संत सोयराबाई अभंग गाथा (एकूण ६२)
संत सोयराबाई अभंग – १
येई येई गरुडध्वजा ।
विटेसहित करीन पूजा ॥१॥
धूप दीप पुष्पमाळा ।
तुज समर्पू गोपाळा ॥२॥
पुढे ठेवोनियां पान ।
वाढी कुटुंबी तें अन्न ॥३॥
तुम्हां योग्य नव्हे देवा ।
गोड करूनियां जेवा ॥४॥
विदुराघरच्या पातळ कण्या ।
खासी मायबाप धन्या ॥५॥
द्रौपदीच्या भाजी पाना ।
तृप्ती झाली नारायणा ॥६॥
तैसी झाली येथें परी ।
म्हणे चोख्याची महारी ॥७॥
संत सोयराबाई अभंग – २
उपाधी भक्तांसाठी ।
कां जगजेठी लाविली ॥१॥
तोडा तोडा मायाजाळें ।
कृपाबळें आपुलिया ॥२॥
नक पाहूं गुणदोष ।
पूर्वीची भाष सांभाळा ॥३॥
जगीं असुनी तूं बा हरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
संत सोयराबाई अभंग – ३
हीन मी काय वानूं देवा ।
तुम्हीं केशवा उदार ॥१॥
करा माझे समाधान ।
दाखवा चरण आपुले ॥२॥
लोटलेंसे महा नदी ।
नाहीं शुध्दी देहाची ॥३॥
बुडत्यें काढावे बाहेरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
संत सोयराबाई अभंग – ४
नाही उरली वसना ।
तुम्हां नारायणा पाहतां ॥१॥
उरला नाहीं भेदाभेद ।
झालें शुध्द अंतर ॥२॥
विटाळाचे होतें जाळे ।
तुटलें बळें नामाच्या ॥३॥
चौदेहाची तुटली दोरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
अवघा रंग एक झाला ।
रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेलें वायां ।
पाहतं पंडरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम ।
पळोनी गेले क्रोध काम ॥३॥
देही असुनी तूं विदेही ।
सदा समाधिस्थ पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥
संत सोयराबाई अभंग – ६
देहासी विटाळ म्हणती सकळ ।
आत्मा तो निर्मळ शुध्द्बुध्द ॥१॥
देहिंचा विटाळ देहीच जन्मला ।
सोवळा तो झाला कवण धर्म ॥२॥
विटाळावाअंचोनी उत्पत्तीचे स्थान ।
कोण देह निर्माण नाही जगीं ॥३॥
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी ।
विटाळ देहांतरी वसतसे ॥४॥
देहाचा विटाळ देहींच निर्धारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥
संत सोयराबाई अभंग – ७
माय तूं माउली अनाथाची देवा ।
धांवे देवाधिदेवा लंवलंफ़ें ॥१॥
पतितपावन नाम गाजे त्रिभुअवनी ।
भक्ताशिरोमणी तुम्हीं देवा ॥२॥
अनाथाचे धांवणे करणें चक्रपाणी ।
सकळ मुगुटमणी विठ्ठला तूं ॥३॥
मज अव्हेरितां कोण म्हणेल थोरी ।
म्हणतसे महारी चोखीयाची ॥४॥
शीण वाटतसे मना ।
नारायणा न पाहतां ॥१॥
वांया आचार विचार ।
सदा मलीन अंतर ॥२ ॥
सोंगाचे ते सोंग ।
दावी रंग कथेचा ॥३॥
परधनी सदा मन ।
वरी दावितसे डोलून ॥४॥
ऐसा नर तो दुराचारी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥
जन तें आंधळे भुलले पैं वांया ।
विठ्ठल सखया वांचोनियां ॥१॥
भुललीं बापडी पायीं तिणें बेडी ।
कोण तोडातोंडी करील त्यांची ॥२॥
यमाची यातना होईल बा जेव्हां ।
सोडाविल तेंव्हा कोण त्यासी ॥३॥
याचलागी म्हणा रामकृष्णा हरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
वाउगें घरदार वाउगा संसार ।
वाउगें शरीर नाशिवंत ॥१॥
एक नाम सार वाउगा पसार ।
नमाचि निर्धार तरती जन ॥२॥
वाउग्याया गोष्टी वाउग्या कल्पना ।
वाउग्या ब्रह्मज्ञाना कोण पुसे ॥३॥
वाउग्याव्युत्पत्ती वाउग्या शब्दआटी ।
वाउग्या ज्ञानगोष्टी बोलून काई ॥४॥
वाउगें तें मन स्थिर नाहीं तरी ।
मग कैंचा हरी मिळे तया ॥५॥
वाउगे ते बोल बोलणे तोंवरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥६॥
११
बैसोनी एकांती बोले गुजगोष्टी ।
घालोनियां मिठी चरणासी ॥१॥
बहु दीस झाली वाटतसे खंती ।
केधवां भेटती बाई मज ॥२॥
तुम्हांसी तों चाड नाहीं आणिकाची ।
परी वासना आमुची अनिवार ॥३॥
सोयरा म्हणे चला जाऊं तेथवरी ।
गुजगोष्टी चारी बोलुं कांही ॥४॥
१२
सोयरा म्हणे पती ।
मनीं आली बाइची खंती ॥१॥
चोखा सोयरा कर्ममेळा ।
भेटूं आले त्या निर्मळा ॥२॥
झाली निर्मळेची भेंटी ।
सोयरा पायीं घाली मिठी ॥३॥
धन्य बाई मेहुणपुरीं ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
१३
दोघी बैसल्या सुखासनीं ।
सोयरा न्याहाळीतसे नयनी ॥१॥
कृपाळुवा माझा बाप ।
विठ्ठल निर्मळ एकरुप ॥२॥
अवघ्या सांगता वृत्तांत ।
रडे चोखियाची कांता ॥३॥
विठ्ठल रूपाचिये थोरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
१४
उपजतां कर्ममेळा ।
वाचे विठ्ठल सांवळा ॥१॥
विठ्ठल नामाचा गजर ।
वेगें धांवे रुक्मिणीवर ॥२॥
विठ्ठल रुक्मिणी ।
बारसें करी आनंदानीं ॥३॥
करीं साहित्य सामुग्री ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
निर्मळेसी करीतां स्नान ।
कोटी प्रयाग समान ॥१॥
तेथें करितां अन्नदान ।
स्वये तुष्टे नारायण ॥२॥
तेथें करितां प्रदक्षिणा ।
कोटि तीर्थ घडली जाणा ॥३॥
ऐसी विख्यात मेहुणपुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
१६
टाळ दिंडीचा गजर ।
विठ्ठल नामाचा उच्चार ॥१॥
दोष पळाले कपाटी ।
नाम उच्चारितं ओठीं ॥२॥
योगयागादि साधने ।
अवघियांसी येथे पेणें ॥३॥
सुख नाही संसारी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
१७
गर्जती नाचती आनंदे डोलती ।
सप्रेम फुंदती विठ्ठल नामें ॥१॥
तया सुखाचा पार न कळे ब्रह्मांदिका ।
पुंडालिकें देखा भुलविले ॥२॥
नावडे वैकुंठ नावडे भुषण ।
नावडे आसन वसन कांही ॥३॥
कीर्तनी गजरी नाचतो श्रीहरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
१८
आनंद सोहळा आषाढी पंढरी ।
कीर्तनी गजरी वाळूंवटीं ॥१॥
होतो जयजयकार आनंद सोहळा ।
अमृत गळाला वैष्णवासी ॥२॥
नाठवे भावना देहाचा विसर ।
विठ्ठल उच्चार संतजनी ॥३॥
तेथें जीवें भावें प्रेमाची आरती ।
लोटांगणी जाती सोयरा भावें ॥४॥
१९
पंढरीचे ब्राम्हणे चोख्यासी छळीले ।
तयालागीं केले नवल देवें ॥१॥
सकळ समुदाव चोखियाचे घरी ।
रिध्दी सिध्दि द्वारी तिष्ठताती ॥२॥
रंग माळा सडे गुढीया तोरणे ।
आनंद किर्तन वैष्ण्ववांचे ॥३॥
असंख्य ब्राम्हण बैसल्या पंगती ।
विमानी पाहती सुरवर ॥४॥
तो सुख सोहळा दिवाळी दसरा ।
वोवाळी सोयरा चोखीयासी ॥५॥
अवघे सुखाची सांगाती ।
दु:ख होतां पळतीं आपोआप ॥१॥
भार्या पुत्र भगिनी माता आणि पिता ।
हे अवघे सर्वथा सुखाचेचि ॥२॥
इष्ट आणि मित्र स्वजन सोयरे ।
सुखाचे निर्धारिं आप्तवर्ग ॥३॥
अंतकाळी कोण नये बरोबरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
२१
माझें माझें म्हणुनी गुंतले हावभरी ।
वांया या संसारी मृगजळा ॥१॥
आपुली आपण करा आठवण ।
संसार बंध तोडा वेगीं ॥२॥
नाम निज नौका विठ्ठल हें तारूं ।
भवाचा सागरू उतरील ॥३॥
ह्याची विश्वास धरावा अंतरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
२२
पंच महापातकीं विश्वासघातकी ।
रामनामे सुखी विश्वजन ॥१॥
महा पापराशी वाल्हा तो तारिला ।
उध्दार तो केल गणिकेचा ॥२॥
पुत्राचिया नामें वैकुठाची गती ।
अजामेळा मुक्ती हरीनामें ॥३॥
नामेंची तरले नर आणि नारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
२३
कोण या पांगिला होईल संसारा ।
कन्या पुत्र दारा त्यजोनियां ॥१॥
कां हे गुंतले वांया मृगजळा ।
कांयासी कंटाळा येईच ना ॥२॥
कां ये नाठविती हरीनाम चित्तीं ।
येतां जांतां फजिती किती होती ॥३॥
कां हे न धरीती संतसमागम ।
कासयाचा भ्रम पडिला यांसी ॥४॥
स्वप्नाचीये परी गुंतले नरनारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥
२४
आमची तो दशा विपरीत झाली ।
कोण आम्हा घाली पोटामध्यें ॥१॥
आमचें पालन करील बा कोण ।
तुजविण जाण दुजे आतां ॥२॥
कळेल तें करा तुमचें उचित ।
माझी तो नित निवेदिली ॥३॥
सोयरा म्हणे माझा जीवप्राण तुम्ही ।
आणिक तो आम्ही कोठें जावें ॥४॥
जें तुम्हां कळें तें करा ।
गोमटें बरें कां वोखटें गोड दिसे ॥१॥
मी तों झालें बोलोनी उतराई ।
तुमचेचिये पायीं समर्पिलें ॥२॥
होता जो वृत्तांत माझिये जीवींचा ।
बोलियेला वाचा तुम्हांपुढें ॥३॥
सोयरा म्हणे माझें सकळ गणगोत ।
तुंचि माझें हित करी देंवा ॥४॥
२६
येई वो विठठले येई लवकरी ।
धावे तूं सत्वरी मजलागी ॥१॥
आमुचा विचार आतां काय देवा ।
सांभाळी केशवा मायबाप ॥२॥
आतां कवणाची पाहूं मी वांट ।
अवघेची वोस दिसतसे ॥३॥
सोयरा म्हणे अहों पंढरीच्या राया ।
आमुची ती दया येऊं द्यावी ॥४॥
२७
माझें मन तुमचे चरणीं ।
तूंची माझा देवा धणी ॥१॥
धरणें घेउनी दारांत ।
बैसलेंसे नाम गात ॥२॥
दुजा धंदा कांही नेणें ।
तुमचे कृपेचे पोसणें ॥३॥
द्वारी बैसोनी हांका मारी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
२८
कां वा उदास मज केलें ।
कोण म्हणे तुम्हां भलें ॥१॥
आम्ही बैसलोंसे दारी ।
दे दे म्हणोनी मागतों हरि ॥२॥
घेउनी बैसलासी बहुताचें ।
गोड कैसे तुम्हां वाटे ॥३॥
ही नित नव्हे बरी ।
म्हणे चोखियाची महारी ॥४॥
२९
किती किती बोलूं देवा ।
किती करूं आतां हेवा ॥१॥
बहु चाळवणा तूं होसी ।
नाही कांरे म्हणे मजसी ॥२॥
आतां न धरी तुमची भीड ।
मज नाहीं दुजी चाड ॥३॥
किती बोलूं देवा ।
आतां राग न धरावा ॥४॥
धरणें घेतिलें तुमचें द्वारी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥
किती शिणताती प्रपंच परमार्था ।
परी न घडे सर्वथा हित कोणा ॥१॥
न घडे प्रपंच न घडे परमार्थ ।
न घडेचि स्वार्थ दोहीसेविषीं ॥२॥
एकाची एकास न पडेचि गांठी ।
तेणे होय कष्टी सुखदु:खें ॥३॥
सोयरा चोखियाची म्हणे पंढरीराया ।
दंडवत पायां तुमचिया ॥४॥
३१
सलगीनें बहु बोलिलें उत्तर ।
परी तुम्ही उदार मायबाप ॥१॥
उदार तों तुम्ही तिही लोकी कीर्ती ।
म्हणोनि कमळापती शरण आलें ॥२॥
रंजले गांजले मोकारिती धांवा ।
त्यांच्या धावण्यासी धांवा मायबाप ॥३॥
सोयरा म्हणोन दंडवत घाली ।
तूं माय माउली पांडुरंगा ॥४॥
३२
आमुचे सुखदुःख कोण दुजा वारी ।
तुम्हीच श्रीहरी मायबाप ॥१॥
तुमच्या उच्छिष्टाची धरोनियां आस ।
बैसले रात्रंदिवस धरणेकरी ॥२॥
परी तुम्हां न ये आमुची करूणा ।
केधवा येईल मना तुमचिया ॥३॥
काम क्रोध लोभ मदमत्सर वैरी ।
हे झडकरी वारी मायबापा ॥४॥
म्हणोनी धरिलें तुमचे पदरा ।
म्हणतसे सोयरा चोखियाची ॥५॥
३३
शिणल्या भागल्यांचा तूंचि विसावा ।
धांवे तूं केशवा मायबापा ॥१॥
किती किती मन आवरोनी धरूं ।
परी न सुचें विचारु कय करूं ॥२॥
तुम्ही तंव समर्थ आपुल्या भारें ।
आमुचे खोटें खरें काय जाणा ॥३॥
मी तो बैसले तुमचिए द्वारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
३४
संताची तो खूण बाणली तुमची ।
तरी कां आमुची सांडी केली ॥१॥
काय साचपण मानूं आतां देवा ।
न कळे हा गोंवा उगवा कधी ॥२॥
रात्रंदिवस भ्रमले हे मन ।
नव्हे समाधान काय करूं ॥३॥
सोयरा म्हणे अहो पंढरीनिवासा ।
लवकारी फांसा तोडा आतां ॥४॥
हीन दीन म्हणोनी कां गा मोकलिलें ।
परी म्यां धरिलें पदरी तुमच्या ॥१॥
आतां मोकलितां नव्हे नित वरी ।
थोरा साजे थोरी थोरपणें ॥२॥
शरण आलिया दावितासां पाठीं ।
काय थोर गोष्टी वानूं देवा ॥३॥
सोयरा म्हणे अहो पंढरीनिवास ।
तुमचा तो ठसा त्रिभुवनी ॥४॥
३६
नामेचि तरले नर आणि नारी ।
ताले दुराचारी हरिनामें ॥१॥
पाहा अनुभव आपुले अंतरी ।
नामेंचि उध्दरी जडजीवां ॥२॥
नामेंचि भुक्ति नामेची मुक्ति ।
नामेंची शांति सुखदु:ख ॥३॥
नामापरतें सार याही हो निर्धारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
३७
नामाचा भरंवसा मानिलासे सार ।
उतरले पार भवनदी ॥१॥
नाम हें सोपें नाम हें सोपें ।
नाम हें सोपे मुखी गाता ॥२॥
नामाची आवडी सदा सर्वकाळ ।
नाहीं काळ वेळ नाम गातां ॥३॥
नामेंचि जन तरती संसारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
३८
नामाचें चिंतन करा सर्वकाळ ।
नाही काळवेळ नामालागी ॥१॥
सुलभ हें सोपें नाम आठवितां ।
हरि हरि म्हणतां मोक्षमुक्ती ॥२॥
सायासाचें नाही येथे हें साधन ।
नामाचे चिंतन करा सुखे ॥३॥
नामाचे सामर्थ्य जपतां ।
श्रीहरी म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
३९
आणिक देवाचे न करा साधन ।
बायां होय शीण आदि अंती ॥१॥
आपुलिया पोटा आणिकां पीडिती ।
ते काय पुरविती मन इच्छा ॥२॥
रोटीसुठीलागीं पिडिताती जगा ।
हेंचि त्यांचे अंगा देवपण ॥३॥
म्हणोनी तयांचे नका पडूं भरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
नामाचे चिंतन अखंड जया वाचे ।
हेंचि साधनाचें सार एक ॥१॥
मागिल परिहार पुढे वारे शिण ।
नाम बीज खूण सांगितली ॥२॥
अवघ्या उपाधि तुटताती नामें ।
भाविकांसी वर्म सोपें हेंचि ॥३॥
आणिक नका पडूं गबाळाचे भरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
४१
नामेचि पावन होती जगीं जाण ।
नाम सुलभ म्हणा विठोबाचें ॥१॥
संसार बंधने नामेंचि तुटती ।
भुक्ति आणि मुक्ति नामापासीं ॥२॥
नाम हें जपतां पाप ताप जाय ।
अनुभव हा आहे जनामाजी ॥३॥
नामाचा गजर वाचें जो उच्चारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
४२
सदा सर्व काळ नामाचा छंद ।
रामकृष्ण गोविंद जपें सदा ॥१॥
अखंड वाचेसी नाही पै खंडण ।
नाम नारायण सुलभ हें ॥२॥
सुखदु:ख कांही न पडे आघात ।
होय मन शांत जपतां नाम ॥३॥
सोयरा म्हणे मज आलीसे प्रचित ।
नामेंचि पतित उध्दरती ॥४॥
४३
सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचें आळवावें विठोबासी ॥१॥
संसार सुखाचा होईल निर्धार ।
नामाचा गजर सर्व काळ ॥२॥
कामक्रोधांचे न चलेचि कांही ।
आशा मनशा पाहीं भुर होती ॥३॥
आवडी धरोनी वाचें म्हणे हरि हरि ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
४४
नवल पाहा नामाचें विंदान ।
पातकी पावन इहलोकीं ॥१॥
कलियुगामाजी सोपे हें साधन ।
वाचे रामकृष्ण जपे सदा ॥२॥
भवसागरांत नाम निजनौका ।
रामकृष्ण सखा उच्चारिता ॥३॥
म्हणोनी आळस नको संसारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
सुलभ सोपे वाचे नाम गातां ।
पापाच्या चळथा पळती पुढें ॥१॥
वाचे हरी हरी जो कोणी उच्चारी ।
नर अथवा नारी पवित्र ते ॥२॥
जातवित गोत नको हा विचार ।
हरिनाम सार कलिमाजी ॥३॥
सोयरा म्हणे मज नामाची आवडी ।
जाय देशोधडी कळिकाळ ॥४॥
४६
जयाचिये वाचे विठोबाचे नाम ।
तयाचा तो जन्म सफळचि ॥१॥
तयासी काचणी नाही बा जाचणी ।
यम पायवणी बंदी त्याची ॥२॥
हेंचि निजसार नामाचा उच्चार ।
मंत्र हा निर्धार सुलभचि ॥३॥
सोयरा म्हणे पावन हें नाम ।
जपतां सुखधाम वैकुंठीचें ॥४॥
४७
कळिकाळ कांपे नाम उच्चारितां ।
विठठल म्हणतां कार्यसिध्दी ॥१॥
त्रिअक्षरी जप सुलभ सोपारा ।
वाचे तो उच्चारा सर्वकाळ ॥२॥
भवताप श्र्म हरे भावव्यधा ।
आज नका पंथा जाऊं कोणी ॥३॥
नामाचा विश्वास दृढ धरा अंतरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
४८
किती हें सुख मानिती संसाराचें ।
काय हें साचे मृगजळ ॥१॥
अभ्रीची छाया काय साच खरी ।
तैसेच हे परी संसाराची ॥२॥
मी आणि माझें वागविती भार ।
पुढील विचार न करतां ॥३॥
कां हे गुंतले स्त्रीपुत्रधना ।
कां ही वासना न सुटे यांची ॥४॥
सोयरा म्हणे अंती कोण सोडवील ।
फजिती होईल जन्मोजन्मी ॥५॥
४९
किती हे मरती किती हे रडती ।
कितिक हांसती आपाआपणा ॥१॥
पाहांता विचार काय हें खरे ।
खोटयालागी झुरे प्राणी देखा ॥२॥
मरती ते काय रडाती ते काय ।
हासती ते काय कवण कवणा ॥३॥
कवण तो मेला कवण राहिला ।
हासती रडाती कवणाला न कळे कांही ॥४॥
सोयरा म्हणे याचें नवल वाटतें ।
परी नाठवितें देवा कोणी ॥५॥
पंच ही भूते अवघा त्यांचा खेळ ।
आत्मा तो निर्मळ शुध्द आहे ॥१॥
तेथें मरतें तें कोण राहतें तें कोण ।
जयाचें कारण तोचि जाणे ॥२॥
वांयाचि वोझें घेती आपुलातें शिरी ।
वाउगे हांवभरी होती वांया ॥३॥
सोयरा म्हणे यांचे वाटते नवल ।
न कळे कांही बोल परमार्थाची ॥४॥
५१
देखोनी आंधळे कां बा जन होती ।
न कळे या गति मजलागी ॥१॥
एकातें मरतां आपणाचि देखती ।
तयासी रडाती आपणचि ॥२॥
हा कैसा नवलाव न कळे यांचा भाव ।
कोण घाव डाव आम्हांलागी ॥३॥
अवघेचि मज नवलाची परी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
५२
याचिये संगतीं अपायचि मोठा ।
दु:खाचा शेलवटा भागा आला ॥१॥
आतां पुरे हरि आतां पुरे हरि ।
सोडवी निर्धारी यांतोनियां ॥२॥
बहुतचि खंत करितसे मन ।
दाखवा चरण मजलागीं ॥३॥
गहिवर नावरे उदास अंतरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
५३
अहो पंढरीच्या राया ।
दंडावत तुमच्या पाया ॥१॥
तूंचि उदार त्रिभुवनीं ।
ऋध्दि सिध्दि तुझे चरणीं ॥२॥
भुक्तिमुक्तिचा तूं दाता ।
मी तों काय वानूं आता ॥३॥
बैसेन महाद्वारी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
५४
कोण दुजा वारी शीण ।
तुम्हावीण उगला ॥१॥
माय बाप बहिण आई ।
दुजें तुजविण नाही ॥२॥
घेतिले पदरी आतां ।
न टाकावे दुरी ॥३॥
अवघी माझी वासना ।
पुरवावी नारायणा ॥४॥
आतां नका धरूं दुरी ।
म्हणे चोखियाची महारी ॥५॥
बहुता परी वानितसें देवा ।
न कळे केशवा कांही मज ॥१॥
सेवा कैसी करूं काय ध्यान धरुं ।
न कळे साचार कांही मज ॥२॥
कैसी ती भाक्ति करावी देवा ।
न कळे कांही हेवा दुजा मज ॥३॥
तुमच्या उच्छिष्टाची आस निर्धारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
५६
उदारा पंढरिराया नको अंत पाहूं ।
कोठवरि मी पाहूं वाट तुझी ॥१॥
माय तूं माउली जिवींचा जिव्हाळा ।
पुरवावा लळा मायबाप ॥२॥
सर्वांपरी उणें दिसते कठिण ।
आता नका शीण माणी माझा ॥३॥
निवांतचि ठेवा तुमचिये दारी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
५७
आजि माझा सर्व पुरवा नवस ।
देखिले पायांस विठोबाच्या ॥१॥
अनंता जन्मांचे फिटलें सांकडे ।
कोंदाटलें पुढें रूप त्यांचे ॥२॥
आठवीत होतें गोमटी पाउलें ।
तोंचि देखियेलीं विटेवरी ॥३॥
आनंद नसमाय मनाचे अंतरी ।
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
५८
चोखा बैसतां समाधीसी ।
निर्मळा आली पंढरीसी ॥१॥
पाहोनी आनंदसोहळा ।
म्हणे विठ्ठला दयाळा ॥२॥
चोखा मेळविला रूपी ।
माझी आतां कोण गती ॥३॥
देव बैसोनी निकटी ।
निर्मळेसी सांगे गोष्टी ॥४॥
ऐसें देखोनियां नयनी ।
सोयरा मिठी घाली चरणीं ॥।५॥
५९
ऐसा आनंदसोहळा ।
निर्मळा पाहे आपुले डोळां ॥१॥
आनंद न माय गगनीं ।
वैष्णव नाचती रंगणीं ॥२॥
जेथें नाही भेदाभेद ।
अवघा भरला गोविंद ॥३॥
तया सुखाची सुखराशी ।
वोळली ती निर्मळेसी ॥४॥
सोयरा देखोनी आनंदती ।
वेळोवेळां विठु न्याहाळी ॥५॥
ऐशा आनंदात एक मासवरी ।
राहिली निर्धारी पंढरीये ॥१॥
नित्य जावोनियां चंद्रभागेस्नान ।
घाली लोटांगण पुंडलिका ॥२॥
क्षेत्र प्रदक्षिणा नामाच्या गजरी ।
येवोनी महाद्वारी हरि वंदी ॥३॥
सोयरा म्हणे ऐस सारोनियां नेम ।
वाचें गाय नाम विठोबाचें ॥४॥
६१
चोखा निर्मळ एकरूप ।
दरुशनें हरे ताप ॥१॥
वाचे विठठलनामछंद ।
नाही भेद उभायतां ॥२॥
तीर्थ उत्तम निर्मळा ।
वाहे भागीरथी जळा ॥३॥
ऐसी तारक मेहुणपुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥४॥
६२
पुसोनी सर्वांसी निर्मळा निघाली ।
येउनी पोहंचली मेहुणपुरी ॥१॥
सर्वकाळ छंद वाचे नाम गाय ।
आठवीत आहे चोखियासी ॥२॥
म्हणे विठोबा दयाळा मागणें आहे तुज ।
तुझा भक्तराज सांभाळी तुं ॥३॥
सोयरा म्हणे ऐसा सुखाचा सोहळा ।
भोगी अवलीळा निर्मळा ती ॥४॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral
View Comments