अभंग गाथा

कान्हो पाठक अभंग भावार्थ

संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – १.

गाये तो गाणुं नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ।।१।।
नव्हे तो संतु योगी ना भक्तु । जो लोकांतु डंव करी ||धृ||
पढे तो पढता उपलवी भक्ता । कवित्व करितां ख्याती लागीं ||३||
पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिकें । जंव जीव सात्त्विकें विनटेना ।।४।।

श्रीमंत श्री कानहोबा महाराज या अभंगातून संतांचे लक्षण व्यावृत्तीपूर्वक सांगतात.  संतांच्या बाबतीत समाजात फारच मोठा गैरसमज आहे. संतांविषयी अपार श्रद्धा मनामध्यें असल्यामुळे वास्तव संतांच्या देशात, वेषात, कृतीत असणाऱ्या कोणालाही संत मानले जाते. सर्व सामान्यांपेक्षा कांही वेगळेपण असले (गोधडी पांघरणें, उघडे अथवा गुहेत राहणे, मौन धरणे इ.) की त्यांना संत मानले जाते. वास्तविक संतत्व हा बाहेरून दिसणारा घटक नाही, तो अनुभवात्मक घटक असल्यामुळे संत ओळखण्याकरिता स्वतः संत असावे लागते. “तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण । तरीच महिमान येईल कळो ॥ ” महाराज स्वतः संत असल्यामुळे सामान्य श्रद्धावान समाज ज्यांना संत मानतो, त्याला ते संत कसे मानतील? म्हणून संत आणि असंत यांची निवड करून संत कोण आहे आणि संत कोण नाही याचे स्पष्टीकरण महाराज या अभंगातून करतात.

गाये तो गाणुं नाचे तो नाचणु । परिसे तो जाणु भेदवादी ||१||

कोणी एखादा सुंदर गात असेल, त्याला नैसर्गीक रित्या ताल, सूर, लय, गायनातील राग रागीणीचे ज्ञान आणि आवाजात गोडवा हे गुण असतील तर तो माणासालाच काय पण पशूलाही गायनाने मोहित करू शकतो. म्हणून तो संत होतो असे मात्र नाही. तर तो गायक आहे, संत नाही, तसेच नृत्याची कला प्राप्त असणारा, हाव-भाव, कटाक्ष या द्वारा लोकांना रंजवणारा हा नाचा असतो, संत नाही.

नव्हे तो संतु योगी ना भक्तु । जो लोकांतु डंव करी ||धृ||

खुप श्रवण करणारा हा बहुश्रुत आहे. तो भेदाला वास्तव मानणारा असल्यामुळे तो सिद्ध, संत, योगी अथवा भक्त नाही, तर तो लोकांमध्ये दंभ करणारा आहे, तोही संत नाही.

पढे तो पढता उपलवी भक्ता | कवित्व करितां ख्याती लागीं ॥३॥

शास्राभ्यास करणारा विद्वान असेल, तो लोकांना शास्त्र समाजावून सांगणारा पंडीत होईल, काव्य करणारा कवी होईल. तो स्वताःच्या प्रसिद्धीकरीता काव्य करीत असेल, परंतु तो संत नाही.

पाठक कान्हो म्हणे वरदळ लटिकें । जंव जीव सात्त्विकें विनटेना ।।४।।

ही सर्वच संतांची वरवरची, बाह्य लक्षणे धारण करणारे लबाड, धोकेबाज आणि ढोंगी आहेत. त्यांना संत समजून त्यांचे अनुकरण कोणीही करू नये. तुका म्हणे नाही निरसला देह । तबरी अवघे संसारिक || संतत्व तेव्हां प्राप्त होते, जेव्हां जीव, जीवपणाचा बळी देऊन परमात्म रूपाशी पूर्णतः ऐक्य पावतो, अर्थात् स्वतः परब्रह्मस्वरूप होतो. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- “ते चालते ज्ञानाचे बींव । तयाचे अवयव ते सुखाचे कोंब । येर मानुसपण ते भांब । लौकिक भागु ।।” तर वैराग्य राजरसिक जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात-“तुका म्हणे मिळे जिवाचिये साठी । नाहीतरी गोष्टी बोलू नये”।। त्यासाठी अंतःकरणांतील सत्वगुण बाढवून त्याद्वारे रजोगुण आणि तमोगुण यांना बाहेर काढून आणि आत्मज्ञानाने आपण गुणातीत होऊन स्वस्वरूपाशी जो एकरूप होतो तो संत आहे. असे कान्हुराज महाराज म्हणतात.


संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – २.

कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं । केली संसाराची होळी ।।१।।
पैका जमूनिया फार । पोशी दारा आणि कुमर ||२||
सदा निंदी साधुसंता । नेणे धर्म कर्म व्रता ||३||
कान्हो पाठक कथितो नर। अंती भोगी नरक घोर ॥४॥

मानवदेह मिळूनही जे त्याचा उपयोग करून घेत नाहीत, त्यांची निर्भत्सना महाराज या अभंगात करतात.

कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं । केली संसाराची होळी ॥१॥
पैका जमूनिया फार । पोशी दारा आणि कुमर ||२||

ज्यांना नरदेह मिळाला ते भाग्यवान आहेत, असे अनेक संतांनी शास्त्रांनी म्हटले आहे. “बडेभाग मानव तनु पावा । अथवा भाग्ये आलेती मनुष्य देहा ।। अथवा भरतखंडी नरदेह प्राप्ती । हे परम भाग्याची संपत्ती ||” कारण हा देह दुर्लभ आहे. “नरदेह दुर्लभ जाणा ।” यामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. या देहाने जीवत्वाचा नाश करून, देवत्वाची प्राप्ती करून घेता येते. “नरदेह निधान लागले हाती । उत्तम सार उत्तम गती । देवची होईन म्हणती ते होती । तरी का चित्ती न धरावे ||” अशी सुवर्णसंधी प्राप्त होऊनही म्हणजे उत्तम कुळात जन्म मिळूनही कान्होबा महाराज सांगतात त्यांनी आपल्या नरदेहरुपी संसाराची होळी अर्थात् वाटोळे केले. कसे? तर ज्या देहाने परमार्थाची साधना करून दुःख, अज्ञान, मृत्यु यावर विजय मिळविण्याचे सोडून पैसा मिळविण्यात आणि बायका- -मुले यांचे पोषण करण्यात व्यर्थ घालविला.

सदा निंदी साधूसंता । नेणे धर्म कर्म व्रता ।।३।।

आपण कर्तव्य करावे ती देवाची सेवा आहे पण त्यात अहंकार वा अभिलाषा नसावी. “तस्मादसक्त सततं कार्य कर्म समाचर ।” असे भगवंतांनी सांगितले आहे. ते सोडून देऊन हा असे आचरण करतो, एवढेच नाही तर सतत आत्म कल्याणाच्या साधनाचे अनुष्ठान करून लोकांना त्यामध्ये प्रवृत्त करणारे जे महात्मे आहेत त्यांच्या विषयी- सतत त्यांची निंदा करतो. निंदा हा पापाचा कारखाना आहे. “येती निंदकापाशी अशेषही पापे” अथवा “निंदा दुरीते ब्याली” असे ज्ञानोबारायांनी म्हटले आहे. त्यात पुन्हा संतांची निंदा हे तर घोर पाप आहे. ज्याला विना थांबा गाडीने नरकाला जाण्याची इच्छा आहे त्यांच्याकरीता हा मार्ग आहे. “आणीक एक कोड । नरका जाण्याची चाड । तरी संत निंदा गोड । करी कवतुके सदा ।।” असे जे करू नये ते करतो आणि जे करणे आवश्यक आहे, धर्माचरण, व्रताचरण, सत्कर्माचरण हे कांहीच करणे जाणत नाही. अर्थात् त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो. तो परिणाम काय आहे ते महाराज शेवटच्या चरणांत सांगतात.

कान्हो पाठक कथितो नूर अंती भोगी नरक घोर ।।४।।

मनुष्य शेवटी घोर अशा नरकाचे दुःख भोगतो. सुखदुःखाचे कारण मानव जन्मातील कर्मच आहे. हा सिद्धांत अनेक ठिकाणी सांगितलेला आहे. “केले कर्म झाले । तेचि भोगा आले ।। तुका म्हणे येथे झाकतील डोळे । भोग देता बेळे येईल कळो” ॥१॥ अथवा “विषयाचे सुख येथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड ।” म्हणून असे कोणीही करू नये हे तात्पर्य


संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ३.

जरी तुज देवाची चाड । तरी न करीं बडबड । बहुत बोलतां वाड । पडसी पतनीं ॥१॥
जरीतुज देवाची बाधा । तरी न करी वेवादा । वाद करितां निंदा । घडती दोष ।।२।।
जरी जरी जरी जरी तुज तुज तुज तुज देवाचा छंद । तरी सांडी कामक्रोध । तेणे परमानंद । होउनी ठासी ||३||
देवचि व्हावा । तरी मौन धरी पा जिव्हा । जेणें तूं अनुभवा । पावसील ॥४॥
देवाचा सांगात । होतां अखंडित । तरी बैस पा निवांत । साधुगीं ॥५॥
देवाचा विश्वास । तरी हृदयीं धरी नागेश म्हणे कान्हो पाठक । अरे जना ॥६॥

हा अभंग केवळ साधकांकरीता आहे. साधन म्हणजे ज्याने या जीवनांत दुःखावर विजय मिळविण्याचा निश्चय करून त्याकरीता संताचे मार्गदर्शन घेण्याचे ठरविले आहे त्यांना महाराज सांगतात

जरी तुज देवाची चाड । तरी न करी बडबड | बहुत बोलतां बाड । पडसी पतनीं ॥१॥

तुला जर खरोखर भगवत्प्राप्तीची इच्छा असेल तर त्याचेच चिंतन कर, दुसरे कांही बडबडू नकोस “नको बोलो फार बैसो जनामधी । साबधान बुद्धी इन्द्रिय वमी ।” ” युक्त आहार विहार । नेम इन्द्रियांसी सार । नसावी बासर । निद्रा बहु भाषण ।। बहु बोलणे ते सारा ।” जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधकांना अती बडबड करू नये असेच अनेक ठिकाणी सांगितलेले आहे. विनाकारण बोलण्याचे अनेक तोटे होतात- १) आयुष्य व्यर्थ जाते “मोलाचे आयुष्य जाते वायाविण ।” २)खोटे बोलले जाते. ३)निंदा होण्याची शक्यता असते. ४)चित्त विक्षिप्त होते. म्हणून विनाकारण फार बोलू नये. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात-भगवत्प्राप्तीची इच्छा असेल तर वादविवाद करू नकोस. “तार्किकांचा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ||” त्यामध्ये दोष घडण्याची शक्यता असते.

जरी तुज देवाची बाधा । तरी न करी वेवादा । वाद करितां निंदा । घडती दोष ||२||
जरी तुज देवाचा छंद । तरी सांडी कामक्रोध । तेणे परमानंद । होउनी ठासी ॥३॥

तिसऱ्या चरणांत कान्होबा महाराज सांगतात की, जर तुला देवाच्या प्राप्तीचा छंद लागला आहे तर तू काम क्रोधांचा त्याग कर काम क्रोध हे आनंदाच्या प्राप्तीतील महान प्रतिबंधक आहेत. “काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । महाशनो महापाप्मा बिद्ध्येनमिह वैरिणम् ।।३।।३७||” “बिहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः । निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ||२||७१||” त्यातून जो साधक मुक्त होतो तो आनंदाच्या साम्राज्यावर अभिषिक्त होऊन राज्य करतो. “हे अंतरीहूनी जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निबटले । जैसे रश्मीवीण उरलें । मृगजळ नाहीं ॥ तैसे राग द्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मींचें स्वराज्य आलें । मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि ।।३।।७०,७१।। “

जरी तुज देवचि व्हावा । तरी मौन धरी पा जिव्हा ।
जेणें तूं अनुभवा । पावसील ॥४॥

तेव्हां जर खरोखर तुला देव मिळावा असे वाटत असेल तर मौन धारण करून भगवचिंतन कर त्या अभ्यासानें अनन्यता प्राप्त होऊन तुला भगवत्स्वरूपाचा अनुभव येईल.

जरी तुज देवाचा सांगात । होतां अखंडित । तरी बैस पा निवांत । साधुसंगीं ||५||

जर तुला देवाच्या अखंड संगतीची इच्छा असेल तर सत्संगामध्ये स्थिर चित्त करून बैस.

जरी तुज देवाचा विश्वास । तरी हृदयीं धरी नागेश । म्हणे कान्हो पाठक । अरे जना ।।६।।

सत्संग हा भगवत्संगच आहे. त्यामुळे देवाविषयीचा विश्वास दृढ होईल. त्या विश्वासानें तूं अंतरंगातील नागेशाला (देवाला) धर. म्हणजे तुझी पारमार्थीक साधना पूर्ण होईल.


संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ४.

जेथें जेथें मन जाय । तेथें नागनाथ आहे ॥१॥
म्हणवोनि पाहे । मन गुंतलें नागेश पाये ॥२॥
सुखसोहळा भोगियले । भोग भोगणें नागेश जेणें ||३||
कान्हो पाठक आनंदला । सद्गुरु नागेश भेटला ॥४॥

कान्हुराज महाराज या अभंगातून आपली अनुभूती सांगतात. परमार्थाचा नकाशा उभा करतात.

जेथें जेथें मन जाय । तेथें नागनाथ आहे ।।१।।

मी चिंतन करीत असता या साधनाचा आश्रय केला असता मन ज्या ज्या विषयाचे चिंतन करेल तो तो विषयच परमात्मा रुपाने नागेश आहे. “यो मां पश्यति सर्वत्र सर्वच मयि पश्यति । तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ||६||३०||”

म्हणवोनि पाहे । मन गुंतलें नागेश पाये ॥२॥

हा अभ्यास अर्थात् सर्व जगत परमात्म स्वरूप आहे.

कोणत्याही विषयाचे ध्यान, चिंतन, मन करू लागले तरी त्या विषयाच्या रूपाने देवच आहे म्हणून ते ही देवाचे चिंतनच आहे.

आता मनाला देवाच्या स्वरूपाशिवाय दुसरे कांहीच प्रतीतीला येत नसल्यामुळे सहजच अव्यभिचारी भक्ती बहु लागली.

सुखसोहळा भोगियले । भोग भोगणें नागेश जेणें ||३||
कान्हो पाठक आनंदला । सद्गुरु नागेश भेटला ||४||

अशी अवस्था झाल्यानंतर सर्व त्रैलोक्यच आनंदरूप आहे असा अनुभव आल्यामुळे

तो आनंद सोहळा काही काळ भोगून नंतर ते द्वैतही नाहीसे झाले. अर्थात सर्व परमात्मा आहे.

मी ही परमात्मा आहे. जीव-देव-जगत ही भेदभ्रांती निवृत्त होऊन सर्वत्र अभेद प्रतीती,

सद्गुरुनागेशनाथांच्यामुळे प्राप्त झाली असे कान्हुराज महाराज सांगतात.


संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ५.

पेंधा म्हणे हृषीकेशी । आरुष बोबडें हें परियेसीं ॥१॥
या रे नाचों अवघे जन । गावों हरिनाम कीर्तन ||२||
कान्हो पाठक बागडा । प्रेमे नाचे वैष्णवां पुढां ।।३।।

हा अभंग बाळक्रीडेतील आहे. या अभंगात पेंद्या आणि कृष्णाचा संवाद महाराज सांगतात गोपाळांचे कृष्णावर खूप प्रेम आहे.

“तुझी आण बाहीन गा देवराया । बहु आबडसी जीवा पासोनिया ।।”

गोपाळांचे जीवनच कृष्ण बनला होता. ते त्याचे अखंड ध्यान, चिंतन करीत होते.

“करीती नामाचें चिंतन । गडी कान्होंबाचे ध्यान ||”

कृष्णालाही गोपाळ फार आवडायचे, तोही त्यांच्या शिवाय राहू शकत नव्हता.

“तुमची मज लागली सबे । ठायींचें नये नव्हों गडी ||”

अशा प्रेमळ देवाचे वर्णन करावे असे पेंद्याला वाटले म्हणून तो कृष्णाला म्हणतो

पेंद्या म्हणे हृषीकेशी । आरुष बोबडें हें परियेसीं ॥१॥

हे इंन्द्रिय नियंत्या श्रीकृष्णा माझे आरुष अशुद्ध आणि बोबडे असे शब्द तूं ऐक.

म्हणून पेंद्यानें श्रीकृष्णाचे स्तवन केलेले आहे. प्रेमाने केलेली स्तुती देवाला फार आवडते. स्तवन झाल्यानंतर पेंद्या म्हणतो

या रे नाचों अबघे जन । गाव हरिनाम कीर्तन ||२||

आपण सगळे नाचू आणि हरिनाम कीर्तन गाऊ. सगळेच गोपाळ गातात आणि नाचतात.

देवही त्यांच्या बरोबर देहभान विसरून नाचू लागलेला आहे. ज्यांत देव आहे तो आनंद काही औरच असतो.

कान्होबा महाराज त्यामध्ये आहेत तेही उड्या मारतात आणि बागडतात.

कान्हो पाठक बागडा । नाचे वैष्णवां पुढां ||३||


संत कान्हो पाठक अभंग भावार्थ – ६.

वेद गणितां मर्यादला । तरि तूं अगाध बा विठ्ठला ॥१॥
येवढें माप कैचें थोर । ज्याणें उमाणे तुमचा पार ॥धृ॥
शेष वर्णितां श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ||३||
म्हणौनि कान्हो पाठक उगा । मौनें मवी पांडुरंगा ।।४।।

या अभंगात कान्हुराज महाराज आपण वर्णन न करता शांत का राहिलो ते सांगतात-भगवंताचे स्वरूप अगाध आहे.

म्हणूनच त्याचे अनंत हे नांव आहे आणि ते अत्यंत सार्थ असेच आहे.

त्याच्या स्वरूपाचा देशाने अन्त होत नाही, कालाने अन्त होत नाही व वस्तुनेही अन्त होत नाही.

“न व्यापित्यात्वेशतोन्तोनित्यत्वान्तापि कांलतः । न वस्तुतोऽपि सार्वत्म्यादानंत्य ब्राह्मणि त्रिधा ||”

असे त्याचे वर्णन आहे. स्वरूप अगणित, अपार आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात तो येत नाही असे महाराज प्रथम चरणांत सांगतात.

बेद गणितां मर्यादला । तरि तूं अगाध बा विठ्ठला ॥१॥ एवढा मोठा वेद. “वेद काय काय न बोले ।” पण तोही कुंठीत झाला, मर्यादीत झाला. आता तुला कव घालील असे जगांत कोणते माप मोठे आहे? “एवढे माप कैचे थोर ।” देवा तुझे गुणही अनन्त आहेत. त्याचे वर्णन करताना एक हजार तोंडांचा शेष थकला आणि त्याच्या जिभा चिरल्या. शेष वर्णितां श्रमला । जिव्हा दुखंड होउनि ठेला ||२|| “जिव्हा चिरुनी पलंग झाला । शेष शिणला । झाल्या सहस्र जिभा जिभा || “ जेथे वेद, शेष, महेश, गणेश, हेही कमी पडतात. मायावाचातीत तुझे हे स्वरूप । म्हणोनिया माप भक्ती केले ॥ भक्तिचिया मापे मोजितो अनंता । इतराने तत्त्वता न मोजवे ।। तु.म.।। कान्हुराज महाराज म्हणतात मी आता मौनानेच तुझे मोजमाप करतो.


संत कान्हो पाठक अभंग भावार्थ समाप्त


हे पण वाचा: संत कान्हो पाठक यांची संपूर्ण माहिती 


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

संत कान्हो पाठक अभंग भावार्थ

समाप्त

संत कान्हो पाठक अभंग भावार्थ

समाप्त

संत कान्हो पाठक अभंग भावार्थ