संत कर्ममेळा अभंग गाथा – एकूण २७ अभंग
अखंड तें मन ठेवलें चरणीं ।
आणिक तें ध्यानीं आहे माझे ॥१॥
गोड गोजिरी विठोबाचीं पाउलें ।
सुखें म्यां ठेविलें मस्तकासी ॥२॥
वायां तोंडपिटी करा कशासाठी ।
तुमची तो रहाटी कळों आली ॥३॥
कर्ममेळा म्हणे लोटांगण पायीं ।
मागणे तें देई हेंचि एक ॥४॥
आजिवरी धरली आस ।
परी मनीं झाली निरास ॥१॥
आतां शरण जाऊं कवणा ।
तुजविण नारायणा ॥२॥
दु:खसागरी लोटलें ।
कोण काढील वहिलें ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
देवा येऊं द्या कळवळा ॥४॥
संत कर्ममेळा अभंग – ३
आणिक वासना नाहीं दुजी मना ।
संतचरणीं जाणा मस्तक हें ॥१॥
घालीन लोटांगण वंदीन पायधुळी ।
पूर्व कर्मा होळी होय तेणें ॥२॥
नामाची आवडी सर्वकाळ वाचे ।
दुजें साधनचि नेणें कांही ॥३॥
कर्ममेळा म्हणे ही माझी वासना ।
पुरवा नारायणा सर्वभावें ॥४॥
संत कर्ममेळा अभंग – ४
आतां येथवरी ।
मज नका बोलूं हरी ॥१॥
तुमचें आहे तुम्हा ठावें ।
माझें म्यांच करावें ॥२॥
आमुच्या संचिता ।
तुम्हां बोल काय आतां ॥३॥
माझें मन मज ग्वाही ।
वायां बोलिनियां काई ॥४॥
कर्ममेळा म्हणे जाणा ।
तुमचें माझें नारायणा ॥५॥
संत कर्ममेळा अभंग – ५
आपण वाढवावें आपण बुडवावें ।
ऐसी रिती बरवें तुमचे घरीं ॥१॥
पाळिल्या पोसिल्या विसर पाडावा ।
समर्थाच्या नांवा लाज येते ॥२॥
रंक मी भिकारी उच्छिष्ठाचा अधिकारी ।
काय भीड हरि माझी तुम्हां ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीनिवासा ।
उगवा हा फांसा लवकरी ॥४॥
६
आमुचा बाप तुझा पोसणा ।
कां हो नारायणा विसरसी ॥१॥
धाकुटपणा मज म्हणियेंलें ।
आतां कां हो कठिण केलें ॥२॥
ब्रीद सांभाळी विठ्ठला ।
तरिच भलेपण तुला ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
देवा न विसरावें मला ॥४॥
आमुची केली हीन याती ।
तुज कां न कळे श्रीपती ॥१॥
जन्म गेला उष्टे खातां ।
लाज न ये तुमचे चित्ता ॥२॥
आमचे घरीं भात दहीं ।
खावोनी कैसा म्हणसी नाहीं ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
कासया जन्म दिला मला ॥४॥
८
आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी ।
म्हणोनी जेविलासे त्याचे घरीं ॥१॥
तेव्हां तुज काय उपवास होते ।
म्हणोनी सांगातें जेविलेती ॥२॥
तईचा तूंचि देवा झालासि पारिखा ।
आम्हां कां सारिखा न धरसी ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण ।
आमुची निजखूण दावीं देवा ॥४॥
९
आमुच्या बापाचें ठेवणें ।
कां तूं न देसी आम्हां कारणें ॥१॥
कैसी तुझी नीत बरी ।
मागतां शिणलों मी हरी ॥२॥
वाउग्या येरझारा ।
किती कराव्या दातारा ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरी ।
किती मागावें निर्धांरी ॥४॥
१०
आहेसी ठाउक मागां संतजनां ।
रिणाईत जाणा बहुतांचा ॥१॥
घेणें ज्याचें त्यास देणें नाहीं हरि ।
ऐसी हे परि जाणतसी ॥२॥
साजतसे तुम्हां थोर थोरपण ।
आमुचें कारण आम्हीं जाणों ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा ।
आपुला तो ठासा सांभाळावा ॥४॥
११
उचित अनुचित आमुचे भागासी ।
आलें ह्रषीकेशी वाटतसे ॥१॥
तुम्हांसी विसर पडियेलासे माझा ।
हें तंव केशीराजा कळलें मज ॥२॥
नागवें उघडें वागविलें खांदीं ।
म्हणोनी उपाधी सांडियेली ॥३॥
कर्ममेळा म्हणे नाम हें चांगलें ।
गोडा गोडावलें गोडपणें ॥४॥
१२
कशासाठीं पोसियेलें ।
हें तूं सांग बा विठ्ठलें ॥१॥
मज कोण आहे गणगोत ।
न दिसे बरी तुझी नीत ॥२॥
मोकलित दातारा ।
काय येते तुझे पदरा ॥३॥
म्हणे चोखियाचा कर्ममेळा ।
वोखटपण येईल तुला ॥४॥
१३
चोख्यासाठी देवें बहु नवल केलें ।
तयाचें खादलें भात दहीं ॥१॥
म्हणोनी ब्राम्हाणें बांधविला चोखा ।
सोडविलें देखा तुम्ही त्यासी ॥२॥
तयाचिया मागें आमुचा सांभाळ ।
कैसा तूं दयाळ करितोसी ॥३॥
कर्ममेळा म्हणे पंढरीरायातें ।
आतां आहे आमुतें कोण सांगा ॥४॥
जरी तुम्हां उबग आलासे दीनांचा ।
अभिमान कोणाचा कोणाकडे ॥१॥
तारुं जाणें उदक आपण वाढविलें ।
हें तुम्हां न कळे कैसें देवा ॥२॥
यापरि पोसणा तुमचे उच्छिष्टाचा ।
भार तयाचा तुम्हां झाला ॥३॥
कर्ममेळा म्हणे जोडोनी ठेविलें ।
तेंचि वहिलें मज देईं ॥४॥
१५
जें जें दिसें व्यापलें तें तें फलकट ।
वाउगा बोभाट करोनी काई ॥१॥
विश्वीं विश्वंभर संतांचें वचन ।
तेंचि प्रमाण मानूं आतां ॥२॥
नामाची आवडी परमार्थ रोकडा ।
नासे भव पीडा संसाराची ॥३॥
कर्ममेळा म्हणे सुलभ सोपारें ।
साच हेंचि खरें वर्म एक ॥४॥
१६
झालों परदेशी एकटा येकला ।
परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥
आतां बुझावण करणें तुम्हांसी ।
मी तो पायांपासी ठाव मागे ॥२॥
मोकलितां तुम्ही कोण पुसे मज ।
थोरीव सहज बुडालीसे ॥३॥
कर्ममेळा म्हणे आतां दंडवत ।
करा माझें हित तुम्ही दिवा ॥४॥
१७
तुमचा तो कळला भाव ।
माझा झाला पारखा ठाव ॥१॥
घेवोनी बैसलासी ठेवणें ।
माझे द्यावें मजकारणें ॥२॥
कायसा करिसी वादावाद ।
मुळींच खुण्टलासे भेद ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरि ।
तुम्हां मज नाहीं उरी ॥४॥
१८
तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां ।
तुम्हां मेघश्यामा न कळे कांहीं ॥१॥
हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी ।
हीनत्व आम्हांसी देवराया ॥२॥
गोड कधी न निळेचि अन्नें ।
सदा लाजीरवाणें जगामध्यें ॥३॥
तुम्हांसी आनंद सुखाचा सोहळा ।
आमुचे कपाळा वोखटपण ॥४॥
चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा ।
हाचि आमुचा ठेवा भागाभाग ॥५॥
१९
न कळे तुमचें महिमान ।
सलगी पायीं जाण करितसे ॥१॥
कमाविलें जेणें तेंचि देई मज ।
येवढेंचि काज माझें आहे ॥२॥
जाणीवा शाहाणीव नको भरोवरी ।
नेणतें मी हरि पोसणें तुमचें ॥३॥
कर्ममेळा म्हणे जीवींची निजखूण ।
दाखवा चरण तुमचे देवा ॥४॥
नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं ।
आमुचें आम्हां देई पांडुरंगा ॥१॥
समर्थ म्हणोनी धरितों पदरा ।
वाउगा पसारा दाऊं नको ॥२॥
ब्रीद बांधिलें कासया चरणीं ।
तें सोडी चक्रपाणी पांडुरंगा ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण ।
नको निर्वाण करूं आतां ॥४॥
२१
नेणता म्हणूनी चाळविसी मज ।
परी जीवीचें गुज कळेचिना ॥१॥
न कळे न कळे तुमचें मानस ।
मी तो कासाविस जीवें झालों ॥२॥
बोलतां न येचि बहुत प्रकार ।
प्रथमचि भार वागविला ॥३॥
कर्ममेळा म्हणे ऐक पंढरीराया ।
बोलियेलें वाया बोल नको ॥४॥
२२
पाळिलीं पोसिलीं तुमचिया नावें ।
तें वर्म ठावें झालें आतां ॥१॥
नष्ट क्रियमाण होसी तूंचि देवा ।
काय बा केशवा म्हणों तुज ॥२॥
विश्वाचा साक्षी असोनि वेगळा ।
तयासी लागला बोल देवा ॥३॥
कर्ममेला म्हणे तुमची हे नित ।
तुम्हासी उचित गोड वाटे ॥४॥
२३
बहु अपराध घडले मजसी ।
म्हणोनी तुम्हांसी पडली तुटी ॥१॥
आमुचें संचित जैसें जैसें आहे ।
तैसें तैसें होय आपेआप ॥२॥
तुम्हांसी हो बोल नाहीं नारायणा ।
आमुच्या आचरणा ग्वाही तुम्ही ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुम्हांसी बोल ।
वाया काय फोल वेंचूं देवा ॥४॥
२४
भरंवसा मानिला परी झाली निरास ।
म्हणोनी कासावीस जीवें झालों ॥१॥
बोलिल्या वचना तें कांही साचपण ।
नयेचि दिसोन अद्यापवरी ॥२॥
किती किती मन आवरूनी धरूं ।
कवणासी विचारूं पुसूं आतां ॥३॥
कर्ममेळा म्हणे कर्महीन माझें ।
भोगणें सहजें सहज असे ॥४॥
संतांची संगती आवडे या जीवा ।
आणिक केशवा दुजें नको ॥१॥
वाया हाव भरी होऊं नेदीं मन ।
राखा आवरोन तुमचें तुम्ही ॥२॥
कर्ममेळा म्हणे पंढरिनिवासा ।
परवावी आशा हीचि माझी ॥३॥
२६
साधनाच्या कांहीं न पडे कचाटीं ।
जावोनी कपाटी काय पाहूं ॥१॥
सुंदर श्रीमुख विटे जें शोभलें ।
कर मिरविले कटावरी ॥२॥
तो हा श्रीहरी उभा भिवरेतीरीं ।
भक्तां अभयकरी पालवितो ॥३॥
कर्ममेळा म्हणे सर्व सुखाचें आगर ।
तो हा विटेवर उभा असे ॥४॥
२७
सुख दु:ख दोन्हीं आमुचे पदरीं ।
पूर्वीच निर्धारी बांधियेली ॥१॥
आतां का वाईट म्हणो कशासाठीं ।
आपुली ती राहाटी भोगूं आम्ही ॥२॥
तुम्ही तो व्यापक सर्वांसी निराळें ।
आमुची कर्मफळें भोगूं आम्ही ॥३॥
कर्ममेळा म्हणे वचन प्रमाण ।
आमुची निजखूण कळली आम्हां ॥४॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: translitera