नवरात्र अभंग
रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई
रंगा येईवो ये रंगा येईवो ये । विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई ॥१॥
वैकुंठनिवासिनी वो जगत्रयजननी वो । तुझा वेधु माझे मनीं वो ॥२॥
कटीं कर विराजित मुगुटरत्नजडित । पीतांबरु कसिला तैसा येई का धावत ॥३॥
विश्वरुप विश्वंभरे कमळनयनें कमळाकरें वो । तुझे ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ॥४॥
अनादि अंबिका भगवती
अनादि अंबिका भगवती । बोध परडी घेउनी हाती ।
पोत ज्ञानाचा पाजळती । उदो उदो भक्त नाचती ॥१॥
गोंधळा येई वो जगदंबे मूळ पीठ तू अंबे ॥धृ.॥
व्यास वसिष्ठ शुक गोंधळी । नाचताती सोहंमेळीं ।
द्वैतभाव विसरूनी बळी । खेळती अंबे तुझे गोंधळी ॥२॥
मुगुटमणी पुंडलीक । तेहतीस कोटी देव नायक ।
गोंधळ घालतील कौतुक । एका जनार्दनी नाचे देख ॥३॥
अनादि निर्गुण प्रगटली भवानी
अनादि निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुरमर्दना लागुनी ।
भक्ता लागोनि पावसि निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा ।
करून पोटी मागेन ज्ञानपुत्रा ।
धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ सासरा सांडीन कुपात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वंडी ।
अद्भुतरसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी झाले मी नि:संग ।
विकल्प नवर्याचा सोडियेला संग ।
काम क्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऎसा जोगवा मागुनि ठेविला ।
जाऊनि महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥६॥
माझे कुळीची कुळस्वामिनी
माझे कुळीची कुळस्वामिनी ।
विठाई जगत्रय जननी । येई वो पंढरपूरवासिनि ।
ठेवीले दोन्ही कर जघनी । उभी सखी सजनी ॥१॥
येई पुंडलिक वरदायिनी । विश्वजननी रंगा येई वो ॥धृ॥
मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधिले ।
ज्ञान कळस वर ठेविले । पूर्ण भरियले । धूप दाविले ।
सुवासे करूनि ॥२॥ सभामंडप शोभला ।
भक्ती चांदवा दिधला । उदो उदो शब्द गाजला ।
रंग माजला । वेद बोलिला । मूळची ध्वनि ॥३॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेऊनी संबळी ।
गाती हरीची नामावळी मातले बळी ।
प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥४॥
ऎसा गोंधळ घातिला ।भला परमार्थ लुटिला ।एका जनार्दनी भला ।
ऎक्य साधिला । ठाव आपुला ।लाभ त्रिभुवनी ॥५॥
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी
चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी ।
वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥१॥
रंगा येई वो विठाई सांवळिये डोळसे ।
तुझें श्रीमुख साजिरें ते मी केधवां देखेन ॥ध्रु॥
रजतमधुपारती । पंचप्राणांची आरती ।
अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥२॥
मन मारोनिया मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी ।
भक्तिभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥३॥
डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे ।
आपुला घेउनी पुरस्कारे । आरोग्य करीं तुकयासी ॥४॥
कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही
कनवाळू कृपाळू भक्तांलागीं मोही ।
गजेद्राचा धांवा तुवां केला विठाई ॥१॥
पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु॥
भक्तांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले ।
आंबॠषीकारणें जन्म दहा घेतले ॥२॥
प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला ।
विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥३॥
उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं ।
पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥४॥
कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली ।
वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी झाली माउली ॥५॥
दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं ।
धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥६॥
कृपाळू माउली भुक्तिमुक्तिभांडार ।
करीं माझा अंगीकार तुका म्हणे विठ्ठले ॥ ७ ॥
तूं विटेवरी सखये बाई हो करी कृपा ।
माझे मन लागो तुझ्या पायी हो करी कृपा ।
तूं सावळे सुंदरी हो करी कृपा ।
लावण्य मनोहरी हो करी कृपा ।
निजभक्ता करुणा करी हो करी कृपा ॥१॥
पंढरपुरीं राहिली । डोळा पाहिली ।
संते देखिली । वरुनी विठाई वरुनी विठाई ।
सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा । उजळकुळ दीपा ।
बोध करी सोपा । येउनी लवलाही येउनी लवलाही ॥धृ.॥
तुझा देव्हारा मांडिला हो करी कृपा ।
चौक आसनीं कळस ठेविला हो करी कृपा ।
प्रेम चांदवा वर दिधला हो करी कृपा ।
ज्ञान गादी दिली बैसावया हो करी क्रृपा ।
काम क्रोध मदमत्सर दंभ अहंकार ।
त्याचे बळ फार । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥२॥
शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा ।
नाचताती प्रेम कल्लोळी हो करी कृपा ।
उदो उदो शब्द आरोळी हो करी कृपा ।
पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा ।
त्याने मार्ग दाविला निटा हो करी कृपा ।
आई दाविली मूळपीठा हो करी कृपा ।
बापरखुमादेवीवरु । सुख सागरु ।
त्याला नमस्कारु । सर्व सुख देई सर्व सुख देई ॥३॥
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव ।
शकुन सांगावयास आले यमाई माझे नाव ।
तये नगरी वस्ती केली तरी आले एकभावे ।
ऐसा माझा शकुन दादा चित देउन ऐकावे ॥१॥
कैकाय कैकाय बाबा दुरील माझा देश ।
शकुन सांगावयास मी आले कलीयुगास ।
ब्रंम्ह विष्णु महेश पुसती शकुन आंम्हास ।
ऐसे नीदान आंम्ही सांगीतले त्यांस ॥२॥
धरीत्री आकाश मज देखता उत्पती ।
चंद्र सुर्य दादा मज देखता होती ।
ब्रंम्ह विष्णु महेश मज देखता उपजती ।
जेथे आहे शिव तेथे आदिशक्ती ॥३॥
दाही आवतार मज देखता झाले ।
अकराही रुद्र दादा होऊनिया गेले ।
अठ्ठ्यांऐंशी सहस्त्र ऋषी मज देखता जन्मले ।
ब्रम्हादीक तेहतीस कोटी देव मी खेळविले ॥४॥
अठ्ठाविस युगे झाली चक्रवर्ती ।
कौरव पांडव गेले दादा नेणो कीती ।
छप्पंन्न कोटी यादव गेले दादा कोण पंथी ।
तुम्ही आंम्ही जाऊ दादा मागे कोणी न राहती ॥५॥
पृथ्वीमधे दादा एक विपरीत होईल ।
बहीण भावा दोघाजनांचा विवाह लागेल ।
पाच वरुषाची बाळा भ्रतार मागेल ।
सहा वरुषाची नारी गर्भिण होईल ॥६॥
आणीक एक दादा माझा ऐकावा बोल ।
पृथ्वी वरुता वारा थोर झुंजाट सुटेल ।
थोर थोर दादा पर्वत उडोंनी जातील ।
आठराही जाती दादा एके ठीकाणी जेवतील ॥ ७ ॥
कलीयुगाची दादा ऐकावी थोरी ।
पुत्र तो होईल पीत्याचा वैरी ।
भ्रतार सोडोनीं घरोघरी फीरतील नारी ।
ऐसा माझा शकुन दादा ऐका निर्धारी ॥ ८ ॥
आणीक एक दादा माझे आईका उत्तर ।
आकार जाईल अवघा होईल निराकार ।
जातील चंद्र सुर्य मग पडेल अंधकार ।
धरीत्री आकाश जाईल मग कैंचा दिनकर ॥ ९ ॥
आणीक एक शकुन माझा ऐकावा संती ।
तुम्ही मुळ पीठी राहाणें नाव माझे आदिशक्ती ।
अंबेचा व्यवहार त्राहे त्राहे आदिमुर्ती ।
एका जनार्धनी प्रसंन्न झाली आदिशक्ती ॥ १० ॥
सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो
सुवेळ सुदिन तुझा गोंधळ मांडिला वो ।
ज्ञान वैराग्याचा वरती फुलवरा बांधिला वो ।
चंद्र सूर्य दोन्ही यांचा पोत पाजळिला वो ।
घालुनी सिंहासन वरुते घट स्थापियेला वो ॥१॥
उदो बोला उदो उदो सद्गुरु माउलीचा वो ॥धृ.॥
प्रवृत्ती निवृत्तीचें घालुनि शुद्धासन वो ।
ध्येय ध्याता ध्यान प्रक्षाळिलें चरण वो ।
कायावाचामनें एकविध अर्चन केले वो ।
द्वैत अद्वैत भावे दिले आचमन वो ॥२॥
भक्ति वैराग्य ज्ञान याहीं पुजियली अंबा वो ।
सद्रूप चिद्रूप पाहुनी प्रसन्न जगदंबा वो ।
एका जनार्दनी शरण मूळकदंबा वो ।
त्राहे त्राहे अंबे तुझा दास आहे उभा वो ॥३॥
स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला वो
स्वर्ग मृत्यू पाताळ त्याचा मंडप घातिला वो ।
चारी वेदांचा फुलवरा बांधिला वो ।
शास्त्रें पुराणें अनुवादती तुझा गोंधळ मांडिला वो ॥१॥
उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा वो ॥धृ.॥
जीवशिव संबळ घेऊनी आनंदे नाचती वो ।
अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी दिवटे तिष्ठती वो ।
तेहतीस कोटी देव चामुंडा उदो उदो म्हणती वो ॥२॥
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी वो ।
पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी वो ।
एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटीं वो ॥३॥
सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो
सुदिन सुवेळ तुझा मांडिला गोंधळ वो ।
पंच प्राण दिवटे दोन्हीं नेञांचे हिल्लाळ वो ॥१॥
पंढरपूरनिवासे तुझें रंगीं नाचत असे वो ।
नवस पुरवी माझा मनींची जाणोनिया इच्छा वो ॥२॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो ।
चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥३॥
बैसली देवतापुढे वैष्णवांचे गाणे वो ।
उद्गारें गर्जती कंठीं तुळसीची भूषणें वो ॥४॥
स्वानंदाचें ताटी धूप दीप पंचारती वो ।
ओवाळिली माता विठाबाई पंचभूतीं वो ॥५॥
तुझे तुज पावलें माझा नवस पुरवीं आता वो ।
तुका म्हणें राखें आपुलिया शरणागता वो ॥६॥
सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो
सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो ।
नागर नाग खोपा । केशर कस्तुरी मळवटीं वो ।
विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो ।
कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥
अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणीं गोंधळा वो ।
राजस तेजोराशी मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो ।
कोटि रविशशिप्रभा तेजे लोपल्या सकळा वो ।
न कळे ब्रम्हादिकां अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु॥
सावळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो ।
सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो ।
कटीं क्षुद्र घंटिका शब्द करिताती माधुरी वो ।
गर्जती चरणीं वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥
अष्टांगें मंडित काय वर्णावी रूपठेवणी वो ।
शोधिव सुंदर रसाची ओतिली सुगंध लावण्यखाणी वो ।
सर्वकळासंपन्न मंजुळ बोले हास्यवदनीं वो ।
बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥३॥
घटस्थापना केली पंढरपुरमहानगरीं वो ।
अस्मानी मंडप दिला तिन्ही ताळांवरी वो ।
आरंभिला गोंधळ इनें चंद्रभागेतिरीं वो ।
आली भक्तिकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥
तेहतिस कोटि देव चामुंडा अष्ट कोटि भैरव वो ।
आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा वरुषाव वो ।
नारद तुंबर गायन ब्रम्हानंद करिती गंधर्व वो ।
वंदी चरणरज तेथे तुकयाचा बांधव वो ॥५॥
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा ।
सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा ।
गर्जा जयजयकार हरि ह्र्दयी धरा ।
आळस नका करू लहाना सांगतो थोरा ॥१॥
या हो या हो बाइयानों निघाले हरि ।
सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं ।
ओवाळू श्रीमुख वंदू पाऊले शिरीं ।
आम्हा दैव आले येथे घरिच्या घरीं ॥२॥
अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते ।
मग येरी गर्जे जैसें तैसे होत जाते ।
म्हणोनि मागे पुढे कोणी न पहावे येथे ।
सांडा परते काम जाऊ हरि सांगाते ॥३॥
बहुतां बहुतां रीतीं चित्तिं धरा हे मनीं ।
नका करू आइकाल ज्या कानी ।
मग हे सुख तुम्ही कधीं न देखाल स्वप्नी ।
उरेल हाय हाय मागे होईल कहाणी ॥४॥
ऐसियास वंचतां त्याच्या अभाग्या पार ।
नाही नाही नाही सत्य जाणा निर्धार ।
मग हे वेळ घटिका न ये अजरामर ।
कळले असो द्या मग पडतील विचार ॥५॥
जयासाठी ब्रम्हादिक झाले ते पिसे ।
उच्छिष्टाकारणें देव जळीं झाले मासे ।
अर्धांगीं विश्वमाता लक्ष्मी वसे ।
तो हा तुकयाबंधु म्हणे आलें अनायासें ॥६॥
फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू
फुगडीफ़ूगे बाई फुगडीफू । निजब्रह्म तूं गे बाई परब्रह्म तूं गे ॥१॥
मन चित्त धू । विषयावरी थू ॥२॥
एक नाम मांडी । दुजा भाव सांडी ॥३॥
हरि आला रंगीं । सज्जनाचे संगीं ॥४॥
सकळ पाहे हरी । तोचि चित्ती धरी ॥५॥
नमन लल्लाटीं । संसारेंसि साटी ॥६॥
वाम दक्षिण चहुंभुजीं आलिंगन ॥७॥
ज्ञानदेवा गोडी । केली संसारा फुगडी ॥ ८ ॥
****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****