संत कान्होबा अभंग गाथा – एकूण ५० अभंग
दुःखें दुभांगलें हृदयसंपुष्ट ।
गहिवरें कंठ दाटताहे ॥१॥
ऐसें काय केलें सुमित्रा सखया ।
दिलें टकोनियां वनामाजी ॥२॥
आक्रंदती बाळें करुणावचनीं ।
त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥३॥
काय हें सामर्थ्य नव्हते तुजपाशीं ।
संगें न्यावयासी अंगभूतां ॥४॥
तुज ठावें आम्हां कोणी नाहीं सखा ।
उभयलोकीं तुका तुजविण ॥५॥
कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं ।
जालों दे रे भेटी बंधुराया ॥६॥
सख्यत्वासी गेलों करीत सलगी ।
नेणेंचि अभागी महिमा तुझा ॥१॥
पावलों आपुलें केलें लाहें रस ।
निदैवा परिस काय होय ॥२॥
कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं ।
अद्यापवरी तरी उपदेशीं ॥३॥
उचित अनुचित सांभाळिलें नाहीं ।
कान्हा म्हणे कांई बोलों आतां ॥४॥
असो आतां कांहीं करोनियां ग्लांती ।
कोणा काकुलती येईल येथें ॥१॥
करुं कांहीं दिस राहे तो सायास ।
झोंबों त्या लागास भावाचिये ॥२॥
करितां रुदना बापुडें म्हणती ।
परि नये अंतीं कामा कोणी ॥३॥
तुकायबंधु म्हणे पडिलिया वनीं ।
विचार तो मनीं बोलिला हे ॥४॥
चरफडें चरफडें शोकें शोक होय ।
कार्यमुळ आहे धीरापाशी ॥१॥
कल्पतसे मज ऐसें हें पाहातां ।
करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥२॥
न चुके होणार सांडिल्या शुरत्वा ।
फुकटचि सत्त्वा होईल हीना ॥३॥
तुकयाबंधु म्हणे दिल्या बंद मना ।
वांचुनी निधाना न पावीजे ॥४॥
श्रीतुकोबांच्या वियोगामुळें कन्होबाचें ।
श्री विठ्ठलाशीं कठोर भाषण
नलगे चिंता आतां अनुमोदना हाता ।
आलें मुळ भ्राता गेला त्याचें ॥१॥
घरभेद्या येथें आहे तें सुकानु ।
धरिती कवळून पाय दोन्ही ॥२॥
त्याचें त्याचिया मुखें पडियेलें ठावें ।
नलगे सारावें मागें पुढें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे करील भेटी भावा ।
सोडीन तेधवां या विठ्ठला ॥४॥
मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं ।
तो हा सारी दोरी खेळवितो ॥१॥
ऐसें हें कळलें असावें सकळां ।
चोर त्या वेगळा नहीं दुजा ॥२॥
वैष्णव हे हेर तयाचे पाळती ।
खूण हे निरुती सांगितली ॥३॥
तुकयाबंधु म्हणे आलें अनुभवास ।
तेणेंच आम्हांस नागविलें ॥४॥
नये सोमसरी उपचाराची हरी ।
करकरेचें करीं काळें तोंड ॥१॥
मागतों इतुकें जोडूनियां कर ।
ठेवूनियां शीर पायंवरी ॥२॥
तुम्हां आम्हांस एके ठायीं सहवास ।
येथें द्वैत द्वेष काय वरा ॥३॥
तुकयाबंधु म्हणे बहुतां रीती ।
अनंता विनंती परिसावी हे ॥४॥
बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा ।
घरबुडवणा भेटलासी ॥१॥
एके घरीं कोणी कोणासी न धरी ।
ऐसी अपरांपरी केलीं आम्हां ॥२॥
कान्हा म्हणे का रे निष्कम दिखिलें ।
म्हणोनी मना आले करितोसी ॥३॥
निनांव हें तुला । नावं साजे रे विठ्ठला ।
बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥१॥
कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें ।
भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥२॥
मुद्राधारण माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे ।
हातीं फाशांचें गुंडाळें । कोण चाळे गुहस्था हे ॥३॥
तुकयाबंधु म्हणे मिस्कीन । करितोसी देखोन ।
पाहा दुरीवरी विच्छिन्न । केला परी संसार ॥४॥
लालुचाईसाठीं बळकाविसी भावा ।
परि मी जाण देवा जिरों नेदीं ॥१॥
असों द्या निश्चय हा मनीं मानसीं ।
घातली येविशीं दृढ कास ॥२॥
मज आहे बळ आळीचें सबळ ।
फोडीन अंतराळ हृदय तुझें ॥३॥
करुणारसें तुकयाबंधु म्हणे भुलवीना ।
काढून घेईना निज वस्तु ॥४॥
११.
भक्ति मुक्ति तुझें जळो ब्रह्मज्ञान ।
दे माझ्या आणोन भावा वेगीं ॥१॥
रिद्धि सिद्धि मोक्ष ठेवीं गुंडाळून ।
दे माझ्या आणून भावा वेगीं ॥२॥
नको आपुलिया नेऊं वैकुंठासी ।
दे माझ्या भावासी आणून वेगीं ॥३॥
नको होऊं काहीं होसील प्रसन्न ।
दे माझ्या आणून भावा वेगीं ॥४॥
तुकयाबंधु म्हणे पाहा तो नाहीं तरी ।
हत्या होईल शिरीं पांडुरंगा ॥५॥
१२.
धींदधींद तुझ्या करीन चिंधड्या ।
ऐसें काम वेड्या जाणितलें ॥१॥
केली तरी बरें मज भेटी भावास ।
नाहीं तरी नास आरंभिला ॥२॥
मरावें मारावें या आलें प्रसंगा ।
बरें पांडुरंगा कळलें सावें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे तुझी माझी उरी ।
उडाली न धरीं भांड कांहीं ॥४॥
१३.
तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा ।
परि तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥
मग कालावुली हाका देते वेळे ।
होतोसी परी डोळे नुघडिसी ॥२॥
जाणोनी अज्ञान करावें मोहरें ।
खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥३॥
तुकयाबंधु म्हणे कारण प्रचीती ।
पाहतां वेळ किती तेच गुण ॥४॥
१४.
मुख्य आहे तुम्हां मातेचा पटंगा ।
तुज पांडुरंगा कोण लेखी ॥१॥
नको लावूं आम्हां सवें तूं तोंवरी ।
पाहा दूरवरी विचारुनी ॥२॥
साहे संतजन केले महाराज ।
न घडे आतां तुज भेईन मी ॥३॥
तुकयाबंधु म्हणे आइकें ऐक्यता ।
वाढतें अनंता दुःखें दुःख ॥४॥
नाहीं घटिका म्हणसी । लाग लागला तुजपाशीं ।
पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥१॥
माझें नेलें पांघुरुण । ठावें असोन दुर्बळ दीन ।
माणसांमधुन । उठविलें खाणोर्या ॥२॥
आम्ही हे जगवूनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनी ।
जालसी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥३॥
तुकयाबंधु म्हणे केलें । उघडें मजचि उमगिलें ।
ऐसें काय गेलें । होते तुज न पुरतें ॥४॥
१६.
अवघीं तुज बाळें सारिखीं नाही तें ।
नवल वाटतें पांडुरंगा ॥१॥
म्हणतां लाज नाहीं सकळांची माउली ।
जवळीं धरीलीं एके दुरी ॥२॥
एकां सुख द्यावें घेऊनी वोसंगा ।
एके दारीं गळा श्रमविती ॥३॥
एकां नवनीत पाजावें दाटुन ।
एकें अन्न अन्न करितील ॥४॥
एके वाटतील नवजावी दूर ।
एकांचा मत्सर जवळी येतां ॥५॥
तुकयाबंधु म्हणे नावडती त्यांस ।
कासया व्यालास नारायणा ॥६॥
१७.
कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ ।
म्हणवितोसी परि केवळ । गळेकाटु दिसतोसी ॥१॥
काय केलें होतें आम्हीं । सांग तुझें एक ये जन्मीं ।
जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया ॥२॥
भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा ।
करूनी बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥३॥
तुकया बंधु म्हणे भला । कैसें म्हणताती तुजला ।
जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहीं तरी ॥४॥
१८.
आतां कळों आले गुण । अवघेचे यावरून ।
चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥१॥
या नांवें कृपासिंधु । म्हणवितोसी दिनाबंधु ।
मज तरी मैंदू । दिसतोसी पाहतां ॥२॥
अमंळ दया नाहीं पोटीं कठिण तैसाचि कपटी ।
आंधळ्याची काठी । माझी गुदरसीच ना ॥३॥
तुकयाबंधु म्हणे पूरता । नाहीं म्हूण बरें अनंता ।
एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥४॥
कया सांगों हृषीकेशी । आहे अनुताप आला ऐसा ।
गिळायासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥१॥
माझें बुडविलें घर । लेकरें बाळें दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनी ॥२॥
जीव घ्यावा किंवा द्यावा । तुझा आपुला केशवा ।
इतकें उरलें आहे देवा । भावाचिया निमित्यें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे जग । बरें बाईट म्हणों मग या ।
कारणें परि लाग । न सांडावा सर्वथा ॥४॥
मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारी ।
तोहि परि हरी । तुज जाला असमाई ॥१॥
हे कां भक्तीचें उपकार । नांदतें विध्वंसिलें घर ।
प्रसन्नता व्यवहार । सेवटीं हे जालासी ॥२॥
एका जीवावरी । होती दोनी कुटुंबारी ।
चाळवूं तो तरी । तुज येतो निर्लज्जा ॥३॥
तुकयाबंधु म्हणे भला । आणीक काय म्हणावें तुला ।
वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥४॥
२१.
पूर्वीं पूर्वजाची गती । हेची आइकिली होती ।
सेवे लावुनी श्रीपती । निश्चिंती केली तयांची ॥१॥
कां रे पाठी लागलासी । ऐसा सांग हृषीकेशी ।
अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती म्हूण ॥२॥
जन्माजन्मांतरीं दावा । आम्हां आपणां केशवा ।
निमित्य चालवा । काईसयास्तव हें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे अदेखणा । किती होसी नारायणा ।
देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥४॥
२२.
निसुर संसार करून । होतों पोट भरून ।
केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥१॥
ऐसा काढिला नीस । काय म्हूण सहित वंश ।
आणिलें शेवटास । हाऊस तरी न पुरे ॥२॥
उरलों पालव्या शेवटीं । तेंही न देखवे दृष्टी ।
दोघांमध्यें तुटी । रोकडीचा पाडिला ॥३॥
तुकया बंधु म्हणे गोड । बहु जालें अति वाढ ।
म्हणोनि कां बुड । मुळ्यासहित खावें ॥४॥
२३.
बरा जाणतोसी धर्मनीति । उचित अनुचित श्रीपति ।
करुं येते राती । ऐसी डोळे झांकुनी ॥१॥
आतां जाब काय कैसा । देसी तो दे जगदीशा ।
आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥२॥
सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अज्ञानत्व ।
येईल येई परि हा भाव । ज्याचा आहे तुज आधीं ॥३॥
असेंच करूनी किती । नागविली नाहीं नीती ।
तुकयाबंधु म्हणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥४॥
कांहीं विपत्ति आपत्यां । आतां आमुचिया होतां ।
काय होईल अनंता । पहा बोलो कांसया ॥१॥
बरें अनायासें जालें । सायासेंविण बोले चाले ।
काबाड चुकले । केलें कष्टावेगळें ॥२॥
बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा ।
बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥३॥
तुकयाबंधु म्हणे दगा । बरा दिला होता बगा ।
झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥४॥
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी अझून ।
अवगलासी झोडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदी ॥१॥
कळों येईल रोकडें । उभा करीन संतांपुढें ।
तुझें काय एवढें भय आपुलें मागतां ॥२॥
आजीवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।
कवडीचा तों आतां । पडों नेदीन फेर ॥३॥
ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बांधव ।
माझा गळा तुझा पाव । एके ठायी बांधेन ॥४॥
२६.
मागें असतासी कळला । उमस घेऊं नसता दिला ।
तेणेंचि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥
इतका न लागला उशीर । न धरितों भीडभार ।
सिद्धासी व्यवहार । कासयसी लागला ॥२॥
असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा ।
धरणेंहि दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥३॥
अझुन तरी इतक्यावरी । चुकवी जनाचार हरी ।
तुकयाबंधु म्हणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥४॥
२७.
आतां न राहे क्षण एक । तुझा कळला र लौकिक ।
नेदी हालों एक एक । कांहीं केल्यावांचुनी ॥१॥
संबंध पडिला कोणाशीं । काय डोळे झांकितोसी ।
नेईन पांचांपाशी । दे नाहीं तरी वोढूनी ॥२॥
सुखें नेदीस जाणवलें । नास कल्याविण उगलें ।
तरी तेंही विचारिलें । आम्ही नांवा वांचूनि दुजा नाइकों ॥३॥
सर्वगुणें सपन्न । कळों आलासी संपूर्ण ।
तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडी ॥४॥
२८.
तुज ते सर्व आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें ।
परि तें आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥
नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनी ।
पाहा विचारोनी । आढी धरोनी काम नाहीं ॥२॥
अवघे राहिले प्रकार । झालों जिवासी उदार ।
असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥३॥
आतां निदसूर नसावे । गांठ पडली कुणब्यासवें ।
तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्त्व आपुलें ॥४॥
बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा ।
एकाचि वचनें आम्हां । काय सांगणें तें सांग ॥१॥
देणें आहे कीं भंडाई । करणें आहे सांग भाई ।
आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥२॥
मागें गेलें जें होऊनी । असो ते धरित नाहीं मनीं ।
आतां पुढें येथूनी । कैसा काय विचार ॥३॥
सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ ।
तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरेल ॥४॥
आतां हें न सुटे न चुके । बोल कं दवडिसी फिके ।
जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाठीं ॥१॥
नये सरतां नव्हें भलें । तुझें लक्षण कळलें ।
बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥२॥
दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैदांचे चाळे ।
दिसतासी ये वेळे । काय करूं विसंबोनी ॥३॥
तुकयाबंधू म्हणे देखतां । अंध बधिर ऐकतां ।
कैसें व्हावें आतां । इतुकियाउपरी ॥४॥
तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक ।
अवघा बुडविला लौकिक । सुखेंचि भीके लाविली ॥१॥
थोटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं ।
म्हणोनि शहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतीना ॥२॥
निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा ।
नागवणा या नांवा । वांचुनि दुजा नाइको ॥३॥
सर्वगुणें संपन्न । कळों आलसी संपूर्ण ।
तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडी ॥४॥
३२.
तोचि प्रसंग आला सहज । गुज धरिता नव्हे काज ।
न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥
तूं तर न होसी शहाणा । नये सांगतों तेंही मना ।
आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥२॥
न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट ।
कांस घालुनियां नीट । चौघाचार करावा ॥३॥
आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन ।
न पडे तयावीण । गांठी तुकयाबंधु म्हणे ॥४॥
३३.
हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड ।
जाणवेल निवाड । करिसी परि पुढें ॥१॥
मी तो सांगून उतराई । झालों आतां तुज काई ।
कळों येईल भाई । तैसा करीं विचार ॥२॥
मागें युगें अठ्ठावीस । जालीं दिवसांचा दिवस ।
मुदल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे राखें । आतां टाकी तुझीं तीं सुखें ।
जगजाहिर ठाउकें । झालें नाहीं खंडलेंसें ॥४॥
पत्र उचटिलें प्रयत्नें । ग्वाही कराया कारणें ।
नाहीं तरी पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥१॥
नांव तुझेंचि करोनी । आहों सुखें पोट भरोनी ।
केली केली जाणवणी । म्हणउनि नाहीं म्हणसील ॥२॥
आतां इतुकियाउपरी । दे नको भलतें करीं ।
म्हणती ऋणकरी । आमुचा इतकें उदंड ॥३॥
तुकयाबंधु जागा । आळवावया पांडुरंगा ।
केला कांहीं मागा । याची नव्हती गरज ॥४॥
माझ्या भावें केली जोडी । च सरेची कल्प कोडी ।
आणियेलें धाडी । घालूनि अवघें वैकुंठ ॥१॥
आतां नलगे यावे जावें । कोठें कांहींच करावें ।
जन्मोंजन्मीं सुखें खावें । बैसोनसें जालें ॥२॥
असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर ।
न माये अपार । त्रिभुवनीं सांठवितां ॥३॥
अवघें भरलें सदोदित । जालें सुखाचें पर्वत ।
तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥४॥
३६.
आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र ।
घरासी अगर । आला सकळ सिद्धींचा ॥१॥
जालों निधाई निधानें । लागलें अनंतगुणरत्न ।
जन्माचें विच्छिन्न । दुःख झालें दारिद्र ॥२॥
तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवले आले येथें ।
ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा ।
आतां पुरुषोत्तमा । ऐसा सौदागर सांपडला ॥४॥
३७.
सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें ।
केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वीचिया ॥१॥
सुखें आनंदरूप आतां । आम्ही आहों याकरितां ।
निवारिली चिंता । देणें घेणें चुकलें ॥२॥
जालें भांडवल घरीचें । अमूप नाम विठ्ठलाचें ।
सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥३॥
तुकयाबंधु म्हणे फिटला । पांग नाहीं बोलायाला ॥
चाड दूसरी विठ्ठला । वांचूनियां आणिक ॥४॥
३८.
विठ्ठलारे तुझें वर्णितां गुणवाद ।
विठ्ठलारेदग्ध झालीं पापें ॥१॥
विठ्ठलारे तुझें पाहतां श्रीमुख ।
विठ्ठलारेसुख झालें नयना ॥२॥
विठ्ठलारे तुज देतां आलिंगन ।
विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥३॥
विठ्ठलारे तुझी ऐकतां कीर्ति ।
विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥४॥
विठ्ठलारे तुकयाबंधु म्हणे देहभाव ।
विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥५॥
३९.
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥
नलगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥२॥
हरपला द्वैतभाव । तेणें देहचि झाला वाव ॥३॥
तुकयाबंधु म्हणे आम्ही । झालों निष्काम ये कामीं ॥४॥
अनंतजन्में जरी केल्या तपराशी ।
तरी हा न पवसी म्हणे देह ॥१॥
ऐसें जें निधान लागलेंसे हातीं ।
त्याची केली माती भाग्यहीना ॥२॥
उत्तमाचें सार वेदांचें भांडार ।
ज्याच्यानें पवित्र तीर्थें होतीं ॥३॥
म्हणे तुकयाबंधु आणिक उपमा ।
नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥४॥
४१.
उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेले ।
नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥१॥
काय बडिवार सांगसी वायां । ठाया पंढरिराया आहेसि आम्हां ।
एकलाचि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥२॥
कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला बाणीं ।
पडिला भूमी परी नयेचि करुणा । दांत पाडियेले दोन्हीका ॥३॥
श्रियाळ बापुडें सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर ।
ऐसा कठीण कोण होईल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥४॥
शिबी चक्रवती करितां यज्ञयाग । त्याचें चिरलें अंग ठायीं ठायीं ।
जाचउनि प्राण घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥५॥
बळीचा अन्याय सांग होता काय । बुडविला तो पाय देउनि माथां ।
कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्र कथा ॥६॥
हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबाघरीं ।
पाडिला बिघड नळदमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि हरि ॥७॥
आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपत्ति गाउसीच्या ।
वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । म्हणे बंधु तुकयाचा ॥८॥
४२.
तुम्हां आम्हांसी दरूषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥
म्हणवुनी करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥२॥
भविष्याचे माथां देह । कोण जाणे होईल काय ॥३॥
म्हणे तुकयाचा बांधव । आमचा तो झाला भाव ॥४॥
४३.
मन उतावीळ । झालें न राहे निश्चळ ॥१॥
दे रे भेटी पंढरीराया । उभारोनि चारी बाह्मा ॥२॥
सर्वाग तळमळी । हात पाय रोमावळी ॥३॥
तुकयाबंधु म्हणे कान्हा । भुक लागली नयना ॥४॥
आकारावंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥
मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ।
श्रुति वाखणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥
म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥
म्हणसी दावीन अवस्था । तैसें नकोरे अनंता ॥१॥
होऊनियां साहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥२॥
मृगजळाचियापरी । तैसें न करावें हरी ॥३॥
तुकयाबंधु म्हणे हरी । कामा नये बाह्मात्कारी ॥४॥
४६.
आम्ही जालों बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥
केला घरांत रिघावा । ठायीं पीडियेला ठेवा ॥२॥
हातां चढलें धन । वर्णिता लक्षण रे देवा ॥३॥
मन जालें उन्मन । अनुपम ग्रहण ।
तुकयाबंधु म्हणे महिमा नेणें रे ॥४॥
कलिमहिमा
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन ।
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचें ॥१॥
ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।
केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥२॥
थोर य युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार ।
सांडूनिया द्विजवर । दावला पीर स्मरताती ॥३॥
ऐसें यथार्थाचे अनर्थ । झाला बुडाला परमार्थ ।
नाहीं ऐसी झाली नीत । हाहा भूत पातलें ॥४॥
शांति क्षमा दया । भावभक्ति सत्क्रिया ।
ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगलें ॥५॥
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।
म्हणवितां रामराम । महा श्रम मानिती ॥६॥
येर भोरप्याचेविशीं । धांवती भूतें आमिषा तैसीं ॥
कथा पुराण म्हणतां सिसी । तिडिके उठे नकरियाची ॥७॥
विषयलोभासाठीं । सर्वार्थेसी प्राण साटी ।
परमार्थी पीठ मुठीं । मागतां उठती सुनीसी ॥८॥
धनाढ्य देखोनि अनामिके । तयांतें मानिती आवश्यक ।
अपमानिले वेदपाठक । शास्त्रज्ञ सात्विक संपन्न ॥९॥
पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ।
सुनाचिया दासी । सासा झाल्या आंदण्य ॥१०॥
खोटें झाले आली विवसी । केली मर्यादा नाहींसी ।
भार्या ते भ्रतारासी । रंक तैसी मानिती ॥११॥
नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ।
पोटासाठीं खौसा । वंदिती म्लेंच्छाच्या ॥१२॥
बहुत पाप झालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ ।
अभक्ष भक्षिती विटाळ । कोणी न धरिती कोणाचा ॥१३॥
कैसें झालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
विडे घेऊनि ब्राह्मण । अविंधवाणी वदताती ॥१४॥
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासींचीं चुंबिती ।
सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१५॥
अठरा यातींचा व्यापार । करिती तस्कराई विप्र ।
सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥२१॥
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ।
अश्वाचियेपरी विकिती । कुमारी वेदवक्ते ॥२२॥
वेदाध्ययनसंहितारुचि । भकांद्या करिती तयांची ।
आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२३॥
मुख्य सर्वोत्तम साधनें । ती उच्छेदुनि केलों दीनें ।
कुडीं कपटी महा मोहनें । शठ दुर्जनें मिरविताती ॥२४॥
कलाकुशळता चतुराई । तर्कवादी भेद निंदेठायीं ।
विधिनिषेधाच्या वाही । एकही ऐसीं नाडिलीं ॥२५॥
जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी । होती वैरागी दिगांबरी ।
निस्पृही कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छेकरीं न सुटती ॥२६॥
कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे झाले प्रजांचे अंतक ।
पिते पुत्र सहोदर एकाएक । शत्रुघातें वर्तताती ॥२७॥
केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविले अवघें जन ।
याती अठरा चार्ही वर्ण । कर्दमकरूनि विटाळविले ॥२८॥
पूर्वीं होतें भविष्य केलें । संतीं तें यथार्थ झालें ।
ऐकत होतों तें देखिलें । प्रत्यक्ष लोचनीं ॥२९॥
आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्यें वावरावें ।
देवाशी भाकोनी करुणारवें । वेगें स्मरावें अंतरीं ॥३०॥
अगा ये वैकुंठनायका । काय पाहतोसी या कौतुका ।
धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३१॥
ओले मृत्तिकेचें मंदिर । आंत सहाजण उंदीर ।
गुंफा करिताती पोखर । त्याचा नका करूं आंगीकार गा ॥१॥
वासुदेव करितो फेरा । तूं अद्यापी कां निदसूरा ।
सावध होईरे गव्हारा । भज भज का सांरगधरा ॥२॥
बा तुझें तूं सोईरे । तूंची वडिल पैं बाघारे ।
तूं तुझेनी आधारें । वरकड मिनले ते अवघे चोर गा ॥३॥
वासुदेव फोडितो टाहो । उठी उठी लवलाहो ।
हा दुर्लभ मानव देह वो । तुकयाबंधु स्वहित लवलाहो गा ॥४॥
जेणें माझी लपविली पिवळी गोटी ।
उलट भवर्याची चोरी घाली पाठी ।
पाहे पाहे कंचुकी सोडूनी गाठी ।
हृदयीं शंकोनि एकांत घाली मिठी वो ॥१॥
पहा पहा सांवळा कैसा धीट ।
बोली बोलूं नये बोलतो उद्धट ।
याच्या बोलण्याचा कोणा नये वीट ।
याजवरोनि देह ओंवाळा संपुष्ट ॥२॥
अवचित माझ्या डोळ्यांत गेलें कणू ।
फुंकोनि काढितां वाटलें समाधानु ।
शहाणा तुझा गे कानडा नारायणु ।
चुंबन घेतां नाठवे देहभानु ॥३॥
नवनीत देखोनि लावितो लाडीगोडी ।
गुनी खुणाविता राजस डोळे मोडी ।
आगमानिगमा न कळे याच्या खोडी ।
तुकयाबंधु चरणीं हात जोडी ॥४॥
न गमे न गमे न गमे हरिविण ।
न गमे न गमे न गमे मेळवा शाम कोणी गे ॥१॥
तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा ।
दिसती दिशा वोसा वो ॥२॥
नाठवे भूक तान विकळ जाले मन ।
घडी जाय प्रमाण जुगा एकी वा ॥३॥
जरी तुम्ही नोळखा सांगतों ऐका ।
तुकयाबंधुचा सखा जगजीवन वो ॥४॥
संत कान्होबा अभंग समाप्त
शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral