैसी ॥ २ ॥
चातका चिंतिता जरी नपवे जीवन ।
तरीच शोकें प्राण तृषा हेतु ॥ ३ ॥
निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु ।
नामाचा उच्चार तेणें छंदें ॥ ४ ॥

अर्थ: कासवीला स्तन नसतात त्यामुळे कासवीच्या पिलानी त्याच्या चरणकमलाची याचना केली व दृष्टीतून प्रेमपान्हा पाजायचे वरदान कासवीला मिळाले. त्यामुळे त्या हरिचरणांवर शरणागती केली तर तीच कामधेनु त्या भक्ताघरी येऊन राहते मग तो निवात काळवेळातीत होऊन हरिभजनात लीन होऊ शकतो. चातक पक्षी जमिनीवरचे पाणी पित नाही पावसाचे पाणी पितो व तो पडलाच नाही तर शोक ग्रस्त होऊन तृषार्थ होऊन त्याचे चिंतन करतो. निवृतिनाथ म्हणतात सतत स्वानंदात राहणारी माझी गुरुमाऊली माझी कामधेनु झाल्यामुळे मी सतत नामस्मरणाचा छंद जोपासत आहे.


१७०

आदिनाथ उमाबीज प्रकटिलें ।
मछिंद्रा लाधली सहजस्थितीं ॥ १ ॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली ।
पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥ २ ॥
वैराग्यें तापला सप्रेमें निवाला ।
ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ ३ ॥
निर्द्वद्व निःशंक विचरतां मही ।
सुखानंद ह्रदयीं स्थिर जाला ॥ ४ ॥
विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख ।
देऊनि सम्यक अनन्यता ॥ ५ ॥
निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण ।
कूळ हें पावन कृष्णनामें ॥ ६ ॥

अर्थ: आदिनाथ शंकराकडुन पार्वती ज्ञान ऐकत असताना त्या क्षिरसागरात सहजस्थितीत असणाऱ्या मछिंद्रनाथाना लाभ झाला. तीच प्रेमनाममुद्रा मछिंद्रनाथानी गोरक्षनाथांना दिली व गोरक्नाथांकडुन ती कृपा गहिनीनाथांना ती प्राप्त झाली. ज्यांच्या कडे धगधगीत वैराग्य आहे. व त्यांच्या हृदयात प्रेम आहे त्यांना शांती सुखाचा ठेवा प्राप्त होतो. ज्याच्या कडे कोणते ही द्वैत नाही व त्याला कोणतीही त्याच्या स्वरुपाबद्दल शंका नाही व जो सतत पृथ्वीवर फिरत राहुन जनांवर कृपा करतो त्याच्या हृदयात तो सुखानंद परमात्मा वास करतो. जो पुर्ण विरक्त आहे व वेदांना शरण जाऊन जो वेदोक्त मुखाने करतो त्याला तो परमात्मा सम्यक व अन्यन ज्ञान प्रदान करतो. निवृतीनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांनी कृपा करुन हे गुह्य ज्ञान मला दिल्याने माझे कुळ पावन झाले आहे.


१७१
चेतवि चेतवि सावधान जिवीं ।
प्रकृति मांडवी लग्न वोजा ॥ १ ॥
मातृका मायानिवेदन हरि ।
प्रपंचबोहरि रामनामें ॥ २ ॥
निवृत्तिदेवीं अद्वैत परणिली शक्ति ।
निरंतर मुक्ति हरि नामें ॥ ३ ॥

अर्थ: हे जीवा अज्ञानाच्या झोपेतून जागा हो ज्ञानचेतना घे हे सावधान मंगलाष्टक आहे. अविद्येच्या मंडपात माये बरोबर तुझे लग्न लागले आहे. मातृका म्हणजे मायेचे पूजन असते शक्तीची रुपे आहेत किंवा शक्ती म्हणजेच माया तिची रुपे आहेत अश्या ह्या मायिक मातृकांचे पुजन करुन त्या प्रपंचा सह रामनाम घेत त्यालाच देऊन टाक. निवृत्तीनाथ म्हणतात ती माया देऊन टाकल्यामुळे मुक्ती नावाची कन्या प्राप्त होते व तिच्याशी परिणय केला म्हणजे शक्तीरुप निरंतर मुक्ती प्राप्त होते.


१७२
हरि आत्मा होय परात्पर आलें ।
नाम हें क्षरलें वेदमतें ॥ १ ॥
वेदांतसिद्धांत नाहीं आनुहेत ।
सर्वभूतीं हेत हरि आहे ॥ २ ॥
हरिवि न दिसे गुरु सांगतसे ।
हरि हा प्रकाशे सर्व रुपीं ॥ ३ ॥
निवृत्तिनें कोंदले सद्‌गुरूंनीं दिधलें ।
हरिधन भलें आम्हां माजी ॥ ४ ॥

अर्थ: आत्मतत्व हेच हरिरुप आहे व आत्मा व हरि हे परात्पर आहेत त्याच हरिचे नाम ही त्याच्या रुपा सारखे अनंत स्वरुप आहे असे वेद सांगतात. सर्वामध्ये तो हरि आहे हा वेदाचा एकमेव हेतु व सिध्दांत आहे. श्री गुरुनी सांगितल्या प्रमाणे तो हरिच मला सर्व पदार्थात दिसतो व तोच हरि ज्ञानप्रकाश बनुन आला आहे. निवृतिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांनी हे ज्ञान दिल्यामुळे तेच आमचे नामधन आम्हामध्ये भरले आहे.


१७३
सुमनाची लता वृक्षीं उपजली ।
ते कोणे घातली भोगावया ॥ १ ॥
तैसा हा पसारा जगडंबर खरा ।
माजि येरझारा शून्यखेपा ॥ २ ॥
नाहीं त्यासि छाया नाहीं त्यासी माया ।
हा वृक्ष छेदावया विंदान करी ॥ ३ ॥
निवृत्तिराज म्हणे गुरुविण न तुटे ।
प्रपंच सपाटे ब्रह्मीं नेम ॥ ४ ॥

अर्थ: फुलांच्या वेली शेजारील झाडाचा आधार घेऊन वाढतात मग त्या वेलींच्या फुलांचा सुगंध कोण भोगतो. त्यानुसार जगताचा पसारा हा खरा नाही मायेच्या अधिन आहे म्हणुन मिथ्या आहे. व जीव जन्म व मृत्युच्या येरझारा त्यामध्ये घालत असतो. त्या मायीक वृक्षाकडुन कृपेची छाया मिळु शकत नाही. म्हणुन हा मायिक वृक्ष तोडण्याचा प्रयत्न काहीनी केला. निवृतीनाथ म्हणतात हा मायिक वृक्ष कोणत्याही उपायाने साधनाने तुटत नाही. गुरुकृपा झाली की जीवाला ब्रह्मावस्था प्राप्त होते व तो सहज स्थितीत जातो तरी प्रपंच पसारा उतरत नाही.


१७४
छेदियेला वृक्ष तुटलें तें मूळ ।
प्रपंच समूळ उडोनि गेला ॥ १ ॥
गेलें तें सुमन गेला फुलहेतु ।
अखंडित रतु गोपाळीं रया ॥ २ ॥
सांडिला आकारु धरिला विकारु ।
सर्व हरिहरु एकरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति निधान वोळले गयनी ।
अमृताची धणी आम्हां भक्ता ॥ ४ ॥

अर्थ: ह्या अभंगात आलेले रुपक मागच्या अभंगतुन आले आहे. त्या संसार वृक्षाला मी तोडला व तो समुळ उखडला. त्यामुळे त्या प्रपंचाचा निरास झाला. त्या प्रपंच वृक्षाच्या संसार नावाच्या फुलातील विषय नावाचा भोग गेला तसेच हेत म्हणजे इच्छा ही राहिली नाही. त्यामुळे मी अखंडितपणे त्या गोपाळाबरोबर रत झालो. शिव व विष्णु हे एकरुप आहे हे जाणवल्यामुळे सर्व जगताच्या आकार व विकार ह्यांना मी सोडले. निवृत्तिनाथ  म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी सांगितलेल्या नाम निधानामुळे भक्तांना नामामृताची प्राप्ती झाली.


१७५

परम समाधान परमवर्धन ।
नाम जनार्दन क्षरलें असे ॥ १ ॥
अक्षर अनंत क्षर हा संकेत ।
मागुतें भरत आपण्यामाजी ॥ २ ॥
आपण क्षरला आपण उरला ।
वैकुंठी वसिन्नला चतुर्भुज ॥ ३ ॥
निवृत्तिगुरुगयनी सांगितलें हरि ।
नाम चराचरीं विस्तारलें ॥ ४ ॥


१७६
विस्तार हरिचा चराचर जालें ।
त्या माजी सानुलें गुरु दैवत ॥ १ ॥
गुरुविण व्यर्थ विज्ञान न संपडे ।
ज्ञान हेतुकडे हिंडनें व्यर्थ ॥ २ ॥
गुरु परब्रह्म गुरु मात पिता ।
गुरूविण दैवत नाहीं दुजें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज गुरु बोध दिठी ।
भक्ति नाम पेटी उघडिली ॥ ४ ॥

अर्थ: त्या हरिचा विस्तार संपुर्ण चराचरा व्यापुन उरलेला आहे त्यामुळे त्या व्यापक स्वरुपापुढे माझे गुरु जरी लहान वाटत असले तरी वापरेल्या दैवत उपाधीने ते ही व्यापकच ठरतात. (अणु रेणु या थोकडा तुका आकाशा येवढा). संसार समजचे विज्ञान गुरुविण कळत नसले व शुध्द ज्ञान जरी झाले तरी त्याचा हेतु हरि झाला नाहीतर ते व्यर्थ ठरते. असे माझे गुरु भाझे माता पिताच आहेत व हेच माझे दैवत आहे दुसरे नाही. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांच्या बोधामुळे मला नामभक्तीची पेटी उघडता आली.


१७७
तुटलें पडळ भेटलें केवळ ।
सर्व हा गोपाळ गुरुमुखें ॥ १ ॥
न देखों बंधन सर्व जनार्दन ।
व्यासदिकीं खूण सांगितली ॥ २ ॥
ब्रह्मांडविवरण हरिचा हा खेळ ।
त्यांतील हा वेळ तोडियेला ॥ ३ ॥
निवृत्ति बोधला गुरुखुणा बोध ।
मनाचा उद्बोध हरिचरणीं ॥ ४ ॥

अर्थः श्री गुरु गहिनीनाथांच्या मुखात ऐकलेल्या त्या परमात्म्याच्या ज्ञानाच्या बोधामुळे माझे भ्रांतीचे पडळ तुटले व मला आत्मस्वरुपातील भगवंताचे दर्शन झाले. श्री गुरु व्यासानी त्यांच्या ग्रंथात वर्णन केलेले वासुदेवाचे स्वरुप वाचुन आम्हाला त्याला जाणण्याचे कोणतेच बंधन उरले नाही. सर्व ब्रह्मांड ची निर्मिती करणे ही हरिची लिला आहे. व त्याला त्यासाठी वेळेचे बंधन उरले नाही. तो ते निमिशमात्रात करतो. निवृतिनाथ म्हणतात, त्याच्या खुणेचा बोध गुरु गहिनीनानी केल्यामुळे माझे मन त्या हरिचरणावर विनटले आहे.


१७८
मारुनि कल्पना निवडिलें सार ।
टाकीलें असार फलकट ॥ १ ॥
धरिला वो हरि गोविलेंसे सर्व ।
विषयाची माव सांडीयेली ॥ २ ॥
पहाते दुभतें कासवी भरितें ।
नेत्रानें करितें तृप्त सदा ॥ ३ ॥
निवृत्ति अमृत गुरुकृपातुषार ।
सर्व ही विचार हरि केला ॥ ४ ॥

अर्थ: मी कल्पनेचा त्याग केला व आत्मस्वरुपाचे सार स्विकारल्यामुळे मला फलकट संसार टाकता आला. नाम मंत्र जीवी धरल्यामुळे त्या व्यापक परमात्म्याला नामभक्तीने मनात गोवले त्यामुळे इंद्रियांना विषय उरला नाही मग विषय मला टाकता आले. जशी कासवी नेत्रातुन पान्हा देऊन पिलांचे पोषण करते तसे माझे पोषण गुरु करतात. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथांनी केलेले नामामृत तुशारांच्या वर्षावा मुळे माझा विचारच हरिरुप झाला बुध्दीला हरि वाचुन काही दिसत नाही.


१७९
आमचा साचार आमचा विचार ।
सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥
धन्य माझा भाव गुरूचा उपदेश ।
सर्व ह्रषीकेश दावियेला ॥ २ ॥
हरिवीण दुजे नेणें तो सहजे ।
तया गुरुराजें अर्पियेलें ॥ ३ ॥
हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा ।
हरिचिया पंथा मनोभाव ॥ ४ ॥
देहभाव हरि सर्वत्र स्वरूप ।
एक्या जन्में खेप हरिली माझी ॥ ५ ॥
निवृत्ति हरी प्रपंच बोहरी ।
आपुला शरीरीं हरि केला ॥ ६ ॥

अर्थ:-

शिव व विष्णु हे दोन्ही एकच आहेत हाच आमचा विचार आहे व हाच आमचा आचार झाला आहे. श्री गुरुच्यां उपदेशावर पुर्ण भाव ठेवल्यामुळे त्यांनी मला त्या हृषीकेशाचे स्वरुप दाखवले आहे. त्यामुळे त्या हरि वाचुन दुसरे काही नाही हे कळल्यामुळे जे काही राहिले ते म्हणजे अज्ञान अविद्या मी श्री गुरु गहिनीना अर्पण करुन मी फक्त त्या हरिरुपालाच विनटलो. हरिच माझे व्रत व कथा झाल्यामुळे त्या हरिच्या पंथाला मी मार्गस्थ झालो. त्यामुळे माझा देहभान गळला व मी हरिरुप असल्याची जाणिव झाली व ह्याच जन्मात माझ्या जन्म मरणांच्या खेपातुन सुटका झाली. निवृतिनाथ म्हणतात देहभावालाच संपवुन हरिरुप दिल्यामुळे माझा प्रपंच ही निरसला. किंवा प्रपंच ही हरिरुप झाला.


१८०

सर्वांघटी वसे तो आम्हां प्रकाशे ।
प्रत्यक्ष आम्हां दिसे गुरुकृपा ॥ १ ॥
विरालें ते ध्येय ध्यान गेलें मनीं ।
मनाची उन्मनि एक जाली ॥ २ ॥
ठेला अहंभाव सर्व दिसे देव ।
निःसंदेह भाव नाहीं आम्हां ॥ ३ ॥
निवृत्ति साधन गयनिप्रसादें ।
सर्व हा गोविन्द सांगतुसे ॥ ४ ॥

अर्थ:-

सर्व शरिरात तो परमात्मा एकत्वाने प्रकाश किंवा चैतन्य रुपाने वसत आहे पण तो फक्त गुरुकृने पाहता येतो. ध्येय ध्याता ध्यान ह्या त्रिपुटीचा निरास त्यानी केल्याने मन उन्मनाची एकच अवस्था झाली किंवा अवस्था लागली. त्या बोधाने अहंभाव गेल्याने सर्वत्र तो परमात्मा पाहता आल्याने माझ्या भावही निसंदेह पणे राहिला नाही.निवृतिनाथ म्हणतात, गहिनीनाथानी नामाचे साधन सांगितल्यामुळे सर्वच त्या गोविदांची स्वरुप आहेत ह्याचे भान झाले.


१८१
माता पिता नाहीं बंधु बोध कांही ।
सर्वसम डोही वर्तताती ॥ १ ॥
सर्व आम्हा राम भजनीं निष्काम ।
दिन कळा नेम भजनशीळ ॥ २ ॥
दया वसे देहीं क्षमा ते माधवीं ।
कासवीं शोभवी जनीं इये ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे ऐसा गयनि सद्‌गुरु ।
उपदेश पूरु अमृताचा ॥ ४ ॥

अर्थ:-

आई बाप बंधु हे उपाधीने वेगळे वाटले तरी एकाच वंशाचे असतात तसेच सर्व स्वरुपात तो परमात्मा एकत्वाने असल्याने सर्वा ठायी सम आहे. आम्ही निष्काम राम भजन करतो ते दिन काला नेमावर नाही तर सतत जन करणे ह्या प्रमाणे आहे. कासवीच्या नेत्रातुन केलेल्या प्रेमपान्ह्यामुळे ती पिले जशी शोभुन दिसतात तसे सतत भजनामुळे दया व क्षमा शरिरात उतरल्याने भक्त शोभुन दिसतात. निवृतिनाथ म्हणतात, त्या कासवीच्या सारखा उपदेशाचा पान्हा गुरु गहिनीनी माझ्यावर धरल्या मुळे ते माझे सदगुरु झाले.


१८२
पूर्णबोधें धाले आत्मराम धाले ।
निखळ वोतले पूर्णतत्त्वें ॥ १ ॥
पूर्वपूण्य चोख आम्हांसि सफळ ।
गयनि कल्लोळ तुषार आम्हां ॥ २ ॥
चंद्र सूर्य कीर्ण आकाश प्रावर्ण ।
पृथ्वी अंथुरण सर्वकाळ ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु धडफुडा ।
ब्रह्मांडा एवढा अनंत माझा ॥ ४ ॥

अर्थ:-

माझ्या आत्माला गुरुकृपेने पुर्ण बोध झाल्याने मला आत्मरामाचे दर्शन घडले. आमचे पुर्वपुण्य चोख असलाने श्री गुरुनी नामामृत कल्लोळाचे तुशार आम्हावर उडवले.त्यामुळे आम्ही आकाशाचे पांघरुण व पृथ्वीचे आंथरुण करुन चंद्र सुर्याचा प्रकाश सर्वकाळ भोगतो. निवृतिनाथ म्हणतात, गुरु गहिनीनाथ धडफुडा म्हणजे खरे गुरु असल्याने त्या ब्रह्मांडाचे अनंत स्वरुप मला समजले.


१८३
आम्हां जप नाम गुरुखूण सम ।
जन वन धाम गुरुचेचि ॥ १ ॥
नेघों कल्पना न चढों वासना ।
एका पूर्णघना शरण जाऊं ॥ २ ॥
तप हें अमूप नलगे संकल्प ।
साधितां संकल्प जवळी असे ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे मज निरोपिलें धन ।
हेचि ब्रह्मखुण जाणिजेसु ॥ ४ ॥

अर्थ:-

आम्हाला नामजपाची खुण गुरु समानच असल्यामुळे आम्हाला हे जन किंवा वन हे श्रीगुरुंचे आहेत असे वाटते. कोणत्याही कल्पनेत न अडकता वासनेला स्वतवर आरुढ न होऊ दिल्यामुळे मला त्या एकमेव पुर्णघन हरिला शरण जाता आले. तो परमात्मा आमच्या जवळ असल्याने आम्हाला साधनेचे संकल्प न करता अमुप तप करता आले.निवृतिनाथ म्हणतात, तो नाम धनाचा ठेवा श्री गुरु गहिनीनाथानी दिल्यामुळे त्या परब्रह्माची खुण आम्हाला समजली.


१८४
आम्हां हेंचि थोर सद्‌गुरुविचार ।
नलगें संप्रधार नानामतें ॥ १ ॥
नेघों ते काबाड न करूं विषम ।
ब्रह्मांड हें होम आम्हां राम ॥ २ ॥
नेदूं यासि दुःख उन्मनीचें सुख ।
न करूं हा शोक आला गेला ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे आम्हां सद्‍गुरु उपदेश ।
सर्व भूतीं वास हरि असे ॥ ४ ॥

अर्थः आमच्या साठी श्री गुरुनी दिलेला विचार सर्वश्रेष्ट आहेत त्यापुढे आम्ही दुसऱ्या कोणत्याही विचाराला मानत नाही त्याची आम्हाला गरज नाही. श्री गुरुनी सांगितल्या प्रमाणे आम्ही रामनाम यज्ञ करत असल्याने दुसऱ्या विचारांचे काबाड म्हणजे कष्टाचे ओझे आम्हाला वागवावे लागत नाही. साधनेचे कष्ट देहाला न देता आम्ही नामजपाने उन्मनी अवस्थेचे सुख भोगतो त्यामुळे कोणताही शोक आम्हा जवळ येत नाही. निवृतिनाथ म्हणतात सर्वाठायी हरि हा गुरु गहिनीनी दिलेला आम्हाला उपदेश आहे.


१८५

चराचरीं हरि गुरुमुखें खरा ।
माजि ब्रह्म सैरा विचरों आम्हीं ॥ १ ॥
आम्हां ऐसें व्हावें तरीच हें भोगावें ।
निरंतर ध्यावें पोटाळूनि ॥ २ ॥
नाहीं येथें काळ अवघे शून्यमये ।
निर्गुणी सामाये तुन माझी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणें परत्रिंकूटगोल्हाट ।
त्यावरील नीट वाट माझी ॥ ४ ॥

अर्थ: ह्या चराचरात हरि भरल्याचे स्वतः गुरु गहिनीनाथानी सांगितले असल्याने त्या ब्रह्म स्वरुपा बरोबर स्वछंदाने फिरत असतो. आम्हा आत्मस्वरुपाने ब्रह्मरुप झाल्याने त्या ब्रह्म स्वरुपाला भोगत असतो व ते आत्म स्वरुप व ब्रह्मस्वरुप एकच झाल्याने एकमेकाला पोटाळुन असल्यासारखे वाटते. ते ब्रह्म स्वरुप शुन्यमय असल्याने शुन्याला कालाचे परिमाण नाही म्हणुन आम्ही देहासह त्या शुन्य स्वरुप ब्रह्मात एकरुप असतो. निवृतिनाथ म्हणतात, आकार मात्रेने झालेला स्थूल देह, उकार मात्रेने झालेला सुक्ष्म देह व मकार मात्रेने झालेला कारण देह वरिल टिंब म्हणजे महाकारण देह ही ओमकाराची रचना आहे. मी ह्या त्रिकुट गोल्हाटाचे म्हणजेच ॐचे ध्यान केल्याने मी ब्रह्म रुपाशी एकरुप झालो आहे. व हाच सरळ मार्ग आहे स्वस्वरुपाची खुण पटवण्याचा.


१८६
नव्हें तें पोसणें नव्हे तें साधन ।
उपदेशखुण वेगळीं रया ॥ १ ॥
न भेदें पालथें वज्रें मढियेलें ।
जीवन घातलें न भरें घटीं ॥ २ ॥
नाइके उपदेश नव्हे खुण सिद्ध ।
योनिसी प्रसिद्ध मढियेले ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे जरीं कृपा करि श्रीगुरु ।
तरिच हा संप्रधारु घरीं आम्हां ॥ ४ ॥

अर्थ: काही लोक परमात्म्याच्या प्राप्ती साठी मना प्रमाणे साधन वापरतात पण तो प्राप्त होत नाही ह्याचे कारण त्यांच्या गुरु उपदेशाची खुण नसते. कोणत्याही मातीच्या घटाला आतुन बाहेरुन वज्रालेपन केले तर तो फोडता येत नाही व पाण्यात पालथा टाकला तर त्यात पाणी जात नाही. त्या पालथ्या घटा प्रमाणे तो आत्मज्ञान आत घेत नाही त्या मुळे तो रिकामा राहतो व आतुन बाहेरुन जन्म मृत्युचा थर देऊन 84 लक्ष योनीतुन मुक्त होत नाही. निवृतीनाथ म्हणतात जर गुरु गहिनीनाथ कृपा करतील तर त्याच्या स्वरुपाच्या विचार साधनाची प्राप्ती होईल.


१८७
साकार निराकार ब्रह्मीचे विकार ।
तेथील अंकुर गुरुराज ॥ १ ॥
रज तम नाहीं सात्विक तेही ।
परिपूर्ण देहीं आत्माराम ॥ २ ॥
सर्वघटवासि सर्वत्रनिवासी ।
आपण समरसीं बिंबलासें ॥ ३ ॥
निवृत्तिची खुण गुरूचा उद्गार ।
सर्व हा निर्धार आत्माराम ॥ ४ ॥

अर्थः सगुण व निर्गुण होणे हे त्या परब्रह्माचे स्वरुप आहे हे गुरुनी सांगितले आहे. ज्या देहात रज व तम नाहीत तो सात्विक देह असतो व त्या परिपुर्ण देहात आत्माराम असतो. ते परब्रह्म सर्व शरिरात विराजत असते व ते स्वप्रकाशाने बिंबत असते. त्या सर्वत्र असणाऱ्या आत्मारामाला पाहण्यासाठी श्री गुरु गहिनीनाथांच्या तोंडातुन निघालेल्या शब्दातुन खुण सापडते


१८८
प्राकृत संस्कृत एकचि मथीत ।
गुरुगम्य हेत पुराणमहिमा ॥ १ ॥
वेदादिक मत शास्त्र हें बोलत ।
श्रुतीचा संपत वाद जेथें ॥ २ ॥
पृथ्वी हे ढिसाळ आकाश कव्हळ ।
जन्म मायाजाळ विरत जेथें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे गुरु गयनि सौरसें ।
आपण जगदीश सर्वारूपीं ॥ ४ ॥

अर्थ: हरि प्राप्ती करुन घेणे हा प्राकृत किंवा संस्कृत ग्रंथांचा. पुराणांनी किंवा गुरुनी सांगितलेला हेतु असतो. हरिप्राप्तीसाठी वेद व त्यांचे उपांग शास्त्र बोलत असते व श्रुतींचा वाद ही त्या हेतुशी संपत असतो. माये मुळे जन्मलेल्या जीवाला ब्रह्मरुप झाल्यावर माया निवृत करता येते तसे पृथ्वीचे ढिसाळपण व आकाशाचे कवटाळणे त्या ब्रह्म स्वरुपात लय पावते. निवृतिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांच्या कृपा सौरसाने तो जगदिश मला सर्व रुपात दिसत आहे.


१८९
सार निःसार निवडूनि टाकीन ।
सर्व हा होईन आत्माराम ॥ १ ॥
राम सर्वा घटीं बिंबलासे आम्हां ।
पूर्ण ते पूर्णिमा सोळाकळी ॥ २ ॥
न देखों दूजें हरिविण आज ।
आणिकाचें काज नाहीं तेथें ॥ ३ ॥
निवृत्ति गौरव गुरुमुखें घेत ।
आपणचि होत समरसें ॥ ४ ॥

अर्थ: ज्ञान प्राप्त झाल्यावर मी सार व निसार निवडुन घेऊन त्या आत्मारामाचा होऊन जाईन. जसा चंद्र प्रतीपदा ते पोर्णीमा मध्ये 16 कला दाखवत आपली प्रतीमा बिंबवत असतो तसा तो आत्माराम सर्व मध्ये अंशात्मक रुपात सर्वत्र बिंबत असतो. मला हरिभक्ती शिवाय कोणतेच काम राहिले नसुन मला त्या हरि शिवाय दुसरे काही दिसत नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, मी माझ्या श्री गुरु गहिनीनाथांकडुन त्या आत्मारामाचा गौरव ऐकला आहे व मी त्याच्याशी समरस झालो आहे.


१९०

पृथ्वी श्रीराम आकाश हें धाम ।
आपण विश्राम स्थूलरूपें ॥ १ ॥
सूक्ष्मस्थूल राम साधक परम ।
नाम सर्वोत्तम सर्वारूपीं ॥ २ ॥
आकार विकार सम सारिखाचि हरि ।
बाह्यअभ्यंतरीं आपणचि ॥ ३ ॥
निवृत्ति निष्टंक ज्ञान तें सम्यक् ।
गयनि विवेक सिद्ध पंथ ॥ ४ ॥

अर्थः आत्माराम रुप पृथ्वी व गृह रुप आकाशात स्थुल रुप घेऊन आपण विश्राम करतो. नामाची साधना हे सर्वोत्तम साधन असुन सुक्ष्म किंवा स्थुल रुपात त्या रामनामाचे साधन करणे उत्तम आहे. सर्वत्र आकार विकाराने भरलेला तो व्यापक परमात्मा सर्व ठायी सम असुन अंतर्बाह्य तोच सर्वत्र भरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, ज्या सिद्धांत ज्ञाना मुळे सम्यक झालेले श्री गुरु गहिनीनाथ विवेक पंथांचे वारकरी झाले आहेत.


१९१
हरिविण न दिसे जनवन आम्हा ।
नित्य तें पूर्णिमा सोळाकळी ॥ १ ॥
चन्द्रसूर्यरश्मी न देंखों तारांगणें ।
अवघा हरि होणें हेंचि घेवो ॥ २ ॥
न देखो हे पृथ्वी आकाश पोकळीं ।
भरलासे गोपाळीं दुमदुमीत ॥ ३ ॥
निवृत्ति निष्काम सर्व आत्माराम ।
गयनीचा धाम गूजगम्य ॥ ४ ॥

अर्थ: पोर्णिमेचा पुर्ण चंद्र अंगात 16 कळा घेऊन त्या सर्वाना जसा व्यापुन असतो तसे जन वन सर्वकाही हरिने व्यापले आहे. त्याच्या शिवाय आम्हाला काही दिसत नाही. संपूर्ण जगत व्यापलेल्या हरिमुळे आम्ही चंद्र सुर्य रश्मी तारांगणे पाहात नाही तिथे ही त्या हरिलाच पाहतो. आकाश व पृथ्वी ह्यातील पोकळी पासुन पृथ्वीला ही आम्ही हरिरुपात पाहतो. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथ त्यांच्या गुह्य स्थानातील निरंजनी घरात राहतात व त्या मुळे मी निष्काम होऊन त्याला पाहायचा प्रयत्न करतो.


१९२
स्वरूप साजणी निद्रिस्त निजलें ।
भलें चेतविलें गुरुरायें ॥ १ ॥
सावध सावध स्मरेरे गोविंद ।
अवघा परमानंद दुमदुमि ॥ २ ॥
निद्रेचिया भुलीं स्वरूपविसरू ।
प्रकाशला थोरु आत्मारम ॥ ३ ॥
निवृतिदेवो आनंद झालया ।
लवति बाहिया स्वस्वरूपीं ॥ ४ ॥

अर्थः आत्मस्वरुप मैत्रिणी मला श्री गुरु गहिनीनाथानी आत्मस्वरुपाची ओळख करवुन मला माया पटलातुन जागे केले. त्यांनी मला सावध हो सावध हो म्हणत त्या गोविंदाचे स्मरण करत सर्व जगतात भरुन उरलेला परमानंद प्राप्त करुन दिला. अज्ञानाच्या निद्रेत मला स्वरुपाची भुल पडली पण आत्मज्ञानाचा प्रकाश पडला व मी सावध झालो. निवृत्तिनाथ म्हणतात, दोन्ही बाह्या स्वस्वरुप आनंदाने स्पुरुन आल्या आहेत त्या मुळे त्या आत्मारामाला आलिंगन देऊन मी आनंद प्राप्त करत आहे.


१९३
मनाची वासना मनेंचि नेमावी ।
सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥ १ ॥
आपेंआप निवेल आपेंआप होईल ।
विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥ २ ॥
साधितां मार्ग गुढ वासना अवघड ।
गुरुमार्गी सुघड उपरती ॥ ३ ॥
निवृत्ति वासना उपरति नयना ।
चराचर खुणा हरि नांदे ॥ ४ ॥

अर्थ:-

मनातील वाईट इच्छा मनातच संपवुन सर्वत्र भरुन असलेल्या विठ्ठलाला मनात धरले की मन वासनारहित होते. हे सर्व करायला सोपे आहे फक्त विठ्ठलाचे स्मरण केले की वासना आपोआप निमतील व विठ्ठल मनात आपोआप स्थापित होईल काही गुढ इच्छा परमार्थ करताना त्रास देतात पण गुरुमार्गी वैराग्य साधना केली की त्या निघुन जातात. निवृत्तिनाथ म्हणतात, माझ्या डोळ्यांना तर चराचरात व्यापक असलेला हरि पाहायची वासना लागली आहे.


१९४
एक देव आहे हा भाव पैं सोपा ।
द्वैतरूप बापा पडसी नरकीं ॥ १ ॥
द्वैत सांडी अद्वैत धरी ।
एक घरोघरी हरी नांदे ॥ २ ॥
सबाह्य कोंदलें परिपूर्ण विश्वीं ।
तोचि अर्जुनासि दुष्ट जाला ॥ ३ ॥
गयनि प्रसादें निवृत्ति बोधु ।
अवघाचि गोविंदु अवध्य रूपीं ॥ ४ ॥

अर्थ:-

जर एकात्म देव आहे तत्व मानले नाही व त्यात द्वैत पाहिले तर नरकाला जावे लागेल. तेंव्हा आपल्यामध्ये असलेले द्वैत टाकले की सर्व घरा मध्ये तो हरिच राहत आहे ही भावना दृढ होते. अर्जुनाचा साह्यकारी म्हणुन दिसणारी तो श्रीकृष्ण सर्व विश्वात ओतप्रोत भरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांच्या कृपे मुळे सर्व रुपात त्या गोविंदाला मी पाहात आहे.


१९५

दिननिशीं नाहीं अवघा दीपक ।
एक रूपें त्रैलोक्य बिंबलेसे ॥ १ ॥
तें रूप सांगतां नये पैं भावितां ।
गुरुगम्य हाता एक तत्त्वें ॥ २ ॥
सांडावे पैं कोहं धरावें पै सोहं ।
अनेकत्व बहु एकतत्त्वी ॥ ३ ॥
निवृत्ति साचार वैकुंठीचे घर ।
देह हें मंदीर आत्मयाचें ॥ ४ ॥

अर्थ:-

त्या ब्रह्मदिपकाच्या जवळ दिवस रात्र हा भेद नाही तो सतत प्रकाश देतो.तोच ज्ञान प्रकाशाने एकरुपाने त्र्यैलोकात व्यापुन आहे.गुरुच्या शिकवणीवर विश्वास ठेवला तर तो अनुभवता येतो अन्यथा त्याचे वर्णन अशक्य आहे. स्वतःतील कोहमचा मी सोडुन सोहं शिवाचा अंगिकार केला तर अनेकत्वामध्ये एकत्व साधता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, सकळ वैकुंठ साचार होऊन त्याचे ह्या देहातच घर करुन त्या मंदिरात आत्मारामाची स्थापना करता येते.


१९६
द्वैताचीये प्रभे नसोन उरला ।
निराकार संचला एकरूपें ॥ १ ॥
तें हें सांवळें स्वरूप डोळस ।
बाळरूप मीस घेतलेंसे ॥ २ ॥
तिहीं लोकीं दुर्लभ न कळे जीवशिवीं ।
तो आपणचि लाघवी मावरूपें ॥ ३ ॥
निवृत्तीचें सार जीवशिवबिढार।
रूनें निर्धार सांगितला ॥ ४ ॥

अर्थ:-

द्वैताच्या प्रभावातही ही तो निर्गुण परमात्मा भासमान होऊन उरला आहे. व निराकार असुन ही सर्व जगताच्या रुपातुन व्यापुन राहिला आहे. त्या निर्गुण रुपाने श्रीकृष्ण रुपी सगुण बालकत्व घेऊन अवतार घेतला आहे. तिन्ही लोक व जीव शिवाला न कळणारा परमात्मा आपल्या मायारुपाने सगुण लाघवी बाल स्वरुपात आला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, जीव शिव चे सार ओझे खांद्यावर घेऊन मार्ग चालावा असे श्री गुरु गहिनी निश्चयात्मक सांगतात.


१९७
निजतेज बीज नाठवे हा देह ।
हरपला मोह संदेहेसी ॥ १ ॥
काय करूं कैसें कोठे गेला हरि ।
देहीं देहमापारीं हरि जाला ॥ २ ॥
विदेह पैं गंगा पारुषली चित्तीं ।
चिद्रूपीं पैं वृत्ति बुडोनि ठेली ॥ ३ ॥
गुरुलागिम भेटी निवृत्ति तटाक ।
देखिलें सम्यक्‍ समरसें ॥ ४ ॥
चित्तवृत्ति धृति यज्ञ दान कळा ।
समाधि सोहळा विष्णुरूप ॥ ५ ॥
ज्ञानगाये हरिनामामृत ।
निवृत्ति त्वरित घरभरी ॥ ६ ॥

अर्थ:-

आत्मारामाचे निजतेजाचे बीज देहात रुजले की मोह संदेह हरपून जातात. काय करु हा हरि कोठे गेला म्हणुन शोध सुरु केला तर तो हरि ह्या देहात देह म्हणुन सापडला. विदेही अवस्थेतील गंगा आत्मारामरुपी चित्त सागराला मिळाली व त्या एकत्वाच्या ठिकाणी सर्व वृत्ती तदाकार होऊन त्या गंगासागरात बुडाल्या. श्री गुरु गहिनीनाथ तलाव असुन मी त्या तलावाचा तट असुन तो तट व तलाव सम्यक दिसले की तलाव पूर्ण होऊन साकार होतो. चित्त, वृत्ती, धृती, यज्ञ दान ह्या कलानी समाधीस्थ होऊन त्या विष्णुरुपाशी एकरुप होता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, सतत त्याचे नाम ज्ञान पुर्वक गायन केल्यामुळे तो हरि वृत्ती रहित होऊन माझ्यात संपुर्ण भरुन राहिला आहे.


१९८
श्यामाची श्याम सेजवरी करी परवस्तुसी भेटी ।
ऐसा तोचि तो सद्‌गुरुरे ॥ १ ॥
सद्‌गुरुवीण मूढासि दरुशन कैचें ।
ऐसा तोचि तो चमत्कारगे बाईये ॥ २ ॥
एकमंत्र एक उपदेशिती गुरु ।
ते जाणावें भूमीभारु ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षत्वें दावी ।
ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ४ ॥

अर्थ: त्या परब्रम्हाला कोणी निळ्यारंगाचा मानते तर कोणी काळ्या रंगाचा मानते. कारण देहाचा रंग ही काळा आहे. काळ्या रंगांच्या देहाने निळ्या रंगाशी तद्रुपता पावता येते. तसेच जो परब्रम्हांशी तद्रुपता करुन देतो त्याला सद्गुरु म्हणतात. त्या देहरूपी जीवास परब्रह्माचे दर्शन फक्त सद्गुरूच करुन देतात हे आश्चर्यच आहे. साधकाच्या भावानुसार मंत्र न देता वेगळाच मंत्र देणारे गुरु हे भूमीला भारच असतात. निवृत्तिनाथ म्हणतात, गुरुनी दाखवलेले तत्त्वज्ञान साक्षत्व दाखवते तेच एक आश्चर्य आहे.


१९९
नेणो पैं द्वैत अवघेंचि अद्वैत ।
एकरूप मात करूं आम्हीं ॥ १ ॥
अवघाचि श्रीहरि नांदे घरोघरीं ।
दिसे चराचरीं ऐसे करा ॥ २ ॥
सेवावे चरण गुरुमूर्ति ध्यान ।
गयनि संपन्न ब्रह्मरसे ॥ ३ ॥
निवृत्ति चोखडा ब्रह्मरसु उघडा ।
गुरुकृपें निवाडा निवडिला ॥ ४ ॥

अर्थ: सर्वत्र तो परमात्मा कोणते ही द्वैत न ठेवता एकत्वाने भरला आहे. आम्ही त्या एकच रुपाचे वर्णन करु. सर्वत्र सर्व ठिकाणी तोच परमात्मा एकत्वाने भरुन राहिला आहे. श्री गुरु गहिनीनाथ ब्रह्मरसाने परिपूर्ण आहे. त्याच गुरुमूर्तीच्या चरणाची सेवा मी करतो. निवृत्तिनाथ म्हणतात, गुरुकृपे मुळे तो शुध्द ब्रह्मरस आम्हाला निवडुन घेता आला.


२००

म्हणवितो नंदाचा बाळ यशोदेचा ।
आपण चौवाचातीत कृष्ण ॥ १ ॥
शब्दासि नातुडे बुद्धिसि सांकडें ।
तो सप्रेमें आतुडे स्मरतां नाम ॥ २ ॥
उपचाराच्या कोटी न पाहे परवडी ।
तों प्रेमळाची घोडी धोई अंगें ॥ ३ ॥
निवृत्तिचें तप फळलें अमुप ।
गयनिराजें दीप उजळिला ॥ ४ ॥

अर्थ: नंद व यशोदेचा मुलगा म्हणवुन घेणारा तो श्रीकृष्णाचे वर्णन करणे चारी वाणीना ही शक्य नाही. त्या श्रीहरिचे प्रेमाने नाव घेतले तर तो साकार होतो नाहीतर बुध्दीला तो सापडत नाही शब्दात सांगता येत नाही. कोटी उपचार केले तरी त्यांना तो जाणत नाही पण भक्ताच्या प्रेमासाठी त्याचे घोडे ही धुतो. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथानी ज्ञानदीप उजळल्यामुळे व मागचे तप असल्यामुळे तो फलद्रुप झाला.


२०१
अनंत ब्रह्मांडें अनंत रचना ।
शून्य दे वासना तेथें झाली ॥ १ ॥
मन गेलें शून्यीं ध्यान तें उन्मनी ।
चित्त नारायणीं दृढ माझें ॥ २ ॥
तेथें नाहीं ठावो वेदासि आश्रयो ।
लोपले चंद्र सूर्य नाहीं सृष्टीं ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तो ठाव मज पैठा ।
नेतसे वैकुठा गुरुनामें ॥ ४ ॥

अर्थः  शुध्द वासनारहित अंतःकरणाने त्याने अनंत ब्रह्मांडाची रचना केली. माझ्या चित्तात त्या नारायणानामा मुळे दृढत्व आल्यामुळे मनात तोच व्यापुन राहिला व ध्यानात उन्मनी अवस्थेत तोच राहिला. त्या ब्रह्म स्वरुपाचे ठाव घेणे वेदाना अशक्य आहे. त्याच्या स्वरुपात चंद्र सुर्य व सृष्टी ही लोप पावते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या परब्रम्हाच्या नामाच्या आश्रय केल्याने तो मला सापडला आहे व गुरुनामामुळे मार्ग ही सोपा झाला आहे.


२०२
सप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि ।
काया माया छाया विवर्जित दिसे तो आहे दुरी ना जवळी गे बाईये ॥ १ ॥
प्रत्यक्ष हरितो दाविपा डोळां ।
ऐसा सद्‍गुरु कीजे पाहोनि ।
तनु मन धन त्यासि देऊनी ।
वस्तु ते घ्यावी मागोनि गे बाईये ॥ २ ॥
पावाडां पाव आणि करी परवस्तुसि भेटी ।
ऐसा तोचि तो ।
सद्‍गुरुविण मूढासि दर्शन कैचें ।
ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ३ ॥
एक मंत्र एक उपदेशिती गुरु ।
ते जाणावे भूमिभारु ।
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षित्वें दावी ।
ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ४ ॥

अर्थः एकविस स्वर्ग व सप्त पाताळा भरुन तो हरि उरला आहे. त्या काया, माया व छाया नाहीत तो निर्गुण आहे. तो लांब ही नाही व जवळ ही नाही. सदगुरुकृपे मुळे तो हरि प्रत्यक्ष पाहता आला. त्याला तन मन धन सर्वकाही देऊन ती परमात्म वस्तु मागुन घेता येते. पावाडा म्हणजे झाडावर चढण्यासाठी पाय ठेवायला केलेली खाच, जसे झाडावर त्या पावाड्यातुन पाय देऊन चढणारे इच्छित फल प्राप्त करतात. तसाच तो आहे. व सदगुरुवाचुन म्हणजे सदगुरुने केलेल्या पावाड्या मधून त्या परमात्मारुपी झाडावर चढ़ता येते हे एक आश्चर्यच आहे. जे लोक गुरुने दिलेला मंत्र न जपता इतर मंत्र जपतात ते भूमीला भार असतात. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरुमुळे ते तत्व साक्षीत्वाने दिसते ते ही एक आश्चर्यच आहे.


२०३
बुद्धि बोध नाहीं क्षमारूप सर्व ।
तेथे देहभाव अर्पियेला ॥ १ ॥
नाही काळ वेळ नाहीं तो नियम ।
सर्व यम नेम बुडोनि ठेले ॥ २ ॥
हरिरूप सर्व गयनि प्रसादे ।
सर्व हा गोविन्द आम्हां दिसे ॥ ३ ॥
निवृत्ति सफळ गयनि वोळला ।
सर्वकाळ जाहला हरिरूप ॥ ४ ॥

अर्थ:-

त्याचा अंगीकार केला की बुध्दीला त्याच्या शिवाय बोध नसतो व द्वैतभावच राहात नाही म्हणून सर्वत्र क्षमा तो देऊ लागतो म्हणजेच देहभाव त्याला अर्पण झाला असे समजते. त्याच्याशी एकरुप झाले की मग काळ वेळ यांची गणती गौण होते. सर्व यमनियम, नेम तोच होऊन जातात.गहिनीनाथांच्या कृपेने ती अवस्था लाभल्या मुळे मी हरिरुप झालो सर्वत्र गोविंदच दिसु लागला. निवृत्तिनाथ म्हणतात, गहिनीनाथांच्या सफळ अनुग्रहामुळे सर्व काळ माझ्या साठी हरिरुप पावते झाले.


२०४
व्योमामाजि तारा असंख्य लोपति ।
तैसे लक्ष्मीपती माजी विरो ॥ १ ॥
धन्य दिवस नित्य सेवूं श्रीरामास ।
जनवनसमरस पूर्णबोधें ॥ २ ॥
तारा ग्रह दि त्या माजि उन्मन ।
प्रपंचाचें भान दुरी ठेलें ॥ ३ ॥
निवृत्ति निमग्न नाम सेविताहे ।
ब्रह्मपण होय सदोदीत ॥ ४ ॥

अर्थ:-

अवकाशात निखऴलेला तारा जसा लुप्त होतो तसे सर्व काही त्या हरिरुपात लोप पावते. जसा जसा तो श्रीराम अंतःकरणात नामरुपाने स्थापित झाला की सर्व जन वन समरस असल्याचा बोध होतो. तसे केल्याने प्रपंचाचे भानच राहात नाही. जसे दिवसा तारे सुर्य प्रकाशामुळे दिसत नाहीत. निवृत्तिनाथ म्हणतात, मी सतत नामचिंतनात निमग्न असल्यामुळे सतत ब्रह्मपणाचे सुख सेवन करत आहे.


२०५

खुंटलें तें मन तोडियेली गति ।
वेळु तो पुढती मोडियला ॥ १ ॥
जाहालें उन्मन विरालें तें मन ।
श्रीरामचरण पुरे आम्हां ॥ २ ॥
गेलें मन रामीं निष्काम कल्पना ।
बुडाली वासना तिये डोही ॥ ३ ॥
धन्य ते चरण नित्यता स्मरण ।
अखंडसंपन्न प्रेम देतु ॥ ४ ॥
अमृत कुपिका अमृताचा झरा ।
पटु येकसरा वाहातुसे ॥ ५ ॥
निवृत्तीची वृत्ति प्रेमेंचि डुल्लत ।
नमनेम निश्चित रामपायीं ॥ ६ ॥

अर्थ:-

आम्ही आत्मारामशी जोडलो गेल्याने मनाची धाव खुंटली त्याची गती निमाली व वेळेचे बंधन ही राहिले नाही.त्या श्रीराम चरणाला विनटल्यापासुन मन उन्मन झाले. मनात राम बसल्यावर कल्पना निष्काम झाली व वा़सना ठायीच बुडुन गेली. त्या रामचरणाचे नित्य स्मरण केल्याने धन्यता मिळाली व अखंड प्रेमाचा झरा हृदयात वाहु लागला. रामनामामुळे अमृताची कुपीका हाती आली व तो अमृत झरा प्रेमपाटातुन सतत वाहता झाला.निवृत्तिनाथ म्हणतात मी रामनामाच्या मुळे प्रेमाने डुल्लत आहे त्यामुळे त्या श्रीराम पायावर मी विनटलो आहे.


२०६
सौजन्य समाधान सर्व जनार्दन ।
आम्हां रूपेंधन इतुके पुरें ॥ १ ॥
गोपाळ माधव कृष्णरूपें सर्व ।
ब्रह्मपद देव सकळ आम्हां ॥ २ ॥
द्वैतभाव भावो अद्वैत उपावो ।
सर्व ब्रह्म देवो एक ध्यावो ॥ ३ ॥
निवृत्तीचा भावो सर्व आत्मा रावो ।
हरि हा अनुभवो वेदमतें ॥ ४ ॥

अर्थ:-

जगतातील सर्व रुपे आम्ही जनार्दन रुपातच पाहतो त्यामुळे आम्हाला समाधान लाभते व सर्वांबरोबर आम्ही सौजन्याने पाहतो हेच आमचे धन पुरेसे आहे. कधी तो गोपाळ तर की माधव तर कधी कृष्ण होतो पण आम्ही त्याच्यात ब्रह्मपणच पाहातो. आमच्या द्वैतभावाचा पूर्ण निरास होऊन आम्ही अद्वैतात त्याला एकत्वाने ब्रह्मस्वरुपात जाणतो. निवृत्तिनाथ म्हणतात, माझा भाव त्याच्याशी एकरुप झाल्याने तो आत्माराम सर्वत्र एकरुपात मी पाहतो व वेदांचा ही त्या हरिरुपाबद्दलच तेच मत आहे.


२०७
मातेचें बाळक पित्याचें जनक ।
गोत हें सम्यक हरि आम्हां ॥ १ ॥
मुकुंद केशव हाचि नित्य भाव ।
हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥ २ ॥
पूर्वज परंपरा तें धन अपारा ।
दिनाचा सोयिरा केशिराज ॥ ३ ॥
निवृत्तीचे गोत कृष्ण नामें तृप्त ।
आनंदाचें चित्त कृष्णनामें ॥ ४ ॥

अर्थ:-

पिता मुलांचा जन्म देणारा व माता त्या बालकाचे पालनपोषण करणारी असते ती दोघ ही हरिरुप असुन सर्व गोत्रज आम्हाला हरिरुपच भासतात. मुकुंद, केशव जरी म्हंटले तरी तो आम्हाला हरिरुपच आहे. त्याच हरिरुपात तो कृष्ण म्हणुन ही दिसतो.आमच्या पुर्वजांची परंपरा हेच आमचे अपार धन असुन केशीराजाचे चिंतन हीच आमची परंपरा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, कृष्णनामाने तृप्त झालेले आमचे गोत्रज आहेत त्यामुळे कृष्णनामाचा आनंद चित्तात भरुन उरला आहे.


२०८
विश्रामीचा श्रम आश्रम पैं नेम ।
जप हा परम आत्मलिंगीं ॥ १ ॥
निवृत्ति घन दाट कृष्णरूपें आम्हा ।
अखंड पूर्णिमा नंदाघरीं ॥ २ ॥
निवृत्तिचित्ताची गेली लगबग ।
केला अनुराग कृष्णरूपीं ॥ ३ ॥
निवृत्ति धारणा कृष्णनाम सार ।
सर्वत्र आचार हरिहरि ॥ ४ ॥

अर्थ:-

ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास ह्या चारी आश्रमात झालेला श्रम आत्मलिंगाच्या जपाने निवृत होतो व शाश्वत आराम प्राप्त होतो. मला ते आत्मलिंग सर्वत्र कृष्णरुपाने ओतप्रोत भरल्याचे दिसत आहे. जसा पौर्णिमेच्या पूर्णचंद्रासारखा त्याच्या उदय नंदाघरी झाला आहे. त्याला तशा रुपात पाहण्याने माझ्या चित्ताची लगबग निवृत झाली व ता कृष्णरुपाचा मी अनुराग केला. निवृत्तिनाथ म्हणतात, ते कृष्णनामाची धारणा मला झाल्यामुळे तो हरिरुपाने सर्वत्र मला जाणवत आहे.


२०९
तिहींचे त्रिगुणें रजतममिश्रित ।
त्यामाजि त्वरित जन्म माझा ॥ १ ॥
सर्व पुण्य चोख आचरलों आम्हीं ।
तरिच ये जन्मीं भक्ति आम्हां ॥ २ ॥
शांति क्षमा दया निवृत्ति माउली ।
अखंड साउली कांसवदृष्टि ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तेंचि गा जीवन मोल ।
भिवरा विठ्ठल दैवत आम्हां ॥ ४ ॥

अर्थः माझा जन्म सत्व, रज, तम ह्या तिन्ही गुणांच्या मुळे त्याच्या इच्छेने लवकर झाला. आम्ही निष्काम पुण्याई मुळे ह्या जन्मी भक्ती करायला आधिकारी झालो. कासवी जशी प्रेमपान्हा नजरेतुन पाजुन पिले जगवते तसे शांती दया क्षमा देऊन त्याने मला जगवले. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या भिवरे काठच्या विठुमाऊली मुळे आमच्या जीवनाला मोल आले.


२१०

चातकाचें ध्यान मेघाचें जीवन ।
आम्हां नारायण तैसा सखा ॥ १ ॥
चकोरा अमृत चंद्र जिववितें ।
भक्तांसि दुभतें हरि आम्हां ॥ २ ॥
विश्रांतीसी स्थळ वैकुंठ सफळ ।
दुभतें गोपाळ कामधेनु ॥ ३ ॥
आशापाश नाहीं कर्तव्या कांही ।
चिंतामणि डोहीं एकविध ॥ ४ ॥
समिरासगट गति पावली विश्रांति ।
नामरूप जाति भेदशून्य ॥ ५ ॥
नामाची हे धणी तेचि हो पर्वणी ।
तृप्तातृप्त कृष्णीं होतु आम्हां ॥ ६ ॥
सांडिले पैं द्वैत दिधलें पै अद्वैत ।
हरीविण रितें न दिसे आम्हां ॥ ७ ॥
निवृत्ति परिवार मुक्तलाग अरुवार ।
रत्नांचा सागर नामें वोळे ॥ ८ ॥

अर्थ: चातक पक्षी जसा मेघांची आतुर होऊन वाट पाहतो तसेच आतुर आहे होऊन आम्ही नारायणाचे ध्यान करतो. चकोराला चंद्राकडुन जसे अमृत मिळते तसे तो आम्हा भक्तांसाठी दुमत असतो ते गोपाळनाम कामधेनु चे दुभते मिळाले की वैकुंठीची विश्रांती आम्हाला लाभते. तो चिंतामणी होऊन आम्हा बरोबर एकविध झाल्यामुळे आमचे आशापाश तुटले आहेत व त्याच्या शिवाय कोणतेही कर्तव्य उरले नाही. आमच्या जीवनदायी वायुच्या गतीलाही त्याच्यामुळे विश्रांती मिळते. त्यामुळे नाम, रूप व जातीचे भेद मावळले. त्याचे नामरुपाचे अमोघ धनाची पर्वणी आम्ही साधली त्यामुळे त्या श्रीकृष्णाने आम्हाला तुप्त केले. आम्ही द्वैत सांडुन अद्वैत साधल्यामुळे तो हरिच सर्व व्यापला आहे रिता ठाव नाही ही अनुभुती प्राप्त झाली. निवृत्तिनाथ म्हणतात,


२११
साधक बाधक न बाधी जनक ।
सर्व हरि एक आम्हां असे ॥ १ ॥
हरिविण नाहीं हरिविण नाहीं ।
हरि हेंचि पाही एकरूप ॥ २ ॥
हरिमाझा जन हरि माझें धन ।
हरि हा निर्गुण सर्वांठायीं ॥ ३ ॥
निवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला ।
निमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥ ४ ॥

अर्थ: तो हरि आमचा झाल्या पासुन अनुकुल प्रतिकुल साधक बाधकता आम्हाला बांधु शकत नाही. हरिविण दुसरे काही आम्ही पाहात नाही तोच हरि एकत्वाने आम्ही पाहतो. सर्वाठायी निर्गुण असणारा तो हरी माझे जन ही आहे व धन ही आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या हरिलीलेने प्रत्येक क्षणची कळा हरिमय झाली.


२१२
त्रैलोक्य पावन जनीं जनार्दन ।
त्यामाजि परिपूर्ण आत्मज्योति ॥ १ ॥
नाहीं आम्हां काळ नाहीं आम्हा वेळ ।
अखंड सोज्वळ हरि दिसे ॥ १ ॥
ब्रह्म सनातन ब्रह्मीचे अंकुर ।
भक्तिपुरस्कार भूतें रया ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे दीन दुबळ मी एक ।
मनोमय चोख आम्हां गोड ॥ ४ ॥

अर्थ: स्वर्ग, मृत्यू व पाताळ ह्या तिन्ही लोकांत तो जनार्दन परिपूर्ण आत्मज्योत घेऊन त्रैलोकाला पावन करतो. आम्हाला काळ वेळेचे बंधन नाही अखंडपणे त्या सोज्वळ हरिचे सानिध्य असते. जे भक्त जीवदशेत त्याचा पुरस्कार करतात ते ब्रह्मदशेचे कोंब होतात. निवृत्तिनाथ म्हणतात मी एक दीन दुबळा मनोगत सांगतो आहे. ते मनात घर करून राहिलेले स्वरुप शाश्वत आहे व ते आम्हाला आवडते.


२१३
प्रपंच टवाळ वृक्षाचें फळ ।
उपटिलें मूळ कल्पनेचें ॥ १ ॥
गेली ते वासना निमाली भावना ।
चुकलें बंधना यमपाश ॥ २ ॥
उपजत मूळ खुंटलें तें जाळ ।
मायेचें पडळ हरपलें ॥ ३ ॥
निवृत्तिस्वानंद नित्यता आनंद ।
जग हा गोविन्द आम्हां पुरे ॥ ४ ॥

अर्थ: शंके मुळे वाढणाऱ्या मायारुप प्रपंच वृक्षाचे अविद्या फळ आहे. पण मी शंकारुप प्रपंच मुळालाच उपटुन टाकले आहे. त्या मुळे इच्छारुप वासना गेली व प्रपंच निष्ठारुप भावना निमाली व यमराजाच्या फासबंधनातुन मुक्तता लाभली. मुळमायेचे उपजत पडल राहिले नाही त्यामुळे मायेचे मुळच उखडले गेले. निवृत्तिनाथ म्हणतात, जग हे गोविंद आहे हे स्विकारल्यामुळे आम्ही त्या योगे नित्य स्वानंद भोगत आहोत.


२१४
कल्पना कोंडूनि मन हें मारिलें ।
जीवन चोरिले सत्रावीचें ॥ १ ॥
साजीव सोलीव निवृत्तिची ठेव ।
कृष्ण हाचि देव ह्रदयीं पूजी ॥ २ ॥
विलास विकृति नाहीपै आवाप्ति ।
साधनाची युक्ति हारपली ॥ ३ ॥
निवृत्ति कारण योगियांचे ह्रदयीं ।
सर्व हरि पाही दिसे आम्हां ॥ ४ ॥

अर्थ: शंकारुपी कल्पनेला मी मनासकट काढून टाकल्या मुळे लिंगदेहाची सतरावी जीवनकला तोच आत्मा आहे. तोच आत्माराम चोरला, साजीव सोलीव असणारा कृष्ण तोच माझा ठेवा आहे. त्याचीच पूजा मी हृदयात करतो. त्यासाठी कोणत्याही साधनाची गरज राहात नाही त्या मुळे विलास विकृती यांची व्याप्ती उरली नाही. निवृत्तिनाथ म्हणतात, जो परमात्मा योग्यांचे कारण आहे तोच मला जगात सर्वत्र दिसतो.


२१५

नामरूप सोय नाहीं जया रूपा ।
तेंथिलये कृपा खेळों आम्हीं ॥ १ ॥
आम्हां हेंचि रूप अद्वैत स्वरूप ।
नाहीं तेथें किं लाभ कल्पनेचा ॥ २ ॥
ध्येय ध्यान खुंटे प्रपंच आटे ।
नाम हें वैकुंठा नेतु असे ॥ ३ ॥
निवृत्ति साधन वृत्तिच संपन्न ।
नाम हें जीवन अच्युताचें ॥ ४ ॥

अर्थ: त्याला नामा नाही रुप नाही जो निर्गुण आहे त्या ब्रह्मस्वरुपाच्या कृपेमुळे आम्ही जगतात खेळताना दिसतो. आमच्या साठी हे अद्वैत स्वरुपच महत्वाचे आहे. त्यामुळे मनाला कल्पनेप्रमाणे जाता येत नाही. ह्या नामाचा जप केला ध्येय ध्यान हे जागीच मुरडुन जाते व वैकुंठाची वाट सोपी होते. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या नामसाधनेचा परिपाठ ठेवला तर आपले जीवनच अच्युतमय होते.


२१६
कल्पितें कल्पिलें चित्त आकळिलें ।
तन्मय घोळिलें चैतन्याचें ॥ १ ॥
सांग माये कैसें कल्पिलें कायसे ।
सर्व ह्रषीकेश दिसे आम्हां ॥ २ ॥
निवृत्ति समरस सर्व ह्रषीकेश ।
ब्रह्मींचा समरस कल्पने माजी ॥ ३ ॥

अर्थ: मायिक संसाराच्या कल्पनेपासुन आपले मन काढुन घेतले की आत्मारामरुप चैतन्याचा प्रवेश मनात होतो. हे माये तु ह्या संसाराबद्दल काय कल्पना केली आहेस. पण आता तो हृषीकेशच आम्हाला सर्वत्र दिसत आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, आमची कल्पनाच ब्रह्रस्वरुपाशी समरस झाल्याने आम्ही सर्वभावे त्या हृषीकेशाशी समरस झालो.


२१७
नाहीं जनीं विजनीं विज्ञानीं ।
निर्गुण काहाणीं आम्हां घरीं ॥ १ ॥
सुलभ हरि दुर्लभ हरि ।
नांदे माजघरी आमचीये ॥ २ ॥
आनंदे सोहळा उन्मनीचि कळा ।
नामचि जिव्हाळा जिव्हे सदा ॥ ३ ॥
निवृत्ति देवीं धरिली निर्गुणीं ।
शांति हे संपूर्णी हरीप्रेमें ॥ ४ ॥

अर्थ: ज्या गोष्टी जनामध्ये वनामध्ये व प्रपंचाच्या ज्ञानात नाहीत त्या निर्गुण कहाण्या आमच्या घरात आहेत. जरी तो परमात्मा सुलभ मानला किंवा दुर्लभ मानला कसाही मानला तरी तो आम्हा सोबत आमच्या घरी आहे. आमच्या जिव्हेला त्याच्या नामाचा छंद लागल्या मुळे आम्ही सतत आनंदी व उन्मनी अवस्थेत सुख भोगत आहोत. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या निर्गुण हरिला प्रेमाने आम्ही हृदयात धरल्यामुळे आम्हाला सख्त शांती प्राप्त होते.


२१८
प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज ।
आम्हा बोलतां लाज येतसये ॥ १ ॥
काय करूं हरि कैसा हा गवसे ।
चंद्र सूर्य अवसे एकसूत्र ॥ २ ॥
तैसें करूं मन निरंतर ध्यान ।
उन्मनि साधन आम्हां पुरे ॥ ३ ॥
निवृत्ति परिपाठ हरिनाम हेचि वाट ।
प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४ ॥

अर्थ: मायेच्या पटला मुळे भासमान होणारा अज्ञानी प्रपंचात काय म्हणुन राहयचे हे बुध्दीरुप सखी त्या विषयी बोलताना ही लाज वाटते. जसे चंद्र सूर्य आवसेला एकसुत्र होतात तसे त्या ब्रह्मरुपाला मिळवण्यासाठी जीव ला त्याच्याशी एकरुप व्हावे लागेल. त्यासाठी उन्मनी अवस्थेत त्याचे चिंतन मनन करणे हेच साधन आहे निवृत्तीनाथ म्हणतात माझा इरिनामाचा परिपाठ असल्यामुळे तो प्रपंच फुकाचा वाटतो.

संत निवृत्तीनाथ अभंग समाप्त


हे पण वाचा: संत निवृत्तीनाथांची संपूर्ण माहिती आणि साहित्य


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

अर्थ:

 

1 thought on “संत निवृत्तीनाथ अभंग”

  1. Pingback: संत निवृत्तिनाथ (Sant Nivruttinath) - मराठी माहिती संग्रह - नमोस्तुते

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *