संत सेना महाराज अभंग

संत सेना महाराज अभंग

संत सेना महाराज अभंग एकूण १३३

विठ्ठल महात्म्य

 १.

विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥

श्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥

कंठी शोभे एकावळी । तोडर गर्जे भूमंडळी। भक्तजनाची माउली तो गे माये ॥३॥

सोनसळा पीतांबर। ब्रीद वागवी मनोहर । सेना वंदि निरंतर तो गे माय ॥४॥

 

२. विटेवरी उभा नीट देखिलागे माये । निवाली कांती हरपला देहभाव ॥१॥

तें रूप पाहतां मन माझें वेधले । नुठेचि कांहीं केलें तेथुनि गे माये ॥२॥

अवघे अवघियाचा विसर पडियेला । पाहतां चरणाला श्रीविठोबाच्या॥३॥

सेना म्हणे चला जाऊं पंढरीसी। जिवलग विठ्ठलासी भेटावया ॥४॥

 

३. जो हा दुर्लभ योगिया जनासी । उभाचि देखिला पुंडलीकापासी ॥१॥

हारपलें दुजेपण फिटला संदेह। निमाली वासना गेलादेहभाव ॥२॥

विठेवरी उभा पंढरीचा राणा । सेना म्हणे बहु आवडतो मना ॥३॥

 

४. जातां पंढरीसी सुख वाटे जीवा । आनंदें केशवा भेटतांचि ॥१॥

या सुखाची उपमा नाहीं त्रिभुवनीं । पाहिली शोधोनी अवघीं तीर्थे ॥२॥

ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार। ऐसे वैष्णव डिंगर दावा कोठें ॥३॥

ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक। ऐसा वेणुनादी काला दावा ॥४॥

ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर। ऐसे पाहतां निर्धार नाहीं कोठें ॥५॥

सेना म्हणे खूण सांगितली संतीं । यापरती विश्रांती न मिळे जीवा ॥६॥

 

५. समचरण विटेवरी। पाहतां समाधान अंतर्री ॥१॥

चला जाऊं पंढरीसी। भेटुं रखुमाई वरासी ॥२॥

होती संतांचिया भेटी । सांगू सुखाचिया गोष्टी ॥३॥

जन्ममरणाची चिंता। सेना म्हणे नाही आतां॥४॥

 

६. विटेवरी उभा। जैसा लावण्याचा गाभा ॥१॥

पायीं ठेउनियां माथा । अवघी वारली चिंता॥२॥

समाधान चित्ता। डोळा श्रीमुख पाहतां ॥३॥

बहू जन्मी केला लाग। सेना देखे पांडुरंग ॥४॥

 

७. जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ॥१ ॥

तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना॥२॥

सहा शास्त्र शिणलीं। मन मौनचि राहिली॥३॥

सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ॥४॥

 

८. ब्रह्मादिक पडती पायां । जे शरण पंढरीराया ॥१॥

मोक्ष मुक्ती लोटांगणीं । उभ्या तिष्ठती आंगणीं ॥२॥

सूर्यसुत शरणागत । येउनी चरणीं लागत ॥ ३॥

काया मने वाचा। सेना शरण विठोबाचा ॥४॥

 

९. मोक्ष आणि मुक्ति । हे तो तुम्हांसी आवडती॥१॥

एका नामावांचून कांही। नसे आवडी आम्हां पाही ॥२॥

तुम्ही करावा जतन । तुमचा आहे ठेवा राखून ॥३॥

सेना म्हणे देई भेटी। कृपावंता जगजेठी ॥४॥

 

१०. शरण जाऊं कोणासी । तुजविण ऋषीकेशी ॥१॥

पाहतां नाहीं त्रिभुवनी। दुजा तुज ऐसा कोणी ॥२॥

पाहिला शोधुनी । वेदशास्त्र पुराणीं ॥३॥

सेना म्हणे पंढरीराया। शरण सांभाळी सखया ॥४॥

 

११. देहूडे ठाण सुकुमार गोजिरें । कल्पद्रुमातळीं उभा देखिलारे ॥१॥

मनीं वेध लागला त्या गोपाळाचा। जो जिवलग गोपगोपिकेचा ॥२॥

जी सावळी सगुण घनानंद मूर्ति। पाहतां वेधली माझी चित्तवृत्ती ॥३॥

जो उभाचि राहिला व्यापुनी सकळ। भेटिलागींसेना व्हावी उतावळी ॥४॥

 

२ भक्त पुंडलीक महात्म्य

 

१२. धन्य महाराज पुंडलीक मुनी। वैकुंठीचा सखा आणिला भूतळालागोनी ॥१॥

केला उपकार जग तारिलें सकळ । निरसली भ्रांति माउली स्नेहाळ ॥२॥

आली चंद्रभागा गर्जना करीत । तुझिया भेटीलागी उतावीळ धांवत ॥ ३॥

जोडोनिया पाणी सेना करी विनवणी। म्हणे धन्य पुंडलीका माथा ठेविला चरणीं ॥४॥

 

३ संत महात्म्य वर्णन

 

१३. उदार तुम्ही संत । मायबाप कृपावंत ॥१॥

केवढा केला उपकार। काय वाणूं मी पामर ॥२॥

जडजीवा उद्धार केला। मार्ग सुपंथ दाविला ॥३॥

सेना म्हणे उतराई । होतां न दिसे कांहीं ॥४॥

 

१४. तुम्ही संत दयानिधी। तारा सांभाळा दुर्बुद्धि ॥१॥

तुम्हां आहे शरणागत। तरी तारावा पतित ॥२॥

अधिकार नाहीं। न कळे भक्तिभाव कांहीं ॥३॥

वागवा अभिमान । सेना आहे याती हीन ॥४॥

 

१५. आजि सोनियाचा दिवस। दृष्टी देखिलें संतांस ॥१॥

जीवा सुख झालें। माझें माहेर भेटलें ॥२॥

अवघा निरसला शीण। देखता संतचरण ॥३॥

आजि दिवाळी दसरा । सेना म्हणे आले घरा ॥४॥

 

१६. म्हणविलों विठोबाचा दास। शरण जाईन संतांस ॥ १॥

सदा सुकाळ प्रेमाचा। नासे दुष्ट मळ बुद्धीचा ॥२॥

ऐकतां हरीचें कीर्तन। अभक्त भक्ति लागे जाण ॥३॥

उभा राहे कीर्तनांत। हर्षे डुले पंढरिनाथ ॥४॥

सेना म्हणे हेंचि सुख । नाहीं ब्रह्मयासि देख ॥५॥

 

१७. मायबाप कृपावंत। तुम्ही दयाळू संत ॥१॥

घातला भार तुमच्या माथा। आवडे तें करा आतां।॥२॥

चिंतुनि आलों पायांपाशीं । न धरीं वेगळे मशी ॥३॥

सेना म्हणे पायीं मिठी । घातली न करा हिंपुटी ॥४॥

 

१८. तेचि एक संत जाणा। आवडती नारायणा ॥१॥

पांडुरंगा वांचोनि कांहीं। न जाणे दुसरे पाही॥२॥

मुखीं नाम अमृतवाणी। धाले मनीं डुल्लती ॥३॥

सेना म्हणे पायीं माथां। त्यांच्या ठेवियला आतां ॥४॥

 

१९. संतसंगतीने थोर लाभ झाला। मोह निरसला मायादिक ॥ १॥

घातले बाहेरा काम क्रोध वैरी । बैसला अंतरी पांडुरंगा ॥२॥

दुजियाचा वारा लागूं नेदी अंगा । ऐसे पांडुरंगा कळो आलें ॥ ३॥

संतांनीं सरता केला सेना न्हावी। ब्रह्मादिक पाही नातुडे जो ॥४॥

 

२०.उदार तुम्ही संत। मायबाप कृपावंत ॥१॥

केवढा केला उपकार । काय वाणू मी पामर ॥२॥

जड जीवा उद्धार केला। मार्ग दाखविला सुपंथ ॥३॥

सेना म्हणे उतराई। होता कांहीं दिसेना ॥४॥

 

४ उपदेशपर

 

२१. हित व्हावें मनासीं। दवडा दंभ मानसीं ॥१॥

अलभ्यलाभ येईल हातां। शरण जावे पंढरिनाथा ॥२॥

चित्त शुद्ध करा । न देई दुजियासी थारा ॥३॥

हेचि शस्त्र निर्वाणीचें। सेना म्हणे धरा साचें ॥४॥

 

२२. करिसी खटपटी । पोटासाठीं आटा आटी ॥१॥

नाम घेतां विठोबाचें। काय तुझ्या वाचें वेंचे ॥२॥

धनाचिया आशा । वाउगा फिरसी दाही दिशा ॥३॥

जावें हरिकीर्तना । आवडेचि तुझ्या मना ॥४॥

सेना म्हणे ऐसा नरा। जवळूनि दूर करा ॥५॥

 

२३ धन कोणा कामा आलें। पहा विचारूनि भले ॥१॥

ऐसे सकळ जाणती । कळोनियां आंधळे होती ॥२॥

स्त्रिया पुत्र बंधु पाही। त्याचा तुझा संबंधु नाहीं ॥३॥

सखा पांडुरंगाविण। सेना म्हणे दुजा कोण ॥४॥

 

५ राम नाम महात्म्य

 

२४. रामें अहिल्या उद्धरिली। रामें गणिका तारिली ॥१॥

म्हणा राम श्रीराम । भवसिंधु तारक राम ॥२॥

रामें जटायु तारिलें । रामें वानरा उद्धरिलें ॥३॥

ऐसा अयोध्येचा राजा। सेना म्हणे बाप माझा॥४॥

 

६ अनामधारकाचानिषेध पर

 

२५. मुखीं नाम नाहीं। त्याची संगती नको पाही ॥१॥

ऐसियाचे मुखीं माउली। वार घालितां विसरली ॥२॥

जया नावडे संतसंगती। अधम जाणावा निश्चिती ॥३॥

नाम घेतां लाज वाटे। रंभे निर्लज्ज भेटें ॥४॥

जातां हरिकीर्तना। नावडे ज्याच्या मना ॥५ ॥

सेना म्हणे त्यास। कुलासुद्धां नर्कवास ॥६॥

 

२६. स्वहित सांगावें भलें। जैसें आपणासि कळे ॥१॥

त्यांच्या पुण्या नाहीं पार । होय अगणित उपकार ॥२॥

मोहपाशें बांधिला । होता तोहि मुक्त केला ॥३॥

जेणें वाट दाखविली। सेना म्हणे कृपा केली ॥४॥

 

२७. रामकृष्ण नामें । ऐसी उच्चारावीं प्रेमें ॥ १॥

तेणें काळ दुरी पळे। जाती दोष ते सकळे ॥२॥

ऐसा नामाचा प्रताप । मार्गे निवारिला ताप ॥३॥

मुखीं रामनाम उच्चारी। सेना म्हणे निरंतरी ॥४॥

 

७ नर देहाची नश्वरता

 

२८. मानिसी देहाचा भरंवसा । केला जाईल नकळे कैसा ॥१॥

सार्थक कर हो कांहीं। जेणें हरी जोडे पायां ॥२॥

धनसंपत्ति पाही । ही तो राहील ठायीं ॥३॥

शरण रिघा पंढरिराया। सेना न्हावी लागे पायां॥४॥

 

८ पंढरीची वारी

 

२९. वाट धरितां पंढरीची। चिंता हारे संसाराची ॥ १॥

ऐसे कोठें नसे पायीं। धुंडितां ब्रह्मांड पाही ॥२॥

पाहिली शोधूनीं । तीर्थे आणि देवस्थानी ॥३॥

मोक्ष मुक्ती पाही। सेना म्हणे लागा पायीं ॥४॥

 

३०. येथें सुखाचिये राशी । पार नाहीं त्या भाग्यासी ॥१॥

झालें आलिंगन। कांती निवाली दर्शनें ॥२॥

उपकार उत्तीर्णता । सेना म्हणे नाही आतां ॥३॥

 

३१ करितां योगयाग। न भेटेची पांडुरंग ॥१॥

एका भावावांचोनि कांहीं। देव जोडे ऐसा नाहीं ॥२॥

धूम्रपानादि साधन। करितां व्यर्थ होय शीण ॥३॥

करितां साधनें शिणलीं। सेना म्हणे वायां गेलीं ॥४॥

 

९ किर्तन विक्षेप (व्यसन) करणारचा निषेध

 

३२. बैसोनि कीर्तनांत । गोष्टी सांगतो निश्चित ॥१॥

दुष्ट अधम तो खरा । येथुनियां दूर करा ॥ २॥

तमाखु ओढूनि सोडी धूर । दुष्टबुद्धि दुराचार ॥३॥

पान खाय कीर्तनांत । रुधिर विटाळशीचें पीत ॥४॥

त्याची संगती जयास । सेना म्हणे नर्कवास ॥५॥

 

१० विठ्ठल नामाची सुलभता

 

३३. नलगे योग तप। करणें साटोप आम्हांसी ॥१॥

सोपे साधन आमुचें। नाम गाऊं विठोबाचें ॥२॥

जो नातुडे धूम्रपानीं । राहे संपुष्टि येऊनि ॥३॥

जया नाहीं रूप । आम्हां कीर्तनीं समीप ॥४॥

सेना म्हणे लडिवाळ। जाणो हरीसी निर्मळ ॥ ५॥

 

३४. म्हणा हरी हरी। अवघे सकळ नरनारी ॥१॥

येणें तुटेल बंधन। भाग निवारील शीण ॥२॥

प्रेमें घ्यारे मुखीं नाम। हरे सकळही श्रम ॥३॥

सेना म्हणे चित्तीं धरा। बळकट रखुमाईच्या वरा ॥४॥

 

३५. कशासाठी करितां खटपट । तप तीर्थ व्रतें अचाट ॥१ ॥

नलगे शोधावें गिरिकानन। भावें रिघा विठ्ठला शरण ॥२॥

विभांडक श्रृंगी तपस्वी आगळा। क्षण न लागत रंभेने नागविला ॥ ३॥

जाणोनि सेना निवांत बैसला। केशवराजा शरण रिघाला ॥४॥

 

३६. सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं ॥१॥

पाल्हाळ लटिका करणें तो काय । शरण पंढरीराया गेला नाहीं ॥२॥

जंव नाहीं गेली अज्ञानाची भ्रांती। जंव नाहीं विरक्ती बाणली आंगीं ॥३॥

जीवाची तळमळ राहिली सकळ। मग ब्रह्मज्ञान कळे सेना म्हणे ॥४॥

 

३७. घरासी आले संत देखोनिया। म्हणे यासी खावया कोठुनी घालूं ॥१॥

ऐसा हा निर्धारीम दुष्ट दुराचारी। जन्मोनियां झाला भूमि भारी ॥२॥

दासीचें आर्जव करोनि भोजन । घाली समाधान करी तीचें ॥३॥

आणि आवडीनें करी तिची सेवा । म्हणे सुख जीवा फार माझ्या ॥४॥

संतानीं पाणी मागतां म्हणे काय । मोडले की पाय जाय आणि ॥५॥

सेनां म्हणे कारे गाढवा नेणसी । कुंभपाक वस्तीसि केला आहे ॥६॥

 

३८. येऊनि गर्भासी मेलों उपवासीं । नाहीं सखी ऐसी भेटली कोणी ॥१॥

देह जाणे अनित्य करावें स्वहित । मोहापासुनि निश्चित सोडवील ॥२॥

न होय अनारिसा पाळी तोंडिच्या घासा। सोडवी ना ऐसी परी देखो॥३॥

वाटलो मीपणे धनमान कांहीं। सेना म्हणे नाहीं लाभ अलाभ ॥४॥

 

३९. तुज ऐसें वाटे देह व्यर्थ जावा । द्यूतकर्म खेळावा सारीपाट ॥१॥

मग नाहीं नाम निजल्य जागा राम। जन्मोनि अधम दुःख पावे ॥२॥

दासीगमनीं धीट विषयीं लंपट । जावया वाट अधोगती ॥३॥

नर्का जावयासी धरसील चाड । तरी निंदा गोड वैष्णवांची ॥४॥

सेना म्हणे नामाचें लावीं करि पिसें । जन्माल्या सायासें व्यर्थ जासी ॥५॥

 

११ न्हावी वंश धारकास आज्ञा

 

४०. जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी ॥१॥

येर अवघे बटकीचे । नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥२॥

शास्त्रे नेम धंदा दोन प्रहर नेमस्त ॥४॥

सत्य पाळारे स्वधर्मासी। सेन म्हणे नेमियला। सांडोनि अनाचार केला ॥३॥

जन्मलों ज्या वंशांत । आज्ञा ऐसी ॥५॥

 

४१. न्हावीयाचे वंशीं। जन्म दिला ऋषीकेशी। प्रतिपाळावें धर्मासी। व्यवहारासी न सांडी॥१ ॥

ऐका स्वधर्मविचारी । धंदा करी दोन प्रहर । सांगितलें साचार । पुरणांतरीं ऐसें हें ॥ २॥

करूनियां स्नान । मुखी जपे नारायण। मागुती न जाण । शिवूं नये धोकटी ॥३॥

ऐसे जे कां न मानिती। ते जातील नरकाप्रती। सकळ पूर्वज बुडविती। । शास्त्रसंमती ऐसी हे॥४॥

शिरीं पाळावें आज्ञेसी। शरण जावें विठोबासी। सेना म्हणे त्यासी। ॠषीकेशी सांभाळी ॥५॥

 

१२ समाधी

 

४२. करितों विनवणी । हात जोडोनियां दोन्ही ॥१॥

हेंचि द्यावे मज दान । करा हरीचें चिंतन ॥२॥

जातों सांगूनियां मात । पांडुरंग बोलावित ॥३॥

सोडा द्वादशी पारणें । सुखें करावें कीर्तन ॥४॥

दिवस मध्यान्हीं आला। सेना वैकुंठासी गेला ॥५॥

 

४३. आलिंगन भेटी। मग चरणीं घाली मिठी ॥१॥

ऐसा माझा भोळा भाव। पंढरिराव जाणता ॥२॥

घेतलें हिरोनी। सीणभाग चक्रपाणी ॥३॥

सेना म्हणे मायबापें। द्यावें भातें हें आतां ॥४ ॥

 

४४. नाहीं सुख त्रिभुवनीं। म्हणुनि मनीं धरिलें ॥१॥

पायीं ठेवियला भाळ। कंठीं माळ नामाची ॥२॥

पावलीं विश्रांती। सेना म्हणे कमळापती ॥३॥

 

४५. ऐसी आवडी आहे जीवा । कैं पाहीन केशवा ॥१॥

माझी पुरवा वासना । सिद्धी न्यावी नारायणा ॥२॥

नलगे वित्त धन। मुखीं नाम नारायण ॥३॥

सेना म्हणें कमळापती। हेंचि द्यावें पुढती पुढती ॥४॥

 

४६. संतीं सांगितलें। तेंचि तुम्हां निवेदिलें। ॥१॥

मी तों सांगतसें निकें। येतील रागें येवों सुखें ॥२॥

निरोप सांगतां । कासया वागवावी चिंता ॥३॥

सेना आहे शरणागत । विठोबा रायाचा दूत ॥४॥

 

४७. करा हाचि विचार । तरा भवसिंधु पार ॥१॥

धरा संतांची संगती। मुखीं नाम अहोराती ॥२॥

अजामीळ पापराशी । पार पावविलें त्यासी ॥३॥

नका धुरें भरूं डोळा। सेना सांगे वेळोवेळां ॥४॥

 

४८. करितां परोपकार। त्याच्या पुण्या नाहीं पार ॥१॥

करितां परपीडा । त्याच्या पापा नाही जोडा ॥२॥

आपुलें परावें समान । दुजा चरफडे देखून ॥३॥

आवडे जगा जें कांहीं। तैसें पाहीं करावें ॥४॥

उघडा घात आणि हित । सेना म्हणे आहे निश्चित ॥५॥

 

४९. शरणागत आहे वैभवाचा धनी। सत्य भावें मानी अर्पिले तें ॥१ ॥

आपणा वेगळें नेदी उरो कांहीं। भावेंचि दावी आपणामाजी ॥२॥

दशा आपली अंगा नेणें जाणे कांहीं । आपणाचि होय इच्छा त्याची ॥३॥

धाकुट्यासी माता करी स्तनपान। सेना म्हणे जिणें बरें हेंचि ॥४॥

 

५०. अंतरीचें पुरें काम । घेतां नाम विठोबाचे ॥१॥

नाम साराचेंही सार । शरणागत यमकिंकर ॥२॥

पाहिले वेदांत। निश्चय केला निगमांत ॥३॥

सेना म्हणे न वेचा कांहीं। लाभ नाहीं या ऐसा ॥४॥

 

५१. करितां योगयाग। सिद्धी न पवेचि सांग ॥१॥

देव एक भावाविण । नाहीं व्यर्थ शीण ॥२॥

केल्या तपाचिया राशी । तरि न मिळेची

त्यासी ॥३॥ करितां धूम्रपान। न भेटे नारायण ॥४॥

सेना म्हणे नको कांहीं। एका वीण दुजे नहीं ॥५॥

 

५२. घेतां नाम विठोबाचें। पर्वत जळती पापांचे ॥१॥

ऐसा नामाचा महिमा । वेद शिणला झाली सीमा ॥२॥

नामे तारिले अपार। महा पापी दुराचार ॥३॥

वाल्हा कोळी ब्रह्महत्यारी। नामें तारिला निर्धारीं ॥४॥

सेना बैसला निवांत। विठ्ठल नाम उच्चारीत ॥५॥

 

५३. नामाचें चिंतन श्रेष्ठ पैं साधन। जातील जळोनि महापापें ॥१॥

नलगे धूम्रपान पंचाग्निसाधन । करितां चिंतन हरी भेटे ॥ २॥

बैसुनि निवांत करा एकचित्त । आवडी गायें गीत विठोबाचें ॥ ३॥

सकळाहुनि सोपें हेंची पैं साधन। सेना म्हणे आण विठोबाची ॥४॥

 

५४. कांही न करी रे मना। चिंती या चरणा विठोबाच्या॥१॥

ठाव नाहीं कल्पनेसी । राशी सुखाची अमूप ॥१॥

पाहिलें श्रीमुख। नासे दुःख महाताप ॥३॥

होईल विसावा । सेना म्हणे सुख जिवा ॥४॥

 

५५. सुखें घालीं जन्मासी । हेंचि बरें की मानसीं ॥१॥

वारी करीन पंढरीची । जोडी ही माझी साची ॥२॥

हरिदासाची करीन सेवा । तेणे सुख थोर जीवा ॥३॥

सेना म्हणे सर्व संग । केला त्याग यासाठीं ॥४॥

 

५६. आम्हां हेंचि अळंकार। कंठीं हार तुळशीचें ॥ १॥

नाम घेऊं विठोबाचें । म्हणवूं डिंगर तयाचें ॥ २॥

चित्तीं चाड नाहीं न धरू आणिकाची कांहीं ॥३॥

सकळ सुख त्याचे पायीं । मिळे बैसलिया ठायीं ॥४॥

सेना म्हणे याविण कांहीं । मोक्ष युक्ति चाड नाहीं ॥५॥

 

५७. आम्ही विष्णूचे दास । न मानूं आणिक देवास ॥१॥

स्तुति आणिकांची करिता । ब्रह्महत्या पडे माथा ॥२॥

तुजविण देव म्हणतां। अवघी पापें पडो माथा ॥३॥

न करी पूजा आणि सेवन । सेंना म्हणे तुझी आण ॥४॥

 

५८. प्रेमसुखें कीर्तन। आनंदें गाऊ हरीचे गुण ॥१॥

धरिला वैष्णवांचा संग । नाहीं लाग कळीकाळा॥२॥

स्वल्प मंत्र हाचि जाण। राम कृष्ण नारायण ॥३॥

वाचे न उच्चारी कांहीं । याविण आणिक नाहीं ॥४॥

सेना म्हणे रंगलें ठायीं । माझें चित्त तुझें पायीं ॥५॥

 

५९. सांडोनि किर्तन। न करी आणिक साधन ॥१॥॥

पुरवा आवडीचे आर्त । तुम्हां आलों शरणागत ॥ २॥

मुखीं नाम वाहीन टाळी नाचेन निर्लज्ज राउळी ॥३॥

सेना म्हणे नुपेक्षावें हेंचि मागें जीवें भावें ॥४॥

 

६०. चित्तीं पाय रूप डोळां । मुखीं नाम वेळोवेळा ॥१॥

हेंचि मागे तुजपाशीं। भाव खरा कीं जाणसी ॥२॥

हे उचित तुमचें। कोड पुरवा बालकाचे ॥३॥

नको देऊं अंतर । सेना लोखे पायांवर ॥४॥

 

६१. चित्त नाहीं हातीं । करूं जाता हरिभक्ति ॥ १॥

मज इतुली वासना। भेटी द्यावी नारायणा ॥२॥

कोण जाणे दानधर्म । नव्हे स्वतंत्र कैचें कर्म ॥३॥

सेना म्हणे सांगें मात। जेणें माझें होय हित ॥४॥

 

६२. संताचे पाय मस्तकीं । सरता झालों तिहीं लोकीं ॥१ ॥

लोळेन चरणावरी । इच्छा फिटेल तोंवरी ॥२॥

नाहीं सेवा केली। मूर्ती डोळां म्यां देखिली ॥३॥

कृतकृत्य झाला सेना न्हावी। ठेविली पायांवरी डोई॥४॥

 

६३. कळेल तैसें गाईन तुज । नाहीं जनासवें काज ॥१॥

स्तुती करीन आवडी। जैसी जीवा वाटे गोडी ॥२॥

नाम गाईन आनंदें। नाचेन आपुलाले छंदें ॥३॥

सेना म्हणे नाहीं। जनासवें काज कांहीं ॥४॥

 

६४. अन्यायी अन्यायी। किती म्हणून सांगो काई।॥ १॥

तूं तो उदाराचा राणा। क्षमा करी नारायणा ॥२॥

काम क्रोध लोभ मोहो । नाडिलों याचेनि पहाहो ॥ ३॥

नावडे संतसंगती। नाहीं केली हरिभक्ती ॥४॥

निंदा केली भाविकांची । चित्तीं आस धनाची ॥५॥

सेना पायांचा पुतळा। तुज शरण जी दयाळा ॥६॥

 

६५ कटीं ठेऊनियां कर। रूप पाहिलें मनोहर ॥१ ॥

तेणे समाधान चित्ता । पायीं ठेवियेला माथा॥२॥

वाहो टाळी गातो गीत। सुखें 1. नाचे राउळांत ॥३॥

सेना म्हणे नामा पुढे। तुच्छ सकळ बापुडे ॥४॥

 

६६. तूं जीवींचे जाणसी। मुखें बोलावें मानसी ॥१॥

आतां भाकितों करुणा। नको मोकलूं नारायणा ॥२॥

आपुले केलें न चले कांहीं । साधन वाउगें पाहीं ॥३॥

सेना म्हणे आशा कांहीं । नाहीं देहाची पाहीं॥४॥

 

६७. बुडतो भवसागरीं । मज काढीं बा मुरारी ॥१॥

आतां न मानी भार कांहीं। माझी पाही माऊली ॥२॥

करीं जतन ब्रीदावळी । वागविशी ते सांभाळी ॥३॥

मी महादोषी चांडाळ । सेना म्हणे तूं दयाळ ॥४॥

 

६८. आतां ऐसे करीगा देवा। तुझी घडो पाय सेवा ॥१॥

मनामाजी दुर्बुद्धी। न यावी माउलिये कधीं॥२॥

चित्तीं भाव जो धरिला। सिद्धी न्यावाजी विठ्ठला ॥३॥

सेना म्हणे याविण कांहीं। लाभ दुसरा नाहीं ॥४॥

 

६९. वाचे म्हणतां निरवृत्ति । अवघी निरसली भ्रांती ॥१॥

हें तो माझ्या अनुभवा। प्रत्यया आले जीवा ॥२॥

गुंतलो होतो मोह आशा । स्मरतां पावलों नाशा ॥३॥

ऐसा अनुभव नामाचा। सेना न्हावी स्मरे वाचा ॥४॥

 

७०.अगा पंढरीनाथा। शरण आलों कृपावंता ॥१॥

याचा धरी अभिमान । सत्य करवें वचन ॥२॥

गीता भागवतीं। स्वयें बोले रमापती ॥३॥

म्हणती दीनानाथ । हेंचि सांभाळीं कीं व्रत ॥४॥

मोकलिता दूरी। सेना न ठेविची उरी ॥५॥

 

७१. उतरलों पार । संसारसिंधू हा दुस्तर ॥१॥

कृपा केली पांडुरंगें। सर्व निवाली आंगे ॥२॥

सुख संतोषा पडे मिठी। आवडी पोटी होती तें ॥ ३॥

उपाधी वेगळा । सेना राहिला निराळा ॥४॥

 

७२. माझा केला अंगीकार। काय जाणे मी पामर ॥१॥

देव दीनाचा दयाळ। शरणागता पाळी लळा ॥२॥

प्रल्हाद कारण । प्रगटला नारायण ॥३॥

मीराबाईसाठीं। केवढी केली आटाआटी॥४॥

शरण रिघा पंढरीराया। सेना न्हावी लागे पाया ॥५॥

 

७३. हाचि माझा शकुन । ह्रदयीं देवाचे चिंतन ॥१॥॥

होईल तैसें हो आतां। काय वाहूं याची चिंता॥२॥

पडियेली गांठी । याचा धाक वाहे पोटी ॥३॥

सेना म्हणे हीनपणे । देवा काय माझें जिणें ॥४॥

 

७४. लेकुराची आळी मायबापापुढें। पुरवी लाडे कोडे लळे त्याचें ॥१॥

करावा सांभाळ सर्वस्वी गा आतां । कांहो अव्हेरितां जवळीचा ॥२॥

आम्हांवरी चाले सत्ता आणिकांची। थोरीव तुमची काय मग ॥३॥

आला सेना न्हावी पायांपें जवळी । आतां टाळाटाळी नकां करूं ॥४॥

 

७५. योगियाचा राजा कैलासवासी गे माये। गाती नारद तुंबर पुढे बसवा आहे ॥१॥

गळां रुंडमाळा वासुकीचें भूषण । गजचर्म पांघुरला। अंगी भस्माचें लेपन ॥२॥

वास अंगीं गिरिजा देवी जटा गंगा वाहे। भोंवतें गण गंधर्व जोडोनि पाणि उभे राहे ॥३॥

सेना म्हणे जेणे भाळी चंद्र धरियेला । नमस्कार माझा तया आदि नाथाला ॥४॥

 

७६. शिणसो भरोवरी । वांया कासया येरझारी ॥१॥

वेद मंथोनियां। नाम काढिले लवलाह्या ॥२॥

आणिक साधन। नाहीं नाहीं नामाविण ॥३॥

सेना म्हणे केला नेम । वस्ती राहे पुरुषोत्तम ॥४॥

 

७७. तरी का माझा केला अंगिकार । आतां विचार करिसी वायां ॥१॥

तुज मी ठाऊक होतों अन्याई । हा खरा तेव्हा कां विचार केला नाहीं ॥२॥

आमुचें तें आम्ही केलेंसे जतन । अंतर तुम्हांकूण न पडावा ॥३॥

समर्थाचे असे वचन प्रमाण। शरणागता जाण जतन जीवी ॥४॥

तुझा म्हणविलों सांभाळी जी आतां । न घे अपेश माथा सेना म्हणे ॥५॥

 

७८. अन्यायी अपराधी लडिवाळ संतांचा। तेथें कळिकाळाचा रीघ नाहीं ॥१॥

समर्थाचे बाळ समर्थचि जाणें। वागवी अभिमान म्हणतां त्याचे ॥२॥

अन्यायाच्या राशी उदंड केल्या जरी। तरी क्षमा करी मायबापा ॥३॥

कल्पतरू छाया बैसला सेना न्हावी। दया ते वागवी बहु पोटीं ॥४॥

 

७९. ठेविला पाय माथा संतजनीं। तिन्हीं लोकी जाण सरता केला ॥१॥

घालीन लोटांगण वंदीन पाय माथा। पुरेल माझी इच्छा धणीवरी ॥२॥

सेना म्हणे धन्य धन्य झालों देवा। न करितां सेवा भेटी दिली ॥३॥

 

८०. ऐकिलें मागें तारिले बहुता। धांवसी की आतां नाम घेतां ॥१॥

बरव्यापरी मज ऐसे कळों आलें । म्हणउनी विठ्ठलें करी धावा ॥२॥

पडिला विसरू माझा तुजलागी। आतां पांडुरंगीं करणें काय ॥३॥

तुजलागि माझी नयेचि करुणा । धरिलें कीं जाण दुरीं मज ॥४॥

सेना म्हणे आतां सांभाळी नारायणा । जाऊं पाहे प्राण तुजसाठीं ॥५॥

 

८१. पुत्राचिया ओढी बाप करी जोडी । वाळवुनि कुरवंडी आपणा करी ॥१॥

मिरासीचा धनी करुनी ठेविला। भार तो वाहिला कडिये खांदी ॥२॥

घाली अलंकार कौतुक डोळा पाहे। ठेवा दावी काय आहे तोचि ॥३॥

दुजियांनीं कोणी गांजितां तयासी । उदार जीवासी सेना म्हणे ॥४॥

 

८२. आम्हां एकविध भाविकांची जाती । न जाणे निश्चिती दुजें कांहीं ॥१॥

खूण जाणे चित्तीं ्षोभ उपजेना । कळवळुनि स्तना लाव पाळी ॥२॥

अवघे होऊ येतें तुज वाटे चित्तें । उपासने परतें नावडे कांहीं ॥३॥

डोळा मुख पाहूं मुखीं नाम गाऊं। सेना म्हणे पाहूं जळींस्थळीं ॥४॥

 

८३. असतां वैकुंठासी। काय सांगें ऋषिकेशी। जाऊनि मृत्युलोकाशी। जन भक्तिसी लावीं कां ॥१॥

आज्ञा वंदुनीया शिरीं। जन्मलों न्हावीयाचे उदरीं । वाचे नाम निरंतरीं । रामकृष्ण गोविंद ॥२॥

कलियुगामाजी जाण । सोपें हेंचि साधन। रामकृष्ण नारायण। ऐसें पुरुषोत्तम सांगत ॥३॥

सेना म्हणे देवाधिदेवा। आम्ही करावी तुझी सेवा। हेंचि मागतों केशवा । नित्य रहावें मजपाशीं ॥४॥

 

८४. स्वभावें गाईन। आवडीनें तुझें नाम ॥१॥

हाचि माझा निर्धार । न करी आणिक विचार ॥ २॥

लोळेन तुझिये आंगणीं । निर्लज्ज होउनि मनीं ॥३॥

रंगीं नाचेन मना ऐसें। पाहिन श्रीमुख सरिसें ॥४॥

सेना म्हणे संकल्प जीवा । हाचि निर्धार हेवा ॥५॥

 

८५. मान करावा खंडण। दुर्जनाचा सुखें करून ॥१॥

लारथा हाणुनि घाला दुरी। निंदकासी झडकरी ॥२॥

त्याचा जाणावा विटाळ। लोकां पिडीतो चांडाळ॥३॥

त्याची संगती जयास । म्हणे नर्कवास ॥४॥

 

८६. हंबरोनि येती। वत्सा घेनु पान्हा देती ॥१॥

तुम्ही करावा सांभाळ । माझा अवघा सकळ॥२॥

विसरली भूकतान। तुमचे देखिल्या चरण ॥३॥

सेना म्हणे प्रेम भातुकें । द्यावें आतां हे कौतुकें ॥४॥

 

८७. तुम्ही करा कृपादान। येइन धाऊन पायापें ॥१॥

घेईन संतांची भेटी। सांगेन सूखाचिये गोष्टी ॥२॥

जैसे माते पार्शी बाळ। सांगे जीवी, सकळ ॥३॥

सेना म्हणे हरे ताप । मायबाप देखुनी ॥४॥

 

८८. आजि फळा आले पुण्य। गेलें भेदोनि गगन ॥१॥

संत झालेति कृपाळ। माझा केलाजी सांभाळ ॥२॥

संचित वोळलें। तुमचीं देखिली पाउलें ॥३॥

सेना म्हणे नेणे । कृपा केली नारायणें ॥४॥

 

८९. उच्चारीत कोडे। नाम आबद्ध वांकुडें ॥१॥

मना आवडे त्यावेळीं । भलत्या काळी उच्चारी ॥२॥

कैसे नाम ठेवूं आतां। कोठे न मिळे पाहतां ॥ ३॥

सेना म्हणे आनंदे धालो । सुख लाधलों। परिपूर्ण ॥४॥

 

९०. असाल तेथें नामाचे चिंतन। याहूनि साधन आणिक नाहीं ॥१॥

सोडवील माझा भक्ताचा कैवारी। प्रतिज्ञा निर्धार केला आम्ही ॥२॥

गुण दोष याती न विचारी कांहीं। धांवे लवलाही भक्तकाजा ॥३॥

अवघे काळीं वाचे म्हणा नारायण। सेना म्हणे क्षण जाऊं नद्या॥४॥

 

९१. अंगिकार केला। भार चालवी विठ्ठला ॥१॥

संतीं सांगितलें । तें म्यां हृदयीं धरिलें ॥२॥

तारिला अजामिळ। महा पापी की चांडाळ ॥३॥

पतितपावन। करी नाम हे जतन ॥४॥

वागवी अभिमान । सेना न्हवी यातिहीन ॥५॥

 

९२. ऐशी आवडी आहे माझ्या जीवा । तुजसि केशवा निवेदिलें। ॥१॥

पांडुरंगा ऐसें वाटतसे जीवा । करिन संतसेवा अहन्निशी ॥२॥

नलगे वित्त गोत वैकुंठी राहणें । साज्युता सदनीं चाड नाहीं ॥३॥

करुणास्वरें सेना बहात विठ्ठला । हेतु पुरविला आवडीचा ॥४॥

 

९३. करितां देवपूजा। नित्य नेम सारिला वोजा। मग आठविलें अधोक्षजा। ध्यानस्थ बैसलों ॥१॥

दूत आले लवलाही। राये बोलाविलें पाहीं। कोठें आहे मज दावी । उरी न ठेवी याची कांहीं ॥२॥

जाणुनि संकट श्रीहरी । धोकटी घेतली खांद्यावरी । त्वरें आला राजदरबारी । देखुनि हरी क्रोध निमाला ॥३॥

राया सन्मुख बैसून । हातीं दिधलें दर्पण । मुख पाहे विलोकून । मूर्ती दिसे चतुर्भुज ॥४॥

हात लाविला मस्तका। वृत्ती हरपली देखा । राम म्हणे प्राणसखा । नित्य भेटे मजलागी ॥५॥

मग केलें तेलमर्दन। घाटी बिंबला नारायण। विसरला कार्य आठवण । वेधलें मन रूपासी ॥६॥

भोंवतां पाहे विलोकून । अवघा बिंबला नारायण। तटस्थ पाहती सभाजन। नाहीं भान रायासी ॥७॥

राव म्हणे हरीसी । तुम्हीं रहावे मजपाशीं। तुजविण न गमे दिवसनिशीं । हरी म्हणे भाकेसि न गुंतें मी।॥ ८॥

मग प्रधाने काय केलें। राया स्नानासी पाठविलें। रायें सोने दिधलें । हरीने ठेविलें धोकटींत ॥ ९ ॥

शुद्ध नाहीं याती। नाही केली हरिभक्ति। शिणविला कमळापती। नाहीं विरक्ति बाणली अंगीं ॥ १० ॥

नाहीं अपराधा गणीत । देखोनि सोने ब्राह्मणा देत। देवास घाली संकटांत। आण वाहत विठोबाची ॥ ११ ॥

सेना म्हणे ऋषीकेशी । मज कारणें शिणलासी। म्हणूनि लागलों चरणासी। संसारासी त्यागिलें ॥ १२ ॥

 

९४. करिता नित्य नेम । रायें बोलाविले जाण ॥१॥

पांडुरंगें कृपा केली । राया उपरती झाली॥२॥

मुख पाहतां दर्पणीं। आंत दिसे चक्रपाणी ॥३॥

कैसी नवलपरी । वाटीमाजी दिसे हरी रखुमादेवीवर । सेना म्हणे मी पामर ॥४॥

 

९५. म्हणवितों दास । तरी सांभाळी ब्रिदास ॥१॥

शुद्ध नाहीं भाव। तूं जाणशी पंढरीराव ॥२॥

केलेंसे जतन। धोकटी आरसाची जाण ॥३॥

करितो व्यवसाव। माझ्या जातीचा स्वभाव ॥४॥

सेनां करितो विनवणी । हात जोडूनिया दोन्ही॥५॥

 

९६. चिंतन चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥

उन्मनी सुखांत। पांडुरंग भेटी देत ॥२॥

ऐसा आहे श्रेष्ठाचार। वेद शास्त्राचा निर्धार ॥३॥

कवटाळूनि पोटी । सेना म्हणे सांगूं गोष्टी ॥४॥

 

९७. पांडुरंग दास । म्हणती सांभाळी ब्रीदास ॥१॥

नाहीं भाव आंगीं। भूषण मिरवितो जगीं ॥२॥

व्रत आचरण । नाहीं केलें तुझें ध्यान ॥३॥

स्थिर नाहीं मन । सदा विषयाचें ध्यान ॥४॥

सेना आहे अपराधी। सांभाळावें कृपानिधी ॥५॥

 

९८. स्तुति करूं ऐसा नाहीं अधिकार। शिणला फणिवर वर्णवेना ॥१॥

तेथें मी सरता होईन कैशापरी। वर्णावया हरी कीर्ति तुझी॥२॥

आठराही भागले सहाही शीणले । चाऱ्ही राहिले मौन्यची ॥३॥

रुक्मादेवीवरें अंगिकार केला। निवांत राहिला सेना न्हावी ॥४॥

 

९९. वेद वर्णिता शीणला। मग मौन्यची राहिला ॥१॥

तेथें माझी वैखरी। कैशी पुर्ण पावे हरी॥२॥

नेणती गोरा कीं सावळा। त्याचि न कळेचि लीला॥३॥

हा सगुण की निर्गुण । गुणातीत परिपूर्ण ॥४॥

माथा ठेऊनि चरणीं सेना पाहे विलोकुनी ॥५॥

 

१००. धन्य धन्य दिन। तुमचे झाले दरुषण ॥१॥

आजि भाग्य उदया आलें। तुमचें पाऊल देखिलें ॥२॥

पूर्व पुण्य फळा आलें। माझें माहेर भेटलें ॥३॥

सेना म्हणे झाला। धन्य दिवस आजि भला ॥४॥

 

१०१. माझें अंतरीचें । जाणें पांडुरंग साचें ॥ १॥

जीवभाव त्याचे पायी। ठेउनी कांहीं न मागों ॥२॥

सुख संत समागम। घेऊ नाम आवडी ॥३॥

सेना म्हणे चुकलों साचें । आणिक वाचे न सेवी ॥४॥

 

१०२. देई मज जन्म देवा। करीन सेवा आवडी ॥१॥

करीन संतांचें पूजन । मुखीं नाम नारायण ॥२॥

असो भलते ठायीं । सुख दुःखा चाड नाहीं ॥३॥

मोक्षं सायुज्यता । सेना म्हणे जिवा चित्ता ॥४॥

 

१०३. नाम साधनाचे सार। भवसिंधु उतरी पार ॥१ ॥

तिहीं लोकीं श्रेष्ठ । नाम वरिष्ठ सेवी हें ॥२॥

शिवभवानीचा। गुप्त मंत्र आवडीचा ॥३॥

सेना म्हणे इतरांचा । पाड कैचा मग येथें॥४॥

 

१०४. त्रैलोक्य पाळतां । नाहीं उबग तुमच्या चित्ता ॥ १ ॥

तया आमुची चिंता। नसे काय रुक्मिणीकांता ॥२॥

दर्दर राहे पाषाणांत। तया चारा कोण देत ॥३॥

पक्षी अजगर । तया पाळी सर्वेश्वर ॥४॥

सेना म्हणे पाळुनी भार। राहिलों निर्धार उगाची ॥५॥

 

१०५. म्हणवितो विठोबाचा दास। शरण जाईन संतास ॥१॥

सदा सुकाळ प्रेमाचा। नासे मळ दुष्ट बुद्धीचा ॥२॥

ऐकत हरिचें कीर्तन । अभक्ति भक्ति लागे ज्ञान ॥३॥

उभा राहे कीर्तनांत । हर्षे डोले पंढरीनाथ ॥४॥

सेना म्हणे हें सुख । नाहीं ब्रह्मयासी देख ॥५॥

 

१०६. आम्ही वारीक वारीक। करूं हजामत बारीक ॥ ५॥

विवेक दर्पण आयना दाऊं। वैराग्य चिमटा हालऊं ।॥२॥

उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळूं ॥३॥

भावार्थाच्या बगला झाडूं । काम क्रोध नखें काढू ॥४॥

चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत ॥५॥

 

१०७. स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया ॥१॥

पंढरीचें सुख देखोनी नयनी। करिती विनवणी जोडुनी हात ॥२॥

चारी मुक्ति तेथें हिंडती दीनरूप । येऊं नेदी समीप कोणी तया ॥३॥

धिक्कारुनी तया घालिती बाहेरी। मागुती पायावरी लोळताती ॥४॥

वैष्णव शरण येती काकुळती। आमुची ती गती काय सांगा ॥५॥

या सुखाचा थेंबुटा नमी ब्रह्मादीकां । तेथें देखा सरता झाला॥६॥

 

१०८. सुखें घालीं जन्मासी । हेचि बरें की मानसीं ॥१॥

वारी करीन पंढरीची। जोडी साची ही माझी ॥२॥

हरिदासाची करीन सेवा । तेणे सुख फार जीवा ॥३॥

सेना म्हणे सर्व संग । केला त्याग यासाठीं ॥४॥

 

१०९. ही माझी मिरासी। पांडुरंग पायापासी ॥१॥

करीन आपुलें जतन । वागवितों अभिमान ॥२॥

जुनाट जुगादीचें । वडिलें साधियेलें साचें ॥३॥

सेना म्हणे कमळापती। पुरातन हे माझी वृत्ती ॥४॥

१२ समाधी

११०. स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचें गुज होतें कांहीं ॥१॥

करा हरीभजन तराल भवसागर उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥

कृपा नारायणे केली मजवरी । तुम्हालागीं हरी विसंबेना ॥३॥

सेना सांगूनियां जातो वैकुंठासी। तिथि ते द्वादशी श्रावणमास ॥४॥

 

१११. माझे झाले स्वहित । तुम्हा सांगतो निश्चित ॥१॥

करा हरीचे चिंतन। गांव उत्तम हे गुण ॥२॥

श्रावण वद्य द्वादशी । सेना समाप्त त्या दिवशी ॥ ३॥

 

१४ त्रिंबकमाहात्म्य.

 

११२. पुण्यभूमी गंगातीरीं । धरी अवतार त्रिपुरारी। नाम त्रिंबक निर्धारी । मागें ब्रह्मगिरी शोभत ॥१ ॥

पार्वतीसी सांगे कैलासराणा । येथे नांदेल निवृत्ति निधान। त्याचेनि ठाव हा पुण्यपावन । जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती ॥२॥

जुनाट जुगादीचें गुप्त ठेविलें। तेचि निवृत्ति नाथा दिधलें। ज्ञानदेवें प्रगट केलें। जगा दाविलें निधान ॥३॥

या भूमिकेचें वर्णन । करें न शके चतुरानन । कैलासाहून पुण्यपावन । तुजला पूर्ण सांगितलें ॥४॥

तो हा निवृत्तिनाथ निर्धारी। स्मरतां तरती नरनारी। सेना म्हणे श्रीशंकरी ॥ ऐसे निर्धारी सांगितले ॥५॥

 

११३. शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥

तया माझा नमस्कार। वारंवार निरंतर ॥२॥

सव्य नांदे कैलासराणा । मागे गंगा ओघ जाणा ॥३॥

सेना घाली लोटांगण । वंदि निवृत्तिचे चरण ॥४॥

 

११४. निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरेची ॥१॥

जप करितां त्रिअक्षरीं । मुक्ती लोळे चरणावरी ॥२॥

ध्यान धरितां निवृत्ती। आनंदमय राहे वृत्ती ॥३॥

सेना म्हणे चित्तीं धरा। स्मरता चुके येरझार ॥४॥

 

११५. सिद्धांमाजी अग्रगणी । तो हा भोळा शुळपाणी॥ १॥

धन्य धन्य त्रिंबक राजा। तया नमस्कार माझा ॥२॥

जटी गंगा वाहे। तो हा त्रिगुणात्मक पाहे ॥३॥

भोंवता वेढा ब्रह्मगिरी। मध्यें शोभे त्रिपुरारी ॥४॥

सेना घाली लोटांगण । उभाहर के जोडुन ॥५॥

 

१६. धन्य धन्य निवृत्तिराया । शरण आले तुझियां पायां॥१॥

नको पाहूं दुसरें आतां। गुण दोषाची वार्ता ॥२॥

नाहीं माझा अधिकार । यातीहीन मी पामर ॥३॥

अपराधाचा केलों। सेना म्हणे काय बोलो ॥४॥

 

१५ आळंदीमाहात्म्य.

 

११७. पुण्यभूमी आळंकावती। प्रत्यक्ष नांदे कैलासपती। आणि सिद्ध साधकां वस्ती । ब्रह्मा अमरपती आदिकरुनी ॥ १॥

ऐका अळंकापुरीची मात । स्वयें वर्णीत श्रीभगवंत । उपमेसि न पुरे  निश्चित । वैकुंठ आदिकरुनी ॥२॥

येथे तिन्ही मूर्ति अवतार । धरुनि करिती जगाचा उद्धार। मुळ अदि माया साचार । दही अवतार मुक्ताबाई ॥३॥

या चौघांचे स्मरणी । महापापा होय धुणी । येऊनि मुक्ती लागती चरणीं । ऐसें चक्रपाणी सांगत ॥४॥

नामया सांगे जगज्जीवन । या भूमीचें न करें वर्णन । सेना घाली लोटांगण। वंदी चरण ज्ञानदेवाचें ॥ ५॥

 

११८. धन्य अलंकापुर धन्य सिद्धेश्वर । धन्य ते तरुवर पशुपक्षी ॥१॥

धन्य इंद्रायणी धन्य भागीरथी। तेथे स्नान जे करिती धन्य जन्म ॥२॥

धन्य ते प्रयाग धन्य ते त्रिवेणी । वहाती येऊनि गुप्तरूपें ॥३॥

धन्य ते भूमी धन्य ते प्राणी । देखती नयनीं ज्ञानदेवा ॥४॥

धन्य ते भाग्याचे होती अळंकापुरी। तयाचा निर्धारी धन्य वंश ॥५॥

धन्य दासानुदास अळंकापुरीचा। सेना न्हावी त्याचा रज:कण ॥६॥

 

११९. नामयाच्या नारायणें घेतली आळी । या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी ॥१॥

धन्य धन्य अलंकापुर धन्य धन्य सिद्धेश्वर । धन्य इंद्रायणि तीरीं राज्य करी ज्ञानेश्वर ॥२॥

या भूमीचें वर्णन करूं न शके चतुरानन। महा क्षेत्र पुरातन पातकें नासती स्मरणे ॥३॥

सेना म्हणे जगज्जीवन सांगतसे जीवींची खूण । महा दोषा होय दहन ज्ञानदेव दरुशनें ॥४॥

 

१२०. नाम हें अमृत भक्तासी दिधलें । ठेवणें ठेविलें होतें गुप्त ॥१॥

प्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी। मार्ग तो निर्धारी दाखविला ॥२॥

कृतयुगामाजी वरिष्ठ जाणता। नाम तो घेतां नारद मुनि ॥३॥

कलियुगामाजी न घडे साधन। जातील बुडोन महा डोहीं ॥४॥

रामकृष्ण हरी गोविंद गोपाळ। स्मरा वेळोवेळां सेना म्हणे ॥५॥

 

१२१. धन्य महाराज अलंकापुरवासी। साष्टांग तयासी नमन माझें ॥ १॥

या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें । उद्धरती तयाचें सकळ कुळे ॥२॥

इंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा । तुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥

सेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें। ज्ञानदेव दरुशनें मुक्त होती॥४॥

 

१२२. वाचे उच्चारी जो ज्ञानदेवाशी । तयाच्या सुकृतासी नाहीं पार ॥१॥

पूर्वीचे सुकृत फळासि आलें। वाचें उच्चारिलें ज्ञानदेवा ॥२॥

या अलंकापुरीं आला जन्मांसि । पूर्वज तयासी मानिती धन्य ॥३॥

सेना म्हणे त्यानें उद्धरिलें कुळ। पूर्वज सकळ आशिर्वाद देती॥४॥

 

१२३. येउनी नरदेहासी वाचे उच्चारी ज्ञानेश्वर । तयाचा संसार सुफळ झालागे माये ॥१॥

प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी । तारिलें जगासी नाममात्रें ॥ २॥

जयाचें आंगणीं पिंपळ सोनियाचा । सिद्ध साधकाचा मेळा तेथें ॥३॥

तयाचे स्मरणें जळती पातकें| सांगत पंढरीनाथ सेना म्हणे ॥४॥

 

१२४. विष्णूचा अवतार। सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥

चला जाऊं अळंकापुरा। संतजनाच्या माहेरा ॥२॥

स्नान करितां इंद्रायणी। मुक्तां लागती चरणीं ॥३॥

ज्ञानेश्वराच्या चरणीं । सेना आला लोटांगणीं ॥४॥

 

१२५. गिरजेप्रती शंकर उपदेशिले। तो गुह्य मंत्र सप्त समुद्रापलीकडे ॥१॥

ऐसें निज गुज साराचेंही सार। उघडे दाविलें साचार ज्ञानदेवें ॥२॥

हे सुखाचें सुख साधन। भक्तिज्ञानाचें अंजन । हेचि परब्रह्म जीवन ॥३॥

हेंचि मुख निज राममंत्र सार । सुलभ साकार सेना ध्याये निरंतर ॥४॥

 

१२६. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारूं । उतरील पैल पारूं ज्ञानदेव ॥१॥

ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता । तोडील भवव्यथा ज्ञानदेव ॥२॥

ज्ञानदेव माझे सोयरे धायरे । जिवलग निरधरि ज्ञानदेव ॥३॥

सेना म्हणे माझा ज्ञानदेव निधान । दाविली निजखूण ज्ञानदेव ॥४॥

 

१२७. अळंकापुरवासिनी। ज्ञानाबाई मायबहिनी ॥१॥

लेकुराची चिंता। वागवावी कृपावंता ॥२॥

मी तो राहे यातीहीन । माझा राखा अभिमान ॥३॥

करूनि विनवणी । सेना लागतो चरणीं ॥४॥

 

१२८. श्रीज्ञानराजें केला उपकार । मार्ग हा निर्धार दाखविला ॥१॥

विटेवरी उभा वैकुंठनायक। आणि पुंडलिक चंद्रभागा ॥२॥

अविनाश पंढरी भूमीवरी पेंठ । प्रत्यक्ष वैकुंठ दाखविलें ॥३॥

सेना म्हणे चला जाऊं तया ठाया। पांडुरंग सखया भेटावया ॥४॥

 

१६ सासवडमाहात्म्य

 

१२९. नामयाचा धरूनि हात। सांगे संवत्सराची मात। विठोजि म्हणे देई चित्त । ऐक गुह्यार्थ सांगतो ॥१॥

ही पुण्यभूमी पवित्र देखा । याची मूळ आदि पीठिका। सिद्धेश्वर नागेंद्र देखा । पुरातन नांदती ॥२॥

या इंद्रनील पर्वतीं तप तपिन्नले अमरपती। आणि सूर्यमूखा वरुती । प्रत्यक्ष मूर्ति श्रीशंकराची ॥३॥

ही स्मशानभूमिका आधीं। येथें सोपान देवा समाधी। पुढें राहिला कैलासनिधी। सन्मुख वाहे भागीरथी ॥४॥

इची करितां पंचक्रोशी। चुके जन्ममरण चौऱ्यांशी । चारी मुक्ती होती दासी। येउनि चरणासी लागती ॥५॥

तो हा सोपान निधान । याचे करितां नामस्मरण। सेना कर जोड़ून । जाती जळून महादोष ॥६॥

 

१३०. वाचे सोपान म्हणतां । चुके जन्ममरण चिंता ॥१॥

वस्ती केली कनहे तीरीं। पुढें शोभें त्रिपुरारी ॥२॥

सोपानदेव सोपानदेव । नाहीं भय काळाचें ॥३॥

सोपान चरणी ठेउनि माथां । सेना होय विनविता ॥४॥

 

१३१. ब्रह्मियाचा अवतार । तो हा सोपान निर्धार ॥१॥

याचे घेतां मुखीं नाम । हरे सकळही श्रम ॥२॥

समाधीपासुनी भागीरथी । स्नानालागी नित्य येती ॥३॥

अष्टोत्तर तीर्थाचा मेळा । नाम कऱ्हाबाई वेल्हाळा ॥४॥

वैष्णवांमाजी डिंगर । सेना तयाचा किंकर ॥५॥

 

१३२. वैकुंठवासिनी कृपावंत माउली। जगा तारावया अळंकापुरा आली ॥१॥

शिव तो निवृत्ति आदिमाया मुक्ताई। ब्रह्मा तो सोपान विष्णु ज्ञानदेव पाहीं ॥२॥

येउनी प्रतिष्ठानी पशुवेद बोलविला । पंडित ब्रह्मज्ञानी यांचा गर्व हरिला ॥३॥

तप्तीतीरवासी चौदाशे वर्षांचा होता । तयाचा अभिमान गर्व हरी आदिमाता ॥४॥

वाळितां ब्राह्मणीं स्वर्गाचे पितर आणविले। सेना म्हणे जगीं पूर्णब्रह्म अवतरलें ॥५॥

 

१७ वासुदेव

 

१३३. वासुदेव टळोनि गेले प्रहर तीन । काय निजतां झांकोन लोचन आलों मागावया दान । नका विन्मुख होऊं जाण गा ॥१॥

रामकृष्ण वासुदेवा। जाणवितो सकल जिवा। द्या मज दान वासुदेवा। मागुता फेरा नाहीं या गांवा गा ॥२॥

आलों दुरुनी सायास। द्याल दान मागायास। नका करू माझी निरास । धर्मसार फळ संसारास गा ॥३॥

एक भाव देवाकारणें। फारसे नलगे देणें घेणें। करा एकचित्त रिघा शरण । हेंचि मागणें तुम्हांकारणें गा ॥४॥

नका पाहू काळ वेळां । दान देई वासुदेवा। व्हां सावध झोपेला। सेना न्हावी चरणी लागला गा ॥५॥


https://www.krushikranti.com/

संत सेना महाराज अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *