श्रीकृष्ण जन्माचे अभंग – एकूण १४ अभंग
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – १.
पापी जे अभक्त दैत्य ते माजले ।
धरणीसीं झाले ओझें त्यांचे ॥१॥
दिधलासे त्रास ऋषि मुनि सर्वां ।
न पूजिती देवा कोणी एक ॥२॥
राहियेले यज्ञ मोडिलें कीर्तन ।
पळाले ब्राम्हण दैत्यां भेणे ॥३॥
वत्सरुपी पृथ्वी ब्रम्हयापाशीं जाय ।
नेत्रीं वाहे तोय सांगतसे ॥४॥
बुडविला धर्म अधर्म झाला फ़ार ।
सोसवेना भार मज आतां॥५॥
ब्रम्हा इंद्र आणि बरोबरी शीव ।
चालियेले सर्व क्षीराब्धीशी ॥६॥
नामा म्हणे आतां करितील स्तुती ।
सावधान चित्तीं परिसावें ॥७॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – २.
वासुदेव ह्रुषिकेशा माधवा मधुसूदना ।
करितातीं स्तवना पुरुषसूक्तें ॥१॥
पद्मनाभा त्रिलोकेशा वामना शेषशायी ।
आम्हां कोणी नाहीं तुजवीण ॥२॥
जनार्दना हरि श्रीवत्सला गरुडध्वजा ।
पाव अधोक्षजा आतां आम्हां ॥३॥
वराहा पुंडरीका नृसिंहा नरांतका ।
वैकुंठनायका देवराया ॥४॥
अच्युता शाश्वता अनंता अज अव्यया ।
कृपेच्या अभया देई आम्हां ॥५॥
नारायणा देवाध्यक्षा कैठभभंजना ।
करी रे मर्दना दृष्टाचिया ॥६॥
चक्रगदाशंखपाणि नरोत्तमा ।
पाव पुरुषोत्तमा दासा तुझ्या ॥७॥
रामा हयग्रीवा भीमा रौद्रोभ्दवा ।
आश्रय भूतां सर्वा तुझा असे ॥८॥
श्रीधरा श्रीपति चतुर्बाहो मेघ :शामा ।
लेकुंरे आम्हां पाव त्वरें ॥९॥
नामा म्हणे ऎसें करितां स्तवन ।
तोषला भगवान क्षीराब्धींत ॥१०॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ३.
आकाशीची वाणी सांगे सकळांसी ।
तळमळ मानसीं करु नका ॥१॥
देवकीच्या गर्भा येईल भगवान ।
रक्षील ब्राम्हण गाई भक्त ॥२॥
उतरील भार मारील दैत्यांसी ।
आनंद सर्वांसी करील तो ॥३॥
रोहिणी उदरीं शेष बळिभद्र ।
यादव समग्र व्हा रे तुम्ही ॥४॥
ऎकोनियां ऎसें आनंद मानसीं ।
येती स्वस्थळासी नामा म्हणे ॥५॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ४.
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर ।
चला अवतार घेऊं आतां ॥१॥
पृथ्वीवरी दैत्य माजले ते फ़ार ।
गार्हाणें सुरवर सांगुं आले॥२॥
शेष म्हणे मज श्रम झाले फ़ार ।
यालागीं अवतार मी ग घेचि ॥३॥
राम अवतारीं झालें लक्षुमण ।
सेविलें अरण्य तुम्हांसवे ॥४॥
चौदा वर्षावरी केलें उपोषण ।
जाणातां आपण प्रत्यक्ष हें ॥५॥
नामा म्हणे ऎसें वदे धरणीधर ।
हासोनी श्रीधर काय बोले ॥६॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ५.
पूर्वी तूं अनुज झालासी कनिष्ठ ।
सोसियेले कष्ट मजसवें ॥१॥
आतां तूं वडील होई गा सर्वज्ञा ।
पाळीन मी आज्ञा तुझी बा रे ॥२॥
देवकी उदरीं राहावें जावोनी ।
मायेसी मागुनी पाठवितों ॥३॥
योगमाया तुज काढील तेथुन ।
घालीन नेऊन गोकुळासी ॥३॥
लक्ष्मीसी सांगे तेव्हांह्र्षीकेषी ।
कौडण्यपुरासी जावें तुम्हीं ॥५॥
नामा म्हणे ऎसा करुनि विचार ।
घ्यावया अवतार सिद्ध असे ॥६॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ६.
वसुदेवा देत देवकी बहीण ।
लग्नामध्ये विघ्न झालें ऎका ॥१॥
आकाशीची वाणी सांगतसे कंसा ।
मानी भरवंसा हा बोलण्याचा ॥२॥
आठवा इचा पुत्र वधील तुजसी ।
ऎकोनी मानसीं क्रोधावला ॥३॥
घेऊनियां खडग माराया धांवला ।
हात तो धरीला वासुदेवें ॥४॥
देईन मी पुत्र सत्य माझें मानी ।
ठेवा बंदीखानीं दूता सांगें ॥५॥
पुण्य सारावया भेटे देवऋषी ।
वधी बाळकांसी ठेवूं नको ॥६॥
होतांची प्रसूत नेऊनियां देत ।
सहाही मारीत दुराचारी ॥७॥
धन्य त्याचें ज्ञान न करीच शोक ।
वधितां बाळक नामा म्हणॆ ॥८॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ७.
सातवा जो गर्भ योगमाया नेत ।
आश्र्चर्य करीत मनामाजी ॥१॥
रोहीणी उदरीं नेवोनी घातला ।
न कळे कोणाला देवावीण ॥२॥
कंसाचिया भेणें यादव पळाले ।
ब्राम्हण राहिले अरण्यांत ॥३॥
नाही कोणा सुख तळमळ मानसीं ।
वधील दुष्टासी कोण आतां ॥४॥
विश्वाचा जो आत्मा कळलें तयाल ।
दावितसे लीला संभूतीची ॥५॥
अहर्निशीं ध्यान भक्तांचे मानसीं ।
स्थापिल धर्मासी नामा म्हणे ॥६॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ७.
देवकीचें तेज दिसे जैसा सूर्य ।
कंसाचे ह्र्दय जळतसे ॥१॥
हरणें पळती देखोनियां व्याघ्र ।
कांपे थरथर तयापरी ॥२॥
अजासर्पन्यानें कीटकभ्रमर ।
दिसती नारीनर कृष्णरुप ॥३॥
जेवितां बोलतां शेजेसी तो निजे ।
आला आला मज मारावया ॥४॥
नाशील हा आतां दैत्यांचे तें बंड ।
फ़ाटलीसे गांड तेव्हां त्याची ॥५॥
नामा म्हणे भय़ें लागलेंसे ध्यान ।
चराचरीं कृष्ण दिसतसे ॥६॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ८.
विमानांची दाटी अंतरिक्षी देव ।
करिताती सर्व गर्भस्तुति ॥१॥
सत्रा अक्षरांत असे तुझी मूर्ती ।
यज्ञेशा तुजप्रती नमो नमो ॥२॥
सहाजणीं भांडती नवजणीं स्थापिती ।
न कळे कोणाप्रती अंत तुझा ॥३॥
आठराजणें तुझी वर्णिताती कीर्ति ।
गुणातीत श्रीपति नमो तुज ॥४॥
चौघां जणां तुझा न कळेचि पार ।
श्रमसी वारंवार आम्हांसाठीं ॥५॥
आठ्यांशी सहस्त्र वर्णिताती तुज ।
ब्रह्माडांचे बीज तुज नमो ॥६॥
जन्म मरणानें नाहीं तया भय ।
आठविती पाय तुझेजे कां ॥७॥
नवजणी तुझ्या पायीं लोळतांतीं ।
परब्रम्हा मूर्ति तुज नमो ॥८॥
नामाम्हणे ऎसी करिताती स्तुती ।
पुष्पें वाहूनि जाती स्वस्थळासीं ॥९॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ९.
मयूरादि पक्षी नृत्य करीताती ।
नद्या वाहताती दोहीं थड्या ॥१॥
भुमीवरी सडे केशर कस्तुरी ।
आनंद अंतरीं सकळांच्या ॥२॥
विमानांची दाटी सुरवर येती ।
गंधर्व गाताती सप्तस्वरे ॥३॥
मंद मंद मेघ गर्जना करिती ।
वाद्यें वाजताती नानापरी ॥४॥
नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती ।
अप्सरा नाचती आनंदाने ॥५॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – १०.
दशरथें मारिला तोचि होता मास ।
वर्षा ऋतु असे कृष्णपक्ष ॥१॥
वसुनाम तिथी बुधवार असे।
शुक सांगतसे परीक्षिती ॥२॥
रोहिणी नक्षत्र दोन प्रहर रात्र ।
माया घाली अस्त्र रक्षपाळां ॥३॥
नवग्रह अनुकूल सर्वांचे जें मूळ ।
वसुदेव कपाळ धन्य धन्य ॥४॥
जयाचा हा वंश तयासी आनंद ।
माझा कुळीं गोविंद अवतरला ॥५॥
अयोनीसम्भव नोहे कांही श्रमी ।
नामयाचा स्वामी प्रगतला ॥६॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – ११.
फ़िराविली दोनी ।
कन्या आणि चक्रपाणि ॥१॥
झाला आनंदि आनंद ।
अवतरले गोविंद ॥२॥
तुटली बंधनें ।
वसुदेव देवकीचीं दर्शनें ॥३॥
गोकुळासी आलें ।
ब्रम्हा अव्यक्त चांगंलें ॥४॥
नंद दसवंती ।
धन्य देखिले श्रीपति ॥५॥
निशीं जन्मकाळ ।
आले अष्टमी गोपाळ ॥६॥
आनंदली मही ।
भार गेला सकळही ॥७॥
तुका म्हणे कंसा ।
आट भोविला वोळसा ॥८॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – १२.
कृष्ण गोकुळीं जन्मला ।
दुष्टां चळकांप सुटला ॥१॥
होतां कृष्णाचा अवतार ।
आनंद करिती घरोघर ॥२॥
सदा नाम वाचे गातीं ।
प्रेमे आनंदे नाचती ॥३॥
तुका म्हणे हरती दोष ।
आनंदाने करिती घोष ॥४॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – १३.
गोकुळींच्या सुखा ।
अंतपार नाहीं लेखा ॥१॥
बाळकृष्ण नंदाघरीं ।
आनंदल्या नरनारी ॥२॥
गुढिया तोरणें ।
करिती कथा गातीं गाणें ॥३॥
तुका म्हणे छंदे ।
येणॆं वेधिलीं गोविंदें ॥४॥
श्रीकृष्ण जन्माचे अभंग – १४.
अनंत ब्रह्मांडे उदारीं ।
हरि हा बाळक नंदाघरीं ॥१॥
नवल केव्हडें केव्हडें ।
न कळे कान्होबाचें कोडे ॥२॥
पृथ्वी जेणें तृत्प केली ।
त्यासी यशोदा भोजन घाली ॥३॥
विश्वव्यापक कमळापती ।
त्यासी गौळणी कडिये घेती ॥४॥
तुका म्हणे नटधारी ।
भोग भोगुनी ब्रह्माचारी ॥५॥
ref: TransLiteral, Bookstruck