अभंग गाथा

संत जनाबाई अभंग २०१ते३५२

संत जनाबाई अभंग २०१ते३५२

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०१
सेना न्हावी भक्त भला । तेणें देव भुलविला ॥१॥
नित्य जपे नामावळी । लावी विठ्‌ठलाची टाळी ॥२॥
रुप पालटोनि गेला । सेना न्हावी विठ्‌ठल झाला ॥३॥
काखें घेउनी धोकटी । गेला राजियाचे भेटी ॥४॥
आपुले हातें भार घाली । राजियाची सेवा केली ॥५॥
विसर तो पडला रामा । काय करूं मेघःशामा ॥६॥
राजा अयनियांत पाहे । चतुर्भुज उभा राहे ॥७॥
दूत धाडूनियां नेला । राजियानें बोलाविला ॥८॥
राजा बोले प्रीतिकर । रात्रीं सेवा केली फार ॥९॥
राजसदनाप्रति न्यावें । भीतरींच घेउनी जावें ॥१०॥
आतां बरा विचार नाहीं । सेना म्हणे करुं काई ॥११॥
सेना न्हावी गौरविला । राजियानें मान दिला ॥१२॥
कितीकांचा शीण गेला । जनी म्हणे न्हावी झाला ॥१३॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०२
गोणाईने नवस केला । देवा पुत्र देंई मला ॥१॥
ऐसा पुत्र देंई भक्त । ज्याला आवडे पंढरीनाथ ॥२॥
शुद्ध देखोनियां भाव । पोटा आले नामदेव ॥३॥
दामाशेटी हरुषला । दासी जनीनें ओवाळिला ॥४॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०३
गोणाई राजाई दोघी सासू सुना । दामा नामा जाणा बापलेंक ॥१॥
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र । जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥
लाडाई गोडाई येसाई साखराई । चवघी सुना पाहीं नामयाच्या ॥३॥
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी । विडीपिशी जनी नामयाची ॥४॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०४
गोणाई राजाई दोघी सासू सुना । दामा नामा जाणा बापलेंक ॥१॥
नारा विठा गोंदा महादा चवघे पुत्र । जन्मले पवित्र त्याचे वंशीं ॥२॥
लाडाई गोडाई येसाई साखराई । चवघी सुना पाहीं नामयाच्या ॥३॥
लिंबाई ती लेकी आऊबाई बहिणी । विडीपिशी जनी नामयाची ॥४॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०५
सुंबाचा करदोडा रकटयाची लंगोटी । नामा वाळवंटीं कथा करी ॥१॥
ब्रम्हादिक देव येवोनि पाहाती । आनंदें गर्जती जयजयकार ॥२॥
जनी म्हणे त्याचें काय वर्णूं सुख । पहाती जे मुख विठोबाचें ॥३॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०६
मागें सत झाले । नाम्या ऐसें कोण बोले ॥१॥
नामा जातां राउळासी । देव बोले अवघियांसी ॥२॥
केवढें नवल सांगावें । दासी जनीचें पद लिहावें ॥३॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०७
पूर आला पंढरीसी । पाणी लागे पायरीसी ॥१॥
संतजन हो मिळाले । उठुनी नाम्याजवळी गेले ॥२॥
नामा सांगे विठोबासी । उतार द्यावा भिवरेसी ॥३॥
दीनवत्सल महाराज । जनी म्हणे केलें काज ॥४॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०८
सण दिवाळीचा आला । नामा राउळासी गेला ॥१॥
हातीं धरुनी देवासी । चला आमुच्या घरासी ॥२॥
देव तेथुनी चालिले । नामयाच्या घरा आले ॥३॥
गोणाईनें उटणें केलें । दामाशेटीनें स्नान केलें ॥४॥
पदर काढिला माथ्याचा । बाळ पुशिला नंदाचा ॥५॥
हातीं घेउनी आरती । चक्रपाणी ओंवाळती ॥६॥
जेऊनियां तृप्त झाले । दासी जनीनें विडे दिले ॥७॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २०९
वोढिला ताडिला । देव भक्तीनें फाडिला ॥१॥
एका प्रेमा नामासाठीं । भक्ति काढियला कंठीं ॥२॥
झाला नाम्याचा मजूर । मोळ्या बांधाटयाचा थर ॥३॥
भिंती चांदया रचिले । त्याचें छप्पर शेकारिलें ॥४॥
वरी सोडूनियां पाणी । धन्य भक्‍ता म्हणे जनी ॥५॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१०
वारा पाणी मुसळ धारा । तेणें मोडिलें छपरा ॥१॥
मग विठाई धांवली । हातीं चक्र धांवत आली ॥२॥
वासे लाविले चौफेर । क्षणामध्यें केलें घर ॥३॥
जागा झाला नामदेव । द्वारीं उभे पंढरिराव ॥४॥
डोयीं ठेवून पायांवरी । दासी जनी चरण चुरी ॥५॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २११
ज्ञानेश्वर म्हणे नाम्यासवें जेविसी । नाहीं ह्रुषिकेशी म्हणतसे ॥१॥
सांगितलें एक भलतेंचि बोलसी । आहे याची भ्रांति ज्ञानेश्वरा ॥२॥
बाहियेलें त्वरें ऐसें कांहीं काम । उठे मेघः- शाम तातडीनें ॥३॥
निरोप येवोनि सांगावा एकांतीं । म्हणे जनीप्रति पांडुरंग ॥४॥
देव म्हणे नाम्या ऐकावें वचन । येईल साधोन वेळ तुझी ॥५॥
जनी म्हणे आतां समजलें मज । धरीन उमज येथोनियां ॥६॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१२
आषाढी एकादशी । नामा होता उपवासी ॥१॥
देवें गरुड धाडिला । वेगीं बालाविलें त्याला ॥२॥
राही म्हणे पांडुरंगा । कोणें बोलाविलें सांगा ॥३॥
ऐसा भक्तराज निका । दासी जनीचा आत्मसखा ॥४॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१३
नामा येऊनियां पाहे । आजि कौतुक दिसताहे ॥१॥
व्रत निवेदी राजाई । लागे नामयाचे पायीं ॥२॥
नामा म्हणे या द्रव्यासी । आम्ही नातळों मानसीं ॥३॥
वेगीं बोलवा ब्राम्हण । करुं आतां संतर्पण ॥४॥
हातीं टाळ दिंडीगान । हेंचि आमचें सर्व धन ॥५॥
ऐसें आश्चर्य देखोनी । जनी हांसतसे मनीं ॥६॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१४
करुनी आरती । नामा आला घराप्रती ॥१॥
तेणें धरियेलें व्रता । अन्न न घ्यावें सर्वथा ॥२॥
ऐसा जाणोनिया नेम । अनुभवी पुरुषोत्तम ॥३॥
आषाढी एकादशी । विप्रवेषें ह्रुषिकेशी ॥४॥
आला नामयाचे सदनीं । नाम गाय दासी जनी ॥५॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१५
नमुनी ब्राम्हण । म्हणे मज द्यावें अन्न ॥१॥
नामा म्हणे एकादशी । इच्छित द्यावें फराळासी ॥२॥
अन्नावांचोनी आतां । मज नकोरे सर्वथा ॥३॥
हातापायांची बेगडी । विप्रें घातली मुरकुंडी ॥४॥
जीव सोडी चक्रपाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१६
जनसमुदाय मिळाला । धिःकारिती नामयाला ॥१॥
विप्र बोलावुनी वेगें । प्रेत नेलें चंद्रभागे ॥२॥
मोठें रचुनी सरण । मध्यें निजविला ब्राम्हण ॥३॥
शय्यागमनीं पहूडला । म्हणे अग्नि द्या आम्हाला ॥४॥
अग्नि दिला जयाप्रती । देव विमानीं पाहती ॥५॥
विस्मित झाला चक्रपाणी । प्रगट होय म्हणे जनी ॥६॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१७
अग्नी लागतां अंगासी । घाबरला ह्रुषिकेशी ॥१॥
निजरुपें प्रगटला । चरणीं मस्तक ठेविला ॥२॥
सोनसळा वैजयंती । कोटि सूर्य ते लोपती ॥३॥
नामा म्हणे विठोबाला । भला अंतरे पाहिला ॥४॥
हातीं धरुनी नामयासी । पाठ थापटी ह्रुषिकेशी ॥५॥
गेला राउळीं चक्रपाणी । भावें वंदी दासी जनी ॥६॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१८
ऐका हो नामयाचा जन्म मूळसंचित ॥धृ०॥
हिरण्यकश्यपकुळीं नामा प्रर्‍हाद । पद्मीणी नाम माझें श्रेष्‍ठ दासीचें पद ॥१॥
दुसरा जन्म याचा अंगद रामभक्त । मंथरा नाम माझें भरतें मारिली लात ॥२॥
द्वापारीं कृष्णसेवा उद्धव जन्मला । कुबज्या नाम माझें देवें उद्धार केला ॥३॥
कलींत नामदेव विठ्‌ठल चिंतनीं । त्याचीच सेवेलागीं दासीं जन्मली जनी ॥४॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २१९
अपूर्व कोणे एके काळीं । देव सभेच्या मंडळी ॥१॥
करी त्रैलोक्य भ्रमणा । करीं वाहे ब्रम्हवीणा ॥२॥
देती सर्वही सन्मान । सिद्ध साधू योगी जन ॥३॥
सांगे अपूर्व काहाणी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २२०
नारद सांगे मृत्युलोकीं । हरिश्चंद्र पुण्यश्लोकी ॥१॥
कैसा सत्त्वाचा समुद्र । ऐसा नाहीं नृपवर ॥२॥
नारदाची ऐकून गोष्‍ट । सुखावला तो वसिष्‍ठ ॥३॥
कोप विश्वामित्रा आला । कैसा वाढविता शिष्‍याला ॥४॥
तपतेजें सूर्यराशी । छळीन म्हणे हरिश्चंद्रासी ॥५॥
उदय पश्चिमे दिनकर । सत्त्व ढाळीना नृपवर ॥६॥
वसिष्‍ठाच्या ऐकुनी बोला । विश्वामित्रा क्रोध आला ॥७॥
जरी उतरेल माझ्या तुकीं । देईन आपुल्या तपासी ॥८॥
ऐसा दोघांचा संवाद । होतां उठला नारद ॥९॥
इंद्र म्हणे का निर्फळ । शब्दाशब्दीं वाढेल कळ ॥१०॥
ऐसें ऐकतां वचन । जनी म्हणे केलें गमन ॥११॥

संत जनाबाई अभंग २०१ते३५२ – २२१
इंद्रसभे झाला वाद । करुं रायासी सावध ॥१॥
येरीकडे ब्रम्हऋषी । कृपें वोळला शिष्यासी ॥२॥
नवी व्याली जैसी गाय । पक्षी अंडजीं झेपाय ॥३॥
बाप माझा तैशापरी । होय शिष्याचा साहाकारी ॥४॥
येऊनियां मागेल तूतें । छळ करील गाधिसुत ॥५॥
बापा सावध अंतरीं । सत्त्व ढाळील नानापरी ॥६॥
धरी श्वापदांच्या झुंडी । तुझ्या देशांत भवंडी ॥७॥
मानी शब्दाला आमुच्या । वना न जावें ऋषींच्या ॥८॥
ऐसें बोलोनी रायासी । गेला वसिष्‍ठ तपासी ॥९॥
तुझ्या सत्त्वालागीं हानी । करुं इच्छी म्हणे जनी ॥१०॥

२२२
विश्वामित्रें तत्क्षणीं । सिद्ध आश्रमा येउनी ॥१॥
बैसे येउनी आश्रमासी । करी मातंग यागासी ॥२॥
सहस्‍त्र अवदान आहुती । होतां प्रगटली शक्ति ॥३॥
विश्वामित्रें तयेवेळे । देवी वरदानाचे बळें ॥४॥
व्याघ्र हिंडती रानें रानें । बंद केलें येणें जाणें ॥५॥
कृषा न जाती कृषिक । तीर्थयात्रेसी पांथिक ॥६॥
धेनु न जाती वनासी । वाट नाहीं वेव्हारासी ॥७॥
प्रजा जाऊन राजसभे । हात जोडोनियां उभे ॥८॥
ऐसी प्रजेची हे वाणी । राजा विचारितो मनीं ॥९॥
गुरुवचन धरितां चित्तीं । माझी होईल अपकीर्ति ॥१०॥
राव निघाला स्वारीसी । म्हणे नामयाची दासी ॥११॥

२२३
नाना वाजंत्र्यांच्या ध्वनी । राजा आरुढला वहनीं ॥१॥
राव प्रवेशला वनीं । अवघीं श्वापदें मारुनी ॥२॥
आश्रमीं आणायासी राव । केलें ऋषीनें लाघव ॥३॥
मृग कनकाचा साजरा । आला रायाच्या सामोरा ॥४॥
गुणीं लाविलासे वाण । घेऊं पाहे त्याचा प्राण ॥५॥
येरु कीलान मारुनी जाय । धरणीं न ठेवितो पाय ॥६॥
राव लागे तया पाठीं । दम न समावे पोठीं ॥७॥
प्रवेशला तये वनीं । देखे अपूर्व नयनीं ॥८॥
धेनुव्याघ्र एके स्थानीं । चाटी एकमेकां दोन्हीं ॥९॥
निर्वैर श्वापदगण । राव विस्मय करी देखोन ॥१०॥
पुढें जातीं सुगंध पाणी । राव स्नानातें करुनी ॥११॥
भावें पूजिला गिरिजावर । नमन केलें जोडुनी कर ॥१२॥
विश्वामित्रें तया वनीं । दोघी रुपसा नयनीं ॥१३॥
रायापुढें नृत्य करी । टाळ विणा झणत्कारी ॥१४॥
द्रव्य आणविलें अपारे । राव देतो आपुल्या करें ॥१५॥
नाहीं द्रव्यासी कारण । तुझ्या स्वरुपासी लीन ॥१६॥
बोले मुनिवर्य दासी । राजा कोपला मानसीं ॥१७॥
आज्ञा केली प्रधानासी । मारा बाहेर घाला याशीं ॥१८॥
रक्तवइन आश्रमासी । म्हणे नामयाची दासी ॥१९॥

२२४
ऋषि अंगणीं कामिनी । लोळती येउनी दोघीजणी ॥१॥
तुम्हा दिला कोणें त्रास । त्याचा करीन मी ग्रास ॥२॥
आम्ही बोलिलों रायासी । घेत नाहीं उचितासी ॥३॥
ऐसें बोलतां वचन । राव कोपला दारुण ॥४॥
केलें प्रधानें ताडण । बाहेर घातलें मारुन ॥५॥
त्यांच्या परिसोनी बोला । विश्वामित्र कोपें आला ॥६॥
म्हणे रायासी अधमा । माझी प्रताप महिमा ॥७॥
वसिष्‍ठाच्या पडिभारें । मातलासी द्रव्यें थोरें ॥८॥
निर्वैर श्वापदांसी । कांरे मारिलें तयासी ॥९॥
वधूनियां शेवटीं त्यासी । मारियेल्या तापस दासी ॥१०॥
पुढें रसाळ आहे कथा । निद्रा लागेल नृपनाथा ॥११॥
स्वप्नीं मागेल दानासी । म्हणे नामयाची दासी ॥१२॥

२२५
विश्वामित्र द्विजचिन्ह । स्वप्नीं प्रगटे आपण ॥१॥
देखोनियां द्विजवरातें । नमियेलें जोडुनी हातें ॥२॥
राव बोले उदारपणीं । काय इच्छा आहे मनीं ॥३॥
दयावंत धर्ममूर्ती । तुझी तिहीं लोकीं कीर्ती ॥४॥
अंकुश कडिया लेखणी । राया वोपी माझ्या पाणी ॥५॥
उदारपणें देसी जरी । उदक घालीं माझे करीं ॥६॥
कृपा करुनी आम्हांवरी । आलें पाहिजे नगरीं ॥७॥
येथें संकल्पावांचून । नाहीं होत माझें येण ॥८॥
रायें घेऊन जीवन । ऋषिहस्तकीं घालून ॥९॥
एक नवल देखे दृष्‍टी । काळपुरुष उभा पाठीं ॥१०॥
लोहदंड घेउनी करी । घालुं पाहे त्याचे शिरीं ॥११॥
तेणें झाला भयाभीत । राव स्वप्नांत बरळत ॥१२॥
राव बैसला उठोन । करी देवाचें स्मरण ॥१३॥
तारामती पुसे राया । कांहो बरळलां स्वामिया ॥१४॥
राज्यदान सुकृतकोटी । एक काळपुरुष पाठीं ॥१५॥
लोहदंड घेऊन करीं । घालूं पाहे माझे शिरीं ॥१६॥
येरु म्हणे या जीवनीं । करा स्नानातें जाउनी ॥१७॥
अग्निमुखीं द्यावें दान । स्वप्नदोष नासती जाण ॥१८॥
म्हणे प्रधान महाराजा । दान करा कांहीं द्विजा ॥१९॥
ऐसें बोलतां वचन । आला विश्वामित्र जाण ॥२०॥
राजा बोले कर जोडून । शयनीं देखियेलें स्वप्न ॥२१॥
ह्याच स्वरुपा प्रमाण । ऐसा देखिला ब्राम्हण ॥२२॥
सिंहासन समेदिनी । राया देगा मजलागोनी ॥२३॥
आतां मागें दक्षणेसी । म्हणे नामयाची दासी ॥२४॥

२२६
ऋषि म्हणेरे समर्था । असो स्वप्नींची हे वार्ता ॥१॥
इच्छा धरुन आलों येथें । औट तुक दे कनकातें ॥२॥
कृपा करुन द्याल जरी । उदक घालीं माझे करीं ॥३॥
दया करा आम्हांवरी । आलें पाहिजे नगरीं ॥४॥
थें संकल्पावांचून । नाहीं होत माझें येणें ॥५॥
रायें घेउनी जीवन । ऋषि हस्तकीं घालून ॥६॥
विश्वामित्र शिविकासनीं । राव चालिला घेउनी ॥७॥
मार्गी वाद्यांचा लाघव । अयोध्येसी आला राव ॥८॥
राव प्रवेशला नगरीं । विश्वामित्र बैसला द्वारीं ॥९॥
दंड पडताळूनि हातीं । लक्षियेली तारामती ॥१०॥
उभी थरथरां कांपत । राया जाणविली मात ॥११॥
राव म्हणे ऋषेश्वर । कोण्या अन्यायानें मार ॥१२॥
केला संकल्प आम्हांसी । नाहीं दिलें द्क्षणेसी ॥१३॥
दान न देतां आम्हांसी । तूं कां गेलासी सदनासी ॥१४॥
हात बांधोनियां राया । दंडहस्तें मारी तया ॥१५॥
तंव आला रोहिदास । चरणीं ठेवी मस्तकास ॥१६॥
येरु रक्तांबर नयन । पुसे कवणाचा कवण ॥१७॥
राव म्हणे कुळभूषण । आहे आमुचा नंदन ॥१८॥
राजा पाचारी भांडारी । आणा कनकातें झडकरी ॥१९॥
मज दिलें राज्यदान । तेंचि घेसी तूं परतोन ॥२०॥
छत्र मुद्रा सिंहासन । ऋषि हस्तकीं ओपून ॥२१॥
हें तों आलें राज्यदानें । औट भार कनक देणें ॥२२॥
धनवत सौदागर । उभे रायाचे समोर ॥२३॥
धन देतों जी अपार । सोडा रायाला सत्वर ॥२४॥
विश्वामित्र म्हणे त्यांसी । काय करावें द्रव्यासी ॥२५॥
क्षितिवरी जितकें धन । तेंहि माझेंचि संपूर्ण ॥२६॥
नाहीं कोणाचा उपाव । जनी म्हणे रक्षील देव ॥२७॥

२२७
राव म्हणे अहो ऋषि । काशीखंड वाराणशी ॥१॥
तेथें जाऊनियां आम्ही । ऋण फेडूं तुमचें स्वामी ॥२॥
एक मासाची अवधी । तुम्हीं द्यावी कृपानिधी ॥३॥
ऋषि म्हणे खरें बोला । नातरी शापीन तिघांला ॥४॥
रोहिदास म्हणे त्यासी । गहाण राहीन तुम्हांपाशीं ॥५॥
पितृवचनाचें ऋण । त्यांचा उतराई होईन ॥६॥
ऋण हत्या आणि वैर । नाहीं चुकत मेल्यावर ॥७॥
ऐसी बाळकाची वाणी । ऐकूनि दचकला मनीं ॥८॥
ऋषि बोलला नृपासी । नको राहूं आमुचे देशीं ॥९॥
निकें निकें त्यासी म्हणे । बाहेर आलीं तिघेजणें ॥१०॥
वनीं निघाला त्वरित । झाला लोकांचा आकांत ॥११॥
लोट पूर जाती पळा । नेत्रीं उदक ढळढळां ॥१२॥
कैसा ब्राम्हण पहा हो । नृपचंद्रालागीं राहो ॥१३॥
राजा बाहेर दवडुनी । पाहे आमुचाचि धणी ॥१४॥
नगरलोकांसी फिरवुनी । राव निघाला तेथुनी ॥१५॥
अलंकार देखियेला । मागें विश्वामित्र आला ॥१६॥
माझ्या राज्यांतील संपत्ती । तारामती धरिली हातीं ॥१७॥
घेई भूषण उतरोनी । म्हणे नामयाची जनी ॥१८॥

२२८
विश्वामित्रें जाऊनि पुढें । वणवा लाविला चहूंकडे ॥१॥
धूम्रें दाटलें अंबर । ज्वाळा येती भयंकर ॥२॥
विश्वामित्रें काय केलें । राया बाळातें चुकविलें ॥३॥
दोघे न पडती दृष्‍टि । होवोनियां परम कष्‍टी ॥४॥
म्हणे अहा कटकटा । काय लिहिलें अदृष्‍टा ॥५॥
मेले वणव्यांत जळोनी । ऐसें आलें तिचे मनीं ॥६॥
पिटीललाट करतळें । जंग टाकी धरणी लोळे ॥७॥
म्हणे बाळा रोहिदासा । भेट देईंगा पाडसा ॥८॥
सूर्यवंशीं चुडारत्‍ना । प्राणपति गा निधाना ॥९॥
राव दृष्‍टि न पडतां । अग्नि खाईन तत्वतां ॥१०॥
ऐसें विचारिलें मनीं । म्हणे नामयाची जनी ॥११॥

२२९
धर्मशिळे आली राणी । ऋषि दचकला मनीं ॥१॥
अग्नि विझवोनी अंगें । सतीपुढें आला रागें ॥२॥
म्हणे कवणाची कवण । अग्नि खासी कवण्या गुणें ॥३॥
येरी म्हणे पांथिकातें । पति बाळ चुकले मातें ॥४॥
तुम्हीं असतील देखिले । मज सांगा जी वहिले ॥५॥
ऋषि बोले तिजलागून । मेले अग्नींत जळून ॥६॥
तारामती नेउनी तेथें । दाखविलीं दोन्ही प्रेतें ॥७॥
त्वचा अंगींची जळाली । हात पाय गोळा झालीं ॥८॥
देखे नृपाचें तें मढें । पाहें वल्लभा मजकडे ॥९॥
रुसूं नका बोला वेगें । गुजगोष्‍टी मजसंगें ॥१०॥
रोहिदास कवळी पोटीं । लावी लल्लाट लल्लाटीं ॥११॥
शोक करी तारामती । अस्त झाला तो गभस्ती ॥१२॥
प्रेत कवळी कां निर्फळ । गेला गेला हंसनीळ ॥१३॥
आतां प्राप्त झाली निशी । व्याघ्र भक्षील तिघांसी ॥१४॥
सति पुढोनियां प्रेत । नेलें ओढोनी परत ॥१५॥
उदर फोडोनी त्वरीत । टाकियेलें काढुनी आर्त ॥१६॥
रागें गुरगुरी तो जाणा । भय दावी क्षणक्षणा ॥१७॥
येरी नेत्र झांकियेले । पंचप्राण आकर्षिले ॥१८॥
तारामती सांडील प्राण । लटिकें प्रतिज्ञा वचन ॥१९॥
पतिपुत्र दोघेजण । आला घेउना ब्राम्हण ॥२०॥
नाहीं व्याघ्र ना वणवा । मृगजळाचा हेलावा ॥२१॥
तिघेजणें एक झालीं । दासी जनी आनंदली ॥२२॥

२३०
पंथ क्रमितां तिघांसी । आडवा आला कपटवेषी ॥१॥
होवोनियां वृद्ध विप्र । हातीं काठी भार्याकुमर ॥२॥
म्हणे धन्यरे नृपेशा । तुझी कीर्तिघोष ठसा ॥३॥
भेरी गर्जती त्रिभुवनीं । धांवून आलों मी ऐकुनी ॥४॥
आज्ञा करावी जी स्वामी । तुमचे शरणागत आम्ही ॥५॥
करुणा दाखवी रायासी । दीन आम्ही तीर्थवासी ॥६॥
पुढें प्रवास कठीण । पायीं नाहीं पायतण ॥७॥
तिघां बोपोनियां जोडे । जनी म्हणे जाती पुढें ॥८॥

२३१
आज्ञा करुनी सूर्यांसी । तपवी द्वादश कळेसी ॥१॥
बाप तपाच्या सामर्थे । आज्ञा वंदिली आदित्यें ॥२॥
पर्वताच्या लाह्या होती । असा प्रकाशला गभस्ती ॥३॥
रोहिदास म्हणे तात । बहू झालों तृषाक्रांत ॥४॥
भाकितसें हो करुणा । सत्वर मेळवीं जीवना ॥५॥
प्राप्त न होतां जरी तोय । जीव माझा जाऊं पाहे ॥६॥
बाळ कडे घेऊनियां । पैल दिसे तेथें छाया ॥७॥
उदक प्राशन करुनी । पंथ क्रमूं म्हणे जनी ॥८॥

२३२
पुढें जातां कष्‍टप्रेम । निर्मी पोह्याचा आश्रम ॥१॥
धर्मपोहेची कुसरी । शोभा रमणिय साजिरी ॥२॥
वृक्ष लागले अंबरीं । डोलताती नानापरी ॥३॥
फणस कर्दळी गंभेरी । आंबे नारळी खर्जुरी ॥४॥
चिंचा पपया जांबळी । गुंज खिरण्या रायकेळी ॥५॥
सीताफळें कवठें निंब । बोरें परीच्या दाळिंब ॥६॥
जाई मोगरा सेवंती । चांपा बकुल मालती ॥७॥
पारिजातक हे चमेली । झेंडू गुलाबास मखमली ॥८॥
तुळसी मंजुळ शोभती । नानापरी पुष्पजाती ॥९॥
प्राप्त वसंताचा काळ । मधु कुंजती कोकिळ ॥१०॥
रंभा ऐशा देवांगना । सर्व शृंगारी भूषणा ॥११॥
वेलबाळा तोयें सारी । उभ्या तिष्‍ठताती द्वारीं ॥१२॥
सुगंध वनीं शीतळ जळ । ऐसें शोभे रम्यस्थळ ॥१३॥
ऐसी देखोनी वाटिका । चोज नाहीं नृपनायका ॥१४॥
म्हणती हे धर्मपोये । जनी म्हणे पुढें जाये ॥१५॥

२३३
पोई अव्हेरितां राय । मागें ऋषि धांवताहे ॥१॥
धन्य धन्यरे नरेंद्रा । हातीं धरी हरिश्चंद्रा ॥२॥
उष्‍ण न ध्यानीं कहार । मार्गी श्रम झाला फार ॥३॥
करा आश्रम पुण्यता । आम्हां घडों द्यावें तीर्था ॥४॥
येथें केलिया आराम । व्यर्थ जाती वांयां श्रम ॥५॥
क्रमा चार दिवस । पहा पोईचा हा वास ॥६॥
द्यावी आम्हां सर्व जोडी । कृपा कराल ती थोडी ॥७॥
करा आनंदें भोजन । सुवासित उदकपान ॥८॥
म्हणे जावें आश्रमाला । पुढें पंथासी लागला। ॥९॥
त्राहें त्राहेंरे जगदीशा । सत्त्व रक्षिसील कैसा ॥१०॥
ऐसा छळक हा ऋषि । नेणों पार कैसा नेशी ॥११॥
आमची चिंता तुजला हरी । जनी म्हणे कृपा करी ॥१२॥

२३४
ऋषि आश्रमा येउनी । येतां देखे ताराराणी ॥१॥
भाव करुनि तात्काळ । कैसा निर्मिला नृपाळ ॥२॥
येऊनि आश्रमासी पाहे । डोळां देखियेला राय ॥३॥
शुद्ध सुमन सेजे नीरा । वालिताती विंझणवारा ॥४॥
सुगंध चंदन चर्चिती । नानापरींच्या उटया देती ॥५॥
रत्‍नखचिताची झारी । राय घेऊनियां करीं ॥६॥
करी आनंदें प्राशन । पुढें दिव्यान्न भोजन ॥७॥
ऐसें करितां अवलोकन । राजा पाहे शामवदन ॥८॥
नव्हे तोंचि कैसें झालें । सूर्या अंधत्व आलें ॥९॥
पुष्पभार शेषावरी । कैसा आजि झाला भारी ॥१०॥
ध्रुव मेरु गजबजिला । तैसी परी झाली रायाला ॥११॥
जोडोनियां करपद्मा । म्हणे बरी केली सीमा ॥१२॥
ऐसें होतें जरी मनीं । तरी कां राज्य दिलें दानीं ॥१३॥
बुद्धि भविष्यानुसार । मी तों आहे येथें स्थिर ॥१४॥
म्हणोनियां पुढें जाय । अव्हेरिलें धर्मपोय ॥१५॥
मार्गी देखियेलें राया । जनी म्हणे लागे पायां ॥१६॥

२३५
येतां देखोनिया बाळ । ऋषि धांवला तात्काळ ॥१॥
कडे घेऊनि तयाला । ऋषि आश्रमासी आला ॥२॥
तुझें मायबापीं प्रेम । होय पाहोनी आराम ॥३॥
सुखें करुनी भोजन । सुवासित उदकपान ॥४॥
करुनी क्रमियेलें पंथा । तिहीं सांगितली वार्ता ॥५॥
बाळ येतसे मागून । त्याचा परामर्ष करणें ॥६॥
म्हणोनी सारिलें विंदान । पुढें वाढिलें दिव्यान्न ॥७॥
रडे मोकलुनी धाय । येथें कल्पांतीं न राहे ॥८॥
पुढें लागला पंथासी । ऋषि तटस्थ मानसीं ॥९॥
वदनीं बोट घाली वोजा । ऋषि करीतसे चोजा ॥१०॥
ऐसें सत्त्वादिकांपुढें । तप खद्योत बापुडें ॥११॥
काय करणें ऐशियांसी । व्यर्थ मुकलों तपासी ॥१२॥
मार्गी तिघें एक झालीं । दासी जनी आनंदली ॥१३॥

२३६
ऐसें क्रमितां अवधारीं । विश्वेश्वराची नगरी ॥१॥
देखियेली वाराणसी । थोर आनंद मानसीं ॥२॥
म्हणती घ्यावें शिवदर्शन । तेणें श्रम निवारण ॥३॥
बाप येऊनि चौबारा । उभा धरुनि पदरा ॥४॥
म्हणे कोठेंरे दक्षणा । बरा होसी चुकावणा ॥५॥
जो का राजा सूर्यवंशीं । छत्र चामरें जयासी ॥६॥
माथां बांधोनियां तृण । घाली विक्रया आपण ॥७॥
राणी म्हणे प्राणेश्वरा । आधीं विक्रा माझा करा ॥८॥
रोहिदास कर जोडुनी । चरणीं मस्तक ठेवुनी ॥९॥
आधीं माझिया द्रव्यासी । तुम्ही द्यावें कौशिकासी ॥१०॥
ऐसें दोघांचें उत्तर । नवल करी ऋषिश्वर ॥११॥
काय करा याच्या बोला । म्हणे वजनीं सोनें घाला ॥१२॥
अग्निहोत्री तो ब्राम्हण । उभा रायापें येऊन ॥१३॥
देई तारामती तुक । एक भार हा कनक ॥१४॥
रोहिदास म्हणे ताता । माता स्नेह माझ्या चित्ता ॥१५॥
राव बोलिला वचन । शीघ्र यावें बा भेटोन ॥१६॥
उभी राहोनी वेल्हाळा । पोटीं बाळाचा उमाळा ॥१७॥
अश्रु ढाळिती लोचन । हा हा शब्दें करी रुदन ॥१८॥
बोले कौशिक ये माते । स्नेह सोड चाल पंथें ॥१९॥
करुनियां ताडातोडीं । पाहे कवतुक आवडी ॥२०॥
माता म्हणे बाळकासी । ममता असूं दे मजपाशीं ॥२१॥
रोहिदास ताराराणी । तेही घेतली ब्राम्हणीं ॥२२॥
मोल देऊनियां दुणें । राव घेतला डोंबानें ॥२३॥
घेऊनियां घरा आला । येऊन सांगतो भार्येला ॥२४॥
सेवक आणिला तुम्हांसी । सेवा घ्यावी आवडेल तैसी ॥२५॥
घागर घेऊनियां हातीं । पाणी आणी शीघ्र गति ॥२६॥
कुंभ घेऊनि चालिला । खडा हाणोनि फोडिला ॥२७॥
रिक्तपाणी येतां त्यासी । अवघे धुमसिती रायासी ॥२८॥
हा तो पहिलाच शकून । पुढें येणें काय करणें ॥२९॥
म्हणती हा तो नव्हे भला । यासी ठेवा स्मशानाला ॥३०॥
राव रक्षी स्मशानासी । म्हणे नामयाची दासी ॥३१॥

२३७
अनामिक त्यासी पुसे । तुमचें भोजनाचें कैसें ॥१॥
कर संपुष्‍ट जोडुनी । राव विनवी मधुर वचनीं ॥२॥
जेणें निघे तुमचें काम । राखा माझाही स्वधर्म ॥३॥
नृपा दिलें कोरें अन्न । सुखें करावें भोजन ॥४॥
धान्य घेऊनियां करीं । राव आला गंगातीरीं ॥५॥
स्नान संध्या नेम सारी । राजा स्वयंपाक करी ॥६॥
गाय अग्नीचा पैं ग्रास । ठाव वाढिला धर्मास ॥७॥
ग्रास घालावा वदनीं । आला विश्वामित्र मुनी ॥८॥
बैसावें जों भोजनासी । अकस्मात पावे ऋषी ॥९॥
एक भाग भक्षियेला । दुजा राजाचा उचलिला ॥१०॥
तृप्त होवोनि ऋषेश्वर । उठे देउनी ढेंकर ॥११॥
पदर कसुनी कटासी । सदा सादर सेवेसी ॥१२॥
निराहार शक्तिहीन । दिसे जैसा रंक दीन ॥१३॥
ऐसा छळी प्रतिदिनीं । म्हणे नामयाची जनी ॥१४॥

२३८
येरीकडे ताराराणी । द्विजा घरीं वाहे पाणी ॥१॥
छिद्र पाडोनी रांजणा । पाणी त्यामध्यें थारेना ॥२॥
नानापरीचें गांजणें । देती गाळी हो प्रदानें ॥३॥
पाणी वाहणें कीं खेळा । होऊं आली सांजवेळा ॥४॥
काळ कौशिक ब्राम्हणें । नित्य अग्निहोत्र करणें ॥५॥
रोहिदासा आज्ञा करी । समिधा आणाव्या झडकरी ॥६॥
संगें घेऊनियां गडी । वना चालिला तांतडी ॥७॥
धरुनियां सर्पवेष । रोहिदासा केला दंश ॥८॥
येउनी सांगती मातेस । सर्पें खादलें पुत्रास ॥९॥
गेला चंद्र उतरोनी । दिसे जैसी म्लान वदनी ॥१०॥
करुणा आली ब्राम्हणासी । जाय सांभाळीं पुत्रासी ॥११॥
रडे मोकलोनी धाय । म्हणे आतां मी करुं काय ॥१२॥
काय करूं आतां कैसें । कोठें गेलें हो पाडस ॥१३॥
प्राण राहिला संकटीं । करा पाडसाची भेटी ॥१४॥
निबिड अंधार काळोख । दीर्घस्वरें मारी हांक ॥१५॥
ठेंचा पायीं अडखळत । पुढें पायासी लागत ॥१६॥
बाळ कवळोनी हात । जनी म्हणे शंख करीत ॥१७॥

२३९
वेष धरोनी ब्राम्हण । तिसी करी संभाषण ॥१॥
खेद न करीं मानसीं । काय करणें होणारासी ॥२॥
वेगीं संस्कारीं याला । दिवसा मागतीं जा कामाला ॥३॥
घेऊनियां प्रेतासी । वेगीं चेतवी अग्नीसी ॥४॥
ज्वाळा अवलोकितां नयनीं । राव आला तत्‌क्षणीं ॥५॥
म्हणे कोण गे तूं येथें । येरी म्हणे तुमचा सुत ॥६॥
कैचा सुत कैसा काय । आमचा हक कोठें आहे ॥७॥
करुणा ग्लानी करी त्याची । म्हणे गोष्‍ट हे तों कैंची ॥८॥
बरेपणें जांई आतां । दंड बैसतलि माथां ॥९॥
घेंई प्रेत ओसंगळी । वेगें प्रवेशे देउळीं ॥१०॥
आडवें प्रेत झोपीं जाय । ऋषि धांवे लवलाहे ॥११॥
उदर चिरोनियां नखीं । मांस कवळें घाली मुखीं ॥१२॥
येऊनियां नगरनारी । जनी म्हणे शंख करी ॥१३॥

२४०
धांवा धांवा नगरवासी । लास भक्षिते लेंकुरासी ॥१॥
अवघे होऊनियां गोळा । कोणी न जातो देउळा ॥२॥
जाळ करोनी पाहती । शेण धुळी धोंडे माती ॥३॥
मारोनी बाहेर घातली । केली डोंबाचे हवालीं ॥४॥
हिच्या करा शिरच्छेदाला । तंव तो आज्ञापी रायाला ॥५॥
रायें घेऊनियां तिला । आणियेलें ठिकाणाला ॥६॥
म्हणे करीं हो स्मरण । तुझें कुळदैवत कोण ॥७॥
खर्ग पुसोनियां धारा । घाव घाली जो शिरा ॥८॥
ऋषि धांवला सत्वरी । वरच्यावरी कर धरी ॥९॥
म्हणे माग मी प्रसन्न । येरी बोले हास्यवदन ॥१०॥
रोहिदासा ऐसा पुत्र । हरिश्चंद्र राजा भ्रतार ॥११॥
याचक विश्वामित्रा ऐसा । जन्मोजन्मीं दे जगदीशा ॥१२॥
बापा भली केली सीमा । तप वोपितों मी तुम्हां ॥१३॥
गगनीं विमानें दाटती । सुमनभार वरुषती ॥१४॥
वेगीं उतरलें विमान । नामयाची जनी म्हण ॥१५॥

२४१
दूत विनविती कर जोडुनी । म्हणती आरुढावें विमानीं ॥१॥
ऋषि म्हणे न घडे ऐसें । ह्याची तृप्ति नाहीं आस ॥२॥
पटावरोनी काढिला । पटीं बैसवीन ह्याला ॥३॥
थोर वाजत गाजत । विप्र मंत्रघोष करीत ॥४॥
विजयी झाला हरिश्चंद्र । आडवा पावला परिवार ॥५॥
लक्षानुलक्ष आरत्या करिती । नगरनारी वोवाळिती ॥६॥
ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्‍ती जाला पट । गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥९॥

२४२
थालीपाक ऐकतां । हरि वारी जन्मव्यथा ॥१॥
दुर्योधनाच्या घरासी । आला दुर्वास हो ऋषी ॥२॥
सेवें बहुत तोषविला । वर माग तूं इच्छिला ॥३॥
शिष्‍यासह रानीं जावें । इच्छाभोजन मागावें ॥४॥
अंतर शाप द्यावा । आतां जातों वर द्यावा ॥५॥
हर हर शब्द थोर केला । झाला वनांत गलबला ॥६॥
नवल सर्वांसी वाटलें । जनी म्हणे ऋषि आले ॥७॥

२४३
मध्यरात्रीं ऋषिसहित । वना आले अकस्मात्‌ ॥१॥
पंडुसुत जागे झाले । ऋषि समस्त वंदिले ॥२॥
धर्म भीमाकडे पाहे । सत्त्वहानि होत आहे ॥३॥
द्रौपदीनें धांवा केला । देव जेवितां उठिला ॥४॥
ऋषि तृप्त केले वनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

२४४
करचरण प्रक्षाळुनीं । उभी ठेली वृंदावनीं ॥१॥
जोडोनियां करकमळ । म्हणे धांवरे गोपाळ ॥२॥
कृष्णा पाहतोसी काय । सत्वहानि होत आहे ॥३॥
ऋषि स्नानासी कोपिष्‍ट । गेले सांगोनियां स्पष्‍ट ॥४॥
दिवसा कर्माचा उगाणा । सर्व सारोनियां जाणा ॥५॥
आतां येतों शीघ्र गती । अन्नें वाढा पात्रावरुतीं ॥६॥
अन्न न देखतां डोळां । भस्म करीन सकळां ॥७॥
गेला घालोनि संकटीं । लाज राखें जगजेठी ॥८॥
कोणी नाहीरे निर्वाणीं । म्हणे नामयाची जनी ॥९॥

२४५
ताट विस्तारी रुक्मिणी । देव बैसले भोजनीं ॥१॥
इतुक्यामध्यें अकस्मात्‌ । ध्वनि उमटली कानांत ॥२॥
धांवा ऐकतां श्रवणीं । ताट लोटी चक्रपाणी ॥३॥
उठिला खडबडोनि कैसा । पावे बहिणीचिया क्लेशा ॥४॥
उभी वृंदावनीं बाळा । पुढें देखिला सांवळा ॥५॥
मुगुट कुंडलें मेखळा । वैजयंति वनमाळा ॥६॥
शंख चक्र आयुधें करीं । दिसे घवघवीत हरी ॥७॥
झळके पीतांबर कासे । नयनीं कोंदला प्रकाशे ॥८॥
पाहतां आनंदली मनीं । म्हणे नामयाची जनी ॥९॥

२४६
रत्‍नाचे मचकीं पहुडे चक्रपाणी । चोळीत रुक्मिणी चरणांबुज ॥१॥
कानीं पडियले द्रौपदीचे बोल । उठे घननीळ तांतडीनें ॥२॥
रुक्मिणी म्हणे ऐक एक गोष्‍ट । पडिलें संकटीं तान्हें माझें ॥३॥
टाकिला गरुड अनवाणी पाय । जनी म्हणे माय धांविन्नली ॥४॥

२४७
हांसें आलें द्रौपदीसी । बापा वचन परियेसीं ॥१॥
सर्व अरिष्‍ट भंजना । तुजलागीं बाहों कोणा ॥२॥
एक भाव तुझे पायीं । यावेगळें कांहीं नाहीं ॥३॥
थाळी माजी पाहतां अन्न । होय क्षुधेचें हरण ॥४॥
थाळी दाखवी देवासी । कैंचा विश्वास तुजसी ॥५॥
धांडोळितां कष्‍टें बहुतें । किंचित शाखापत्र तेथें ॥६॥
निर्मी कैवल्याचा दानी । म्हणे नामयाची जनी ॥७॥

२४८
कर पसरिला भगवंतें । घाली द्रौपदी देंठातें ॥१॥
म्हणे पावो विश्वंभर । बोले द्रौपदी सुंदर ॥२॥
देतां तृप्तीचा ढेंकर । धालें त्रैलोक्य अपार ॥३॥
दावी कौतुक श्रीपती । पर्वत अन्नाचे पाहाती ॥४॥
उष्ण घवघवीत कैसी । वाफा उठती आकाशीं ॥५॥
नानापरिचीं दिव्यान्नें । डोळां दावी नारायणें ॥६॥
चोज सर्वांचिया मनीं । म्हणे नामयाची जनी ॥७॥

२४९
येरीकडे गंगातीरीं । कवतुक दाखवी श्रीहरी ॥१॥
र्मासहित साहीजण । ऋषिलागीं देती अन्न ॥२॥
रत्‍नखचित मंडपा आंत । पंगती बैसल्या आनंदभूत ॥३॥
नानापरिचें दिव्य अन्न । वाढी द्रौपदी आपण ॥४॥
मिठी पडली वदनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

२५०
म्हणती माथां असतें तोंड । अन्नें भक्षितों उदंड ॥१॥
कैंचीं पोटें आमुचीं लहान । गोड धर्माघरचें अन्न ॥२॥
उदरें सागराच्या ऐसीं । करुनी यावें धर्मापाशीं ॥३॥
तृप्ति द्रौपदीच्या हातें । नित्य भक्षाया अन्नातें ॥४॥
वदन करवेना तळीं । वरुती चंद्राची मंडळी ॥५॥
चंद्री लागलीसे नेत्रा । कोण सांभाळितें धोत्रा ॥६॥
तरी आवडी भोजनीं । म्हणे नामयाची जनी ॥७॥

२५१
ऐशा धाल्या ऋषिपंक्ती । ढेंकर आनंदाचे देती ॥१॥
तृप्ति बाणली सर्वांसी । तरी आवड अन्नापाशीं ॥२॥
उठले हात प्रक्षाळुनी । विडे घेतले सर्वांनीं ॥३॥
न बैसवे सुखासनीं । अवघे प्रवर्तले शयनीं ॥४॥
ते देखोनि निद्रिस्थ । साही जणें झालीं गुप्त ॥५॥
माया निर्मियेली जैसी । आतां गुप्त झालीं तैसीं ॥६॥
कोणा न कळे याची करणी । म्हणे नामयाची जनी ॥७॥

२५२
म्हणे पाचारा भूदेवा । धर्म म्हणे जावें भीमा ॥१॥
गंगातिरासी येऊन । नमियेल ऋषिजन ॥२॥
त्वरा करा ऋषिजन । पात्रीं विस्तारलें अन्न ॥३॥
म्हणती बापा ऐसें नव्हे । पोट आहे किंवा काय ॥४॥
आतां स्वस्थ प्रसादें । तृप्त झालीं ऋषिवृंदें ॥५॥
कैंचा नष्‍ट दुर्योधन । आम्हां धाडिलें दुर्जनें ॥६॥
कष्‍टी करितां अंबऋषी । चक्र लागलें पाठीसी ॥७॥
तेचि गोष्‍टी झाली आतां । शीघ्र पळावें तत्त्वता ॥८॥
माझा आशिर्वाद धर्मा । नित्य कल्याणची तुम्हां ॥९॥
ऋषि निघाले तेथुनी । म्हणे नामयाची जनी ॥१०॥

२५३
ऐसा योग घडे ज्यातें । धन्य माता आणि तात ॥१॥
अखंड वासना । ब्रम्हार्पण देवार्चना ॥२॥
ब्रम्हभावें हो देवा । ऐसा पूजी जो भूदेवा ॥३॥
नम्रता चरणीं । म्हणे जनी सरली मनीं ॥४॥

२५४
जावोनी राउळा जोडूनियां हात । बोले ज्ञानेश्वर विठोबासी ॥१॥
करावीं हीं तीर्थे आवड अंतरीं । घ्यावें बरोबरी नामदेवा ॥२॥
ऐकतांचि ऐसें म्हणे पांडुरंग । न धाडितां राग येईल तुज ॥३॥
तयाविण मज घडी जरी जाय । युगा ऐसी होय ज्ञानेश्वरा ॥४॥
जनी म्हणे मग नामया पाचारी । कृपाळुवा हरि मायबाप ॥५॥

२५५
जाय बरोबरी नामया तूं जाय । न चले उपाय कांहीं येथें ॥१॥
करुं काय मज पडिलें सांकडें । उल्लंघेना भीड मज याची ॥२॥
नामा म्हणे ऐका स्वामी नारायणा । एक विज्ञापना परिसावी ॥३॥
कटावरी कर नाहीं ज्या देवाचे । न घे मी तयाचें दरुशन ॥४॥
मारितांचि हाक यावें त्वां झडकरी । बरें म्हणे हरि नामयासी ॥५॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान चांगया । जनी म्हणे तया सांगतसे ॥६॥

२५६
तुम्ही सकळिक संत आहांत सज्ञान । हें माझें अज्ञान फार आहे ॥१॥
याजबरोबर चालावी हो वाट । मोडतील कांटे सांभाळावे ॥२॥
हळूहळू जावें करुं नका घाई । चालायाची नाहीं संवय त्यासी ॥३॥
लागतांचि भूक न धरी हा निर्धार । घ्यावा समाचार क्षणक्षणा ॥४॥
जनी म्हणे ऐसें बोलिला घननीळ । नेत्रींहुनी जळ वाहतसे ॥५॥

२५७
वियोग नाम्याचा न साहे गोपाळा । न जाय राउळा पांडुरंग ॥१॥
पद्माळ्यांत तेव्हां राहे विश्वंभर । कळे समाचार रुक्मिणीसी ॥२॥
चलावें मंदिरीं स्वामी पुरुषोत्तमा । येईल गे नामा माझा जेव्हां ॥३॥
तयाविण मज दाही दिशा ओस । न लगे चित्तास गोड कांहीं ॥४॥
जनी म्हणे ऐसी आवड नाम्याची । म्हणोनियां त्याची झालें दासी ॥५॥

२५८
जो जो जो जो रे गोरक्षा । जगदोद्धारा जगदीशा ॥१॥
शुद्ध सुमनांची सेज । भक्तिभावें आंत नीज ॥२॥
माता उन्मनी केवळ । निजीं निजले गोपाळ ॥३॥
मागें घालुनी आनंदा । सुखें निजे बा गोविंदा ॥४॥
अद्वय नाम गीतीं गातां । दासी जनी कैंची आतां ॥५॥

२५९
पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला ।
चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला ॥१॥
धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकुळा लावियेली । यादववृंदा ही गोष्‍ट बरी नाहीं केली ॥३॥
सत्त्ववानाचा बहु केला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
सखा म्हणविसी त्याचें नासी बळ । जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥

२६०
माझें अचडें बचडें छकुडें ग राधे रुपडें । पांघरुं घाली तीं कुंचडें ॥धृ०॥
हरि माझा गे सांवळा । पायीं पैंजण वाजे खुळखुळा ।
यानें भुलविल्या गोपिबाळा ॥१॥
हरि माझा गे नेणता । करी त्रिभुवनाचा घोंगता ।
जो कां नांदे त्रिभुवनीं ॥२॥
ऐसे देवाजीचे गडी । पेंद्या सुदाम्याची जोडी ।
बळिभद्र त्याचा गडी ॥३॥
जनी म्हणे तूं चक्रपाणी । खेळ खेळतो वृंदावनीं ।
लुब्ध झाल्या त्या गौळणी ॥४॥

२६१
विठोबा मला मूळ धाडा । धांवत येईन दुडदुडां ।
चरणीं लोळेन गडबडा । माझा जीव झाला वेडा ॥१॥
कर ठेवूनि कटावरी । उभा राहिला विटेवरी ।
मुकुट घातला सरी । कलगी खोविली वरी ॥२॥
पितांबर नेसूनियां पिंवळा । गळां पैं तुळसीच्या माळा ।
कीं रुप सुंदर सांवळा । तेज झळके झळाळा ॥३॥
नामदेवाचें कौतुक । मला सांपडलें माणीक ।
विठोबा पाहुनी तुझें मुख । हारपली माझी तहान भूक ॥४॥
विठोबा तुझी संगत बरी । जैसा चंदन मैलागिरी ।
संत चालले पंढरी । निशाण पताका जरतारी ॥५॥
जसी मोहोळासी लुब्ध मासी । तसी तूं सखी माझी होसी ।
सुख दुःख सांगेन तुजपासी । माझा जीव होईल खुषी ॥६॥
काळी मध्यान रात्र झाली । फेरी विठ्‌ठलाची आली ।
जनी म्हणे चूक पडली । भेट नाहीं विठ्‌ठलाची झाली ॥७॥

२६२
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल गुरुचे पायीं ।
कापुर जळूनि गेला तेथें काजळीं उरली नाहीं ॥१॥
साखर पेरुनी ऊंस काढिला कान झाला डोळा ।
निबर बायको भ्रतार तान्हा सासरा तो भोळा ॥२॥
नवल वर्तलें नवल वर्तलें नवल चोजवेना ।
डोहामाजी मासोळीनें वांचविलें जीवना ॥३॥
नवल वर्तलें नवल वर्तलें अनाम चक्रपाणी ।
गोकुळ चोरुन नेलें तेथें कैंची दासी जनी ॥४॥

२६३
खंडेराया तुज करितें नवसू । मरूं देरे सासू खंडेराया ॥१॥
सासू मेल्यावरी तुटेल आसरा । मरुं दे सासरा खंडेराया ॥२॥
सासरा मेलिया होईल आनंद । मरूं दे नणंद खंडेराया ॥३॥
नणंद सरतां होईन मोकळी । गळां घालीन झोळी भंडाराची ॥४॥
जनी म्हणे खंडो अवघे मरुं दे । एकटी राहूं दे पायापशीं ॥५॥

२६४
ऐसा हा देवानें थोर पवाडा केला । पूर्व अवतारीं झाला हयग्रीव ॥१॥
मग अंबऋषिसाठीं पडियेला संकटीं । मच्छ झाला पोटीं समुद्राच्या ॥२॥
होउनी कच्छप पर्वत धरिला । वराहें मारिला दैत्य भार ॥३॥
तयाचा सहोदर मृत्यु नाहीं ऐसा वर । तेव्हां नारसिंह झाला अवतार ॥४॥
अर्धनारी नटेश्वर दुसरा तो वामन । भार्गव तो निधान दाशरथी ॥५॥
होऊनियां कृष्‍ण कंस वधियेला । आतां बुद्ध झाला सखा माझा ॥६॥
लीला अवतारीं हरि करी खेळ नाना । म्हणे जनी जाणा तैं मी होत्यें ॥७॥

२६५
बगायाला गेले क्रियमाण शिडी । घालूनियां उडी तेथें आले ॥१॥
पुरवीं या नवसा म्हणवी गा देवा । टोंचियेले जीवा गळ देहीं ॥२॥
आठ चारी फेरे फिरविती त्यासी । पाहती नवसासी पुरले नाहीं ॥३॥
दुःख सुख तेथें पाहुनी प्रमाण । करिती समान क्रीयमाण ॥४॥
दुरुनी पाहती दावी जनी दासी । म्हणे नामयासी पहावें स्वामी ॥५॥

२६६
शेष बाणातें पुसत । कोणे काजा आला येथ ॥१॥
बाण करी अहाकार । मुखें पडलीया धूर ॥२॥
वृक्ष पाडी हो मक्षिका । तैसें येथें झालें देखा ॥३॥
काय शिखंडीचे बाण । करिती भीष्माचें पतन ॥४॥
तेथें मागितलें पाणी । म्हणे नामयाची जनी ॥५॥

२६७
माझा हा विठोबा येईल गे केव्हां । जेवीन मी तेव्हां गोणाबाई ॥१॥
जाउनी राउळा तयासी तूं पाहें । लवकरी बाहे भोजनासी ॥२॥
भरलिया रागें क्रोध त्याचा साहे । लवकरी बाहे भोजनासी ॥३॥
ज्ञानेश्वराघरीं असेल बैसला । जाउनी विठ्‌ठला पाहें तेथें ॥४॥
जनी म्हणे देवा चला पुरुषोत्तमा । खोळंबला नामा भोजनासी ॥५॥

२६८
अहो मांडियला खेळ । बुद्धि रंग बुद्धिबळ ॥१॥
कैंचा शह आला । प्याद्याखालीं फरजी मेला ॥२॥
शहबाजु झाली । जनी म्हणे मात केली ॥३॥

२६९
भक्ति ते कठीण इंगळासी खाई । रिघणें त्या डोहीं कठीण असे ॥१॥
भक्ति तें कठीण विषग्रास घेणें । उदास पैं होणें जीवें भावें ॥२॥
भक्ति ते कठीण भक्ति ते कठीण । खड्‌गाची धार बाण न सोसी तया ॥३॥
भक्ति ते कठीण विचारुनि पाहे जनी । भक्ति योगें संतसमागमीं सर्व सिद्धी ॥४॥

२७०
वाचे म्हणतां सोपान । प्राप्त वैकुंठचि जाण ॥१॥
सोपानदेव करितां जप ॥२॥
सोपानदेव धरितां ध्यानें । पुनः जन्मा नाहीं येणें ॥३॥
दासी जनी तल्लिन झाली । सोपान चरणीं विनटली ॥४॥

२७१.
गातां विठोबाची कीर्ती । महापातकें जळती ॥१॥
सर्व सुखाचा आगर । उभा असे विटेवर ॥२॥
आठवितां पाय त्याचे। मग तुह्यां भय कैंचें ॥३॥
कायावाचामनें भाव । जनी ह्मणे गावा देव ॥४॥

२७२.
जन्मा येऊनियां देख । करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्‌ठलाचें । तेणें सार्थक देहाचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा । शेषा वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम तारक त्रिभुवनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

२७३.
नाम फुकट चोखट । नाम घेतां नये वीट ॥१॥
जड शिळा ज्या सागरीं । आत्मारामें नामें तारी ॥२॥
पुत्रभावें स्मरण केलें । तया वैकुंठासी नेलें ॥३॥
नाममहिमा जनी जाणे । ध्यातां विठ्‌ठलचि होणें ॥४॥

२७४.
एक नाम अवघें सार । वरकड अवघें तें असार ॥१॥
ह्यणोनियां परतें करा । आधीं विठ्‌ठल हें स्मरा ॥२॥
जनी देवाधिदेव । एक विठ्‌ठल पंढरीराव ॥३॥

२७५.
काय हे करावे । धनवंतादि अवघे ॥१॥
तुझें नाम नाहीं जेथें ।
नको माझी आस तेथें ॥२॥
तुजविण बोल न मानीं । करीं ऐसें ह्मणे जनी ॥३॥

२७६.
विठ्‌ठल नामाची नाहीं गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥
गळां बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥
ऐसा अभिमानी मेला । नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥
नामा बोध करी मना । दासी जनी लागे चरणा ॥४॥

२७७.
तो हा भक्तांचे तोडरीं । वाचे उच्चारितां हरी ॥१॥
काम होऊनि निष्‍काम । काम भावभक्ति प्रेम ॥२॥
तो हा पूर्ण काम होय । अखंडित नाम गाय ॥३॥
काम निष्काम झाला मनीं । वंदी नाचे दासी जनी ॥४॥

२७८.
नाम विठोबाचें घ्यावें । मग पाउल टाकावें ॥१॥
नाम तारक हें थोर । नामें तारिले अपार ॥२॥
आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥
नाम दळणीं कांडणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

२७९.
निराकारींचें नाणें । शुद्ध ब्रह्मींचें ठेवणें ॥१॥
प्रयत्‍नें काढिलें बाहेरी । संतसाधु सवदागरीं ॥२॥
व्यास वसिष्‍ठ नारद मुनी । टांकसाळ घातली त्यांनीं ॥३॥
उद्धव अक्रूर स्वच्छंदीं । त्यांनीं आटविली चांदी ॥४॥
केशव नामयाचा शिक्का । हारप चाले तिन्ही लोकां ॥५॥
पारख नामयाची जनी । वरती विठोबाची निशाणी ॥६॥

२८०.
माझा शिणभाग गेला । तुज पाहतां विठ्‌ठला ॥१॥
पाप ताप जाती । तुझें नाम ज्याचे चित्तीं ॥२॥
अखंडित नामस्मरण । बाधूं न शके तया विघ्‍न ॥३॥
जनी ह्मणे हरिहर । भजतां वैकुंठीं त्या घर ॥४॥

२८१
नाम विठोबाचें थोर । तरला कोळी आणि कुंभार ॥१॥
ऐसी नामाची आवडी । तुटे संसाराची बेडी ॥२॥
नाम गाय वेळोवेळां । दासी जनीसी नित्य चाळा ॥३॥

२८२.
मारुनियां त्या रावणा । राज्य दिधलें बिभिषणा ॥१॥
सोडवुनी सीता सती । राम अयोध्येस येती ॥२॥
ख्याति केली रामायणीं । ह्मणे नामयाची जनी ॥३॥

२८३.
येऊं ऐसें जाऊं । जनासंगें हेंचि दाऊं ॥१॥
आपण करुं हरिकीर्तन । जाणोनी भक्तीचें जीवन ॥२॥
नाम संशयछेदन । भवपाशाचें मोचन ॥३॥
जनी ह्मणे हो देवासी । होईल त्याला कसणी ऐसी ॥४॥

२८४.
हरिहर ब्रह्मादिक । नामें तरले तिन्ही लोक ॥१॥
ऐसा कथेचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥२॥
जपें तपें लाजविलीं । तीर्थे शरणागत आलीं ॥३॥
नामदेवा कीर्तनीं । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥४॥
देव श्रुतीं देती ग्वाही । जनी ह्मणे सांगूं कायी ॥५॥

२८५.
व्हावें कथेसी सादर । मन करुनियां स्थीर ॥१॥
बाबा काय झोंपी जातां । झोले चौ‍र्‍यांशींचे खाता ॥२॥
नरदेह कैसारे मागुता । भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥
आळस निद्रा उटाउठी । त्यजा स्वरुपीं घाला मिठी ॥४॥
जनी ह्मणे हरिचें नाम । मुखीं ह्मणा धरुनि प्रेम ॥५॥

२८६.
पुंडलिक भक्तबळी । विठो आणिल भूतळीं ॥१॥
अनंत अवतार केवळ । उभा विटेवरी सकळ ॥२॥
वसुदेवा न कळे पार । नाम्यासवें जेवी फार ॥३॥
भक्त भावार्था विकला । दासी जनीला आनंद झाला ॥४॥
२८७.
भला भला पुंडलिका । तुझ्या भावार्थाचा शिक्का ॥१॥
भलें घालूनियां कोडें । परब्रह्म दारापुढें ॥२॥
घाव घातला निशाणीं । ख्याति केली त्रिभुवनीं ॥३॥
जनी ह्मणे पुंडलिका । धन्य तूंचि तिहीं लोकां ॥४॥
२८८.
पंढरीचें सुख पुंडलिकासी आलें । तेणें हें वाढिलें भक्तालागीं ॥१॥
भुक्ति मुक्ति वरदान दिधलें । तेंहि नाहीं ठेविलें आपणापाशीं ॥२॥
उदार चक्रवर्ती बाप पंडलिक । नामें विश्वलोक उद्धरिले ॥३॥
२८९.
अरे विठया विठया । मूळ मायेच्या कारटया ॥१॥
तुझी रांड रंडकी झाली । जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥
तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ रडे ॥३॥
उभी राहूनि आंगणीं । शिव्या देत दासी जनी ॥४॥
२९०.
जन्म खातां उष्‍टावळी । सदा राखी चंदावळी ॥१॥
राहीरुक्मिणीचा कांत । भक्तिसाठीं कण्या खात ॥२॥
देव भुलले पांडुरंग । ऐसा जाणावा श्रीरंग ॥३॥
जनी ह्मणे देवराज । करी भक्ताचें हो काज ॥४॥
२९१.
ऐसा आहे पांडुरंग । भोग भोगूनि निसग ॥१॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या सत्यत्व दाविलें ॥२॥
जैसी वांझेची संपत्ति । तैसी संसार उत्पत्ति। ॥३॥
तेथें कौचे बा धरिसी । ब्रह्मीं पूर्ण जनी दासी ॥४॥
२९२.
स्मरतांचि पावसी । तरी भक्तांसी लाधसी ॥१॥
ऐसा नाहीं न घडे देवा । वांयां कोण करी सेवा ॥२॥
न पुरतां आस । मग कोण पुसे देवास ॥३॥
कोठें चक्रपाणी । तुज आधीं लाही जनी ॥४॥
२९३.
बाप रकुमाबाई वर । माझें निजाचें माहेर ॥१॥
तें हें जाणा पंढरपुर । जग मुक्तीचें माहेर ॥२॥
तेथें मुक्ति नाहीं ह्मणे । जनी न पाहे याचें वदन ॥३॥
२९४.
अनंत लावण्याची शोभा । तो हा विटेवरी उभा ॥१॥
पितांबर माल गांठीं । भाविकांसी घाली मिठी ॥२॥
त्याचे पाय चुरी हातें । कष्‍टलीस माझे माते ॥३॥
आवडी बोलें त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥
ऐसा ब्रह्मींचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥
२९५.
देव देखिला देखिला । नामें ओळखुनी ठेविला ॥१॥
तो हा विटेवरी देव । सर्व सुखाचा केशव ॥२॥
जनी ह्मणे पूर्ण काम । विठ्‌ठल देवाचा विश्राम ॥३॥
२९६.
योगीं शीण झाला । तुजवांचुनी विठ्‌ठला ॥१॥
योग करितां अष्‍टांग । तुजविण शुका रोग ॥२॥
बैसला कपाटीं । रंभा लागे त्याच्या पाठीं ॥३॥
तंई त्वांचि सांभाळिला । जेव्हां तुज शरण आला ॥४॥
सांगोनी पुत्रातें । त्वांचि छळिलें कश्यपातें ॥५॥
अमराच्या राया । ह्मणे जनी सुखालया ॥६॥
२९७.
आळवितां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥
ते हे यशोदेच्या बाळा । बरवी पाहातसें डोळां ॥२॥
विटेवरी उभा नीट । केली पुंडलिकें धीट ॥३॥
स्वानंदाचें लेणें ल्याली । पाहून दासी जनी धाली ॥४॥
२९८.
स्तन पाजायासी । आली होती ते माउसी ॥१॥
तिच्या उरावरी लोळे । विठो माझा क्रीडा खेळे ॥२॥
मेल्यें मेल्यें कृष्णनाथा । सोडीं सोडींरे अनंता ॥३॥
लिंग देह विरविरलें । जनी ह्मण विठ्‌ठलें ॥४॥
२९९.
अहो यशोदेचा हरी । गोपिकांसी कृपा करी ॥१॥
वेणु वाजवितो हरी । सर्व देवांचा साह्यकारी ॥२॥
धांवे धांवे गाई पाठीं । जनी ह्मणे जगजेठा ॥३॥
३००.
विठो माझा लेंकुरवाळा । संगें लेंकुरांचा मेळा ॥१॥
निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी ॥२॥
पुढें चाले ज्ञानेश्वर । मागें मुक्ताई सुंदर ॥३॥
गोरा कुंभार मांडिवरी । चोखा जीवा बरोबरी ॥४॥
बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी ॥५॥
जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा ॥६॥
३०१.
नोवरीया संगें वर्‍हाडीया सोहोळा । मांडे पुरणपोळ्या मिळे अन्न ॥१॥
परीसाचेनीसंगें लोहो होय सोनें । तयाचीं भूषणें श्रीमंतासी ॥२॥
जनी ह्मणे जोड झाली विठोबाची । दासी नामयाची म्हणोनियां ॥३॥
३०२.
तुझ्या निजरुपाकारणें । वेडावलीं षड्‌दर्शनें ॥१॥
परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां देवासीं ॥२॥
चारीश्रमें हो कष्‍टती । वेदशास्त्रें धुंडाळिती ॥३॥
परि कवणें रीति तुला । न जाणवे जी विठ्‌ठला ॥४॥
तुझी कृपा होय जरी । दासी जनी ध्रुपद करी ॥५॥
३०३.
पंढरी सांडोनी जाती वाराणसी । काय सुख त्यांसी आहे तेथें ॥१॥
तया पंचक्रोसी ह्मणती मरावें । मरोनियां व्हावें जीवनमुक्त ॥२॥
नको गा विठोबा मज धाडूं काशी । सांगेन तुजपाशीं ऐक आतां ॥३॥
मरचीमान्न वेरण स्तंभीं घाली । घालोनियां गाळी पापपुण्य ॥४॥
जावोनियां तेथें प्रहर दोन रात्रीं । सत्य मिथ्या श्रोतीं श्रवण करा ॥५॥
आई आई बाबा ह्मणती काय करुं । ऐसें दुःख थोरू आहे तिथें ॥६॥
इक्षुदंड घाणा जैसा भरी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥
लिंगदेहादिक करिती कंदन । तेथील यातना नको देवा ॥८॥
न जाय तो जीव एकसरी हरी । रडती नानापरी नानादुःखें ॥९॥
अमरादिक थोर थोर भांबावले । भुलोनियां गेले मुक्तिसाठीं ॥१०॥
ती ही मुक्ति माझी खेळे पंढरीसी । लागतां पायांसी संतांचिया ॥११॥
ऐसिये पंढरी पहाती शिखरीं । आणि भीमातीरीं मोक्ष आला ॥१२॥
सख्या पुंडलिका लागतांचि पाया । मुक्ति म्हणे वांयां गेलें मी कीं ॥१३॥
घर रिघवणी मुक्ति होय दासी । मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥
मोक्ष सुखासाठीं मुक्ति लोळे । बीं नेघे कोणी कदा काळीं ॥१५॥
मोक्ष मुक्ति जिंहीं हाणितल्या पायीं । आमुची ती काय धरिती सोयी ॥१६॥
समर्थाचे घरीं भिक्षा नानापरी । मागल्या पदरीं घालिताती ॥१७॥
अंबोल्या सांडोनी कोण मागे भीक । सांराजाचें सुख तुझें ॥१८॥
जनी ह्मणे तुज रखुमाईची आण । जरी मज क्षण विसंबसी ॥१९॥

३०४.
पाय जोडूनि विटेवरी । कर ठेउनी कटावरी ॥१॥
रुप सांवळें सुंदर । कानीं कुंडलें मकराकार ॥२॥
गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥
गरूड सन्मुख उभा । ह्मणे जनी धन्य शोभा ॥४॥

३०५.
येगे माझे विठाबाई । कृपादृष्‍टीनें तूं पाहीं ॥१॥
तुजविण न सुचे कांहीं । आतां मी वो करुं कांहीं ॥२॥
माझा भाव तुजवरी । आतां रक्षीं नानापरी ॥३॥
येई सखये धांउनी । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

३०६.
हात निढळावरी ठेवुनी । वाट पाहें चक्रपाणी ॥१॥
धांव धांव पांडुरंगे । सखे जिवलगे अंतरंगे ॥२॥
तुजवांचूनि दाही दिशा । वाट पाहातें जगदीशा ॥३॥
हांसें करुं नको जनासी । ह्मणे नामयाची दासी ॥४॥

३०७.
सख्या घेतलें पदरीं । आतां न टाकावें दुरी ॥१॥
थोरांचीं उचितें । हेंचि काय सांगों तूंतें ॥२॥
ब्रह्मियाच्या ताता । सज्जना लक्षुमीच्या कांता ॥३॥
आपुली म्हणवूनि । आण गावी दासी जनी ॥४॥

३०८.
गंगा गेली सिंधुपाशीं । त्याणें अव्हेरिलें तिसी ॥१॥
तरी तें सांगावें कवणाला । ऐसें बोलें बा विठ्‌ठला ॥२॥
जळ काय जळचरा । माता अव्हेरी लेंकुरा ॥३॥
जनी ह्मणे शरण आलें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥

३०९.
माझी आंधळयाची काठी । अडकली कवणे बेटीं ॥१॥
आतां सांगूं मी कवणासी । धांवें पावें ह्रुषिकेशी ॥२॥
तुजवांचुनी विठ्‌ठला । कोणी नाहींरे मजला ॥३॥
माथा ठेवीं तुझे चरणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

३१०.
सख्या पंढरीच्या नाथा । मज कृपा करीं आतां ॥१॥
ऐसें करीं अखंडित । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥
वेधु माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जीव ओंवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥

३११.
कां गा न येसी विठ्‌ठला । ऐसा कोण दोष मला ॥१॥
मायबाप तूंचि धनी । मला सांभाळीं निर्वाणीं ॥२॥
त्वां बा उद्धरिले थोर । तेथें किती मी पामर ॥३॥
दीनानाथा दीनबंधू । जनी ह्मणे कृपासिंधू ॥४॥

३१२.
अगा रुक्मिणीनायका । सुरा असुरा प्रिय लोकां ॥१॥
ते तूं धांवें माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥
अगा शिवाचिया जपा । मदन ताता निष्पापा ॥३॥
आपुली म्हणवुनी । अपंगावी दासी जनी ॥४॥

३१३.
नाहीं केली तुझी सेवा । दुःख वाटतसे माझे जिवा ॥१॥
नष्‍ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला । तें त्वां सोसिलें विठ्‌ठला ॥३॥
रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं लागलासी ॥४॥
क्षमा करावी देवराया । दासी जनी लागे पायां ॥५॥

३१४.
येरे येरे माझ्या रामा । मनमोहन मेघःश्यामा ॥१॥
संतमिसें भेटी । देंई देंई कृपा गोष्‍टी ॥२॥
आमची चुकवी जन्म व्याधी । आह्यां देंई हो समाधी ॥३॥
जनी ह्मणे चक्रपाणी । करीं ऐसी हो करणी ॥४॥

३१५.
अहो नारायणा । मजवरी कृपा कां कराना ॥१॥
मी तो अज्ञानाची राशी । ह्मणोन आलें पायांपाशीं ॥२॥
जनी ह्मणे आतां । मज सोडवीं कृपावंता ॥३॥

३१६.
तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटतसे जीवा ॥१॥
नष्‍ट पापीण मी हीन । नाहीं केलें तुझें ध्यान ॥२॥
जें जें दुःख झालें मला । तें तूं सोशिलें विठ्‌ठला ॥३॥
क्षमा करीं देवराया । दासी जनी लागे पायां ॥४॥

३१७.
आधीं घेतलें पदरीं । आतां न धरावें दुरी ॥१॥
तुम्हा थोराचें उचितें । हेंचि काय सांगूं तूंतें ॥२॥
अहो ब्रह्मियाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥
दयेच्या सागरा । जनी ह्मणे अमरेश्वरा ॥४॥

३१८.
आह्यीं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढरीराया ॥१॥
सरिता गेली सिंधूपाशीं । जरी तो ठाव न दे तिसी ॥२॥
जळ कोपलें जळचरासी । माता न घे बाळकासी ॥३॥
ह्मणे जनी आलें शरण । जरी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥

३१९.
हा दीनवत्सल महाराज । जनासवें काय काज ॥१॥
तुझी नाहीं केली सेवा । दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥
रात्रंदिवस मजपाशीं । दळूं कांडूं तूं लागसी ॥३॥
जें जें दुःख झालें मला । तें तें सोसिलें विठ्‌ठला ॥४॥
क्षमा कीजे पंढरिराया । दासी जनी लागे पायां ॥५॥

३२०.
ऐक बापा ह्रुषिकेशी । मज ठेवीं पायांपाशीं ॥१॥
तुझें रुप पाहीन डोळां । मुखीं नाम वेळोवेळां ॥२॥
हातीं धरिल्याची लाज । माझें सर्व करीं काज ॥३॥
तुजविण देवराया । कोणी नाहींरे सखया ॥४॥
कमळापति कमळपाणी । दासी जनी लागे चरणीं ॥५॥

३२१.
पोट भरुनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी ॥१॥
धिरा धिरा पांडुरंगा । मज कां टाकिलें निःसंगा ॥२॥
ज्याचा जार त्यासी भार । मजला नाहीं आणिक थार ॥३॥
विठाबाई मायबहिणी । तुझे कृपें तरली जनी ॥४॥

३२२.
अविद्येच्या वो रात्रीं । आडकलों अंधारीं ॥१॥
तेथुनी काढावें गोविंदा । यशोदेच्या परमानंदा ॥२॥
तुझें सन्निधेचे पाशीं । ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥
तुझे संगती पावन । उद्धरिले ब्रह्में पूर्ण ॥४॥
अजामेळ शुद्ध केला । ह्मणे दासी जनी भला ॥५॥

३२३.
धन्य कलत्र माय । सर्व जोडी तुझे पाय ॥१॥
सखा तुजवीण पाहीं । दुजा कोणी मज नाहीं ॥२॥
माझी न करावी सांडणी । ह्मणे तुझी दासी जनी ॥३॥

३२४.
रुक्मिणीच्या कुंका । सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥
तूं धांव माझे आई । सखे साजणी विठाबाई ॥२॥
शिवाचिया जपा । मदनताता या निष्‍पापा ॥३॥
दयेच्या सागरा । ह्मणे जनी अमरेश्वरा ॥४॥

३२५.
मी वत्स माझी गायी । नय आतां करुं काई ॥१॥
तुह्मीं तरी सांगा कांहीं । शेखी विनवा विठाबाई ॥२॥
येंई माझिये हरणी । चुकलें पाडस दासी जनी ॥३॥

३२६.
सख्या पंढरीच्या राया । घडे दंडवत पायां ॥१॥
ऐसें करीं अखंडित । शुद्ध प्रेम शुद्ध चित्त ॥२॥
वेध माझ्या चित्ता । हाचि लागो पंढरिनाथा ॥३॥
जावें ओंवाळुनी । जन्मोजन्मीं ह्मणे जनी ॥४॥

३२७.
कां गा उशीर लाविला । माझा विसर पडिला ॥१॥
तुजवरी संसार । बोळविलें घरदार ॥२॥
तो तूं आपुल्या दासासी । ह्मणे जनी विसंबसी ॥३॥

३२८.
किती सागूं तूंतें । बुद्धि शिकवणें हें मातें ॥१॥
सोमवंशाच्या भूषणा । प्रतिपाळीं हर्षे दीनां ॥२॥
शिकवावें तुंतें । हाचि अपराध आमुतें ॥३॥
स्वामीलागीं धीट ऐसी । ह्मणती शिकवी जनी दासी ॥४॥

३२९.
शिणल्या बाह्या आतां । येऊनियां लावीं हाता ॥१॥
तूं मार्झे वो माहेर । काय पहातोसी अंतर ॥२॥
वोंवाळुनी पायां । जिवेंभावें पंढरिराया ॥३॥
धर्म ताता धर्म लेंकी । ह्मणे जनी हें विलोकीं ॥४॥

३३०.
योग न्यावा सिद्धी । सकळ गुणाचिया निधी ॥१॥
अरुपाच्या रुपा । साब राजाचिया जपा ॥२॥
ब्रह्मियाचा ताता । ह्मणे जनी पंढरिनाथा ॥३॥

३३१.
माय मेली बाप मेला । आतां सांभाळीं विठ्‌ठला ॥१॥
मी तुझें गा लेकरुं । नको मजशीं अव्हेरूं ॥२॥
मतिमंद मी तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशीं ॥३॥
तुजविण सखे कोण । माझें करील संरक्षण ॥४॥
अंत किती पाहासी देवा । थोर श्रम झाला जीवा ॥५॥
सकळ जिवाच्या जीवना । ह्मणे जनी नारायणा ॥६॥

३३२.
अहो सखीये साजनी । ज्ञानाबाई वो हरणी ॥१॥
मज पाडसाची माय । भक्ति वत्साची ते गाय ॥२॥
कां गा उशीर लाविला । तुजविण शिण झाला ॥३॥
अहो बैसलें दळणीं । धांव घालीं ह्मणे जनी ॥४॥

३३३.
काय करूं या कर्मासी । धांव पाव ह्रुषिकेशी ॥१॥
नाश होतो आयुष्याचा । तुझें नांव नये वाचा ॥२॥
काय जिणें या देहाचें । अखंड अवघ्या रात्रीचें ॥३॥
व्यर्थ कष्‍टविली माता । तुझें नाम नये गातां ॥४॥
जन्म मरणाचें दुःख । म्हणे जनी दाखवीं मुख ॥५॥

३३४.
अहो ब्रह्मांड पाळका । ऐकें रुक्मिणीच्या कुंका ॥१॥
देवा घेतलें पदरीं । तें तूं टाकूं नको दुरी ॥२॥
होतें लोकांमध्यें निंद्य । तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥
विनवीतसे दासी जनी । परिसावी माझी विनवणी ॥४॥

३३५.
येंई जीवाचिया जीवा । रामा देवाचिया देवा ॥१॥
सर्व देव बंदीं पडिले । रामा तुझी सोडविले ॥२॥
मारुनियां लंकापती । सोडविली सीता सती ॥३॥
देवा तुमची ऐसी ख्याती । रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥

३३६.
अहो देवा हरिहर । उतरीं आह्यां भवपार ॥१॥
देवा आह्मी तुझे दास । करुं वैकुंठीं वो वास ॥२॥
जनी म्हणे कल्पवृक्ष । देव दृष्‍टासी पैं भक्ष ॥३॥

३३७.
शरण आलों नारायणा । आतां तारीं हो पावना ॥१॥
शरण आला मारुतिराया । त्याची दिव्य केली काया ॥२॥
शरण प्रल्हाद तो आला । हिरण्यकश्यपू मारिला ॥३॥
जनी ह्मणे देवा शरण । व्हावें भल्यानें जाणोन ॥४॥

३३८.
ऐक बापा माझ्या पंढरीच्या राया । कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥
माझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस । न करीं निरास आर्तभूतां ॥२॥
त्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा । अभय तो द्यावा कर तयां ॥३॥
जैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा । अढळपद ध्रुवा दिधलेंसे ॥४॥
उपमन्यु बाळका क्षीराचा सागरू । ऐसा तूं दातारु काय वानूं ॥५॥
ह्मणे दासी जनी आलें या कीर्तनीं । तया कंटाळुनी पिटूं नका ॥६॥

३३९.
गजेंद्रासी उद्धरिलें । आह्मीं तुझें काय केलें ॥१॥
तारिली गणिका । तिहीं लोकीं तुझा शिक्का ॥२॥
वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥३॥
गुणदोष मना नाणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥

३४०.
राजाई गोणाई । अखंडित तुझे पायीं ॥१॥
मज ठेवियेलें द्वारीं । नीच ह्मणोनी बाहेरी ॥२॥
नारा गोंदा महादा विठा । ठेवियलें अग्रवाटा ॥३॥
देवा केव्हां क्षेम देसी । आपुली ह्मणोनी जनी दासी ॥४॥

३४१.
काय करूं पंढरीनाथा । काळ साह्य नाहीं आतां ॥१॥
मज टाकिलें परदेशीं । नारा विठा तुजपाशीं ॥२॥
श्रम बहु झाला जीवा । आतां सांभाळीं केशवा ॥३॥
कोण सखा तुजवीण । माझें करी समाधान ॥४॥
हीन दीन तुझे पोटीं । जनी ह्मणे द्यावी भेटी ॥५॥

३४२.
तुझे पाय रुप डोळा । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥
काय करुं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥
जन्मा येऊनियां दुःख । नाहीं पाहिलें श्रीमुख ॥३॥
लळे पुरविसी आमुचे । ह्मणे जनी ब्रिद साचें ॥४॥
७३.
वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्‌ठला ॥१॥
तूं वो माझी निज जननी । मज कां टाकियेलें वनीं ॥२॥
धीर किती धरुं आतां । कव घालीं पंढरिनाथा ॥३॥
मला आवड भेटीची । धनी घेईन पायांची ॥४॥
सर्व जिवांचे स्वामिणी । ह्मणे जनी माय बहिणी ॥५॥
३४४.
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥
माझा रंग तुझिया गुणीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
३४५.
आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥
येंई येंई पांडुरंगे । भेटी देंई मजसंगें ॥२॥
मी बा बुडतें बहु जळीं । सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥
राग न धरावा मनीं । ह्मणे नामयाची जनी ॥४॥
३४६.
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥
विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥
अगे क्षेत्र माये सखे पंढरिये । मोकलीते पाय जीव जातो ॥३॥
विश्वाचिये माते सुखाचे अमृत । सखा पंढरिनाथ विनवी तरी ॥४॥
तूं मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनियां जनी घालीं पायीं ॥५॥
३४७.
कां गे निष्‍ठुर झालीसी । मुक्या बाळातें सांडिसी ॥१॥
तुज वांचोनिया माये । जीव माझा जावों पाहे ॥२॥
मी वत्स माझी माय । नये आतां करुं काय ॥३॥
प्राण धरियेला कंठीं । जनी ह्मणे देंई भेटी ॥४॥
३४८.
माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं ॥१॥
मुकें तुझें मी पाडस । चुकलें माये पाहें त्यास ॥२॥
चुकली माझिये हरिणी । फिरतसे रानोरानीं ॥३॥
आतां भेटवा जननी । विनवितसे दासी जनी ॥४॥
३४९.
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥
धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥
धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव । त्याचे पाय देव आह्यां भेटी ॥३॥
नामयाची जनी पालट पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥
३५०.
चिंतनीं चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥
उन्मनीच्या मुखा आंत । पांडुरंग भेटी देत ॥२॥
कवटाळुनी भेटी पोटीं । जनी ह्मणे सांगूं गोष्‍टी ॥३॥
३५१.
देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥
धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥
रात्रंदिवस भाव विठ्‌ठलाचे पायीं । चित्त ठायींचे ठायीं मावळलें ॥३॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥
३५२.
पुंडलिकें नवल केलें । गोपिगोपाळ आणिले ॥१॥
हेंचि देंई ह्रुषिकेशी । तुझें नाम अहर्निशीं ॥२॥
नलगे आणिक प्रकार । मुखीं हरि निरंतर ॥३॥
रुप न्याहाळिन डोळां । पुढें नाचेन वेळोवेळां ॥४॥
संर्वाठायीं तुज पाहें । ऐसें देऊनि करीं साह्य ॥५॥
धांवा करितां रात्र झाली । दासी जनीसी भेट दिली ॥६॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral