दासबोध दशक विसावा

दासबोध दशक तिसरा

दासबोध दशक तिसरा विडिओ आणि ऑडिओ सहित



समास १ ते ५

समास १ ते ५ अर्थ

समास ६ ते १०

समास ६ ते १० अर्थ


श्रीमत् दासबोध ॥
॥ दशक तिसरा : स्वगुणपरीक्षानाम

समास पहिला : जन्मदुःख निरूपण
॥ श्रीराम ॥

जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर ।
जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १॥
श्री समर्थ म्हणतात की, जन्म हा दुःखरूपी वृक्षाचा अंकुर म्हणजे आरंभ. जन्म झाला की दुःखाला सुरुवातच होते. जन्म शोकाचा समुद्र असून भयाचा कधीही न हलणारा असा डोंगर आहे. (१)

जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी ।
जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २॥
जन्म म्हणजे कर्माची मूस आहे. कारण जन्मापासूनच कर्म पाठीस लागते. जन्म ही पातकाची खाण आहे. जन्म ही नित्यनूतन काळाची जाचणी आहे. कारण जन्माला आल्यापासून काळाचे भय सदा मागे लागलेलेच असते. (२)

जन्म कुविद्येचें फळ । जन्म लोभाचें कमळ ।
जन्म भ्रांतीचें पडळ । ज्ञानहीन ॥ ३॥
जन्म हे कुविद्येचे फळ आहे असे म्हणण्याचे कारण वासनेमुळेच जन्म घ्यावा लागतो. जन्मास लोभाचे कमळ म्हटले आहे. लोभ म्हणजे आसक्ती. आसक्तिरूपी कमळातच जीवरूपी भ्रमर गुंतून पडतो. जन्म हे भ्रांतीचे पडळ आहे. कारण जन्म होताच स्वस्वरूपाचे विस्मरणरूपी अज्ञान उत्पन होते. (३)

जन्म जिवासी बंधन । जन्म मृत्यासी कारण ।
जन्म हेंचि अकारण । गथागोवी ॥ ४॥
जन्म होताच मी देह हे विपरीत ज्ञान बुद्धीस व्यापते व वास्तविक मुक्त असून जीव आपल्याला बद्ध समजू लागतो. तसा देहाचा जन्म म्हणजे अकारणच मायेत गुरफटणे होय. (४)

जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर ।
जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५॥
जन्म होताच स्वस्वरूपाचा विसर पडतो. तोच सुखाचा विसर होय. मी देह ही भावना दृढ होताच एकामागोमाग एक चिंता त्या जीवास व्यापून टाकतात, म्हणून जन्म म्हणजे चिंतेचे आगर म्हटले असून जन्मच मुळी वासनेमुळे होतो आणि त्यानंतर वासनांची सतत वृद्धीच होत जाते. (५)

जन्म जीवाची आवदसा । जन्म कल्पनेचा ठसा ।
जन्म लांवेचा वळसा । ममतारूप ॥ ६॥
जन्म होताच जीवाचे स्वस्वरूपज्ञान लोपते हे एक प्रकारे त्याचे अधःपतनच असते. जन्म होताच मी देह या कल्पनेचा ठसा बुद्धीवरउमटतो आणि मग ममतारूप डाकीण त्याला झपाटून टाकते. (६)

जन्म मायेचे मैंदावें । जन्म क्रोधाचें विरावें ।
जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७॥
जन्म म्हणजे मायेचे कपट होय. जन्म म्हणजे क्रोधाचे वीरपण होय. जन्म मोक्षाच्या मार्गात आडवे येणारे विघ्नच आहे. (७)

जन्म जिवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण ।
जन्म हेंचि विस्मरण । ईश्वराचें ॥ ८॥
देहाचा जन्म होताच मी देह हा अहंकार उत्पन होतो, म्हणजे अहंता तेव्हापासून आपला प्रभाव गाजवू लागते आणि गर्भात असताना च्या जीवास ईश्वराचे स्मरण असते, त्यास जन्मताक्षणी त्याचा पूर्ण विसर पडतो. (८)

जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी ।
जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९॥
जन्म होताच विषयांची आवड उत्पन्न होते, इंद्रियांनी विषयोपभोग घेतले असता सुख लाभेल अशी दुराशेची बेडी हातापायात पडते. काळ म्हणजे मृत्यू. काकडी खावी तसा काळ या शरीरास कधी नष्ट करील, हे सांगता येत नाही. (९)

जन्म हाचि विषमकाळ । जन्म हेंचि वोखटी वेळ ।
जन्म हा अति कुश्चीळ । नर्कपतन ॥ १०॥
जन्मकाळ हाच वाईट काळ असून ती वेळ फार कठीण, प्राणसंकटाची असते. जन्म फार घाणेरडा असून ते नरकात पडणेच समजावे. (१०)

पाहातां शरीराचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ ।
रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११॥
या देहाची उत्पत्ती कशी होते, याचा विचार करू लागल्यास या देहासारखे अमंगळ काही नाही अशी खात्री पटते. रजस्वलेच्या विटाळामध्ये याचा जन्म होतो. (११)

अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा ।
तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवी घडे ॥ १२॥
ज्या विटाळास अत्यंत अमंगळ, दोषास्पद मानतात, त्या विटाळाचाच पुतळा म्हणजे हा देह होय. असा मुळातच जो अमंगळ, त्याला निर्मळ करण्याचा खयटोप केला, तरी तो कसा सफल होणार ? (१२)

रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोन जाला गाळ ।
त्या गळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३॥
रजस्वलेचा विटाळ आटून त्याचा जो गाळ बनतो, त्या गाळाचेच हे शरीर बनते. (१३)

वरी वरी दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नर्काचें ।
जैसें झांकणें चर्मकुंडाचें । उघडितांच नये ॥ १४॥
ते वरवर सुरेख दिसते, पण वास्तविक ते आतमध्ये घाणीचे पोतडेच आहे. चांभाराच्या चर्मकुंडाचे झाकण काढायची ज्याप्रमाणे सोयच नसते, तशीच या शरीराची स्थिती आहे. (१४)

कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यईं धु‍ईजेतें ।
तरी दुर्गंधी देहातें । शुद्धता न ये ॥ १५॥
ते चर्मकुंड धुऊन काढले असता स्वच्छ होऊ शकते पण या देहाला दररोज कितीही धुऊन काढले तरी दुर्गंधीने भरलेला हा देह निर्मळ होतच नाही. (१५)

अस्तीपंजर उभविला । सीरानाडीं गुंडाळिला ।
मेदमांसें सरसाविला । सांदोसाअंदीं भरूनी ॥१६॥
हाडांचा सापळा उभा केला, तो शिरा नाड्या यांनी गुंडाळला आणि प्रत्येक सांध्यामध्ये चरबी व मांस भरून त्याला चांगला फुगवला. असा हा देह तयार होतो. (१६)

अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंहि भरलें असे देहीं ।
नाना व्याधी दुःखें तेंहि । अभ्यांतरी वसती ॥ १७॥
रक्त म्हणजे ‘अशुद्ध’ अर्थात जे शुद्ध नाही, तेही या शरीरात भरलेले असते. शिवाय या शरीरात नाना व्याधी दुःखे भरलेली असतात. (१७)

नर्काचें कोठार भरलें । आंतबाहेरी लिडीबिडिलें ।
मूत्रपोतडें जमलें । दुर्गंधीचें ॥ १८॥
शरीर म्हणजे आतबाहेर घाणीने लडबडलेले व नर्काचे कोठार आहे. शरीर म्हणजे दुर्गंधीने भरलेली मूत्राची पिशवीच आहे. (१८)

जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी ।
अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी ॥ १९॥
शरीरात जैत, किडे वळवळत असतात आणि नाना प्रकारच्या दुर्गंधीची पोतडी म्हणजे यातील आतडी होत. शरीरात अनेक कंटाळवाणी गलिच्छ कातडी लोंबत असतात. (१९)

सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण ।
उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी नेघवे ॥ २०॥
शरीरात शिर म्हणजे मस्तक हे श्रेष्ठ म्हणतात. त्याला उत्तमांग म्हणतात, पण तेथे नाकांतून शेंबूड वाहात असतो आणि कान फुटला असता जी दुर्गंधी त्या घाणीमुळे सुटते ती तर सहनच होत नाही. (२०)

डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें ।
प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥२१॥
डोळ्यांत चिपडे येतात, नाकांत मेकडे गर्दी करतात, सेज प्रातःकाळी तोंडातून मळासारखी घाण बाहेर पडते. (२१)

लाळ थुंका आणी मळ । पीत श्लेष्मा प्रबळ ।
तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥ २२॥
ज्या तोंडामध्ये लाळ, थुंकी आणि इतर घाण, तसेच पित्त, कफ यासारखी प्रबळ घाण भरलेली असते, त्याला मुखकमळ चंद्रासारखे आहे, असे म्हणतात. (२२)

मुख ऐसें कुश्चीळ दिसे । पोटीं विष्ठा भरली असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥ २३॥
तोंड असे घाणेरडे असते, तर पोटात विष्ठा भरलेली असते. या गोष्टी जगात प्रत्यक्षच आहेत. त्यांना दुसरे प्रमाण देण्याची जरुरी नाही. (२३)

पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्ठा कांहीं वमन ।
भागीरथीचें घेतां जीवन । त्याची कोये लघुशंका ॥ २४॥
पोटात जरी काही मिष्टान्न, दिव्यान्न घातले तरी त्यातील काहीची विष्ठा होते, तर कधी कधी काही ओकूनही पडते. जरी अगदी गंगाजलप्राशन केले तरी त्याचे मूत्रच बनते. (२४)

एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन ।
येणेंचि देह वाढे जाण । यदर्थीं संशय नाहीं ॥ २५॥
थोडक्यात, मल मूत्र आणि ओक हे देहाचे जीवन असून त्यांनीच देहाचे पोषण होते, याबद्दल संशय नाही. (२५)

पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक ।
जाला राव अथवा रंक । पोटीं विष्ठा चुकेना ॥ २६॥
जर पोटात याप्रमाणे मल, मूत्र, ओक नसतील, तर सर्व लोक मरून जातील. राव असो वा रंक असो, त्याच्या पोटात विष्ठा असतेच असते. ती चुकत नाही. (२६)

निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्वतां ।
एवं देहाची वेवस्था । ऐसी असे ॥ २७॥
स्वच्छ करण्यासाठी ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला तर देह मरून जाईल या देहाची अवस्था ही अशी असते. (२७)

ऐसा हा धड असतां । येथाभूत पाहों जातां ।
मग ते दुर्दशा सांगतां । शंका बाधी ॥ २८॥
जो पर्यंत देह धडधाकट असतो तोपर्यंत देहाची कशी अवस्था असते, हे इत्यंभूत सांगितले तरी खरे वाटत नाही व देह खरेच असा घाणेरडा आहे का, अशी शंका मनात येते. (२८)

ऐसिये कारागृहीं वस्ती । नवमास बहु विपत्ती ।
नवहि द्वारें निरोधती । वायो कैंचा तेथें ॥ २९॥
अशा या देहरूपी कारागृहात वस्तीला आल्यामुळे जीवाला नऊ महिने फार यातना भोगाव्या लागतात. गर्भाशयात वायू नसतो. त्यामुळे देहातील नऊ द्वारे (दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन भोके, तोंड गुद आणि उपस्थ) रोधली जातात. (२९)

वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती ।
तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३०॥
आईच्या पोटातील ओक आणि विष्ठा यातून पाणी झिरपते, रस झिरपतात, ते जठराग्नीमुळे तापतात, त्यामुळे गर्भाच्या अस्थी व मांस उकडून निघतात. (३०)

त्वचेविण गर्भ खोळे । तंव मातेसी होती डोहळे ।
कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१॥
गर्भाला त्वचा नसते, तो नुसता मांसपिंड खोळीत असतो. तो हालचाल करू लागतो, तेव्हा मातेला डोहाळे लागतात. ती कडू व तिखट पदार्थ खाऊ लागते, त्यामुळे त्या गर्भातील बालकाचे सर्वांग होरपळते. (३१)

बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें ।
रसौपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२॥
गर्भ म्हणजे चामड्याचे बांधलेले गाठोडे व आत विष्ठेचे पोतडे असते. नाभीपासून निघणाऱ्या नाळेच्याद्वारे जगण्यास आवश्यक असणारे रस त्याला मिळतात. (३२)

विष्ठा मूत्र वांती पीत । नाकीं तोंडीं निघती जंत ।
तेणें निर्बुजलें चित्त । आतिशयेंसीं ॥ ३३॥
मल मूत्र, ओक आणि पित्त यांच्यामुळे नाकातोंडातून जंतू बाहेर पडतात. त्यामुळे त्या गर्भातील जीव अतिशय घाबरतो. (३३)

ऐसिये कारागृहीं प्राणी । पडिला अत्यंत दाटणीं ।
कळवळोन म्हणे चक्रपाणी । सोडवीं येथून आतां ॥ ३४॥
अशा या कैदखान्यात तो जीव अत्यंत अडचणीत सापडतो. त्यावेळी तो जीव कळवळून म्हणू लागतो की, ‘हे चक्रपाणी, मला आता येथून सोडव.’ (३४)

देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहित करीन ।
गर्भवास हा चुकवीन । पुन्हां न ये येथें ॥ ३५॥
हे देवा, जर तू आत्ता मला येथून सोडवशील, तर मी स्वतःचे हित करून घेईन आणि गर्भवास चुकवीन. पुन्हा येथे येणार नाही. (३५)

ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली । तंव जन्मवेळ पुढें आली ।
माता आक्रंदों लागली । प्रसूतकाळीं ॥ ३६॥
दुःखाने कासावीस होऊन जीव अशी प्रतिज्ञा करतो, तोच जन्मवेळ जवळ आलेली असते आणि प्रसूतीची वेळ आल्याने त्या वेदनांनी आई आरडाओरडा करू लागते. (३६)

नाकीं तोंडीं बैसलें मांस । मस्तकद्वारें सांडी स्वास ।
तेंहि बुजलें निशेष । जन्मकाळीं ॥ ३७॥
पोराच्या नाकातोंडात मांस घट्ट बसल्याने ते मस्तकावरील टाळूच्या छिद्राद्वारे श्वासोच्छवास करू लागते. पण ते छिद्रही जन्मकाळी बुजून जाते. (३७)

मस्तकद्वार तें बुजलें । तेणें चित्त निर्बुजलें ।
प्राणी तळमळूं लागलें । चहूंकडे ॥ ३८॥
टळूचे छिद्र बंद झाल्याने त्या पोराचा जीव घाबरा होऊन तो तळमळून चहूकडे हळू लागतो. (३८)

स्वास उस्वास कोंडला । तेणें प्राणी जाजावला ।
मार्ग दिसेनासा जाला । कासावीस ॥ ३९॥
श्वासोच्छवास कोंडला गेल्यामुळे तो जीव त्रासतो, पण मार्गच नसल्यामुळे तो कासावीस होतो. (३९)

चित्त बहु निर्बुजलें । तेणें आडभरीं भरलें ।
लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ ४०॥
अतिशय घाबरून मूल बाहेर येण्यासाठी धडपडू लागले, पण ते भलत्याच जागी अडकून आडवे झाले. तेव्हा लोक म्हणू लागले की, ‘ अरे मूल आडवे आले आहे, तर आता त्याला कापून त्याचे तुकडे करूनच काढा.’ (४०)

मग ते खांडून काढिती । हस्तपाद छेदून घेती ।
हातां पडिलें तेंचि कापिती । मुख नासिक उदर ॥ ४१॥
मग त्या मुलाचे हात, पाय, किंवा तोंड नाक पोट वगैरे जे अवयव हाताला सापडतील, ते कापून काढले जातात. (४१)

ऐसे टवके तोडिले । बाळकें प्राण सोडिले ।
मातेनेंहि सांडिलें । कळिवर ॥ ४२॥
अशा प्रकारे त्या बालकाचे टवके तोडून काढताक्षणी ते बालक प्राण सोडते. एवढेच नव्हे तर या सगळ्या खटपटीत माताही देहाचा त्याग करते. (४२)

मृत्य पावला आपण । मतेचा घेतला प्राण ।
दुःख भोगिलें दारुण । गर्भवासीं ॥ ४३॥
याप्रमाणे ते बालक स्वत: मृत्यू पावते व आईचाही प्राण जातो. गर्भवासात त्या जीवाला भयंकर दुःख भोगावे लागते. (४३)

तथापी सुकृतेंकरूनी । मार्ग सांपडला योनी ।
तर्ह्हीं आडकला जाउनी । कंठस्कंदीं मागुता ॥ ४४॥
तथापि जर पूर्वपुण्याईच्या योगे त्याला योनीतून बाहेर येण्याचा सरळ मार्ग सापडला, तरी त्याची मान, खांदा वगैरे एखादा अवयव त्या संकुचित मार्गात अडकून बसतो. (अ)

तये संकोचित पंथीं । बळेंचि वोढून काढिती ।
तेणें गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५॥
मग त्या संकुचित मार्गातून त्याला बळेच ओढून बाहेर काढतात. त्यायोगेही त्या बालकाचे प्राण कधी कधी जातात. (४५)

बाळकाचे जातां प्राण । अंतीं होये विस्मरण ।
तेणें पूर्वील स्मरण । विसरोन गेला ॥ ४६॥
बालकाचे प्राण जाऊ लागले की, त्या अंतसमयी परमेश्वराचे विस्मरण होऊन पूर्वीच्या सर्व गोष्टी तो विसरून जातो. (४६)

गर्भीं म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं ।
ऐसा कष्टी जाला बहु । गर्भवासीं ॥ ४७॥
गर्भात असताना स्वस्वरूपाचे ज्ञान असल्याने तो जीव ‘ सोहं सोहं ‘ म्हणजे मी तोच आहे, म्हणजे मी ब्रह्मच आहे, असे म्हणत असतो, पण बाहेर पडला की ‘कोहं’ म्हणजे मी कोण आहे असे म्हणू लागतो. अर्थात त्याला स्वस्वरूपाचे विस्मरण होते. (४७)

दुःखा वरपडा होता जाला । थोरा कष्टीं बाहेरी आला ।
सवेंच कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८॥
गर्भात असताना दुःखी असलेला तो जीव तेथून मोठ्या कष्टाने बाहेर येतो. पण बाहेर येताच गर्भवासातील सर्व कष्ट तो पार विसरून जातो. (४८)

सुंन्याकार जाली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं ।
अज्ञानें पडिली भ्रांती । तेणें सुखचि मानिलें ॥ ४९॥
त्याची वृत्ती शून्याकार होऊन त्याला चित्तात काहीच आठवेनासे होते आणि अज्ञानाने भ्रांती उत्पन्न होऊन जन्मलेल्या बालकाला सुखच वाटू लागते. (४९)

देह विकार पावलें । सुखदुःखें झळंबळे ।
असो ऐसें गुंडाळलें । मायाजाळीं ॥ ५०॥
त्याचा देह विकार पावू लागतो. त्याची वाढ होऊ लागली की, तो जीव सुख-दुःखाने व्याप्त होतो. असो. यप्रमाणे तो जीव मायेच्या जाळ्यात सापडून बद्ध होतो. (५०)

ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणीमात्रांसीं ।
म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१॥
प्रत्येक प्राणिमात्राला गर्भवासात असे दारुण दुःख भोगावे लागते. म्हणून त्याने भगवंतास शरण जावे. (५१)

जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त ।
ज्ञानबळें बिरक्त । सर्वकाळ ॥ ५२॥
जो भगवंताचा भक्त असतो, तो या जन्ममरणाच्या चक्रातून आपल्या विरक्तीच्या आणि ज्ञानाच्या बळावर कायमचा मुक्त होतो. त्याला पुनर्जन्म नसतो. (५२)

ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरोपिल्या येथामती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३॥
श्रीसमर्थ म्हणतात की, याप्रमाणे गर्भवासातील दुःखाचे मी यथामती वर्णन येथे केले आहे. आता पुढे जे काही सांगणार आहे, त्याकडे श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे. (५३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
जन्मदुःखनिरूपणनाम समास पहिला ॥ १॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘जन्मदुःखनिरूपणनाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : स्वगुणपरीक्षा (अ)
॥ श्रीराम ॥

संसार हाचि दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
मागां बोलिली तळमळ । गर्भवासाची ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, हा संसारच मुळी दुःखाचे मूळ आहे. यात दुःखाची इंगळी लागते, तेव्हा तिच्या डंखाने प्राणांतिक वेदना होतात. मागील समासात गर्भवासात ज्या यातना सोसाव्या लागतात, त्याचे वर्णन केले होते. (१)

गर्भवासीं दुःख जालें । तें बाळक विसरलें ।
पुढें वाढों लागलें । दिवसेंदिवस ॥ २॥
पण गर्भवासात जे दुःख भोगलेले असते त्याचा त्या बालकास विसर पडतो आणि पुढे ते दिवसेंदिवस वाढू लागते. (२)

बाळपणीं त्वचा कोंवळी । दुःख होतांचि तळमळी ।
वाचा नाहीं तये काळीं । सुखदुःख सांगावया ॥ ३॥
बाळपणी त्याची त्वचा फार कोवळी असते. त्यामुळे जरा काही दुःख झाले की ते तळमळू लागते आणि सुखदुःख सांगावे म्हटले तर त्यावेळी त्याला बोलताही येत नसते. (३)

देहास कांहीं दुःख जालें । अथवा क्षुधेनें पीडलें ।
तरी तें परम आक्रंदलें । परी अंतर नेणवे ॥ ४॥
देहाला काही दुःख झाले अथवा भुकेने व्याकूळ झाले, तरी ते बालक मोठमोठ्याने रडू लागते, पण आपली आतली व्यथा त्याला सांगता येत नाही. (४)

माता कुरवाळी वरी । परी जे पीडा जाली अंतरीं ।
ते मायेसी न कळे अभ्यांतरीं । दुःख होये बाळकासीं ॥ ५॥
माता त्याला जवळ घेते, कुरवाळते, पण त्याच्या अंतरांत काय दुःख आहे, ते तीही जाणू शकत नाही. त्यामुळे त्या बालकाचे दुःख दूर होऊ शकत नाही. (५)

मागुतें मागुतें फुंजे रडे । माता बुझावी घे‍ऊन कडे ।
वेथा नेणती बापुडें । तळमळी जीवीं ॥ ६॥
ते मूल हुंदके देऊन परत परत रडते, आई त्याला कडेवर घेऊन समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्याला काय व्यथा आहे हे कुणीच जाणू शकत नाही; त्यामुळे ते मूल बिचारे तळमळत राहाते. (६)

नानाव्याधीचे उमाळे । तेणें दुःखें आंदोळे ।
रडे पडे कां पोळे । अग्निसंगें ॥ ७॥
नाना व्याधींच्या जोरामुळे ते दुःखाने भयकंपित होते. कधी ते रडते, कधी पडते, तर कधी विस्तवामुळे ते पोळतेही. (७)

शरीर रक्षितां नये । घडती नाना अपाये ।
खोडी अधांतरीं होये । आवेवहीन बाळक ॥ ८॥
त्याला स्वतःच्या शरीराचे रक्षण करता येत नाही. त्यामुळे नाना अपाय घडत असतात. खोड्या करताना अकस्मात अपाय होऊन त्याला एखादा अवयवही गमवावा लागतो. (८)

अथवा अपाय चुकले । पूर्णपुण्य पुढें ठाकलें ।
मातेस ओळखों लागलें । दिवसेंदिवस ॥ ९॥
अथवा पूर्णपुण्याईमुळे असे काही अपाय झाले नाहीत की ते मोठे होऊन हळूहळू आपल्या आईला अधिकाधिक ओळखू लागते. (९)

क्षणभरी मातेस न देखे । तरी आक्रंदें रुदन करी दुःखें ।
ते समईं मातेसारिखें । आणीक कांहिंच नाहीं ॥ १०॥
मग एक क्षणभर जरी आई दिसली नाही, तरी ते दुःखाने मोठमोठ्याने रडू लागते. त्यावेळी त्याला आईसारखे दुसरे आणखी काहीच आवडत नाही. (१०)

आस करून वास पाहे । मातेविण कदा न राहे ।
वियोग पळमात्र न साहे । स्मरण जालियां नंतरें ॥ ११॥
मोठ्या आशेने ते आईची वाट पाहात असते, आईशिवाय ते जराही राहत नाही. आईची आठवण झाली की, तिचा वियोग त्याला पळभरही सहन होत नाही. (११)

जरी ब्रह्मादिक देव आले । अथवा लक्ष्मीने अवलोकिलें ।
तरी न वचे बुझाविलें । आपले मातेवांचुनी ॥ १२॥
ब्रह्मादिक देव जरी आले किंवा प्रत्यक्ष लक्ष्मीने जरी प्रेमाने त्याच्याकडे पाहिले, कितीही समजाविण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्या आईला सोडून ते थोडा वेळही राहात नाही. (१२)

कुरूप अथवा कुलक्षण । सकळांहूनि करंटेपण ।
तरी नाहीं तीसमान । भूमंडळीं कोणी ॥ १३॥
आई कुरूप असो कुलक्षणी असो अथवा सगळ्यांच्यापेक्षा अभागी असो, त्या बाळाला सर्व जगात तिच्यासारखे कोणीही नसते. (१३)

ऐसें तें केविलवाणें । मातेविण दिसे उणें ।
रागें परतें केलें तिनें । तरी आक्रंदोनी मिठी घाली ॥ १४॥
आई नसेल तर ते मूल केविलवाणे, दीन दिसते. तिने रागावून त्याला दूर सारले तरी ते मोठमोठ्याने रडू लागते व धावत येऊन तिलाच मिठी मारते. (१४)

सुख पावे मातेजवळी । दुरी करितांचि तळमळी ।
अतिप्रीति तयेकाळीं । मातेवरी लागली ॥ १५॥
आईच्या जवळ ते आनंदात असते. तिने दूर सारले तर ते तळमळू लागते. त्यावेळी आईवर त्याचे अतिशय प्रेम जडलेले असते. (१५)

तंव ते मातेस मरण आलें । प्राणी पोरटें जालें ।
दुःखें झुर्णीं लागलें । आई आई म्हणोनी ॥ १६॥
अशा स्थितीत आई मरण पावली तर ते मूल अगदी पोरके होते आणि ‘आई, आई’ म्हणून दुःखाने झुरणीला लागते. (१६)

आई पाहातां दिसेना । दीनरूप पाहे जना ।
आस लागलिसे मना । आई ये‍ईल म्हणोनी ॥ १७॥
आई कुठे दिसत नाही. त्यामुळे ते केविलवाणे होऊन लोकांच्या तोंडाकडे पाहू लागते. त्याला अजून आशा वाटत असते की आपली आई जरूर परत येईल. (१७)

माता म्हणौन मुख पाहे । तंव ते आपुली माता नव्हे ।
मग हिंवासलें राहे । दैन्यवाणें ॥ १८॥
एखाद्या स्त्रीला पाहून ही आपली आई तर नाही ना, या विचाराने ते तिच्या चेहऱ्याकडे न्याहाळून पाहू लागते, तेव्हा त्याला कळते की, ही आपली आई नाही. त्यामुळे ते मूल हिरमुसले होते आणि केविलवाणे दिसू लागते. (१८)

मातावियोगें कष्टलें । तेणें मानसीं दुःख जालें ।
देहहि क्षीणत्व पावलें । आतिशयेंसीं ॥ १९॥
आईच्या वियोगाने ते फार कष्टी होते. त्याला मनात अत्यंत दुःख वाटते. त्यामुळे त्याचे शरीरही अत्यंत रोडावते. (१९)

अथवा माताहि वांचली । मायलेंकुरा भेटी जाली ।
बाळदशा ते राहिली । देवसेंदिवस ॥ २०॥
मातेलाही मरण न येता ती वाचली, तरमायलेकरची भेट होते. मग दिवसेंदिवस त्या मुलाचे बालपणही संपत येते. (२०)

बाळपण जालें उणें । दिवसेंदिवस होये शाहाणें ।
मग ते मायेचें अत्यंत पेरूणें । होतें, तें राहिलें ॥ २१॥
बालपण संपून ते मूल दिवसेंदिवस शहाणे होऊ लागते. मग त्याला जो आईचा अत्यंत लळा लागलेला असतो, तो तितका राहात नाही. (२१)

पुढें लो लागला खेळाचा । कळप मेळविला पोरांचा ।
आल्यगेल्या डायाचा । आनंद शोक वाहे ॥ २२॥
पुढे त्याला खेळाचा नाद लागतो आणि तो मुलांचा मेळा जमवून खेळण्यात दंग होतो. डाव जिंकला तर त्याला आनंद होतो आणि डाव हरला तर दुःख वाटते. (२२)

मायेबापें सिकविती पोटें । तयाचें परम दुःख वाटे ।
चट लागली न सुटे । संगती लेंकुरांची ॥ २३॥
आईवडील अत्यंत ममतेने मनःपूर्वक त्याला शिकविण्याचा प्रयत्न करतात, पण त्याला त्यामुळे फार दुःख होते. मुलांच्या संगतीची चटक लागलेली असते, ती सुटता सुटत नाही. (२३)

लेंकुराअंमध्यें खेळतां । नाठवे माता पिता ।
तंव तेंथेहि अवचिताअ । दुःख पावला ॥ २४॥
मुलांमध्ये खेळत असताना त्याला आईवडिलांची आठवणही होत नाही, परंतु त्या खेळण्यात अकस्मात दुःख ओढवते. (२४)

पडिले दांत फुटला डोळा । मोडले पाय जाला खुळा ।
गेला माज अवकळा- । ठाकून आली ॥ २५॥
खेळ्याना दात पडतात, डोळा फुटतो किंवा पाय मोडून तो लंगडा होतो, अगदी वेड्यासारखी त्याची अवस्था होते. त्याची सर्व मस्ती उतरते, जिरते व व्यंग आल्याने अवकळा येते. (२५)

निघाल्या देवी आणी गोवर । उठलें कपाळ लागला ज्वर ।
पोटसुळीं निरंतर । वायगोळा ॥ २६॥
त्यात त्याला देवी येतात किंवा गोवर येतो, कपाळ दुखू लागते किंवा अंगात ताप भरतो, नाही तर निरंतर वायगोळा उठून पोटशूळ लागतो. (२६)

लागलीं भूतें जाली झडपणी । जळीच्या मेसको मायेराणी ।
मुंज्या झोटिंग करणी । म्हैसोबाची ॥ २७॥
त्याची अवस्था पाहून लोक नाना तर्ककुतर्क करू लागतात. कुणी म्हणते की, याला भुतांनी (झपाटले) आहे, तर कुणी म्हणतात की, याला मेसको, मायेराणी या जलदेवतांनी पकडले आहे. कुणी म्हणतात की मुंज्या, झोटिंग किंवा म्हसोबाची करणी बाधली आहे. (२७)

वेताळ खंकाळ लागला । ब्रह्मगिर्ह्हो संचरला ।
नेणों चेडा वोलांडिला । कांहीं कळेना ॥ २८॥
कुणी म्हणतो की, याला दुष्ट वेताळ लागला आहे, तर कुणी म्हणते की, ब्रह्मराक्षसांनी याला धरले आहे, तर कुणी म्हणते की, कुणीतरी चेटूक केले असावे किंवा याने उतारा ओलांडला असावा. खरे काय झाले आहे, ते कळतच नाही. (२८)

येक म्हणती बीरे देव । येक म्हणती खंडेराव ।
येक म्हणती सकळ वाव । हा ब्राह्मणसमंध ॥ २९॥
कोणी म्हणतो बिरदेव लागला, तर कुणी म्हणतो खंडेराव लागला, तर दुसरा कोणी म्हणतो की हे सगळेच खोटे आहे. याला ब्रह्मसमंधच लागला आहे. (२९)

येक म्हणती कोणें केलें । आंगीं देवत घातले ।
येक म्हणती चुकलें । सटवाईचें ॥ ३०॥
एक म्हणतो की, कुणी करणी केली आहे, तर कुणी म्हणतो की, मंत्र म्हणून एखादी देवता याच्या अंगात सोडली आहे, तर कोणी म्हणतो की सटवाईचे काही देणे चुकले असावे. (३०)

येक म्हणती कर्मभोग । आंगीं जडले नाना रोग ।
वैद्य पंचाक्षरी चांग । बोलाऊन आणिले ॥ ३१॥
कुणी म्हणतात की, पूर्वजन्मीच्या कर्मांचे फळ म्हणून याच्या अंगी नाना रोग जडले आहेत. असे म्हणून कुणी चांगले वैद्य किंवा चांगले मांत्रिक यांना बोलावून आणते. (३१)

येक म्हणती हा वांचेना । येक म्हणती हा मरेना ।
भोग भोगितो यातना । पापास्तव ॥ ३२॥
कोणी म्हणतात की, आता काही हा वाचत नाही. तर दुसरे कुणी म्हणतात की हा मरत नाही. पूर्वजन्मीच्या पापांचे फळ म्हणून याला या यातना भोगाव्या लागत आहेत. (३२)

गर्भदुःख विसरला । तो त्रिविधतापें पोळला ।
प्राणी बहुत कष्टी जाला । संसारदुःखें ॥ ३३॥
माणूस गर्भवासाचे दुःख जरी विसरला तरी तो त्रिविध तापाने पोळून निघतो. या नाना प्रकारच्या संसारदुःखाने तो अत्यंत कष्टी होतो. (३३)

इतुकेंहि चुकोन वांचला । तरी मारमारूं शाहाणा केला ।
लोकिकीं नेटका जाला । नांव राखे ऐसा ॥ ३४॥
या इतक्या सगळ्या कटकटीतून माणूस जर वाचला तर त्याला विद्या यावी, म्हणून आईवडील मारमारून शहाणा करतात. लोकांत नाव राखील असा तो चांगला होतो. (३४)

पुढें मायबापीं लोभास्तव । संभ्रमें मांडिला विव्हाव ।
दाऊनियां सकळ वैभव । नोवरी पाहिली ॥ ३५॥
नंतर आईवडिलांनी संसाराच्या लोभाने त्याच्या विवाहाचा विचार केला आणि आपल्या सर्व वैभवाचे प्रदर्शन करून त्याच्यासाठी नवरी पाहिली. (३५)

वर्ह्हाडीवैभव दाटलें । देखोन परमसुख वाटले ।
मन हें रंगोन गेलें । सासुरवाडीकडे ॥ ३६॥
आपापले वैभव घेऊन सर्व वार्‍हाड्यांनी दाटी केली. ते पाहून त्या नवरदेवास फार सुख वाटले व त्याचे मन सासुरवाडीकडे अगदी रंगून गेले. (३६)

मायबापीं भलतैसें असावें । परी सासुरवाडीस नेटकें जावें ।
द्रव्य नसेल तरी घ्यावें । रुण कळांतरें ॥ ३७॥
आपले आईवडील कशाही हीनदीन अवस्थेत असले, तरी सासुरवाडीस आपण नीटनेटके गेले पाहिजे. त्यासाठी द्रव्य नसले तरी ऋण काढून व्याजाने द्रव्य घेऊन तो थाटात सासुरवाडीस जातो. (३७)

आंतर्भाव ते सासुरवाडीं । मायेबापें राहिलीं बापुडीं ।
होताती सर्वस्वें कुडकुडीं । तितुकेंच कार्य त्यांचें ॥ ३८॥
त्याचे अंतःकरण आतून सर्व सासुरवाडीकडे गुंतलेले असते. आईबाप बिचारे दीन होऊन घरात राहातात. ते सर्वस्वी असहाय्य झालेले असतात. जणू तेवढ्यासाठीच जिवंत होते आणि त्यांचे कार्य आता झाले आहे. (३८)

नोवरी आलियां घरा । अती हव्यास वाटे वरा ।
म्हणे मजसारिखा दुसरा । कोणीच नाहीं ॥ ३९॥
नवरी घरी आली की, त्या नवरदेवाला तिच्याविषयी अत्यंत आसक्ती वाटू लागते व आपल्यासारखा सुखी दुसरा कोणीच नाही, असे त्याला वाटू लागते. (३९)

मायबाप बंधु बहिणी । नोवरी न दिसतां वाटे काणी ।
अत्यंत लोधला पापिणीं । अविद्येनें भुलविला ॥ ४०॥
घरात आई-वडील, भाऊ-बहिणी सर्व असली तरी नवरी दिसली नाही तर बाकीची सर्व त्याला तुच्छ वाटू लागतात. आपल्या बायकोमध्ये तो अधिकच गुंतून जातो. पापी अविद्येने त्याला पार भुलवून ठाकले असते. (४०)

संभोग नस्तां इतुका प्रेमा । योग्य जालिया उलंघी सीमा ।
प्रीती वाढविती कामा- । करितां प्राणी गुंतला ॥ ४१॥
स्त्री वयात आली नसताही त्यास तिच्याविषयी इतके प्रेम वाटते. मग ती वयात येऊन तिच्यापासून स्त्रीसौख्य मिळू लागले म्हणजे तर त्याच्या वागण्याला मर्यादाच राहात नाही. त्यांचे एकमेकांवरील प्रेम वाढू लागते आणि कामवासनेमुळे माणूस पुरता प्रपंचात गुरफटून जातो. (४१)

जरी न देखे क्षण येक डोळां । तरी जीव होय उताविळा ।
प्रीतीपात्र अंतर्कळा । घे‍ऊन गेली ॥ ४२॥
बायको क्षणभर जरी दृष्टीआड झाली, तरी तो तिला पाहावयास अत्यंत उतावळा होतो. त्याची प्रीतिपात्र बनलेली ती पत्‍नी त्याचे अंतःकरणच जणू घेऊन जाते. (४२)

कोवळे कोवळे शब्द मंजुळ । मर्यादा लज्या मुखकमळ ।
वक्त्रलोकनें केवळ । ग्रामज्याचे मैंदावें ॥ ४३॥
तिचे ते कोमल, मंजुळ शब्द, ती मर्यादा, तो लाजरेपणा, तो कमलासारखा सुंदर चेहरा पाहिला तरी संभोगाच्या विचाराने मन भरून जाते. (४३)

कळवळा येतां सांवरेना । शरीर विकळ आवरेना ।
अनेत्र वेवसाईं क्रमेना । हुरहुर वाटे ॥ ४४॥
तिच्याबद्दलची आसक्ती अनावर होते. विषयसेवनासाठी शरीर व्याकूळ बनते, ते आवरत नाही. अन्यत्र दुसऱ्या व्यवसायात मन रमत नाही, सारखी तिची हुरहुर वाटत राहते. (४४)

वेवसाय करितां बाहेरी । मन लागलेंसे घरीं ।
क्षणाक्षणां अभ्यांतरीं । स्मरण होये कामिनीचें ॥ ४५॥
बाहेर काही व्यवसाय करीत असला तरी त्याचे मन सर्वस्वी घरी लागलेले असते. क्षणोक्षणी मनामध्ये आपल्या कामिनीचे स्मरण त्याला होत असते. (४५)

तुम्हीं माझिया जिवांतील जीव । म्हणौनी अत्यंत लाघव ।
दाऊनियां चित्त सर्व । हिरोन घेतलें ॥ ४६॥
‘तुम्ही माझ्या जीवापेक्षाही मला प्रिय आहात’ असे त्याची स्त्री अत्यंत लाघवीपणाने म्हणते आणि अशा गोड वागण्याने त्याचे सर्व चित्त हिरावून घेते. (४६)

मैद सो‍इरीक काढिती । फांसे घालून प्राण घेती ।
तैसें आयुष्य गेलियां अंतीं । प्राणीयांस होये ॥ ४७॥
ठग किंवा पेंढारी लोक आधी ओळख काढतात आणि नंतर रुमालाचा गळफास लावून प्राण घेतात, तशी आयुष्य संपत आल्यावर माणसाची स्थिती होते. (४७)

प्रीति कामिनीसीं लागली । जरी तयेसी कोणी रागेजली ।
तरी परम क्षिती वाटली । मानसीं गुप्तरूपें ॥ ४८॥
आपल्या स्त्रीवर त्यांचे फार प्रेम जडते. तिला जरा कुणी रागाने बोलले की, मनातल्या मनात त्याला अत्यंत दुःख होते. (४८)

तये भार्येचेनि कैवारें । मायेबापासीं नीच उत्तरें ।
बोलोनियां तिरस्कारें । वेगळा निघे । ४९॥
आपल्या बायकोचा कैवार घेऊन तो आईवडिलांना शिवीगाळ करतो, वाईट शब्दांत प्रत्युत्तर देतो, तिरस्काराने त्यांचा अपमान करून तो वेगळा निघतो. (४९)

स्त्रीकारणें लाज सांडिली । स्त्रीकारणें सखीं सोडिलीं ।
स्त्रीकारणें विघडिलीं । सकळहि जिवलगें ॥ ५०॥
स्त्रीसाठी तो लाजलज्जा सोडतो. तिच्याकरता मित्रांना सोडतो. एवढेच नव्हे तर तिच्याखातर सर्व जिवलगांशी असलेले चांगले संबंध तो बिघडवून टकतो. (५०)

स्त्रीकारणें देह विकिला । स्त्रीकारणें सेवक जाला ।
स्त्रीकारणें सांडविला । विवेकासी ॥ ५१॥
स्त्रीकरिता जणू तो आपला देहही विकतो. तिचा सेवक होऊन राहतो. स्त्रीकरिता तो विवेकालाही मुकतो. (५१)

स्त्रीकारणें लोलंगता । स्त्रीकारणें अतिनम्रता ।
स्त्रीकारणें पराधेनता । अंगिकारिली ॥ ५२॥
स्त्रीसाठी तो लंपट बनतो. तिच्यासाठीच अति नम्रता धारण करतो आणि पराधीन होऊन राहतो. (५२)

स्त्रीकारणें लोभी जाला । स्त्रीकारणें धर्म सांडिला ।
स्त्रीकारणें अंतरला । तीर्थयात्रा स्वधर्म ॥ ५३॥
स्त्रीच्या योगे तो लोभी होतो, धर्माचा त्याग करतो. तीर्थयात्रा, स्वधर्म इत्यादी गोष्टी तो करू शकत नाही. (५३)

स्त्रीकारणें सर्वथा कांहीं । शुभाशुभ विचारिलें नाहीं ।
तनु मनु धनु सर्वही । अनन्यभावें अर्पिलें ॥ ५४॥
स्त्रीच्या आसक्तीमुळे तो शुभ- अशुभ याचा विचारही करीत नाही. आपले तन, मन, धन किंबहुना सर्वस्वच अनन्यभावाने तिला अर्पण करतो. (५४)

स्त्रीकारणें परमार्थ बुडविला । प्राणी स्वहितास नाडला ।
ईश्वरीं कानकोंडा जाला । स्त्रीकारणें कामबुद्धी ॥ ५५॥
स्त्रीसाठी त्याने परमार्थ बुडवला, स्वहितास मुकला, ईश्वराविषयी उदासीन झाला आणि कामासक्ती मात्र वाढली. (५५)

स्त्रीकारणें सोडिली भक्ती । स्त्रीकारणें सोडिली विरक्ती ।
स्त्रीकारणें सायोज्यमुक्ती । तेहि तुछ्य मानिली ॥ ५६॥
स्त्रीला वश होऊन त्याने भक्तीचा त्याग केला, विरक्ती सोडून दिली. एवढेच नव्हे तर जी स्वीकारण्यास योग्य ती सायुज्य मुक्तीही त्याने तुच्छ मानली. (५६)

येके स्त्रियेचेनि गुणें । ब्रह्मांड मानिलें ठेंगणें ।
जिवलगें तीं पिसुणें । ऐसीं वाटलीं ॥ ५७॥
एका स्त्रीच्या नादाने त्याने सर्व ब्रह्मांड तुच्छ मानले. प्रेमाची माणसे त्यास शत्रूसारखी वाटू लागली. (५७)

ऐसी अंतरप्रीति जडली । सार्वस्वाची सांडी केली ।
तंव ते मरोन गेली । अकस्मात ॥ ५८॥
अशा प्रकारे आपल्या पत्‍नीवर त्याचे अत्यंत अंतःकरणपूर्वक प्रेम जडल्याने त्याने तिच्यापायी सर्वस्वाचा त्याग केला. तो अकस्मात ती बायको मरूनच गेली. (५८)

तेणें मनीं शोक वाढला । म्हणे थोर घात जाला ।
आतां कैंचा बुडाला । संसार माझा ॥ ५९॥
तिच्या मृत्यूने त्याच्या मनास अत्यंत शोक झाला. तो म्हणू लागला की, ‘माझा फार मोठा घात झाला. आता कसला संसार ! माझा संसार पार बुडाला.’ (५९)

जिवलगांचा सोडिला संग । अवचिता जाला घरभंग ।
आतां करूं मायात्याग । म्हणे दुःखें ॥ ६०॥
जिवलग माणसांशी संबंध सोडून टाकला आणि आता अवचित माझे घरच मोडले ! मग तो दुःखाने म्हणू लागला की, मी आता या मायेचा त्याग करतो. (६०)

स्त्री घे‍ऊन आडवी । ऊर बडवी पोट बडवी ।
लाज सांडून गौरवी । लोकां देखतां ॥ ६१॥
स्वीचे प्रेत मांडीवर घेऊन तो ऊर व पोट बडवून घेऊ लागला आणि लाज सोडून लोकांच्यासमोर तिची थोरवी वर्णन करू लागला. (६१)

म्हणे माझें बुडालें घर । आतां न करी हा संसार ।
दुःखें आक्रंदला थोर । घोर घोषें ॥ ६२॥
तो मोठमोठ्याने दुःखाने आक्रंदू लागला आणि म्हणू लागला की, ‘माझे घर बुडाले । आता मी यापुढे संसार करणार नाही !’ (६२)

तेणें जीव वारयावेघला । सर्वस्वाचा उबग आला ।
तेणें दुःखें जाला । जोगी कां महात्मा ॥ ६३॥
भ्रमिष्ट झालेल्या माणसासारखी त्याची स्थिती झाली. त्याला सर्वस्वाचा उबग आला. त्या दुःखामुळे तो अंगाला राख फासून साधू-बैसगी बनला. (६३)

कां तें निघोन जाणें चुकलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
तेणें अत्यंतचि मग्न जालें । मन द्वितीय संमंधीं ॥ ६४॥
पण काही कारणाने घरातून निघून जाणे जमले नाही आणि शेवटी त्याने पुन्हा लग्न केले. त्यानंतर त्या दुसऱ्या बायकोमध्ये त्याचे मन अत्यंत आसक्त झाले. (६४)

जाला द्वितीय संमंध । सवेंचि मांडिला आनंद ।
श्रोतीं व्हावें सावध । पुढिले समासीं ॥ ६५॥
दुसरे लग्न झाल्यावर लगेच त्याच्या आनंदाला भरती आली. श्रीसमर्थ म्हणतात की, आता पुढला समास ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध व्हावे. (६५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास दुसरा ॥ २॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसवादे ‘स्वगुणपरीक्षा (अ) नाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : स्वगुणपरीक्षा (ब)
॥ श्रीराम ॥

द्वितीय संमंध जाला । दुःख मागील विसरला ।
सुख मानून राहिला । संसाराचें ॥ १॥
दुसरा विवाह होताच मागील दुःख तो विसरून गेला आणि संसारात सुख आहे असे मानून दिवस घालवू लागला. (१)

जाला अत्यंत कृपण । पोटें न खाय अन्न ।
रुक्याकारणें सांडी प्राण । येकसरा ॥ २॥
आता तो अत्यंत कंजूष झाला. पोटभर अन्न देखील खाईना. पै-पैशासाठी एकाएकी प्राण टाकू लागला. (२)

कदा कल्पांतीं न वेची । सांचिलेंचि पुन्हा सांची ।
अंतरीं असेल कैंची । सद्वासना ॥ ३॥
प्रलय ओढवला तरी पैसे खर्च करीनासा झाला. साठविलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतरात सद्‌वासना राहील तरी कशी ? (३)

स्वयें धर्म न करी । धर्मकर्त्यासहि वारी ।
सर्वकाळ निंदा करी । साधुजनाची ॥ ४॥
स्वत: धर्म करीना व इतर कुणी धर्म करू लागले, तर त्याचे निवारण करू लागला. साधु-सज्जनांची सर्वकाळ निंदा करू लागला. (४)

नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतित अभ्यागत ।
मुंगीमुखींचें जें सीत । तेंही वेंचून सांची ॥ ५॥
तीर्थयात्रा नाही, व्रत नाही की अतिथी अभ्यागत नाही, अशी त्याची वृत्ती झाली. मुंगीच्या तोंडातील अन्नाचा कणही तो वेचून साठवू लागला. (५)

स्वयें पुण्य करवेना । केलें तरी देखवेना ।
उपहास्य करी मना- । नये म्हणौनी ॥ ६॥
स्वतःच्या हातून पुण्य करवत नाही. दुसऱ्या कुणी केले तर ते पाहवत नाही. आपल्याला आवडत नाही म्हणून जो कुणी करीत असेल त्याचा उपहास करू लागला. (६)

देवां भक्तांस उछेदी । आंगबळें सकळांस खेदी ।
निष्ठुर शब्दें अंतर भेदी । प्राणीमात्रांचें ॥ ७॥
देवाला, भक्तांना त्रास देऊ लागला. आपल्या शक्तीच्या बळावर सगळ्यांना दुःख देऊ लागला. प्राणिमात्रास निष्ठुर शब्द बोलून त्याचे अंतःकरण दुखवू लागला. (७)

नीति सांडून मागें । अनीतीनें वर्तों लागे ।
गर्व धरून फुगे । सर्वकाळ ॥ ८॥
नीतीचा त्याग करून तो अनीतीने वागू लागला आणि सदासर्वदा अभिमान धरून ताठ्याने वागू लागला. (८)

पूर्वजांस सिंतरिलें । पक्षश्राद्धहि नाहीं केलें ।
कुळदैवत ठकिलें । कोणेपरी ॥ ९॥
तो पक्ष-श्राद्धही करीना. याप्रकारे त्याने आपल्या पूर्वजांनाही फसविले. काही तरी सबब शोधून तो कुळधर्म, कुळाचारही करीना. याप्रकारे त्याने कुळदेवतेलाही ठकविले. (९)

आक्षत भरिली भाणा । दुजा ब्राह्मण मेहुणा ।
आला होता पाहुणा । स्त्रियेस मूळ ॥ १०॥
तो बहिणीलाच सवाष्ण म्हणून आमंत्रण देई आणि बायकोला बोलवायला आलेल्या मेहुण्यासच ब्राह्मण सांगून पाहुण्यांच्यावरच भागवू लागला आणि त्यामुळे इतर दोघांचा भोजनखर्च वाचवू लागला. (१०)

कदा नावडे हरिकथा । देव नलगे सर्वथा ।
स्नानसंध्या म्हणे वृथा । कासया करावी ॥ ११॥
त्याला हरिकथा कधीच आवडत नसे. देवाची काय आवश्यकता आहे, असे त्याला वाटे उगीचच स्नानसंध्या तरी का म्हणून करावी ? असे तो म्हणू लागला. (११)

अभिळाषें सांची वित्त । स्वयें करी विस्वासघात ।
मदें मातला उन्मत्त । तारुण्यपणें ॥ १२॥
अभिलाषा धरून तो द्रव्यसंचय करू लागला. स्वत: दुसऱ्याचा विश्वासघात करू लागला आणि तारुण्याच्या मदाने माजून अत्यंत उन्मत्तपणे वागू लागला. (१२)

तारुण्य आंगीं भरलें । धारिष्ट न वचे धरिलें ।
करूं नयें तेंचि केलें । माहापाप ॥ १३॥
तारुण्याच्या जोरामुळे कामवासना उत्पन्न झाली. मनोधैर्य टिकणे अशक्य झाले आणि जे करू नये ते महापाप त्याने केले. (१३)

स्त्री केली परी धाकुटी । धीर न धरवेचि पोटीं ।
विषयलोभें सेवटीं । वोळखी सांडिली ॥ १४॥
स्त्री केली होती पण वयात आलेली नव्हती आणि याला तर धीर धरवेना. शेवटी विषयसुखाच्या लोभाने कुणाला ओळखेनासा झाला. (१४)

माये बहिण न विचारी । जाला पापी परद्वारी ।
दंड पावला राजद्वारीं । तर्ह्हीं पालटेना ॥ १५॥
आई-बहिणीप्रमाणे परस्त्रीशी वागावे, हा विचार राहिला नाही आणि परस्त्रीशी संबंध ठेवल्याने पातकी ठरला. त्यामुळे न्यायालयात त्याला शिक्षा झाली, तरी त्याचे वागणे पालटले नाही. (१५)

परस्त्री देखोनि दृष्टीं । अभिळाष उठे पोटीं ।
अकर्तव्यें हिंपुटी । पुन्हां होये ॥ १६॥
परस्त्री दृष्टीस पडताच त्याच्या मनात तिच्याविषयी अभिलाषा उत्पन्न होऊ लागली. पण तिची प्राप्ती होत नाही, असे पाहून तो पुन्हा कष्टी होऊ लागला. (१६)

ऐसें पाप उदंड केलें । शुभाशुभ नाहीं उरलें ।
तेणें दोषें दुःख भरलें । अकस्मात आंगीं ॥ १७॥
अशा रीतीने त्याने उदंड पाप केले. शुभाशुभाचा विचारही त्याच्या ठिकाणी राहिला नाही. त्या दोषामुळे अकस्मात त्याच्या अंगी दुःख भरले. (१७)

व्याधी भरली सर्वांगीं । प्राणी जाला क्षयरोगी ।
केले दोष आपुले भोगी । सीघ्र काळें ॥ १८॥
त्याच्या सर्व शरीरात रोग पसरला. त्याला क्षयरोग लागला. त्याने केलेल्या दोषांची फळे भोगण्याची पाळी लवकरच त्याच्यावर आली. (१८)

दुःखें सर्वांग फुटलें । नासिक अवघेंचि बैसलें ।
लक्षण जाऊन जालें । कुलक्षण ॥ १९॥
रोगाने त्याच्या सर्वांगावर फोड उठले, नाक झडून गेले आणि सर्व सौंदर्य जाऊन कुरूपता आली. (१९)

देहास क्षीणता आली । नाना वेथा उद्भवली ।
तारुण्यशक्ती राहिली । खंगला प्राणी ॥ २०॥
देह अगदी कृश झाला. नाना व्यथा उत्पन्न झाल्या आणि तारुण्यातील शक्ती सगळी नष्ट होऊन तो अगदी खंगून गेला. (२०)

सर्वांगीं लागल्या कळा । देहास आली अवकळा ।
प्राणी कांपे चळचळां । शक्ति नाहीं ॥ २१॥
त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या, देहाला अवकळा आली आणि अंगात शक्ती न राहिल्याने तो थरथर कापू लागला. (२१)

हस्तपादादिक झडले । सर्वांगीं किडे पडिले ।
देखोन थुंकों लागले । लाहानथोर ॥ २२॥
हात-पाय वगैरे रोगाने झडले, सर्वांगात किडे पडले. त्याच्याकडे पाहून सर्व लहान-थोर तिरस्काराने) थुंकू लागले. (२२)

जाली विष्टेची सारणी । भोवती उठली वर्ढाणी ।
अत्यंत खंगला प्राणी । जीव न वचे ॥ २३॥
त्यात त्याला जुलाब होऊ लागले. त्यामुळे आसपास दुर्गंधी सुटली. तो अत्यंत खंगून गेला. पण जीव जाता जाईना. (२३)

आतां मरण दे गा देवा । बहुत कष्ट जाले जीवा ।
जाला नाहीं नेणों ठेवा । पातकाचा ॥ २४॥
मग तो म्हणू लागला की, देवा, आता मला मरण दे. माझ्या जीवाला अत्यंत यातना झाल्या आहेत. अजून माझ्या पापांचा घडा भरला नाही का ? (२४)

दुःखें घळघळां रडे । जों जों पाहे आंगाकडे ।
तों तों दैन्यवाणें बापुडें । तळमळी जीवीं ॥ २५॥
तो दुःखाने घळघळा रडू लागला. जो जो स्वतःच्या अंगाकडे पाहावे, तो तो ते अधिकच दैन्यवाणे दिसू लागले. त्यामुळे तो बिचारा मनात तळमळू लागला. (२५)

ऐसे कष्ट जाले बहुत । सकळ जालें वाताहात ।
दरवडा घालून वित्त । चोरटीं नेलें ॥ २६॥
अशा प्रकारे त्याला खूप कष्ट झाले. सर्व वाताहात झाली. त्यात दरोडेखोरांनी दरोडा घालून सर्व द्रव्य चोरून नेले. (२६)

जालें आरत्र ना परत्र । प्रारब्ध ठाकलें विचित्र ।
आपला आपण मळमूत्र । सेविला दुःखें ॥ २७॥
याप्रमाणे ना धड इहलोक ना परलोक अशी विचित्र अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला की, स्वतःचे मळमूत्रच दुःखाने त्याला सेवावे लागले. (२७)

पापसामग्री सरली । देवसेंदिवस वेथा हरली ।
वैद्यें औषधें दिधलीं । उपचार जाला ॥ २८॥
पुढे त्याच्या पापकर्माचा भोग सरला आणि दिवसेंदिवस त्याची व्यथा कमी होऊ लागली. वैद्याने औषधे दिली आणि त्याचा उपयोग झाला. (२८)

मरत मरत वांचला । यास पुन्हां जन्म जाला ।
लोक म्हणती पडिला । माणसांमध्यें ॥ २९॥
लोक म्हणू लागले की, हा मरता मरता वाचला आहे. याचा जणू पुनर्जन्मच झाला आहे. आता हा जस माणसात आला आहे. (२९)

येरें स्त्री आणिली । बरवी घरवात मांडिली ।
अति स्वार्थबुद्धी धरिली । पुन्हां मागुती ॥ ३०॥
मग त्याने आपल्या स्त्रीला घरी आणली आणि परत घरात दिवा लागू लागला. पण परत त्याने पूर्वीप्रमाणेच अति स्वार्थबुद्धीच धरली. (३०)

कांहीं वैभव मेळविलें । पुन्हां सर्वही संचिलें ।
परंतु गृह बुडालें । संतान नाहीं ॥ ३१॥
काही वैभव मिळविले. परत सर्व साठवले. पण संतान नसल्याने घर बुडाल्यासारखेच त्याला वाटू लागले. (३१)

पुत्र संतान नस्तां दुःखी । वांज नांव पडिलें लोकिकीं ।
तें न फिटे म्हणोनी लेंकी । तरी हो आतां ॥ ३२॥
पुत्रसंतान झाले नाही, त्यामुळे तो दुःखी झाला. लोकांत ‘वांझ’ म्हणून नाव पडले. ते नाव जावे म्हणून ‘आता मुलगी तरी होऊ दे’ असे तो म्हणू लागला. (३२)

म्हणोन नाना सायास । बहुत देवास केले नवस ।
तीर्थें व्रतें उपवास । धरणें पारणें मांडिलें ॥ ३३॥
म्हणून त्याने नाना सायास केले. अनेक देवांना नवस केले. तीर्थयात्रा, व्रते, उपवास, धरणे, पारणे यांचा सपाटा लावला. (३३)

विषयसुख तें राहिले । वांजपणें दुःखी केलें ।
तंव तें कुळदैवत पावलें । जाली वृद्धी ॥ ३४॥
विषयसुख राहिले बाजूला, पण वांझपणाने दोघांना दुःखी केले. तेवढ्यात कुलदैवत प्रसन्न झाले आणि एकदाचे मूल झाले. (३४)

त्या लेंकुरावरी अतिप्रीति । दोघेहि क्षण येक न विशंभती ।
कांहीं जाल्या आक्रंदती । दीर्घस्वरें ॥ ३५॥
त्या मुलावर दोघांचे अत्यंत प्रेम जडले. दोघेही त्याला एक क्षणभरही विसंबत नसत. त्याला काही झाले तर ती जोरजोराने रडू लागत. (३५)

ऐसी ते दुःखिस्ते । पूजीत होती नाना दैवतें ।
तंव तेंहि मेलें अवचितें । पूर्व पापेंकरूनी ॥ ३६॥
अशी ती दुःखित दोघे नाना दैवतांची पूजा करीत होती, तोच पूर्वपापाच्या प्रभावाने ते मूलही अकस्मात मरण पावले. (३६)

तेणें बहुत दुःख जालें । घरीं आरंधें पडिलें ।
म्हणती आम्हांस कां ठीविलें । देवें वांज करूनी ॥ ३७॥
त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झाले. परत घरी निपुत्रिकत्व आले. ती दोघे म्हणू लागली की, देवाने वांझ करून आम्हांला तरी कशाला ठेवले आहे ? (३७) .

आम्हांस द्रव्य काये करावें । तें जावें परी अपत्य व्हावें ।
अपत्यालागी त्यजावें । लागेल सर्व ॥ ३८॥
आम्हांला हे द्रव्य काय करायचे आहे ? हे सर्व गेले तरी चालेल पण मूल-बाळ होऊ दे. मुलासाठी सर्व सोडावे लागले तरी चालेल. (३८)

वांजपण संदिसें गेलें । तों मरतवांज नांव पडिलें ।
तें न फिटे कांहीं केलें । तेणें दुःखें आक्रंदती ॥ ३९॥
एक मूल झाल्याने वांझपण गेले होते; पण आता ते मूल गेल्याने ‘मरत वांझ’ (म्हणजे जिची मुले जगत नाहीत अशी स्त्री) नाव पडले आहे. ते नाव आता काही केल्या जात नाही, म्हणून त्या दुःखाने दोघे पुन्हा रडू लागली. (३९)

आमुची वेली कां खुंटिली । हा हा देवा वृत्ती बुडाली ।
कुळस्वामीण कां क्षोभली । विझाला कुळदीप ॥ ४०॥
आमची वंशवेली का बरेखुंटली ? हाय रे देवा, आमची वृत्ती का बरे बुडाली ? कुलस्वामिनी आमच्यावर कोपली तर नाही ना ? आमचा कुलदीप का बरे विझला ? (४०)

आतां लेंकुराचें मुख देखेन । तरी आनंदें राडी चालेन ।
आणी गळही टोंचीन । कुळस्वामिणीपासीं ॥ ४१॥
आता परत जर आम्हांला पुत्राचे मुख पाहावयास मिळाले, तर आनंदाने धगधगीत निखार्‍याच्या खाईतून चालन जाईन किंवा कुलस्वामिनीपुढे गळही टोचून घेईन. (४१)

आई भुता करीन तुझा । नांव ठेवीन केरपुंजा ।
वेसणी घालीन, माझा- । मनोरथ पुरवी । ४२॥
आई, त्या मुलाला तुझा ‘भुता’ सेवेकरी करीन. त्याचे नाव ‘केरपुंजा’ ठेवीन. त्याच्या नाकात नथणी घालीन. पण माझा एवढा मनोरथ पुरा कर (४२)

बहुत देवांस नवस केले । बहुत गोसावी धुंडिले ।
गटगटां गिळिले । सगळे विंचू ॥ ४३॥
याप्रमाणे अनेक देवांना त्यांनी नवस केले. पुष्कळ गोसावी धुंडले. सबंध विंचू गयगय गिळले (४३)

केले समंधास सायास । राहाणे घातलें बहुवस ।
केळें नारिकेळें ब्राह्मणास । अंब्रदानें दिधलीं ॥ ४४॥
समंधांना प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अंगात दैवत घालण्याचे नाना तव्हेने प्रयत्न केले ब्राह्मणांना केळी, नारळ आंबे इत्यादींची दाने दिली. (४४)

केलीं नाना कवटालें । पुत्रलोभें केलीं ढालें ।
तरी अदृष्ट फिरलें । पुत्र नाहीं ॥ ४५॥
नाना प्रकारचे तंत्रप्रयोग केले. पुत्रलोभाने क्षुद्र मंत्रप्रयोगही केले. तरीही नशीब फिरले आणि आणि पुत्र काही होईना. (४५)

वृक्षाअखालें जाऊन नाहाती । फळतीं झाडें करपती ।
ऐसे नाना दोष करिती । पुत्रलोभाकारणें ॥ ४६॥
पुत्र व्हावा म्हणून अस्पर्श असता वृक्षाखाली जाऊन न्हाणे, फळती झाडे जाळणे इत्यादी नाना पातके त्यांनी केली. (४६)

सोडून सकळ वैभव । त्यांचा वारयावेधला जीव ।
तंव तो पावला खंडेराव । आणी कुळस्वामिणी ॥ ४७॥
दोघांनी आपले सर्व वैभव सोडून दिले आणि त्यांची अवस्था भ्रमिष्टासारखी झाली. इतक्यात त्यांना खंडेराव आणि कुलस्वामिनी प्रसन्न झाली. ७)

आतां मनोरथ पुरती । स्त्रीपुरुषें आनंदती ।
सावध हो‍ऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ४८॥
आता आपले मनोरथ पूर्ण होतील, या विचाराने नवरा-बायको आनंदून गेली. श्री समर्थ म्हणतात की, आता श्रोत्यांनी सावध होऊन पुढे जे सांगेन ते लक्षपूर्वक ऐकावे. (४८)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास तिसरा ॥ ३॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (ब) नाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : स्वगुणपरीक्षा (क)
॥ श्रीराम ॥

लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली ।
बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥ १॥
पुष्कळ मुले झाली, पण घरात साठवून ठेवलेला पैसा संपून गेला. त्यामुळे त्यांना पोटभर खायला मिळेना. त्या बिचाऱ्यांवर भीक मागण्याची पाळी आली. (१)

लेंकुरें खेळती धाकुटीं । येकें रांगती येकें पोटीं ।
ऐसी घरभरी जाली दाटी । कन्या आणी पुत्रांची ॥ २॥
धाकटी काही मुले खेळत आहेत, कुणी रांगत आहेत तर कुणी गर्भात आहे. अशी घरभर पुत्र आणि कन्या यांची गर्दीच झाली. (२)

देवसेंदिवसा खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला ।
कन्या उपवरी जाल्या, त्यांला- । उजवावया द्रव्य नाहीं ॥ ३॥
दिवसेंदिवस खर्च वाढू लागला आणि आवक होती ती थांबून गेली. कन्या उपवर झाल्या पण त्यांचे विवाह करून द्यायला जवळ द्रव्य नाही, अशी स्थिती झाली. (३)

मायेबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन ।
तेणें करितां प्रतिष्ठा मान । जनीं जाला होता ॥ ४॥
आईवडील श्रीमंत होते, त्यांच्याजवळ भरपूर धन होते. म्हणून लोकांत त्यांना चांगली प्रतिष्ठा, मान प्राप्त झाला होता. (४)

भरम आहे लोकाचारीं । पहिली नांदणूक नाहीं घरीं ।
देवसेंदिवस अभ्यांतरीं । दरिद्र आलें ॥ ५॥
लोकांत अजून त्यांच्या श्रीमंतीबद्दल भ्रम होता, पण पहिली सुबत्ता घरात राहिली नव्हती. दिवसेंदिवस घरात दारिद्र्यच येत होते. (५)

ऐसी घरवात वाढली । खातीं तोंडें मिळालीं ।
तेणें प्राणीयांस लागली । काळजी उद्वेगाची ॥ ६॥
अशा रीतीने घरसंसार वाढला. खाणारी माणसे वाढली. त्यामुळे त्याला उद्वेग व काळजी वाटू लागली. (६)

कन्या उपवरी जाल्या । पुत्रास नोवया आल्या ।
आतां उजवणा केल्या । पहिजेत कीं ॥ ७॥
कन्या उपवर झाल्या, पुत्रांना मुली सांगून येऊ लागल्या. आता मुलामुलींची लग्ने करायलाच हवीत, अशी परिस्थिती येऊन ठेपली. (७)

जरी मुलें तैसींच राहिलीं । तरी पुन्हां लोकलाज जाली ।
म्हणती कासया व्यालीं । जन्मदारिद्र्यें ॥ ८॥
मुले मुली लग्नाशिवाय तशीच राहिली तरी लोक नावे ठेवणारच. ते म्हणतील की, ‘हे जन्मदरिद्री होते, तर त्यांनी इतक्या मुलांना जन्म तरी कशाला दिला ?’ (८)

ऐसी लोकलाज हो‍ईल । वडिलांचें नांव जाईल ।
आतां रुण कोण दे‍ईल । लग्नापुरतें ॥ ९॥
अशा रीतीने लोकात कमीपणा येईल, वडिलांचे नाव जाईल. पण लग्ने करावीत तर लग्नापुरते कर्ज तरी कोणी देईल का, अशी काळजी उत्पन झाली. (९)

मागें रुण ज्याचें घेतलें । त्याचें परतोन नाहीं दिल्हें ।
ऐसें आभाळ कोंसळलें । उद्वेगाचें ॥ १०॥
मागे ज्यांच्याकडून कर्ज घेतले होते, ते अद्याप परत केलेले नाही. असे निराशेचे आभाळच त्यांच्यावर कोसळले. (१०)

आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासीं ।
सर्वकाळ मानसीं । चिंतातुर ॥ ११॥
आपण अन्न खातो खरे पण खरेतर अन्नच आपल्याला खात असते. याप्रकारे खाल्लेले अन्नही अंगी लागेना. असा तो मनात अत्यंत चिंतातुर झाला. (११)

पती अवघीच मोडली । वस्तभाव गाहाण पडिली ।
अहा देवा वेळ आली । आतां डिवाळ्याची ॥ १२॥
लोकांत जराही पत राहिली नाही. घरातील चीजवस्तू गहाण पडल्या. तो म्हणू लागला की, ‘अरे देवा, आता दिवाळखोरीची वेळ आली आहे.’ (१२)

कांहीं केला ताडामोडा । विकिला घरींचा पाडारेडा ।
कांहीं पैका रोकडा । कळांतरें काढिला ॥ १३॥
काही मोडतोड केली. घरची जनावरे विकली आणि व्याजाने काही रोकड पैसा उभा केला. (१३)

ऐसें रुण घेतलें । लोकिकीं दंभ केलें ।
सकळ म्हणती नांव राखिलें । वडिलांचें ॥ १४॥
याप्रकारे ऋण काढून लोकात खोटा मोठेपणा मिरवला. सगळे लोक म्हणू लागले की, ‘वडिलांचे नाव राखले बरं का !’ (१४)

ऐसें रुण उदंड जालें । रिणाइतीं वेढून घेतलें ।
मग प्रयाण आरंभिलें । विदेशाप्रती ॥ १५॥
अशा रीतीने खूप कर्ज झाले, तेव्हा सावकारांनी वेढून टाकले. तेव्हा त्याने विदेशी जाण्याचा विचार केला. (१५)

दोनी वरुषें बुडी मारिली । नीच सेवा अंगीकारिली ।
शरीरें आपदा भोगिली । आतिशयेंसीं ॥ १६॥
दोन वर्षे तो बेपत्ता झाला. तेथे नीच सेवा अंगीकारली आणि शरीराने अत्यंत कष्ट सोसले. (१६)

कांहीं मेळविलें विदेशीं । जीव लागला मनुष्यांपासीं ।
मग पुसोनियां स्वामीसी । मुरडता जाला ॥ १७॥
विदेशात काही द्रव्य मिळविले, पण जीव घरच्या माणसांत गुंतला होता. म्हणून मालकाची परवानगी घेऊन घराकडे परत फिरला. (१७)

तंव तें अत्यंत पीडावलीं । वाट पाहात बैसलीं ।
म्हणती दिवसगती कां लागली । काये कारणें देवा ॥ १८॥
घरी आल्यावर बघतो तर घरातील माणसे अत्यंत कष्ट भोगत असलेली आणि त्याची आतुरतेने वाट पाहात असलेली दिसली. ती म्हणत होती की, ‘देवा, त्यांना कोणत्या कारणाने घरी परतायला इतके दिवस लागले आहेत ? (१८)

आतां आम्ही काये खावें । किती उपवासीं मरावें ।
ऐसियाचे संगतीस देवें । कां पां घातलें आम्हांसी ॥ १९॥
आता आम्ही काय खावे, किती दिवस उपवास काढून मरावे ! देवाने आम्हांला अशा माणसाच्या संगतीत का बरे घातले आहे ?’ (१९)

ऐसें आपुलें सुख पाहाती । परी त्याचें दुःख नेणती ।
आणी शक्ती गेलियां अंतीं । कोणीच कामा न येती ॥ २०॥
याप्रमाणे सर्वजण आपल्या सुखाचा विचार करीत होते, पण त्याचे दुःख कुणीच जाणून घेत नव्हते आणि अंगातील शक्ती नाहीशी झाल्यावर तर शेवटी कोणीच उपयोगी पडत नाही. (२०)

असो ऐसी वाट पाहतां । दृष्टीं देखिला अवचिता ।
मुलें धावती, ताता । भागलास म्हणौनी ॥ २१॥
असो. याप्रमाणे त्याची वाट पाहात असता तो अचानक दृष्टीस पडला, तेव्हा ‘बाबा, तुम्ही किती भागलात ?’ असे म्हणत मुले त्याच्याजवळ धावत आली. (२१)

स्त्री देखोन आनंदली । म्हणे आमुची दैन्यें फिटली ।
तंव येरें दिधली । गांठोडी हातीं ॥ २२॥
बायकोने त्याला पाहिले तेव्हा तिला आनंद झाला. ती म्हणाली की, ‘ आता आमचे दैन्य फिटले !’ तेव्हा त्याने आपली पैशाची गाठोडी तिच्या हाती दिली. (२२)

सकळांस आनंद जाला । म्हणती आमुचा वडील आला ।
तेणें तरी आम्हांला । आंग्या टोप्या आणिल्या ॥ २३॥
सगळ्यांना आनंद झाला. आमचे वडील आले. त्यांनी आमच्यासाठी अंगरखे आणि टोप्या आणल्या आहेत, असे मुले म्हणू लागली. (२३)

ऐसा आनंद च्यारी देवस । सवेंच मांडिली कुसमुस ।
म्हणती हें गेलियां आम्हांस । पुन्हां आपदा लागती ॥ २४॥
पण हा आनंद चारच दिवस टिकला. मग लगेच सर्वांची कुरबुर सुरू झाली. सर्व म्हणू लागले की, आणलेला पैसा खर्च झाला की, आमचे हाल परत सुरू होतील. (२४)

म्हणौनी आणिलें तें असावें । येणें मागुतें विदेशास जावें ।
आम्ही हें खाऊं न तों यावें । द्रव्य मेळऊन ॥ २५॥
म्हणून त्यांनी जे द्रव्य वगैरे आणले आहे, ते येथेच ठेवावे व त्यांनी परत विदेशास जावे. आणि आम्ही हे खाऊन संपण्याचे आत द्रव्य मिळवून परत यावे. (२५)

ऐसी वासना सकळांची । अवघीं सो‍ईरीं सुखाचीं ।
स्त्री अत्यंत प्रीतीची । तेहि सुखाच लागली ॥ २६॥
सगळ्यांची इच्छा या प्रकारची होती. प्रपंचात सर्व नाती केवळ त्यांच्या त्यांच्या सुखापुरतीच असतात. बायको अत्यंत प्रेम करीत असली तरी ती तिच्या स्वतःच्या सुखासाठीच करीत असते. (२६)

विदेसीं बहु दगदला । विश्रांती घ्यावया आला ।
स्वासहि नाहीं टाकिला । तों जाणें वोढवलें ॥ २७॥
परदेशात त्याला खूप परिश्रम झाले होते, म्हणून खरे तर तो विश्रांती घेण्यासाठी घरी आला होता. पण घरी येऊन श्वास टाकतो न टाकतो तोपर्यंत परत जाण्याची पाळी आली. (२७)

पुढें अपेक्षा जोसियांची । केली विवंचना मुहूर्ताची ।
वृत्ति गुंतली तयाची । जातां प्रशस्त न वटे ॥ २८॥
नंतर ज्योतिष्याला विचारून जाण्यासाठी मुहूर्त शोधला, पण त्याची वृत्ती घरात गुंतली असल्याने जाणे त्याला प्रशस्त वाटेना. (२८)

माया मात्रा सिद्ध केली । कांहीं सामग्री बांधली ।
लेंकुरें दृष्टीस पाहिलीं । मार्गस्त जाला ॥ २९॥
जावयाचे म्हणून काही द्रव्य व फराळाचे साहित्य तयार केले. इतर काही सामग्रीही एकत्र बांधून घेतली, मुलाबाळाकडे डोळे भरून पाहिले आणि मार्गाला लागला. (२९)

स्त्रियेस अवलोकिलें । वियोगें दुःख बहुत वाटलें ।
प्रारब्धसूत्र तुकलें । रुणानबंधाचें ॥ ३०॥
इतक्यात बायकोकडे नजर गेली, तेव्हा वियोगाचे फार दुःख झाले. वियोगाच्या ऋणानुबंधाचे प्रारब्ध बळावल्याने इच्छेविरुद्ध जाणे भाग पडले. (३०)

कंठ सद्गसदित जाला । न संवरेच गहिवरला ।
लेंकुरा आणी पित्याला । तडातोडी जाली ॥ ३१॥
दुःखाने कंठ सद्‌गदित झाला. गहिवर आवरेनासा झाला. मुलांची आणि बापाची ताटातूट झाली. (३१)

जरी रुणानुबंध असेल । तरी मागुती भेटी हो‍ईल ।
नाहीं तरी संगती पुरेल । येचि भेटीनें तुमची ॥ ३२॥
जर ऋणानुबंध असेल, तर आपली परत भेट होईल. नाहीतर हीच आपली शेवटची भेट समजावी. (३२)

ऐसीं बोलोन स्वार होये । मागुता फीरफिरों पाहे ।
वियोगदुःख न साहे । परंतु कांहीं न चले ॥ ३३॥
असे म्हणून तो घोड्यावर स्वार झाला, पण वारंवार मागे वळून पाहू लागला. वियोगदुःख सहन होईना, परंतु जाणे भागच पडले. दुसरा काही उपायच उरला नाही. (३३)

आपुला गांव राहिला मागें । चित्त भ्रमलें संसारौद्वेगें ।
दुःखवला प्रपंचसंगें । अभिमानास्तव ॥ ३४॥
पाहता पाहता आपला गाव मागे राहिला संसाराच्या उद्वेगाने चित्त भ्रमले. देहाभिमान धरून प्रपंचाची संगत केल्याने त्याला दुःख भोगावे लागले (३४)

ते समईं माता आठवली । म्हणे म्हणे धन्य ते माउली ।
मजकारणें बहुत कष्टली । परी मी नेणेंचि मूर्ख ॥ ३५॥
त्यावेळी त्याला आईची आठवण झाली. तो म्हणू लागला की खरोखर ती माउली धन्य. माझ्यासाठी तिने फार कष्ट सोसले पण त्यावेळी मला मूर्खाला हे कळले नाही. (३५)

आजी जरी ते असती । तरी मजला कदा न विशंभती ।
वियोग होतां आक्रंदती । ते पोटागि वेगळीच ॥ ३६॥
आज जर ती जिवंत असती तर तिने मला कधीही दूर परदेशात जाऊ दिले नसते. माझा वियोग होताच तिला अत्यंत दुःख झाले असते व ती आक्रोश करू लागली असती. आईचा कळवळा वेगळाच असतो. (३६)

पुत्र वैभवहीन भिकारी । माता तैसाचि अंगिकारी ।
दगदला देखोन अंतरीं । त्याच्या दुःखें दुःखवे ॥ ३७॥
पुत्र वैभवहीन अगदी भिकारी जरी असला, तरी माता त्याचा जसा असेल तसा स्वीकार करते. त्याला कष्ट झालेले दिसले तर त्याच्या दुःखाने ती दुःखी होते. (३७)

प्रपंच विचारें पाहातां । हें सकळ जोडे न जोडे माता ।
हें शरीर जये करितां । निर्माण जालें ॥ ३८॥
प्रपंचाबद्दल विचार करून पाहिला तर असे दिसते की बाकी सर्व गोष्टी मिळू शकतात, पण जिच्यामुळे हे शरीर निर्माण झाले, ती आई मात्र परत मिळत नाही. (३८)

लांव तरी ते माया । काय कराविया सहश्र जाया ।
परी भुलोन गेलों वायां । मकरध्वजाचेनी ॥ ३९॥
आई स्वभावाने कर्कश असली तरी आईची माया खरी असते. हजार स्त्रिया असल्या तरी ते प्रेम त्यांच्याजवळ नसते. पण कामवासनेच्या बळाने मी हे सर्व अगदी विसरून गेलो. (३९)

या येका कामाकारणें । जिवलगांसिं द्वंद घेणें ।
सखीं तींच पिसुणें । ऐसीं वाटतीं ॥ ४०॥
या एका कामवासनेच्या नादाने जिवलगांशी मी कलह केला. हितकर्ते मित्र मला शत्रूप्रमाणे वाटले. (४०)

म्हणौन धन्य धन्य ते प्रपंची जन । जे मायेबापाचें भजन ।
करिती न करिती, मन- । निष्ठुर जिवलगांसीं ॥ ४१॥
म्हणून जे लोक आईवडिलांची भक्ती करतात आणि जिवलग माणसांविषयी मन निष्ठर करीत नाहीत, ते धन्य होत. (४१)

संगती स्त्रीबाळकाची । आहे साठी जन्माची ।
परी मायेबापीं कैंचीं । मिळतील पुढें ॥ ४२॥
बायको व मुलांची सोबत आपल्याला जन्मभर लाभते, पण आईवडिलांचा सहवास फार थोडा मिळतो. त्यांची संगत पुढे कशी बरे मिळेल ? (४२)

ऐसें पूर्वीं होतें ऐकिलें । परी ते समईं नाहीं कळलें ।
मन हें बुडोन गेलें । रतिसुखाचा डोहीं ॥ ४३॥
मी पूर्वी हे सगळे ऐकले होते, पण त्यावेळी ते कळले नाही. माझे मन रतिसुखाचे डोहात अगदी बुडून गेले होते. (४३)

हे सखीं वाटती परी पिसुणें । मिळाली वैभवाकारणें ।
रितें जातां लाजिरवाणें । अत्यंत वाटे ॥ ४४॥
ज्यांना मी मित्र समजत होतो, ते लबाड होते. माझ्याजवळील पैशाच्या लोभाने ते माझ्याभोवती जमले होते. आता मोकळ्या हाताने परत जायची मला अत्यंत लाज वाटत आहे. (४४)

आता भलतैसें करावें । परि द्रव्य मेळऊन न्यावें ।
रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥ ४५॥
आता काय वाटेल ते करावे, परंतु द्रव्य मिळवूनच परत फिरले पाहिजे. मोकळ्या हाताने परत गेलो, तर स्वाभाविकच दुःख होणार. (४५)

ऐसी वेवर्धना करी । दुःख वाटलें अंतरीं ।
चिंतेचिये माहापुरीं । बुडोन गेला ॥ ४६॥
अशी विवंचना करीत असता त्याला मनात अत्यंत दुःख झाले. चिंतेच्या महापुरात जणू काही तो बुडून गेला. (४६)

ऐसा हा देह आपुला । असतांच पराधेन केला ।
ईश्वरीं कानकोंडा जाला । कुटुंबकाबाडी ॥ ४७॥
तो मनात म्हणू लागला की, हा देह माझा असता मी पराधीन झालो आणि ईश्वरविषयक कर्तव्याकडेदुर्लक्ष करून केवळ कुटुंबासाठी काबाडकष्ट करीत राहिलो. (४७)

या येका कामासाठीं । जन्म गेला आटाटी ।
वय वेचल्यां सेवटीं । येकलेंचि जावें ॥ ४८॥
या एका कामवासनेपायी जन्मभर आटापिटा केला. आता म्हातारपण आले आहे. आयुष्याच्या शेवटी एकट्यालाच जावे लागणार आहे. (४८)

ऐसा मनीं प्रस्तावला । क्षण येक उदास जाला ।
सवेंचि प्राणी झळंबला । मायाजाळें ॥ ४९॥
अशा प्रकारे विचार करीत असता त्याला मनात फार पश्चात्ताप झाला व एक क्षणभर तो खिन्न झाला. पण लगेचच तो मुलालेकरांच्या ममतेने मोहित होऊन मायेच्या जाळ्यात अडकला. (४९)

कन्यापुत्रीं आठवलीं । मनींहुनि क्षिती वाटली ।
म्हणे लेंकुरें अंतरलीं । माझीं मज ॥ ५०॥
मुलामुलींची आठवण होऊन मनात फार दुःख झाले आणि म्हणू लागला की, ‘माझी लेकरे मला दुरावली.’ (५०)

मागील दुःख आठवलें । जें जें होतें प्राप्त जालें ।
मग रुदन आरंभिलें । दीर्घ स्वरें ॥ ५१॥
मागे जे जे काही दुःख भोगले होते, त्याची आठवण होऊन तो दुःखी झाला आणि मोठमोठ्याने रडू लागला. (५१)

आरुण्यरुदन करितां । कोणी नाहीं बुझाविता ।
मग होये विचारिता । आअपुले मनीं ॥ ५२॥
पण अरण्यात त्याचे रडणे ऐकून त्याला समजाविणारे कुणीच नसल्याने त्याने धैर्य धरले व तो आपल्याच मनाशी विचार करू लागला. (५२)

आतां कासया रडावें । प्राप्त होतें तें भोगावें ।
ऐसे बोलोनिया जीवें । धारिष्ट केलें ॥ ५३॥
आता रडून काय उपयोग आहे ? जे प्रारब्धाने प्राप्त होते, ते भोगावेच लागते. असे म्हणून त्याने मनास धीर दिला. (५३)

ऐसा दुःखें दगदला । मग विदेशाप्रती गेला ।
पुढे प्रसंग वर्तला । तो सावध ऐका ॥ ५४॥
याप्रमाणे दुःखाने थकला भागलेला तो मग विदेशी गेला. श्री समर्थ म्हणतात की, पुढे काय प्रसंग घडला, तो श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावा. (५४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास चवथा ॥ ४॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (क) नाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : स्वगुणपरीक्षा ( ड )
॥ श्रीराम ॥

पुढें गेला विदेशासी । प्राणी लागला व्यासंगासी ।
आपल्या जिवेसीं सोसी । नाना श्रम ॥ १॥
श्रीसमर्थ सांगतात की, याप्रमाणे पुढे विदेशात जाऊन व्यवसाय करायला सुरुवात केली व त्यासाठी तो जिवापाड नाना प्रकारचे कष्ट सोसू लागला. (१)

ऐसा दुस्तर संसार । करितां कष्टला थोर ।
पुढें दोनी च्यारी संवत्सर । द्रव्य मेळविलें ॥ २॥
याप्रमाणे प्रपंच करीत असता त्याला अत्यंत कष्ट झाले. पुढे दोन चार वर्षे कष्ट करून त्याने द्रव्य मिळविले. (२)

सवेंचि आला देशासी । तों आवर्षण पडिलें देसीं ।
तेणें गुणें मनुष्यांसी । बहुत कष्ट जाले ॥ ३॥
मग लगेच तो स्वदेशास परत आला. तो तेथे दुष्काळ पडला होता व त्यामुळे सर्व माणसांना अत्यंत कष्ट भोगावे लागत होते. (३)

येकांच्या बैसल्या अमृतकळा । येकांस चंद्री लागली डोळां ।
येकें कांपती चळचळा । दैन्यवाणीं ॥ ४॥
कुणाची गालफडे बसली होती तर कुणाचे डोळे निस्तेज झाले होते, कोणी अत्यंत दीन होऊन थरथरा कापत होते. (४)

येकें दीनरूप बैसलीं । येकें सुजलीं येकें मेलीं ।
ऐसीं कन्यापुत्रें देखिलीं । अकस्मात डोळां ॥ ५॥
कोणी भिकल्यासारखी बसलेली, तर कुणाच्या अंगावर सूज आलेली, तर कोणी मरून गेलेली, अशी आपल्या मुलामुलींची अवस्था झालेली त्याने बघितली. (५)

तेणें बहुत दुःखी जाला । देखोनिया उभड आला ।
प्राणी आक्रंदों लागला । दैन्यवाणा ॥ ६॥
ते सर्व पाहून तो अत्यंत दुःखी झाला. त्याला गहिवरून आले व तो दीन होऊन आक्रोश करू लागला. (६)

तंव तीं अवघीं सावध जालीं । म्हणती बाबा बाबा जेऊं घाली ।
अन्नालागीं मिडकलीं । झडा घालिती ॥ ७॥
तेव्हा ती सर्व मुले सावध झाली आणि ‘बाबा, बाबा, आम्हांल जेवू घाल’ असे म्हणू लागली. अन्नासाठी आशाळभूत झालेली असल्याने त्याच्या अंगावर त्यांनी झडपच घातली. (७)

गांठोडें सोडून पाहाती । हातां पडिलें तेंचि खाती ।
कांहीं तोंडीं कांहीं हातीं । प्राण जाती निघोनी ॥ ८॥
पोरांनी बापाचे गाठोडे सोडून पाहिले व जे हाताला येईल ते ती खाऊ लागली. आणि काही अन्न तोंडात तर काही हातात असतानाच काही जणांचे प्राण निघून गेले (८)

तांतडी तांतडी जे‍ऊं घाली । तों तें जेवितां जेवितां कांहीं मेलीं ।
कांहीं होतीं धादावलीं । तेंहि मेलीं अजीर्णें ॥ ९॥
तो घाईघाईने त्यांना जेवू घालू लागला, तर जेवता जेवताच काही मेली. काही अत्यंत भुकेली होती, त्यांनी जास्त खाल्याने ती अजीर्ण होऊन मेली. (९)

ऐसीं बहुतेकें मेलीं । येक दोनीं मुलें उरलीं ।
तेंहि दैन्यवाणीं जालीं । आपलें मातेवांचुनी ॥ १०॥
अशा प्रकारे बहुतेक मुले मेली. एक-दोन उरली, पण तीही आपल्या आईवाचून अत्यंत दीनवाणी झाली. (१०)

ऐसे आवर्षण आलें । तेणें घरचि बुडालें ।
पुढें देसीं सुभिक्ष जालें । आतिशयेंसी ॥ ११॥
अशा रीतीने दुष्काळ पडल्याने त्याचे सर्व घरच बसले काही दिवसांनंतर देशात अन्नधान्याची अतिशय समृद्धी झाली. (११)

लेकुरां नाहीं वाढवितें । अन्न करावें लागे आपुलेन हातें ।
बहु त्रास घेतला चित्तें । स्वयंपाकाचा ॥ १२॥
घरात मुलांना वाढविणारे कुणी राहिले नव्हते. स्वतःच्या हाताने अन्न शिजवावे लागे. स्वयंपाक करण्याचा त्याच्या मनाला फार त्रास वाटू लागला. (१२)

लोकीं भरीस घातलें । पुन्हां मागुतें लग्न केलें ।
द्रव्य होतें तें वेचलें । लग्नाकारणें ॥ १३॥
लोकांनी भरीला घातले म्हणून त्याने पुन्हा लग्न केले. जे द्रव्य मिळविले होते, ते लग्ननासाठी खर्च झाले. (१३)

पुन्हां विदेशासी गेला । द्रव्य मेळऊन आला ।
तव घरीं कळहो लागला । सावत्र पुत्रांसी ॥ १४॥
म्हणून तो परत विदेशी गेला व पुन्हा द्रव्य मिळवून परत आला. तो घरी बायको आणि सावत्र मुलांच्यात भांडणास सुरुवात झाली होती. (१४)

स्त्री जाली न्हातीधुती । पुत्र देखों न सकती ।
भ्रताराची गेली शक्ती । वृद्ध जाला ॥ १५॥
त्याची बायको वयात येऊन शहाणी झाली होती, ते मुलांना बघवेना. नवरा वृद्ध झाल्याने त्याच्या अंगी काहीच शक्ती उरली नव्हती. (१५)

सदा भांडण पुत्रांचें । कोणी नायकती कोणाचें ।
वनिता अति प्रीतीचें । प्रीतिपात्र ॥ १६॥
मुलांमध्ये आपसांत सारखी भांडणे सुरू झाली. कोणी कोणाचे ऐकेना. त्याचे मन मात्र बायकोवर अत्यंत आसक्त झाले. (१६)

किंत बैसला मनां । येके ठाई पडेना ।
म्हणोनियां पांचा जणा । मेळविलें ॥ १७॥
एकमेकांबद्दल त्यांच्या मनांत संशय उत्पन्न झाला. काही केल्या एकमत होईना, म्हणून त्याने पंचांना बोलावून आणले. (१७)

पांच जण वांटे करिती । तों ते पुत्र नायेकती ।
निवाडा नव्हेचि अंतीं- । भांडण लागलें ॥ १८॥
पंचांनी वाटण्या करून दिल्या, पण मुलांना ते पटेना व ती ऐकेनात. काहीच निवाडा झाला नाही आणि शेवटी परत भांडणे सुरू झाली. (१८)

बापलेकां भांडण जालें । लेंकीं बापास मारिलें ।
तंव ते मातेनें घेतलें । शंखतीर्थ ॥ १९॥
बापाचे व मुलांचे भांडण जुंपले आणि मुलांनी बापाला मारले. ते पाहून आईने शंखध्वनी करायला सुरुवात केली. (१९)

ऐकोनि मेळले लोक । उभे पाहाती कौतुक ।
म्हणती बापास लेक । कामा आले ॥ २०॥
तिने बोंब मारलेली ऐकून तेथे लोक गोळा झाले आणि उभे राहून गंमत पाहू लागले. ते म्हणू लागले की ‘वा, मुले बापाच्या चांगली उपयोगी पडली !’ (२०)

ज्या कारणें केले नवस । ज्या कारणें केले सायास ।
ते पुत्र पितीयास । मारिती पहा ॥ २१॥
ज्या मुलांसाठी बापाने नवस केले, अनेक कष्ट उपसले, तीच मुले आता बापाला मारीत आहेत, पाहा ! (२१)

ऐसी आली पापकळी । आश्चिर्य मानिलें सकळीं ।
उभे तोडिती कळी । नगरलोक ॥ २२॥
असा हा पापमय कलह पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटले. मग तेथे गावातील जमलेल्या लोकांनी ते भांडण मिटविले. (२२)

पुढें बैसोन पांच जण । वांटे केले तत्समान ।
बापलेंकांचें भांडण । तोडिलें तेहीं ॥ २३॥
पुढे पाच जणांनी बसून समसमान वाटे केले आणि त्यांनी ते बाप-लेकांचे भांडण एकदाचे मिटवले. (२३)

बापास वेगळें घातलें । कोंपट बांधोन दिधलें ।
मन कांतेचें लागलें । स्वार्थबुद्धी ॥ २४॥
त्या मुलांनी बापाला वेगळे काढले आणि एक खोपटे बांधून दिले बायकोच्या मनातही स्वार्थबुद्धी उत्पन्न झाली. (२४)

कांता तरुण पुरुष वृद्ध । दोघांस पडिला संमंध ।
खेद सांडून आनंद । मानिला तेहीं ॥ २५॥
बायको तरुण आणि नवस म्हातारा असा घरात या दोघांचाच संबंध उरला. तेव्हा खेद न करता दोघांनी त्यातच आनंद मानला. (२५)

स्त्री सांपडली सुंदर । गुणवंत आणी चतुर ।
म्हणे माझें भाग्य थोर । वृद्धपणीं ॥ २६॥
‘मला म्हातारपणी सुंदर गुणवंत आणि चतुर बायको मिळाली, हे माझे केवढे थोर भाग्य !’ असे तो म्हणू लागला. (२६)

ऐसा आनंद मानिला । दुःख सर्वही विसरला ।
तंव तो गल्बला जाला । परचक्र आलें ॥ २७॥
याप्रमाणे मागील सर्व दुःख विसरून त्याने आनंद मानला. इतक्यात चहूकडे आरडाओरडा झाला की शत्रूची धाड आली आहे. (२७)

अकस्मात धाडी आली । कांता बंदीं धरून नेली ।
वस्तभावही गेली । प्राणीयाची ॥ २८॥
अकस्मात धाड आली आणि शत्रूने त्याच्या बायकोला कैद करून धरून नेली. एवढेच नव्हे तर त्याची सर्व चीजवस्तूही गेली. (२८)

तेणें दुःख जालें भारीं । दीर्घ स्वरें रुदन करी ।
मनीं आठवे सुंदरी । गुणवंत ॥ २९॥
त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले व तो मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या सुंदर गुणसंपन्न बायकोची मनात त्याला आठवण येऊ लागली. (२९)

तंव तिची वार्ता आली । तुमची कांता भ्रष्टली ।
ऐकोनियां आंग घाली । पृथ्वीवरी ॥ ३०॥
तोपर्यंत बातमी आली की, ‘तुमच्या बायकोला भ्रष्ट केले आहे !’ हे ऐकताच तो दुःखाने धाडकन जमिनीवर कोसळला. (३०)

सव्य अपसव्य लोळे । जळें पाझरती डोळे ।
आठवितां चित्त पोळे । दुःखानळें ॥ ३१॥
डाव्या, उजव्या कुशीवर तो गडबडा लोळू लागला. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. बायकोची आठवण येऊन त्या दुःखाने त्याचे चित्त पोळू लागले. (३१)

द्रव्य होतें मेळविलें । तेंही लग्नास वेचलें ।
कांतेसिही धरून नेलें । दुराचारी ॥ ३२॥
‘ मी काही द्रव्य मिळविले होते, तेही लग्नासाठी खर्च केले आणि आता दुराचारी लोकांनी माझ्या बायकोलाही धरून नेली.’ (३२)

मजही वृद्धाप्य आलें । लेंकीं वेगळें घातलें ।
अहा देवा वोढवलें । अदृष्ट माझें ॥ ३३॥
‘मलाही आता म्हातारपण आले आहे आणि त्यात मुलांनी मला वेगळे काढले आहे. देवा, हे केवढे दुर्देव माझ्यावर ओढवले आहे ! (३३)

द्रव्य नाहीं कांता नाहीं । ठाव नाहीं शक्ति नाहीं ।
देवा मज कोणीच नाहीं । तुजवेगळें ॥ ३४॥
माझ्याजवळ आता पैसा-अडका नाही, बायकोही नाही ! घरही गेले शक्तीही उरली नाही ! देवा, आता तुझ्याशिवाय मला दुसरे कोणीच उरलेले नाही !’ (३४)

पूर्वीं देव नाहीं पुजिला । वैभव देखोन भुलला ।
सेखीं प्राणी प्रस्तावला । वृद्धपणीं ॥ ३५॥
पूर्वी देवाची पूजा कधी केली नाही, वैभवाला भुलला आणि शेवटी म्हातारपणी त्याला पश्चात्ताप होऊ लागला. (३५)

देह अत्यंत खंगलें । सर्वांग वाळोन गेलें ।
वातपीत उसळलें । कंठ दाटला कफें ॥ ३६॥
देह अत्यंत खंगला. सर्वांग वाळून गेले. वात, पित्त उसळले. कंठ कफाने दाटून आला. (३६)

वळे जिव्हेची बोबडी । कफें कंठ घडघडी ।
दुर्गंधी सुटली तोंडीं । नाकीं स्लेष्मा वाहे । ३७॥
जिभेची बोबडी वळली, कफाने घसा घरघरू लागला, तोंडातून दुर्गंधी सुटली, नाकातून शेंबूड वाहू लागला. (३७)

मान कांपे चळचळां । डोळे गळती भळभळां ।
वृद्धपणीं अवकळा । ठाकून आली ॥ ३८॥
मान चळचळा कापू लागली, डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले, वृद्धपणात अशी ही अवकळा प्राप्त झाली. (३८)

दंतपाटी उखळली । तेणें बोचरखिंडी पडिली ।
मुखीं लाळ गळों लागली । दुर्गंधीची ॥ ३९॥
दातांची कवळी उखडल्यामुळे बोळके झाले. तोंडातून अति दुर्गंध असलेली लाळ गळू लागली. (३९)

डोळां पाहातां दिसेना । कानीं शब्द ऐकेना ।
दीर्घ स्वरें बोलवेना । दमा दाटे ॥ ४०॥
डोळ्यांनी नीट दिसेना, कानांनी शब्द ऐकू येईना, मोठ्याने बोलताही येईना, कारण दमा वाढू लागला. (४०)

शक्ती पायांची राहिली । बैसवेना मुरुकुंडी घाली ।
बृहती वाजों लागली । तोंडाच ऐसी ॥ ४१॥
पायांतील शक्ती नाहीशी झाली. बसता येईनासे झाले. म्हणून मुरकुंडी घालून पडून राहू लागला. तोंडाप्रमाणे गुदद्वारही वाजू लागले. (४१)

क्षुधा लागतां आवरेना । अन्न समईं मिळेना ।
मिळालें तरी चावेना । दांत गेले ॥ ४२॥
भूक आवरेनाशी झाली. भुकेच्या वेळी अन्न मिळेना आणि मिळाले तरी दात पडून गेल्याने ते चावता येईना. (४२)

पित्तें जिरेना अन्न । भक्षीतांच होये वमन ।
तैशेंचि जाये निघोन । अपानद्वारें ॥ ४३॥
पित्तामुळे अन्न पचेना, खाताक्षणीच ते ओकून पडू लागले किंवा खालच्या वाटेने जसेच्या तसे निघून जाऊ लागले. (४३)

विष्टा मूत्र आणि बळस । भोवता वमनें केला नास ।
दुरून जातां कोंडे स्वास । विश्वजनाचा ॥ ४४॥
विष्ठा, मूत्र आणि नाकातोंडातील मळ व ओकारी यामुळे त्याच्या आजूबाजूला सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली. या घाणीमुळे दुरून जाऊ लागले, तरी सुद्धा लोकांचा श्वास कोंडू लागला. (४४)

नाना दुःखें नाना व्याधी । वृद्धपणीं चळे बुद्धी ।
तर्ह्हीं पुरेना आवधी । आयुष्याची ॥ ४५॥
याप्रमाणे नाना दुःखे व नाना रोग यामुळे म्हातारपणी त्याची बुद्धी भ्रमिष्ट झाली. तरी आयुष्याची मर्यादा काही संपेना. (४५)

पापण्या भवयाचे केंश । पिकोन झडले निःशेष ।
सर्वांगीं लोंबलें मांस । चिरकुटासारिखें ॥ ४६॥
पापण्यांचे, भुवयांचे केस पिकून पूर्णपणे गळून गेले. सर्वांगावरील मांस एखाद्या जुन्या कापडासारखे लोंबू लागले. (४६)

देह सर्व पाअरिखें जालें । सवंगडे निःशेष राहिले ।
सकळ प्राणीमात्र बोले । मरेना कां ॥ ४७॥
देह पूर्णपणे पराधीन झाला. कोणी सवंगडीही उरले नाहीत. सर्व लोक म्हणू लागले की, ‘हा एकदाचा मरत का नाही ?’ (४७)

जें जन्मून पोसलीं । तेंचि फिरोन पडिलीं ।
अंतीं विषम वेळ आली । प्राणीयासी ॥ ४८॥
ज्यांना जन्म देऊन त्यांचे पालन-पोषण केले ती मुले विरुद्ध झाली. शेवटी त्याला फार कठीण काळ आला. (४८)

गेलें तारुण्य गेलें बळ । गेलें संसारीचें सळ ।
वाताहात जालें सकळ । शरीर आणी संपत्ती ॥ ४९॥
तारुण्य गेले, अंगातली शक्ती गेली, संसाराची मस्तीही गेली. अशा प्रकारे शक्ती आणि संपत्ती जाऊन सर्व वाताहात झाली. (४९)

जन्मवरी स्वार्थ केला । तितुकाहि वेर्थ गेला ।
कैसा विषम काळ आला । अंतकाळीं ॥ ५०॥
जन्मभर स्वार्थ साधण्यासाठी प्रयत्न केला, पण तो व्यर्थ गेला आणि शेवटी अंतकाळी अशी विषम परिस्थिती प्राप्त झाली. (५०)

सुखाकारणें झुरला । सेखीं दुःखें कष्टी जाला ।
पुढें मागुता धोका आला । येमयातनेचा ॥ ५१॥
सुखासाठी झुरला, पण शेवटी दुःखीकष्टी झाला आणि पुढे यमयातनेचा धोका तर आहेच. (५१)

जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावें ॥ ५२॥
सारांश, जन्म हेच सर्व दुःखाचे मूळ असून त्याला दुःखाची इंगळी सारखी डसतच असते, म्हणून माणसाने तत्काळ स्वहित साधावे. (५२)

असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण ।
म्हणोनियां शरण । भगवंतास जावें ॥ ५३॥
श्री समर्थ म्हणतात, की असो. याप्रमाणे सर्वांना असे दारुण वृद्धपण येणारच आहे, म्हणून प्रत्येकाने भगवंतास शरण जावे. (५३)

पुढें वृद्धीस तत्वतां । गर्भीं प्रस्तावा होता ।
तोचि आला मागुता । अंतकाळीं ॥ ५४॥
गर्भावस्थेत जीवाला जसा पश्चात्ताप झाला होता, तसाच तो तत्त्वतः त्याला वृद्धपणी होतो आणि तोच पुन्हा अंतकाळीही होतो. (५४)

म्हणौनि मागुतें जन्मांतर । प्राप्त मातेचें उदर ।
संसार हा अति दुस्तर । तोचि ठाकून आला ॥ ५५॥
म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मातेच्या उदरात काही काळ राहावे लागते आणि तरून जाण्यास कठीण असा हा संसार परत त्याच्यापुढे उभा राहतो. (५५)

भगवद्भहजनावांचुनी । चुकेना हे जन्मयोनि ।
तापत्रयांची जाचणी । सांगिजेल पुढे ॥ ५६॥
या प्रकारे गर्भवास व जन्म यांतून भगवद्‌भजनावाचून सुटका होत नाही. आता पुढील समासात तीन तापांचा जाच कसा असतो ते सांगितले जाईल. (५६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
स्वगुणपरीक्षानाम समास पाचवा ॥ ५॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘स्वगुणपरीक्षा (ड) नाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : आध्यात्मिक ताप
॥ श्रीराम ॥

तापत्रयाचें लक्षण । आतां सांगिजेल निरूपण ।
श्रोतीं करावें श्रवण । यकाग्र हो‍ऊनी ॥ १॥
श्री समर्थ म्हणतात की, मी आता तापत्रयाच्या लक्षणांचे नीट वर्णन करतो. ते श्रोत्यांनी एकाग्र होऊन श्रवण करावे. (१)

जो तापत्रैं पोळला । तो संतसंगें निवाला ।
आर्तभूत तोषला । पदार्थ जेवी ॥ २॥
तापलेला पदार्थ जसा पाण्याने निवतो, तसा तापत्रयाने जो पोळतो, तो संतसमागमाने निवतो, शांत होतो. (२)

क्षुधाक्रांतास मिळे अन्न । तृषाक्रांतास जीवन ।
बंदीं पडिल्याचें बंधन- । तोडिनां, सुख ॥ ३॥
भुकेलेल्यास अन्न मिळावे किंवा तहानलेल्यास पाणी मिळावे किंवा बंधनात पडलेल्याची बंधनातून सुटका व्हावी, त्याप्रमाणे त्याला सुख प्राप्त होते. (३)

माहापुरें जाजावला । तो पैलतीरास नेला ।
कां तो स्वप्नींचा चे‍इला । स्वप्नदुःखी ॥ ४॥
कोणी येकासी मरण- । येतां, दिलें जीवदान ।
संकटास निवारण । तोडितां सुख ॥ ५॥
किंवा महापुरात घाबरलेल्यास पैलतीरास नेला असता तो जसा सुखी होतो किंवा स्वप्नदुःखाने दुःखी झालेल्यास जागे करावे किंवा कुणाचे मरण ओढवले असता त्याला जीवनदान द्यावे किंवा एखादा संकटात सापडला असता युक्तिप्रयुक्तीने त्याचे संकट निवारण केल्यावर त्यास जसे सुख होते. (४-५)

रोगियास औषध । सप्रचित आणी शुद्ध ।
तयासी होये आनंद । आरोग्य होतां ॥ ६॥
किंवा रोग्याला अनुभवसिद्ध असे खात्रीचे आणि उत्तम औषध मिळून आरोग्य प्राप्त झाले असता त्याला जसा आनंद होतो. (६)

तैसा संसारें दुःखवला । त्रिविधतापें पोळला ।
तोचि येक अधिकारी जाला । परमार्थासी ॥ ७॥
त्याप्रमाणे संसारातील दुःखाने जो गांजलेला असतो, त्रिविध तापाने जो पोळलेला असतो, तोच एक परमार्थ मिळण्यास अधिकारी ठरतो. (७)

ते त्रिविध ताप ते कैसे । आतां बोलिजेत तैसे ।
येविषईं येक असे । वाक्याधार ॥ ८॥
ते त्रिविध ताप कसे असतात, ते आता मी सांगतो. याविषयी एक वाक्याधार आहे. (८)

श्लोक ॥ देहेंद्रियप्राणेन सुखं दुःखं च प्राप्यते ।
इममाध्यात्मिकं तापं जायते दुःक देहिनाम् ॥ १ ॥
श्लोक १ अर्थ – देह इंद्रिये आणि प्राण यांच्यामुळे जे सुखदुःख भोगावे लागते, त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. (१)

सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥ २ ॥
श्लोक २ अर्थ – सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते, तो दुसरा ताप असून तो मोठा क्लेशदायक आहे. तो खरोखर आधिभौतिक ताप होय. (२)

शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादिं भोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥ ३ ॥
श्लोक ३ अर्थ – माणसाच्या चांगल्या-वाईट कर्माप्रमाणे मेल्यावर यमयातना, स्वर्ग, नरक वगैरे जे भोग भोगावे लागतात, त्यांना आधिदैविक ताप असे म्हणतात. (३)

येक ताप आध्यात्मिक । दुजा तो आदिभूतिक ।
तिसरा आदिदैविक । ताप जाणावा ॥ ९॥
एका तापास आध्यात्मिक ताप म्हणतात. दुसरा जो ताप त्यास आधिभौतिक म्हणतात आणि तिसरा ताप तो आधिदैविक जाणावा. (९)

आध्यात्मिक तो कोण । कैसी त्याची वोळखण ।
आदिभूतिकांचें लक्षण । जाणिजे कैसें ॥ १०॥
आध्यात्मिक ताप म्हणजे काय, तो कसा ओळखावा, तसेच आधिभौतिक तापाचे लक्षण ते कसे जाणावे ? (१०)

आदिदैविक तो कैसा । कवण तयाची दशा ।
हेंहि विशद कळे ऐसा । विस्तार कीजे ॥ ११॥
आधिदैविक ताप कसा असतो, त्याची अवस्था कोणती, हे सर्व स्पष्टपणे कळेल अशा प्रकारे विस्तार करून सांगा. (११)

हां जी म्हणोनि वक्ता । जाला कथा विस्तारिता ।
आध्यात्मिक ताप आतां । सावध ऐका ॥ १२॥
त्यावर वक्ता ‘हां जी’ असे म्हणून विस्तारपूर्वक सांगता झाला. तरी आता आध्यात्मिक तापासंबंधीचे निरूपण सावध होऊन ऐका. (१२)

देह इंद्रिय आणी प्राण । यांचेनि योगें आपण ।
सुखदुःखें सिणे जाण । या नांव आध्यात्मिक ॥ १३॥
देह इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने आपणास सुख-दुःख होऊन जो त्रास होतो, त्या तापाला आध्यात्मिक ताप असे नाव आहे. (१३)

देहामधून जें आलें । इंद्रियें प्राणें दुःख जालें ।
तें आध्यात्मिक बोलिलें । तापत्रईं ॥ १४॥
जे दुःख देहामधून येते आणि इंद्रिये व प्राण यांच्याद्वारे भोगावे लागते, त्याला तापत्रयात आध्यात्मिक असे म्हणतात. (१४)

देहामधून काये आलें । प्राणें कोण दुःख जालें ।
आतां हें विशद केलें । पाहिजे कीं ॥ १५॥
देहामधून कोणती दुःखे येतात आणि प्राणांमुळे ती कशी सोसावी लागतात, हे आता स्पष्ट करून सांगितले पाहिजे. (१५)

खरुज खवडे पुळिया नारु । नखरुडें मांजया देवि गोवरु ।
देहामधील विकारु । या नांव आध्यात्मिक ॥ १६॥
देहामधील विकारांना आध्यात्मिक ताप म्हणतात. ते असे- खरूज, खवडे, पुळ्या, नारु, नखुर्डे मांजऱ्या, देवी, गोवर (१६)

काखमांजरी केशतोड । वोखटें वर्ण काळफोड ।
व्याधी मूळव्याधी माहाजड । या नांव आध्यात्मिक ॥ १७॥
काखमांजरी, केस्तुड, सडके, व्रण, काळपुळी, व्याधी, दुःसह अशी मूळव्याध. (१७)

अंगुळवेडे गालफुगी । कंड लागे वाउगी ।
हिरडी सुजे भरे बलंगी । या नांव आध्यात्मिक ॥ १८॥
बोटाचे दुखणे, गालफुगी, उगीच कंड सुटणे, हिरडी सुजणे, दातांत भरणारे कस्पट (१८)

वाउगे फोड उठती । कां ते सुजे आंगकांती ।
वात आणी तिडका लागती । या नांव आध्यात्मिक ॥ १९॥
अंगावर उगीच फोड उठणे किंवा अंगाला सूज येणे, वात होणे, तिडका लागणे. (१९)

नाइटे अंदु गजकर्ण । पेहाचे पोट विस्तीर्ण ।
बैसलें टाळें फुटती कर्ण । या नांव आध्यात्मिक ॥ २०॥
नायटे, हाड्यावण, गजकर्ण, जलोदराने वाढलेले पोट कानठळ्या बसून कान फुटणे. (२०)

कुष्ट आणि वोला कुष्ट । पंड्यारोग अतिश्रेष्ठ ।
क्षयरोगाचे कष्ट । या नांव आध्यात्मिक ॥ २१॥
पांढरे कोड, महारोग, अति श्रेष्ठ असा रक्त क्षय व क्षयरोगाचे कष्ट (२१)

वाटी वटक वायेगोळा । हातीं पाईं लागती कळा ।
भोवंडी लागे वेळोवेळां । या नांव आध्यात्मिक ॥ २२॥
गाठ सरकणे, अर्भक दूध प्यायल्यावर दुधाच्या गोळ्या होऊन ते ओकते ते दुखणे किंवा वायुगोळा अथवा हातापायाला कळा लागणे, वरचेवर चक्कर येणे. (२२)

वोलांडा आणी वळ । पोटसुळाची तळमळ ।
आर्धशिसी उठे कपाळ । या नांव आध्यात्मिक ॥ २३॥
वोलांडा, वळ, पोटशूळाच्या वेदना, अर्धशिशीने कपाळ उठणे. (२३)

दुःखे माज आणि मान । पुष्ठी ग्रीवा आणि वदन ।
अस्तिसांदे दुःखती जाण । या नांव आध्यात्मिक ॥ २४॥
मान आणि कंबर दुखणे, पाठ, गळा आणि तोंड दुखणे, हाडांचे सांधे दुखणे. (२४)

कुळिक तरळ कामिणी । मुरमा सुंठरें माळिणी ।
विदेसीं लागलें पाणी । या नांव आध्यात्मिक ॥ २५॥
मोडशी, अजीर्णाची हागओक, कावीळ पुरळ गळवे, गडमाळा, विदेशांतील पाणी लागणे. (२५)

जळसोस आणी हिवारें । गिरीविरी आणी अंधारें ।
ज्वर पाचाव आणी शारें । या नांव आध्यात्मिक ॥ २६॥
कोरड पडणे, हिवताप, गरगरणे आणि अंधारी येणे. उलटलेला ज्वर, ज्वर आणि शहारे येणे. (२६)

शैत्य उष्ण आणी तृषा । क्षुधा निद्रा आणी दिशा ।
विषयतृष्णेची दुर्दशा । या नांव आध्यात्मिक ॥ २७॥
शैत्य, उष्ण, तहान, भूक, निद्रा आणि हगवण, विषयवासनेच्या अतिरेकाने होणारी दुर्दशा. (२७)

आळसी मूर्ख आणी अपेसी । भय उद्भवे मानसीं ।
विसराळु दुश्चित्त आहिर्निशी । या नांव आध्यात्मिक ॥ २८॥
आळशी, मूर्ख, अपयश, मनात भय उत्पन्न होणे. विसराळू असणे आणि रात्रंदिवस उद्विग्न असणे. (२८)

मूत्रकोड आणी परमें । रक्तपिती रक्तपरमें ।
खडाचढाचेनि श्रमे । या नांव आध्यात्मिक ॥ २९॥
लघवी अडणे, परमा, गरमी, रक्तपिती आणि रक्तपरमे, मूतखड्याचा त्रास होणे. (२९)

मुरडा हागवण उन्हाळे । दिशा कोंडतां आंदोळे ।
येक वेथा असोन न कळे । या नांव आध्यात्मिक ॥ ३०॥
मुरडा, हागवण, उन्हाळे लागणे, अवरोध झाला असता त्रासणे किंवा रोग असून तो कोणता हे न कळणे. (३०)

गांठी ढळली जाले जंत । पडे आंव आणी रक्त ।
अन्न तैसेचि पडत । या नांव आध्यात्मिक ॥ ३१॥
गाठ सरकणे, जंत होणे, आव आणि रक्त पडणे किंवा अन्न न पचता तसेच पडणे. (३१)

पोटफुगी आणी तडस । भरला हिर लागला घांस ।
फोडी लागतां कासावीस । या नांव आध्यात्मिक ॥ ३२॥
पोटफुगी, तडस लागणे, ठसका लागणे, घास लागणे, मुखातील लहान फोडामुळे जीव कासावीस होणे. (३२)

उचकी लागली उसित गेला । पीत उसळलें उलाट झाला ।
खरे पडसा आणी खोंकला । या नांव आध्यात्मिक ॥ ३३॥
उचकी लागणे, घास अडकणे, पित्त उसळून उलटी होणे, जीभकाटे, पडसे, खोकला होणे. (३३)

उसळला दमा आणी धाप । पडजिभ ढासि आणी कफ ।
मोवाज्वर आणी संताप । या नांव आध्यात्मिक ॥ ३४॥
दमा उसळून धाप लागणे, पडजिभेमुळे ढास लागणे, कफ होणे, मोवाज्वर आणि संताप येणे. (३४)

कोणी सेंदूर घातलाअ । तेणें प्राणी निर्बुजला ।
घशामध्ये फोड जाला । या नांव आध्यात्मिक ॥ ३५॥
कोणी शेंदूर खायला घातल्याने मनावर परिणाम होणे. घशामध्ये फोड येणे. (३५)

गळसोट्या आणी जीभ झडे । सदा मुखीं दुर्गंधी पडे ।
दंतहीन लागती किडे । या नांव आध्यात्मिक ॥ ३६॥
घटसर्प आणि जीभ झडणे, तोंडाला सदा दुर्गंधी येणे, दात पडून हिरड्यांना कीड लागणे. (३६)

जरंडी घोलाणा गंडमाळा । अवचिता स्वयें फुटे डोळा ।
आपणचि कापी अंगुळा । या नांव आध्यात्मिक ॥ ३७॥
पाथरी वाढणे, घोळणा फुटणे, गंडमाळा, अकस्मात डोळा फुटणे, आपलेच बोट आपण कापून घेणे. (३७)

कळा तिडकी लागती । कां ते दंत उन्मळती ।
अधर जिव्हा रगडती । या नांव आध्यात्मिक ॥ ३८॥
कळा व तिडका लागणे, दात उपटले जाणे, दातांनी ओठ किंवा जीभ चावली जाणे. (३८)

कर्णदुःख नेत्र दुःख । नाना दुःखें घडे शोक ।
गर्भांध आणी नपुश्यक । या नांव आध्यात्मिक ॥ ३९॥
कान ठणकणे, डोळे दुखणे, नाना प्रकारच्या दुःखामुळे शोक होणे, गर्भांध किंवा नपुंसक असणे. (३९)

फुलें वडस आणी पडळें । कीड गर्ता रातांधळें ।
दुश्चित्त भ्रमिष्ट आणी खुळें । या नांव आध्यात्मिक ॥ ४०॥
डोळ्यात फूल पडणे, वडस वाढणे, मोतीबिंदू काचबिंदू होणे, पापण्यांना कीड पडणे, डोळे असून न दिसणे, रातांधळेपणा, दुद्धि श्चत्तपणा, भ्रमिष्टपणा आणि खुळेपणा. (४०)

मुकें बधीर राखोंडें । थोटें चळलें आणी वेडें ।
पांगुळ कुर्हें आणी पावडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४१॥
मुकेपणा, बधिरपणा, ओठ तुटणे, हात तुटणे, वृत्ती चळणे, वेडेपणा, पांगळेपणा, आखूड पाय असणे, कुबड असणे. (४१)

तारसें घुलें काणें कैरें । गारोळें जामुन टाफरें ।
शडांगुळें गेंगाणें विदरें । या नांव आध्यात्मिक ॥ ४२॥
तारवटलेले डोळे असणे, वाकडी मान असणे, तिरळेपणा, घारे डोळे असणे, अति ठेंगणेपणा, सारखे ठेचकाळणे, हाताला सहा बोटे असणे, गेंगणेपणा, कुरूपता. (४२)

दांतिरें बोचिरें घानाळ । घ्राणहीन श्रोत्रहीन बरळ ।
अति कृश अति स्थूळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४३॥
दांतरेपणा, बोचरेपणा लांब नाक असणे, नाकच नसणे, कान नसणे, बडबड करणे, अतिकृशता, अतिस्थूलता. (४३)

तोंतरें बोंबडें निर्बळ । रोगी कुरूप कुटीळ ।
मत्सरी खादाड तपीळ । या नांव आध्यात्मिक ॥ ४४॥
तोतरेपणा, बोबडेपणा, अशक्तपणा, रोगटपणा, कुरूपता, कुटिलता, मत्सरी स्वभाव, खादाडपणा, तापटपणा. (४४)

संतापी अनुतापी मत्सरी । कामिक हेवा तिरस्कारी ।
पापी अवगुणी विकारी । या नांव आध्यात्मिक ॥ ४५॥
संतापणे, पश्चात्ताप करणे, मत्सर करणे, कामना असणे, हेवा अथवा तिरस्कार करणे, पाप करणे, अवगुण असणे, विकारवशता. (४५)

उठवणें ताठा करक । आवटळे आणी लचक ।
सुजी आणी चालक । या नांव आध्यात्मिक ॥ ४६॥
उठता न येणे, अंग ताठणे, अवघडणे, लचकणे, सूज येणे आणि संधिवात. (४६)

सल आडवें गर्भपात । स्तनगुंते सनपात ।
संसारकोंडे आपमृत्य । या नांव आध्यात्मिक ॥ ४७॥
न वाढणारा गर्भ, मूल आडवे येणे, गर्भपात होणे, स्तनात गाठी होणे, सन्निपात, संसारातील अडचणी, अपमृत्यू (४७)

नखविख आणी हिंगुर्डें । बाष्ट आणी वावडें ।
उगीच दांतखीळ पडे । या नांव आध्यात्मिक ॥ ४८॥
नखविष आणि नखुर्डे शिळे व वातुळ खाण्याने होणारे रोग, वावडे खाण्याने होणारा त्रास, उगीच दातखीळ बसणे. (४८)

झडती पातीं सुजती भवया । नेत्रीं होती राझणवडीया ।
चाळसी लागे प्राणियां । या नांव आध्यात्मिक ॥ ४९॥
डोळ्यांच्या पापण्या झडणे, भुवया सुजणे, डोळ्याला रांजणवाड्या होणे, डोळ्यांना चष्मा लागणे. (४९)

वांग तिळ सुरमें लांसें । चामखिळ गलंडे मसें ।
चुकुर हो‍इजे मानसें । या नांव आध्यात्मिक ॥ ५०॥
काक्सरपुळ्या, तीळ पांढरेचट्टे काळेचट्टे चामखीळ गालगुंड केसाळ काळे चट्टे मनाने भ्रमिष्ट होणे. (५०)

नाना फुग आणी आवाळें । आंगीं दुर्गंधी प्रबळे ।
चाईचाटी लाळ गळे । या नांव आध्यात्मिक ॥ ५१॥
अंगावर येणारे फुगवटे, आवाळे, अंगाला अत्यंत दुर्गंधी येणे, डोक्यावरील केस गळून चट्टे पडणे, तोंडातून लाळ गळणे. (५१)

नाना चिंतेची काजळी । नाना दुःखें चित्त पोळी ।
व्याधीवांचून तळमळी । या नांव आध्यात्मिक ॥ ५२॥
नाना प्रकारच्या चिंतेने काळवंडणे, नाना दुःखांनी चित्त पोळून निघणे, काही आजार नसून जीवाची तगमग होणे. (५२)

वृद्धपणीच्या आपदा । नाना रोग होती सदा ।
देह क्षीण सर्वदा । या नांव आध्यात्मिक ॥ ५३॥
वृद्धपणाच्या यातना, सदा काही ना काही रोग होणे, देह नेहमी क्षीण असणे. (५३)

नाना व्याधी नाना दुःखें । नाना भोग नाना खांडकें ।
प्राणी तळमळी शोकें । या नांव आध्यात्मिक ॥ ५४॥
नाना रोग व नाना प्रकारचे दुःख, नाना भोग, अनेक जखमा, यांमुळे माणसाला दुःख होऊन तळमळणे. (५४)

ऐसा आध्यात्मिक ताप । पूर्वपापाचा संताप ।
सांगतां सरेना अमूप । दुःखसागर ॥ ५५॥
अशा प्रकारचे आध्यात्मिक ताप हे पूर्वजन्मातील पातकांचे फळ असते. त्यांचे कितीही वर्णन केले तरी पुरे पडत नाही, असा हा न संपणारा दुःखाचा समुद्र आहे. (५५)

बहुत काय बोलावें । श्रोतीं संकेतें जाणावें ।
पुढें बोलिजे स्वभावें । आदिभूतिक ॥ ५६॥
श्रीसमर्थ म्हणतात की, आणखी किती वर्णन करावे ? श्रोत्यांनी वरील उदाहरणांवरून समजून घ्यावे. आता पुढील समासात स्वाभाविकच आधिभौतिक तापाचे निरूपण केले जाईल. (५६)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आध्यात्मिकतापनिरूपणनाम समास सहावा ॥ ६॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘आध्यात्मिकतापनाम’ समास सहावा समाप्त


समास सातवा : आधिभौतिक ताप
॥ श्रीराम ॥

मागां जालें निरूपण । आध्यात्मिकाचें लक्षण ।
आतां आदिभूतिक तो कोण । सांगिजेल ॥ १॥
श्री समर्थ म्हणतात की, मागील समासात आध्यात्मिक तापाचे लक्षण वर्णन केले. आता आधिभौतिक ताप कोणता ते सांगितले जाईल. (१)

श्लोक ॥ सर्वभूतेन संयोगात् सुखं दुःखं च जायते ।
द्वितीयतापसंतापः सत्यं चैवाधिभौतिकः ॥
अर्थ- सर्व भूतमात्रांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते त्या दुसर्‍या दुःखाला यथार्थ रीतीने आधिभौतिक असे म्हणतात. (१)

सर्व भूतांचेनि संयोगें । सुखदुःख उपजों लागे ।
ताप होतां मन भंगे । या नांव आदिभूतिक ॥ २॥
सर्व भूतांच्या संयोगाने जे सुख-दुःख उत्पन्न होते, त्याने ताप होऊन मन दुःखी होते, त्याला आधिभौतिक असे म्हणतात. (२)

तरी या आदिभूतिकाचें लक्षण । प्रांजळ करूं निरूपण ।
जेणें अनुभवास ये पूर्ण । वोळखी तापत्रयाची ॥ ३॥
तरी आता या आधिभौतिक तापाची लक्षणे स्पष्टपणे वर्णन करू या, म्हणजे त्यायोगे तापत्रयाची चांगली ओळख होऊन अनुभवही येईल. (आधिभौतिक दुःखे पुढीलप्रमाणे) (३)

ठेंचा लागती मोडती कांटे । विझती शस्त्रांचे धायटे ।
सला सिलका आणी सरांटे । या नांव आदिभूतिक ॥ ४॥
ठेच लागणे, पायात काटे मोडणे, शस्त्रांचे घाव लागून जखमा होणे, लाकडाचे बारीक काट्यासारखे कुसळ चुया आणि सराटे इत्यादी घुसणे. (४)

अंग्या आणी काचकुहिरी । आवचटा लागे शरीरीं ।
गांधील ये‍ऊन दंश करी । या नांव आदिभूतिक ॥ ५॥
आग्या वनस्पती शरीरास अकस्मात लागून आग होणे किंवा खाजकुहिरी लागून अंगास खाज सुटणे, गांधीलमाशी येऊन चावणे. (५)

मासी गोमासी मोहळमासी । मुंगी तेलमुंगी डांस दसी ।
सोट जळू लागे यासी । आदिभूतिक बोलिजे ॥ ६॥
माशी, गोमाशी, मोहोळमाशी, मुंगी, तेलमुंगी, डास यांनी दंश करणे किंवा सोट म्हणजे रक्त पिणारा किडा किंवा जळू अंगास चिकटणे. (६)

पिसा पिसोळे चांचण । कुसळें मुंगळे ढेंकुण ।
विसीफ भोवर गोंचिड जाण । या नांव आदिभूतिक ॥ ७॥
पिसवा, पिसोळे, चांचड, कुसळे, मुंगळे, ढेकूण, इसब उत्पन्न करणारे किडे, भुंगे, गोचीड यांचा दंश. (७)

गोंबी विंचु आणी विखार । व्याघ्र लाअंडिगे आणी शूकर ।
गौसायळ सामर । या नांव आदिभूतिक ॥ ८॥
गोम, विंचू आणि साप, वाघ, लांडगे आणि डुक्कर, साळू, सांबर यांचे दंश. (८)

रानगाई रानम्हैसे । रानशकट्ट आणी रीसें ।
रानहाती लांवपिसें । या नांव आदिभूतिक ॥ ९॥
वनगाई, रानम्हशी, रानबैल अस्वले रानहत्ती इत्यादी जनावरांचा मार आणि डाकिणीमुळे लागणारे वेड (९)

सुसरीनें वोढून नेलें । कां तें आवचितें बुडालें ।
आथवा खळाळीं पडिलें । या नांव आदिभूतिक ॥ १०॥
सुसरीने ओढून नेणे किंवा अवचित बुडून मरणे अथवा पाय घसरून प्रवाहात पडणे. (१०)

नाना विखारें आजगर । नाना मगरें जळचर ।
नाना वनचरें अपार । या नांव आदिभूतिक ॥ ११॥
नाना विषारी साप, अथवा अजगर, मगरी वगैरे नाना जलचर प्राणी यांनी ओढून नेणे. अनेक जंगली प्राण्यांपासून दुःख होणे. (११)

अश्व वृषभ आणी खर । स्वान शूकर जंबुक मार्जर ।
ऐसीं बहुविध क्रूर । या नांव आदिभूतिक ॥ १२॥
घोडा, बैल गाढव, कुत्री, डुक्कर कोल्हे, मांजर अशा अनेक कूर पशूमुळे दुःख होणे. (१२)

ऐसीं कर्कशें भयानकें । बहुविध दुःखदायकें ।
दुःखें दारुणें अनेकें । या नांव आदिभूतिक ॥ १३॥
अशी कर्कश, भयानक, नाना प्रकारे दुःख देणारी अनेक दारुण दुःखे. (१३)

भिंती माळवंदे पडती । कडे भुयेरीं कोंसळती ।
वृक्ष आंगावरी मोडती । या नांव आदिभूतिक ॥ १४॥
भिंती आणि गच्च्या कोसळणे, कडे, भुयारे कोसळून अंगावर पडणे किंवा झाडे मोडून अंगावर पडणे. (१४)

कोणी येकाचा श्राप जडे । कोणी येकें केले चेडे ।
आधांतरी होती वेडे । या नांव आदिभूतिक ॥ १५॥
कुणा एकाचा शाप बाधणे, कोणी तरी जादूटोणा करणे, कारण नसताना वेड लागणे. (१५)

कोणी येकें चाळविलें । कोणी येकें भ्रष्टविले ।
कोणी येकें धरून नेलें । या नांव आदिभूतिक ॥ १६॥
कुणीतरी फसविणे, कोणी तरी भ्रष्टविणे, कोणीतरी धरून नेणे. (१६)

कोणी येकें दिलें वीष । कोणी येकें लाविले दोष ।
कोणी येकें घातलें पाश । या नांव आदिभूतिक ॥ १७॥
कुणी तरी विष देणे, कुणी तरी दोषारोप करणे, कुणीतरी फास घालणे. (१७)

अवचिता सेर लागला । नेणो बिबवा चिडला ।
प्राणी धुरें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ १८॥
कल्पना नसताना शेराच्या झाडाचा चीक अंगाला लागणे, बिब्बा उतणे किंवा धुराने जीव घाबरा होणे. (१८)

इंगळावरी पाय पडे । शिळेखालें हात सांपडे ।
धावतां आडखुळे पडे । या नांव आदिभूतिक ॥ १९॥
मोठ्या विंचवावर, इंगळीवर पाय पडणे दगडखाली हात सापडणे, धावताना अडखळून पडणे. (१९)

वापी कूप सरोवर । गर्ता कडा नदीतीर ।
आवचितें पडे शरीर । या नांव आदिभूतिक ॥ २०॥
विहिरी, कूप, सरोवर मोठा खड्डा, कडा किंवा नदीतीर या ठिकाणी एकाएकी शरीर पडणे. (२०)

दुर्गाखालें कोंसळती । झाडावरून पडती ।
तेणें दुह्खें आक्रंदती । या नांव आदिभूतिक ॥ २१॥
किल्यावरून खाली कोसळणे, झाडावरून पडणे आणि त्या दुःखाने आक्रोश करणे. (२१)

सीतें वोठ तरकती । हात पाव टांका फुटती ।
चिखल्या जिव्हाळ्या लागती । या नांव आदिभूतिक ॥ २२॥
थंडीने ओठ फुटणे, हात, पाय, टाचा यांना भेगा पडणे, चिखल्या होणे, जिव्हाळी लागणे. (२२)

अशनपानाचिये वेळे । उष्ण रसें जिव्हा पोळे ।
दांत कस्करे आणी हरळे । या नांव आदिभूतिक ॥ २३॥
खातापिताना उष्ण पदार्थाने जीभ पोळणे, दात करकरणे आणि दातात फटी पडणे. (२३)

पराधेन बाळपणीं । कुशब्दमारजाचणी ।
अन्नवस्त्रेंवीण आळणी । या नांव आदिभूतिक ॥ २४॥
बालपणी पसधीनतेमुळे शिव्यांचा, वाईट शब्दांचा मार सोसावा लागणे, अन्नवस्त्रांची कमतरता असणे. (२४)

सासुरवास गालोरे । ठुणके लासणें चिमोरे ।
आलें रुदन न धरे । या नांव आदिभूतिक ॥ २५॥
मुलींना सासुरवासापायी गालगुच्चे, ठोसे, चिमटे डागणे, इत्यादी जाच सोसताना रडू न आवरणे. (२५)

चुकतां कान पिळिती । कां तो डोळा हिंग घालिती ।
सर्वकाळ धारकीं धरिती । या नांव आदिभूतिक ॥ २६॥
चूक झाली असता कान पिळला जाणे, डोळ्यांत हिंग घालणे, सतत धारेवर धरणे. (२६)

नाना प्रकारीचे मार । दुर्जन मारिती अपार ।
दुरी अंतरे माहेर । या नांव आदिभूतिक ॥ २७॥
दुष्टांनी नाना तर्‍हेने मारहाण करणे, मुलींना माहेर दुरावणे. (२७)

कर्णनासिक विंधिलें । बळेंचि धरून गोंधिलें ।
खोडी जालिया पोळविलें । या नांव आदिभूतिक ॥ २८॥
कानाला, नाकाला भोके पडणे, बळेच धरून गोंदणे, जरा चूक झाली असता आगीचे चटके देणे. (२८)

परचक्रीं धरून नेलें । नीच यातीस दिधलें ।
दुर्दशा हो‍ऊन मेलें । या नांव आदिभूतिक ॥ २९॥
शत्रूचा हल्ला आला असता त्यांनी धरून नेणे, नीच जातीच्या लोकांना विकून टाकणे आणि त्यामुळे दुर्दशा होऊन मरण पावणे. (२९)

नाना रोग उद्भवले । जे आध्यात्मिकीं बोलिले ।
वैद्य पंचाक्षरी आणिले । या नांव आदिभूतिक ॥ ३०॥
पूर्वी जे आध्यात्मिक रोग वर्णन केले आहेत, त्यातील अनेक रोग होणे. त्यांच्या उपचारांकरिता वैद्य अथवा मांत्रिक आणणे. (३०)

नाना वेथेचें निर्शन । व्हावया औषध दारुण ।
बळात्कारें देती जाण । या नांव आदिभूतिक ॥ ३१॥
अनेक रोगांचे निरसन करण्यासाठी बळजबरीने दारुण औषधे देणे. (३१)

नाना वल्लीचे रस । काडे गर्गोड कर्कश ।
घेतां होये कासावीस । या नांव आदिभूतिक ॥ ३२॥
नाना वनस्पतींचे रस, काढे, व कडवट चाटणे वगैरे घेताना जीव कासावीस होणे. हे सर्व आधिभौतिक तापच आहेत. (३२)

ढाळ आणी उखाळ देती । पथ्य कठीण सांगती ।
अनुपान चुकतां विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ३३॥
जुलाब आणि वातीचे औषध घ्यावे लागणे, कडक पथ्य करावे लागणे, अनुपानात चूक झाल्याने कष्ट होणे. (३३)

फाड रक्त फांसणी । गुल्लडागांची जाचणी ।
तेणें दुःखें दुःखवे प्राणी । या नांव आदिभूतिक ॥ ३४॥
शरीराची चिरफाड करणे, गाठीवर शस्त्राने चिरा पाडणे व त्यामुळे रक्तस्त्राव होणे, तप्त सळईचे डाग घेणे व त्यायोगे दुःखाने व्याकूळ होणे. (३४)

रुचिक बिबवे घालिती । नाना दुःखें दडपे देती ।
सिरा तोडिती जळा लाविती । या नांव आदिभूतिक ॥ ३५॥
रुईचा चीक अथवा बिय्या घालणे, नाना दुःखाचे आघात होणे, शिरा तोडणे, जळवा लावणे. (३५)

बहु रोग बहु औषधें । सांगतां अपारें अगाधें ।
प्राणी दुखवे तेणें खेदें । या नांव आदिभूतिक ॥ ३६॥
नाना रोग व त्यावर नाना प्रकारची औषधे आणि उपचार आहेत. ते वर्णन करावयाचे ठरवले तर अपार अगाध असल्याने पुरे पडणार नाही. या दुःखांनी अत्यंत दुःख होणे. (३६)

बोलाविला पंचाक्षरी । धूरमार पीडा करी ।
नाना यातना चतुरीं । आदिभूतिक जाणिजे ॥ ३७॥
पंचाक्षरी म्हणजे मांत्रिक बोलाविला असता त्याने धुराचा मारा करणे अशा नाना प्रकारच्या यातना आहेत त्या शहाण्यांनी आधिभौतिक म्हणून जाणाव्या. (३७)

दरवडे घालूनियां जना । तश्कर करिती यातना ।
तेणें दुःख होये मना । या नांव आदिभूतिक ॥ ३८॥
चोर दरोडे घालून लोकांना छळतात, त्यामुळे मनाला फार दुःख होणे. (३८)

अग्नीचेनि ज्वाळें पोळे । तेणें दुःखें प्राणी हरंबळे ।
हानी जालियां विवळे । या नांव आदिभूतिक ॥ ३९॥
अग्नीच्या ज्याळांनी होरपळल्यामुळे व्याकूळ होणे, अन्य नुकसान झाले तरी विव्हळणे. (३९)

नाना मंदिरें सुंदरें । नाना रत्नांचीं भांडारें ।
दिव्यांबरें मनोहरें । दग्ध होती ॥ ४०॥
नाना सुंदर मंदिरे अनेक रजांचे साठे, अनेक मनोहर दिव्य वस्त्रे इत्यादी जळणे. (४०)

नाना धान्यें नाना पदार्थ । नाना पशु नाना स्वार्थ ।
नाना पात्रें नाना अर्थ । मनुष्यें भस्म होती ॥ ४१॥
नाना धान्ये, नाना पदार्थ, नाना पशू घरात साठविलेले द्रव्य, भांडी- कुंडी, नाना वस्तू आणि माणसे जळून जाणे. (४१)

आग्न लागला सेती । धान्यें बणव्या आणी खडकुती ।
युक्षदंड जळोन जाती । अकस्मात ॥ ४२॥
शेते, धान्ये, गवताच्या गंजी आणि मळणीनंतर उरलेले कुठार, ऊस वगैरे अकस्मात जळून जाणे. (४२)

ऐसा आग्न लागला । अथवा कोणी लाविला ।
हानी जाली कां पोळला । या नांव आदिभूतिक ॥ ४३॥
अशी आग कोणी लावली किंवा आपोआप लागली तरी त्यामुळे नुकसान होणे किंवा भाजणे. (४३)

ऐसें सांगतां बहुत । होती वन्हीचे आघात ।
तेणे दुःखें दुःखवे चित्त । या नांव आदिभूतिक ॥ ४४॥
अशा अनेक प्रकाशने आगीपासून नुकसान होतच असते, त्या दुःखाने जीव व्याकूळ होणे. (४४)

हारपे विसरे आणी सांडे । नासे गाहाळ फुटे पडे ।
असाध्य होये कोणीकडे । या नांव आदिभूतिक ॥ ४५॥
वस्तू हरवणे, विसरणे किंवा सांडून जाणे, नासून जाणे, गहाळ होणे किंवा पडून फुटणे, परत मिळणे अशक्य होणे. (४५)

प्राणी स्थानभ्रष्ट जालें । नाना पशूतें चुकलें ।
कन्यापुत्र गाहाळले । या नांव आदिभूतिक ॥ ४६॥
माणूस स्थानभ्रष्ट होणे, जनावरे चुकणे, मुली, मुले बेपत्ता होणे. (४६)

तश्कर अथवा दावेदार । आवचितां करिती संव्हार ।
लुटिती घरें नेती खिल्लार । या नांव आदिभूतिक ॥ ४७॥
चोर किंवा शत्रू यांनी अवचित धाड घालून संहार करणे, घरे लुटणे, दुभती जनावरे पळवून नेणे. (४७)

नाना धान्यें केळी कापिती । पानमळां मीठ घालिती ।
ऐसे नाना आघात करिती । या नांव आदिभूतिक ॥ ४८॥
शेतातील उभी पिके, केळी वगैरे कापून नेणे, पानमळ्याचे नुकसान व्हावे म्हणून त्यात मीठ घालणे असे नाना प्रकारचे आघात. (४८)

मैंद उचले खाणोरी । सुवर्णपंथी भुररेकरी ।
ठकु सिंतरु वरपेकरी । वरपा घालिती ॥ ४९॥
गठीछोडे द्रव्य सोडिती । नाना आळंकार काढिती ।
नाना वस्तु मूषक नेती । या नांव आदिभूतिक ॥ ५०॥
पेंढारी, उचलेगिरी करणारे भुरटे चोर, काळीज खाणारे किमयागार, भुलविणारे ठग, लुच्चे, लबाड लोक, लुटारू दरोडेखोर इत्यादींची पीडा. वाटमाऱ्यांनी गाठोडी सोडून द्रव्य व नाना अलंकार पळविणे, उंदरांनी अनेक वस्तू नेणे. (४९-५०)

वीज पडे हिंव पडे । प्राणी प्रजंनी सांपडे ।
कां तो माहापुरीं बुडे । या नांव आदिभूतिक ॥ ५१॥
अंगावर वीज पडणे, अत्यंत थंडी पडणे, मुसळधार पावसात सापडणे, महापुरात वाहून जाणे, बुडणे. (५१)

भोवरें वळणें आणी धार । वोसाणें लाटा अपार ।
वृश्चिक गोंबी आजगर । वाहोन जाती ॥ ५२॥
भोवऱ्यात, वळणात किंवा धारेत सापडणे, पुरात वाहून येणारी लाकडे, अपार लाटा आणि महापुराबरोबर वाहून येणारे अजगर विंचू गोमा इत्यादी प्राण्यांचा त्रास. (५२)

तयामधें प्राणी सांपडला । खडकी बेटीं आडकला ।
बुडत बुडत वांचला । या नांव आदिभूतिक ॥ ५३॥
या सर्वांमध्ये माणूस सापडणे किंवा एखाद्या खडकावर अथवा बेटावर अडकणे, बुडता बुडता वाचणे. (५३)

मनासारिखा नसे संसार । कुरूप कर्कश स्त्री क्रूर ।
विधवा कन्या मूर्ख पुत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५४॥
कुरूप, कर्कश आणि निर्दय बायको मिळणे, कन्या विधवा होणे आणि पुत्र मूर्ख निपजणे, यांसारख्या कारणांनी प्रपंच मनासारखा न होणे. (५४)

भूत पिशाच्च लागलें । आंगावरून वारें गेलें ।
अबद्धमंत्रे प्राणी चळलें । या नांव आदिभूतिक ॥ ५५॥
भूतपिशाच्च लगणे अंगावरून वारे जाणे चुकलेल्या मंत्रामुळे मनुष्य भ्रमिष्ट होणे. (५५)

ब्राह्मणसमंध शरीरीं । बहुसाल पीडा करी ।
शनेश्वराचा धोका धरी । या नांव आदिभूतिक ॥ ५६॥
ब्राह्मणसंमंधाने देह झपाटून अनेक वर्षे छळणे. शनीची वाईट दशा, साडेसाती वगैरे येणे. (५६)

नाना ग्रहे काळवार । काळतिथी घातचंद्र ।
काळवेळ घातनक्षत्र । या नांव आदिभूतिक ॥ ५७॥
इतर ग्रहांची वाईट दशा येणे. काळ्यार काळतिथी, चंद्राचे घातक योग, काळवेळ आणि घातनक्षत्र यांपासून त्रास. (५७)

सिंक पिंगळा आणी पाली । वोखटें होला काक कलाली ।
चिंता काजळी लागली । या नांव आदिभूतिक ॥ ५८॥
शिंकेचा अपशकुन होणे, पाल चुकचुकणे, पिंगळा होला, कावळा, कलाली इत्यादींनी अपशकुन केल्याने चिंता, काळजी लागणे. (५८)

दिवटा सरवदा भाकून गेला । अंतरीं धोका लागला ।
दुःस्वप्नें जाजावला । या नांव आदिभूतिक ॥ ५९॥
कुडमुड्या जोशी, भविष्य सांगणारा ज्योतिषी यांनी सांगितल्यामुळे काळजी लागणे, वाईट स्वप्ने पडून त्यामुळे भय वाटणे. (५९)

भालु भुंके स्वान रडे । पाली अंगावरी पडे ।
नाना चिन्हें चिंता पवाडे । या नांव आदिभूतिक ॥ ६०॥
कोल्हेकुई, कुत्र्याचे रडणे, पाल अंगावर पडणे, इत्यादी अनेक अपशकुनांच्या योगे मनात चिंता उत्पन होणे. (६०)

बाहेरी निघतां अपशकून । नाना प्रकारें विछिन्न ।
तेणें गुणें भंगे मन । या नांव आदिभूतिक ॥ ६१॥
घराबाहेर पडताना नाना प्रकारे अपशकुन होऊन त्यामुळे मन खिन्न, उदास होणे. (६१)

प्राणी बंदी सांपडला । यातने वरपडा जाला ।
नाना दुःखें दुःखवला । या नांव आदिभूतिक ॥ ६२॥
कैदेत सापडून तेथे अनेक प्रकारच्या यातना भोगाव्या लागणे आणि त्यायोगे नाना प्रकारचे दुःख सोसावे लागणे. (६२)

प्राणी राजदंड पावत । जेरबंद चाबुक वेत ।
दरेमार तळवेमार होत । या नांव आदिभूतिक ॥ ६३॥
राजाकडून दंड किंवा शिक्षा होणे, घोड्याच्या काढण्या, चाबूक, वेताची छडी यांनी मारणे, दरीत लोटून मारणे किंवा तापलेल्या तव्यावर उभे करून मारणे. (६३)

कोरडे पारंब्या फोक । बहुप्रकारें अनेक ।
बहुताडिती आदिभूतिक । या नांव बोलिजे ॥ ६४॥
चामड्याचा चाबूक, झाडाच्या पारंब्या आणि फोक म्हणजे झाडाची सालपटे अशी मारण्याची अनेक साधने वापरून दिलेला खूप मार सोसणे. (६४)

मोघरीमार बुधलेमार । चौखुरून डंगारणेमार ।
बुक्या गचांड्या गुढघेमार । या नांव आदिभूतिक ॥ ६५॥
गुदद्वारी मेख मारणे, दारूच्या बुधल्यास बांधून आग लावून देणे. चारी बाजूंनी ताणून धरून बडग्यांनी मारणे, बुक्क्या मारणे, गचांड्या मारणे गुडघ्यावर मारणे. (६५)

लाता तपराखा सेणमार । कानखडे दगडमार ।
नाना प्रकारींचे मार । या नांव आदिभूतिक ॥ ६६॥
लाथा मारणे, चपराका मारणे, शेणमारा करणे, कानात खडे खुपसणे, दगडांनी मारणे, अशा नाना प्रकारांनी मारणे. (६६)

टांगणें टिपया पिछोडे । बेडी बुधनाल कोलदंडे ।
रक्षणनिग्रह चहूंकडे । या नांव आदिभूतिक ॥ ६७॥
टांगणे, चाप लावणे, दोन्ही हात खेचून मागे बांधणे, बेड्या घालणे, झाडाच्या बुंध्याशी नालाकृती बांधून मारणे, कोलदांडे घालणे, इकडे तिकडे जराही हलू न देणे. (६७)

नाकवणी चुनवणी । मीठवणी रायवणी ।
गुळवण्याची जाचणी । या नांव आदिभूतिक ॥ ६८॥
नाकात तीक्ष्ण पदार्थ ओतणे किंवा चुन्याचे पाणी, मिठाचे पाणी, मोहरीचे पाणी, गुळाचे पाणी नाकात, कानात वा घशात ओतल्याने यातना होणे. (६८)

जळामध्यें बुचकळिती । हस्तीपुढें बांधोन टाकिती ।
हाकिती छळिती यातायाती । या नांव आदिभूतिक ॥ ६९॥
पाण्यात बुचकळणे, हात पाय बांधून हत्तीपुढे टाकणे, गुरांप्रमाणे हाकणे, छळणे, उगाच कष्ट देणे. (६९)

कर्णछेद घ्राणछेद । हस्तछेद पादछेद ।
जिव्हाछेद अधरछेद । या नांव आदिभूतिक ॥ ७०॥
कान कापणे, नाक कापणे, हात, पाय तोडणे, जीभ कापणे, ओठ कापणे. (७०)

तीरमार सुळीं देती । नेत्र वृषण काढिती ।
नखोनखीं सुया मारिती । या नांव आदिभूतिक ॥ ७१ ॥
बाणांनी मारणे, सुळी देणे, डोळे काढणे, वृषण कापणे, नखांत सुया मारणे. (७१)

पारड्यामध्यें घालणें । कां कडेलोट करणें ।
कां भांड्यामुखें उडवणें । या नांव आदिभूतिक ॥ ७२॥
पारड्यामध्ये घालणे, कडेलोट करणे किंवा तोफेच्या तोंडी उडविणे. (७२)

कानीं खुंटा आदळिती । अपानीं मेखा मारिती ।
खाल काढून टाकिती । या नांव आदिभूतिक ॥ ७३॥
कानात खुंट्या ठोकणे, गुदद्वारी मेख मारणे, नखशिखांत अंगाचे कातडे सोलणे. (७३)

भोत आणी बोटबोटी । अथवा गळ घालणें कंठीं ।
सांडस लावून आटाटी । या नांव आदिभूतिक ॥ ७४॥
पोत्यात भरून मारणे, बोटे ठेचून मारणे, अथवा गळ्याला गळ टोचणे, तापलेल्या चिमट्याने वृषण किंवा स्तन दाबणे. (७४)

सिसें पाजणें वीष देणें । अथवा सिरछेद करणें ।
कां पायातळीं घालणें । या नांव आदिभूतिक ॥ ७५॥
उकळत्या शिशाचा रस पाजणे, विष देणे, शिरच्छेद करणे किंवा अंगावर माणसे नाचवून पायदळी तुडवून मारणे हे सर्व शिक्षेचे प्रकार (७५)

सरड मांजरें भरिती । अथवा फांसीं ने‍ऊन देती ।
नानापरी पीडा करिती । या नांव आदिभूतिक ॥ ७६॥
अंगावरील कपड्यात सरडे इत्यादी भरणे, बंद खोलीत पिसाळलेले मांजर अंगावर सोडणे, अथवा फाशी देणे, अशा नाना प्रकारांनी पीडा करणे. (७६)

स्वानप्रळये व्याघ्रप्रळये । भूतप्रळये सुसरीप्रळये ।
शस्त्रप्रळये विझप्रळये । या नांव आदिभूतिक ॥ ७७॥
कुत्री, वाघ, भुतेखेते, सुसरी, नाना शस्त्रे, अंगावर वीज पडणे वगैरेंचा अतिरेक होणे व त्यामुळे मरण ओढवणे. (७७)

सीरा वोढून घेती । टेंभें ला‍उन भाजिती ।
ऐशा नाना विपत्ती । या नांव आदिभूतिक ॥ ७८॥
अंगातील शिरा तोडणे, टेंभे लावून त्यांनी अंगाला चटके देणे. अशा नाना विपत्ती. (७८)

मनुष्यहानी वित्तहानी । वैभवहानी महत्वहानी ।
पशुहानी पदार्थहानी । या नांव आदिभूतिक ॥ ७९॥
जवळची माणसे मरणे, वित्तहानी, वैभव नाहीसे होणे, मानसन्मान यांची हानी, जनावरे मरणे, इतर चीजवस्तू नाहीशी होणे. (७९)

बाळपणीं मरे माता । तारुण्यपणीं मरे कांता ।
वृद्धपणीं मृत्य सुता । या नांव आदिभूतिक ॥ ८०॥
बालपणात आई मरणे, तरुणपणी बायको मरणे, म्हातारपणी मुलगा मरणे. (८०)

दुःख दारिद्र आणी रुण । विदेशपळणी नागवण ।
आपदा अनुपत्ति कदान्न । या नांव आदिभूतिक ॥ ८१॥
दुःख, दारिद्रय, कर्ज, परदेशी पळून जावे लागणे, लूट होऊन सर्वस्वास मुकणे, संकटे येणे, आवश्यक वस्तूंचा तुटवडा भासणे, कदन्न खायची वेळ येणे. (८१)

आकांत वाखाप्रळये । युद्ध्य होतां पराजये ।
जिवलगांचा होये क्षये । या नांव आदिभूतिक ॥ ८२॥
महामारीने हजारो माणसे मरणे व त्यामुळे हाहाकार माजणे, युद्धात पराजय होणे, जिवलग माणसे मृत्यू पावणे. (८२)

कठीण काळ आणी दुष्काळ । साशंक आणी वोखटी वेळ ।
उद्वेग चिंतेचे हळाळ । या नांव आदिभूतिक ॥ ८३॥
आधीच कठीण काळ असता त्यात दुष्काळ पडणे, मनात धास्तावलेला असता वाईट वेळ येणे, उद्वेग आणि चिंता यांमुळे हालहाल होणे. (८३)

घाणा चरखीं सिरकला । चाकाखालें सांपडला ।
नाना वन्हींत पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८४॥
घाण्यात किंवा चरकात सापडून चाकाखाली येणे, नाना प्रकारच्या आगीत सापडणे. (८४)

नाना शस्त्रें भेदिला । नाना स्वापदीं भक्षिला ।
नाना बंदीं पडिला । या नांव आदिभूतिक ॥ ८५॥
नाना शस्त्रांनी जखमा होणे. नाना श्वापदांनी खाणे, अनेक लोकांच्या कैदेत पडणे. (८५)

नाना कुवासें निर्बुजे । नाना अपमानें लाजे ।
नाना शोकें प्राणी झिजे । या नांव आदिभूतिक ॥ ८६॥
नाना प्रकारच्या वाईट स्थळी राहावे लागल्याने श्वास कोंडणे, नाना प्रकारे अपमान झाल्याने लाज वाटणे, नाना प्रकारच्या शोकांनी खंगून जाणे, या सर्वांस आधिभौतिक तापच म्हणतात. (८६)

ऐसें सांगतां अपार । आहेत दुःखाचे डोंगर ।
श्रोतीं जाणावा विचार । आदिभूतिकाचा ॥ ८७॥
याप्रकारे आधिभौतिक ताप म्हणजे दुःखाचे डोंगरच असून ते अपार आहेत. येथे जे सांगितले आहेत, त्यावरून श्रोत्यांनी आधिभौतिक तापाच्या स्वरूपासंबंधी विचार जाणून घ्यावा, असे समर्थ म्हणतात. (८७)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
आदिभौतिकतापनिरूपणनाम समास सातवा ॥ ७॥
इति श्रीदासबोधे गुरूशिव्यसंवादे ‘आदिभौतिकतापनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : आधिदैविक ताप
॥ श्रीराम ॥

मागां बोलिला आध्यात्मिक । त्याउपरीं आदिभूतिक ।
आतां बोलिजेल आदिदैविक । तो सावध ऐका ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, प्रथम आध्यात्मिक तापाचे निरूपण केले. त्यानंतर आधिभौतिक तापाचे वर्णन केले. आता आधिदैविक तापासंबंधी जे सांगतो, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे. (१)

श्लोक: शुभाशुभेन कर्मणा देहांते यमयातना ।
स्वर्गनरकादिभोक्तव्यमिदं चैवाधिदैविकम् ॥
श्लोक अर्थ- आपल्या चांगल्या-वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरकादींचे भोग भोगावे लागतात त्यांना आधिदैविक म्हणतात. (१)

शुभाशुभ कर्मानें जना । देहांतीं येमयातना ।
स्वर्ग नर्क भोग नाना । या नांव आधिदैविक ॥ २॥
लोकांना त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्माच्या योगे मरणानंतर यमयातना अथवा स्वर्ग किंवा नरकादी नाना भोग भोगावे लागतात, त्यांना आधिदैविक असे म्हणतात. (२)

नाना दोष नाना पातकें । मदांधपणें अविवेकें ।
केलीं, परी तें दुःखदायकें । येमयातना भोगविती ॥ ३॥
माणूस जिवंत असता मदांधपणाने किंवा अविचाराने नाना दोष, नाना पातके करतो, त्या वेळी त्याला काही वाटत नाही. पण त्यामुळेच त्याला दुःखदायक अशा यमयातना भोगाव्या लागतात. (३)

आंगबळें द्रव्यबळें । मनुष्यबळें राजबळें ।
नाना सामर्थ्याचेनि बळें । अकृत्य करिती ॥ ४॥
शारीरिक बळाने, द्रव्यबळाने, मनुष्यबळाने, राजबळाने किंवा इतर नाना शक्तींच्या बळाने मनुष्य जे करू नये, तेच कुकर्म करतो. (४)

नीती सांडूनियां तत्वतां । करूं नये तेंचि करितां ।
येमयातना भोगितां । जीव जाये ॥ ५॥
याप्रमाणे नीती सोडून वास्तविक जे करू नये, ते कृत्य केल्याने नंतर जेव्हा यमयातना भोगाव्या लागतात, तेव्हा जीव कासावीस होतो. (५)

डोळे झांकून स्वार्थबुद्धीं । नाना अभिळाश कुबुद्धीं ।
वृत्ति भूमिसिमा सांधी । द्रव्य दारा पदार्थ ॥ ६॥
मनुष्य अति स्वार्थबुद्धीने अंध बनून, कुबुद्धी व अतिलोभ यांमुळे अनेक दुष्कृत्ये करतो. आपल्या निर्वाहाचे साधन असलेली जी जमीन त्याला मिळालेली असते तिची हद्द वाढविणे, दुसऱ्याचे द्रव्य, बायको व इतर चीजवस्तू पळविणे. (६)

मातलेपणें उन्मत्त । जीवघात कुटुंबघात ।
अप्रमाण क्रिया करीत । म्हणौन येमयातना ॥ ७॥
अत्यंत माज चढल्याप्रमाणे उन्मत्तपणे वागणे, जीवघात, कुटुंबघात करणे इत्यादी अनुचित कृत्ये केल्याने त्याला यमयातना भोगाव्या लागतात. (७)

मर्यादा सांडूनि चालती । ग्रामा दंडी ग्रामाधिपती ।
देशा दंडी देशाधिपती । नीतिन्याय सांडितां ॥ ८॥
नीतिन्यायाची चाड न धरता मर्यादा सोडून वागले असता ग्रामाधिपती गावाला दंड करतो. देशाधिपती देशाला दंड करतो. (८)

देशाधिपतीस दंडिता रावो । रायास दंडिता देवो ।
राजा न करितां नीतिन्यावो । म्हणौन यमयातना ॥ ९॥
देशाधिपती जरनीतिन्याय-मर्यादा सोडून वागू लागला, तर त्याला राजा दंड करतो. राजा अयोग्य वागला तर त्याला देव दंड करतो. गजाने जर नीतिन्याय सोडला तर त्यालाही यमयातना भोगाव्या लागतात. (९)

अनीतीनें स्वार्थ पाहे । राजा पापी हो‍ऊन राहे ।
राज्याअंतीं नर्क आहे । म्हणौनियां ॥ १०॥
स्वार्थाने, अनीतीने वागल्यास राजालाही पाप लागते व यज्याअती नरकात जावे लागते. (१०)

राजा सांडितां राजनीति । तयास येम गांजिती ।
येम नीति सांडितां धावती । देवगण ॥ ११॥
राजाने राजनीति सोडली तर त्यास यम शासन करतो आणि यमाने नीती सोडली तर देवगण धावून येतो व त्याला शासन करतो. (११)

ऐसी मर्यादा लाविली देवें । म्हणौनि नीतीनें वर्तावें ।
नीति न्याय सांडितां भोगावें । येमयातनेसी ॥ १२॥
भगवंताने अशी मर्यादा घालून दिलेली आहे, म्हणून सदैव नीतीने वागावे. नीतिन्याय सोडून वर्तन केल्यास यमयातना भोगाव्या लागतात. (१२)

देवें प्रेरिले येम । म्हणौनि आदिदैविक नाम ।
तृतीय ताप दुर्गम । येमयातनेचा ॥ १३॥
देव यमास प्रेरणा देऊन त्याच्याद्वारे जीवाला हे भोग भोगायला लावतो, म्हणून त्यांना आधिदैविक म्हणतात. हा यमयातनेचा तृतीय ताप अत्यंत दुर्गम आहे. (१३)

येमदंड येमयातना । शास्त्रीं बोलिले प्रकार नाना ।
तो भोग कदापि चुकेना । या नांव आदिदैविक ॥ १४॥
शास्त्रांमध्ये यमदंड आणि यमयातना यांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे. तो भोग कधीही चुकवता येत नाही. त्याला आधिदैविक म्हणतात. (१४)

येमयातनेचे खेद । शास्त्रीं बोलिले विशद ।
शेरीरीं घालून, अप्रमाद- । नाना प्रकारें ॥ १५॥
माणूस जी नाना प्रकारची पापे करतो, त्याचे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवले जातात. त्या दोषास अनुसरून त्याचा स्थूल देह पडल्यावर त्याला नाना प्रकारच्या यमयातना सोसाव्या लागतात. त्यांचे अनेक प्रकार असून त्यांचे शास्त्रांत सविस्तर वर्णन करण्यात आले आहे. (१५)

पापपुण्याचीं शरीरे । स्वर्गीं असती कळिवरें ।
त्यांत घालून नाना प्रकारें । पापपुण्य भोगविती ॥ १६॥
मरणोत्तर लोकात ह्या स्थूल देहापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी पाप-पुण्याची शरीरे असतात. त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पापपुण्यानुसार ती शरीरे धारण करतो व त्या प्रमाणे नाना प्रकारचे भोग भोगतो. (१६)

नाना पुण्यें विळास । नाना दोषें यातना कर्कश ।
शास्त्रीं बोलिलें अविश्वास- । मानूंच नये ॥ १७॥
त्याने पुष्कळ पुण्य केले असेल तर त्याला स्वर्गात नाना प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते व नाना दोष, पातके केली असतील, तर कठोर यातना सोसाव्या लागतात, असे शास्त्र सांगते. त्या शास्त्रावर अविश्वास कधीही नसावा. (१७)

वेदाज्ञेनें न चालती । हरिभक्ती न करिती ।
त्यास येमयातना करिती । या नांव आदिदैविक ॥ १८॥
जे वेदाज्ञेचे पालन करीत नाहीत, हरिभक्तीही करीत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. (१८)

अक्षोभ नर्कीं उदंड जीव । जुनाट किडे करिती रवरव ।
बांधोन टाकिती हातपाव । या नांव आदिदैविक ॥ १९॥
अक्षोभ नावाचा नरक आहे, त्यात असंख्य जुने किडे वळवळ करीत असतात, पापी जीवास हातपाय बांधून त्या नरकात टाकून देतात. (१९)

उदंड पैस लाहान मुख । कुंभाकार कुंड येक ।
दुर्गंधी उकाडा कुंभपाक । । या नांव आदिदैविक ॥ २०॥
काही पापी जीवांना कुंभपाक नावाच्या नरकात टाकतात. कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे आत उदंड जागा असलेले कुंभाच्या आकाराचे एक कुंड असते, त्यात अत्यंत दुर्गंधी व उकाडा असतो. (२०)

तप्तभूमिका ताविती । जळत स्थंभ पोटाळविती ।
नाना सांडस लाविती । या नांव आदिदैविक ॥ २१॥
काही पापी जीवांना तापलेल्या भूमीवर भाजतात, काहींच्या पोटावरून जळत असलेला खांब फिरवितात किंवा शरीरास अनेक प्रकारचे चाप लावतात. (२१)

येमदंडाचे उदंड मार । यातनेची सामग्री अपार ।
भोग भोगिती पाअपी नर । या नांव आदिदैविक ॥ २२॥
यमदंडाच्या मागचे अनेक प्रकार आहेत. यातनेची साधने अपार आहेत. पापी लोकांना त्याच्या यातना भोगाव्या लागतात. (२२)

पृथ्वीमध्यें मार नाना । त्याहून कठीण येमयातना ।
मरितां उसंतचि असेना । या नांव आदिदैविक ॥ २३॥
पृथ्वीवर माराचे नाना प्रकार असले तरी यमयातना त्याहून फारच कठीण असतात. तेथील यातना थांबतच नाहीत. (२३)

चौघे चौंकडे वोढिती । येक ते झोंकून पाडिती ।
ताणिती मारिती वोढूनि नेती । या नांव आदिदैविक ॥ २४॥
चारजण चहूंकडे ओढतात, कुणी झोके देऊन पाडतात, तर कुणी ताणून धरतात. कुणी मारतात तर कुणी ओढून फरफटत नेतात. (२४)

उठवेना बसवेना । रडवेना पडवेना ।
यातनेवरी यातना । या नांव आदिदैविक ॥ २५॥
त्या प्राण्याची उठवेना, बसवेना, रडता येईना, पडता येईना, यातनेवर यातना चालूच आहेत, अशी स्थिती होते. (२५)

आक्रंदे रडे आणि फुंजे । धकाधकीनें निर्बुजे ।
झुर्झरों पंजर हो‍ऊन झिजे । या नांव आदिदैविक ॥ २६॥
जीव तेथे आक्रोश करतो, रडतो, गहिवरतो, फुसफुसतो, तेथील धक्काबुक्कीने कासावीस होतो, सारखी झुरणी लागल्याने झिजून केवळ हाडांचा सापळा शिल्लक राहतो. (२६)

कर्कश वचनें कर्कश मार । यातनेचे नाना प्रकार ।
त्रास पावती दोषी नर । या नांव आदिदैविक ॥ २७॥
कर्कश बोलणे ऐकून घ्यावे लागते, असह्य मार, अनेक प्रकारच्या यातना, यांमुळे दोषी लोकांना फार त्रास भोगावा लागतो. (२७)

मागां बोलिलां राजदंड । त्याहून येमदंड उदंड ।
तेथील यातना प्रचंड । भीमरूप दारुण ॥ २८॥
पूर्वी राजदंडाचे वर्णन केले आहे, पण त्याहूनही हा यमदंड फार भयंकर असतो. तेथील यातना फार मोठ्या अत्यंत दारुण व प्रचंड असतात. (२८)

आध्यात्मिक आदिभूतिक । त्याहूनि विशेष आदिदैविक ।
अल्प संकेतें कांहींयेक । कळावया बोलिलें ॥२९॥
श्रीसमर्थ म्हणतात की, प्रथम आध्यात्मिक आधिभौतिक तापाचे वर्णन केले. पण त्याहूनही आधिदैविक ताप फारच वेगळा व असह्य असतो. त्याची थोडी तरी कल्पना यावी म्हणून काही थोडीशी लक्षणे येथे सांगितली आहेत. (२९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आदिदैविकतापनिरूपणनाम
समास आठवा ॥ ८॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘आदिदैविकतापनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : मृत्युनिरूपण
॥ श्रीराम ॥

संसार म्हणिजे सवेंच स्वार । नाहीं मरणास उधार ।
मापीं लागलें शरीर । घडीनें घडी ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, संसार म्हणजे स्वतःच स्वार होणे, म्हणजे जीव स्वतः सच्चिदानंदस्वरूप असून त्याचे विस्मरण झाल्याने तो स्वतःला देह मानून बळेच या जन्म-मरणाच्या चक्रात सापडतो. एकदा यात जन्म घेतला की, मरण चुकत नाही. मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर कुणीच ढकलू शकत नाही. माणसाच्या शरीराला क्षणाक्षणाचे माप लागलेले आहे. क्षणाक्षणाने तो मृत्यूच्या निकट जात असतो. (१)

नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।
कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसीं विदेसीं ॥ २॥
जन्माला आल्यापासून काळ नेहमी बरोबरच असतो. पुढे काय होणार आहे, हे कुणीच सांगू शकत नाही, कुणालाच ते कळत नाही. ज्याचे जसे कर्म असेल, त्याप्रमाणे माणूस देशात अथवा परदेशात मृत्यू पावतो. (२)

सरतां संचिताचें शेष । नाहीं क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणें लागे ॥ ३॥
पूर्वसंचित पूर्णपणे संपताच एक क्षणभराचाही अवकाश मिळत नाही. अखेरची वेळ आली की निमिष भरते न भरते तोच देह सोडून जावेच लागते. (३)

अवचितें काळाचे म्हणियारे । मारित सुटती येकसरें ।
ने‍ऊन घालिती पुढारें । मृत्युपंथे ॥ ४॥
अचानक काळाचे दूत येऊन एकदम जीवाला मारत सुटतात आणि पुढे घालून मृत्युपंथाने घेऊन जातात. (४)

होतां मृत्याची आटाटी । कोणी घालूं न सकती पाठीं ।
सर्वत्रांस कुटाकुटी । मागेंपुढें होतसे ॥ ५॥
एकदा मृत्यूची धाड पडली की, कोणी पाठीशी घालू शकत नाही. सर्वांनाच काळ कुटून टाकतो. त्यात कुणाला लवकर मरण येते तर कुणाला उशिरा. (५)

मृत्युकाळ काठी निकी । बैसे बळियाचे मस्तकीं ।
माहाराजे बळिये लोकीं । राहों न सकती ॥ ६॥
मृत्युकाळ म्हणजे जणू भरभक्कम काठीच आहे. कितीही बलवान माणूस असला तरी त्याच्या मस्तकावरही तिचा प्रहार होतोच. अत्यंत बलाढ्य राजेरजवाडेही तिच्यापुढे टिकू शकत नाहीत. (६)

मृत्य न म्हणे किं हा क्रूर । मृत्य न म्हणे हा जुंझार ।
मृत्य न म्हणे संग्रामशूर । समरांगणीं ॥ ७॥
मृत्यू असे म्हणत नाही की, हा क्रूर आहे, हा झुंजार आहे किंवा हा समरांगणी संग्रामशूर आहे, (७)

मृत्य न म्हणे किं हा कोपी । मृत्य न म्हणे हा प्रतापी ।
मृत्य न म्हणे उग्ररूपी । माहांखळ ॥ ८॥
किंवा हा कोपी आहे, हा प्रतापी आहे, हा महादुष्ट असून अत्यंत उग्र स्वरूपाचा आहे, (८)

मृत्य न म्हणे बलाढ्य । मृत्य न म्हणे धनाढ्य ।
मृत्य न म्हणे आढ्य । सर्व गुणें ॥ ९॥
किंवा हा बलाढ्य आहे, हा धनाढ्य आहे किंवा हा सर्वगुणसंपन्न आहे, (९)

मृत्य न म्हणे हा विख्यात । मृत्य न म्हणे हा श्रीमंत ।
मृत्य न म्हणे हा अद्भुत । पराक्रमी ॥ १०॥
हा प्रसिद्ध आहे, हा श्रीमंत आहे व हा अद्‌भुत पराक्रमी आहे, (१०)

मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवती ।
मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ॥ ११॥
किंवा हा भूपती आहे, हा चक्रवर्ती आहे, हा तंत्रमंत्र प्रयोग जाणणारा करामती आहे, (११)

मृत्य न म्हणे हा हयपती । मृत्य न म्हणे गजपती ।
मृत्य न म्हणे नरपती । विख्यात राजा ॥ १२॥
हा अश्वांचा धनी आहे, हा गजपती आहे किंवा हा अत्यंत विख्यात राजा आहे. (१२)

मृत्य न म्हणे वरिष्ठ जनीं । मृत्य न म्हणे राजकारणी ।
मृत्य न म्हणे वेतनी । वेतनधर्ता ॥ १३॥
किंवा हा लोकांत श्रेष्ठ आहे किंवा हा राजकारणी आहे किंवा हा वेतन घेणारा किंवा अनेकांना वेतन देणारा मालक आहे. (१३)

मृत्य न म्हणे देसाई । मृत्य न म्हणे वेवसाई ।
मृत्य न म्हणे ठाई ठाई । पुंड राजे ॥ १४॥
हा देसाई आहे किंवा हा व्यवसायी आहे किंवा ठिकठिकाणचे पुंड राजे आहेत, (१४)

मृत्य न म्हणे मुद्राधारी । मृत्य न म्हणे व्यापारी ।
मृत्य न म्हणे परनारी । राजकन्या ॥ १५॥
हा राजमुद्रा धारण करणारा आहे, हा व्यापारी आहे, ही परदारा आहे किंवा ही राजकन्या आहे, (१५)

मृत्य न म्हणे कार्याकारण । मृत्य न म्हणे वर्णावर्ण ।
मृत्य न म्हणे हा ब्राह्मण । कर्मनिष्ठ ॥ १६॥
हे कार्य आहे, हे कारण आहे, हा उच्चवर्णीय आहे किंवा हा नीचवर्णाचा आहे किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे, (१६)

मृत्य न म्हणे वित्पन्न । मृत्य न म्हणे संपन्न ।
मृत्य न म्हणे विद्वज्जन । समुदाई ॥ १७॥
हा व्युत्पन्न आहे, हा संपन्न आहे किंवा सभेतील हे मोठे विद्वान पंडित आहेत, (१७)

मृत्य न म्हणे हा धूर्त । मृत्य न म्हणे बहुश्रुत ।
मृत्य न म्हणे हा पंडित । माहाभला ॥ १८॥
हा धूर्त आहे, हा बहुश्रुत आहे, हा मोठा सज्जन असून पंडित आहे, (१८)

मृत्य न म्हणे पुराणिक । मृत्य न म्हणे हा वैदिक ।
मृत्य न म्हणे हा याज्ञिक । अथवा जोसी ॥ १९॥
हा पुराणिक आहे, हा वैदिक आहे, हा याज्ञिक आहे आणि हा जोशी किंवा ज्योतिषी आहे. (१९)

मृत्य न म्हणे अग्निहोत्री । मृत्य न म्हणे हा श्रोत्री ।
मृत्य न म्हणे मंत्रयंत्री । पूर्णागमी ॥ २०॥
हा अग्निहोत्री आहे, हा श्रौतशास्त्रवेत्ता याज्ञिक आहे किंवा हा पूर्णपणे तंत्रमंत्रशास्त्र जाणणारा आहे, (२०)

मृत्य न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्य न म्हणे वेदज्ञ ।
मृत्य न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥ २१॥
हा शास्त्रज्ञ आहे, हा वेदज्ञ आहे, हा सर्वज्ञ असून सर्व जाणतो, (२१)

मृत्य न म्हणे ब्रह्मत्या । मृत्य न म्हणे गोहत्या ।
मृत्य न म्हणे नाना हत्या । स्त्रीबाळकादिक ॥ २२॥
हा ब्रह्महत्या करणारा आहे, हा गोहत्या करणारा आहे किंवा स्त्री, बाल इत्यादींची हत्या करणात आहे. (२२)

मृत्य न म्हणे रागज्ञानी । मृत्य न म्हणे ताळज्ञानी ।
मृत्य न म्हणे तत्वज्ञानी । तत्ववेत्ता ॥ २३॥
हा रागज्ञानी आहे, हा तालज्ञानी आहे किंवा हा तत्त्व जाणारा तत्त्वज्ञानी आहे, (२३)

मृत्य न म्हणे योग्याभ्यासी । मृत्य न म्हणे संन्यासी ।
मृत्य न म्हणे काळासी । वंचूं जाणे ॥ २४॥
हा योगाभ्यासी आहे, हा संन्यासी आहे. हा काळाला फसवू शकेल असा योगी आहे, (२४)

मृत्य न म्हणे हा सावध । मृत्य न म्हणे हा सिद्ध ।
मृत्य न म्हणे वैद्य प्रसिद्ध । पंचाक्षरी ॥ २५॥
हा सावध आहे, हा सिद्ध आहे, हा प्रसिद्ध वैद्य आहे किंवा हा पंचाक्षरी आहे, (२५)

मृत्य न म्हणे हा गोसावी । मृत्य न म्हणे हा तपस्वी ।
मृत्य न म्हणे हा मनस्वी । उदासीन । २६॥
हा गोसावी आहे, हा तपस्वी आहे किंवा हा मनोजयी असून विरक्त आहे, (२६)

मृत्य न म्हणे ऋषेश्वर । मृत्य न म्हणे कवेश्वर ।
मृत्य न म्हणे दिगंबर । समाधिस्थ ॥ २७॥
हा ऋषीश्वर आहे, हा कवीश्वर आहे, हा दिगंबर आहे, हा समाधिस्थ आहे, (२७)

मृत्य न म्हणे हठयोगी । मृत्य न म्हणे राजयोगी ।
मृत्य न म्हणे वीतरागी । निरंतर ॥ २८॥
हा हठयोगी आहे, हा राजयोगी आहे किंवा हा निरंतर विरक्त आहे, (२८)

मृत्य न म्हणे ब्रह्मच्यारी । मृत्य न म्हणे जटाधारी ।
मृत्य न म्हणे निराहारी । योगेश्वर ॥ २९॥
हा ब्रह्मचारी आहे, हा जलधारी आहे, हा निराहारी योगेश्वर आहे, (२९)

मृत्य न म्हणे हा संत । मृत्य न म्हणे हा महंत ।
मृत्य न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३०॥
हा संत आहे, हा महंत आहे, हा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे, (३०)

मृत्य न म्हणे हा स्वाधेन । मृत्य न म्हणे हा पराधेन ।
सकळ जीवांस प्राशन । मृत्युचि करी ॥ ३१॥
हा स्वाधीन आहे, हा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यूच खाऊन टाकतो. (३१)

येक मृत्युमार्गी लागले । येकीं आर्धपंथ क्रमिले ।
येक ते सेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२॥
काही जीव जन्मतःच मरतात, काही अर्धे आयुष्य जगून मरतात तर काही वृद्धपणी मरतात. (३२)

मृत्य न म्हणे बाळ तारुण्य । मृत्य न म्हणे सुलक्षण ।
मृत्य न म्हणे विचक्षण । बहु बोलिका ॥ ३३॥
मृत्यू हा विचारच करीत नाही की, हा बाल आहे, हा तरुण आहे, हा सुलक्षण आहे किंवा हा खूप बोलका आहे की, हा चतुर शहाणा आहे. (३३)

मृत्य न म्हणे हा आधारु । मृत्य न म्हणे उदार ।
मृत्य न म्हणे हा सुंदर । चतुरांग जाणे ॥ ३४॥
हा अनेकांचा आधार आहे किंवा हा उदार आहे, हा सुंदर असून चतुरस्त्र आहे, (३४)

मृत्य न म्हणे पुण्यपुरुष । मृत्य न म्हणे हरिदास ।
मृत्य न म्हणे विशेष । सुकृती नर ॥ ३५॥
हा पुण्यपुरुष आहे, हा हरिदास आहे किंवा हा विशेष सत्कर्म करणारा आहे. (३५)

आतां असो हें बोलणें । मृत्यापासून सुटिजे कोणें ।
मागेंपुढें विश्वास जाणें । मृत्युपंथें ॥ ३६॥
आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूपासून कोणीही सुटू शकत नाही. प्रत्येक जीवास लवकर अगर उशिरा पण निश्चितपणे मृत्युपंथानेच जावे लागते. (३६)

च्यारी खाणी च्यारी वाणी । चौयासी लक्ष जीवयोनी ।
जन्मा आले तितुके प्राणी । मृत्य पावती ॥ ३७॥
सृष्टीत असणाऱ्या जरायुज, अंडज, स्वेदज व उद्‌भिज्ज या चार प्रकारच्या प्राण्यांना परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार प्रकारच्या वाणींना, चौऱ्यांशी लक्ष जीवयोनींना म्हणजेच जे जे जन्मास येतात त्या सर्व प्राण्यांना मृत्यू चुकत नाही. (३७)

मृत्याभेणें पळों जातां । तरी मृत्य सोडिना सर्वथा ।
मृत्यास न ये चुकवितां । कांहीं केल्या ॥ ३८॥
मृत्यूला भिऊन पळून जावे म्हटले तरी मृत्यू सर्वथा सोडतच नाही. काहीही केले तरी मृत्यूला चुकविता येतच नाही. (३८)

मृत्य न म्हणे हा स्वदेसी । मृत्य न म्हणे हा विदेसी ।
मृत्य न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९॥
हा माणूस स्वदेशातील आहे की विदेशातील आहे किंवा हा निरंतर उपवास करणारा आहे, याचा विचार मृत्यू करीत नाही. (३९)

मृत्य न म्हणे थोर थोर । मृत्य न म्हणे हरिहर ।
मृत्य न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४०॥
माणूस अत्यंत थोर असला, प्रत्यक्ष हरिहर असले किंवा भगवंताचे अवतार जरी असले तरी मृत्यू त्यांना जुमानीत नाही. (४०)

श्रोतीं कोप न करावा । हा मृत्यलोक सकळांस ठावा ।
उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्यपंथें ॥ ४१॥
हे सर्व ऐकून श्रोत्यांनी राग मागू नये. हा मृत्युलोक आहे हे सर्वजण जाणतातच. जो जन्माला येतो, तो प्राणी मृत्यूच्या मार्गाने जातो हे ठरलेलेच आहे. (४१)

येथें न मनावा किंत । हा मृत्यलोक विख्यात ।
प्रगट जाणती समस्त । लहान थोर ॥ ४२॥
या बाबतीत संशय घेणे योग्य नव्हे. कारण लहान- थोर सर्वांनाच हे स्पष्ट माहीत आहे. (४२)

तथापी किंत मानिजेल । तरी हा मृत्यलोक नव्हेल ।
याकारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३॥
जरी संशय घेतला, तरी हा मृत्युलोक नाही, असे होणार आहे का ? म्हणून येथे जन्मलेला प्रत्येकजण मरणारच. (४३)

ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें ।
जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥ ४४॥
तरी हे जाणून घेऊन प्रत्येक जीवाने आपल्या आयुष्याचे सार्थकच करावे. मृत्यूने देह नष्ट झाला तरी या लोकात त्याने कीर्तिरूपाने उरावे. (४४)

येरवीं प्राणी लहान थोर । मृत्य पावती हा निर्धार ।
बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंची नये ॥ ४५॥
नाहीतर जे लहान- थोर प्राणी या जगात येतात, ते सर्व मृत्यू पावतात हे अगदी निश्चितच आहे. म्हणून आत्तापर्यंत जे काही सांगितले, ते खोटे मानूच नये. (४५)

गेले वहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे ।
गेले अगाध महिमेचे । मृत्यपंथें ॥ ४६॥
अत्यंत वैभवसंपन्न, दीर्घायुषी, ज्यांचा महिमा अगाध होता, असे सर्व शेवटी मृत्युपंथानेच गेले. (४६)

गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी ।
गेले बहुत संग्रामी । संग्रामसौरे ॥ ४७॥
अत्यंत पराक्रमी, अत्यंत कपटी, संग्रामशूर असे अनेक रणांगणांवर संग्राम करीत असतानाच गेले. (४७)

गेले बहुतां बळांचे । गेले बहुतां काळांचे ।
गेले बहुतां कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८॥
अत्यंत बलवान असलेले अत्यंत दीर्घायुषी, अनेक कुलेत अनेक कुळातील प्रसिद्ध राजे सगळे गेले. (४८)

गेले बहुतांचे पाळक । गेले बुद्धीचे चाळक ।
गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९॥
अनेक लोकांचे पालनपोषण करणारे अनेकांच्या बुद्धीला प्रेरणा देणारे मोठ्या युक्तीने तर्क करणारे तर्कवादी सगळे गेले (४९)

गेले विद्येचे सागर । गेले बळाचे डोंघर ।
गेले धनाचे कुबेर । मृत्यपंथे ॥ ५०॥
विद्येचे सागर असणारे बळाचे डोंगर असणारे, धनाचे कुबेर असणारे सगळे मृत्युपंथानेच गेले. (५०)

गेले बहुत पुरुषार्थाचे । गेले बहुत विक्रमाचे ।
गेले बहुत आटोपाचे । कार्यकर्ते ॥ ५१॥
मोठ्या पुरुषार्थाचे, अत्यंत पराक्रम गाजवलेले, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सर्व गेले. (५१)

गेले बहुत शस्त्रधारी । गेले बहुत परोपकारी ।
गेले बहुत नाअनापरी । धर्मरक्षक ॥ ५२॥
अनेक शस्त्रधारी, अनेक परोपकारी, नाना प्रकारे धर्माचे रक्षण करणारे सगळे गेले. (५२)

गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तीचे ।
गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३॥
मोठे प्रतापवान, मोठे कीर्तिमान व अत्यंत नीतीने वागणारे नीतिवंत अनेक राजेही गेले. (५३)

गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी ।
गेले बहुत वेवादी । बहुतांपरीचे ॥ ५४॥
मोठे मतवादी किंवा अनेक मतवादी, अनेक कार्यवादी, अनेक प्रकारचे वादविवाद करणारे सर्व गेले (५४)

गेलीं पंडितांची थाटें । गेलीं शब्दांचीं कचाटें ।
गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५॥
पंडितांचे समुदाय गेले शब्दाची खटपट लटपट करणारे गेले, नाना मतांचे प्रतिपादन करून अचाट वाद करणारे गेले. (५५)

गेले तापषांचे भार । गेले संन्यासी अपार ।
गेले विचारकर्ते सार । मृत्यपंथे ॥ ५६॥
तपस्वी लोकांचे समुदाय गेले, असंख्य संन्यासी गेले सारासार विचार करणारे विचारवंतही मृत्युपंथानेच गेले (५६)

गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी ।
गेले बहुत नानापरी । नाना छंद करूनी ॥ ५७॥
अनेक संसारी गेले, अनेक वेषधारी गेले. नाना प्रकारचे व्यं करणारे अनेकलोक आपला छंद करता करता गेले (५७)

गेले ब्राह्मणसमुदाये । गेले बहुत आच्यार्य ।
गेले बहुत सांगों काये । किती म्हणौनि ॥ ५८॥
ब्राह्मणांचे समुदाय गेले, अनेक आचार्य गेले, असे अनेकानेक लोक गेले. किती म्हणून सांगावे ? (५८)

असो ऐसे सकळहि गेले । परंतु येकचि राहिले ।
जे स्वरुपाकार जाले । आत्मज्ञानी ॥ ५९॥
असो. याप्रमाणे सर्व मृत्युपंथानेच गेले, फक्त जे स्वरूपाकार झाले ते आत्मज्ञानीच फक्त एकटे रहिले. (५९)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
मृत्यनिरूपणनाम समास नववा ॥ ९॥
इति श्रीदासबोधे गुरुशिव्यसंवादे ‘मृत्युनिरूपणनाम’ समास नववा समाप्त


समास दहावा : वैराग्य निरूपण
॥ श्रीराम ॥

संसार म्हणिजे माहापूर । माजीं जळचरें अपार ।
डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १॥
श्रीसमर्थ म्हणतात की, संसार म्हणजे महापूर आहे. त्यात असंख्य जलचर प्राणी आहेत. संसाराच्या महापुरात पडलेल्या जीवांना विषारी काळसर्प दंश करण्यासाठी धावत येत असतात. (१)

आशा ममता देहीं बेडी । सुसरी करिताती तडातोडी ।
ने‍ऊन दुःखाचे सांकडी- । माजीं घालिती ॥ २॥
आशा आणि ममता या बेड्या सूक्ष्म देहाला बांधून ठेवतात. जलामधील सुसरी शरीराचे लचके तोडून दुःखाच्या कपारीत घालतात. (२)

अहंकारनक्रें उडविलें । ने‍ऊनि पाताळीं बुडविलें ।
तेथुनियां सोडविलें । न वचे प्राणी ॥ ३॥
अहंकाररूपी मगर जीवाला पाताळात उंच नेऊन बुडवितो. तेथून सुटणे जीवाला शक्य होत नाही. (३)

काम =मगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना ।
मद मत्सर वोहटेना । भूलि पडिली ॥ ४॥
कामवासनेची मगरमिठी सुटत नाही. तिरस्कार मनात उत्पन होतो, तो सुटत नाही. मदमत्सर हे विकारही कमी होत नाहीत. अशा प्रकारे माणूस एक प्रकारे मोहित होतो. (४)

वासनाधामिणी पडिली गळां । घालून वेंटाळें वमी गरळा ।
जिव्हा लाळी वेळोवेळां । भयानक ॥ ५॥
वासनारूपी धामीण गळ्यात पडते. ती गळ्याभोवती वेटोळे घालून विष ओकत असते आणि वारंवार भयंकर जीभ बाहेर काढून छळत राहते. म्हणजे वासनेच्या विळख्यात जीव जखडला जातो (५)

माथां प्रपंचाचें वोझें । घे‍ऊन म्हणे माझें माझें ।
बुडतांही न सोडी, फुंजे । कुळाभिमानें ॥ ६॥
डोक्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन जीव सतत ‘माझे माझे’ म्हणत राहतो. बुडायची पाळी आली तरी कुळाभिमानाने फुगतो आणि ते ओझे काही उतरवायला तयार होत नाही. (६)

पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें ।
आलें अहंतेचें काविरें । भूतबाधा ॥ ७॥
भ्रांतीचा अंधार पडतो. त्यात अभिमानरूपी चोर सर्वस्व हरण करतो म्हणजे अज्ञानामुळे विपरीत ज्ञान अर्थात देहबुद्धी उत्पन्न होते. त्यामुळे अहंकार उत्पन्न होतो. तो भूतबाधेप्रमाणे माणसाला झपाटून टाकतो. (७)

बहुतेक आवर्तीं पडिले । प्राणी वाहातचि गेले ।
जेंहिं भगवंतासी बोभाईलें । भावार्थबळें ॥ ८॥
बहुतेक जन्ममरणाच्या भोवऱ्यात सापडून वाहातच जातात. पण काही माणसे भावार्थाच्या बळावर भगवंताचा धावा करतात. (८)

देव आपण घालूनि उडी । तयांसी नेलें पैलथडी ।
येर तें अभाविकें बापुडीं । वाहातचि गेलीं ॥ ९॥
अशा लोकांना देव स्वतः धाव घेऊन उडी घालून वाचवतो व पैलतीसवर नेतो. बाकी जे श्रद्धाहीन लोक असतात, ते बिचारे त्या महापुरात वाहातच जातात. (९)

भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोन भुलला ।
संकटीं पावे भाविकाला । रक्षितसे ॥ १०॥
भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. भाविक भक्तांचा भावार्थ पाहून तो भुलतो व संकटात धाव घेऊन भक्तांचे रक्षण करतो. (१०)

जयास भगवंत आवडे । तयाचें देवासीं सांकडें ।
संसारदुःख सकळ उडे । निजदासाचें ॥ ११॥
ज्याला भगवंत मनापासून आवडतो, त्याच्या संकटाचे ओझे भगवंतावर पडते व त्यामुळे भगवंत आपल्या अंतरंग भक्ताचे संसारदुःख सगळे नाहीसे करतो. (११)

जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे ।
धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२॥
जे ईश्वराला सर्वस्वी शरण जातात, त्यांना स्वस्वरूपानुभवामुळे मिळणारा परमानंद प्राप्त होतो. असे भाविकजन खरोखर अत्यंत धन्य होत. (१२)

जैसा भाव जयापासीं । तैसा दैव तयासी ।
जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणीमात्रांचा ॥ १३॥
ज्याचा जसा भाव असतो तसा देव त्याच्याशी वागतो. कारण प्राणिमात्रांच्या अंतर्यामीच भगवान असल्याने त्यांच्या हृदयातील भाव तो अचूक जाणतो. (१३)

जरी भाव असिला माईक । तरी देव होये माहा ठक ।
नवल तयाचें कौतुक । जैशास तैसा ॥ १४॥
भाव जर दिखाऊ असेल तर देवही महाठक होतो. देवाचे हे विशेष कौतुक आहे की, तो जशास तसा वागतो. (१४)

जैसें जयाचें भजन । तैसेंची दे समाधान ।
भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५॥
जशी ज्याची उपासना असेल तसे देव त्याला समाधान देतो. भावात जरा जरी उणीव आली तरी देव दुरावतो. (१५)

दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैस्यास तैसें भासे ।
तयाचें सूत्र असे । आपणाच पासीं ॥ १६॥
आरशात आपले प्रतिबिंब दिसते, ते बघणारा जसा असेल तसेच हुबेहूब दिसते. प्रतिबिंब कसे दिसावे याचे मर्म आपल्यापाशीच असते. (१६)

जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें ।
जरी डोळे पसरूनि पाहावें । तरी तेंही टवकारे ॥ १७॥
आपण जशी हालचाल करू, तशीच ते प्रतिबिंब करते. आपण जर डोळे वटारून पाहू लागलो, तर प्रतिबिंबही डोळे वटारून आपल्याकडे पाहाते. (१७)

भृकुटीस घालून मिठी । पाहातां क्रोधें तेंहि उठी ।
आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८॥
आपण जर रागाने कपाळाला आठ्या घालून भुवया चढवून पाहू लागलो, तर तेही क्रोधाने आपल्याकडे पाहू लागते. आपण जर हसून पाहिले तर तेही पोटी आनंदलेले दिसते. (१८)

जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाचि देव जाला ।
जो जैसें भजे त्याला । तैसाचि वोळे ॥ १९॥
ज्याचा जसा भाव असतो, त्या भावाचे प्रतिबिंब असे त्याच्या देवाचे रूप होते. जो त्याला जसा भजतो त्याप्रमाणे तो तसाच प्रसन्न होतो. (१९)

भावें परामार्थाचिया वाटा । वाहाती भक्तीचिया पेंठा ।
भरला मोक्षाचा चोहाटा । सज्जनसंगें ॥ २०॥
भावामुळेच परमार्थाच्या वाटा भक्तीच्या बाजारपेठेपर्यंत येऊन पोहोचतात. तेथे संतसज्जनांच्या संगतीत मोक्षाचा चव्हाट्यावर बाजार भरलेला असतो. (२०)

भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरी पावन जाले ।
भावार्थबळें उद्धरिले । पूर्वज तेहीं ॥ २१॥
खऱ्या भक्तिभावनेने जे भगवद्‌भजन करतात, ते भगवंताशी एकरूप होऊन पावन होतात. त्यांनी भावार्थाच्या बळावर आपल्या पूर्वजांचाही उद्धार केलेला असतो. (२१)

आपण स्वयें तरले । जनासहि उपेगा आले ।
कीर्तिश्रवणें जाले । अभक्त, भावार्थी ॥ २२॥
असे भक्त स्वतःही तरतात व लोकांच्याही उपयोगी पडतात, त्यांच्या तोंडून भगवंताची कीर्ती श्रवण करून जे अभक्त असतात, तेही भावार्थी बनतात. (२२)

धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं ।
तेहिंच येक जन्म जनीं । सार्थक केला ॥ २३॥
जे हरिभजनी लागतात, देवाची भक्ती करू लागतात त्यांची जननी धन्य समजावी. त्यांनीच जगात जन्म घेऊन आपला जन्म सार्थकी लावलेला असतो. (२३)

तयांची वर्णूं काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी ।
कासे लाऊन उतरी । पार दुःखाचा ॥ २४॥ज्यांचा कैवार प्रत्यक्ष भगवंत घेतो व स्वतः आपल्या कासेला लावून दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो, त्यांची थोरवी काय वर्णावी बरे ? (२४)

बहुतां जन्मांचे सेवटीं । जेणें चुके अटाटी ।
तो हा नरदेह भेटी । करी भगवंतीं ॥ २५॥
अनेक जन्मांच्या शेवटी ह्या नरदेहाची प्राप्ती होते. त्यायोगे सर्व यातायात चुकते. एवढेच नव्हे तर या देहातच भगवद्‌दर्शन, होऊ शकते. (२५)

म्हणौन धन्य ते भाविक जन । जेंहिं जोडिलें हरिनिधान ।
अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६॥
म्हणून ज्यांनी हरिरूपी संपत्ती जोडली, ते भाविक जन धन्य आहेत. त्यांच्या अनंत जन्मांतरींचे पुण्य फळास आले असे समजावे. (२६)

आयुष्य हेचि रत्नपेटी । माजीं भजनरत्नें गोमटीं ।
ईश्वरीं अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी ॥ २७॥
मानवाचे आयुष्य ही ज्यात सुंदर अशी भजनरत्‍ने भरलेली आहेत, अशी रत्नपेटीच आहे. यातील भजनरूपी रत्‍ने ईश्वरास अर्पण करून मानवाने आनंदाची लयलूट करावी. (२७)

हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ ।
सदा सर्वदा संतुष्ट । नैराशबोधें ॥ २८॥
हरिभक्त हा लौकिक वैभवाच्या दृष्टीने कनिष्ठ असला तरी तो ब्रह्मादी देवांपेक्षा वरिष्ठ समजावा. कारण तो दुर्लभ अशा अनासक्तीने सदासर्वदा संतुष्ट असतो. (२८)

धरून ईश्वराची कास । केली संसाराची नैराश ।
तयां भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९॥
जो संसारातील कुणाचीही आणि कशाचीही आशा न बाळगता केवळ ईश्वरावर विसंबून त्यास सर्वभावे शरण जातो, त्या भाविकांचा जगदीश आत व बाहेर सांभाळ करतो. (२९)

जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परमसुख ।
संसारसुखाचेनि पढतमूर्ख । लोधोन पडती ॥ ३०॥
ज्याला संसारातील दुःखही विवेकाच्या योगे परम सुखच वाटते, जे पढतमूर्ख असतात, ते मात्र संसारसुखाच्या आशेने संसारातच आसक्त होतात. (३०)

जयांचा ईश्वरीं जिव्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा ।
जयांचा जनावेगळा । ठेवा आक्षै ॥ ३१॥
ज्यांना ईश्वराविषयी आत्यंतिक प्रेम असते ते भक्त स्वानंद-सोहळा भोगतात. त्यांच्या आनंदाचा ठेवा अक्षय असतो. पण तो सामान्य जनांच्या आनंदापेक्षा वेगळा असतो. (३१)

ते आक्षै सुखें सुखावले । संसारदुःखें विसरले ।
विषयेरंगी वोरंगले । श्रीरंगरंगीं ॥ ३२॥
ते अक्षय सुखाने सुखावून संसारदुःखे विसरून जातात. ते निरिच्छ होतात आणि श्रीभगवंताच्या प्रेमात रंगून जातात. (३२)

तयांस फावली नरदेह पेटी । केली ईश्वरेंसिं साटी ।
येरें अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३॥
ज्यांनी देहबुद्धी देऊन ईश्वर मिळविण्याची अदलाबदल केली, त्यांनी या नरदेहाचे सार्थक केले. ही नरदेहरूपी रत्‍नपेटी त्यांनाच लाभली असे म्हणावे लागते. इतर अभागी अभाविक आपला मनुष्यदेह वाया चघालवितात (३३)

आवचटें निधान जोडलें । तें कवडिच्या बदल नेलें ।
तैसें आयुष्य निघोनि गेलें । अभाविकाचें ॥ ३४॥
अकस्मात एखाद्यास रत्‍न सापडले असता त्याने ते कवडीच्या बदल्यात घालवावे तसे अश्रद्ध लोकांचे आयुष्य कवडीमोलाने निघून जाते. (३४)

बहुता तपाचा सांठा । तीणें लाधला परीस गोटा ।
परी तो ठा‍ईंचा करंटा । भोगूंच नेणे ॥ ३५॥
एखाद्याने खूप तप करावे आणि त्याचे फळ म्हणून त्याल परिस मिळावा, पण मुळातच तो अत्यंत अभागी असल्याने त्याचा उपभोग कसा घ्यावा हेच त्याला कळत नाही. (३५)

तैसा संसारास आला । मायाजाळीं गुंडाळला ।
अंतीं येकलाचि गेला । हात झाडुनी ॥ ३६॥
त्याप्रमाणे जो या संसारात मनुष्य म्हणून जन्मूनही मायेच्या पाशात गुंडाळला जातो आणि अखेर हात झाडून सर्व काही इथेच सोडून एकटाच निघून जातो (३६)

या नरदेहाचेनि संगतीं । बहुत पावले उत्तम गती ।
येकें बापुडी यातायाती । वरपडी जालीं ॥ ३७ ॥
या नरदेहाच्या योगे अनेकांनी उत्तम गतीची प्राप्ती करून घेतली, पण काही बिचारे यातायातीतच गुंतले आणि दुःखी झाले. (३७)

या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावे संतसंगें ।
नीचयोनीं दुःख मागें । बहुत भोगिलें ॥ ३८॥
या उत्तम नरदेहाचे संतसमागम करून शक्य तितक्या लवकर सार्थक करावे. मागे अनेक नीचयोनीत आपण खूप भोगलेले आहे, याचे स्मरण ठेवावे. (३८)

कोण समयो ये‍ईल कैसा । याचा न कळे किं भर्वसा ।
जैसे पक्षी दाही दिशा । उडोन जाती ॥ ३९॥
केव्हा कशी वेळ येईल याचा भरवसा नसतो. आपण ते जाणूही शकत नाही. पक्षी जसे रात्री एखाद्या वृक्षावर एकत्र जमतात व प्रातःकाळ होताच दाही दिशांना उडून जातात, त्याप्रमाणे मानवी जीवनही आहे. (३९)

तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैसी वेळ ।
पुत्रकळत्रादि सकळ । विघडोन जाती ॥ ४०॥
तसेच हे वैभवादी सर्व जाणावे. केव्हा कशी वेळ येईल, हे कोणीही जाणू शकत नाही. वाईट वेळ आली तर बायकोमुले वगैरे सर्व सोडून जातात अथवा एखादे वेळी नष्टही होतात. (४०)

पाहिली घडी नव्हे आपुली । वयसा तरी निघोन गेली ।
देह पडतांच ठेविली- । आहे नींच योनी ॥ ४१॥
जो क्षण येताना आपण पाहतो, तो लगेच आपल्या हातून निसटून जातो. अशा प्रकारे बघता बघता आयुष्य निघून जाते आणि हा स्थूल देह पडला की नीच योनी प्राप्त होते. (४१)

स्वान शुकरादिक नीच याती । भोगणें घडे विपत्ती ।
तेथे कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२॥
कुत्रा, डुक्कर इत्यादी नीच योनीत जन्म होतो आणि दुःख भोगावे लागते. त्या योनीत गेल्यावर उत्तम गती मिळणे अशक्यच असते. (४२)

मागा गर्भवासीं आटाटी । भोगितां जालासि रे हिंपुटी ।
तेथुनियां थोरा कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३॥
मागे गर्भवासात यातना भोगताना जीव कष्टी झालेला असतो. त्यातून सुदैवाने अत्यंत कष्टाने एकदाची सुटका होते. (४३)

दुःख भोगिलें आपुल्या जीवें । तेथें कैचिं होतीं सर्वें ।
तैचेंचि पुढें येकलें जावें । लागेल बापा ॥ ४४॥
गर्भवासात जेव्हा जीव दुःख भोगतो, तेव्हा कुणी मदतीला येऊ शकत नाही. तसेच पुढे आयुष्याच्या शेवटीही जीवाला एकटेच जावे लागणार आहे ! ‘ अरे बाबा, हे लक्षात घे. ‘ (४४)

कैंचि माता कैंचा पिता । कैंचि बहिण कैंचा भ्राता ।
कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकळत्रादिक ॥ ४५॥
कुठली आई आणि कुठला बाप, कुठली बहीण आणि कुठला भाऊ ! कुठले मित्र आणि कुठली बायको ! कुठली मुलेबाळे व इतर नातेवाईक ! (४५)

हे तूं जाण मावेचीं । आवघीं सो‍इरीं सुखाचीं ।
हे तुझ्या सुखदुःखाचीं । सांगाती नव्हेती ॥ ४६॥
ही सर्व मायिक आहेत, हे तू जाणून घे. सगळी त्यांच्या त्यांच्या सुखाच्या आशेने तुझ्याभोवती गोळा झालेली आहेत. ही तुझ्या सुख-दुःखात तुला साथ देऊ शकत नाहीत. (४६)

कैंचा प्रपंच कैंचे कुळ । कासया होतोसी व्याकुळ ।
धन कण लक्ष्मी सकळ । जाइजणें ॥ ४७॥
कसला प्रपंच आणि कसले कुळ ! त्यासाठी कशाला व्याकुळ होतोस ? धनधान्य, ऐश्वर्य आदी सर्व अशाश्वत आहे. (४७)

कैंचें घर कैंचा संसार । कासया करिसी जोजार ।
जन्मवरी वाहोन भार । सेखीं सांडून जासी ॥ ४८॥
कसले घर आणि कसला संसार ! उगीच कशाला यातायात करतोस ? जन्मभर त्यांचे ओझे वाहून अखेर ते सर्व सोडून जावेच लागते. (४८)

कैंचें तारुण्य कैंचे वैभव । कैंचें सोहळे हावभाव ।
हें सकळहि जाण माव । माईक माया ॥ ४९॥
कसले तारुण्य, कसले वैभव ! कसले सोहळे आणि कसले हावभाव ! हे सर्व मायिक आहे आणि भुलवून मायेच्या पाशात अडकविणारे आहे, हे जाणून घे. (४९)

येच क्षणीं मरोन जासी । तरी रघुनाथीं अंतरलासी ।
माझें माझें म्हणतोसी । म्हणौनियां ॥ ५०॥
याच क्षणी मरून गेलास, तर रघुनाथाला अंतरलास असे समज. कारण हा देह, संसार यांना तू माझे-माझे म्हणतोस, म्हणून मी तुला हे सांगतो. (५०)

तुवां भोगिल्या पुनरावृत्ती । ऐसीं मायबापें किती ।
स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानलक्ष ॥ ५१॥
तू आत्तापर्यंत किती जन्म घेतलेस ! त्यावेळी असे आईवडील वगैरे किती झाले ? स्त्री, पुत्र, कन्या वगैरेंची गणती करू लागल्यास लक्षावधी संख्या भरेल. (५१)

कर्मयोगें सकळ मिळालीं । येके स्थळीं जन्मास आलीं ।
तें तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२॥
पूर्वकर्माच्या ऋणानुबंधाने सर्व एका स्थळी जमतात, एका स्थळी जन्म घेतात, ती तू आपली कशी रे मानलीस, पढतमूर्खा ! (५२)

तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार ।
आतां येक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३॥
तुझे म्हणून तुला वाटणारे हे शरीरही जर तुझे नाही, तर इतरांचा कसला विचार करायचा ? आता खरोखर मनःपूर्वक एका भगवंतालाच भावार्थाच्या बळाने घट्ट धरून ठेव. (५३)

येका दुर्भराकारणें । नाना नीचांची सेवा करणें ।
नाना स्तुती आणी स्तवनें । मर्यादा धरावी ॥ ५४॥
आपल्या कधीही न भरणाऱ्या पोटासाठी आपल्याला अनेक नीच लोकांची सेवा करावी लागते. त्यांची स्तुतिस्तोत्रे गाऊन त्यांच्यापुढे मर्यादेने वागावे लागते. (५४)

जो अन्न देतो उदरासी । शेरीर विकावें लागे त्यासी ।
मां जेणें घातलें जन्मासी । त्यासी कैसें विसरावें ॥ ५५॥
जो पोटाला अन्न देतो, त्याच्या सेवेत मानवी शरीर विकावे लागते. मग ज्याने हा दुर्लभ मनुष्य देह दिला, त्याला कसे काय विसरावे ? (५५)

अहिर्निशीं ज्या भगवंता । सकळ जिवांची लागली चिंता ।
मेघ वरुषे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरी ॥ ५६॥
ज्या भगवंताला रात्रंदिवस सर्व जीवांची चिंता लागलेली असते व ज्याच्या सत्तेने मेघ जलवृष्टी करतात, समुद्र आपली मर्यादा सांभाळतो, (५६)

भूमि धरिली धराधरें । प्रगट हो‍ईजे दिनकरें ।
ऐसी सृष्टी सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७॥
ऐसा कृपाळु देवाधिदेव । नेणवे जयाचें लाघव ।
जो सांभाळी सकळ जीव । कृपाळुपणें ॥ ५८॥
शेष पृथ्वी आपल्या मस्तकावर धारण करतो, सूर्य उदयास येतो, असा आपल्या सत्तामात्रेकरून जो सर्व वृष्टी चालवितो, असा परमेश्वर अत्यंत कृपाळू आहे. त्याची लीला जाणता येत नाही. कृपाळूपणे तोच सर्व जीवांचा सांभाळ करीत असतो. ५७ -८८

ऐसा सर्वात्मा श्रीराम- । सांडून, धरिती विषयकाम ।
ते प्राणी दुरात्मे अद्धम । केलें पावती ॥ ५९॥
अशा सर्वांच्या अंतर्मायी आत्मरूपाने असलेल्या श्रीरामाला सोडून जे प्राणी विषयांची इच्छा करतात, ते अत्यंत अधम दुरात्मे स्वतःच्या केलेल्या कर्मांची फळेच भोगत असतात. (५९)

रामेविण जे जे आस । तितुकी जाणावी नैराश ।
माझें माझें सावकाश । सीणचि उरे ॥ ६०॥
रामाशिवाय जी जी इच्छा करावी ती ती निरर्थकच जाणावी. ‘माझे, माझे’ करता करता शेवटी कष्टच उरतात. (६०)

जयास वाटे सीण व्हावा । तेणें विषयो चिंतीत जावा ।
विषयो न मिळतां जीवा । तगबग सुटे ॥ ६१॥
ज्याला कष्टच व्हावे असे वाटत असेल, त्याने सतत विषयांचेच चिंतन करावे. विषयाची प्राप्ती झाली नाही की, जीवाची अगदी तगमग होते. (६१)

सांडून राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन ।
त्यासी कैंचें समाधान । लोलंगतासी ॥ ६२॥
आनंदघन म्हणजे मूर्तिमंत आनंदच अशा रामाचे चिंतन करावयाचे सोडून जो मनात सतत विषयाचे चिंतन करतो, त्या विषयासक्त माणसाला समाधान कसे प्राप्त होणार ? (६२)

जयास वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनीं लागावें ।
स्वजन सकळही त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३॥
ज्याला आपल्याला सदैव सुखच लाभावे असे वाटत असेल त्याने रघुनाथभजनी लागावे आणि जे दुःखाचे मूळ आहेत, अशा सर्व स्वजनांचा त्याग करावा. (६३)

जेथें वासना झोंबोन पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे ।
म्हणौनि विषयवासना मोडे । तो येक सुखी ॥ ६४॥
ज्या वस्तू अथवा व्यक्तीच्या ठिकाणी वासना अगदी तुटून पडते, तेथे जीवाला अपाय होतो व दुःखच प्राप्त होते. म्हणून ज्याची विषयवासना नाहीशी होते, तोच माणूस सुखी होतो. (६४)

विषयजनित जें जें सुख । तेथेंचि होतें परम दुःख ।
पूर्वीं गोड अंतीं शोक । नेमस्त आहे ॥ ६५॥
विषयांपासून जे जे सुख मिळावे अशी माणूस इच्छा करतो, तेच त्याच्या परमदुःखास कारणीभूत होते. पहिल्याने ते गोड वाटते, पण परिणामी शोकदायकच ठरते, असे निश्चितपणे समजावे. (६५)

गळ गिळितां सुख वाटे । वोढून घेतां घसा फाटे ।
कां तें बापुडें मृग आपटे । चारा घे‍ऊन पळतां ॥ ६६॥
माशाला गळ गिळताना त्याला लावलेल्या आमिषाच्या लोभामुळे प्रथम सुख वाटते. नंतर तो गळ जेव्हा ओढून घेतला जातो, तेव्हा त्याचा घसा फाटून मृत्यू ओढवतो किंवा हरीण हिरवा चारा तोंडात घेऊन पळत असता बिचारे दगडावर आपटते व तोंड फोडून घेते. (६६)

तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुडी ।
म्हणौनियां आवडी । रघुनाथीं धरावी । ६७॥
त्याप्रमाणेच विषयसुखाचे आहे. पहिल्याने ते गोड वाटते, पण अंती ते वाईट परिणाम करणारे ठरते. म्हणून रघुनाथ भजनाचीच आवड धरावी. (६७)

ऐकोनि बोले भाविक । कैसेनि घडे जी सार्थक ।
सांगा स्वामी येमलोक । चुके जेणें ॥ ६८॥
समर्थांनी केलेला हा उपदेश ऐकून भाविक त्यांना विनंती करू लागले की, स्वामी ! या नरदेहाचे सार्थक कशाने होईल आणि यमलोकापासून सुटका कशी होईल हे आपण कृपा करून सांगावे. (६८)

देवासी वास्तव्य कोठें । तो मज कैसेंनि भेटे ।
दुःखमूळ संसार तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९॥
देव कोठे राहतो, मला तो कसा भेटेल, दुःखमूळ असा हा संसार काय केल्याने नष्ट होईल हे स्वामी ! मला हे सर्व सांगा. (६९)

धडपुडी भगवत्प्राप्ती- । हो‍ऊन, चुके अधिगती ।
ऐसा उपाये कृपामूर्ती । मज दीनास करावा ॥ ७०॥
प्रत्यक्ष भगवत्‌प्राप्ती होऊन अधोगती चुकेल असा उपाय कृपामूर्ती अशा आपण मज दीनाला सांगावा. (७०)

वक्ता म्हणे हो येकभावें । भगवद्भजन करावें ।
तेणें हो‍ईल स्वभावें । समाधान ॥ ७१॥
तेव्हा वक्त्याने उत्तर दिले की, एकनिष्ठ भावाने भगवद्‌भजन करावे म्हणजे त्यायोगे अगदी सहज समाधान प्राप्त होईल. (७१)

कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन ।
भगवद्भजनाचें लक्षण । मज निरोपावें ॥ ७२॥
तेव्हा श्रोता विचारतो की, भगवद्‌भजन कसे करावे ? मन कुठे एकाग्र करावे ? भगवद्‌भजनाचे लक्षण काय ? हे सर्व आपण मला समजावून द्यावे. (७२)

ऐसा म्लानवदनें बोले । धरिले सदृढ पाऊलें ।
कंठ सद्गनदित, गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३॥
असे म्लान वदनाने म्हणून श्रोत्याने वक्त्याची पावले सुदृढपणे धरली. त्याचा कंठ सद्‌गदित होऊन, दुःखाने डोळ्यांतून अश्रू गळू लागले. (७३)

देखोन शिष्याची अनन्यता । भावें वोळला सद्गु्रु दाता ।
स्वानंद तुंबळेल आतां । पुढिले समासीं ॥ ७४॥
ही शिष्याची अनन्यता पाहून व त्याचा एकनिष्ठ भाव पाहून सद्‌गुरू प्रसन्न झाले व ज्ञान देण्यास उत्सुक झाले. आता पुढील समासात या गुरुशिष्यांच्या संवादात स्वानंद उचंबोळून येईल. (७४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
वैराग्यनिरूपणनाम समास दहावा ॥ १०॥
इति श्रीदासबोधे गुरूशिष्यसंवादे ‘वैराग्यनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक तीसरा समाप्त ॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref: satsangdhara

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *