संत विठाबाई अभंग
१
म्हणोनिया मीच अवतरीलो समज। चिदंबर नाम धरुनीया ।। जाहले चिदंबर पांडुरंग तोची ॥१॥
माझे आईचे नांव संतुवाई जाणा सांगते हो खूणा तुम्हालागी ।।२।।
पिताचे हो नांव रामप्पा नायक । दोघे होते देखा पंढरपुरी ||३||
मुलगा होवो मुलगी होवो आम्हालागी नाव ठेवीतो तुझेची विठ्ठला रे||४||
२
नाव ठेवीती मजसी विठाबाई म्हणून जन्मशतके सत्रासे चवदा जाण ॥। १॥
आषाढ हो मासी वद्य चतुर्दशी मंगळवारी पाहटे प्रहरासी ॥२॥
३
भ्रतरा हो मजसी चोदतो येकांती भोगावे मजसी म्हणुनीया ।।१।।
ओदोनीया बहुत मारीतो मजसी मध्यरात्री जाणा समयासी ॥२॥
४
म्हणोनीया मीच अवतरीलो समज चिदंबर नाम धरुनीया ।।१।।
कुंदगोळी असतो ब्राह्मणवेषेने। जावे ह्या वाटेने म्हणती मजसी ||२|| रा
जाराम भक्त माझे येईल येथे तुकाराम जाण प्रत्यक्ष तो ।।३।।
५
तेसेच निघाले रानामाजी पूर्ण मुखी विठ्ठलचूर्ण धरोनीया ॥१॥
मूर्ती घेवोनी होती आले डोंगरावरती। वाट नाही दिसती कोठे मजसी ॥२॥
देहबहुत क्षीण आज उद्या प्राण जाऊ पाहतो प्राण पांडुरंगा ॥३॥
विठाबाईची आली शेवटील वेळ कैसे म्हणु दयाळ तुला देवा ||४||
चिदंबरनाम गात फीरतो जाणा अवतार पूर्ण नामदेव ॥५॥
येईल हो आता कुंदगोळी जाणेसी हेची वाट त्याची खूण जाण ॥६॥
त्याचबरोबर जावे तुवा | तेथे। सांगोनी अद्रश्य होती देव ॥७॥
६
विठाबाई म्हणे देहभाव गेले चरण देखीले जेव्हा राजाराम ॥१॥
उठवीती मजसी हस्त दोनी धरुनी। स्वामीपासी न्हेती मजसी जाण ॥२॥
मध्यरात्री आलों कार्तिक हो मासी शुद्ध येकादसी जाणावा तो ।।३।।
गुरुवारी मध्यरात्रीचे समयासी कुंदगोळ द्वारासी राहिलो ते ।।४।।
विदेहाने चरणी लोळु लागले जाण आलींगीती पूर्ण स्वामी मजसी ||५||
देहासी हो मीठी मारीली स्वामीनी। स्वास फुंकती तोंडी देहालागी ||६||
७
विठाबाई म्हणे स्मरण आले जैसे जनाबाई म्हणुनी सर्व माझे ॥ १॥
जनी असती माझे पाठी उभा राहसी जगजेती ।।१।।
विठ्ठल राई रखुमाई चिदंबर सावीत्री सरस्वतीबाई नामदेव राजाराम जैसे धरोनीया नाम ॥३॥
८
तुझी सत्ता आहे देहावरी समज माझेवरी तुझी कींचीत नाही ॥१॥
देह नव्हे मी माझे देह जाण । समजती मी देह अहंभाव ॥२॥
९
हीरण्यकश्यपाचे वेळी पद्मीनी नामे दाशीचे कुली ।।१।।
दुसरा जन्म ऐका अता मंथरा नामे लाथ दिधली माथा।।२।।
कुब्जा नामे माझा जन्म जाहला उद्धव नामे तुझा ||३॥
नामयाची जनी जाहले । भेटी दीधली मला रूपविठ्ठलें ॥ ४॥
१०
मेली म्हणती मजसी नोळखती पूर्ण विदेहस्थीती जाण नेणती मूर्ख ||१||
देह पडता जवळी येवोनी पाहतो। दुर्गंधी हो वास हाताचा तो॥२॥
पदर लावोनी नाकी प्रतार पळतो। गावी आपल्या जातो पांढरपुरा ॥३॥
११
मन जाते जेथे दुःख दाखवी तेथे। नामावाचुनी वाचा बंद करी ॥१॥
तुजवीण चैन नाही चिदंबरा पायें या सत्वरा चिदंबरा ||२॥
विठाबाईचा अंत कीती पाहासी देवा लवकरी हो यात्रावा स्वामीराया ॥३॥
का नये करुणा स्वामी ब्रह्मपूर्णा कृपेचा तू राणा म्हणवीसी ॥४॥
धावा करीतो स्वामी रात्रदीस तुझे। का नये रे माझे करुणा तुला ॥५॥
विठाबाईंचा अंत जवळ आला स्वामी कुठे गेला तुम्ही चिदंबरा ।।६।।
१२
चिदंबर क्षेत्री मल्हार दीक्षीत जाती तपस्यास सहीत सती ।।१।।
मल्हार दीक्षीत भक्तीसामर्थ्याने सगुण केले जाणा विठ्ठलासी ॥२॥
देव बोले तेव्हा हसत हो त्याना अवतारा घेतो तुमचा उदरी।।३।।
विठाबाई म्हणे मागील जन्माची आठवण वसुदेव देवकीची ||४||
लौकीकाकरीता गर्म घरी लक्ष्मी नसे वेदना त्याना तीळभरी ॥५॥
अष्टवर्षात्मक प्रगटोनी राहती। साष्टांगे करीती उभयताना॥६॥
देवकीचे वेळी इच्छा तुमचे आई बाळलीला पाहावी म्हणोनीया॥७॥
म्हणुनी सांगुनी नारायण तेव्हा बाळरूप जाहले मंगळवारी ||८||
१३
विठाबाई म्हणे शके सांगते ऐका सोळाशते ऐसी जाणावा तो ॥१॥
बहुधान्यनाम सवत्छर जाणा अवतार पूर्णब्रह्म जाणा ||२||
कार्तीक हो वद्य षष्ठी तीथी जाणा। प्रातःकाळी दोन प्रहरी जाणा ॥३॥
१४
मातीचा हो हत्ती पूजोनी स्वामीनी सजीव करोनी घरी आले ।।१।।
होसुरीचे लोक घाबरे होवोनी। आले परतोनी पिताजवळी ॥२॥
मल्हार दीक्षीत पाठवीती तेथे शकेत सोळासे नवदीत ॥३॥
स्वामी चितंबर आले तया स्थळा पाहतीते वेळा हत्तीलागी ||४||
पाहता क्षणी हत्ती आपुल्या त्या स्थळा होत जैसे तैसे मृत्तिका रूप
१५
सहस्रार्जुनाकरीता जाहला परशुराम निक्षत्री धरीत्रीकेली जाण ॥१॥
वलीकरीता झाला वामन अवतार। घातीला हो धूर पाताळांत ॥२॥
पुंडलीकासाठी उभा जगमेटी चंद्रभागातटी पांडुरंग ॥३॥
१६
दंडकारण्याभीतरी गोदावरी तीरी बाभुळगांव ग्राम चेक जाणा ।।१।।
तथा ग्रामी राहती रजपूत ते वंशी हरीशींग लक्ष्मी जाणा ||२||
अनुप्रमाण लक्ष्मी होती जाण दोघे विठ्ठलभक्त पूर्ण होते||३||
१७
जन्म आला पुत्र माहाभगवद्भक्त। फालगुणपक्ष वद्य द्वितीया ॥१॥
शकेत सोळाशे नवदीत जाण विठाबाई खूण सांगते जाण ॥२॥
तेव्हा बोलताती द्वारकादास भेटेल तुजस चिदंबर ||३||
काही काळ गेल्यावरी हो तुजसी घडुन येईल योग समज ॥४॥
१८
पंढरपुरी गेले प्रार्थीले वीला चिदंबर कोण सांगे मला ।।१।।
रात्री हो द्रष्टांती विठ्ठल सांगती रूप होवोनी बोलती चिदंबराचे ॥२॥
मीच अवतरीलो चिदंबररूपे जावे तुवा तेथे कर्नाटक ||३||
विठाबाई म्हणे आनंद निघाले कुंदगोळी आले स्वामीजी ॥४॥
१९
राजारामासी दोघी कृष्णा राधा नामे होत्या हो कामीनी।।१।।
चाकरीस जाती हंगाबादेसी शीलेदारी काम करीता जाण||२||
विठाबाई म्हणे तैलंगदेशाचा । कृष्णभट्ट ब्राह्मण आला तेथे ॥३॥
चिदंबराचि खूण सर्व सांगतो जाण । अवतारपूर्ण श्रीकृष्ण तो ।।४।।
जावे तुवा तेथे चरण देखता त्याचे होईल तुमचे शांती जाण ॥५॥
२०
मूर्ती हो करवती गुलहोरी जाम चालवीता आगीत बाभुळगांव।।१।।
बाभुळगांवी त्याचा संगे होते जाण ऐका तुम्ही पूर्ण मन करुनी ||२||
विठाबाई म्हणे जीवंत मरावे चिरंजीव राहावे विदेहीने।।३।।
अग्नीविणे दाणे चोळुनीया पाही घ्यावे म्हणतो पाही सर्वालागी ॥४॥
२१
ऐकोनीया शास्त्री रागेने बहुत मूर्ख म्हणतो शेतकरीस जाणा ||१||
नीळा बोले तेव्हा शाख शिकले तरी पुराण वाचले तरी जन्मभरी।।२।।
तीर्थयात्रा फीरता न समजती गूढ गुरुपाय दृढ धरल्यावीण ॥३॥
म्हणुनीया त्याचे शिरी जाण नीळा हस्त ठेवीतो डोळा सर्व पाहती ॥४॥
ज्ञान जाहले त्यास सर्व येकंदर चरण धरीतो नीळायाचे ॥५॥
२२
लोक विचारीती हरीसी हो जाण देशपांड्या नाही आला जाण ॥१॥
ऐकोनिया हरी ऐसे म्हणतो जाण आज पंद्रा दिनी येतो समोर ।।२।।
देशपांडे जाणा मरण पावला जेथे त्याची यात्रा आली समोर ते॥३॥
हिकडुनिया निये भजन मंडळी तिकडूनिया प्रेत सावकाराचे ||४||
विठाबाई म्हणे म्हणतो हरि जाण देशपांडे आला पहा तेथे ॥५॥
२३
विठाबाई म्हणे अधर्म तो धर्म जेणे नारायण वश्य होय ||१||
दुःख केले तरी न होतो जीवंत भवरोगाचे वैद्य येथे आहे।।२।।
जावे तुम्ही शरण संताला हो आधी उठेल हो पुत्र तेव्हा तुमचा ||३॥
२४
स्वामी तेथे आले प्रत्यक्ष हो पूर्ण हात फिरवीती सर्व बाळावरी ॥१॥
वरदहस्त जेव्हा लागला बाळासी जीवंत हो जाहला तात्काळाची ॥२॥
बाळ सजीव जाहले सुब्बराव पहातो लोळोनी मागतो क्षमा जाण ।।३।।
सुशीलम्मा हो उठीली स्वामीचरणी पडली उठवीती स्वामी हस्त धरुनी ||४||
विठाबाई म्हणे आनंदे आनंद सर्वानंद नाचताती ॥५॥
२५
विठाबाई नामी नसता प्रेमसंग काय भजनी रंग नाचोनीया ॥१॥
भाव नसता राग ताल स्वर जाण । संस्कार नसता प्रेत समजा पूर्ण ||२||
भक्ती नसता भजन कीर्तन हे सारे। असे व्यर्थ….।।३।।
विठाबाई म्हणे मनावीण जाण। जीवेवीत साखर तैसे ताण ॥४॥
२६
विठाबाई सांगत खूण विदेही गर्जा नाम जाण ॥१॥
कोटी कोटी नाम करीता देहाने न चुके बंधन समजा आधी ॥२॥
विदेह प्रेमाने येक नाम घेता आनंदाश्रु जाता नयनी सदा ||३||
विदेहाने नाम म्हणणारे वीरळ । भेटी होणेसी गाठी पुण्य पाहिजे ||४||
नाम म्हणता देही न भेटतो जाण म्हणता विदेही प्रत्यक्ष ते ||५||
स्वामी नाम विदेह घरी देवदेहसंबंध दूर करी ||६||
विठाबाई म्हणे नाम चिदंबर विदेह अंतर शोधोनी म्हणा॥७॥
जडदेह सोडोनी विदेहाने जाण उपचाराचे पूर्ण चिदंबर॥८॥
२७
भावेवीण नाम घेता चिदंबर दगडावरी प्रजन्य तैसे जाणा ।। १ ।।
भावामाजी दोन प्रकारीचे जाण । देहभान विदेहीभान जान ||२||
ऐसे वाणीमद दोन वाणी जाण देह आणी विदेहवाणी समजा ||३||
देहवाणी म्हणजे इंद्रियाने निघते ऐका सांगते खूण तुम्ही ऐका ||४||
२८
प्रत्यक्ष तो विष्णु असे ज्ञानेश्वर उद्धव अवतार नामदेव ॥१॥
निवृत्ती तो हर ब्रह्म तो सोपान। ऐसे अवतार बहुत जाण ॥२॥
२९
संतासी भेटता अंग चोरीतो जाण वेश्या सुरा उरा ओळंगीतो ।।१।।
देवाकरीता पैका देता रडे रुका। विषयालागी फुका लुटीतसे ॥२॥
कोडियाचे बहुत आहे गोरेपणा अहंकारी ज्ञान तैसे समजा ॥३॥
विठाबाई म्हणे तोंडावरी थुंका जातो यमपुरी भोगावया ||४||
नकळे जया भक्तीचे महीमान त्याने ब्रह्मज्ञान बोलु नये ||५||
विठाबाई म्हणे ज्यासी नाही भक्ती त्याने भगवे हाती धरू नये ॥६॥
३०
कलीयुगी हो नामापेक्षा मोठे नाही योगयागयज्ञ प्रणतुल्य ॥१॥
योगयाग वर्ज करी नाम धीदेही हो घरी ||२||
नादबिंदु नको पाही इडा पिंगळा नको काही ||३||
ब्रह्मरंध्र नको शोधुं आसन नको कभी घालु ||४||
नको भ्रमरगुंफा पाही । नको चवद चक्र काही ।।५।।
हदई कमळ नको आठउ। कुंडलीनी नको शोधु ।।६।।
यम अहो जाणा भागवतामदे मुख्य नाम म्हणता सख्य होते त्यासी ।।७।।
३१
काय गातो अर्थ त्यांनाच कळेना राग गातो नाना आळवोनी ॥१॥
विठाबाई म्हणे जळो त्यांचे तोंड व्यर्थ व्याली रांड त्यासीं समजा ।।२।।
परस्त्रीगमन कदापी न करा त्यापेक्षा बरा नंपुसक॥३॥
घरोघरी गुरु जाण ज्ञान सांगणार पूर्ण ||४||
शब्दज्ञान ते सांगती अधोगती दोघे जाती ॥५॥
३२
विठाबाई म्हणे धान्याबरोबर घाटचारा जाण येतो समजा ।। १॥
तैसे घाटीचारा सिटा समजा जाण नाम धान्य मुख्य समजा पूर्ण ||२||
दुधापासून ताक ताकापासून लोणी लोणीपासुन सुपस्वाद ॥३॥
विठाबाई म्हणे निराकार दूध आकार हे तूप नाही म्हणुनी ॥४॥
अभंग हे दूध मन है रवी जाण घुसळीता मिळते लोणी जाण ॥५॥
(उपलब्ध अप्रकाशित अभंग, धारवाड (कर्नाटक आर्टस् कॉलेज संपा. डॉ. आवळीकर पंडित)
तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या