संत जनाबाई

संत जनाबाई अभंग १०१ते२००

संत जनाबाई अभंग १०१ते२००

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०१
स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥
संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥
विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥
न विचारितां कुळ गणिका उद्धरिली । नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥
ऋषींचीं कुळें उच्चारिलीं जेणें । स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥
नामयाची जनी भक्तितें सादर । माझें तें साचार विटेवरी ॥६॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०२
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥
तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥
रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ॥३॥
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥
ऐशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला ध्यावें ॥५॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०३
सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥
धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रुदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥
आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्‌ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥
नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रुदयीं राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥४॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०४
वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रुपडें ॥१॥
आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥
चराचरीं जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥
माझें नाठवे मीपण । तेथें कैंचें दुजेपण ॥४॥
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०५
धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥१॥
ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्‌ठल कोंडिला ॥२॥
शब्दें केली जडाजुडी । विठ्‌ठल पायीं घातली बेडी ॥३॥
सोहं शब्दाचा मारा केला । विठ्‌ठल काकुलती आला ॥४॥
जनी म्हणे बा विठ्‌ठला । जीवें न सोडीं मी तुला ॥५॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०६
द्ळूं कांडूं खेळूं । सर्व पाप ताप जाळूं ॥१॥
सर्व जिवामध्यें पाहूं । एक आह्मी होउनी राहूं ॥२॥
जनी म्हणे ब्रह्म होऊं । ऐसें सर्वांघटी पाहूं ॥३॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०७
चरण विठोबाचे देखिले । साही रिपु हारपले ॥१॥
नाहीं नाहीं ह्मणती आह्मी । सांगासी त्या लागूं कामीं ॥२॥
नाहीं तरी जाऊं देशीं । जनी नामयाची दासी ॥३॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०८
वैराग्य अभिमानें फिरविलें जातें । ह्मणवोनी यातें भाव खुंटा ॥१॥
संचित मातृका वैरणी घातली । अव्यक्तिं दळिलीं व्यक्ताव्यक्त ॥२॥
नामरुपा आदि दळियेलें सर्व । पीठ भरी देव पंढरीचा ॥३॥
नवल हा देव बैसला दळणीं । नाहीं केली जनी नामयाची ॥४॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०९
भ्रांती माझें मन प्रपंचीं गुंतलें । श्रवण मनन होउनी ठेलें ॥१॥
बापें बोधिलें बापें बोधिली । बोधुनी कैसी तद्रुप झाली ॥२॥
निज्रध्यासें कैसा अवघाचि सांपडला । कीं विश्वरुपीं देखिला बाईयांनो ॥३॥
नामयाची जनी स्वयंबोध झाला । अवघाचि पुसिला ठाव देखा ॥४॥

संत जनाबाई अभंग १०१ते२०० – ११०
संतमहानुभाव येती दिगंबर । नम्रतेचें घर विरळा जाणें ॥१॥
निवाले मीपण तें जें ठायीं नाहीं । सोहं शब्द सोई तेथें कैंची ॥२॥
पाहतां हा कोण दावितां हा कोण । पाहतां दावितां हे खूण विरळा जाणें ॥३॥
नामयाची जनी वस्तु झाली । अवघ्यांसी बुडाली परब्रह्मीं ॥४॥

१११
त्या वैष्णवांच्या माता । तो नेणे देवताता ॥१॥
तिहीं कर्मे हें पुसिलें । अकर्म समूळ नाहींसें केलें ॥२॥
कानाचा हो कान । झालें धरुनियां ध्यान ॥३॥
डोळियाचा हो डोळा । करुनी झालें प्रेम सोहळा ॥४॥
तोही वसे नरदेहीं । जनी दासी वंदी पायीं ॥५॥

११२
देहभाव प्राण जाय । तेव्हां हें धैर्य सुख होय ॥१॥
तया निद्रे जे निजले । भाव जागृती नाहीं आले ॥२॥
ऐसी विश्रांति लाधली । आनंद कळा संचरली ॥३॥
तेथें सर्वांग सुखी झालें । लिंगदेह विसरलें ॥४॥
त्या एकी एक होता । दासी जनी नाहीं आतां ॥५॥

११३
जोड झालीरे शिवासी । भ्रांत फिटली जिवाची ॥१॥
आनंदची आनंदाला । आनंद बोधचि बोधला ॥२॥
आनंदाची लहरी उठी । ब्रह्मानंद गिळिला पोटीं ॥३॥
एक पण जेथें पाहीं । तेथें विज्ञाप्ति उरली नाहीं ॥४॥
ऐसी सदुरुची करणी । दासी जनी विठ्‌ठल चरणीं ॥५॥

११४
बाई मी लिहिणें शिकलें सद्‌गुरायापासीं ॥ध्रु०॥
ब्रह्मीं झाला जो उल्लेख । तोचि नादाकार देख ।
पुढें ओंकाराची रेख । तूर्या ह्मणावें तिसी ॥१॥
माया महतत्त्वाचें सुभर । तीन पांचाचा प्रकार ।
पुढें पंचविसांचा भार । गणती केली छत्तीसीं ॥२॥
बारा सोळा एकविस हजार । आणीक सहाशांचा उबार ।
माप चाले सोहंकार । ओळखिले बावन्न मात्रेंसी ॥३॥
चार खोल्या चार घरीं । चौघे पुरुष चार नारी ।
ओळखुनी सर्वांशी अंतरीं । राहिले पांचव्यापासीं ॥४॥
पांच शहाणे पांच मूर्ख । पांच चाळक असती देख ।
पांच दरवडेखोर आणिक । ओळखिलें दोघांसी ॥५॥
एक बीजाचा अंकूर । होय वृक्षांशीं विस्तार ।
शाखापत्रें फळ फुलभार । बीजापोटीं सामावे ॥६॥
कांतीण तंतूशीं काढून । वरी क्रीडा करिती जाण ।
शेवटीं तंतूशीं गिळून । एकटी राहे आपैसी ॥७॥
वेदशास्त्र आणि पुराणा । याचा अर्थ आणितां मना ।
कनकीं नगाच्या भूषणा । अनुभव वाटे जीवासीं ॥८॥
नामदेवाच्या प्रतापांत । शिरीं विठोबाचा हात ।
जनी म्हणे केली मात । पुसा ज्ञानेश्वरासी ॥९॥

११५
नम्रतेविण योग्यता मिरविती । ते केवीं पावती ब्रह्मसुख ॥१॥
लटिकें नेत्र लावूनि ध्यान पैं करिती । ते केवीं पावती केशवातें ॥२॥
एक संत म्हणविती नग्न पैं हिंडती । अंतरींची स्थिति खडबड ॥३॥
झालेपणाचे गुण दिसताती सगुण । वस्तु ते आपण होऊनि ठेली ॥४॥
सागरीं गंगा मिळोनि गेली जैसी । परतोनि तियेसी नाम नाहीं ॥५॥
नामयाची जनी निर्गुणीं बोधिली । ठेवा जो लाधली पांडुरंग ॥६॥

११६
शब्दाचें ब्रह्म लौकिकी हो दिसे । जैसे ते फांसे मइंदांचे ॥१॥
ज्ञानी तो कोण विज्ञानी तो कोण । दोहींचा आपण साक्षभूत ॥२॥
स्वयें सुखें धाला आपणातें विसरला । तो योगि राहिला नाहीं येथें ॥३॥
नामयाची जनी सागरीं मिळाली । परतोनि मुळीं केवीं जाय ॥४॥

११७
अखंडित ध्यानीं । पांडुरंग जपे वाणी ॥१॥
पांडुरंग नाम जपे । हेंचि माझें महा तप ॥२॥
ऐसें आलें प्रत्ययासी । सहज तेणें तत्त्वमसी ॥३॥
पावलिया हो स्वपद । सहज विराला तो शब्द ॥४॥
संदेह अवघाचि फिरला । जनी म्हणे उदयो झाला ॥५॥

११८
देव खाते देव पीते । देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते देव घेते । देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें देव तेथे । देवाविणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई । भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥

११९
श्रीमूर्ति असे बिंबली । तरी हे देहस्थिति पालटली ॥१॥
धन्य माझा इह जन्म । ह्रुदयीं विठोबाचें नाम ॥२॥
तृष्णा आणि आशा । पळोन गेल्या दाही दिशा ॥३॥
नामा म्हणे जनी पाहें । द्वारीं विठ्‌ठल उभा आहे ॥४॥

१२०
जनी दृष्‍टि पाहे । जिकडे तिकडे हरि आहे ॥१॥
मग म्हणे वो देवासी । तुमच्या नामयाची दासी ॥२॥
नामयाचा प्रसाद । झाला जनीला आनंद ॥३॥

१२१
झाली पूर्ण कृपा आहे । ऐसा पूर जो कां पाहे ॥१॥
ऐसा पूर जो कां पाहे । गुरुपुत्र तोचि होय ॥२॥
पूर्णपदीं जो स्थापिला । जनी म्हणे धन्य झाला ॥३॥

१२२
नित्य हातानें वारावें । ह्रुदय अंतरीं प्रेरित जावें ॥१॥
ऐसा स्वरुपाचा पूर । आला असे नेत्रावर ॥२॥
स्वरुपाचा पूर आला । पाहातां डोळा झाकूळला ॥३॥
जनी म्हणे ऐसा पूर । पाहें तोचि रघुवीर ॥४॥

१२३
गगन सर्वत्र तत्वता । त्यासी चिखल लावूं जातां ॥१॥
तैसा जाण पांडुरंग । भोग भोगुनी निःसंग ॥२॥
सिद्ध सनकादिक । गणगंधर्व अनेक ॥३॥
जैसी वांझेची संतती । तैसी संसार उत्पत्ती ॥४॥
तेथें कैंचें धरिसी ध्यान । दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥५॥

१२४
काळाचिये लेख । नाहीं ब्रह्माविष्णु मुख्य ॥१॥
युगा एक लव झडे । तोही न सरे काळापुढें ॥२॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ॥३॥
महीपाळ स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥
वर्म चुकलीं बापुडीं । दासी जनी विठ्‌ठल जोडी ॥५॥

१२५
रक्तवर्ण त्रिकुट स्नान । श्रीहाट पाहे श्वेतवर्ण ॥१॥
शामवर्ण तें गोलाट । निळबिंदु औट पीट ॥२॥
वरि भ्रमर गुंफा पाहे । दशमद्वारीं गुरु आहे ॥३॥
नव द्वारातें भेदुनी । दशमद्वारीं गेली जनी ॥४॥

१२६
शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे ॥१॥
प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अधःशून्य ॥२॥
उर्ध्वशून्य श्वेतवर्ण | मध्य शून्य शामवर्ण ॥३॥
महा शून्य वर्ण नीळ । त्यांत स्वरुप केवळ ॥४॥
अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥

१२७
ज्योत पहा झमकली । काय सांगूं त्याची बोली ॥१॥
प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी । लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥
परापश्यंती मध्यमा । वैखरेची झाली सीमा ॥३॥
चारी वाचा कुंठित जाहाली । सोहं ज्योत प्रकाशली ॥४॥
ज्योत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना ॥५॥

१२८
ज्योत परब्रह्मीं होय । खेचरी दर्पणीनें पाहे ॥१॥
ईडा पिंगळा सुशुन्मा । तिन्ही पाहे ह्रुदयभूवना ॥२॥
हळू हळू रीघ करी । सूक्ष्म ह्रुदय अंतरीं ॥३॥
हृदय कमळावरी जासी । जनी जणे मुक्त होसी ॥४॥

१२९
नाहीं आकाश घडणी । पाहा स्वरुपाची खाणी ॥१॥
स्वरुप हें अगोचर । गुरू करिती गोचर ॥२॥
गोचर करिताती जाणा । दृष्‍टि दिसे निरंजना ॥३॥
नाहीं हात पाय त्यासी । जनी म्हणे स्वरुपासी ॥४॥

१३०
माझे मनीं जें जें होतें । तें तें दिधलें अनंतें ॥१॥
देह नेउनी विदेही केलें । शांति देउनी मीपण नेलें ॥२॥
मूळ नेलें हें क्रोधाचें । ठाणें केलें विवेकाचें ॥३॥
निज पदीं दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ॥४॥

१३१
दळितां कांडितां । तुज गाईन अनंता ॥१॥
न विसंबें क्षणभरी । तुझें नाम गा मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥
मायबाप बंधुबहिणी । तूं बा सखा चक्रपाणी ॥४॥
लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी ॥५॥

१३२
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवर पाहूं ॥१॥
स्नान करुं भिवरेसी । पुंडलिका पायांपाशीं ॥२॥
डोळे भरून पाहूं देवा । तेणें ईश्वर जीवाभावा ॥३॥
ऐसा निश्चय करुनी । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१३३
जनी म्हणे नामदेवासी । चला जाऊं पंढरिसी ॥१॥
आला विषयाचा कंटाळा । जाऊं भेटूं त्या गोपाळा ॥२॥
आवडीनें जगजेठी । गळां घालूनियां मिठी ॥३॥
आवडीनें गुज कानीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१३४
जात्यावरील गीतासी । दळणमिशें गोवी दासी ॥१॥
देह बुद्धीचें वैरण । बरवा दाणा हो निसून ॥२॥
नामाचा हो कोळी । गुरु आज्ञेंत मी पाळीं ॥३॥
मज भरंवसा नाम्याचा । गजर दासी जनीचा ॥४॥

१३५
तूझा लोभ नाहीं देवा । तुझी करिना मी सेवा ॥१॥
नाहीं अंगीं थोरपण । मिथ्या धरिसी गुमान ॥२॥
रागा येउनी काय करिशी । तुझें बळ आह्मांपाशीं ॥३॥
नाहीं सामर्थ्य तुज हरी । जनी म्हणे धरिली चोरी ॥४॥

१३६
तुझे चरणीं घालीन मिठी । चाड नाहीं रे वैकुंठीं ॥१॥
सर्वभावें गाईन नाम । सखा तूंचि आत्माराम ॥२॥
नित्य पाय वंदिन माथा । तेणें नासे भवभय व्यथा ॥३॥
रुप न्याहाळीन दृष्‍टी । सर्व सुखें सांगेन गोष्‍टी ॥४॥
दीनानाथा चक्रपाणी । दासी जनी लावी ध्यानीं ॥५॥

१३७
आतां भीत नाहीं देवा । आदि अंत तुझा ठावा ॥१॥
झालें नामाचेनि बळकट । तेणें वैकुंठ पायवाट ॥२॥
ज्ञान वैराग्य विवेक बळें । तें तंव अह्मांसवें खेळे ॥३॥
दया क्षमा आम्हांपुढें । जनी म्हणे झाले वेडे ॥४॥

१३८
माझे चित्त तुझें पायीं । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥१॥
मुखीं उच्चार नामाचा । कायामनें जीवें वाचा ॥२॥
धरणें तें ऐसें धरुं । जनी म्हणे विठ्‌ठल स्मरुं ॥३॥

१३९
आह्मी पातकांच्या राशी । आलों तुझ्या पायांपाशीं ॥१॥
मना येईल तें तूं करीं । आतां तारीं अथवा मारीं ॥२॥
जनी म्हणे सृष्‍टीवरी । एक अससी तूं बा हरी ॥३॥

१४०
मना लागीं हाचि धंदा । रामकृष्ण हरि गोविंदा ॥१॥
जिव्हे करुं नित्य नेम । सदा विठोबाचें नाम ॥२॥
नामामध्यें नामसार । जप करी निरंतर ॥३॥
म्हणे जनी नाम घेणें । नाममंत्रें शंकर होणें ॥४॥

१४१
स्मरण तें हेंचि करुं । वाचे रामराम स्मरुं ॥१॥
आणिक न करुं तें काम । वाचे धरुं हाचि नेम ॥२॥
सुकृताचें फळ । जनी म्हणे हें केवळ ॥३॥

१४२
मनामागें मन लावूं । तेथें सर्व सुख पाहूं ॥१॥
मग आह्मां काय उणे । दया करी नारायण ॥२॥
जनी म्हणे ऐसें मन । करुं देवा हो आधिन ॥३॥

१४३
सत्त्वरजतमें असे हें बांधिलें । शरीर दृढ झालें अहंकारें ॥१॥
सांडीं अहंकार धरीं दृढभाव । ह्रुदयीं पंढरिराव धरोनियां ॥२॥
नामयाची जनी भक्तीसी भुलली । ते चरणीं राहिली विठोबाचे ॥३॥

१४४
नित्य सारुं हरीकथा । तेथें काळ काय आतां ॥१॥
वनवासी कां धाडिलें । कृपाळें बा हो विठ्‌ठलें ॥२॥
आशा मनशा तृषा तिन्ही । ह्या तो ठेविल्या बांधोनि ॥३॥
काम क्रोध विषय झाले । हे तों मोहोनि राहिले ॥४॥
अवलोकूनि कृपा दृष्‍टि । जनी म्हणे देंई भेटी ॥५॥

१४५
करूं हरीचें कीर्तन । गाऊं निर्मळ ते गुण ॥१॥
सदा धरुं संतसंग । मुखीं ह्मणूं पांडुरंग ॥२॥
करुं जनावरी कृपा । रामनाम म्हणवूं लोकां ॥३॥
जनी म्हणे कीर्ति करुं । नाम बळकट धरुं ॥४॥

१४६
आनंदाचे डोहीं । जो कां समूळ झाला नाहीं ॥१॥
कीर्तनें जन्मला । हरीभक्तीनें शिंपिला ॥२॥
आळवितसे अंतवरी । वाचा नाम लोहा करीं ॥३॥
समूळ झाला नाहीं । देहें जनी विठ्‌ठल पायीं ॥४॥

१४७
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥
नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥
न लगे संतति धन आणि मान । एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥
सत्य कीं मायी आमुचें बोलणें । तुमची तुह्मा आण सांगा हरी ॥४॥
जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळूनि । म्हणे दासी जनी नामयाची ॥५॥

१४८
आतां येतों स्वामी आम्ही । कृपा असों द्यावी तुह्मी ॥१॥
बहु दिवस सांभाळ केला । पुन्हा जन्म नाहीं दिला ॥२॥
थोर सुकृताच्या राशी । तुमचे पाय मजपाशीं ॥३॥
ऐसा नामदेव बोले । ऐकोनी दासी जनी डोले ॥४॥

१४९
मी तों समर्थाची दासी । मिठी घालीन पायांसीं ॥१॥
हाचि माझा दृढभाव । करीन नामाचा उत्सव ॥२॥
आह्मां दासीस हें काम । मुखीं विठ्‌ठल हरिनाम ॥३॥
सर्व सुख पायीं लोळे । जनीसंगें विठ्‌ठल बोले ॥४॥

१५०
नामयाचें ठेवणें जनीस लाधलें । धन सांपडलें विटेवरी ॥१॥
धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्‍णुदास स्वामी माझा ॥२॥
कामधाम माझे विठोबाचे पाय । दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥
माझ्या वडिलांचें दैवत तोहा पंढरिनाथ । तेणें माझा अर्थ पुरविला ॥४॥
संसारींचें सुख नेघे माझे चित्तीं । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ॥५॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला । ह्रुदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥

१५१
धन्य धन्य ज्याचे चरणीं गंगाओघ झाला । मस्तकीं धरिला उमाकांतें ॥१॥
धुंडितां ते पाय शिणला तो ब्रह्मा । बोल ठेवी कर्मा आपुलीया ॥२॥
शुक सनकादिक फिरती हरिजन । नारदादि गाणें जयासाठीं ॥३॥
ते चरण आह्मांसी गवसले अनायासी । धन्य झाली दासी जनी म्हणे ॥४॥

१५२
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥
हातीं घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आतां मज मना कोण करी ॥२॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावर तेल घाला तुह्मी ॥३॥
जनी म्हणे देवा मी झालें येसवा । निघालें केशवा घर तुझें ॥४॥

१५३
भक्तिभावें वळे गा देव । महाराज पंढरिराव ॥१॥
पंढरीसी जावें । संतजना भेटावें ॥२॥
भक्ति आहे ज्याचें चित्तीं । त्याला पावतो निश्चिती ॥३॥
भाव धरा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१५४
बांधोनियां हात गयाळ मारिती ॥ दंड ते करिती मोक्षासाठीं ॥१॥
गेले ते पितर मोक्षालागीं तुझे । आतां देंई माझे दक्षिणेसी ॥२॥
बापुडें केंश बोडिती मिशीदाढी । मग दक्षणा हिरडी खातसे हे ॥३॥
फाय काय सांगों मेल्याविण मुक्ती । नाहीं ते वांछिती स्वप्न सुख ॥४॥
अनंत जन्म मृत्यु होतां जैसें दुःख । त्याहूनि अशेष आहे तेथें ॥५॥
भांबावले जन धांवे आटाआटी । सोडूनियां कोटि अनंत पद ॥६॥
नलगे गाळावें नलगे तळावें । नलगे मरावें मुक्तीसाठीं ॥७॥
मुक्ति लागे पायां जाऊनियां पाहे । जीव जातां देह जनी नाहीं ॥८॥

१५५
धनियाचें पडपे गेला । जीव जिवें जीव झाला ॥१॥
देहीं देह हारपले । गेह गेहातीत झालें ॥२॥
झाला आश्रम आश्रमा । जनी म्हणे धरा प्रेमा ॥३॥

१५६
झाली जगाचिये सीमा । वस्तुभाव येर व्योमा ॥१॥
पहा हो अधिकारी । नको असोनी भिकारी ॥२॥
पट तंतूंचा घडला । घट मृत्तिकेचा झाला ॥३॥
पहा श्वानसमची पंडित । जनी म्हणे एकचि मात ॥४॥

१५७
नाद पडे कानीं । मृग पैज घाली प्राणी ॥१॥
आवडी अंतरीं । गज मेला पडे गारी ॥२॥
चोख पाहे अंग । दिपें नाडला पतंग ॥३॥
गोडी रसगळा । मच्छ अडकला गळा ॥४॥
गंधें आंले नेला । म्हणे जनी तोचि मेला ॥५॥

१५८
भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥
काय तिनें तपमुद्रा धरियेली । ह्मणोनियां झाली भृंगी अंगें ॥२॥
अरे बा शहाणिया तैसा करीं जप । संतयोगें पाप नाहीं होय ॥३॥
नामयाची जनी पिटिती डांगोरा । संदेह न धरा करा पूजा ॥४॥

१५९
जहाज तारिलें तारिलें । शेवटीं उगमासी आलें ॥१॥
भाव शिडासी लाविला । नाम फरारा सोडिला ॥२॥
कथा भरियेलें केणें । घ्यारे नका दैन्यवाणें ॥३॥
एका मनाचा विसार । आधीं देउनी निर्धार ॥४॥
कोण देतो फुकासाठीं । आर्तभूत व्हावें पोटीं ॥५॥
आर्तभूत व्हारे । जनी म्हणे केणें घ्यारे ॥६॥

१६०
हेंचि देवांचें भजन । सदा राहे समाधान ॥१॥
येर अवघे संसारिक । इंद्र देव ब्रह्मादिक ॥२॥
वरकडाचा पाड किती । जनी देवास बोलती ॥३॥

१६१
चोरा संगतींनें गेला । वाटे जातां नागवला ॥१॥
तैसी सांडोनियां भक्ती । धरी विषयाची संगती ॥२॥
अग्निसवें खेळे । न जळे तो परी पोळे ॥३॥
विश्वासला चोरा । जनी म्हणे घाला बरा ॥४॥

१६२
जगीं विठ्‌ठल रुक्मिणी । तुह्मी अखंड स्मरा ध्यानी ॥१॥
मग तुज काय उणें । झाले सोयरे त्रिभुवनें ॥२॥
साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥
मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१६३
सुखें संसार करावा । माजी विठ्‌ठल आठवावा ॥१॥
असोनियां देहीं । छाया पुरुष जैसा पाहीं ॥२॥
जैसा सूर्य घटाकाशीं । तैसी देहीं जनी दासी ॥३॥

१६४
अंगीं हो पैं शांती । दया क्षमा सर्वांभूतीं ॥१॥
जेथें जाऊन पाहे देवा । ब्रह्मादिक करिती सेवा ॥२॥
आवडी असे पैं कीर्तनीं । लवे संतांचे चरणीं ॥३॥
जैसी दया पुत्रावरी । तेंचि पाहे चराचरीं ॥४॥
बहु अपराध केला । म्हणे जनी तो रक्षिला ॥५॥

१६५
मृदु वाहे पाणी । वृजमानी ऐसें लाणी ॥१॥
क्षमा ऐसी जिवीं । क्रोधभूत हें पृथ्वी ॥२॥
गंधमाती सरी । करुनी आपुली कस्तुरी ॥३॥
गुणदोष मना नाणीं । म्हणे बहिरी होय जनी ॥४॥

१६६
आपणची सारा । पाहावें कीं नारीनरां ॥१॥
पटाकारणे हे जनी । पांडुरंग तंतु मनीं ॥२॥
भावेंवीण भजलें । भिउनियां झांकीं डोळे ॥३॥
म्हणे काय पाहूं येतें । भिन्न नव्हे वस्तु जेथें ॥४॥
भिन्नाभिन्न नाहीं मनीं । म्हणे नामयाची जनी ॥५॥

१६७
आक्रोशें ध्यानासीं आणी पुरुषोत्तमा । पृथ्वीयेसी क्षमा उणी आणी ॥१॥
अखंडित शुद्ध असावें अंतर । लोणिया कठोर वाटे मनीं ॥२॥
बोलें तें वचन बहु हळुवट । सुमना अंगीं दाट जडभार ॥३॥
नाम तें स्मरण अमृतसंजिवनी । म्हणे दासी जनी हेंचि करा ॥४॥

१६८
आम्ही आणि संतसंत आणि आह्मी । सूर्य आणि रश्मि काय दोन ॥१॥
दीप आणि सारंग सारंग आणि दीप । ध्यान आणि जप काय दोन ॥२॥
शांति आणि विरक्ति विरक्ति आणि शांती । समाधान तृप्ति काय दोन ॥३॥
रोग आणि व्याधी व्याधी आणि रोग । देह आणि अंग काय दोन ॥४॥
कान आणि श्रोत्र श्रोत्र आणि कान । यश आणि मान काय दोन ॥५॥
देव आणि संत संत आणि देव । म्हणे जनी भाव एक ऐसा ॥६॥

१६९
पाणी तेंचि मेघ मेघ तेंचि पाणी । काय या दोन्हीपणीं वेगळीक ॥१॥
माती तेचि धूळ धूळ तेचि माती । भेंडा आणि भिंती काय दोन ॥२॥
साखरीं गोडी गोडी साखरेसी । थिजलें तुपासी काय दोन्ही ॥३॥
डोळा तें बुबुळ बुबुळ तो डोळा । शांति ज्ञानकळा काय भिन्न ॥४॥
वदन ते ओंठ ओंठ तें वदन । क्षेमआलिंगन काय दोन ॥५॥
जीभ ते पडजीभ पडजीभ ते जीभ । आशा आणि लोभ काय दोन ॥६॥
संत तेचि देव देव तेचि संत । म्हणे जनी मात गोष्‍टी भिन्न ॥७॥

१७०
प्रपंचीं जो रडे । ब्रम्हवन त्यातें जडे ॥१॥
ऐसा अखंडित ब्रम्हीं । विठ्‌ठला जो कर्माकर्मी ॥२॥
पुत्रदेह ध्याया ध्यानीं । कांता धनवो कामिनी ॥३॥
सिंधूसी सांडावा । जनी म्हणे गा सदैवा ॥४॥

१७१
काम लागे कृष्णापाठीं । केली स्मशानाची गांठी ॥१॥
परम कामें भुलविला । कृष्ण स्मशानासी नेला ॥२॥
भुलविला मनीं । रुद्र पाहोनी मोहनी ॥३॥
कन्येचिये पाठीं । ब्रम्ह लागे हतवटी ॥४॥
काम पराशरालागीं । ज्ञानासी लाविली आगी ॥५॥
काम गेला शुकापाठीं । म्हणे जनी मारी काठी ॥६॥

१७२
भजन करी महादेव । राम पूजी सदाशिव ॥१॥
दोघे देव एक पाहीं । तयां ऐक्य दुजें नाहीं ॥२॥
शिवा रामा नाहीं भेद । ऐसे देव तेही सिद्ध ॥३॥
जनी म्हणे आत्मा एक । सर्व घटीं तो व्यापक ॥४॥

१७३
पतंग सुखावला भारी । उडी घाली दीपावरी ॥१॥
परि तो देहांतीं मुकला । दोहीं पदार्थी नाडिला ॥२॥
विषयांचे संगती । बहु गेले अधोगती ॥३॥
ऐसे विषयानें भुलविले । जनी म्हणे वांयां गेले ॥४॥

१७४
येऊनियां जन्मा एक । करा देहाचें सार्थक ॥१॥
वाचे नाम विठ्‌ठलाचें । तेणें सार्थक जन्माचें ॥२॥
ऐसा नामाचा महिमा । शेष वर्णितां झाली सीमा ॥३॥
नाम शास्त्रीं त्रिभुवनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥

१७५
विवेकाची पेंठ । उघडी पंढरीची वाट ॥१॥
तेथें नाहीं कांहीं धोका । उठाउठी भेटे सखा ॥२॥
मरोनियां जावें । शरण विठोबासी व्हावें ॥३॥
म्हणे नामयाची जनी । देव करा ऐसा ऋणी ॥४॥

१७६
शरीर हें जायाचें नश्वर आणिकांचें । म्हणाल जरी त्याचें काय काज ॥१॥
आंबरसें चोखिला बिजसालें सांडिला । पुढें तेणें उभविला दुजा एकू ॥२॥
समूळ साल माया सांडूनियां दिजे । परि अहंबीज जतन करा ॥३॥
तें बीज भाजोनि करा ओंवाळणी । संतांचे चरणीं समूळ देह ॥४॥
पुढें त्या बीजांची न करावी दुराशा । न धरावी आशा पुढिलांची ॥५॥
आहे नाहीं देह धरीं ऐसा भाव । म्हणे जनी देव सहज होसी ॥६॥

१७७
नाना व्रत तप दान । मुखीं हरी स्मरण ॥१॥
येथें असों द्यावा भाव । पुरवी अंतरींचें देव ॥२॥
हाचि विश्वास धरुनी । कृपा करील चक्रपाणी ॥३॥
भक्तिभाव ज्याचा पुरा । त्यासी धांवतो सामोरा ॥४॥
लक्ष लावा पायांपाशीं । म्हणे नामयाची दासी ॥५॥

१७८
शूराचें तें शस्‍त्र कृपणाचें धन । विध्वंसिल्या प्राण हातां नये ॥१॥
गजमाथां मोतीं सर्पाचा तो मान । गेलियाही प्राण हातां नये ॥२॥
सिंहाचें तें नख पतिव्रतेचें स्तन । गेलियाही प्राण हातां नये ॥३॥
विराल्यावांचून देह अहंभाव । जनी म्हणे देव हातां नये ॥४॥

१७९
संसारीं निधान लाधलें जनां । सद्‌गुरुचरणा सेवीं बापा ॥१॥
कायावाचामनें तयास देवावीं । वस्तु मागून घ्यावी अगोचर ॥२॥
तें गोचर नव्हे जाण गुरुकृपेवीण । एर्‍हवी तें आपणा माजी आहे ॥३॥
असतां सम्यक परि जना चुकामुक । भुललीं निष्‍टंक मंत्रतंत्रें ॥४॥
माळ वेष्‍टण करीं टापोर घेती शिरीं । नेम अष्‍टोत्तरीं करिताती ॥५॥
जो माळ करविता वाचेसि वदविता । तया ह्रुदयस्था नेणे कोणी ॥६॥
सोहं आत्मा प्रगट जो दाखवी वाट । सद्रुरुवरिष्‍ठ तोचि जाणा ॥७॥
तया उत्तीर्णता व्हावया पदार्था । न देखों सर्वथा जनी म्हणे ॥८॥

१८०
कीर्तनासी जातां मार्गी टाकी पाय । अमर देह होय कळे त्यासी ॥१॥
वाराणसी धरोनि पदरीं । चाललीसे नारी दोहींकडे ॥३॥
आमच्या बापाची ऐकावया कीर्ति । जाऊं म्हणोन घेती ऐक्य कधीं ॥४॥
कीर्तनासी जावें कैसें कोणेपरी । असूं द्या अंतरीं गोष्‍ट हित ॥५॥
वर्‍हाडी धांवे जैसा प्रयोजनीं । तान्हेलें तें पाणी पुसावया ॥६॥
व्याकुळ तें एक चुकलें बाळक । त्या धांवे शोकें हांका मारी ॥७॥
अशी कथे जातां गंगा त्या चरणीं । म्हणे दासी जनी भाक मानी ॥८॥

१८१
कीर्तनाचा रस आवडे नरासी । लागती पायांसी मुक्ति चार्‍ही ॥१॥
वारी पंढरीचा निश्चयें म्यां केला । वारकरी झाला पंढरीचा ॥२॥
मोक्षाचा जो मोक्ष मुक्तीची जे मुक्ती । जनी म्हणे किती सांगुं फार ॥३॥

१८२
गौळण म्हणे गौळणीला । पुत्र झाला यशोदेला ॥१॥
एक धांवे एकीपुढें । ताटीं वाटी सुंठवडे ॥२॥
सुइणीची गलबल झाली । दासी जनी हेल घाली ॥३॥

१८३
मग म्हणे नंदाजीला । पुत्रमुख पाहूं चला ॥१॥
स्नान घालूनि त्यासी । वस्त्रें दिधलीं ब्राम्हणांसी ॥२॥
परब्रम्ह तें पाहुनी । ब्रम्हीं मिळे दासी जनी ॥३॥

१८४
आलिया ब्राम्हणासी दान । द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥
गाई म्हसींचीं खिल्लारें । ब्राम्हण दिधलीं अपारें ॥२॥
कामधेनूची उभनी । कल्पवृक्षाची दाटणी ॥३॥
ऐसा आनंदसोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

१८५
वैकुंठीचा हरी । तान्हा यशोदेच्या घरीं ॥१॥
रांगतसे हा अंगणीं । माथा जावळाची वेणी ॥२॥
पायीं पैंजण आणि वाळे । हातीं नवनीताचे गोळे ॥३॥
धन्य यशोदा ते माय । दासी जनी वंदी पाय ॥४॥

१८६
ब्रम्हा वंदी ज्याचे पाय । त्याची यशोदा ते माय ॥१॥
साम राज्याचा जो दानी । मागे यशोदेसी लोणी ॥२॥
क्षीरसागर ज्याचे चरणीं । त्याला पायावरतें न्हाणी ॥३॥
देव ब्रम्हांड पालकीं । त्याची टाळू हातें माखी ॥४॥
शुक सनकादिक योगी । जनी म्हणे दळूं लागी ॥५॥

१८७
अहो गोकुळींच्या देवा । आदि अंत तुम्हां ठावा ॥१॥
न लगे पुसावें हो कोणा । आदि अंत हो सुजाणा ॥२॥
जनी म्हणे हो गोकुळीं । किती खासी उष्‍टावळी ॥३॥

१८८
असो थोरथोरांची मात । तूंचि मिळालासी गोपाळांत ॥१॥
त्यांच्या शिदोर्‍या सोडिसी । ग्रासोग्रासीं उच्छिष्‍ट खासी ॥२॥
न म्हणे सोंवळें ओवळें । प्रत्यक्षचि तें ओवळें ॥३॥
स्वानंदाचे डोहीं हात । धुतले सर्वांही निश्चित ॥४॥
हातीं काठया पायीं जोडे । दासी जनी वाट झाडे ॥५॥

१८९
एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी । माझा ज्ञानराज गोपाळाशीं लाह्या वाटीं ॥१॥
नामदेव कीर्तन करी पुढें नाचे पांडुरंग । जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग ॥२॥
अभंग बोलतां रंग कीर्तनीं भरिला । प्रेमाचेनि छंदें विठ्‌ठल नाचु लागला ॥३॥
नाचतां नाचतां देवाचा गळाला पितांबर । सावध होई देवा ऐसा बोले कबीर ॥४॥
साधु या संतांनीं देवाला धरिला मनगटीं । काय झालें म्हणुनी दचकले जगजेठी ॥५॥
ऐसा कीर्तन महिमा सर्वांमाजीं वरिष्‍ठ । जडमूढ भाविका सोपी केली पायवाट ॥६॥
नामयाची जनी लोळे संताच्या पायीं । कीर्तन प्रेमरस अखंड देईगे विठाई ॥७॥

१९०
भाव अक्षराची गांठी । ब्रम्हज्ञानानें गोमटी ॥१॥
ते हे माया ज्ञाने वरी । संतजनां माहेश्वरी ॥२॥
ज्ञानेश्वर मंगळ मुनी । सेवा करी दासी जनीं ॥३॥

१९१
गीतेवरी आन टीका । त्यांनीं वाढियेली लोकां ॥१॥
रानताटामाजीं । त्यानें वोगरिलें कांजी ॥२॥
या ज्ञानेशा वांचोनी । म्हणे नामयाची जनी ॥३॥

१९२
ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥
मरोनियां जावें । बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥
ऐसें करी माझ्या भावा । सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥
जावें वोवाळुनी । जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥

१९३
मायेहूनि माय मानी । करी जिवाची ओंवाळणी ॥१॥
परलोकींचें तारूं । म्हणे माझा ज्ञानेश्वरु ॥२॥
वित्त गोत चित्त पाहे । सत्य वंदी गुरुचे पाय ॥३॥
पतिव्रते जैसा पती । जनी म्हणे सांगों किती ॥४॥

१९४
संत राउळा चालिले । ज्ञानेश्वर तंव बोले ॥१॥
एवढें नवल सांगावें । दासी जनीचें पद ल्याहावें ॥२॥
पाय जोडुनी विटेवरी । कटीं हात उभा हरी ॥३॥
रुप सांवळें सुंदर । कानीं कुंडल मनोहर ॥४॥
सोनसळा वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥५॥
गरुडपारीं सन्मुख उभा । जनी म्हणे धन्य शोभा ॥६॥

१९५
ज्ञानेश्वर अभंग बोलिले ज्या शब्दां । चिदानंद बाबा लिही त्यांस ॥१॥
निवृत्तीचे बोल लिहिले सोपानें । मुक्ताईचीं वचनें ज्ञानदेवें ॥२॥
चांगयाचा लिहिणार शामा तो कांसार । परमानंद खेचर लिहित होता ॥३॥
सांगे पूर्णानंद लिही परमानंद । भगवंत भेटी आनंद रामानंद ॥४॥
सांवत्या माळ्याचा काशिबा गुरव । कर्म्याचा वसुदेव काईत होता ॥५॥
चोखामेळ्याचा अनंतभट्‌ट अभ्यंग । म्हणोनी नामयाचे जनीचा पांडुरंग ॥६॥

१९६
सदाशिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
महा विष्णूचा अवतार । सखा माझा ज्ञानेश्वर ॥२॥
ब्रम्हा सोपान तो झाला । भक्तां आनंद वर्तला ॥३॥
आदि शक्ति मुक्ताबाई । दासी जनी लागे पायीं ॥४॥

१९८
सोपानाची ऐशी मूर्ति । विश्वकर्ता ब्रम्ह म्हणती ॥१॥
ऐसें बोले पुराणांत । सृष्‍टिकर्ता जो भगवंत ॥२॥
जनी म्हणे हा सोपान । ब्रम्हा अवतरला पूर्ण ॥३॥

१९९
नामयाचा गुरु । तो हा सोपान सद्गरु ॥१॥
करविरीं करुनी वस्ती । ब्रम्हपुरीं तिशीं म्हणती ॥२॥
माझ्या जिवींच्या जीवना । ह्रुदयीं राहें तूं सोपाना ॥३॥
चित्त उद्धव ज्याची सत्ता । जनी म्हणे माझ्या ताता ॥४॥

२००
शालिवाहन शके अक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥
त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत ॥२॥
नव्वाण्णवाच्या सालीं मुक्ताई देखिली । जनी म्हणे केली मात त्यांनीं ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *