chokhamela

संत चोखामेळा अभंग ३०१ते३२६

संत चोखामेळा अभंग ३०१ते३२६ – गाथा 

३०१
आपुल्या आपण सांभाळोनी घ्यावें । आहे नाहीं ठावें तुम्हां सर्व ॥१॥
वांयाचि करणें लौकिकाचा गोवा । कोठवरी देवा बोलणें हें ॥२॥
अंगा नाहीं आलें तंव तें साहालें । खादलें पचलें तरी तें हित ॥३॥
चोखा म्हणे तुमचें तुम्हासी सांगणें । माझें यांत उणें काय होतें ॥४॥

३०२
मी तो विकलों तुमचे पायी । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥
माझा मीच झालों उतराई देवा । तुमचें तुम्हीं पाहा आम्हांकडे ॥२॥
नव मास माता वोझें वाहे उदरीं । तैसीच ही परी तुमची माझी ॥३॥
अपत्य आपुलें फिरे देशोदेशीं । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥

३०३
जगामध्यें दिसे बरें कीं वाईट । ऐसाचि बोभाट करीन देवा ॥१॥
आतां कोठवरी धरावी हे भीड । तुम्हीं तो उघड जाणतसां ॥२॥
ब्रीदाचा तोडर बांधलासे पायीं । त्रिभुवनीं ग्वाही तुमची आहे ॥३॥
चोखा म्हणे जेणें न ये उणेपण । तेंचि तें कारण जाणा देवा ॥४॥

३०४
माझा मी विचार केला असें मना । चालवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥
तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझे । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥
वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥
चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥

३०५
वारंवार किती करुं करकर । माझा तंव आधार खुंटलासे ॥१॥
न बोलावें आतां हेंचि शहाणपण । होउनी पाषाण पडो द्वारीं ॥२॥
केव्हां तरी आम्हां होईल आठव । हाचि एक भाव धरुं आतां ॥३॥
चोखा म्हणे मग येशील गिवसित । तोंवरी हें चित्त दृढ करुं ॥४॥

३०६
कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥
काय करुं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥
कोठवरी धांवा पोकारुं केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥
चोखा म्हणे आतां पुरे चाळवण । आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥

३०७
अहो पतितपावना पंढरीच्या राया । भक्त विसाविया मायबापा ॥१॥
धांवे दुडदुडा आपुलिया काजा । येई गरुडध्वजा मायबापा ॥२॥
दाही दिशा उदास तुम्हांविण झाल्या । न करीं पांगिला दुजी यासी ॥३॥
चोखा म्हणे मज दावीं आतां वाट । मग मी बोभाट न करी कांहीं ॥४॥

३०८
धरोनिया आशा टाकिलासे ठाव । अवघाचि वाव झाला दिसे ॥१॥
कवणासी सांकडें सांगूं पंढरीराया । कां हो न ये दया माझी तुम्हां ॥२॥
बाळकाचे परी लडिवाळपणें । तुमचें पोसणें मी तो देवा ॥३॥
चोखा म्हणे मज तुम्ही मोकलितां । काय आमुची कथा आतां चाले ॥४॥

३०९
सुखाचिया लागीं करितों उपाव । तों अवघेंचि वाव दिसों येतें ॥१॥
करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥
अवघेंचि साकडें दिसोनियां आलें । न बोलवें तें भलें कोणा पुढें ॥३॥
चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनियां ॥४॥

३१०
बरें हें वाईट आहे माझे भाळीं । तें सुखें हो वळी जीवें माझ्या ॥१॥
आतां कोणावरी रुसों नये देवा । भोग तो भोगावा आपुलाची ॥२॥
आहे जें संचित तैसें होत जात । वाउगा वृत्तांत बोल काय ॥३॥
चोखा म्हणे आतां बहु लाज वाटे । झालें जें वोखटें कर्म माझें ॥४॥

३११
बहु कनवाळु होसी गा देवराया । म्हणोनि सखया शरण आलों ॥१॥
निवारीं या तापापासोनी सोडवीं । करूणा भाकावी किती तुम्हां ॥२॥
माझीयाचि काजा विलंब दातार । कां न करीं त्वरा देवराया ॥३॥
चोखा म्हणे बहु पडिलों काचणी । सोडवीं चक्रपाणी वेगीं आतां ॥४॥

३१२
कोण माझा आतां करील परिहार । तुज वीण डोंगर उतरी कोण ॥१॥
तूं वो माझी माय तूं वो माझी माय । दाखवीं गे पाय झडकरी ॥२॥
बहुत कनवळा तुझिया गा पोटीं । आतां नको तुटी करुं सेवा ॥३॥
चोखा म्हणे मज घ्यावें पदरांत । ठेवा माझें चित्त तुमचे पायीं ॥४॥

३१३
नाहीं देह शुद्ध याति अमंगळ । अवघे वोंगळ गुण दोष ॥१॥
करुं जातां विचार अवघा अनाचार । आणिक प्रकार काय बोलूं ॥२॥
वाणी नाहीं शुद्ध धड न ये वचन । धिःकारिती जन सर्व मज ॥३॥
अंगसंग कोणी जवळ न बैसे । चोखा म्हणे ऐसें जीवित माझें ॥४॥

३१४
अहो करुणाकरा रुक्मिणीच्या वरा । उदारा धीरा पांडुरंगा ॥१॥
काय म्यां पामरें वानावें जाणावें । न कळे कैसें गावें नाम तुमचें ॥२॥
विध अविध कोणता प्रकार । नेणों न कळे साचार मजलागीं ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । उगाचि मी लोळे महाद्वारीं ॥४॥

३१५
असें करणें होतें तुला । तरी कां जन्म दिला मला ॥१॥
जन्म देवोनी सांडिलें । कांहो निष्‍ठुर मन केलें ॥२॥
कोठें गेला माझे वेळीं । केलें कोणाचें सांभाळी ॥३॥
चोखा म्हणे देवा । नका मोकलू केशवा ॥४॥

३१६
जनक तूं माझा जननी जगाची । करुणा आमुची कां हो नये ॥१॥
कासया संसार लावियेला पाठीं । पडलीसे तुटी तुमची माझी ॥२॥
जन्म जरा मरण आम्हां सुख दुःख । पहासी कौतुक काय देवा ॥३॥
गहिंवरुनी चोखा उभा महाद्वारीं । विनवी जोडूनि करीं विठोबासी ॥४॥

३१७
दुःखरुप देह दुःखाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥
कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती । दुःख होतां जाती आपोआप ॥२॥
सोइरे धायरे कवणाचे कवण । अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । सोडवीं भवपाशा पासोनियां ॥४॥

३१८
भवाचिया भेणें येतों काकूळती । धांवे करुणामूर्ति देवराया ॥१॥
पडीलोसे माया मोहाचीये जाळीं । येवोनी सांभाळीं देवराया ॥२॥
कवणाची आस पाहूं कोणीकडे । जीवींचें सांकडें वारीं देवा ॥३॥
गहिंवर नावरे चोखियाचे मनीं । धांवें चक्रपाणी देवराया ॥४॥

३१९
नेत्रीं अश्रुधारा उभा भीमातिरीं । लक्ष चरणावरी ठेवोनिया ॥१॥
कांगा मोकलीलें न येसी गा देवा । काय मी केशवा चुकलोंसे ॥२॥
नेणें करुं भक्ती नेणें करूं सेवा । न येसी तूं देवा कळलें मज ॥३॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसांवा । पोकारितों धांवा म्हणोनियां ॥४॥

३२०
ऊंस डोंगा परी रस नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलिया रंगें ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलिया रंगा ॥४॥

३२१
विठोबा पाहुणा आला आमुचे घरा । निंबलोण करा जीवेंभावें ॥१॥
पंचप्राणज्योति ओंवाळुनी आरती । ओवाळिला पती रखुमाईचा ॥२॥
शड्‌रस पक्‍कवान्नें विस्तारिलें ताट । जेवूं एकवट चोखा म्हणे ॥३॥

३२२
पाहतां पाहतां वेधियेला जीव । सुखाचा सुख सिंधु पंढरीराव ॥१॥
माझा ही मीपणा हरपला जाणा । कळल्या आगम निगमाच्या खुणा ॥२॥
भवसागराचा दाता । विठ्‌ठल विठ्‌ठल वाचे म्हणतां ॥३॥
उभा राहुनि महाद्वारीं । चोखा मेळा दंडवत करी ॥४॥

३२४
यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करुं तुमची सेवा ॥१॥
आम्हां नीचाचें तें काम । वाचें गावें सदा नाम ॥२॥
उच्छीष्‍टाची आस संत दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे नारायणा । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥

३२५
हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ॥१॥
मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटूं कवण्या रीती ॥२॥
माझा लागतांचि कर । सिंतोडा घेताती करार ॥३॥
माझ्या गोविंदा गोपाळा । करुणा भाकी चोखामेळा ॥४॥

३२६
तुम्हांसी शरण बहुत मागे आले । तयांचे साहिले अपराध ॥१॥
तैसा मी पामर यातिहीन देवा । माझा तो कुढावा करा तुम्ही ॥२॥
नाहीं अधिकार उच्छिष्‍टा वेगळा । म्हणवोनी कळवळा पाळा माझा ॥३॥
चोखा म्हणे मज कांहीं तें न कळे । नामाचिया बळें काळ कंठी ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत चोखामेळा अभंग ३०१ते३२६ संत चोखामेळा अभंग ३०१ते३२६

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *