संत कान्हो पाठक अभंग गाथा – एकूण ६ अभंग
संत कान्हो पाठक अभंग – १.
गाये तो गाणुं नाचे तो नाचणु ।
परिसे तो जाणु भेदवादी ।।१।।
नव्हे तो संतु योगी ना भक्तु ।
जो लोकांतु डंव करी ||धृ||
पढे तो पढता उपलवी भक्ता ।
कवित्व करितां ख्याती लागीं ||३||
पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिकें ।
जंव जीव सात्त्विकें विनटेना ।।४।।
संत कान्हो पाठक अभंग – २.
कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं ।
केली संसाराची होळी ।।१।।
पैका जमूनिया फार ।
पोशी दारा आणि कुमर ||२||
सदा निंदी साधुसंता ।
नेणे धर्म कर्म व्रता ||३||
कान्हो पाठक कथितो नर ।
अंती भोगी नरक घोर ॥४॥
संत कान्हो पाठक अभंग – ३.
जरी तुज देवाची चाड । तरी न करीं बडबड ।
बहुत बोलतां वाड । पडसी पतनीं ॥१॥
जरी तुज देवाची बाधा । तरी न करी वेवादा ।
वाद करितां निंदा । घडती दोष ||२||
जरी तुज देवाचा छंद | तरी सांडी कामक्रोध ।
तेणे परमानंद | होउनी ठासी ||३||
जरी तुज देवचि व्हावा । तरी मौन धरी पा जिव्हा ।
जेणें तूं अनुभवा । पावसील ॥४॥
जरी तुज देवाचा सांगात । होतां अखंडित |
तरी बैस पा निवांत । साधुसंगीं ||५||
जरी तुज देवाचा विश्वास | तरी हृदयीं धरी नागेश ।
म्हणे कान्हो पाठक। अरे जना ॥६॥
४.
जेथें जेथें मन जाय ।
तेथें नागनाथ आहे ॥१॥
म्हणवोनि पाहे ।
मन गुंतलें नागेश पाये ॥२॥
सुखसोहळा भोगियले ।
भोग भोगणें नागेश जेणें ||३||
कान्हो पाठक आनंदला ।
सद्गुरु नागेश भेटला ॥४॥
५.
पेंधा म्हणे हृषीकेशी ।
आरुष बोबडें हें परियेसीं ॥१॥
या रे नाचों अवघे जन ।
गावों हरिनाम कीर्तन ||२||
कान्हो पाठक बागडा ।
प्रेमे नाचे वैष्णवां पुढां ।।३।।
६.
वेद गणितां मर्यादला ।
तरि तूं अगाध बा विठ्ठला ॥१॥
येवढें माप कैचें थोर ।
ज्याणें उमाणे तुमचा पार ॥धृ॥
शेष वर्णितां श्रमला ।
जिव्हा दुखंड होउनि ठेला ||३||
म्हणौनि कान्हो पाठक उगा ।
मौनें मवी पांडुरंगा ।।४।।
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या