chokhamela

संत चोखामेळा अभंग १०९ते१९०

संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – गाथा

नाम (१०९ ते १३३)

१०९
अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥
सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥
निर्वाणी तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥
चोखा म्हणे नाम जपें दिननिशी । येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥

११०
अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥
हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥
क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥
चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥

१११
अवघ्या साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥
येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥
भाग्यें होय संत भेटी । सांगू गोष्ट सुखाच्या ॥३॥
चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥

११२
आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥
जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥
भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥
चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥

११३
आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥
जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥
असारा साराचे नक पडूं भरी । सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥
चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम । नको आन श्रम जाय वांया ॥४॥

११४
आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥
सुखें आठवीन तुमचें हें नाम । न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥
कासया करूं जिवासी आटणी । नाम निर्वाणी तारीतसे ॥३॥
मागेही तरले पुढेंही तरती । चोखा म्हणे चित्तीं दृढ वसो ॥४॥

११५
आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥
सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं वर्म दुजें काहीं ॥२॥
आवडीनें नाम गाईन उल्हासें । संतांच्या सहवासें खेळीं मेळीं ॥३॥
चोखा म्हणे माझी आवडी ही देवा । पुरवावी केशवा जन्मोजन्मी ॥४॥

११६
आम्हां न कळे ज्ञान न कळे पुराण । वेदांचे वचन न कळे आम्हां ॥१॥
आगमाची आठी निगमाचा भेद । शास्त्रांचा संवाद न कळे आम्हां ॥२॥
योग याग तप अष्टांग साधन । न कळेची दान व्रत तप ॥३॥
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझें ॥४॥

११७
केला अंगिकार । उतरिला माझा भार ॥१॥
अजामेळ पापराशी । तो ही नेला वैकुंठासी ॥२॥
गणिका नामेंचि तारिली । चोखा म्हणे मात केली ॥३॥

११८
कोणासी सांकडें गातां रामनाम वाचें । होय संसाराचें सार्थक तेणें ॥१॥
येणें दो अक्षरीं उतराल पैलपार । नाम निरंतर जप करा ॥२॥
अनंततीर्थराशि वसे नामापाशी । ऐसी साक्ष देती वेदशास्त्रें ॥३॥
चोखा म्हणे हेचि ग्रंथांचे पैं सार । राम हा निर्धार जप करीं ॥४॥

११९
गणिका अजामेळें काय साधन केलें । नामचि उच्चारिलें स्वभावतां ॥१॥
नवल हें पहा नवल हें पहा । अनुभवें अनुभवा देहामाजीं ॥२॥
उच्चारितां नाम वैकुंठीचें पेणें । ऐसें दुजें कोणें आहे कोठें ॥३॥
ब्रम्हाहत्या जयासी घडल्या अपार । वाल्हा तो साचार उद्धरिला ॥४॥
सुफराटें नाम न येचि मुखासी । मारा मारा ध्यासीं स्मरतां झाला ॥५॥
चोखा म्हणे ऐसा नामाचा महिमा । उद्धार अधमा स्त्री शूद्रां ॥६॥

१२०
त्रैलोक्य वैभव ओवाळोनि सांडावें । नाम सुखें घ्यावें विठोबाचें ॥१॥
आणिक साधनें आहेत बहुतांपरी । नामाची ती सरी न पवती ॥२॥
म्हणोनि सुलभ विठ्ठल एक नाम । गातां नाचतां प्रेमें मुक्ति तया ॥३॥
चोखा म्हणे माझा अनुभव उघडा । भवभय पीडा येणें वारे ॥४॥

१२१
नाम हें सोपें जपतां विठ्ठल । अवघेंचि फळ हातां लागे ॥१॥
योग याग जप तप अनुष्ठान । तीर्थ व्रत दान नाम जपतां ॥२॥
सुखाचें सुख नाहीं यातायाती । बैसोनी एकांतीं नाम स्मरा ॥३॥
चोखा म्हणे येणें साधेल साधन । तुटेल बंधन भवपाश ॥४॥

१२२
नामाचें सामर्थ्य विष तें अमृत । ऐसी हे प्रचीत आहे जीवा ॥१॥
तें नाम सोपें विठ्ठल विठ्ठल । नको काळ वेळ जपें आधीं ॥२॥
नेम धर्म कांहीं नलगे साधन । सुखें नारायण जप करीं ॥३॥
चोखा म्हणे मज भरंवसा नामाचा । येणें कळिकाळाचा भेव नाहीं ॥४॥

१२३
नाशिवंतासाठीं करितोसी आटी । दृढ धरा कंठीं एक नाम ॥१॥
भवासी तारक विठ्ठलची एक । नाहीं आणिक सुख येतां जातां ॥२॥
एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेहीं थारा तईच लाभे ॥३॥
चोखा म्हणे येथें एकचि साधन । संतासी शरण जाईं सुखें ॥४॥

१२४
भवाचें भय न धरा मानसीं । चिंता अहर्निशी रामनाम ॥१॥
मंत्र हा सोपा न लगे सायास । जपा रात्रंदिवस सुलभ तें ॥२॥
दुर्लभ सर्वांसी न ये जो ध्यानासी । वेडावले ऋषि जयालागीं ॥३॥
आदिनाथ कंठी जप हा सर्वंदा । पवित्र हे सदा अखंड जपे ॥४॥
चोखा म्हणे येथें सर्वांधिकार । उंच नीच अपार तरले नामें ॥५॥

१२५
भेदाभेद कर्म न कळे त्याचें वर्म । वाऊगाचि श्रम वाहाती जगीं ॥१॥
नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनीं । पाप ताप नयनीं न पडेचि ॥२॥
वेदाचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद । नामचि गोविंद एक पुरे ॥३॥
चोखा म्हणे मज कांहींच न कळे । विठ्ठलाचे बळें नाम घेतों ॥४॥

१२६
महादोष राशि पापाचे कळप । नामें सुखरूप कलियुगीं ॥१॥
म्हणोनि आळस करूं नका कोणी । नाम जपा वाणी सर्वकाळ ॥२॥
आसनीं शयनीं नामाचा आठव । आन ठावाठाव करूं नका ॥३॥
चोखा म्हणे खातां जिवितां वाचें । नाम श्रीविठ्ठलाचें उच्चारावें ॥४॥

१२७
माझ्या तो मनें केलासे विचार । आणिक प्रकार नेणें कांही ॥१॥
नाम वेळोवेळां आठवावे वाचे । दुजें आणिकांचें भय नाहीं ॥२॥
आवडी बैसली विठूचे चरणीं । आतां दुजेपणीं नाहीं गोष्टी ॥३॥
चोखा म्हणे दृढ केलोसे संती । म्हणोनी विश्रांती जीवा झाली ॥४॥

१२८
मोहळा मक्षिका गुंतली गोडीसी । तैशापरी मानसीं नाम जपे ॥१॥
मग तुज बंधन न घडे सर्वथा । राम नाम म्हणतां होसी मुक्त ॥२॥
न करी कायाक्लेश उपवास पारणें । नाम संकीर्तनें कार्यसिद्धी ॥३॥
चोखा म्हणे एकांतीं लोकांती नाम जपे श्रीराम । तेणें होसी निष्काम इये जनीं ॥४॥

१२९
योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥
नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥
कासया फिरणें नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काया क्लेश ॥३॥
चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥

१३०
राम हीं अक्षरें सुलभ सोपारी । जपतां निर्धारीं पुरे कोड ॥१॥
मागें बहुतांसी उद्धरिलें देखा । ऐसें बळ आणिका नाही अंगीं ॥२॥
नामामृत पाठ घेईं कां घुटका । होईल सुटका संसाराची ॥३॥
नाम हेंचि सार नाम हेंचि सार । भवसिंधु उतार दो अक्षरीं ॥४॥
चोखा म्हणे नाम सुलभ सोपारें । जपावें निधरिं एका भावें ॥५॥

१३१
वोखटें गोमटें असोत नरनारी । दोचि अक्षरीं पावन होती ॥१॥
न लगे अधिकार वर्णावर्ण धर्म । नाम परब्रम्हा येचि अर्थीं ॥२॥
योगायोगादि जपतप कोटी । एक नाम होठीं घडे तेंचि ॥३॥
चोखा म्हणे ऐसा आहे शिष्टाचार । नाम परिकर श्रीरामाचें ॥४॥

१३२
सूखा कारणें करी तळमळ । जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे ॥१॥
तेणें सर्व सुख होईल अंतरा । चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥
न लगे वेचावें धनाचिये पेटी । धरा नाम कंठीं विठोंबाचे ॥३॥
बैसोनी निवांत करावें चिंतन । राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥
चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार । नाम एक सार विठोबाचें ॥५॥

१३३
हातींच्या कांकणा कासया आरसा । धरावा भरवंसा विठ्ठलनामीं ॥१॥
नलगे साचार याग यज्ञ विचार । जप निरंतर विठ्ठलनामी ॥२॥
योग्यांचिया वाटे नलगे खटपट । नामचि फुकट जपा आधीं ॥३॥
चोखा म्हणे सुख संताचे संगती । नाम अहोरात्रीं जप करा ॥४॥

हे पण पहा: संत साहित्य पुस्तके विकत घ्या 


संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – संत (१३४ ते १३९)

१३४
आजि दिवस धन्य सोनियाचा । जीवलग विठोबाचा भेटलासे ॥१॥
तेणें सुख समाधान झाली विश्रांती । दुजे नाठवती चित्तीं कांही ॥२॥
समाधानें जीव राहिला निश्चळ । गेले हळह्ळ त्रिविध ताप ॥३॥

१३५
कोणी पंढरीसी जाती वारकरी । तयांचे पायांवरी भाळ माझें ॥१॥
आनंदें तयांसी भेटेन आवडी । अंतरीची गोडी घेईन सुख ॥२॥
ते माझें मायबाप सोयरे सज्जन । तयां तनु मन वोवाळीन ॥३॥
चोखा म्हणे ते माहेर निजाचें । जन्मोजन्मांतरिचे साहाकारी ॥४॥

१३६
माझा शिण भाग अवघा हरपला । विठोबा देखिला विटेवरी ॥१॥
अवघ्या जन्मांचें सार्थक पैं झालें । समचरण देखिलें डोळेभरी ॥२॥
चंद्रभागे तीरीं नाचती वारकरी । विठ्ठलनाम गजरीं आनंदानें ॥३॥
दिंडया गरुड टके पताकांचे भार । होतो जयजयकार नामघोष ॥४॥
तो सुखसोहळा देवांसी दुर्लभ । आम्हां तो सुलभ चोखा म्हणे ॥५॥

१३७
माझ्या मना तूं धरी कां विचार । न करी प्रकार आन कांहीं ॥१॥
पंढरीसी कोणी जाती वारकरी । सुखें त्यांचे घरी पशुयाती ॥२॥
तयाचिया सवें घडेल चिंतन । चंद्रभागे स्नान एकादशी ॥३॥
जागर क्षिरापती वैष्णव सांगाते । घडेल आपैतें लाभ मज ॥४॥
चोखा म्हणे घडेल संतांची संगती । सहज पंगती बैसेन मी ॥५॥

१३८
वेध कैसा लागला वो जीवा । नाठवेचि हेवा दुजा कांहीं ॥१॥
पंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करीं मात तयां ॥२॥
माझ्या विठोबाचें गाती जे नाम । ते माझे सुखधाम वारकरी ॥३॥
लोटांगणें सामोरा जाईन तयांसी । क्षेम आनंदेसी देईन त्यांसी ॥४॥
चोखा म्हणे माझा प्राणाचा तो प्राण । जाईन वोवाळोन जीवें भावें ॥५॥

१३९
सप्रेम निवृत्ति आणि ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठल चरणीं ॥१॥
सोपान सांवता गोरा तो कुंभार । नरहरी सोनार प्रेम भरित ॥२॥
कबीर कमाल रोहिदास चांभार । आणिक अपार वैष्णव जन ॥३॥
चोखा तया पायीं घाली लोटांगण । वंदितो चरण प्रेमभावें ॥४॥


संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – उपदेश (१४० ते १७६)

१४०
अखंड समाधी होउनी ठेलं मन । गेलें देहभान विसरोनी ॥१॥
विधिनिषेध भेणें न मोडे समाधी । तुटली उपाधी लिगाडाची ॥२॥
चालतां बोलतां न मोडे समाधी । मूळ अंतरशुद्धी कारण हें ॥३॥
चोखा म्हणे ऐसा समाधी सोहळा । जाणे तो विरळा लक्षामाजीं ॥४॥

१४१
असोनि नसणें या नांव स्वार्थ । येथेंचि परमार्थ सुखी होय ॥१॥
स्वार्थ परमार्थ आपुलेची देहीं । अनुभवोनि पाहीं तुझा तूंची ॥२॥
सुख दु:ख दोन्ही वाहूं नको ओझें । मी आणि माझें परतें सारीं ॥३॥
चोखा म्हणे तोचि योगियांचा राणा । जिहीं या खुणा अनुभविल्या ॥४॥

१४२
असोनि नसणें संसाराचे ठाईं । हाचि बोध पाहीं मना घ्यावा ॥१॥
संतांची संगती नामाची आवडी । रिकामी अर्ध घडी जावों नेदी ॥२॥
काम क्रोध सुनेपरी करी दूरी । सहपरिवारी दवडी बापा ॥३॥
चोखा म्हणे सुख आपेआप घरा । नाहीं तर फजीतखोरा जासी वायां ॥४॥

१४३
आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥
पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥
परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥
चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥

१४५
आला नरदेहीं पाहीं । शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥
करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥
न ये राम नाम मुखीं । नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥
करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुद्ध ॥४॥
मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥

१४६
उदंड नागवले वाहावले पुरीं । ऐसी याची थोरी काय सांगों ॥१॥
ब्रम्हादिक जेणें बहु नागविले । सिद्ध ऋषि भुलविले येणें देख ॥२॥
इंद्रादि चंद्रा लावियेले काळें । कामाचिया बळें अहिल्येसी ॥३॥
प्रत्यक्ष शूळपाणि तपियां मुगुटमणी । तो हिंडविला वनीं भिल्लणीमागें ॥४॥
वृंदेचे घरीं विष्णु धरणें करी । अभिलाष करी मनें धरिला ॥५॥
चोखा म्हणे येणें बहु नाडियेले । काय आतां बोल जाय पुढें ॥६॥

१४७
ऊंस डोंगा परी रस नोहे डोंगा । काय बुललासी वरलीया रंगा ॥१॥
कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥२॥
नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगें । काय भुललासी वरलीया रंगा ॥३॥
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा । काय भुललासी वरलीया रंगा ॥४॥

१४८
कोणें देखियेलें जग । पांडुरंगा मी नेणें ॥१॥
मौन्यें पारूषली वाणी । शब्द खाणी विसरली ॥२॥
एका आधी कैचे दोन । मज पासोन मी नेणें ॥३॥
चोखामेळा म्हणती संत । हे ही मात उपाधी ॥४॥

१४९
घरदार वोखटें अवघें फलकटें । दु:खाचें गोमटें सकळही ॥१॥
नाशिवंतासाठी रडती रांडा पोरें । काय त्याचें खरें स्त्री पुत्र ॥२॥
लावूनियां मोह भुलविलें आशा । त्याचा भरंवसा धरिती जन ॥३॥
सकळही चोर अंती हे पळती । चोखा म्हणे कां न गाती रामनाम ॥४॥

१५०
चंदनाचे संगे बोरीया बाभळी । हेकळी टाकळी चंदनाची ॥१॥
संतांचिया संगें अभाविक जन । तयाच्या दर्शनें तेची होती ॥२॥
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा । नाहीं तरी भार वाहवा खरा ऐसा ॥३॥

१५१
जन्मला देह पोशिला सुखाचा । काय भरंवसा याचा आहे ॥१॥
येकलेंचि यावें येकलेंचि जावें । हेंचि अनुभवावें आपणाची ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरणजा सर्वेशा विठोबासी ॥४॥

१५२
जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
कोण हे आघवे सुखाचे संगती । अंतकाळी होती पाठीमोरे ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । शरण जा सर्वेशा विठोबासी ॥४॥

१५३
जन्मांचे साकडें नाहीं माझे कोडें । जेंणें तुम्हां पडे वोझें देवा ॥१॥
कोणत्याही कुळीं उंच नीच वर्ण । हे मज कारण नाहीं त्याचें ॥२॥
वैष्णवाचे घरीं लोळेन परवरी । करीं कधिकारी उच्छिष्टाचा ॥३॥
चोखा म्हणे जया घडे पंढरीची वारी । तयाचिये घरी पशुयाती ॥४॥

१५४
जया जे वासना तया ती भावना । होतसे जाणा आदि अंतीं ॥१॥
कामाचे विलग आवरावें चित्त । क्रोधाचा तो ऊत शांतवोनी ॥२॥
ममताही माया दंभ अहंकार । आवरावे साचार शांति सुखें ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरावा संग । तरीच पांडुरंग हाता लागे ॥४॥

१५५
डोळियाचा देंखणा पाहतांच दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटी ॥१॥
डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपेआप तेथें झांकला डोळा ॥२॥
चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥

१५६
तुटला आयुष्याचा दोरा । येर वाउगा पसारा ॥१॥
ताकोनी पळती रांडा पोरें । अंती होती पाठमोरे ॥२॥
अवघे सुखाचे सांगती । कोणी कामा नये अंती ॥३॥
चोखा म्हणे फजितखोर । माझें माझें म्हणे घर ॥४॥

१५७
तुम्ही तों सांकडें बहुत वारिलें । आतां कां उगलें बोलूं देवा ॥१॥
आजीवरी पडिलों लिगाडाचे गुंतीं । तेणेंचि फजिती झाली दिसे ॥२॥
झाला दिसे मज मोकळा मारग । धिक्कारिती जग मागें पुढें ॥३॥
चोखा म्हणे ऐसें विपरीत देखिलें । तें साचचि संचलें मनीं माझ्या ॥४॥

१५८
देव म्हणे नारदासी । जाय निर्मळा तीर्थासी ॥१॥
तीर्थ निर्मळे संगमी । स्नान करी नारदस्वामी ॥२॥
नारदाची नारदी सरी । धन्य धन्य मेहुणपुरी ॥३॥
चोखा म्हणे हेंचि देई । स्नान घडो तये ठायीं ॥४॥

१५९
देह बुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥
देव पहा तुम्हीं देव पहा । तुम्हीं देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥
उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्याक्तानें देव ग्रासीला ॥३॥
चोखा म्हणे नागवे उघडे झाले एक । सहज मीपण देख मावळले ॥४॥

१६०
देही देखिली पंढरी । विठू अविनाश विटेवरी ॥१॥
रुक्मिणी अंगना । आत्मा पुंडलिक जाणा ॥२॥
आकार तितुका नासे । निराकार विठ्ठल दिसे ॥३॥
ऐसें गुज ठायीचा ठायी । चोखा म्हणे लागा पायी ॥४॥

१६१
दु:खरूप देह दु:खाचा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥१॥
कन्या पुत्र बाळें सुखाचे सांगाती । दु:ख होतां जाती आपोआप ॥२॥
सोयरे धायरे कवणाचे कवण । अवघा वाटे शीण मना माझ्या ॥३॥
चोखा म्हणे अहो पंढरीनिवासा । सोडवी भवपाशा पासोनिया ॥४॥

१६२
धिक् तो आचार धिक् तो विचार । धिक् तो संसार धिक् जन्म ॥१॥
धिक् तें पठण धिक् तें पुराण । धिक् यज्ञ हवन केलें तेणें ॥२॥
धिक् ब्रम्हाज्ञान वाउग्या ह्या गोष्टी । दया क्षमा पोटी शांति नाहीं ॥३॥
धिक् ते आसन जटाभार माथा । वायांचि हे कंथा धरिली जेणें ॥४॥
चोखा म्हणे धिक् जन्मला तो नर । भोंगी नरक घोर अंतकाळीं ॥५॥

१६३
न करीं सायासाचें काम । गाईन नाम आवडीं ॥१॥
या परतें कांही नेणें । आन साधनें कोणतीं ॥२॥
सुखाचेंचि अवघें झालें । नाहीं उरलें दु:खातें ॥३॥
चोखा म्हणे भवनदी उतार । नामें पैलपार तरेन ॥४॥

१६४
निर्गुणा अंगी सगुण बाणलें । निर्गुण सगुण एकत्वा आलें ॥१॥
शब्दाची खूण जाणती ज्ञानी । येरा गबाळा अवघी कहाणी ॥२॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान भले । निर्गुण सगुण त्याही गिळियेलें ॥३॥
चोखा म्हणे त्यांच्या पायींची पादुका । वागवितो देखा ऐक्यपणें ॥४॥

१६५
नेणपणें मिठी घालीन पदरा । बैसेन द्वारांत तयाचिया ॥१॥
आशा हे पाठी घेवोनी सांगतों । निचेष्ट निरूतें भरीन माजी ॥२॥
लाभाचा हा लाभ येईल माझे हाती । मग काय चिंता करणें काज ॥३॥
चोखा म्हणे मज हेचि वाटे गोड । आणिक नाहीं चाड दुजी कांही ॥४॥

१६६
नेणों कोणे काय देवासी दिधलें । मागत वाहिलें तयापाशीं ॥१॥
पेरावें जें शेती तेचि फळप्राप्ती । वाया काय गुंती आपुले मनीं ॥२॥
तेव्हां घ्यावें हेंचि पूर्वापार । पुराणी विचार हाचि आहे ॥३॥
चोखा म्हणे उगें देवासी रुसती । आपुलें मनाप्रती प्रसती ना ॥४॥

१६७
पांडुरंगी लागो मन । कोण चिंतन करी ऐसें ॥१॥
देहभाव विसरला । देव गेला बुडोनी ॥२॥
जीव उपाधि भक्ती वंद्य । तेथें भेद जन्मला ॥३॥
मुळींच चोखा मेळा नाहीं । कैंचा राही विटाळ ॥४॥

१६८
फुलाचे अंगीं सुवास असे । फूल वाळलिया सुवास नासे ॥१॥
मृत्तिकेचे घट केले नानापरी । नाव ठेविलें रांझण माथण घागरी ॥२॥
विराली मृत्तिका फुटले घट । प्राणी कां फुकट शोक करी ॥३॥
चोखा म्हणे ऐसें मृगजळ पाही । विवेकी तिये ठायीं न गुंतेची ॥४॥

१६९
बावरे मन रात्रंदिवस झालें । नावरे वाहिलें काय करूं ॥१॥
येणें माझा कैसा घेतिलासे लाहो । आतां कोठे जावो देशांतरीं ॥२॥
न धरीं तयाची संगतीची गोडी । झाली वोढावोढी साच दिसे ॥३॥
चोखा म्हणे याचा न तुटे संबंध । येणें मज बाध लाविलासे ॥४॥

१७०
बैसोनि निवांत करीन चिंतन । काया वाचा मनसहित देवा ॥१॥
नामाचा आठव हेचि सोपें वर्म । अवघें कर्माकर्म पारूषती ॥२॥
या परतें साधन आन कांहीं नेणें । अखंड वाचे म्हणे रामकृष्ण ॥३॥
सुलभ हा मंत्र तारक जीवासी । येणें भवासी उतार होय ॥४॥
चोखा म्हणे मज सांगितलें कानीं । राम कृष्ण वाणीं जप सदा ॥५॥

१७१
याचिया छंदा जे लागले प्राणी । त्याची धुळधाणी केली येणें ॥१॥
याचा संग पुरे याचा संग पुरे । अंतरी ते उरे हांव हांव ॥२॥
स्वार्थ परमार्थ घातिलासे चिरा । किती फजीतखोरा बुझवावें ॥३॥
न जावें तेथें हाटेची जाय । करूं नये तें करीं स्वयें न धरीं कांही ॥४॥
चोखा म्हणे तुज तुझीच आण । होई समाधान घटिकाभरी ॥५॥

१७२
लिहिलें संचितीं न चुके कल्पांतीं । वायां कुंथाकुंथीं करूनी काय ॥१॥
जन्ममरण सुखदु:खाचें गांठोडें । हें तों मागें पुढें बांधलेंसे ॥२॥
निढळींची अक्षरे साच तेचि खरे । आतां वोरबार करील कोण ॥३॥
चोखा म्हणे आमुची जैशी कां वासना । तैशीच भावना होत जात ॥४॥

१७३
वाढलें शरीर काळाचें हें ग्वाजें । काय माझें तुझें म्हणतोसी ॥१॥
बाळ – तरुण दशा आपुलेच अंगीं । आपणची भोगी वृद्धपण ॥२॥
आपुला आपण न करी विचार । काय हे अमर शरीर याचें ॥३॥
चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी । मक्षिके निर्धारी वेढियेला ॥४॥

१७४
वांया हांव भरी गुंतले कबाडी । करिताती जोडी पुढीलाची ॥१॥
ऐसे तें वोंगळ देख आंधळे । भोगिताती बळें सुख दु:खं ॥२॥
नाशिवंत अवघे मानियेलें साच । करिती हव्यास जन्मोजन्मीं ॥३॥
चोखा म्हणे यासी काय उपदेश । भोगी नर्कवास कल्पवरी ॥४॥

१७५
वांया हांव भरी नका घालूं मन । चिंतावे चरण विठोबाचे ॥१॥
हेंचि साधन साराचें सार । येणें भवपार उतरती ॥२॥
न करी आळस नामाचा क्षणभरी । कामक्रोध दुरी पळे येणें ॥३॥
दया क्षा शांति संतांची संगती । यां परती विश्रांती दुजी नाहीं ॥४॥
चोखा म्हणे दृढ धरावा विश्वासा । नामाचा निजध्यास सर्वकाळ ॥५॥

१७६
संतांचा अनुभव संतची जाणति । येर ते हांसती अभाविक ॥१॥
नामाचा प्रताप प्रल्हादचि जाणें जन्म मरण जेणे खुंटविलें ॥२॥
सेवेचा प्रकार जाणे हनुमंत । तेणें सीताकांत सुखी केला ॥३॥
सख्यत्वें पूर्णता अर्जुना बाणली । ऐक्य रूपें चाली मिरवली ॥४॥
चोखा म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । तेथें मी पामर काय वानूं ॥५॥


संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – भाव

१७७
आमुचा आम्ही केला भावबळी । भावें वनमाळी आकळीला ॥१॥
भावचि कारण भावचि कारण । भावें देव शरण भाविकासी ॥२॥
निज भावबळें घातिलासे वेढा । देव चहूंकडा कोंडियेला ॥३॥
चोखा म्हणे देव भावाचा बांधला । भक्तांचा अंकिला म्हणुनी झाला ॥४॥

१७८
शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें पुराणें वदती ॥१॥
जयासाठीं जप तप । तो हा विश्वाचाचि बाप ॥२॥
नामें पातकी तारिले । जड जीव उद्धरिले ॥३॥
विश्वास दृढ धरा मनीं । चोखा मिठी घाली चरणीं ॥४॥


संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – विटाळ (१७९ – १८४)

१७९
काळाचा विटाळ जीवशिवा अंगीं । बांधलासे जगीं दृढ गांठीं ॥१॥
विटाळी विटाळ चवदाही भुवनीं । स्थावर जंगम व्यापुनी विटाळची ॥२॥
सुखासी विटाळ दु:खासी विटाळ । विटाळीं विटाळ वाढलासे ॥३॥
विटाळाचे अंगी विटाळाचे फळ । चोखा तो निर्मळ नाम गाय ॥४॥

१८०
कोण तो सोंवळा कोण तो वोंवळा । दोहींच्या वेगळा विठ्ठल माझा ॥१॥
कोणासी विटाळ कशाचा जाहला । मुळींचा संचला सोंवळाची ॥२॥
पांचाचा विटाळ येकचिये आंगा । सोंवळा तो जगामाजी कोण ॥३॥
चोखा म्हणे माझा विठ्ठल सोंवळा । अरूपें आगळा विटेवरी ॥४॥

१८१
उपजले विटळीं मेले ते विटाळीं । राहिले विटाळीं ते ही जाती ॥१॥
रडती पडती ते ही वेगें मरती । परि नाम न गाती भुली भ्रमें ॥२॥
कायरे हा देह सुखाचा तयासी । उघडाचि जासी अंतकाळी ॥३॥
चोखा म्हणे याचा न धरीं भरंवसा । अंती यम फांसा गळां पडे ॥४॥

१८२
नीचाचे संगती देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळोनि सोंवळा केला ॥१॥
मुळींच सोवळा कोठें तो वोंवळा । पाहतां पाहाणें डोळा जयापरी ॥२॥
सोवळ्यांचे ठाई सोंवळा आहे । वोंवळ्या ठाई वोंवळा कां न राहे ॥३॥
चोखा म्हणे देव दोहींच्या वेगळा । तोचि म्यां देखिला दृष्टीभरी ॥४॥

१८३
पंचही भूतांचा एकचि विटाळ । अवघाचि मेळ जगीं नांदे ॥१॥
तेथें तो सोंवळा वोंवळा तो कोण । विटाळाचें कारण देह मूळ ॥२॥
आदिअंती अवघा विटाळ संचला । सोंवळा तो झाला कोण न कळे ॥३॥
चोखा म्हणे मज नवल वाटतें । विटाळा परतें आहे कोण ॥४॥

१८४
वेदासी विटाळ शास्त्रासी विटाळ । पुराणें अमंगळ विटाळाचीं ॥१॥
जीवासी विटाळ शिवासी विटाळ । काया अमंगळ विटाळाची ॥२॥
ब्रम्हिया विटाळ विष्णूसी विटाळ । शंकरा विटाळ अमंगळ ॥३॥
जन्मतां विटाळ मरतां विटाळ । चोखा म्हणे विटाळ आदिअंती ॥४॥


संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – समाजाचे वर्ण

१८५
बहुत प्रकार बहुत या जगाचे । काय वानूं त्याचे गुणदोष ॥१॥
नीच हे याति अनामिक नांव । तेथें भावाभाव कोण कैचा ॥२॥
चाहाड चोर जार भ्रष्ट ते साचे । हीनत्व जन्मांचे पदरीं आहे ॥३॥
चोखा म्हणे त्यांचे संगती पडिलों । बहु हे पीडिलों वियोगानें ॥४॥


संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – नामदेव स्तुती

१८६
आजि सोनियाचा दिवस धन्य झाला । प्रत्यक्ष भेटला नामदेव ॥१॥
माझें मज दिलें माझें मज दिलें । माझें मज दिलें प्रेमसुख ॥२॥
बहुत आटणी करितां दाटणी । सुखाचें सुख मनीं कोंदाटलें ॥३॥
माझा मज देव दावियेला देहीं । मी तूं पण गेलें ठाय़ींच्या ठायीं ॥४॥
चोखा म्हणे माझा जीवीचा विसावा । पोकरितों धांवा नामदेवा ॥५॥


संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – संकीर्ण

१८७
कैसा या लोभें गोवियेला । हा तो आपैसाचि राहिला ॥१॥
मज तो वाटे चोज याचे । खातां खादलें खाय साचें ॥२॥
ऐसी काय तुझी भीड । पडली ते न कळे गूढ ॥३॥
चोखा म्हणे भुलवण्या । धन्य नामया शाहाण्या ॥४॥


जोहार

१८८
कोपटी तळपती गाई । हाडाचीं बेडी पडेल पायीं । तोंड चुकवितां इज्जत जाई । मग वाचोनियां । काय कीजे मायबाप ॥१॥
जोहार पाटील बाजी । चावडी चलाना कां जी । ऐसें सांगत आलों आजी । बहुत बाकीं थकली की मायबाप ॥२॥
हिमायत येथें न चले कांही । दुस्तर वार्ता पुढें भाई । वरते पाय खालीं डोई । नव महिने होईल कीं जी मायबाप ॥३॥
उगलीं कां कोंडितां गुरें । गांवीची कां बुजवितां द्वारें । फेडा झाला बरोबर । नका उणें पुरें की मायबाप ॥४॥
यंदा आली चेवाची पाळीं । तोंडें कां जी करितां काळीं । चावडी चला या वेळीं । शिव्या गाळी घेऊं नका की मायबाप ॥५॥
कुळकर्णी आपुल्या स्वाधीन करा । आडखर्चाचा ताळा धरा । दयाळु मायाळु बाप करा । येईल मुजरा निजसत्वें की मायबाप ॥६॥
विठु पाटलाचा महार चोखामेळ्याचा जोहार । सकळ संतांचा कारभार । मज नफराचे शिरीं की जी मायबाप ॥७॥

१८९
जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ॥१॥
बहु भुकेला जाहलों । तुमच्या उष्टयासाठीं आलों ॥२॥
बहु केली आस । तुमच्या दासाचा मी दास ॥३॥
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्टयासाठीं ॥४॥


प्रसाद

१९०
वासुदेव दिंडी गान । प्रसाद मागूं आले दान । आणिक आले कोण कोण । त्यांची नावें परिसावी ॥१॥
ब्राम्हाण क्षत्रिय शूद्र वाणि । मागूं आल्या चारी खाणी । लिहिणार जोशी पंडित गणीं । चाटे भाट आले ते ॥२॥
गोंधळ डफ गाणें बहीरव जोगी । बाळसंतोषी आणि बैरागी । फकीर डाकुलता तो वेगी । कान फाडया आला तो ॥३॥
सारमंडळी आलासे । राहा विनोदें बोलतसे । चोखा महार जोहार करितसे । प्रसाद देई म्हणोनी ॥४॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

संत चोखामेळा अभंग १०९ते१९० संत चोखामेळा अभंग १०९ते१९०

2 thoughts on “संत चोखामेळा अभंग १०९ते१९०”

  1. विश्वास गराडे

    सुंदर अभंग उपलब्ध करून दिल्याबददल धन्यवाद

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *