अभंग गाथा

संत भागूबाई अभंग

संत तुकाराम महाराजांची मुले त्यांच्या निर्वाणसमयी अल्पवयीन होती. त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या संस्कारांना ती काहीशी मुकली असावीत. तसेच वडिलांच्या पश्चात २५ वर्षे ती आपल्या आजोळी होती. त्यामुळे वडिलांची कीर्ती ऐकण्या व्यतिरिक्त त्यांच्या वाट्याला फारसे काही आले नसावे. असे वाटते. तथापि त्यांनी काही अभंगरचना केली असावी असे तुकारामतात्या संपादित ‘ श्री तुकोबाराम बाबांचे बंधू कान्होबा, मुलगी संत भागूबाई आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगांची गाथा ’ यातील अभंगावरून दिसून येते. या संपादनात संत तुकाराम महाराजांची कन्या भागूबाईचे दोन अभंग आले आहेत. या अभंगांत विठ्ठलभेटीची तिची तळम्ळ स्त्रीसुलभ भाषेत व्यक्त झाली आहे. वात्सल्यभावातून केलेली ही भक्ती तिच्या स्त्रीमनाचे दर्शन घडवते. ती विठ्ठलाला आळवताना म्हणते,

मी रे अपराधी मोठी । मज घालावें बा पोटीं ।
मी तान्हुलें अज्ञान । म्हणू का देऊ नये स्तन ॥
अवघ्या संतां तूं भेटसी । मी रे एकली परदेशी ॥
भागू म्हणे विठोबासी । मज धरावें पोटासी ॥

’ यातील ‘ तान्हुले ’, ‘ स्तनपान ’, ‘ परदेशी ’ ( सासरी ) या शब्दप्रतिमा स्त्रीसुलभ मनाच्या निदर्शक ठरतात. दुसर्‍या अभंगात संतसंगाए माहात्म्य ती पारंपारिक पद्धतीने वर्णन करताना म्हणते,

साधूचा संग धरीरे । श्रीहरी स्मरणीं रंगली वाणी ॥
भक्ती धरी दृढ, काम त्यजी रे । साधूचा संग धरीरे ॥
मायाजाळे हें मृगजळ पाहे । गुंतसी परी गती नाही बरीरे ॥
दुस्तर डोहीं बुडसी पाही । तारूं हें विठ्ठलनाम धरी रे ॥
कीर्तनरंगी होसी अभंगीं ॥ भागु बघ तुज नमन करी रे ॥

अभंग ही तत्कालीन पारमार्थिक जीवनाची अभिव्यक्ती होती.  अभंगात बोलल्याशिवाय आपल्याला प्रकट होता येत नाही, अशीच त्यावेळची धारणा दिसून येते. संत भागूबाई चे हे दोनच अभंग अशा प्रेरणेतून निर्माण झाले आहेत.


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: transliteral