संत जनाबाई अभंग १ते१००
संत जनाबाई अभंग १ते१०० – १
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी ह्मणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – २
पूर्वी काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥
येऊनियां देव दळूं लागे अंगें । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाचि पैं संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥
ओझें झालें ह्मणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥
ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – ३
एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशीं ॥१॥
कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥
पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥
ऐशियाच्या घरीं आलें । जनी ह्मणे धन्य झालें ॥४॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – ४
जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्न्ली ॥१॥
देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥
केश विंचरुनी मोकळे केले । जनी ह्मणे निर्मळ झालें ॥३॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – ५
जनी बैसली न्हायाला । पाणी नाहीं विसणाला ॥१॥
घागर घेउनी पाण्या गेली । मागें मागें धांव घाली ॥२॥
घागर घेऊनियां हातीं । पाणी रांजणांत ओती ॥३॥
ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥४॥
पाणी पुरे पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – ६
एके दिवशीं न्हावयास । पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव धांवोनियां आले । शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हातें विसणीं । घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥
माझ्या डोईच्या केसांस । न्हाणें नव्हतें फार दिवस ॥४॥
तेणें मुरडी केसांस । कां ह्मणे उगीच बैस ॥५॥
आपुल्या हातें वेणी घाली । जनी ह्मणे माय झाली ॥६॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – ७
तुळशीचे बनीं । जनी उकलीत वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी । डोई चोळी चक्रपाणी ॥२॥
माझे जनीला नाहीं कोणी । ह्मणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोकां । न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – ८
साळी सडायास काढी । पुढें जाउनी उखळ झाडी ॥१॥
कांडितां कांडितां । शीण आला पंढरिनाथा ॥२॥
सर्व अंगीं घाम आला । तेणें पितांबर भिजला ॥३॥
पायीं पैंजण हातीं कडीं । कोंडा पांखडूनि काढी ॥४॥
हाता आला असे फोड । जनी ह्मणे मुसळ सोड ॥५॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – ९
ज्याचा सखा हरी । त्यावरी विश्व कृपा करी ॥१॥
उणें पडों नेदी त्याचें । वारें सोसी आघाताचें ॥२॥
तयावीण क्षणभरी । कदा आपण नव्हे दुरी ॥३॥
आंगा आपुले ओढोनी । त्याला राखे जो निर्वाणीं ॥४॥
ऐसा अंकित भक्तांसी । ह्मणे नामयाची दासी ॥५॥
संत जनाबाई अभंग १ते१०० – १०
पक्षी जाय दिगंतरां । बाळकांसी आणी चारा ॥१॥
घार हिंडते आकाशीं । झांप घाली पिल्लापासीं ॥२॥
माता गुंतली कामासी । चित्त तिचें बाळापाशीं ॥३॥
वामर हिंडे झाडावरी । पिलीं बांधुनी उदरीं ॥४॥
तैंसी आह्यासी विठ्ठल माये । जनी वेळोवेळां पाहे ॥५॥
११
भक्त जें जें कर्म करिती । तें तूं होसी कृपामूर्ती ॥१॥
हें तों नवल नव्हे देवा । भुललासी भक्तिभावा ॥२॥
वाग्दोर धरुनी दांतीं । चारी घोडे चहूं हातीं ॥३॥
धूतां लाज नाहीं तुला । दासी जनी ह्मणे भला ॥४॥
१२
देव भावाचा लंपट । सोडुनी आला हो वैकुंठ ॥१॥
पुंडलिकापुढें उभा । सम चरणांवरी शोभा ॥२॥
हातीं चक्र पायीं वांकी । मुख भक्तांचें अवलोकीं ॥३॥
उभा बैसेन सर्वथा । पाहे कोडें भक्त कथा ॥४॥
सर्व सुखाचा सागर । जनी ह्मणे शारंगधर ॥५॥
१३
दुःशासन द्रौपदीसी । घेउनी आला तो सभेसी ॥१॥
दुर्योधन आज्ञा करी । नग्न करावी सुंदरी ॥२॥
आतां उपाय कृष्णा काय । धांवें माझे विठ्ठल माय ॥३॥
निरी ओढितां दुर्जन । झालें आणिक निर्माण ॥४॥
ऐसीं असंख्य फेडिलीं । देवीं तितुकीं पुरविलीं ॥५॥
तया संतां राखिलें कैसें । जनी मनीं प्रेमें हांसे ॥६॥
१४
ब्राह्मणाचें पोर । मागे दूध रडे फार ॥१॥
माता ह्मणे बालकासी । दूध मागें देवापासी ॥२॥
क्षिराब्धीची वाटी । ह्मणे जनी लावी ओंठीं ॥३॥
१५
पंढरीच्या राया । माझी विनवणी पायां ॥१॥
काय वर्णू हरिच्या गोष्टी । अनंत ब्रह्मांडें याचे पोटीं ॥२॥
सेना न्हावी याचे घरीं । अखंड राबे विठ्ठल हरी ॥३॥
राम चिंता ध्यानीं मनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
१६
भिल्लणीचीं फळें कैशीं । चाखोनी वाहातसे देवासी ॥१॥
भावें तिचीं अंगिकारी । सर्वाहुनी कृपा करी ॥२॥
गुज वान्नरांसी पुसावें । राक्षसांतें हो जिंकावें ॥३॥
वान्नर अवघे भुभुःकार । बोलताती रामासमोर ॥४॥
आज्ञा करावी आह्मांसी । रावण आणितों तुह्मापासीं ॥५॥
तुझ्या नामच्या प्रतापें । हनुमंत गेला जी संतापें ॥६॥
सीताशुद्धि करुनी आला । दासी जनीस आनंद झाला ॥७॥
१७
यातिहीन चोखामेळा । त्यासी भक्तांचा कळवळा ॥१॥
त्याचा झाला ह्मणीयारा । राहे घरीं धरी थारा ॥२॥
देह बाटविला त्याणें । हांसे जनी गाय गाणें ॥३॥
१८
चोखामेळा संत भला । तेणें देव भुलवीला ॥१॥
भक्ति आहे ज्याची मोठी । त्याला पावतो संकटीं ॥२॥
चोख्यामेळ्याची करणी । तेणें देव केला ऋणी ॥३॥
लागा विठ्ठल चरणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
१९
माळियाचा लेक झाला । सेखी कुर्म्यालागीं गेला ॥१॥
चांभार्यानें जानव्यासी । काढोन दाविलें भटांसी ॥२॥
तुरका घरीं विणी । ह्मणे नामयाची जनी ॥३॥
२०
माझा लोभ नाहीं देवा । तुझी करीं ना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रामा येऊनि काय करिसी । तुझें बळ आह्मांपासीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी ह्मणे धरिला चोरीं ॥४॥
२१
द्रौपदीकारण । पाठीराखा नारायण ॥१॥
गोरा कुंभाराच्यासंगें । चिखल तुडवूं लागे अंगें ॥२॥
कबिराच्या बैसोनि पाठीं । शेले विणितां सांगे गोष्टी ॥३॥
चोखामेळ्यासाठीं ढोरें ओढी जगजेठी ॥४॥
जनीसंगें दळूं लागे । सुरवर म्हणती धन्य भाग्यें ॥५॥
२२
देव भक्तांचा अंकित । कामें त्याचीं सदा करित ॥१॥
त्याचें पडों नेदी उण । होय रक्षिता आपण ॥२॥
जनी ह्मणे भक्तिभाव । देवदास ऐक्य जीव ॥३॥
२३
बाळे भोळे ठकविशी । तें तंव न चले आह्मांपाशीं ॥१॥
गर्व धरिसी नामाचा । सोहं सोहं गर्जे वाचा ॥२॥
आशा तृष्णा तुह्मांपाशीं । नाहीं ह्मणे जनी दासी ॥३॥
२४
जेवीं जेवीं बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥१॥
कनकाचे ताटीं । रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥
आमुचें ब्रह्म सारंग पाणी । हिंडतसे रानोरानीं ॥३॥
गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडूफळी ॥४॥
तुळसीचे वनीं । उभी राहे दासी जनी ॥५॥
२५
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांची ॥१॥
कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥
कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद कां राहिला ॥३॥
कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥
२६
दुर्योधना मारी । पांडवासी रक्षी हरी ॥१॥
पांडवा वनवासीं जाये । तयापाठीं देव आहे ॥२॥
उणें न पडे तयांचें । काम पुरवी हो मनाचे ॥३॥
जनी म्हणे विदुराच्या । कण्या भक्षी हो प्रीतीच्या ॥४॥
२७
वर स्कंधी ऋषि तो वाहिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
भक्ता आधीन होसी । त्याच्या वचनीं वर्तसी ॥२॥
त्याचे गर्भवास सोसी । कष्टी होता अंबऋषी ॥३॥
सर्व दुःखासी साहिलें । जनी म्हणे बरवें केलें ॥४॥
२८
भक्तीसाठीं याति नाहीं । नाहीं तयासी ते सोई ॥१॥
रोहिदास तो चांभार । त्याचा करी कारभार ॥२॥
जो कां भक्त यातिहीन । देव करी त्याचा मान ॥३॥
त्यासी भक्ताचा आधार । चाट पाहे निरंतर ॥४॥
जनी म्हणे भक्तासाठीं । विठो सदा गोण्या लोटी ॥५॥
२९
चोखामेळा अनामिक । भक्तराज तोचि एक ॥१॥
परब्रह्म त्याचे घरीं । न सांगतां काम करी ॥२॥
रोहिदास तो चांभार । पाहे मोमिन कबीर ॥३॥
नेमी जबी बीच दासी । रंगीं वेढी नांगर पिशी ॥४॥
३०
देव तारक तारक । देव दुष्टांसी मारक ॥१॥
गीतेमध्ये आदि अंत । ऐसें बोले तो भगवंत ॥२॥
शत्रुलागीं आधीं मारी । भक्तसंकटीं रक्षी हरी ॥३॥
जनी म्हणे कृपा करी । भाव पाहोन अंतरीं ॥४॥
३१
पांडवांचे घरीं । रात्रंदिवस मुरारी ॥१॥
तैंच सखा ना मयाचा । एके ठायीं जेवायाचा ॥२॥
त्याच्या उच्छिष्ठाचा ग्रास । जनी हात उचली त्यास ॥३॥
३२
भूत झालें ऋषि पोटीं । लावियेलें मृगापाठीं ॥१॥
विश्वामित्रा घाला घाली । पोटीं शकुंतला आली ॥२॥
भगांकित केला । इंद्र भूतानें झडपिला ॥३॥
तेंचि झालें हें भारत । म्हणे जनी केली मात ॥४॥
३३
दोहीकडे दोही जाया । मध्यें गोरोबाची शय्या ॥१॥
गोरा निद्रिस्थ असतां । कपट करिती त्याच्या कांता ॥२॥
गोरोबाचे दोन्ही हात । आपुल्या ह्रुदयावरी ठेवित ॥३॥
जागा झाला गोरा भक्त । जनी म्हणे त्या निद्रित ॥४॥
३४
अहो द्रौपदीच्या बंधू । तारक देवा कृपासिंधू ॥१॥
पांचाळीसी वस्त्रें देत । पुरवितो जगन्नाथ ॥२॥
जनी म्हणे भाग्यवंत । तिच्या भावाचा अंकित ॥३॥
३५
खांदीऋषि तो चालिला । बळीनें द्वारपाळ केला ॥१॥
ऐसा भक्ता आधिन होसी । त्याच्या वचनें वर्तसी ॥२॥
कष्टी होतां अंबऋषी । त्याचे गर्भवास सोसी ॥३॥
सर्व दुःखासी साहिलें । जनी म्हणे दळण केलें ॥४॥
३६
बाप श्रोतियाचा राजा । कैसी उभारिली ध्वजा ॥१॥
एक झाला परिक्षिती । ऐसे पवाडे गर्जिती ॥२॥
भागवतीं रससुखें । द्रौपदी वाढी सावकाशें ॥३॥
ज्याची ऐकतां गर्जना । कंप काळाचिया मना ॥४॥
सात दिवस वृष्टि झाली । जनी म्हणे मात केली ॥५॥
३७
मांडियेला डाव । कौरवांनीं दुष्ट भाव ॥१॥
टाकियेला फांसा । पांडव गेले वनवासा ॥२॥
वना गेले पांडवबळी । दिनकरें दिधली थाळी ॥३॥
पांडवांची कृष्णाबाई । जनी म्हणे माझी आई ॥४॥
३८
ऐशापरी पांडवांतें । रक्षियेलें दीनानाथें ॥१॥
शंखचक्र आयुधें करीं । छाया पितांबर करी ॥२॥
हस्त ठेऊनियां माथां । सुखी असा निर्भय चित्तां ॥३॥
आज्ञा घेउनी सर्वांची । देव गेले द्वारकेसी ॥४॥
सरला थालिपाक आतां । पुढें सावधान श्रोतां ॥५॥
कथा पुढील गहन । घोषयात्रा निरुपण ॥६॥
येथुनी अध्याय कळस । जनी म्हणे झाला रस ॥७॥
३९
कोणे एके दिवशीं । विठो गेला जनीपाशीं ॥१॥
हळूच मागतो खायासी । काय देऊं बा मी तुसी ॥२॥
हातीं धरुन नेला आंत । वाढी पंचामृत भात ॥३॥
प्रेमसुखाचा ढेंकर दिला । जनी म्हणे विठो धाला ॥४॥
४०
एके दिवशीं वाडियांत । देव आले अवचित ॥१॥
अवघीं पायांस लागली । देवें त्यांवरी कृपा केली ॥२॥
बाहेर कामासी गुंतल्यें । देवें मजला विचारिलें ॥३॥
बाहेर आहेस वो बोलती । देव मजला हाटकिती ॥४॥
हात धुऊनि जवळ गेल्यें । कोण गे जनी हांसून बोले ॥५॥
४१
दळण्याच्या भिषें । विठ्ठल सावकाशें ॥१॥
देहबुद्धीचें वैरण । द्वैत खंडारे निसून ॥२॥
एकलीच मातां । दुजा साद उमटतां ॥३॥
कोण तुझे बरोबरी । साद देतो निरंतरी ॥४॥
खूण कळली नामदेवा । विठ्ठल श्रोता जनीच्या भावा ॥५॥
४२
मग हांसोनि सकळी । पाहूं देव कैसा बळी ॥१॥
आले नामदेवा घरीं । प्रेमें भुललासे हरी ॥२॥
घाली जातिया वैरण । गाय आवडीचें गाण ॥३॥
पुढें देखे ज्ञानेश्वरा । देव झालासे घाबरा ॥४॥
जनी म्हणे पंढरिनाथा । जाय राउळासी आतां ॥५॥
४३
निवृत्ति पुसत । कोठें होते पंढरिनाथ ॥१॥
खूण कळली ह्रुषिकेशी । सांगों नको निवृत्तीसी ॥२॥
उत्तर दिलें ज्ञानदेवें । नवल केवढें सांगावें ॥३॥
शिव वंदी पायवणी । नये योगियांचे ध्यानीं ॥४॥
द्वारीं उभे ब्रह्मादिक । गुण गाती सकळिक ॥५॥
जनीसवें दळी देव । तिचा देखोनियां भाव ॥६॥
४४
काकड आरती । करावया कमळापती ॥१॥
भक्त मिळाले सकळ । रितें देखिलें देउळ ॥२॥
ज्ञानेश्वर बोले । आतां देव कोठें गेले ॥३॥
ठावें जाहलें अंतरीं । देव दळी जनी घरीं ॥४॥
४५
जाय जाय राउळासी । नको येऊं आह्मांपाशीं ॥१॥
जाऊं आह्मी बरोबर । झाला तिचा हो चाकर ॥२॥
तिजसंगें काम करी । ऐसा जाणा देव हरी ॥३॥
चहूं हातीं धुणें केलें । जनी म्हणें बरें झालें ॥४॥
४६
आतां पुरे हा संसार । कोठें फेडूं उपकार ॥१॥
सांडूनियां थोरपण । करी दळण कांडण ॥२॥
नारिरुप होउनी हरी । माझें न्हाणें धुणें करी ॥३॥
राना जाये वेंची शेणी । शेखीं वाहे घरीं पाणी ॥४॥
ठाव मागें पायापाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥
४७
धुणें घेऊनि कांखेसी । जनी गेली उपवासी ॥१॥
मार्गे विठ्ठल धांवला । म्हणे कां टाकिलें मला ॥२॥
कां गा धांवोनि आलासी । जाय जाय राउळासी ॥३॥
चहूं हातें धुणें केलें । जनी म्हणे बरें झालें ॥४॥
४८
जनी जाय शेणासाठीं । उभा आहे तिच्या पाठीं ॥१॥
पितांबराची कांस खोवी । मागें चाले जनाबाई ॥२॥
गौर्या वेंचुनि बांधिली मोट । जनी म्हणे द्यावी गांठ ॥३॥
मोट उचलून डोईवर घेई । मागें चाले जनाबाई ॥४॥
४९
राना गेली शेणीसाठीं । वेंचूं लागे विठो पाठी ॥१॥
पितांबर ओचे खोंवी । पायीं शोभा पारखावी ॥२॥
रिती बांधितांचि मोट । जनी म्हणे द्यावी भेट ॥३॥
५०
जनीचिया बोलें करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥
जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचे चरणीं ओढवी माथा ॥२॥
महेशादिदेव तेहि तया ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥
५१
आई मेली बाप मेला । मज सांभाळीं विठ्ठला ॥१॥
हरीरे मज कोणी नाहीं । माझी खात असे डोई ॥२॥
विठ्ठल म्हणे रुक्मिणी । माझे जनीला नाहीं कोणी ॥३॥
हातीं घेउनी तेलफणी । केंस विंचरुन घाली वेणी ॥४॥
वेणी घालुन दिधली गांठ । जनी म्हणे चोळ बा पाठ ॥५॥
जनी म्हणे बा गोपाळा । करी दुबळीचा सोहळा ॥६॥
५२
एक प्रहर रात्र झाली । फेरी विठ्ठलाची आली ॥१॥
नामा म्हणे जनी पाहे । द्वारीं उभा कोण आहे ॥२॥
प्रभा घरांत दाटली । एक सराद सुटली ॥३॥
एकमेकां आलिंगन । नामा म्हणे जनी धन्य ॥४॥
५३
जनी जाय पाणीयासी । मागें धांवे ह्रुषिकेशी ॥१॥
पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥
पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥
धुणें धुऊनियां आणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥
५४
शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥
बुद्धि सांगे राजाईसी । तुह्मी न छळावें नाम्यासी ॥२॥
अवघ्या वित्तासी वेंचावें । सरल्या मजपासीं मागावें ॥३॥
विठ्ठलशेट नाम माझें । नामयाला सांगावें ॥४॥
आतां उचित दासी । ऐसें बोले राजाईसी ॥५॥
ऐसे बोलोनियां गेला । म्हणे जनी नामा आला ॥६॥
५५
नामदेवाचे घरीं । चौदाजण स्मरती हरी ॥१॥
चौघेपुत्र चौघी सुना । नित्य स्मरती नारायणा ॥२॥
आणिक मायबाप पाही । नामदेव राजाबाई ॥३॥
आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी । पंधरावी ती दासी जनी ॥४॥
५८
माझा नामा मज देंई । जीव देईन तुझे पायीं ॥१॥
पुंडलिका भुलविलें । तैसें माझिया बाळा केलें ॥२॥
तें गा न चले मजपाशीं । दे गा माझ्या नामयासी ॥३॥
तुझ्यासंगें जे जे गेले । ते त्वां जितेचि मारीले ॥४॥
विठ्ठल म्हणे गोणाबाई । नामा तुझा घेवोनी जांई ॥५॥
हातीं धरोनियां आली । दासी जनी आनंदली ॥६॥
५९
धरा सतराचा हो मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेमबळा आनंदें ॥१॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मी ब्रह्मरुपीचा हुडा ।
संत ऐकताती कोडां । प्रेमबळा आनंदें ॥२॥
नामादामा दोनी काळू । नामा विठा दमामे पैलू ।
चौघी सुना चारी हेलू । कडकडां बोल उमटती ॥३॥
गोंदा म्हादा करणी करी । नादें दुमदुमली पंढरी ।
आऊबाई तुतारी । मंजुळस्वर उमटती ॥४॥
गौणाबाई नोबतपल्ला । नाद अंबरीं कोंदला ।
राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळ स्वर उमटला ॥५॥
जनाबाई घडयाळ मोगरीं । घटका भरतां टोला मारी ।
काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदें ॥६॥
६०
विठोबा चला मंदिरांत । गस्त हिंडती बाजारांत ॥१॥
रांगोळी घातली गुलालाची । शेज म्यां केली पुष्पांची ॥२॥
समुया जळती अर्ध रात्रीं । गळ्यांमध्यें माळ मोत्यांची ॥३॥
नामदेवाला सांपडलें माणिक । घेतलें जनीनें हातांत ॥४॥
घेउनी गेली राउळांत । गस्त हिंडती हकिमाची बाजारांत ॥५॥
६१
लोलो लागला अंबेचा । विठाबाई आनंदीचा ॥१॥
आदि ठाणें पंढरपूर । नांदे कान्हाई सुंदर ॥२॥
गोणाईनें नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥३॥
शुद्ध देखोनियां भाव । पोटीं आले नामदेव ॥४॥
दामाशेटी हरुषला । दासी जनीस आनंद झाला ॥५॥
६२
नामदेवा पुत्र झाला । विठो बारशासी आला ॥१॥
आंगडें टोपडें पेहरण । शेला मुंडासा घेऊन ॥२॥
माझ्या जीवाच्या जीवना ॥ नाम ठेवी नारायणा ॥३॥
जनी म्हणे पांडुरंगा । नांव काय ठेवूं सांगा ॥४॥
६३
हाटीं जायाचि तांतडी । नामा होता पैल थडी ॥१॥
म्हणे जा गे आणा त्यासी । नाहीं तरी मी उपवासी ॥२॥
जनी धांवत चालली । मागें विठ्ठल माउली ॥३॥
६४
पुंडलिकापाशीं । नामा उभा कीर्तनासी ॥१॥
येऊनियां पांडुरंगें । स्वयें टाळ धरी अंगें ॥२॥
गाऊं लागे बरोबरी । नाहीं बोलायाची उरी ॥३॥
स्वर देवाचा उमटला । दासी जनीनें ओळखिला ॥४॥
६५
ऐसी कीर्तनाची गोडी । वैकुंठींहुनी घाली उडी ॥१॥
आपण वैकूंठींच नसे । भक्तापासीं जाण वसे ॥२॥
जनी म्हणे कृपानिधी । भक्तभावाची मांदी शोधी ॥३॥
६६
राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करीं ॥१॥
राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥२॥
सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥
आवडीनें विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥
६७
विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥
हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥
जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥
६८
जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुह्मीं संतीं ॥१॥
अहो ज्ञानदेवा असावें तुह्मा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आह्मां ॥२॥
माझी मज आण सांगतें प्रमाण । सेवितें चरण तुझे स्वामी ॥३॥
जनीचे हो बोल स्वानंदाचे डोल । स्वात्ममुखीं बोल दुणावती ॥४॥
शुद्ध सत्त्व कागद नित्य करी शाई । अखंडित लिही जनीपाशीं ॥५॥
हांसोनी ज्ञानदेवें पिटियेली टाळी । जयजयकार सकळीं केला थोर ॥६॥
६९
जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥
नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥
मज भरंवसा नामाचा । गजर नामाच्या दासीचा ॥३॥
विटेवरी ब्रह्म दिसे । जनी त्याला पाहतसे ॥४॥
७०
सोंग सोंगा जाय । नवल जाउनी हांसताहे ॥१॥
हांसोनियां बडवी टिरी । कोण नाठवी हे परी ॥२॥
हा नाठवी आपणा । म्हणे जनी भुललें जाणा ॥३॥
७१
देहभाव सर्व जाय । तेव्हां विदेही सुख होय ॥१॥
तया निद्रें जे पहुडले । भवजागृति नाहीं आले ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥
त्या एकीं एक होतां । दासी जनी कैंचि आतां ॥४॥
७२
एके रात्रींचे समयीं । देव आले लवलाहीं ॥१॥
सुखशेजे पहुडले । जनीसवें गुज बोले ॥२॥
गुज बोलतां बोलतां । निद्रा आली अवचिता ॥३॥
उठा उठा चक्रपाणी । उजाडलें म्हणे जनी ॥४॥
७३
पदक माळा सकलाद । तेथें टाकिली गोविंदें ॥१॥
देव तांतडी निघाले । वाकळ घेउनी पळाले ॥२॥
भक्त येती महाद्वारीं । चोर पडले देव्हारीं ॥३॥
नवल झालें पंढरपुरीं । देव राबे दासी घरीं ॥४॥
त्रिभुवनांत मात गेली । दासी जनी प्रगटली ॥५॥
७४
पदक विठ्ठलाचें गेलें । ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें ॥१॥
अगे शिंपियाचे जनी । नेलें पदक दे आणुनी ॥२॥
देवासमोर तुझें घर । तुझें येणें निरंतर ॥३॥
म्यां नेलें नाहीं जाण । सख्या विठोबाची आण ॥४॥
धोतर झाडूनि पाहती । पडलें पदक घेऊनि जाती ॥५॥
जनी वरी आली चोरी । ब्राह्मण करिती मारा मारी ॥६॥
धाविन्नले चाळीस गडी । जनीवरी पडली उडी ॥७॥
दंडीं लाविल्या काढण्या । विठो धांवरे धावण्या ॥८॥
चंद्रभागे रोविला शूळ । जनाबाईस आलें मूळ ॥९॥
हातीं टाळी वाजविती । मुखीं विठ्ठल बोलती ॥१०॥
विलंब लागला ते वेळीं । म्हणती जनिला द्यारे सुळीं ॥११॥
ऐसा येळकोट केला । जनी म्हणे विठो मेला ॥१२॥
तंव सुळाचें झालें पाणी । धन्य म्हणे दासी जनी ॥१३॥
७५
प्रेमभावें तुह्मी नाचा । रामरंगें रंगो वाचा ॥१॥
हेंचि मागों देवाजीला । आवडी शांती खरें बोला ॥२॥
जैसी माय तान्हयातें । खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥
तेंवि तुह्मी संतजना । सर्वी धरावी भावना ॥४॥
हरि कोठवळा झाला । म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥
७६
अर्थ जे काढिती उपनिषदांमाजी । सांडोनियां गोड भाजी घेती माठ ॥१॥
भूगोलाचा स्वामी सुप्रसन्न झाला । त्यासी मागे गोळा भाजीचा तो ॥२॥
पुंडलिकें धन जोडिलें असतां । प्रार्थोनियां देतां न घेती हे ॥३॥
मग गडी हो पाहे देवचि येथोनी । जवळी होती जनी फावलें तिये ॥४॥
७७
ऋषि ह्मणती धर्मदेवा । आमचा आशिर्वाद घ्यावा ॥१॥
पांडवपालक गोविंद । तिहीं लोकीं गाजे ब्रिद ॥२॥
भक्तिभावें केला वश्य । हरि सांभाळी तयास ॥३॥
रात्रंदिवस तुह्मांपासीं । दुजा ठाव नाहीं त्यासी ॥४॥
देव द्रौपदीतें सांभाळी । उभा पाठीसी वनमाळी ॥५॥
वनीं सांभाळी पांडवांसी । सुदर्शन त्याजपाशीं ॥६॥
हरिभक्तिं जाहला ऋणी । म्हणे नामयाची जनी ॥७॥
७८
वेदांतीं हें बोलिले । सिद्धांतीं हें नेमियेले ॥१॥
लागा लागा भक्तिवाटा । धरा हेंचि नेमनिष्ठा ॥२॥
वेदबाह्य तें कर्म । सांडीं न करीं अधर्म ॥३॥
तोचि एक होय ज्ञानी । देवनिष्ठ म्हणे जनी ॥४॥
७९
जनींचें बोलणें वाची नित्य कोणी । तयाचे आंगणीं तिष्ठतसे ॥१॥
जनीचिया पदां आखंडित गाये । तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥
जनीचे आवडे जयासी वचन । तयासी नारायण कृपा करी ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक ज्ञानदेवा । ऐसा वर द्यावा जनीसाठीं ॥४॥
८०
ऐसा वर देई हरी । गांई नाम निरंतरीं ॥१॥
पुरवीं आस माझी देवा । जेणें घडे तुझी सेवा ॥२॥
हेंचि आहे माझे मनीं । कृपा करीं चक्रपाणी ॥३॥
रुप न्याहाळूनियां डोळां । मुखीं नाम लागो चाळा ॥४॥
उदाराच्या राया । दासी जनी लागे पायां ॥५॥
८१
साधु आणि संत । जन्म द्यावा जी कलींत ॥१॥
मागणें तें हेंचि देवा । कृपा करीं हो केशवा ॥२॥
संत दयाळ परम । तया साक्षी नारायण ॥३॥
जनी म्हणे ऐसे साधु । तयापाशीं तूं गोविंदु ॥४॥
८२
विटेवरी ब्रह्म दिस । साधु संतांचा रहिवास ॥१॥
देव भावाचा अंकित । जाणे दासाचें तें चित्त ॥२॥
भक्ति जनी मागे देवा । तिचा मनोरथ पुरवा ॥३॥
८३
देवा देंई गर्भवास । तरीच पुरेल माझी आस ॥१॥
परि हे देखारे पंडरीं । सेवा नामयाचे द्वारीं ॥२॥
करी पक्षि कां शुकर । श्वान श्वापद मार्जार ॥३॥
ऐसी आशा हे मानसीं । म्हणे नामयाची दासी ॥४॥
८४
ऐसा पुत्र देंई संतां । तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥
गीता नित्य नेमें । वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥
संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥
कन्या व्हावी भागीरथी । तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥
ऐसे करी संतजना । दासी जनीच्या निधाना ॥५॥
८५
माझें दुःख नाशी देवा । मज सुख दे केशवा ॥१॥
आह्मां सुख ऐसें देई । तुझी कृपा विठाबाई ॥२॥
चरणीं अनन्य शरण । त्यासि नाहीं जन्म मरण ॥३॥
जनी म्हणे हेंचि मागें । धण्या सर्व तुज सांगें ॥४॥
८६
रुक्माई आईचें आहे ऐसें भाग्य । असावें आरोग्य चिरकाळ ॥१॥
सख्या पुंडलिका आवडतें स्थळ । असावें चिरकाळ स्वस्ति क्षेम ॥२॥
अहो संतजन घ्या आवडतें धन । असावें कल्याण चिरकाळ ॥३॥
जन्मोजन्मीं हेंचि मागें गोविंदासी । म्हणे जनी दासी नामयाची ॥४॥
८७
परधन कामिनी समूळ नाणीं मना । नाहीं हे वासना माया केली ॥१॥
तृष्णा हे अधम न व्हावी मजला । प्रेमाचा जिव्हाळा देंई तुझ्या ॥२॥
निरपेक्ष वासना देगा मज देवा । आणि तुझी सेवा आवडीची ॥३॥
शांतीचीं भूषणें मिरविती अंगी । वैष्णव आणि योगी ह्मणावे ते ॥४॥
असो तो अकुळी असो भलते याती । माथां बंदी प्रीती जनी त्यासी ॥५॥
८८
द्वारकेच्या राया । बुद्धि देगा नाम गाया ॥१॥
मतिमंद तुझी दासी । ठाव देंई चरणांपासीं ॥२॥
तुझे पदरीं पडलें खरी । आतां सांभाळ करीं हरी ॥३॥
न कळे हरीची करणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥
८९
संतांचा तो संग नव्हे भलतैसा । पालटावी दशा तात्काळिक ॥१॥
चंदनाचे संगें पालटती झाडें । दुर्बळ लांकडें देवामायां ॥२॥
हें कां ऐसें व्हावें संगती स्वभावें । आणिकें न पालटावें देहालागीं ॥३॥
तैसा निःसंगाचा संग अग्रगणी । जनी ध्याय मनीं ज्ञानेश्वरा ॥४॥
९०
संत हे कोण तरी देवाचे हे डोळे । पूजेविण आंधळे देवाचिये ॥१॥
कोण्या नेत्रें देव पाहे तुजकडे । यासाठीं आवडे संत करी ॥२॥
संत ऐसे करी देवाचे कान । सांडियेल्या ध्यान कोण ऐके ॥३॥
संत पुससी तरी देवाचे ते पाय । आगमा न गमे सोय मागाडीये ॥४॥
संत पुससी तरी देवाचें तें पोट । धरुनियां बोट दाविती हरी ॥५॥
संत म्हणसी तरी देवाचा हा गळा । जेणें रस आगळा वेदादिकां ॥६॥
संतसरी पुससी तरी देवाचें वदन । माझें तें वचन संत झाले ॥७॥
परादिया चारी सांडूनि मीपणीं । संत बोले वाणी विठोबाची ॥८॥
परेचिया परी आनंदा माझारीं । संत झाले अंतरीं पडजीभ देवा ॥९॥
क्षरजे नासिलें अक्षर तें काढिलें । निःशब्दाचें झालें बोले संत ॥१०॥
शब्द तो उडाला नाद तो बुडाला । भेद तो आटला माया भावीं ॥११॥
विठो वटावरीं पारविया झाले । केश ते वाढले माय संत ॥१२॥
कुरळ होऊनियां देती ते सुढाळ । म्हणे जनी वोवाळ जीवेंभावें ॥१३॥
९१
या वैष्णवाच्या माता । तो नेणवें देवा दैतां ॥१॥
तिहीं कर्म हें पुसिलें । अकर्म समूळ नाहीं केलें ॥२॥
कानाचे हे कान । झालें धरुनियां ध्यान ॥३॥
डोळियाचा डोळा । करुनी धाले प्रेम सोहळा ॥४॥
तोही वश्य नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥
९२
भक्तामाजीं अग्रगणी । पुंडलिक महामुनी ॥१॥
त्याचे प्रसादें तरले । साधुसंत उद्धरिलें ॥२॥
तोचि प्रसाद आम्हासीं । विटेवरी ह्रुषिकेषि ॥३॥
पुंडलिक बापमाय । दासी जनी वंदी पाय ॥४॥
९३
अळकापुरवासिनी समिप इंद्रायणी । पूर्वेसी वाहिनी प्रवाह तेथें ॥१॥
ज्ञानाबाई आई आर्त तुझे पायीं । धांवोनियां येई दूडदुडां ॥२॥
बहु कासाविस होतो माझा जीव । कनवाळ्याची कींव येऊं द्यावी ॥३॥
नामयाची जनी म्हणावी आपुली । पायीं सांभाळिली मायमापें ॥४॥
९४
आंधळ्याची काठी । अडकली कवणें बेटीं ॥१॥
माझिये हरणी । गुंतलीस कोणे रानीं ॥२॥
मुकें मी पाडस । चुकलें भोवें पाहें वास ॥३॥
तुजवीण काय करुं । प्राण किती कंठीं धरूं ॥४॥
आतां जीव जाऊं पाहे । धांव घालीं माझे आये ॥५॥
माझी भेटवा जननी । संतां विनवी दासी जनी ॥६॥
९५
पाहतां पंढरिराया । त्याच्या मुक्ति लागे पायां ॥१॥
पुरुषार्थे चारी । त्याचें मोक्ष आर्जव करी ॥२॥
धन संपत्तीचा दाता । होय पाहतां पंढरिनाथा ॥३॥
संताचे चरणीं । लोळे नाचे दासी जनी ॥४॥
९६
विष्णुमुद्रेचा अंकिला । तोचि वैष्णव एक भला ॥१॥
अहं जाळोनी अंगारा । सोहंभस्मी तीर्थ सारा ॥२॥
विष्णु माया द्वारावती । भक्तिमुद्रा त्या मिरवती ॥३॥
पंचायतन पूजी भावें । अहं सोहं भस्मीं नांवें ॥४॥
प्रेमतुळसी कानीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥
९७
वैष्णव तो कबीर चोखामेळा महार । तिजा तो चांभार रोहिदास ॥१॥
सजण कसाई बाया तो कसाब । वैष्णव तो शुद्ध एकनिष्ठ ॥२॥
कमाल फुलार मुकुंद जोहरी । जिहीं देवद्वारीं वस्ति केली ॥३॥
राजाई गोणाई आणि तो नामदेव । वैष्णवांचा राव म्हणवितसे ॥४॥
त्या वैष्णवाचरणीं करी ओंवाळणी । तेथें दासी जनी शरीराची ॥५॥
९८
वैष्णव तो एक इतर तीं सोंगें । ठसे देउनी अंगें चितारिती ॥१॥
जिचे योनि जन्मला तिसी दंडूं लागला । तीर्थरुप केला देशधडी ॥२॥
नाइकोनी ब्रह्मज्ञान जो का दुराचारी । अखंड द्वेष करी सज्जनांचा ॥३॥
विद्येच्या अभिमानें नाइके कीर्तन । पाखांडी हें म्हणे करिती काई ॥४॥
पंचरस पात्रा कांता हे बडविती । उद्धरलों ह्मणती आह्मी संत ॥५॥
कीर्तनाचा द्वेष करी तो चांडाळ । तयाचा विटाळ मातंगीसी ॥६॥
वैष्णव तो एक चोखामेळा महार । जनी म्हणे निर्धार केला संतीं ॥७॥
९९
पंढरीचा वारकरी । त्याचे पाय माझे शिरीं ॥१॥
हो कां उत्तम चांडाळ । पायीं ठेवीन कपाळ ॥२॥
वंद्य होय हरिहरा । सिद्ध मुनि ऋषेश्वरा ॥३॥
मुखीं नाम गर्जे वाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥
१००
आले वैष्णवांचे भार । दिले हरिनाम नगार ॥१॥
अवघी दुमदुमली पंढरी । कडकडाट गरुडपारीं ॥२॥
टाळ मृदंग धुमाळी । रंगणीं नाचे वनमाळी ॥३॥
ऐसा आनंद सोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥
शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral
View Comments
Hii