संत जनाबाई अभंग – थालीपाक
३१८
थालीपाक ऐकतां । हरि वारी जन्मव्यथा ।। १ ।।
दुर्योधनाच्या घरासी । आला दुर्वास हो ऋषी।।२।।
सेवें बहुत तोषविला वर माग तूं इच्छिला ||३||
शिष्यांसह रानीं जायें। इच्छाभोजन मागावें ।।४।।
नंतर शाप द्यावा । आतां जातों वर द्यावा ॥५॥
हर हर शब्द थोर केला झाला वनांत गलबला ॥ ६ ॥
नवल सर्वासी वाटलें जनी म्हणे ऋषी आले।।७।।
३१९
मध्यरात्रीं ऋषिसहित वना आले अकस्मात ।।१।।
पंडुसुत जागे झाले ऋषि समस्त वंदिले । २शा
धर्म भीमाकडे पाहे । सत्त्वहानि होत आहे।।३।।
द्रौपदीनें धांवा केला देव जेवितां उठिला ||४||
ऋषि तृप्त केले वनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥
हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग
३२०
करचरण प्रक्षाळुनी उभी ठेली वृंदावनीं ।। १ ।।
जोडोनियां करकमळ म्हणे धांवरे गोपाळ ॥२॥
कृष्णा पाहतोसी काय । सत्त्वहानि होत आहे ॥३॥
ऋषि स्नानासी कोपिष्ट गेले सांगोनियां स्पष्ट । । ४ । ।
दिवसा कर्माचा उगाणा सर्व सारोनियां जाणा।।५।।
आतां येतो शीघ्र गती अत्रे वाढा पात्रावरुती ॥६॥
अन्न न देखतां डोळां । भस्म करीन सकळां ॥७॥
गेला घालोनि संकटीं लाज राखें जगजेठी।।८।।
कोणी नाहीं रे निर्वाणीं म्हणे नामयाची जनी ॥ ९॥
३२१
वाट विस्तारी रुक्मिणी देव बैसले भोजनीं ।।१।।
इतुक्यामध्यें अकस्मात । ध्वनि उमटला कानांत ॥२॥
धांवा ऐकतां श्रवणीं ताट लोटी चक्रपाणी।।३।।
उठिला खडबडोनि कैसा पावे बहिणीचिया क्लेशा ।।४।।
उभी वृंदावनी बाळा । पुढें देखिला सांवळा ॥५॥
मुगुट कुंडलें मेखळा । वैजयंति वनमाळा ॥६॥
शंख चक्र आयुधे करीं। दिसे घवघवीत हरी ।।७।।
झळके पीतांबर कासे नयनीं कोंदला प्रकाशे ।।८।।
पाहतां आनंदली मनीं म्हणे नामयाची जनी।।९।
३२२
रत्नाचे मंचकी पहले चक्रपाणी चोळीत रुक्मिणी चरणांबुज ।।१।।
कानीं पडियेले द्रौपदीचे बोल । उठे घननीळ तांतडीनें ॥ २॥
रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्ट पडिलें संकटीं तान्हें माझें ॥३॥
टाकिला गरुड अनवाणी पाय । जनी म्हणे माया धांविन्नली ॥४॥
३२३
दोनी श्रीकृष्णचरण हरुष घाली लोटांगण ॥१॥
म्हणे तूंचि माझ्या मना । स्वस्थ करीं गा नारायणा ॥ २ ॥
आश्रमासी येतां ऋषि तोंवरी आयुष्य प्राणासी ॥३॥
ऐकतांचि हांसे देवा न दिसे प्राप्तीचा उपाय ॥४॥
अवकाळी केर्चे अन विचारितां दिसे विघ्न॥५॥
त्यांचें असो बळ तैसें कांहीं वोपायें आम्हांस ॥६॥
स्वस्थ नव्हे माझें मन । क्षुधा लागली दारुण॥७॥
ताटीं विस्तारिला मेवा तुझा ऐकोनियां धांवा ॥८॥
न जेवितां आलों येथें। बहु झालों क्षुधाक्रांत ॥१॥
सत्वर मेळवीं भोजनी म्हणे नामयाची जनी ।।१०।।
३२४
हांसें आलें द्रौपदीसी बापा वचन परियेसी ||१||
सर्व अरिष्ट भंजना तुजलागीं वाहो कोणा ||२||
एक भाव तुझे पाय यावेगळें कांहीं नाहीं ॥३॥
थाळीमाजीं पाहतां अन्न होय क्षुधेर्चे हरण ||४||
थाळी दाखवी देवासी कैंचा विश्वास तुजसी ||५॥
जितां करें बहुते किंचित शाखा निर्मा ||६॥
कैवल्याचा दानी। म्हणे नामयाची जनी ॥७॥
३२५
कर पसरिला भगवंतें। घाली द्रौपदी देंठाते।॥१॥
म्हणे पावो विश्वंभर बोले द्रौपदी सुंदर ||२||
देतां तृप्तीचा टेंकर थालें त्रैलोक्य अपार ||३||
दावी कौतुक श्रीपती पर्वत अन्नाचे पाहाती ॥४॥
उष्ण घवघवीत कैसी वाफां उठती आकाशीं ॥५॥
नाना परिचीं दिव्या डोळां दावी नारायणें ॥६॥
चोज सर्वांचिया मनीं म्हणे नामयाची जनी ॥७॥
३२६
येरीकडे गंगातीरीं। कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥
धर्मासहित साहीजण ऋषिलागी देती अन्न ॥२॥
रत्नखचित मंडपा आंत पंगती बैसल्या आनंदभूत || ३॥
नानापरिचें दिव्य अन्न वादी द्रौपदी आपण||४||
मिठी पडली वदनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥
३२७
म्हणती माथां असतें तोंड अत्रें भक्षितों उदंड ॥ १॥
कैची पोटें आमुर्ची लहान गोड धर्माधरचें अन्न ||२||
उदरें सागराच्या ऐसी करुनी यावें धर्मापाशीं ॥ ३॥
तृप्ति द्रौपदीच्या हातें । नित्य भक्षाया अन्नातें ||४||
वदन करवेना तळीं । वरुती चंद्राची मंडळी ॥५॥
तंद्री लागलीसे नेत्रा। कोण सांभाळितें धोत्रा ॥६॥
तरी आवडी भोजनीं । म्हणे नामयाची जनी ॥७॥
३२८
ऐशा या पंक्ती टैंकर आनंदाचे देती।।१।।
तृप्ति वागली सर्वांसी । तरी आवड अन्नापाशीं ॥२॥
उठले हात प्रक्षाळुनी। विडे घेतले सर्वांनी ॥ ३॥
न बैसवे सुखासनीं । अवघे प्रवर्तले शयनीं ।।४।।
ते देखोनि निद्रिस्त । साही जणें झालीं गुप्त ।।५॥
माया निर्मियेली जैसी आतां गुप्त झाली तैसी ॥६॥
कोणा न कळे याची करणी म्हणे नामयाची जनी ॥७॥
३२९
म्हणे पाचारा भूदेवा धर्म म्हणे जावें भीमा ।।१।।
गंगातिरासी येऊन । नमियेले ऋषिजन ॥२॥
त्वरा करा ऋषिजन । पात्रीं विस्तारलें अन्न ।। ३॥
म्हणती बापा ऐसें नव्हे पोट आहे किंवा काय ।।४।।
आतां स्वस्थ प्रसादें तृप्त झाली ऋषिदें||५||
कैचा नष्ट दुर्योधनें आम्हां धाडिलें दुर्जनें । ॥६॥
कही करितां अंबऋषी । चक्र लागलें पाठीसी।।७।।
तेचि गोष्टी झाली आतां। शीघ्र पळावें तत्त्वतां ।।८।।
माझा आशीर्वाद धर्मा नित्य कल्याणचि तुम्हां ।। ९।।
ऋषि निघाले तेथुनी । म्हणे नामयाची जनी ।। १० ।।
३३०
ऐशापरी पांडवांतें । रक्षियेलें दीनानार्थे ।। १ ।।
शंखचक्र आयुधें करीं। छाया पितांबर करी।।२।। हस्त
ठेऊनियां माथां । सुखी असा निर्भय चित्तां ।।३।।
आज्ञा घेउनी सर्वांची। देव गेले द्वारकेसी ||४||
सरला थालिपाक आतां। पुढें सावधान श्रोता ।।५।।
कथा पुढील गहन। घोषयात्रा निरूपण ॥ ६॥
येथुनी अध्याय कळस । जनी म्हणे झाला रस।।७।।
३३१
ऐसा योग घडे ज्यातें धन्य माता आणि तात ।।१।।
अखंड वासना। ब्रह्मार्पण देवार्चना ||२||
ब्रह्मभावें हो देवा । ऐसा पूजी जो भूदेवा ।।३।।
नम्रता चरणीं । म्हणे जनी सरली मनीं ॥४॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या